राजकारणापलीकडचे राजकारणी !

मीडिया वॉच दिवाळी अंक -२०१८

–प्रवीण बर्दापूरकर

 

भारतीय समाजमनात राजकारण्यांविषयी फार काही चांगलं मत नाहीये ; अर्थात त्याला राजकारणीही जबाबदार आहेत . पण , राजकारण्यांविषयी प्रतिकूल मत होण्यात मोलाची कामगिरी बजावली आहे ती मीडिया आणि सर्व भाषक भारतीय चित्रपटांनी . राजकारणी दिवसाचे चोवीस तास राजकारणच करतो , कट-कारस्थानं रचतो , शिवाय तो असंवेदनशील असतो , त्याच्यात सुसंस्कृतपणाचा लवलेश नसतो , अनेकदा तर तो क्रूर आणि कायम गैरवर्तन करणारा असतो , गुंडशक्तीला प्रोत्साहन देणारा असतो , अशी जनभावना झालेली आहे . गेली चाळीस वर्षं पत्रकारितेत आणि विशेषत: राजकीय वृत्तसंकलनाच्या क्षेत्रात नागपुर , मुंबई , दिल्लीत वावरत असताना जे राजकारणी अनुभवायला मिळाले , ते सर्व एकजात सालस , सुसंस्कृत होते असा दावा मी करणार नाही . परंतु प्रत्येक राजकारण्याला भावना असतात , त्याला वेदना होतात , कुणाच्या तरी वियोगानं त्त्याच्या डोळ्यात अश्रू येतात , कुणा स्वकियाच्या मृत्यूनं त्याला अपार दु:ख होतं , तो कुणाचा बाप-काका-मामा असतो आणि ते नातेसंबंध जपताना तो हळवा होतो , एवढंच कशाला जनसामन्यांबाबतही संवेदनशील होतो असं अनेकदा अनुभवयाला आलेलं आहे . थोडक्यात , अनेक राजकारण्यांना राजकारणाच्या पलीकडे जाऊन एक माणूस म्हणून बघता आलं , अनुभवता आलं . या संदर्भात मी जे सांगणार आहे , ते किस्से नाहीत तर त्या हकिकती आहेत ; ते माझे अनुभव आहेत आणि ते अनुभव व्यक्तीगत नव्हे तर प्रातिनिधिक आहेत , हे प्रारंभीच नोंदवून ठेवतो ।

मी पत्रकारितेत आलो तेव्हा आणीबाणी अगदी नुकतीच संपलेली होती आणि शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते . तेव्हापासून ते नारायण राणे यांच्या पर्यंतच्या मुख्यमंत्री तसंच असंख्य मंत्र्यांचा  कारभार बघता आला . यातील काहींशी अगदी वैयक्तिक वैयक्तिक भावबंध जुळले ; काहींशी अंगत-पंगत करण्याइतकी जवळीक निर्माण झाली . अनेक मंत्री , अनेक आमदार आणि खासदार दोस्तयार झालेत . त्या सगळ्यांसोबत वावरत असताना लक्षात येण्यासारखी ठळक बाब अशी होती की हे आपल्यासारखीच हाडा-मांसाची माणसं आहेत . यशवंतराव  चव्हाण यांना महाराष्ट्राच्या सत्तेत सक्रीय असल्याचं काही मला पाहता आलं नाही कारण तोपर्यंत ते दिल्लील्ला गेलेले होते पण , मंत्रालयात वावरतांना त्यांनी आखून दिलेल्या अनेक ठळक व मोलाच्या  वाटा दिसल्या , त्यावर यशवंतराव चव्हाण यांची पदचिन्हे दिसली…

