महात्मा गांधी काही समज – गैरसमज व वास्तव

-भुजंग रामराव बोबडे

  1. महात्मा गांधी व भगतसिंग

गांधी रिसर्च फाउंडेशन, जैन हिल्स, जळगाव, महाराष्ट्र येथून मा. पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन व श्री. अशोकभाऊ जैन, अजित भाऊ जैन यांच्या दूरदृष्टीकोनामुळे सुरू झालेल्या व ज्यात आत्ता पर्यंत 16 लाख पेक्षा अधिक विद्यार्थी सहभागी झाले आहेत अशा गांधी विचार संस्कार परीक्षेच्या कार्यानिमित्त महाराष्ट्र व महाराष्ट्रा बाहेरील 8 राज्यात जवळपास 1400 हून  अधिक व्याख्याने देण्याचा योग आला. ज्यात जवळपास 5 ते 6 लाख तरूणांशी, आयएएस – आयपीएस अधिकार्‍यांशी बोलण्याची, संवाद साधण्याची संधि मिळाली. यात अनेकदा असे होते की तरुण विद्यार्थी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांना पडलेला एक प्रश्न ते कायम विचारत असतात खरे म्हणजे ते अत्यंत उद्वेगाने सांगतात – “काश अगर एक बार गांधीजीने कोशिश की होति तो भगतसिंग की फासी टल जाती” परंतु त्यांना कोणी हे सांगितलेले नसते किंवा त्यांच्या वाचनात आलेले नसते की – भगतसिंगाच्या सुटकेच्या संदर्भात महात्मा गांधीजीनी त्यावेळचा व्हाईसराय लॉर्ड आयर्विन याला प्रत्यक्ष भेटले होतेच परंतु त्याला 5 पत्रेही लिहली होती. त्यात दिनांक 18 फेब्रुवारी 1931 रोजी लॉर्ड आयर्विन ला भेटून या बाबत चर्चाही केली होती. जे पत्र लिहिले होते ज्यात त्यांनी लिहिले होते की – ‘भारत व इंग्लंड या दोन देशातील प्रेमाचे संबंध सुधारायचे असतील तर सध्याची भारतीय जनतेची मागणी लक्षात घेता ब्रिटीश शासनाने हि फाशी थांबवायला हवी’. परंतु केवळ गांधीजींच्या सांगण्यावरून हि फाशी टळायची असती तर स्वतः गांधीजीना तरी इतके वर्ष कशाला जेल मध्ये रहावे लागले असते? त्यांच्या पत्नी कस्तुरबांचे जेलमध्येच अंत्यसंस्कार कशाला करावे लागले असते? परंतु या गोष्टीचा तरुणांनी कधी विचार केला का ? तसेच ज्या दिवशी भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांना सायंकाळी ७ वाजता फाशी देण्यात आली त्याच दिवशी सकाळी एक टेलिग्रामहि त्यांनी  व्हाईसरायला पाठविलेला होता तसेच स्वतः भगतसिंगांनी मला फाशीच्या शिक्षेतून माफी नको असे स्पष्टपणे सांगितले होते कारण – ‘माझ्या फासावर जाण्यानंतर या देशात त्यातून प्रेरणा घेऊन हजारो – लाखो असे तरुण तयार होतील जे देशसेवेसाठी आपला प्राण हसत हसत अर्पण करतील’ पण तरुणांना खरा भगतसिंग कळला का? हाच मोठा प्रश्न आहे जर तो कळला असता तर भगतसिंगानी अंधश्रद्धा, देशसेवा याबद्दल तरुणाचे काय कर्तव्य आहे हे जे स्वतः लिहून ठेवले आहे ते आपल्या या तरुण वर्गाने जरूर वाचावे. त्या वेळच्या पंजाब प्रांतातील आय. सी. एस. अधिकार्‍यांनी देखील ही फाशी रद्द झाली तर सरकारला सामूहिक राजीनामा देण्याची धमकी दिलेली होती. ज्या लॉर्ड आयर्विन चे सरकार इंग्लंड मध्ये अल्पमतात होते, जेथे चर्चिलचे भारताविषयी अत्यंत कठोर धोरण होते तेथे गांधीजींच्या प्रयत्नांना यश येणार नव्हते हे आपल्याला लक्षात येऊ शकते. या बाबत न्यूज क्रोनिकल लंडन च्या रॉबर्ट बर्नेस च्या डायरीतील उल्लेखही महत्वपूर्ण आहेत. तसेच 26 मार्च 1931 च्या कराची काँग्रेस मधील सरदार वल्लभाई पटेल यांचे तरुणांना उद्देशून केलेले वक्तव्यही तितकेच महत्वाचे आहे. (येथील काँग्रेस अधिवेशनासाठी गांधीजी सरदार वल्लभाई पटेल यांच्या सोबत आलेले असताना तेथील तरुणांनी त्यांना काळे झेंडे दाखविले. त्यावेळी गांधींना मागे सारून सरदार पटेल पुढे झाले व ते म्हणाले – “तुम्ही या काळ्या झेंड्यांनी आमचे स्वागत केले, त्याचा आम्ही स्वीकार करतो. पण गांधीजींनी भगतसिंगाच्या सुटकेसाठी जे प्रयत्न केले आणि व्हाईसराय आयर्विन यांची त्यांनी मनधरणी केली तिला तोड नाही.” पुढे ते म्हणाले, “स्वत: भगतसिंग तरी त्यांच्या सुटकेला तयार होते काय, हे त्यांच्या आईला विचारा. लोकांनी केलेल्या विनंतीमुळे झालेली मृत्युदंडाची शिक्षा रद्द झाली, तर आपली देशनिष्ठा बाधित होईल, असे ते म्हणाले आहेत, हे ध्यानात घ्या.” सरदार पटेलांचे म्हणणे ऐकल्यानंतर तरुणांचा तो गटच मग त्यांचे आणि गांधीजींचे स्वागत करायला उत्साहाने पुढे झाला.)   सुभाषचंद्र बोस देखील या बद्दल म्हणतात, ‘it must be admitted that Gandhi did try his very best.’

