राजकारणाचे गेले ते दिन गेले…

प्रवीण बर्दापूरकर

दिवस अन वार नक्की आठवत नाही पण , हे नक्की आठवतं की १९७७चा मे महिना होता .

मुंबईच्या आताच्या छत्रपती शिवाजी टर्मिनसला एक टॅक्सी थांबली . खादीचा पांढरा कुडता , त्यावर जाकीट घातलेले एक गृहस्थ उतरले आणि प्रवासाची बॅग हातात घेऊन ते गृहस्थ औरंगाबादला ( आताचे छत्रपती संभाजी नगर ) जाणाऱ्या रेल्वेत जाऊन बसले . पुढे मध्यरात्री मनमाडला उतरले आणि बॅग स्वत:च घेऊन दुसऱ्या रेल्वेत जाऊन बसले . कांही लोक त्यांच्या हातातली बॅग घेण्यासाठी धावले पण त्यांनी ठाम नकार दिला . औरंगाबादला सकाळी उतरल्यावर ऑटोरिक्षानं ते सुभेदारी विश्रामगृहात जाऊन विसावले .

त्यांच्या या कृतीची एक बातमी चौकटीत ‘मराठवाडा’ दैनिकात दुसऱ्या दिवशी प्रकाशित झाली कारण , हे गृहस्थ कुणी सामान्य नागरिक नव्हते  तर जेमतेम दोन आठवड्यांपूर्वी म्हणजे १७ मे १९७७ रोजी देशातल्या एका मोठ्या आणि महत्वाच्या महाराष्ट्रासारख्या राज्याच्या मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार झालेले ते शंकरराव चव्हाण होते . आमदार , मंत्री , मुख्यमंत्रीपद भूषवूनही त्यांचं मुंबईत घर नव्हतं !

बाय द वे , तेव्हा माजी मुख्यमंत्र्याला निवास , वाहन आणि पोलिस बंदोबस्त अशा सुविधा नव्हत्या . पुढे १९९५मध्ये सेना-भाजप युतीचं सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यावर त्या सुविधा माजी मुख्यमंत्री आणि माजी उपमुख्यमंत्र्याना देण्याचा निर्णय झाला तसंच त्या काळात मुंबईहून औरंगाबादला येताना किंवा जाताना मनमाडला जाताना रेल्वे बदलावी लागत असे .  

 लोकप्रतिनिधी इतका जमिनीवर वावरणारा असतो , यावर आजच्या पिढीचा विश्वासच बसणार नाही , अशी स्थिती आहे पण , माझ्या पिढीच्या म्हणजे आज सत्तरीच्या उंबरठ्यावर असलेल्यांना ही बातमी नक्की आठवत असेल . ही आठवण झाली त्याचं कारण सध्या व्हायरल झालेली मार्क रुट ( Mark Rutte) यांची सायकल स्वारी आहे . मार्क रुट हे नेदरलँड या देशाचे सलग १४ वर्ष पंतप्रधान होते . नुकताच त्यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला . पदाची सूत्रे सोपवल्यावर मार्क रुट कार्यालयाबाहेर आले आणि चक्क सायकल चालवत त्यांच्या घरी रवाना झाले ! इतका साधा राजकारणी असू शकतो आणि तो आपल्या देशात का नाही , अशा चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाल्या आणि मन भूतकाळात गेलं…मार्क रुट तसंच शंकरराव चव्हाण यांच्यासारखी माणसं आपल्या देशाच्या आणि राज्याच्याही राजकारणात बहुसंख्येनं कशी होती , यांची आठवण झाली आणि जाणवलं , खरंच गेले ते ते दिन गेले…

 

१९७७साली मी पत्रकारितेत आलो . तेव्हा पत्रकारिता म्हणजे मुद्रीत माध्यम असं समीकरण होत. १९८० पासून मंत्रालय आणि विधीमंडळात वावर सुरु झाला  तेव्हापासून राज्याचे राजकारणी आणि प्रशासक पाहतो आहे . त्यातील अनेक मित्र झाले , अनेकांशी बैठकीची दोस्ती झाली . सत्तेच्या दालनातील वावरामुळे ही माणसं जवळून बघता आली . राजकारण हे मिशन म्हणजे सेवाभाव आहे आणि लोकांच्या हितासाठी आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत , अशी भावना प्रबळ होती . लोकप्रतिनिधींचे पाय जमिनीवर होते आणि जनतेशी त्यांचा थेट संपर्क होता . सभागृह जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष  वेधण्यासाठी आणि सरकारला सळो की पळो करुन सोडण्यासाठी आहे , अशी त्यांची ठाम धारणा होती .