====

महाराष्ट्रातील अभिजनांनी वसंतदादा पाटील यांच्या कमी शिक्षणाची खूप टिंगल केली . टर उडविली पण , माझा वसंतदादा पाटील यांच्या संबंधातला अनुभव सुसंस्कृतपणाचा कळसच होता . १९८३साली नागपूरला होणार्‍या भारत-पाकिस्तान कसोटी क्रिकेट सामन्याचं समालोचन मराठीतून न करण्याचा निर्णय अचानक आकाशवाणीनं घेतला . त्या संदर्भात मी केवळ एक बातमीच दिली नाही तर एक मोठं आंदोलन उभं करण्यासाठी पत्रकारीतेतील माझ्यासोबत  सहकारी पत्रकार-दोस्त प्रकाश देशपांडे यानं पुढाकार घेतला . त्यात श्रमिक पत्रकार संघ , विदर्भ साहित्य संघ या संस्थाही सहभागी झाल्या . त्या आंदोलनाचं नेतृत्व नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू , महानुभाव संशोधन डॉ. वि. भि. उपाख्य भाऊसाहेब कोलते यांनी केलं ; साहित्य , कला , संस्कृती , पत्रकारीता अशा क्षेत्रातील अनेक मान्यवर त्या आंदोलनात सहभागी झाले . मराठी समालोचन व्हावं या  मागणीसाठी आम्ही एक मोर्चा काढायचं ठरवलं . नेमकं त्याच वेळी विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपुरात होतं . आम्ही मोर्चा काढत असल्याचं रीतसर पत्र पोलिसांना दिलं . मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयालाही मोर्चा काढणार असल्याचं कळवलं . बाकीच्या तपशीलाचं सोडून द्या  पण , आम्ही मोर्चाला सुरुवात केली न केली तोच पोलिसांच्या दोन गाड्या आल्या आणि क्षणभर आमच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की , हे सरकार काय साहित्यिकांना, पत्रकारांना काय अटक करणार की काय ? पण , प्रत्यक्षात तसं काही नव्हतं . एक पोलीस अधिकारी जीपच्या खाली उतरले . त्यांनी भाऊसाहेब कोलते आणि आम्हा अन्य मंडळींना विनंती करून जीपमध्ये बसायला सांगितलं ; बाकीच्यांना मागच्या व्हॅनमध्ये बसवलं . ‘तुम्ही मोर्चा काढायचा नाही. तुमचा मोर्चा गाडीतूनच आम्ही घेऊन येण्याचा आदेश आम्हाला मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालाय’  असं त्या पोलिस अधिकार्‍यानं सांगितलं . काही मोर्चेकरी जीप आणि उर्वरीत व्हॅनमधून असा आमचा ‘मोर्चा’ विधिमंडळाच्या परिसरात पोहोचला . विधिमंडळाच्या परिसरात स्वागतासाठी मुख्यमंत्र्यांचे तेव्हाचे सचिव श्यामकांत मोहोनी पोर्चमध्ये उभे होते . ते लगबगीने पुढे आले . भाऊसाहेब कोलते आणि अन्य आम्हाला घेऊन ते मुख्यमंत्र्यांच्या दालनात गेले . त्यांनी सभागृहात बसलेल्या मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना मोर्चा आल्याचा निरोप पाठवला . धोतराचा सोगा सावरत लगबगीनं  वसंतदादा पाटील सभागृहातून त्यांच्या केबिनमध्ये आले . सगळ्यांना त्यांनी नमस्कार तर भाऊसाहेब कोलते यांना प्रणाम केला आणि चक्क मुख्यमंत्र्यांची खुर्ची सोडून ते भाऊसाहेब कोलते यांच्या बाजूला बसले . मग वसंतदादा यांनी सांगितलं की , ‘तुम्ही निवेदन वगैरे आणलं आहे तर ते द्या ; पण मी दिल्लीत नभोवाणी मंत्र्यांशी बोललेलो आहे . आकाशवाणीवरून या सामन्याचं समालोचन मराठीतून होईलच , असं आश्‍वासन त्यांनी मला दिलेलं आहे. तशा सूचनाही जारी झाल्या आहेत . नभोवाणी मंत्रालयाकडून मला त्या संदर्भात कळविण्यातही आलं आहे . तरी तुमच्या समाधानासाठी म्हणून नभोवाणी मंत्र्यांशी बोलून घेतो’ , असं म्हणून त्यांनी फोन उचलून ( तेव्हा मोबाईल नव्हते ) त्यांच्या सहायकाला दिल्लीला नभोवाणी मंत्र्यांना फोन लावायला सांगितलं . फोन लागल्यावर त्यांच्या त्या जगप्रसिद्ध ‘मराठीळलेल्या हिंदी’त वसंतदादा पाटील नभोवाणी मंत्र्यांशी बोलले . त्यांनी आम्हाला चहा आणि अल्पोपहार दिला . आमचं काम संपलेलं असल्यामुळे मग आम्ही उठलो . भाऊसाहेब कोलते काठी टेकत टेकत आलेले होते . वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपादचा आब बाजूला ठेऊन भाऊसाहेबांना आणि आमच्या शिष्टमंडळाला सोडण्यासाठी जातीने पोर्चमध्ये गाडीपर्यंत आले . ‘बाबांनो, हे साहित्यिक आणि पत्रकार आहेत , त्यांना जिथून आणलं तिथे व्यवस्थित सोडा . तक्रारीला जागा ठेवू नका’ , अशा सूचना त्यांनी पोलीस अधिकार्‍यांना दिल्या आणि नमस्कार करून ते पुन्हा सभागृहात जाण्यासाठी वळले .