व्हाईसराय लॉर्ड आयर्विनने भारतातील नोकरी संपवून इंग्लंडला परत गेल्यानंतर त्याचे जे आत्मचरीत्र लिहून ठेवले आहे त्यात तो लिहितो – ‘There was one man who want to save Bhagatsing, Sukhdev and Rajguru But I could not do anything because of my Administration and that man was Gandhi’. इतके वाचून तरी आमचे डोळे उघडले तरी ते पुरेसे आहे.

स्वत: गांधी ज्या काळात 26 जानेवारी 1931 पर्यंत जेलमध्ये होते तरी त्यांनी त्यांना शक्य तितके प्रयत्न केलेच.  आता राहतो हा मुद्दा की ज्यांनी हे प्रश्न उपस्थीत केले / निर्माण केले त्यांच्या साथी माझाही एक छोटासा प्रश्न – ज्यांना ज्यांना तुम्ही स्वत:चा आदर्श माना ते तुमचेही नेते त्या वेळी जिवंत होते ना मग त्यांनी भगतसिंग, सुखदेव व राजगुरूंना वाचविण्यासाठी काय काय प्रयत्न केले तेही जरा पुराव्यानिशी सांगता येईल काय?

खोटी गाणी लिहून गांधी विरोध पसरविणार्‍या गोष्टींना बळी पडण्यापेक्षा जे स्वत: भगतसिंगांनी लिहिले आहे ते जरी आमच्या तरुणांनी वाचले, समजून घेतले तरी हा देश नक्कीच एक मानवता धर्म असलेला देश बनेल यात कांहीच शंका नाही. पूर्ण लेखन मिळवून नाही वाचता आले तरी किमान त्या काळातील कीर्ती वृत्तपत्रात जून व जुलै 1928 मध्ये आलेले 2 लेख तरी वाचावेत ही अपेक्षा.

  1. महात्मा गांधी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस

महात्मा गांधी व सुभाषचंद्र बोस यांच्या बद्दल देखील अनेक गोष्टी मुद्दाम चुकीच्या पद्धतीने पसरविल्या गेल्या. असे संगितले गेले की सुभाषचंद्र बोस हे जेंव्हा 1939 मध्ये काँग्रेस चे अध्यक्ष म्हणून विजयी झाले तेंव्हा गांधीजींनी हा माझा पराभव आहे असे सांगितले. परंतु स्वार्थांध राजकारण्यानी व मीच किती शहाणा आहे – किती महान इतिहासकार आहे हे दाखविणार्‍या लेखकांनी त्यांच्या मूळ वक्तव्य व लिखाणाला चुकीच्या पद्धतीने जगासमोर मांडले. खरे काय होते – 31 जानेवारी 1939 ला बारडोली येथे गांधीजींनी दिलेला हा संदेश जो यंग इंडियाच्या 4 फेब्रुवारी 1939 च्या अंकात छापला आहे तो असा – ‘मै सुभाष बाबू की विजय से खुश हुं….लेकीन मौलाना अबुल कलाम आझाद द्वारा अपना नाम वापस लेने के बाद भी डॉ. पट्टाभी को चुनाव से हटनेकी सलाह मैने दी थी, इसलिए यह हार उनसे जादा मेरी है.’ गांधी आगे लिखते है, ‘इस हार से मै खुश हुं…. सुभाष बाबू अब ऊन अब ऊन लोगों की कृपा के सहारे अध्यक्ष नही बने है बल्की चुनाव जितकर अध्यक्ष बने है. ऊनकी राय मे ऊनका कार्यक्रम और ऊनकी नीती दोनो अत्यंत अग्रगामी है, अल्पमत के लोग उसकी सफलता ही चाहेंगे.’

आता यावरून अभ्यासक हे समजु शकतात की किती खोटारडा प्रचार केला जात आहे!

दुसरी महत्वाची बाब म्हणजे एका फार मोठ्या पदावर असलेल्या व्यक्तीने सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर मराठीत एक फार मोठी कादंबरी लिहिली ज्यात त्यांनी नेताजींना नायक दाखवायचे तर व्हिलन म्हणून गांधीजींची प्रतिमा रंगविली. परंतु त्यांनीच 14 डिसेंबर 2014 रोजी दिव्य मराठी वृत्तपत्रात लिहिलेल्या लेखात मात्र कादंबरीच्या अगदी उलट माहिती लिहिली आहे हे मात्र न उडगलणारे कोडे आहे.

आता कांही महत्वाच्या घटना पहा म्हणजे सत्य लक्षात येईल.

ज्या वेळी सुभाष बाबूंना ब्रिटिश सरकारने अटक केली त्यावेळी त्यांनी एक लेख 26 मे 1927 रोजी यंग इंडिया मध्ये लिहिला ज्यात ते लिहितात – ‘इस दुख:द मामले से भी आगर कोई सांत्वना की चीज दुंढ निकालना चाहे, तो उसे एक चीज जरूर मिल जायेगी और वह यह कि अंतिम क्षण तक श्रीयुत सुभाषचंद्र बोस सरकार द्वारा समय – समय पर रखी गई अपमान भरी शर्तो को बडी जंवामर्दी के साथ इन्कार करते रहे. अब हमे आशा और प्रार्थना करनी चाहीए कि परमात्मा उन्हे फिर स्वस्थ करे और वे चिरकाल तक अपने देश की सेवा करते रहे.’

