बेडूक जोडप्याच्या घटस्फोटाची गोष्ट!

-डॉ. मुकुंद कुळे

………………………………………………..

आता पावसाच्या येण्या-जाण्याचे काही आडाखे-बिडाखे उरलेले नाहीत. कधीही येतो नि कधीही जातो. पूर्वी कशी पावसाची नक्षत्रं ठरलेली असायची. रोहिणी नक्षत्र लागलं की पावसाची चाहूल लागायची. मृग नक्षत्र लागलं की हलकेच पाऊस बरसायला सुरुवात व्हायची अन् मातीचा ओला गंध आसमंतात पसरायचा. मग येणाऱ्या प्रत्येक नक्षत्रात पाऊस त्या नक्षत्राच्या वाहनाप्रमाणे कमी-जास्त पडायचा. पावसाची सुरुवात रोहिणीपासून व्हायची, तर नवरात्राच्या आगे-मागे येणारं हस्त नक्षत्र म्हणजे पावसाला निरोप देणारं. क्वचित कधी हस्तातही हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस पडायचा. पण तो अपवादानेच. अन्यथा भारतीयांचे अनुभवातील शहाणपणातून आलेले पावसाचे ठोकताळे ठरलेले असायचे. अगदी शहरी-ग्रामीण, शिक्षित-अशिक्षित साऱ्यांनाच ते ठाऊक असायचे. फरक एवढाच असायचा की- शिकले-सवरलेले ‘आर्द्रा’, ‘पूर्वा’ असे स्वच्छ शब्दोच्चार करायचे; तर आमची गावाकडची अशिक्षित-निरक्षर माणसं अगदी लडिवाळपणे याच शब्दांचा उच्चार ‘आडदाडा’ नि ‘पूरबा’ असं करायची. परंतु आर्द्रा म्हटलं काय नि आडदाडा म्हटलं काय, त्यांचे पावसाचे ठोकताळे क्वचितच चुकायचे. कारण आयुष्यभर घेतलेल्या पावसाच्या अनुभवातूनच तर ते आकाराला आलेले होते. एकप्रकारे ती अनुभवातून आलेली पारंपरिक शहाणीव होती. ही शहाणीव थेट जगण्यातही उतरलेली असते. म्हणून तर ‘पडतील चित्रा-स्वाती तर पिकतील माणिक-मोती’, ‘पडतील उतरा तं भात खाईना कुत्रा’ किंवा ‘हाती करील अन्नाची माती’ अशा म्हणीही तयार झालेल्या दिसतात. म्हणजेच उत्तरा किंवा हस्त नक्षत्रात पाऊस पडला, तर हाताशी आलेलं पीक जाण्याची भीती असते. तर अशी ही अनुभवातील शहाणीव लोकपरंपरेत महत्त्वाची मानली जाते. ती शास्त्रीय नसेल कदाचित, पण लोकमानसातून आकाराला आलेली असते आणि हे लोकमानस काळानुसार बदत असलं, तरी त्याच्या आदिम गाठी कायम असतात.

वास्तविक पाऊस का पडतो याचं शास्त्रीय कारण आता साऱ्यांनाच ठाऊक आहे आणि जेव्हा तो पडत नाही तेव्हाही त्याच्या विलंबाची कारणं हवामानशास्त्रज्ञ आपल्याला सांगतच असतात. तरीही जेव्हा शास्त्राधार तोकडा पडतो तेव्हा हेच लोकमानस परंपरेला शरण जातं आणि पावसावरचे पारंपरिक तोडगे शोधू लागतं. विशेषतः ग्रामीण भागातील लोकमानस. कारण ग्रामीण अर्थव्यवस्था आजही बहुशः कृषिसंस्कृतीवरच आधारलेली आहे आणि भारतातली सत्तर टक्के जनता अजूनही ग्रामीण भागातच आहे. साहजिकच पावसाची ओढ ग्रामजनांना दुखावते, चिंताग्रस्त करते. जणू भूमिपुत्राच्या गळ्यालाच फास लागतो. म्हणूनच पावसाने जरा जरी ओढ दिली की तो हवामान खात्याच्या अंदाजांकडे दुर्लक्ष करीत पाऊसदेवाला लोकपारंपरिक श्रद्धेने आळवायला सुरुवात करतो. अर्थात पावसाची भाकणूक फक्त गावांतच होते असं नाही, शहरांतही होते. फक्त फरक असतो तो त्यांच्या कृतींमध्ये. पावसाला थोडा जरी विलंब झाला की, शहरी भागांत मंदिरांतून यज्ञयाग करण्याचे प्रकार सर्रास होताना दिसतात. त्यासाठी यज्ञातील समिधांवर किलोकिलोने तूप ओतलं जातं. उच्चरवात मंत्रघोष केले जातात. जणू वेदांतील पर्जन्यदेवतेलाच आवाहन केलं जातं. मात्र शहरांतून होणाऱ्या या वैदिक विधी-विधानांपेक्षा गावाकडचे पाऊसविधी अधिक सुरस आणि चमत्कारिक असतात. मुख्य म्हणजे त्यांत तेला-तुपाचा खर्च नसतो, फक्त निसर्गाला केलेलं आवाहन असतं. लोकपरंपरेने चालत आलेले असे आवाहनाचे अनेक प्रकार आजही ग्रामीण भागत तग धरून आहेत. केवळ महाराष्ट्रच नाही, तर संपूर्ण भारतात पूर्वापार असे विधी चालत आलेले आहेत. या विधींमुळे पाऊस पडतो, हा लोकभ्रम आहे. पण मनुष्याने आदिम अवस्थेत असताना निसर्गाशी असलेलं ऐक्य, साम्य आणि फरकही शोधण्याच्या प्रयत्नांतून सुरू केलेले हे विधी आहेत. एकप्रकारे ते प्रतीकात्मक विधी आहेत. या विधींमागील विज्ञानाचा शोध घ्यायला कुणीही जात नाही. तिथे फक्त लोकभावनाच श्रेष्ठ ठरते आणि ती लोकभावना आदिम असते. ही आदिम लोकभावना किंवा लोकश्रद्धा म्हणजे काय? तर सारख्यातून सारखं निघतं (होमोजिनियस मॅजिक), ही आदिम भावना. या भावनेतूनच आपल्या जी गोष्ट हवी आहे किंवा साध्य करायची आहे, त्यासारखाच एक विधी कल्पनेने करायचा. म्हणजेच देवाचा गाभारा पाण्याने भरला की तो पाऊस पाडेल, एवढी साधीसोपी गोष्ट. असे अनेक विधी लोकपरंपरेत आहेत.

