मोठी आली महाराणी!

#माणसं_साधी_आणि_फोडणीची (भाग सात)

-मिथिला सुभाष

स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रीच्या ‘स्वत्वा’ला जोपर्यंत धक्का लागत नाही, तोपर्यंत ती नॉर्मल, प्रेमळ, मायाळू स्त्री असते. पण तिचं स्वत्व, तिचं स्त्रीत्व डिवचलं गेलं की मग ती कोणाला ऐकत नाही. त्यानंतर ती जे म्हणून करते त्यात झळाळून उठते. मग तिच्या तेजात ऐरेगैरे भस्मसात होतात! ती जाहिरात बघून राकेशचं तेच झालं. कुठे तर आपल्या प्रेग्नंट बायकोला कोणी पाहू नये असं त्याला वाटत होतं आणि कुठे ही जाहिरात.. तिला प्रेग्नन्सीत एवढं उघडं तर त्यानेही बघितलं नव्हतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे बाळाला पाजत होती. याच्याकडे बघून हसली.. पण त्या हसण्याला डोळ्यातल्या आगीची धगधगती किनार होती!
*******

ती पार अगदी स्ट्रगलर असल्यापासून मी तिला ओळखते. मी त्या काळात जेवणाचे डबे द्यायची. दहा-बारा डबे होते. त्यातली ही एक, शर्मिष्ठा, शमू! (नाव अर्थातच बदललंय!) डबे पोचवणारा मुलगा तिचाही डबा पोचवायचा. तिला फक्त रात्रीचा डबा हवा असायचा. रविवारी रात्री टिफिनला सुट्टी असायची. तेव्हा ती काय करायची कोणजाणे. तिची आणि माझी भेट व्हायची ती बरोबर महिन्याच्या दोन तारखेला. ती स्वत: पैसे द्यायला यायची. माझ्या मुलीला खेळवायची. मी तिला म्हणायची, “अग, सगळेजण त्या डबे पोचवणाऱ्याकडे पैसे देतात, तू पण दिलेस तर चालेल!” त्यावर ती म्हणायची-
“संसारासाठी पडेल ते काम करणाऱ्या बायका मला आवडतात. नवरा पैसा आणेल आणि मग संसार होईल म्हणून त्या अडून बसत नाहीत. आणि तुम्ही तर माझ्या अन्नदात्या दिदी आहात!”

हळूहळू तिची आणि माझी घसट वाढायला लागली. पूर्वी ती डबा धुवून, सुकवून त्यात चिठी घालायची, “दिदी, उसळ फर्मास झाली होती” “फुलके एवढे कसे मऊ होतात दिदी? तुमचा मऊ हात लागतो म्हणून का?” वगैरे.. हळूहळू मी तिला रविवारी रात्री जेवायला घरी बोलवायला लागले. पहिल्या रविवारी तिनंच फोन केला होता-
“दिदी, तुम्ही घरात काहीतरी खालच ना? तेच मला द्या, येऊ का मी जेवायला? मला हॉटेलातलं खाववत नाही!” आणि ती आली. जेवण झाल्यावर पर्स हातात घेऊन रेंगाळत राहिली. पर्सची उघडझाप करत होती. माझा नवरा पटकन म्हणाला, “ओ शमूताई, रविवार रात्री आम्ही अन्न विकत नाही हां!”
तिनं पटकन जीभ चावली आणि सॉरी म्हणाली. नवऱ्याने केलेल्या आगाऊपणावर पलस्तर मारण्यासाठी मीच तिला पुढच्या रविवारी फोन करून निमंत्रण दिलं. ती संध्याकाळीच आली. आपण पावभाजी करूया का विचारलं. मी हो म्हणताच बाजारात जाऊन भाजी आणि काय आवश्यक मसाले वगैरे होते ते घेऊन आली. पाव आणले, लोणी आणलं. भाजी होत आली तसं तिने गॅसवर मूठभर तांदूळ चढवायला घेतले. मी विचारलं हे काय? तर म्हणाली, बच्चू लहान आहे ना? तिला तूप-मीठ-मऊ भात भरवा. मेतकूट असेल का? मी तिच्याकडे पाहातच राहिले. हळूहळू शमू आमच्या घरची झाली. दर रविवारी रात्रीचं जेवायला यायची. मला आराम म्हणून कधी-कधी स्वत:च स्वयंपाकाला लागायची. त्याच सुमाराला माझ्या नवऱ्याचं घरच्यांशी आरंभलेलं भांडण संपलं आणि आम्ही माझ्या सासरच्या गावी निघून गेलो.