तेव्हा राज्यात प्रवासाचं सार्वजनिक  साधन केवळ एस. टी. होती , रेल्वे सर्वत्र नव्हती . बसमध्ये पहिल्या पांच जागा लोकप्रतिनिधी व पत्रकारांसाठी राखीव असत . महत्वाचं म्हणजे याच बसनं किंवा रेल्वेनं तेव्हाचे बहुसंख्य लोकप्रतिनिधी प्रवास करत . असा प्रवास करतांना जॉर्ज फर्नांडिस , ग . प्र . प्रधान , मृणालताई  गोरे , भाई वैद्य , उत्तमराव पाटील , राम नाईक , राम कापसे , मधू देवळेकर , हशू अडवाणी , गंगाधरराव फडणवीस , महादेवराव शिवणकर , विठ्ठलराव हांडे , दत्ता पाटील , अरविंद देशमुख , एन . डी . पाटील . गणपतराव देशमुख , बी . टी. देशमुख , जांबुवंतराव धोटे , बबनराव ढाकणे , मनोहर जोशी , छगन भुजबळ , प्रमोद नवलकर , सुधीर जोशी , भारत बोंदरे , बबन चौधरी , व्यंकप्पा पतकी , संभाजी पवार , बी. जे खताळ , ए. बी. बर्धन , सुदामकाका देशमुख , नरसय्या आडम , केशवराव  धोंडगे , शंकरराव गेडाम , प्रभाकर कुंटे , प्रमिलाताई टोपले , रजनीताई  सातव  , सूर्यकांता पाटील , शोभाताई फडणवीस , किती नावं घ्यावी ? अशा किती तरी जणांना पाहिलं आहे ; त्यांच्यापैकी अनेकांसोबत अनेकदा प्रवासही  केलेला आहे  . महाराष्ट्र विधानसभेचचं सदस्यत्व सर्वाधिक काळ भूषवण्याचा विक्रम असलेले गणपतराव देशमुख तर शेवटपर्यंत एस . टी .नं प्रवास करणारे शेवटचे लोकप्रतिनिधी .

त्याकाळात मी तर नागपूर-मुंबई आणि मुंबई-नागपूर प्रवास रेल्वेनं करतांना कधीच जेवणाचा डबा सोबत नेला नाही . रेल्वेच्या डब्यात ८/१० आमदार , खासदार हमखास भेटत आणि खाण्याची सोय होऊन जात असे . रणजीत  देशमुख , सतीश चतुर्वेदी , जयप्रकाश  गुप्ता , अशोक धवड अशी कांही खास दोस्त मंडळी यात असली की प्रवासभर गप्पा आणि खाण्या-पिण्याची चंगळ असे . मनोहर जोशी , छगन भुजबळ , प्रमोद नवलकर , सुधीर जोशी , हे तर नागपुरात बिनधास्त ऑटोरिक्षानं फिरत ; माझ्या तसंच धनंजय गोडबोलेच्या मोटार सायकलवरून शहराचा फेरफटका मारत आणि ‘जय महाराष्ट्र’ म्हणणाऱ्या सर्वांना प्रतिसाद देत असत .

मंत्रीमंडळातले सदस्य वगळता सर्व विधिमंडळाचे सर्व सदस्य आमदार निवासात वास्तव्याला असत ( एखाद-दुसराच ‘चुकार’ असे ) . एकदा मी प्रधान मास्तरांना भेटायला आमदार निवासातील त्यांच्या खोलीवर गेलो . तर प्रधान मास्तर चक्क कपडे धूत होते . मी त्यांना म्हटलं , ‘अहो , अधिवेशनाच्या काळात आमदारांचे कपडे कापड मोफत  धुवून मिळतात’ , तर प्रधान मास्तर उत्तरले , ‘आपले कपडे धुण्यात लाज कशाची ? त्यासाठी कशाला माणूस पाहिजे ?’

भाई वैद्य यांची तर कमालच . ते मंत्री होते तेव्हा त्यांना लांच देण्याचा प्रयत्न झाला तर त्यांनी लांच  देणाराला चक्क पोलिसांच्या स्वाधीन केलं . इतके स्वच्छ आणि सोज्वळ लोकप्रतिनिधी  तेव्हा बहुसंख्येनं होते , हे आता खरं वाटणार नाही .  विधिमंडळ सदस्यांना मिळणारं निवृत्ती वेतन नाकारणारे मी पाहिलेले पहिले आमदार ए. बी. बर्धन ( आणि दुसरे गिरीश गांधी ) . ए. बी. बर्धन , गंगाधरराव फडणवीस , नितीन गडकरी यांना स्कूटरवर भटकताना पाहिलेले नागपुरात पायलीला पन्नास मिळतील . मंत्रीपद भूषवलेले शंकरराव गेडाम , टी. जी. देशमुख असे अनेकजण शेवटपर्यंत हाऊसिंग बोर्डाच्या गाळ्यात राहिले , यावर आज कुणाचा विश्वासही बसणार नाही .