पुन्हा एकदा जेंव्हा सुभाष बाबुना अटक करण्यात आली त्यावेळी 9 जुलै 1940 रोजी सेवगराम असताना लिहितात – ‘सुभाष बाबू जैसे महान व्यक्ति की गिरफ्तारी कोई मामुली बात नही है. लेकीन सुभाष बाबू ने अपनी लडाई की योजना काफी सोच-समझकर और हिम्मत के साथ सामने रखी है. वे मानते है कि ऊनका तरीका सबसे अच्छा है…उन्होने मुझे बडी आत्मीयता से कहा कि जो कुछ कार्यसमिति नही कर पाई, वे वह सब करके दिखा देंगे. वे विलंब से ऊब चुके थे. मैने उनसे कहा कि अगर आपकी योजना के फलस्वरूप मेरे जीवन-काल मे स्वराज्य मिला तो आपको बधाई का सबसे पहला तार मेरी और से ही मिलेगा. आप अपना संघर्ष चला रहे होंगे उस दौरान अगर मै आपके तरीके का कायल हो गया तो मै पुरे दिल से अपने नेता के रूप मे आपका स्वागत करूंगा और आपकी सेना मे भरती हो जाऊंगा.’

सुभाष बाबू यांची प्रशंसा करताना गांधीजींनी लिहिले आहे जर या भारत देशाला हुकूमशहा देण्याची वेळ आलीच तर पहिला हुकूमशहा म्हणून मी सुभाषचंद्रांचीच निवड करीन. त्याच बरोबर 23 ऑगस्ट 1946 रोजी जेंव्हा सुभाषचंद्र बोस यांचा विमान अपघातात मृत्यू झाल्याची बातमी त्यांना कळली तेंव्हा ते उरळी कंचन येथील आश्रमात होते व त्या वेळी सायंकाळच्या प्रार्थनेची वेळ होती शेजारी तिरंगी झेंड्याचे निशाण फडकविले जायचे, बातमी कळल्याबरोबर त्यांनी आपली प्रार्थना आटोपती घेतली व रडवेले होत ते म्हणाले, ‘तो झेंडा जरा उतरवा, माझा मुलगा गेला.’  24 फेब्रुवारी 1946 च्या ‘हरिजन’ या वृत्तपत्रात गांधीजी लिहितात – ‘आझाद हिंद फौज का जादू हमपर छा गया है. नेताजी का नाम सारे देश मे गुंज रहा है. वे अनन्य देशभक्त है. ऊनकी बहादूरी उनके सारे कामों मे चमक रही है. ऊनका उद्देश महान था…. नेताजी और ऊनकी फौज हमे जो सबक सिखाती है, वह तो त्याग का, जाति-पाति के भेद रहित एकता का और अनुशासन का सबक है. अगर ऊनके प्रति हमारी भक्ति समझदारी की और विवेकपूर्ण होगी तो हम ऊनके इन तीनो गुणो को पुरी तरह अपनाएंगे ’.

27 एप्रिल 1947 रोजी आझाद हिंद फौजेच्या जवानांशी बोलताना गांधीजी म्हणतात – ‘सुभाष बाबू तो मेरे पुत्र के समान थे. उनके और मेरे विचारों मे भले ही अंतर रहा हो, लेकिन उनकी कार्यशक्ति और देशप्रेम के लिए मेरा सिर ऊनके सामने झुकता है.’ त्यांच्या निधनानंतर देखील गांधीजी सुभाष बाबू यांचा सुभाष असा कधीही एकेरी उल्लेख करीत नसत तर ते ‘नेताजी’ असा आदराने उल्लेख करीत असत.

आता थोडे आपण नेताजी सुभाषचंद्र बोस यांचाही संदेश पूर्णपणे समजून घेऊ जो त्यांनी गांधीजींच्या जन्मदिनी 2 ऑक्टोबर 1943 रोजी बँकोंक रेडियो वरून प्रसारित केला होता – ‘…. मन की शून्यता के ऐसे ही क्षणो मे महात्मा गांधी का उदय हुआ. वे लाए अपने साथ असहयोग का, सत्याग्रह का एक अभिनव, अनोखा तरीका. ऐसा लगा मानो उन्हे विधाता ने ही स्वतंत्रता का मार्ग दिखाने के लिए भेजा था. क्षण भर मे, स्वत: ही सारा देश उनके साथ हो गया. हर भारतीय का चेहरा आत्मविश्वास और आशा से दमक गया. अंतिम विजय की आशा फिर सामने थी. आने वाले बीस वर्षो तक (1920 – 21 मध्ये गांधीजींचा खर्‍या अर्थाने काँग्रेस मध्ये प्रवेश झालेला होता तेंव्हा पासून 20 वर्षे) महात्मा गांधी ने भारत की मुक्ति के लिए काम किया और उनके साथ काम किया भारत की जनता ने. ऐसा कहने मे जरा भी अतिशयोक्ति नही होगी कि यदि 1920 मे गांधीजी आगे नही आते तो शायद आज भी भारत वैसा ही असहाय बना रहता. भारत की स्वतंत्रता के लिए उनकी सेवांए अनन्य, अतुल्य रही है. कोई अकेला व्यक्ति उन परिस्थितीयों मे एक जीवन मे उतना कुछ नही कर सकता था.’ दि. 6 जुलै 1944 रोजी सुभाषबाबूनी प्रत्यक्ष गांधीजींना उद्देशून रेडियो वर एक भाषण केले. त्यात त्यांनी गांधीजींचा उल्लेख ‘राष्ट्रपिता’ असा केला. तसेच देशाच्या स्वातंत्र्यासाठी सुरू केलेल्या लढ्याला गांधीजींचे आशीर्वाद मागितले. नेताजी सारखा एक महान सेना नायक जर त्यांचे गांधीजीशी मनभेद असते (मतभेद जरूर होते पण मनभेद कधीच नव्हते, एकमेकाबद्दल मनात वैरभाव कधीच नव्हता) तर त्यांनी कधीच असे उद्गार काढले नसते.

परंतु ज्यांनी सुभाष बाबूनी भेटण्याची इच्छा व्यक्त केली असताना व त्यासाठी स्वत:चे सहाय्यक पाठवले असताना त्यांना साधी भेटण्याची वेळही दिली नाही अशाच लोकांनी गांधीजी व सुभाष बाबू यांच्या संदर्भात अनेक खोट्या अफवा निर्माण करून केवळ द्वेष पेरण्याचे काम केले. नाहीच गांधीजी समजून घ्यायचा तरी कांही हरकत नाही पण नेताजींनी मानवतेसाठी जो महान त्याग, धार्मिक एकता व खर्‍या अनुशासनाचा जो पाठ आम्हाला दिला आहे तेवढा जरी आम्ही शिकू शकलो तरी पुरेसे आहे.