वसंतदादा पाटल्यांच्या कामाची शैलीही विलक्षण होती . वसंतदादा ‘जनता’ किंवा ‘लोक’ असं फारसं म्हणत नसत ; ते ‘रयत’ असा शब्दप्रयोग करीत . रयतेच्या एखाद्या प्रश्‍नावर जर त्यांना निर्णय घ्यायचा असेल आणि तो निर्णय घेण्यामध्ये जर कुठल्या नियमाचा अडथळा सचिवांनी उपस्थित केला तर वसंतदादा पाटील त्याच्याकडे न बघता फाईल किंवा ते आलेलं निवेदन परत सचिवाकडे  सरकवत आणि सांगत असत , ‘हे रयतेच्या हिताचं काम आहे . हे सरकार रयतेच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी आहे . नियम आणि कायदे रयतेच्या हिताच्या    आड आले नाही पाह्यजेत . हे काम नियमात बसवून आणा . काम होईपर्यंत मी इथंच मध्ये बसतो’ . वसंतदादा असं आदेशवाजा सांगत असल्यामुळे अधिकार्‍यांना कामं पटापट करावी लागत असत आणि वसंतदादा कार्यालय सोडण्याच्या आत त्या कामाचे आदेश जारी होत .

मुख्यमंत्री वसंतदादांच्या संदर्भातला माझा एक अनुभव तर मोठा विलक्षणच आहे . तेव्हा मी नागपूर पत्रिका ह्या दैनिकाचा मुख्य वार्ताहर होतो . तरुण होतो ; अंगात रग आणि लिहिण्यात जोश होता तरी पोच पुरेशी आलेली नव्हती . एकदा मुख्यमंत्री वसंतदादा पाटील नागपूरला येणार होते . नागपूरचे अनेक प्रश्‍न तेव्हा रेंगाळलेले होते . त्या प्रश्‍नांकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी मी एक अतिशय कडक असा मजकूर लिहिला आणि वृत्तपत्राच्या भाषेत ज्याला ‘अँकर’ किंवा ‘बॉटम लीड’ म्हणजे वृत्तपत्राच्या तळाची बातमी , मोठ्या ठळक अक्षरात नागपूरच्या समस्यांचा वेध घेणारा तो मजकूर प्रकाशित केला . माझ्या दृष्टिकोनातून ती अतिशय परखड आणि सत्य पत्रकारिता होती . ते शब्द नको तेवढे तीव्र , कठोर झाले होते . ती भाषा वापरताना मुख्यमंत्र्यांच्या संदर्भातले मी काही असांसदिय शब्द वापरले होते ; अर्थातच हे नंतर लक्षात आलं . दुसर्‍या दिवशी तो मजकूर प्रकाशित झाल्यावर साहजिकच खळबळ उडाली . आमचे संपादक माझ्यावर खूप नाराज झाले . त्यांनी  मला आमचे तत्कालिन व्यवस्थापकीय संचालक नरेश गद्रे यांच्यासमोर हजर केलं . नरेश गद्रे यांचा मी अतिशय लाडका वार्ताहर होतो . त्यांनी माझ्याकडे अगदी आपादमस्तक बघितलं आणि रागानं ते म्हणाले , ‘मूर्खा ,आपण आज आपल्या वृत्तपत्राला सरकारकडून मिळणार्‍या जाहिरातीचे दर वाढवून देण्यासंबंधी पत्र देणार होतो . तू सगळा घोळ करून ठेवलायेस .’