आमदार निवासातून विधिमंडळात जा-ये करण्यासाठी आमदारांसाठी साध्या बसेस असत . याच बसेसचा वापर बहुसंख्य आमदार करत असत . कांही आमदार , विशेषत: विरोधी पक्षांचे अनेक आमदार अनेकदा पायी जा-ये करतांना दिसत . जाता-येताना रस्त्यात उपोषण करणाऱ्या , आंदोलन करणाऱ्यांना भेटत , रस्त्यात लोकांनी दिलेली  निवेदने स्वीकारत आणि त्यांच्या समस्या मग सभागृहात मांडत असत . एकदा तर शरद पवार यांनाही ते समाजवादी काँग्रेसमधे असतांना या बसमधून आमदारांसोबत हास्यविनोद करत प्रवास करताना बघितल्याचं अजूनही स्मरतं . ते सगळं आता स्वप्नवत वाटतं कारण एकोणिसाव्या शतकाच्या नव्वदीनंतर हे चित्र हळूहळू बदलत गेलं आणि आता तर पूर्ण बदललं  आहे ; लोकप्रतिनिधी लोकांपासून तुटले आहेत कारण राजकारण करण्याचे हेतू वेगळे झालेले आहेत . राजकारण सत्ताप्राप्तीसाठी आणि सत्तेसाठी ‘वाट्टेल ते’ अशी मानसिकता आता दृढ झालेली आहे .    

केवळ राजकारणच नाही तर सर्वच क्षेत्रात ‘डाऊन टू अर्थ’ असणारे अनेक लोक त्या काळात होते आणि त्यांची आठवण मार्क रुट यांच्या सायकल   सवारीच्या निमित्ताने झाली . राजकरणाबाहेरचं एक उदाहरण . आताच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि तेव्हाच्या नागपूर विद्यापीठाचं कुलगुरुपद प्रभारी म्हणून जाल पी. गिमी यांनी दोनदा भूषवलं . कुलगुरु असतांना ते चक्क सायकलनं विद्यापीठात येत आणि सायकलनं घरी परतत . कुलगुरुपदाच्या काळात आमचे मित्र हरिभाऊ केदार स्कूटर चालवत कार्यालयात येत…असो . अशी एक ना अनेक उदाहरणं देता येतील . महापौर असतानाही स्वत:च्या कामासाठी स्कूटरवर फिरणारे अटल बहादूर आणि बेस्टच्या बसने फिरणारे मुंबईचे महापौर महादेव देवळे अनेकांनी पाहिले असणारच .

अजून नोकरित  कायम न झालेल्या एका महिला अधिकाऱ्याचे पदाचा गैरवापर आणि अधिकार मर्यादा उल्लंघनाच्या माजाचे  ‘प्रताप’ सध्या गाजत असताना पदाचा तोरा न बाळगता वावरणाऱ्या , सध्या , स्वच्छ व कार्यक्षम असणाऱ्या अनेक विद्यमान तसेच सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकाऱ्यांची नावे सांगता येतील पण  , नंतर कधी तरी कारण आजचा विषय लोकप्रतिनिधी पुरताच मार्यादित आहे .

बदल अपरिहार्य असतात आणि ते सकारात्मकतेनं स्वीकारायचे असतात हे खरं असलं तरी राज्याच्या राजकारण आणि ते करणारात  झालेले सर्वच बदल सकारात्मक नाहीत म्हणून जनहिताचेही नाहीत . त्यामुळेच सत्ताधाऱ्यांनी घेतलेला कोणताही निर्णय खरंच जनतेच्या हितासाठी आहे का असा संशय दाटून येत असतो ; त्यातून राजकारणात आलेली ‘खोका’ संस्कृती ही महाप्रलयंकारी कीड आहे ; जनहित आणि लोकशाहीलाही ती मारक आहे . साध्या नगर पंचायतीचं सदस्यत्व एक टर्म मिळालं तरी तो माणूस पार बदलून जातो . त्याच्या मनगटावर जाड ब्रासलेट , हातात महागडा सेलफोन , बुडाखाली वातानुकूलित चार चाकी येते , त्याचा वावर पंचतारांकित होतो , राहणीत मोठ्ठा चंगळवादी बदल होतो . तो लोकांपासून तुटतो , असा  आपला राजकारण्याविषयीचा अनुभव सध्या  झालेला आहे . आपल्या देशात राजकारण ‘धंदा’ आणि निवडणुका ‘इव्हेंट’ झाल्याचे हे राष्ट्रीय दुष्परिणाम आहेत .

-म्हणूनच पद सोडल्यावर मार्क रुट यांच्या सायकलवर घरी परतण्याचं , पंतप्रधानपदी राहूनही स्वच्छ व सोज्वळ असण्याचं आजच्या पिढीला स्वाभाविक कौतुक वाटतं . त्यावरच्या कडवट प्रतिक्रिया वाचताना आमच्या  पिढीला आपल्या राज्यातही झालेले मार्क रुट आठवतात आणि आमच्या पिढीच्या मनातील राजकारणाच्या त्या गेलेल्या दिवसांची हुरहूर गडद होतं जाते…  

(लेखक नामवंत पत्रकार व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleपरमात्मा व परधर्म : हिंदुत्वाची जन्मकथा
Next articleवसंतदादांच्या आवडत्या  ‘यशवंता’चा सत्कार
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here