म्हणूनच रोहिणी गेल्या, मृग नक्षत्रही कोरडंच आलं नि गेलं की, महाराष्ट्रातल्या खेड्यापाड्यांत धोंडी-भुंडी या अज्ञात लोकदेवतांच्या नावाने गाऱ्हाणं गायला सुरुवात होते. गावागावातली मुलं एकत्र येतात आणि ‘धोंडी धोंडी पाणी दे’ म्हणत गावभर हुंदडतात. याला धोंडी काढणं असंही म्हणतात. मुलांची एक मिरवणूकच निघते. मिरवणुकीतील दोन मुलं निर्वस्त्र असतात. त्यांनी आपल्या अंगाभोवती फक्त कडुलिंबाच्या पाल्याच्या डहाळ्या गुंडाळलेल्या असतात. या दोघांच्या खांद्यावर एक आडवी काठी देऊन त्या काठीला मध्यभागी एक बेडूक उलटा लटकावलेला असतो. या उलट्या लटकावलेल्या बेडकाला गावभर फिरवलं जातं. मिरवणुकीची सुरुवात गावच्या मंदिरातून होते. त्यावेळी केवळ छोटी मुलंच नाही, जाणती माणसंही उपस्थित असतात. मंदिरातून निघाल्यावर

‘धोंडी धोंडी पाणी दे

धोंडीच्या दिवसात

पाणी भारी येऊ दे

पीक मोठं होऊ दे…’ असं म्हणत ही बालसेना गावातील प्रत्येकाच्या घरी जाते आणि ही धोंडी दारात आल्यावर घरातघरातील महिला रिवाजानुसार प्रथम धोंडीच्या काठीवर आणि बेडकावर लोटाभर पाणी ओततात. नंतर हळद-कुंकू वाहून बेडकाची पूजा करतात. इथे बेडूकच का, तर पावसाची चाहूल लागली की तोच पहिल्यांदा डराव डराव करतो.

विदर्भात धोंडीच्या नावाने पावसासाठी गाऱ्हाणं घालायची पद्धत आहे, तर कोकणात हेच गाऱ्हाणं भुंडीच्या नावाने घातलं जातं-

‘भुंडे भुंडे पाऊस दे

भुंडी गेली डोंगरात

पाऊस पडला आगरात

भुंडे भुंडे पाऊस दे…’

अशा पद्धतीने भुंडीच्या नावाने हाका मारत मुलं संपूर्ण गावाचं रान-शिवार, घर-दार फिरतात आणि तिच्याकडे पाण्यासाठी गा‍‍ऱ्हाणं घालतात आणि शेवटी नदीत जाऊन उड्या टाकतात. म्हणजे परत पाण्यासाठी पाण्यालाच शरण जाणं.

याचप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस पडावा म्हणून गाढवाचं लग्न लावलं जातं, तर पूर्वी अहमदनगर जिल्ह्यातल्या गावपरिसरात बेडकांच्या मिरवणुकीबरोबरच अंधाऱ्या रात्री काही महिला पावसाचं गाऱ्हाणं गात गावभर फिरायच्या. त्यांचं हे गाऱ्हाणं म्हणजे पावसाची खरोखर केलेली तक्रारच असायची.