  1. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर

अजून एक महत्वाचा मुद्दा जो नेहमी समोर येतो तो म्हणजे – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांच्यासाठी वेगळ्या मतदारसंघाची मागणी केली होती त्याला गांधीजीनी विरोध केला व त्यांनी अस्पृश्यता निवारण्यासाठी काहीही कार्य केले नाही’. खरे म्हणजे त्याकाळी जी परिस्थिती होती ती अभ्यासने खूप महत्वाचे आहे. सायमन कमिशन समोर बाबासाहेबांनी वेगळे मतदारसंघ नको अशी मागणी का केली होती? त्यानंतर दुसऱ्या गोलमेज परिषदेत त्यांनी वेगळे मतदारसंघ का मागितले तसेच पुणे कराराच्या आधी या देशात बेबनाव निर्माण होईल अश्या राजा-मुंजे करारावर बाबासाहेबांचा विरोध असतानाही कोणी व का सह्या केल्या होत्या? गांधीजींचे नेमके म्हणणे काय होते व त्याबद्दल बाबासाहेबांनी मिरज, जुहू चौपाटी, मुंबई येथील पुणे करार झाल्यानंतर जी भाषणे केली आहेत त्यात काय म्हंटले आहे? हे सर्व अभ्यासने अधिक गरजेचे आहे.

आंबेडकर आणि गांधी या दोघांचे टारगेट ऑडियन्स वेगवेगळे होते हे लक्षात घ्यायला हवे. गांधी सवर्णांना जातीय जोखडातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होते, तर आंबेडकर दलित बांधवांना गुलामगिरीच्या मानसिक भूमिकेतून. दोघांच्या भुमिका एकमेकांना पुरक होत्या. गांधीजी हे आंबेडकरांप्रमाणे विद्वान, अभ्यासक किंवा संशोधक निश्चितच नव्हते. पण त्यांना उभ्या देशाबद्दल कळकळ प्रेम आणि जिव्हाळा होता. केवळ दलित बांधवांचे भले करणे हा गांधीसमोरचा एकमेव कार्यक्रम कधीच नव्हता पण उच्च निचतेला आणि मुख्यत: अस्पृश्यतेला त्यांचा विरोध पहिल्या पासून होता.

गांधी नसते तर… तर आंबेडकरांना सवर्णांकडुन खुप स्ट्रॉंग रिऍक्शन मिळाली असती. आणि त्याने जातीय तेढ आणखी वाढली असती. गांधींमुळे सवर्णांमधे ते करत असणाऱ्या अन्यायाची जाणीव निर्माण होत होती आणि त्यामुळेच आंबेडकरांना समजुन घेण्याची भुमिका आपल्या एकुणच राजकीय कार्यकर्त्यांमधे निर्माण होत होती.

१९१५ साली आपल्या आश्रमात हरिजन परिवाराला प्रवेश देण्यापासुन गांधींचे अस्पृश्यता निवारणाचं काम सुरु झालं होतं. वधूवरांपैकी एक सवर्ण आणि एक अस्पृश्य असणा-या विवाह समारंभास उपस्थित राहण्याची केलेली प्रतिज्ञाही त्यांनी शेवटपर्यंत पाळली. अस्पृश्यता निवारणाचा प्रचार अधिक प्रभावीपणे करण्यासाठी इंग्रजीत “हरिजन”, हिंदीत “हरिजन सेवक”, व गुजरातीत “हरिजन बंधु” ही साप्ताहिकं त्यांनी सुरु केली. या सर्व पत्रांचं काम गांधी स्वत: करत होते. एकादशव्रतातही त्यांनी अस्पृश्यतानिवारणाच्या व्रताचा समावेश केला होता. येरवडा जेलमधुन सुटल्यावर गांधींनी हरिजनयात्रा काढली होती. हरिजन सेवक संघ स्थापन करुन फंड गोळा केला होता. कधी काळी वर्णाश्रम मानणारे गांधी “हरिजन सेवक” बनले होते.

गांधीजी वर्णाश्रम मानत होते ही १९१५ पुर्वीची बाब आहे. का मानत होते याची कारणे तुम्हाला त्याच्या बालपणीच्या संस्कारात मिळतील. गांधीजींची वर्णाश्रमाबद्दलची मते कालांतराने बदलत गेली.

ब्रिटिशांना दिलेल्या सायमन कमिशनच्या निवेदनात बाबासाहेब लिहितात  – ” १ ) आज अस्पृश्य समाजाच्या समस्या वेगळ्या असल्याने ते हिंदु समाजापासून वेगळे आहेत २) मात्र अस्पृश्यांसाठी मागितलेल्या मागितलेल्या सवलती तात्पुरत्या आहेत. सर्व भारत शेवटी एका व्हावा. ” (गोखले ११८) या काळात आंबेडकरांनि विभक्त  मतदार संघाला कडाडून विरोध केलेला आहे.  आणि राखीव जागा मागितलेल्या आहेत.   निवेदनात बाबासाहेब म्हणतात – विभक्त मतदार संघ हे लोकशाहीच्या मुळावरच घाव घालतात. विभक्त मतदार संघात निवडुन गेलेले उमेदवार सभागृहात सर्वांसाठीच कायदे करतात . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांबद्दल कायदे करण्याचा हक्क विभक्त मतदार संघातल्या उमेदवारांना मिळतो . ज्यांनी निवडुन दिले नाही त्यांवर राज्य करणे हि कुठली लोकशाही ?  (Dr Ambedkar Writings and Speeches. Vol 2 pg 344 – 366, 1982) ह्या निवेदनात बाबासाहेबांचा लोकशाहीवाद आणि राष्ट्रवाद अनेकवार व्यक्त झाला आहे.