मी त्यांना सॉरी वगैरे म्हणालो . थोड्या वेळाने वातावरण शांत झाल्यावर नरेश गद्रे मला  म्हणाले, ‘असं कर हे पत्र द्यायला मी जाणार आहे तेव्हा तू माझ्यासोबत चल आणि  मुख्यमंत्र्यांची माफी माग .’ आदेशच तो ; त्याप्रमाणे मुख्यमंत्र्यांच्या नागपुरातील रामगिरी या निवासस्थानी नरेश गद्रे आणि आमच्या संपादकांसोबत मी निमूटपणे गेलो . नागपूर टाइम्स व नागपूर पत्रिका या दैनिकांचे संस्थापक संपादक अनंत गोपाळ शेवडे होते आणि ते मोठे गांधीवादी म्हणून ओळखले जात असत . आम्हाला फार तातडीने प्रवेश देण्यात आला . आत जातानाच नरेश गद्रे यांनी मला बजावून सांगितलं होतं की , ‘तू मुख्यमंत्र्यांच्या समोर बसायचं नाही’ . रामगिरीला वसंतदादा ज्या हॉलमध्ये बसलेले होते त्या हॉलमध्ये आम्ही गेलो . सोबतचे अन्य सर्व  वसंतदादांच्या आजूबाजूच्या सोफ्यावर स्थानापन्न झाले . नरेश गद्रे यांनी वसंतदादांना ते मागणीचे निवेदन दिलं आणि वसंतदादांनी त्याच्यावर तातडीने सही करून यांचे दर वाढवून द्या असा आदेश तिथे हजर असलेले माहिती खात्याचे महासंचालक ए. एम. देवस्थळे यांना दिला . तेव्हा वृत्तपत्राच्या जाहिरातीचे दर वाढवून देण्याचा थेट अधिकार मुख्यमंत्र्यांना होता , त्याप्रमाणे त्यांनी हे आदेश दिलेले होते . मग चहा-पाणी झाल्यावर आलेले लोक उठतील ह्या अपेक्षेत वसंतदादा होते पण , सगळे रेंगाळले होते .

‘मग आता काय ?’ असं त्यांनी विचारलं तेव्हा नरेश गद्रे यांनी माझ्याकडे बोट दर्शवत एका दमात वसंतदादांना सांगितलं की , ‘हा आमचा मुख्य वार्ताहर आहे . आज तुमच्या विरुद्ध जो मजकूर प्रकाशित झालेला आहे , तो त्याने लिहिलेला आहे आणि त्याबद्दल तो दिलगिरी व्यक्त करण्यासाठी इथे आलेला आहे.’

वसंतदादांनी माझ्याकडे बघितलं . किंचित हंसून ते म्हणाले , ‘मी याला ओळखतो. क्रिकेटच्या मराठीच्या आंदोलनांमागे हाच गडी होता .’

वसंतदादा पुढे म्हणाले, ‘अरे , मुख्यमंत्रीपदाचा एक आब असतो . तो आब तुम्ही पत्रकारांनी सांभाळला नाही तर आम जनतेला कळणार कसं काय ?  तू तरुण आहेस . अशा चुका होत असतात . यानंतर अशी चूक पुन्हा करू नको.’ मग ते पुढे गद्रे यांना म्हणाले , ‘यात माफी वगैरे मागण्याचं काही कारण नाहीय . होतं असतं असं कधी . तरुण रक्त उसळलेलं असतं .  उसळलेल्या रक्तानं काही वेडेवाकडं लिहिलं तर ते फार गंभीरपणे घ्यायचं नसतं . निघा तुम्ही.’

ज्या व्यक्तीविषयी आपण टोकाची भूमिका घेऊन लिहिलेलं आहे , ती एवढ्या मोठ्या पदावर आहे आणि आपल्या संस्थेच्या हिताचा निर्णय घेताना अशा टीकेची ते कोणतीही दखल घेत नाही , वसंतदादांचा हा जो सुसंस्कृतपणा बघायला मिळाला त्यामुळे मी अक्षरशः स्तंभितच झालो . वसंतदादांचं शिक्षण, त्यांचं रांगडं वागणं, त्यांचं जनतेत मिसळणं हे सगळं त्या काळात उपहासाचा विषय झालेलं होतं पण , मला मात्र वसंतदादांमधला सुसंस्कृतपणा खूपच भावला ; तो कायम माझ्या मनात मुक्कामाला आला  .