शमू मुंबईत मॉडेलिंग करायला आली होती. तिच्या गावी गोव्यात तिचं छान कुटुंब होतं. मध्यमवर्गीय होती. दिसायला अफलातून होती. छान उंची, शेलाटा बांधा, कथ्थई डोळे, लांबसडक मऊ केस, नितळ त्वचा… नजरेत छळवादी जादू.. आणि चालीत नर्तिकेचा डौल! आम्ही तिथे होतो तोवर तिने प्रिंटच्या काही जाहिराती केल्या होत्या. टीव्हीचा काळ सुरु झालेला होता पण त्याचं एवढं प्रस्थ नव्हतं. तिचं वय देखील लहान होतं. माझ्याच घरी तिचा विसावा वाढदिवस आम्ही साजरा केला होता. आणि आम्ही मुंबई सोडली! शमूला अतिशय वाईट वाटलं. पण आता मला असे डबे वगैरे करावे लागणार नाहीत याचं समाधानही वाटलं. आम्ही निघतांना तिनं मला मदर मेरीचा बाळ जीजसला घेतलेला छोटा पुतळा दिला. मला म्हणाली, तू माझ्यापेक्षा फार काही मोठी नाहीस दिदी, पण तुझ्यात एक मदर एलिमेंट आहे. जगन्माता आहेस तू. अशीच राहा!

काळ सरत राहिला. आणि माझी मुलगी दहावी झाल्यावर आम्ही पुन्हा मुंबईत आलो. यावेळी स्थायिक व्हायला. मुलीचं शिक्षण मुंबईत व्हावं या इच्छेने. नवऱ्याचा छान जम बसलेला होता. मीही एका वर्तमानपत्रात नोकरीला लागले होते. शमूची आठवण यायची. पहिली काही वर्षं फोनाफोनी होत होती. मग मी माझ्या संसारात रमले. तिचा स्ट्रगल संपत आला असावा. लँडलाईन फोन हळूहळू दिसेनासे व्हायला लागले. माझ्याकडे पण मोबाईल आला. तिच्याकडेही आला असेल, कारण तिचा लँडलाईन नंबर भलत्याच कोणीतरी उचलला होता. दोघींची दोन विश्व.. एकाच पोकळीत तरंगत राहून दोन ग्रह कधीच एकमेकांना भेटत नाहीत तशा झालो आम्ही. ती जाहिरातींमधून दिसायला लागली होती. तशीच होती अजूनही.. छान उंची, शेलाटा बांधा, कथ्थई डोळे, लांबसडक मऊ केस, नितळ त्वचा… नजरेत छळवादी जादू.. आणि चालीत नर्तिकेचा डौल! आम्हाला एकमेकींचा ठावठिकाणा मिळण्याचा चान्सच नव्हता. माझ्याकडे अजूनही ती मदर मेरी होती. दिवसातून एकदा तरी मला शमूची आठवण यायची आणि मग मी उगाचच मदर मेरीच्या गालावर हात फिरवायची!

एका संध्याकाळी मी जुहूच्या बस स्टॉपवर बसची वाट पाहात उभी होते. स्टॉपच्या मागे आईस्क्रीम पार्लर होतं. एवढ्यात तिथे एक आलिशान गाडी आली, स्टॉपच्या थोडं पुढे जाऊन थांबली. त्यातून एक आठ-नऊ वर्षाची मुलगी उतरली आणि आईस्क्रीम पार्लरच्या दिशेने धावली. मी माझ्या ‘मदर एलिमेंट’ला जागत तिला ओरडून सांगितलं, “सावकाश ग, पडशील!” मुलीने क्षणभर माझ्याकडे पाहिलं आणि मी सर्द झाले. तेच कथ्थई डोळे, मऊ केस, नितळ त्वचा… नजरेत छळवादी जादू..! कोण आहे ही मुलगी? ओळखीची का वाटतोय म्हणून मी गाडीकडे पाहिलं. तिची आई गाडीतून उतरली होती. आम्ही दोघींनी एकमेकींकडे पाहिलं आणि दुसऱ्या क्षणी ती धावत सुटली आणि मला ‘दिदी’ म्हणून घट्ट मिठी मारली. समांतर चालणारी दोन विश्वं पुन्हा एक झाली होती. मी तिला म्हंटलं, जशी होतीस तशीच आहेस शमू.. ती म्हणाली, तू पण तशीच आहेस, मदर एलिमेंट असलेली! माझ्या लेकीला ओरडून सांगितलंस ना, सावकाश जा म्हणून? ते ऐकून तर गाडीबाहेर आले मी..