सायमन आयोगापुढे ३७ दलित संघटना गेल्या होत्या.  त्यापैकी ३५ संघटनांनी विभक्त मतदार संघांची मागणी केली होती.  बाबासाहेबांनी आपले वैयक्तिक मत बाजूला ठेवत पुढे लोकमताला मान दिला. (खैरमोडे ४ – १४१. १४२) आणि गोलमेज परिषदेत बाबासाहेबांनी दलितांना विभक्त मतदार संघ मागितले.  लोकमताच्या रेट्यात बाबासाहेबांनी बदललेला हा निर्णय आहे.  इथे एक लक्षात ठेवले पाहिजे की आंबेडकर हे केवळ विचारवंत नाहीत ते एक राजकारणीही आहेत. जे बाबासाहेबांबद्दल खरे आहे ते गांधी बद्दल हि खरे आहे.

बाबासाहेब काँग्रेस मध्ये का आले याचे अनेक चुकीचे संदर्भ दिले जातात त्या सर्वांनी बाबासाहेबांचे दिनांक 28 एप्रिल 1948 रोजी जवाहरलाल नेहरू यांना लिहिलेले पत्र जरूर वाचावे. तसेच गांधीजींनी बाबासाहेबांना दिनांक 6 ऑगस्ट 1944 रोजी जे पत्र लिहिले होते त्यात ते लिहितात – ‘I know your great ability and I would love to own you as a colleague and co-worker. But I must admit my failure to come nearer to you. If you can show me a way to common meeting ground between us, I would like to see it. Meanwhile, I must reconcile myself to the present unfortunate difference.’ या व इतरही अनेक पत्रातून हे दिसून येते की  महात्मा गांधी व डॉ. बाबाबासाहेब आंबेडकर यांच्यात मतभिन्नता व कार्याची प्राथमिकता नक्कीच वेगवेगळी होती परंतु त्यांच्यात मनभेद कधीच नव्हते हे गांधीजीच्या हत्येनंतर बाबासाहेबांनी संसदेत त्यावेळी जे भाषण केले होते त्यावरून स्पष्ट दिसून येते. या भाषणात ते म्हणतात – “गांधीजीको खोकर वस्तुतः भारतने अपना बहुत कुछ खो दिया है. मानवताको उनके उपर गर्व था. दलितो और पिडीतो का एक सहारा चला गया. उनका जीवनहि परोपकार के लिये था; वे उसीके लिये जिये और उसीके लिये मरे. भारतीय राजनीतीको उनकी देन अमर है और है प्रेरणात्मक.”

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे हे उद्गार, त्यांचे 6 सप्टेंबर 1954 रोजी राज्यसभेत केलेले महात्मा गांधीजी व त्यांच्या अस्पृश्यतेसंबंधीच्या कार्याबद्दलचे भाषण बाबासाहेबांच्याच शब्दात जरूर वाचावे. (जे डॉ. नरेंद्र जाधव सरांच्या बोल महामानवाचे, खंड क्र. 2 मध्ये पृ. क्र. 134-135 वर तसेच बाबासाहेब आंबेडकर कार्य व भाषणे खंड क्र 15 मध्ये पृ क्र 895 – 896 यात प्रकाशित केलेले आहे)  तसेच तत्कालीन जगातील बुद्ध धर्माचे महान अभ्यासक महापंडित राहुल सांकृत्यायन, नोबेल विजेते ज्यू. मॉर्टीन ल्युथर किंग, नेल्सन मंडेला, बराक ओबामा यांनी गांधीजींच्या कार्याबद्दल काढलेले उद्गार हे गांधींच्या अस्पृश्यता चळवळीचे कार्य अधोरेखीत करण्यासाठी पुरेसे आहेत.

  1. महात्मा गांधीजींची हत्या व 55 कोटींचा प्रश्न

55 कोटींसाठी गांधीजींनी उपोषण केले आणि त्यामुळे गांधीजींची हत्या करण्यात आली असा खोटा प्रचार जाणीवपूर्वक आजही केला जातो.

12 जानेवारी, 1948 च्या दुपारी गांधीजींनी आपला उपोषणाचा बेत जाहीर केला, तेव्हा ‘हिंदू-मुस्लीम ऐक्य’ एवढेच कारण नमूद करण्यात आले होते. त्याच दिवशी संध्याकाळी गांधीजी माऊंटबॅटन यांना भेटायला गेले असताना, माऊंटबॅटन यांनीच हा 55 कोटींचा विषय गांधीजींशी बोलताना काढला. माऊंटबॅटन याबद्दल म्हणतात, ‘‘मीच 55 कोटींचा मुद्दा गांधीजींना सांगितला. तोपर्यंत त्यांनी या विषयाबद्दल काही ऐकलेदेखील नव्हते.’’ (Mountbatten and Partition of India- लॅरी कॉलिन्स व डॉमिनिक लॅपिए, पृ. 50). 55 कोटी रुपये पाकिस्तानला द्यावेत, असा आग्रह लॉर्ड माउंटबेटन, राजा गोपालाचारी आणि तेव्हाचे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर चिंतामणराव देशमुख यांनी धरला होता. मग एकट्या गांधींचाच खून का?

13 जानेवारी 1948 ला गांधीजींचे उपोषण सुरु झाले. 14 जानेवारीला सरकारने 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने एकमताने घेतला. तरीही गांधीजींचे उपोषण 14-15 किंवा 16 तारखेला सुटले नाही. ते 18 जानेवारीला सुटले. कारण गांधीजींचे उपोषण 55 कोटींसाठी नव्हते. उपोषण मागे घेताना गांधीजींनी ज्या सात गोष्टींची हमी घेतली, त्यात 55 कोटींचा उल्लेख नव्हता. (संदर्भ: महात्म्याची अखेर, जगन फडणीस, पृ. 43) कारण 55 कोटी रुपयांसाठी गांधींनी उपोषण केले हा चुकीचा प्रचार असमर्थनीय गांधी खुनाचे समर्थन करण्यासाठी केलेला कांगावा आहे.