====

विशेषतः मुंबईच्या पत्रकारांनी आधी मंत्री आणि नंतर मुख्यमंत्री सुधाकरराव नाईकांच्या संदर्भामध्ये  आकसाची भूमिका घेतली , नाहक प्रवाद पसरवले ; असं माझं ठाम मत आहे . त्यातही सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री झाले आणि मुंबईत दंगली भडकल्यानंतर तर मुंबईचे बहुसंख्य पत्रकार सुधाकरराव नाईकांच्या संदर्भामध्ये ऐकीव माहितीवर जास्त बातम्या देत होते असं माझं निरीक्षण होतं . याच सुधाकरराव नाईकांच्या बाबत १९९१ मध्ये मोवाडचा पूर आल्यावर मी एक गुस्ताखी केलेली होती . अख्खं मोवाड पुरात वाहून गेलं आणि गावात प्रवेश करण्याच्या रस्त्यावर भला मोठा मातीचा ढिगारा निर्माण झालेला होता. सुधाकरराव नाईक तो ढिगारा चढून पलीकडे जाण्याच्या शारीरिक परिस्थितीत नव्हते ; अर्थात हे मला माहिती नव्हतं . एका झाडाखाली खुर्ची टाकून ते बसले आणि तिथेच त्यांनी आपत्तीग्रस्तांची चौकशी केली . त्यांच्या सोबत आलेल्या अधिकार्‍यांनी गावात जाऊन सगळी पाहणी करून त्या झालेल्या नुकसानीबद्दल सुधाकरराव नाईक यांना सांगितलं . तेव्हा सुधाकरराव नाईक म्हणाले की, ‘याचा एक अहवाल करा आणि पंतप्रधान कार्यालयाला लगेच पाठवा’ . याचा एक संदर्भ तेव्हा नुकतेच देशाचे पंतप्रधान झालेल्या पी. व्ही. नरसिंहराव यांच्याशी होता . मोवाड गाव ज्या रामटेक लोकसभा मतदार संघात येतं त्या मतदार संघातून नरसिंहराव दोन वेळा लोकसभेवर निवडून गेलेले होते .

मुख्यमंत्री पुरानं वाहून गेलेल्या मोवाड गावात न जाता झाडाखाली बसून लोकांची चौकशी करताहेत याचा एक फोटो तिथे उपस्थित असलेल्या एकमेव आणि शासनाच्या छायाचित्रकाराने काढला . सुधाकरराव नाईक हे झाडाखाली बसलेले आहेत , त्यांच्या भोवती काही पोलीस उभे आहेत. वगैरे वगैरे तपशील असलेले छायाचित्र माहिती आणि जनसंपर्क कार्यालयाच्या ‘त्या’ छायाचित्रकाराने  मला गुपचूप आणून दिलं . दोनच दिवसांनी प्रकाशित होणार्‍या ‘साप्ताहिक लोकप्रभा’च्या अंकासाठी मी ‘मोडलेलं मोवाड’ ही कव्हरस्टोरी केलेली होती , त्यात आणि लोकसत्तातही ते ‘असंवेदनशील मुख्यमंत्री’ अशा शेलक्या आणि बोचर्‍या ओळींसह ते  छायाचित्र  आम्ही वापरलं ;  सुधाकरराव नाईकांना जरा रागच आला . त्यांनी आमचे तत्कालीन संपादक माधव गडकरी यांना फोन करून ते छायाचित्र प्रकाशित केल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आणि गुडघ्याचा त्रास असल्यामुळे ते तो उंचवटा कसे चढू शकत नव्हते , हे सांगितलं. माधव गडकरींचा मला लगेच फोन आला . नेमकी माहिती न घेता ते छायाचित्र वापरल्याबद्दल माधव गडकरींनी मला चांगलंच झापलं . लिहिण्यातलं शहाणपण माहितीतली अचूकता शिकवणारा तो प्रसंग होता .

मोवाड प्रकरणाचा उत्तरार्ध थोडासा वेगळा होता आणि त्यातही सुधाकरराव नाईक हेच जास्त अ‍ॅक्टिव्ह होते . मोवाडचं पुनर्वसन करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी गुरुमूर्ती बेडगे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन झाली . त्या समितीनं २७/२८कोटी रुपयांचा पुनर्वसन प्रकल्प तयार केला . गुरुमूर्ती बेडगे हे माझे अतिशय निकटचे स्नेही होते ; आमचे कौटुंबिक संबंध होते . त्यामुळे मोवाडच्या मदत व  पुनर्वसनाच्या संदर्भातली वित्तंबातमी मला ताबडतोब कळत असे . त्या काळात बेडगेंनीही एक दर आठ दिवसांनी पत्रकार भवनात येऊन मोवाडच्या संदर्भामध्ये जी काही हालचाल झाली, प्रगती झाली, त्याचा लेखाजोखा पत्रकारांना सादर पद्धत सुरू केली होती . त्यातून प्रशासन लालफितीत अडकलं आहे किंवा रेंगाळलं आहे किंवा कुठे काही हयगय होते आहे , अशा समजाचं वातावरण निर्माणच होऊ न देण्याची दक्षता गुरुमूर्ती बेडगे यांनी घेतलेली होती . एक दिवस त्यांचं ब्रिफिंग संपल्यावर आम्ही चहा पित उभे असताना बेडगे मला त्राग्यानं म्हणाले , ‘अहो, काहीतरी करायला पाहिजे आपण.’