शमू संथ वाहणाऱ्या नदीसारखी दिसत असली तरी तिच्या आयुष्यात खूप उलथापालथ झालेली होती. नंतर झालेल्या आमच्या भेटीत त्या मला कळल्या.
*******

शमूचा स्ट्रगल सुरुच होता. हळूहळू तिचं नाव होत होतं. तिचा चेहरा नामांकित प्रॉडक्ट्सच्या जाहिरातीत दिसायला लागला होता. त्याचवेळी तिची ओळख राकेश ठाकूरशी झाली. तोही मॉडेल होता. ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं आणि दोघांचं लग्न झालं. गोव्यालाच झालं लग्न. राकेशचे उत्तरभारतीय कुटुंबीय मात्र लग्नाला आले नाहीत. त्यांना हे लग्न पसंत नव्हतं. हिचे नातेवाईक आणि दोघांच्या मित्रमंडळींच्या गर्दीत छान लग्न झालं. दोघांनी भाड्याच्या घरातून स्वत:च्या घरात जाण्याची तयारी लग्नाआधीच केली होती. दोघं तिकडे राहायला गेली. आपापली कामं व्यवस्थित पूर्ण करून दोघं पंधरा दिवसांचा हनिमून करून आली. शमूच्या एका जाहिरातीचं शूट होतं आणि..

राकेशने बॉम्ब फोडला! आता काम करायचं नाही! शमू चकित झाली. तिनं त्याला जाहिरातीसाठी केलेलं करारपत्र दाखवलं. हे एक कर, यानंतर तू काम करायचं नाही असं त्यानं सांगितलं. प्रश्नोत्तरं व्हायला लागली. असं का ते शमूला कळत नव्हतं. राकेशने सांगितलं, तुझ्याशी लग्न करून मी माझ्या घरच्या लोकांना नाराज केलंय. आता तू काम करत राहिलीस तर माझ्या कुटुंबाची अब्रू जाईल.
“अरे पण आपण प्रेमात पडलो, लग्नाचा निर्णय घेतला तेव्हाही मी मॉडेलच होते ना?”
“हो, पण तेव्हा तुला सांगितलं असतं तर तू तयार झाली नसतीस.. आणि मला तुझ्यासारखी मुलगी सोडायची नव्हती! आता काय हनिमून पण झालाय. मला तुझी चव कळलीये.. आता तुला काम करत राहायचं असेल तर या फ्लॅटचे अर्धे पैसे दे आणि जा जायचं असेल तर..”

त्याच क्षणी तो शमूच्या नजरेतून पडला. मी तिला विचारलं, “तू तेव्हाच काहीतरी निर्णय घेऊन मोकळी का नाही झालीस?”
“घेतला ना, निर्णय घेतला दिदी मी. राकेश ठाकूरला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला! मोकळं होणं सहज शक्य होतं, पण मी त्याला सोडणार नव्हते. त्याने माझं शरीर आणि मन दोन्ही वापरलं होतं. माझ्यापेक्षा त्याला त्याची खोटी प्रतिष्ठा जास्त प्रिय होती. मी कुठलंही वाईट काम न करता त्याच्या अब्रूचा पालापाचोळा केला. आजही तो कागदोपत्री माझा नवरा आहे, माझ्या मुलीचा कायदेशीर बाप आहे, पण खजील होऊन मुंबई सोडून गेलाय. बापाच्या दुकानावर बसतो एकेकाळचा सुपर मॉडेल राकेश ठाकूर.”
*******