जर 55 कोटी रुपये पाकिस्तानला देणे अन्याय्य होते आणि त्याने मोठा लोकक्षोभ निर्माण झाला होता, असे काहीजण म्हणतात, तर ज्या मंत्रीमंडळाने हे पैसे पाकिस्तानला देण्याचा निर्णय एकमताने घेतला, त्या मंत्रीमंडळात हिंदुमहासभेचे राष्ट्रवादी नेते डॉ. शामाप्रसाद मुखर्जी मंत्री होते. त्यांनी या ठरावाला विरोध का केला नाही? किंवा ते मंत्रीमंडळातून राजीनामा देवून बाहेर का पडले नाहीत?

गांधी हत्येचा कट 1 जानेवारी 1948 पूर्वी कधीतरी रचण्यात आला, हे न्यायालयाने सिद्ध मानले आहे. 55 कोटी रुपये पाकिस्तानला देण्याचे प्रकरण 12 जानेवारी 1948 नंतरचे आहे. 55 कोटींसाठी गांधी उपोषण करणार आहेत, याची आकाशवाणी झाली होती काय? आणि गांधींवर काय एकच खुनी हल्ला झाला काय? स्वातंत्रपूर्व काळातही गांधींवर एकूण पाच खुनी हल्ले झाले ही कपूर कमिशनपुढे आलेल्या साक्षीवरून सिद्ध झाले आहे.

पहिला हल्ला 25 जून 1934 रोजी गांधीजी पुण्यात आले होते, तेव्हा त्यांचा गाडीवर बॉम्ब टाकून करण्यात आला. गांधी मागच्या गाडीत होते म्हणून वाचले. तेव्हा फाळणी होऊ घातली होती का? 55 कोटींचा प्रश्न उपस्थित झाला होता का? सप्टेंबर 1944 मध्ये महात्मा गांधी सेवाग्राम आश्रमातून रेल्वेने मुंबईस निघाले असताना हिंदुसभेच्या कार्यकर्त्यांनी महात्मा गांधींना धक्काबुक्की केली. त्यावेळी पोलिसांनी नथुराम गोडसे आणि थत्ते यांच्याकडून जांबिया जप्त केला. (संदर्भ: महात्मा गांधी: द लास्ट फेज, प्यारेलाल, तळटीप, पृ. 713) तेव्हा फाळणी होऊ घातली होती का? 55 कोटींचा प्रश्न उपस्थित झाला होता का?

29 जून 1946 रोजी महात्मा गांधी मुंबईहून पुण्याला रेल्वेने येत असताना नेरळ-कर्जत दरम्यान गाडी पूर्ण वेगात असताना महात्मा गांधींना अपघातात ठार मारण्याच्या हेतूने रेल्वे रुळावर मोठे मोठे दगड टाकण्यात आले होते. इंजिन ड्रायव्हरच्या प्रसंगावधानाने मोठा अपघात टळला. रेल्वे इंजिनाचे नुकसान झाले. त्या मार्गावरून त्यावेळी गांधीजींच्या गाडीशिवाय कोणतीही गाडी किंवा मालगाडी जाणार नव्हती. म्हणजे गांधींचा अपघात करण्यासाठीच हे दगड टाकण्यात आले होते ते स्पष्ट आहे. ) तेव्हा फाळणी होऊ घातली होती का? 55 कोटींचा प्रश्न उपस्थित झाला होता का? ज्यांना या देशात धार्मिक ऐक्य नको होते त्यांनी गांधीजीच्या शरीराला संपविले.

माझ्या सर्व संघनिष्ठ बंधुनो विनायक दामोदर सावरकर हे जेव्हा अंदमान च्या जेल मध्ये होते तेव्हा गांधीजीनी त्यांच्या संबंधी लिहिलेले हे पत्र वाचा –

कॅपिटल पत्रात ‘डिचर’ या लेखकाने या शूर बंधूंवर चिखल उडवला आहे. त्याने एका सावरकर बंधूवर असा आरोप केला आहे की, तुरुंगवासाच्या काळात त्याने बिनतारीचा (वायरलेस) दुरुपयोग केला व शत्रूबरोबर व्यूह रचला. त्यांनी तपशीलही दिला आहे. जणू काय लेखकाला तो परिच्छेद लिहिण्याकरिता सरकारीरीत्या उद्धयुक्त करण्यात आले. जर आरोप खरा असेल तर सरकारने खऱ्या गोष्टी उजेडात आणाव्यात. आहे त्या परीस्थितीत लोकांच्या दृष्टीने त्या बंधूंची बे-अब्रू झाली आहे. ते असहकारितावादी नाहीत. आपण पूर्णपणे निरपराधी आहोत असा त्यांचा दावा आहे. आणि त्यांना त्या पत्राविरुध्द सहज इलाज करता येईल. ते काहीही असो, डॉक्टर सावरकर मला कळवितात की, गणेश दामोदर सावरकर याने माफी धरून १४ वर्ष २ महिने शिक्षा भोगली आहे. आणि कायद्याप्रमाणे त्यांची सुटका व्हावयास पाहिजे आहे. इंडियन पिनल कोडचे ५५ वे कलम म्हणते: ज्या प्रत्येक खटल्यात जन्मठेपेची शिक्षा दिली असेल त्या बाबतीत हिंदुस्थान सरकारला किंवा जेथे आरोपीला शिक्षा झाली असेल तेथील सरकारला गुन्हेगाराच्या संमतीशिवाय कोणत्याही प्रकारची शिक्षा कमी करता येईल. पण ती चौदा वर्षापेक्षा जास्त असणार नाही.