‘पाऊसराजानं कुणीकडे केलं काळं

वैतागली नार टाकून गेली तान्हं बाळ…’

अशी तक्रार करतच लहानथोर साऱ्या महिला गावातलं घरन् घर घ्यायच्या. ही तक्रारीची गाणी म्हणायचीही खास पद्धत होती. या महिलांचं म्होरकेपण करणारी महिला सगळ्यांच्या पुढे असायची. तिच्या हातात घुंगरू बांधलेलं मुसळ असायचं. हे मुसळ ती प्रत्येक घराच्या दारात वाजवायची आणि त्याच्या ताला-सुरावरच पावसाची गाऱ्हाण्याची गाणी गायची. हे गाऱ्हाणं गाताना मुसळच वापरलं जायचं, कारण काय तर मुसळासारखा पाऊस पडावा! म्हणजे इथूनतिथून संबंध पाऊस-पाण्याशी.

पावसाने ओढ दिली की अजूनही ही नैसर्गिक पाऊससुक्तं लोकमानस आळवत असतं. लोकमानसाने एकप्रकारे आपल्या समस्येवर शोधून काढलेले हे तोडगेच असतात. पण सांगायची गंमत म्हणजे क्वचित कधी या पारंपरिक तोडग्यांवरही तोडगे काढले जातात. नुकताच असा एक आधुनिक काळातलाच शोभावा असा तोडगा मध्यप्रदेशची राजधानी असलेल्या भोपाळमधील एका मंदिरातील पुजाऱ्याने शोधून काढला. झालं असं की- जुलै महिना सरत आला तरी भोपाळमध्ये पाऊस पडत नव्हता. जो-तो आपल्याला परीने पाऊसदेवाला विनवणी करत होता. त्याचाच भाग म्हणून भोपाळमधील एका शिवमंदिरातील पुजाऱ्याने बेडूक नर-मादीची मातीची जोडी बनवून त्यांचा रीतसर विवाह लावला. बेडूक हा पावसाच्या आगमनाची चाहूल देणारा प्राणी तर आहेच, शिवाय बेडकाच्या जोडीचा विवाह म्हणजे नवसर्जनाला केलेलं आवाहन. म्हणजेच सर्जनशील पावसाला भूमीवर बरसण्याची केलेली विनंती… पण शिवमंदिरातील त्या पुजाऱ्याची ही विनंती पाऊसराजाने एवढी मनावर घेतली की तो कित्येक दिवस बरसतच राहिला, बरसतच राहिला आणि एवढा बरसला की ‘बाबा रे आता थांब’ म्हणायची पाळी लोकांवर आली. अन् तरीही जेव्हा पाऊस थांबला नाही तेव्हा त्या मंदिरातील पुजाऱ्यानेच हा पाऊस थांबवण्यासाठी एक अजब तोडगा शोधून काढला- पाऊस पडावा म्हणून बेडकांच्या ज्या जोडीचा विवाह त्याने लावला होता, त्या जोडीचा त्याने रीतसर घटस्फोट घडवून आणला. तुम्ही एकत्र आलात म्हणून पाऊस पडला ना, थांबा आता तुम्हालाच दूर करतो म्हणजे पाऊस थांबेल, अशी त्याची त्यामागची भावना होती. विशेष म्हणजे त्याचं त्याने दिलेलं स्पष्टीकरण भारी होतं. तो म्हणाला- ‘कधी कधी एक तोडगा निकामी करण्यासाठी दुसरा तोडगा शोधून काढावा लागतो.’

म्हणजे बघा, ‘सारख्यातून सारखं निघतं’ ही आदिम लोकश्रद्धा त्याने इथे दोनदा हुकमीपणे वापरली. सुरुवातीला पाऊस पडावा म्हणून आदिम परंपरेतील तोडगा वापरला आणि नंतर पाऊस रोखण्यासाठी आधुनिक तोडगा वापरला. एकप्रकारे त्याने आपल्या निरीक्षणातून पावसाला रोखण्याच्या संदर्भात नवीन कल्पनाबंधच आकाराला आणला. शेवटी आधुनिक वर्तमानातही मानवाच्या आदिम काळातील गाठी कायम असतात आणि त्या काळानुसार नवनवीन रूप धारण करतात. पुनरावृत्त होत राहतात. मात्र वरकरणी जीवनशैली बदलली तरी आदिम प्रेरणांचे आदिबंध कायमच राहतात!

(साभार : दैनिक पुण्यनगरी)

(लेखक हे लोककला व लोकपरंपरेचे अभ्यासक आहेत)

9769982424

मुकुंद कुळे यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात मुकुंद कुळे– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleमोठी आली महाराणी!
Next articleनितीशकुमारांची चाल तिरकी ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.