शमू संसार करत राहिली. त्यातला गोडवा मुरायच्या आधीच संपला होता. त्याचं तर फावलंच. त्याला ती हवीच असायची. तो लग्नाआधी तिला कौतुकाने म्हणायचा, मोठी आली महाराणी! आता हेच तीन शब्द तो तुच्छतेनं म्हणायचा, मोठी आली महाराणी. जिरली ना आता? घरात बसायचं आणि माझा संसार करायचा! शमू काहीच नाही बोलायची. तिच्या नजरेतली जादुई किमया जाऊन त्याजागी थंडं मुर्दाडपणा आला होता. पण बाकीची ती जशी होती तशीच होती. त्यासाठी ती कष्ट घेत होती. अशातच तिला दिवस गेले. राकेश वैतागला. लग्नाला वर्ष व्हायच्या आधी प्रेग्नन्सी?
“मी तुला आधीच सांगितलं होतं, मी प्रिकॉशन घेणार नाही. पण तुला गोळ्या खायला काय झालं होतं?
शमू म्हणाली आता होतंय तर होऊन जाऊ दे.. नाहीतरी घरात बसून मी काय करते?
राकेशला दुष्ट आनंद झाला. तो म्हणाला, मोठी महाराणी समजायचीस ना स्वत:ला? होश ठिकाने आये ना अब?

होश तर राकेशचे यायचे होते ठिकाण्यावर!

प्रेग्नन्सी व्यवस्थित पार पडत होती. शमूला माहेरी जायची इच्छा नव्हती. तिची आईच इथं येऊन राहिली होती. राकेशचं काम ठीकठाक सुरु होतं. प्रेगन्सीत शमूला कोणी पाहू नये म्हणून तो जपत होता. त्याच्या आईने त्याला सांगितलं होतं म्हणे की आपल्या कुटुंबातल्या सुनांना प्रेग्नन्सीत कोणीही पाहायचं नसतं, त्यांना दृष्ट लागते! तीही त्याचं ऐकत होती. यथावकाश तिचे दिवस भरले आणि तिला हॉस्पिटलमधे पोचवलं गेलं. तिला मुलगी झाली आणि पाच दिवसांनी ती घरी आली.

राकेशचं जुनं आयुष्य सुरुच होतं. छुटपुट कामं मिळत होती. पण मॉडेलिंगमधे पैसा तेव्हाही बराच असायचा. एक दिवस तो संध्याकाळी लवकर घरी आला तर शमू आणि तिची आई रिक्षातून उतरत होत्या. आईच्या हातात बाळ होतं. राकेशला बघून शमूची आई सटपटली.. पण शमूच्या चेहऱ्यावर तृप्त आनंद दिसत होता. राकेशने त्यांना कुठे गेल्या होतात वगैरे विचारलं. शमूने काहीतरी थातुरमातुर उत्तरं दिली आणि वेळ मारून नेली. आता राकेश तिच्याशी जरा बरा वागायचा. सासूच्या जाण्याची वाट पाहत होता तो.. शमूजवळ जाण्याची घाई झाली होती त्याला. एका संध्याकाळी तो कंटाळून हॉलमधे बसला होता. त्याला सेंटर टेबलवर एक परदेशी मासिक दिसलं. राकेशने सहज म्हणून ते चाळायला घेतलं आणि एका पानावर तो चमकून थांबला! चौथ्या महिन्याची गरोदर स्त्री.. अंगात फक्त चार बोटं रुंदीची दोन अंतर्वस्त्र.. चार महिन्याच्या पोटावर हात फिरवत होती.. आणि ती राकेशची बायको शमू होती.. क्रमश: जाहिरात होती ती! त्याने धडधडत्या हृदयाने पान उलटलं. पाचव्या महिन्यातली शमू.. सहाव्या.. सातव्या.. आठव्या.. नवव्या महिन्यातली त्याची बायको.. वेगवेगळ्या रंगाची अंतर्वस्त्रे घालून.. आणि शेवटच्या फोटोत एका बाजूची छाती उघडी करून बाळाला पाजणारी तृप्त शमू! राकेश गरगरला.

शमूने मला सांगितलं की त्या जाहिरातीचे तिला लक्षावधी डॉलर्स मिळाले होते. दहा टप्प्यातली जाहिरात होती. तिनंच ती कंपनी शोधून काढली होती आणि सगळा पत्रव्यवहार झाल्यावरच तिनं गरोदर राहण्याचा निर्णय घेतला होता. प्रेग्नन्सीत करायच्या व्यायामाची साधनं बनवणारी ती कंपनी होती. आणि शमू प्रत्येक महिन्यात जाऊन फोटो सेशन करून येत होती. राकेशला पत्ताच नव्हता. आणि म्हणूनच शमू बाळंतपणासाठी गोव्याला गेली नाही आणि आईला मुंबईत बोलावून घेतलं. फुलप्रूफ प्लान करून तिनं राकेश ठाकूरचं नाक कापलं!