या कलमाप्रमाणे हे स्पष्ट होते की, गणेश दामोदर सावरकर यांना दोन महिन्यापूर्वीच सोडावयास पाहिजे होते. त्या बंधूना अंदमानातून हलविल्यामुळे, मी जे कलाम उद्धृत केले ते त्यांच्या बाजूने अमलात आणावयास पाहिजे. आणि त्यांना चौदा वर्षापेक्षा अधिक काळ अटकेत ठेवता कामा नये. हे उदाहरण उजेडात आणण्याचे कार्य एका प्रेमळ बंधूच्या परिश्रमामुळे झाले.’ (Collected Works of Mahatma Gandhi, Vol. no. 20, Page no. 283)

या सोबतच सावरकरांची जेलमधून ब्रिटिश सरकारने सुटका करायला हवी असा ठराव गांधीजींनी दोन वेळा अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये पास करून घेतला होता. खरेच ज्यांना गांधी इतकाही समजून घेता आला नाही त्यांनी किमान सावरकरांचा विज्ञाननिष्ठ दृष्टीकोन, हिंदुस्थानात राहून या राष्ट्रावर प्रेम करणारा मग तो कोणत्याही जाती-धर्माचा असो तो हिंदुस्थानी हा त्यांचा दृष्टीकोन, अस्पृश्यता निवारणाचे त्यांचे कार्य एवढे कधी तरी आचरणात आणून दाखवा. केवळ सोईसाठी सावरकरांच्या नावाचा वापर करू नका.

  1. महात्मा गांधीजीना स्वतःचा आदर्श मानणारे, त्यांच्या गौरवपर लेखन करणारे, भाषणात त्यांच्या बद्दल गौरवोद्गार काढणाऱ्या महनीय व्यक्ती व संस्था

या देशातील कांही अत्यंत मान्यवर विद्वान (गल्ली ते दिल्ली पर्यंतचे) जे उठसूट गांधीबद्दल अत्यंत गलीच्छ विचार प्रकट करत असतात व ते करत असताना जी भाषा वापरून आपली नैतिक व सांस्कृतिक  पातळी जगासमोर प्रकट करत असतात त्या सर्व विद्वजनासाठी ……

 

नोबेल पारितोषक विजेते व आंतरराष्ट्रीय प्रभावी व्यक्ती

  • अल्बर्ट आईन्स्टाईन २. नेल्सन मंडेला ३. ज्यू. मार्टिन ल्युथर किंग ४. रविंद्रनाथ टागोर

५. मदर टेरेसा ६. आंग सांग स्यू की ७. अमर्त्य सेन ८. मलाला युसुफझाई ९. कैलाश सत्यार्थी

१०. लिओ टालस्टाय   ११. दलाई लामा १२. चार्ली चॅप्लीन  १३.बराक ओबामा १४. सामदोंग रींपोछे  १४. जॉर्ज बर्नाड शॉ १५. उं थाट १६. कोफी अन्नान  १७. वेब मिलर  १८. लॉर्ड अॅटनबरो

ऐतिहासिक महान भारतीय

  • लोकमान्य टिळक २. गोपालकृष्ण गोखले ३. सरदार वल्लभभाई पटेल ४. राहुल सांकृत्यायन

५. शामजी कृष्ण वर्मा ६. शंकरराव देव ७. साने गुरुजी ८. यशवंतराव चव्हाण ९. स्वामी रामानंद तीर्थ १०. वि. स. खांडेकर ११. पु. ल. देशपांडे १२. मुल्कराज आनंद १३.मा. राष्ट्रपती के. आर. नारायणन १४. स्वामी रंगनाथन आनंद १५. आचार्य भागवत १६. आचार्य जावडेकर १७. बाबा आमटे १८. प्रेमलीला ठाकरसी १९. जयप्रकाश नारायणन २०. प्रबोधनकार ठाकरे २१. महामहोपाध्याय दत्तो वामन पोद्दार २२. ना. ग. गोरे २३. आचार्य नित्यानंद २४. आचार्य नरहर कुरुंदकर २५. यशपाल जैन २६. धर्मपाल २७. आचार्य अत्रे २८. बी. आर. नंदा २९. जे. सी. कुमारप्पा ३०. मा. राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा ३१. हुमायून कबीर ३२. देवकीनंदन जोशी ३३. भवानीप्रसाद तिवारी ३४. यदुनाथ थत्ते ३५. कमलापती त्रिपाठी ३६. कुसुमाग्रज ३७. मैथिलीशरण गुप्त ३८. आर. के. नारायण ३९. सुमित्रानंदन पंत ४०. रामधारीसिंह दिनकर ४१. हरिवंशराय बच्चन ४२. ना. सी. फडके ४३. राजा मंगळवेढेकर ४४. श्रीराम शर्मा ४५. अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे ४६. केशवचंद्र सेन ४७. आर. एस. एस. चे राष्ट्रीय कार्यकर्ते नानाजी देशमुख  ४८. राधाकृष्ण बजाज व रामकृष्ण बजाज  ४९. घनश्यामदास बिर्ला ५०. परमहंस योगानंद

भारतरत्न प्राप्त महान व्यक्ती 

  • डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन २. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  ३. डॉ. राजेंद्र प्रसाद ४. भगवान दास
  • सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या ६. गोविंद वल्लभ पंत ७. बी. सी. रॉय  ८. पुरुषोत्तमदास टंडन
  • डॉ. झाकीर हुसेन १०. लाल बहाद्दूर शास्त्री  ११. विनोबा भावे  १२. व्ही. व्ही. गिरी १३. खान अब्दुल गफार खान  १४. अब्दुल कलाम आझाद १५. मोरारजीभाई देसाई  १६. जे. आर. डी. टाटा  १७. गुलझारीलाल नंदा  १८. अरुणा असफ अली  १९. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम २०. सचिन तेंडूलकर  २१. मा. अटल बिहारी वाजपेयी

 

सद्य स्थितीतील भारतीय राजकीय, सामाजिक, आर्थिक, वैज्ञानिक, औद्योगिक क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तिमत्व

 