मी विचारलं, ‘काय झालं ?’ तर ते म्हणाले की, ‘‘पुनर्वसनाच्या बांधकामाची जेवढी काही टेंडर्स निघाली आहेत ती ३० ते ५९ टक्के जास्तीच्या बोलीची आहेत . ही शुद्ध अडवणूक आहे कंत्राटदार लॉबीची’.  आणखी चौकशी केल्यावर कळलं की ते सर्व कंत्राटदार अ-मराठी होते . ही जी अमराठी भाषक मंडळी होती त्याबद्दल बेडगेंच्या मनामध्ये राग होता असं काही नाही  परंतु ती मंडळी प्रसंगाचं गांभीर्य लक्षात न घेता जास्त दरानी ते काम करायला तयार होती , हे त्यांच्या दृष्टीकोनातून फारच गंभीर होतं .

मग मी बेडगे यांच्यासोबतच त्यांच्या कार्यालयात जाऊन ते सगळे तपशील घेतले आणि दुसर्‍या दिवशी त्याची कंत्राटदार कशी अडवणूक करत आहेत अशी सविस्तर बातमी केली . बातमी पाठण्यापूर्वी माधव गडकरी यांना फोन करून त्या संदर्भात माहिती दिली . ती बातमी लोकसत्ताच्या पहिल्या पानावर अतिशय अग्रक्रमाने प्रकाशित झाली . मोडलेल्या मोवाडच्या टाळूवरचं लोणीही खाण्याचा प्रयत्न कंत्राटदार मंडळी करतात आहेत , असा त्या बातमीचा सूर होता . ती बातमी प्रकाशित झाल्यावर माधव गडकरींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की , ही कामं जास्तीत जास्त ५-७ टक्के जास्तीच्या किंमतीत करण्यासाठी तयार असलेल्या  ८-१० मराठी बिल्डर्सची नावं मला दे . ते शक्यतो तरुण असतील तर जास्त चांगलं . तेव्हा नागपुरात फ्लॅट संस्कृती अतिशय जोरात फोफावली होती . अनेक तरुण अभियंते त्या व्यवसायात शिरले होते . त्यापैकी काही माझे मित्र होते . त्या सगळ्यांना फोन करून मी चर्चा केली ; आमची एक बैठकही झाली आणि अक्षरशः चोवीस तासात मी गडकरींना ८ जणांची नावं कळवली . ते सगळे तेव्हा माझ्याशी वयाने समकालीन होते ; व्यवसायात तसे नवखे होते पण कामाचा उत्साह त्यांच्यात होता . गडकरींनी त्या सर्वांना घेऊन तातडीनं मुंबईला यायला सांगितलं .  त्याप्रमाणे आम्ही सगळेचजण विमानानं लगेच मुंबईला गेलो . माधव गडकरी यांनी मुख्यमंत्र्यांसोबत आमची भेट करवून दिली .

मुख्यमंत्र्यासोबत चर्चा सुरू असताना त्या बिल्डर्सची आर्थिक परिस्थिती , त्यांची क्षमता , अनुभव वगैरे मुद्दे निघाले . तेव्हा म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी असलेले अजित वर्टी तिथे होते . ते सगळं ऐकल्याच्या नंतर सुधाकरराव नाईक यांना अजित वर्टी म्हणाले की , ‘आपण या तरुण मुलांना ही कामं द्यायला पाहिजे आणि ती त्या तरुण मुलांनी ते अतिशय गतीने पूर्ण करण्याची हमी आपल्याला द्यायला हवी .’

