आजचा सर्वात मोठा पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष आजच्या घडीला देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय. फडणवीसांचे नेतृत्व हे दिल्लीहून नेमलेले नेतृत्व आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या अकाली मृत्यूनंतरच्या विशिष्ट परिस्थितीत राजकीय चित्र बदलले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले. सर्वांना सोबत घेऊन राज्यकारभार केला असता तर फडणवीस यांना मोठी संधी होती. परंतु सर्वांना सोबत घेण्याऐवजी सोबत असलेल्या सहका-यांचे पंख छाटण्याला त्यांनी प्राधान्य दिले. चंद्रकांत पाटील यांच्यासारखा संघाचा स्वयंसेवकही दरम्यानच्या काळात भाजपने महाराष्ट्रात नेता म्हणून उभा केला. दोघांमध्ये सुप्त संघर्ष असला तरी आजच्या घडीला पक्षाचे आणि देशाचे सर्वोच्च नेतृत्व फडणवीस यांना अनुकूल असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर समाजमाध्यमांतून फडणवीस यांच्याविरोधात जो रोष व्यक्त होत आहे, त्या वास्तवाची जाणीव त्यांना आहे का, हा खरा प्रश्न आहे. सत्ता गेल्यानंतरही फडणवीस यांनी सातत्याने ज्या आक्रस्ताळेपणाचे आणि उतावीळपणाचे दर्शन घडवले, सहका-यांना मागे ठेवून आपणच पुढे राहण्याचे राजकारण पुढे सुरू ठेवले, ते पाहता यापुढील काळात जेव्हा कधी भाजपला सत्तेत संधी मिळेल तेव्हा त्यांच्या नेतृत्वाविरोधात आवाज उठल्यावाचून राहणार नाही. तरीसुद्धा फडणवीस यांचे वय ही त्यांच्यासाठी मोठी जमेची बाजू आहे. त्यांना सुधारायला संधी आहे आणि लोकांची स्मरणशक्ती कमकुवत असते त्याचा फायदा त्यांना भविष्यात मिळू शकतो. दिल्लीच्या राजकारणात अमित शहा यांचे राजकारण किती बळकट राहते यावर चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाचे भवितव्य अवलंबून आहे. पंकजा मुंडे आपले नेतृत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत असल्या तरी बीड जिल्हा आणि वंजारी समाज यापलीकडे त्यांच्या नेतृत्वाची झेप जाताना दिसत नाही. त्यांची उथळ राजकीय शैली त्यांच्या नेतृत्वाच्या आड येते. आशिष शेलार यांच्या नेतृत्वाचा गेल्या काही वर्षांतील आलेख पाहता मुंबईपुरते का असेना, पण त्यांना दुर्लक्षित करता येणार नाही.