. मा. नरेंद्र मोदी  २. मा. नरेंद्र जाधव  ३. हरीत क्रांतीचे जनक पद्मविभूषण डॉ. एम. एस. स्वामिनाथन ४. पद्मविभूषण डॉ. अनिल काकोडकर  ५. पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर  ६. पद्मविभूषण मोहन धारिया ७. टेलिफोन क्रांतीचे जनक सॅम पित्रोदा ८. मा. सुनिल गावस्कर ९. राज्यपाल किरण बेदी १० राज्यपाल डॉ. श्रीनिवास पाटील  ११. महाराष्ट्रभूषण डॉ. अभय बंग  १२. पद्मभूषण अमजदअली खान  १३. पद्मभूषण डॉ. डी. आर. मेहता १४. पर्यावरण तज्ञ पद्मभूषण डॉ. माधव गाडगीळ १५. पद्मभूषण मल्लिका साराभाई १६. परम संगणकाचे निर्माते पद्मभूषण डॉ. विजय भटकर १७. पद्मभूषण पुष्प भार्गव १८. पद्मभूषण मार्क टुली  १९. पद्मभूषण अण्णा हजारे  २०. आचार्य राममूर्ती  २१. संदीप वासलेकर  २२.एल. के. शर्मा    २३. बाबा आढाव  २४. डॉ. विवेक सावंत  २५. राहुल बजाज  २६. पद्मश्री डॉ. भवरलाल जैन  २७. अनु आगा   २८. अरुण फिरोदिया  २९. फोर्स मोटर्सचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया  २९. पद्मश्री अरुण मायरा  ३०. नयनालाल किडवाई  ३१. इन्फोसिसचे जनक नारायण मूर्ती ३२. स्वाती पिरामल  ३३. निर्लेप उद्योग समूहाचे मालक राम भोगले इ.

(यात कुठेही पंडित नेहरू यांचे घराणे, महादेवभाई देसाई, डॉ. सुशीला नायर, प्यारेलाल, काका कालेलकर, दादा धर्माधिकारी वा पद्मभूषण न्या. चंद्रशेखर धर्माधिकारी यांची नावे घेतली नाहीत हे ही या विद्वानांनी लक्षात ठेवावे आणि ज्या नावांना बोल्ड केले आहे त्या नावांचा आधी विचार करावा.)

आंतरराष्ट्रीय संस्था

  • युनेस्को २. म्युझिअम ऑफ टॉलरन्स – अमेरिका  ३. अरिझोना स्टेट युनिवर्सिटी – अमेरिका

४. UNC Mahatma Gandhi Fellowship (Univ. of North Carolina, Chapel Hill)

५. Mahatma Gandhi Canadian Foundation for World Peace (Canada)

६. Gandhi Information Center (Germany)

७. Gandhi Memorial Centre- Washington, D.C.20016, USA

८. Mahatma Gandhi Center for Global Nonviolence- James Madison University,

Harrisonburg, Virginia 22807, USA

९. Mahatma Gandhi Foundation- Carrera 52 No.35-33 Medellin, Colombia. etc….

    १०. ११९ देश ज्यांनी त्या त्या देशाच्या शासनाच्या वतीने महात्मा गांधीजींवर डाक तिकिटे प्रकाशित केलेली आहेत.

ज्यांना ज्यांना गांधी चुकीचा आहे हे सिद्ध करायचे आहे त्या सर्व मान्यवरांनी उपरोक्त १२२ व्यक्ती, ९ संस्था (तसेच इतरही अनेक संस्था ज्यांचा नामोल्लेख इथे केलेला नाही) व ११९ देशाची सरकारे इ. निर्बुद्ध आहेत हे आधी सिद्ध करावेत वा त्यांनी गांधींची ज्या कुठल्या कारणाने जी स्तुती केली आहे ती चुकीची आहे हे सिद्ध करावे आणि मगच आपली विद्वत्ता प्रकट करावी.

कधीतरी जेव्हा माणसे घोषणा देत होती  ‘गांधीला मरू द्या’  हि गोष्ट जेंव्हा गांधीजींना कळली तेंव्हा  त्यांच्या चेहऱ्यांवर प्रसन्नता पसरली. त्यावेळी त्यांचे शब्द किती सुंदर होते. ते म्हणाले “जर गांधीची तत्वे मेली तर समजा गांधी जिवंत असतानाच मेला; पण जर गांधीची तत्वे जिवंत राहिली तर समजा की गांधी अमर आहे.” (हे स्वतःला गांधीवादी म्हणवून त्याच्या उलट वर्तन करणाऱ्यासाठीही लागू पडते)

गांधी असो वा बुद्ध, महावीर असो वा कबीर, नानक असो वा छत्रपती शिवाजी, फुले असो वा आंबेडकर  …. ज्या ज्या महात्म्यांनी मानवतेच्या कल्याणासाठी स्वतःला समर्पित केले त्यांचे विचार कायमच अजरामर राहतील. जरी कोणी जगातील सगळ्या धर्म-जातींना संपवुन स्वतःची जात वा धर्म जिवंत ठेवणार असेल तर त्यांनी हे जरूर लक्षात ठेवावे की माणूस हा पैशासाठी वा स्वतःच्या स्वार्थासाठी आपल्या जन्मदात्या आई-बापाचाही गळा कापायला मागे-पुढे पहात नाही त्यामुळे मानवतेची आणि प्रेमाचीच मुळाक्षरे आपणाला गिरवावी लागतील अन्यथा समग्र मानव जात या पृथ्वीतलावरून नामशेष होईल.

(लेखक गांधी रिसर्च फाउंडेशन, जळगाव येथे अभिरक्षक (Curator) म्हणून कार्यरत आहेत)

94049 55226/94050 48556

Previous articleवाढता असुसंस्कृतपणा… 
Next articleसरन्यायाधीशांचे ‘ सर्वोच्च ‘ मराठीपर्व !
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

  1. अतिशय सुंदर, अभ्यासपूर्ण आणी मार्मिक माहितीवर्धक लिखाण. आज महात्मा गांधीजी यांचे चुकीचे चित्र नवीन पिढी समोर मांडण्याचा उद्योग होत असतांना, आपला हा लेख अतिशय प्रासंगिक व महत्वाचा ठरतो. आपणास त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद… तसेच आपल्या पुढील लेखनास हार्दिक शुभेच्छा !🌹💐🌹🙏

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here