त्यावर त्या नागपूरकर बिल्डर मंडळीनी तिथेच एकमुखाने आम्ही एक वर्षाच्या आत हे काम पूर्ण करू, अशी ग्वाही दिली . मग काही तांत्रिक बाबींची चौकशी चर्चा करण्यासाठी ते बिल्डर्स आणि अजित वर्टी बाजूच्या दालनात गेले . तेव्हा झालेल्या चर्चेत अजित वर्टी यांच्या लक्षात आलं की त्यापैकी एकही बिल्डर म्हाडाकडे नोंदणीकृत नव्हता आणि एकाचाही  दर्जा ‘अ’  नव्हता ;  म्हणजे इतक्या मोठ्या रकमेचं काम त्यांच्यापैकी अद्यापपर्यंत कुणीही केलेलं     नव्हतं . त्या सर्वांना घेऊन अजित वर्टी परत मुख्यमंत्र्यांच्या दालनात आले . त्यांनी सुधाकरराव नाईक यांना सांगितलं , ‘ यापैकी एकही पात्र कंत्राटदार नाही , काम सुरू करण्यासाठी किमान आवश्यक रक्कम उभी करण्याची क्षमता यापैकी एकाही  बिल्डरची नाही ; ही यांना कामं वाटून देण्यात अडचण आहे.’

सुधाकरराव नाईक क्षणभर गप्प झाले . त्यांचा तो प्रसिद्ध पाईप त्यांनी पेटवला . दोन झुरके घेतले आणि ते वर्टींना म्हणाले, ‘वर्टी , विशेष बाब म्हणून आपण या मुलांना म्हाडाचं ‘अ’ दर्जाचं रजिस्ट्रेशन नाही देऊ शकत का ?  मी परवानगी देतो हवं तर.’

अजित वर्टी म्हणाले , ‘मुख्यमंत्री तो निर्णय घेऊ शकतात . पण तरी प्रश्‍न पैशांचा राहणारच आहे.’ त्यावर  सुधाकरराव नाईक मिष्किलपणे म्हणाले की , ‘आपण पैशाचाही प्रश्‍न मिटवू . हे मराठी आहेत ; त्यांच्याकडे पैसे कसे असणार ?  हे काम जसं ज्याच्या वाट्याला येईल , त्याच्या १५ टक्के रक्कम आगावू म्हणून या बिल्डर्सना म्हाडाकडून देऊ.’

वर्टी म्हणाले, ‘आपण तो निर्णय घेणार असाल तर माझी त्याला हरकत असण्याचं काही कारण नाही आणि मला अंमलबजावणी करण्यातही काहीच अडचण नाही.’

सुधाकरराव नाईक यांच्या आग्रहानं मोवाडच्या पुनर्वसनाचं ते काम  मराठी तरुणांना मिळालं . अर्थात पुढे ते काम रेंगाळलं वगैरे वगैरे आणि मराठी माणसं जशी माती खातात तशीच माती त्यापैकी आशुतोष शेवाळकर वगळता बाकीच्या बिल्डर्सनी खाल्ली ; तो भाग वेगळा .  सांगायचं तात्पर्य असं की , सुधाकरराव नाईकांचा दृष्टिकोन किती संवेदनशील होता . कुठलाही गाजावाजा न करता सुधाकरराव नाईक हे कशा पद्धतीने मराठी बाणा जपण्याचा प्रयत्न करीत असत , त्याचं ते उदाहरण आहे .

अजून एक अनुभव सांगण्यासारखा आहे . सुधाकरराव नाईक हे पत्रकार होते , लेखक होते. साहित्यिकांत त्यांची उठबस होती आणि ते अतिशय हजरजबाबी होते . सुधाकरराव नाईकांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि पुन्हा विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आलं . तेव्हा मला सतत असं वाटत होतं की , एकदा सुधाकरराव नाईक यांना जाउन भेटावं . जुने संबंध होते , चांगली ओळख होती . कदाचित त्यांना ते आवडू शकेल असं मला वाटलं . तेव्हा माजी मुख्यमंत्री म्हणून सुधाकरराव नाईक यांना रविभवन परिसरातच एक बंगला मिळालेला होता . एका दिवशी विधिमंडळाचं लवकर कामकाज आटोपलं . रिपोर्टिंगचं काम संपलं आणि घरी जाता जाता मी कार त्यांच्या बंगल्याकडे वळवली . सुदैवाने सुधाकरराव नाईक बंगल्यातच होते . त्यांचे खाजगी सचिव मला ओळखत होते . मी त्यांना सांगितलं की ‘मी जस्ट एक कर्टसी म्हणून भेटायला आलो आहे . दोन-तीन मिनिटं मला भेटायचं आहे . त्याच्या पेक्षा जास्त वेळ सुधाकरराव नाईकांनी नाही दिला तरी चालेल .’ ते आत गेले आणि लगेच परत येऊन त्यांनी सांगितलं की, ‘जा आंत , भेटा त्यांना.’