स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाच्या स्त्रीच्या ‘स्वत्वा’ला जोपर्यंत धक्का लागत नाही, तोपर्यंत ती नॉर्मल, प्रेमळ, मायाळू स्त्री असते. पण तिचं स्वत्व, तिचं स्त्रीत्व डिवचलं गेलं की मग ती कोणाला ऐकत नाही. त्यानंतर ती जे म्हणून करते त्यात झळाळून उठते. मग तिच्या तेजात ऐरेगैरे भस्मसात होतात! ती जाहिरात बघून राकेशचं तेच झालं. कुठे तर आपल्या प्रेग्नंट बायकोला कोणी पाहू नये असं त्याला वाटत होतं आणि कुठे ही जाहिरात.. तिला प्रेग्नन्सीत एवढं उघडं तर  त्यानेही बघितलं नव्हतं. त्याने तिच्याकडे पाहिलं. ती शांतपणे बाळाला पाजत होती. याच्याकडे बघून हसली.. पण त्या हसण्याला डोळ्यातल्या आगीची धगधगती किनार होती! तिनं शांतपणे सांगितलं, “जाहिरातीतली ती मुलगी आपली नाहीये, ते वेगळं बाळ आहे. नाहीतर तू ऑब्जेक्शन घेतलं असतंस ना?”
“अग पण हे काय केलंयस तू? कोणाच्या बाळाला पाजतेयस माझ्या मुलीच्या वाटचं?”
“मुसलमान वॉचमन आहे त्या स्टुडीओचा.. त्याचा मुलगा आहे!”
“त्या मुसलमान पोराने तुला उष्टावलं? आजपासून तू माझ्यासाठी मेलीस..”
“तू तर कधीचाच मेलायस माझ्यासाठी!”
“अग पण हे का केलंस तू??”
“महाराणी आहे ना मी? माझं राज्य स्थापन केलंय. आता तू पण नाही मला थांबवू शकत. राहायचं असेल इथं तर राहा, नसेल राहायचं तर चालता हो.. मला या घरचे अर्धे पैसे पण नकोत.. महाराणीने सोडले ते पैसे असं समज.”
राकेश बघत राहिला. तिच्या धगधगणाऱ्या डोळ्यात हळूहळू छळवादी जादू पुन्हा आकार घेत होती. राकेश उभ्या जागी थिजला होता आणि शमू तीच होती. तेच कथ्थई डोळे, मऊ केस, नितळ त्वचा… नजरेत छळवादी जादू..!

त्यानंतर राकेश गावाला निघून गेला आणि शमू काम करत राहिली. आजही करतेय! अतिशय देखणी वयस्कर स्त्री एखाद्या जाहिरातीत दिसली तर समजा ती माझी शमूच आहे!

(फोटो सौजन्य: गुगल)

(मिथिला सुभाष या नामवंत पटकथाकार व संवाद लेखिका आहेत)

[email protected]

………………………………………………..

हे सुद्धा नक्की वाचा –

‘नारायणी’ नमोस्तुते! (भाग एक)– समोरील लिंकवर क्लिक करा – https://bit.ly/3Q23Cik

हा दोन घडीचा तंबूतिल रे खेळ (भाग दोन ) समोरील लिंकवर क्लिक करा https://bit.ly/3Q9RVqc

अजूनही तिन्हीसांज रोज येतच राहते (भाग तीन ) समोरील लिंकवर क्लिक करा-  https://bit.ly/3zUMAMW

सुन सायबा सुन (भाग चार)  समोरील लिंकवर क्लिक करा– https://bit.ly/3Apvo3n

दररोज मी जाते सती..(भाग पाच)  समोरील लिंकवर क्लिक करा-  https://bit.ly/3KiTPD9

तांब्याचे सोने बनवणार! (भाग सहा)  समोरील लिंकवर क्लिक करा- https://bit.ly/3AJWtNw

1 COMMENT

  1. सुंदर…
    #माणसं_साधी_आणि_फोडणीची
    एक नवीन माणूस समजून घ्यायला मिळालं अगदी मनाचं ठाव घेणारं लेखन…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here