मी सुधाकरराव नाईकांच्या त्या बंगल्याच्या हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा सुधाकरराव नाईक एकटे वृत्तपत्र वाचत एका सोफ्यावर बसलेले होते . आजूबाजूला पुस्तकं विखुरलेली होती . मी त्यांना अभिवादन केलं . सुधाकरराव नाईकांनी माझ्याकडे त्यांच्या त्या चष्म्याआडून बघितलं आणि हंसत हंसत त्यांनी मला विचारलं, ‘काय रे, माजी मुख्यमंत्री कसा दिसतो हे बघायला आलायेस का ?’

मी म्हटलं ‘नाही’ ,  तरी  क्षणभर मी वरमलो . मी पुढे म्हणालो , ‘एकतर आपली ओळख आहे आणि मला असं मनापासून वाटलं की , तुम्हाला एकदा भेटावं. मुख्यमंत्री असताना तर तुम्हाला खूप लोक भेटत होते पण , त्या पदावर नसतानाही आपले जुने ॠणानुबंध लक्षात घेऊन एकदा भेटावं असं मला वाटलं.’  सुधाकरराव नाईकांनी बेल वाजवून चहा वगैरे बनवायला सांगितला आणि नागपुरातल्या अनेक चौकशा केल्या . मोवाडच्या कामाची चौकशी केली .

माझ्या इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर माझं एक ठाम मत झालं आहे की , सुधाकरराव नाईक यांच्यासारखा कणखर मुख्यमंत्री महाराष्ट्राला भेटलेला नाही . त्यांची प्रशासनावरची जबर पकड , त्यांना कुठल्याही घटनेचा किंवा एखाद्या माणसाचा येणारा अदमास , त्यांचं आकलन  व्यापक असे . मुख्यमंत्री असताना आणि मुख्यमंत्रीपद गेल्यावरही जलसंधारण समितीचे अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राच्या जलसंधारणाची जी मुहूर्तमेढ त्यांनी केली , जो पाया त्यांनी रचला ते कायम अज्ञातच राहिलं .

सुधाकरराव नाईकांचा अजून एक अनुभव सांगायला पाहिजे ; तो थोडासा आधीचा आहे. ते शिक्षणमंत्री असतानाचा . सुधाकरराव नाईक आणि मी एकाच विमानाने मुंबईहून नागपूरला आलो . आमच्या रांगेत पण दुसर्‍या बाजूला सीटवर एक मध्यमवयीन महिला अधूनमधून हमसून हमसून रडत होती ; हुंदके आवरत अश्रू पुसत होती . सुधाकरराव नाईकांनी उठून जाऊन तिची चौकशी केली . मग सुधाकरराव नाईक त्यांच्या जागेवर येऊन बसले पण , ते मला तेव्हा काहीच बोलले नाहीत . तेव्हा नागपूरचं विमान रात्री साडेनऊ वाजता लँड होत असे . विमानातून खाली उतरल्यावर सुधाकरराव नाईक यांनी एका पोलीस अधिकार्‍याला बोलावलं आणि त्याला काही तरी सांगितलं . नंतर सुधाकरराव नाईक यांनी त्यांच्या बंद गळ्याच्या कोटाच्या खिशातून काही नोटा काढल्या आणि त्या पोलीस अधिकार्‍याकडे दिल्या . पोलीस अधिकारी विलक्षण संकोचून गेलेला होता . मी हे सगळं बघत होतो. मला मोठं आश्‍चर्य वाटत होतं की , हे  असं काय होतंय ?

सुधाकररावांना न राहवून अखेर विचारलं ही काय भानगड आहे ? तेव्हा ते म्हणाले , ‘या बाईंची पुसदला जाण्याची आणि त्यांना तिथून परत आणण्याची सोय करायची आणि त्यांना मुंबईच्या विमानात व्यवस्थित बसवून द्यायचं . त्यांच्याकडून एकही पैसा घ्यायचा नाही , असं सांगत होतो मी त्या ऑफिसरला’

‘कुणी नात्यातल्या आहेत का त्या बाई तुमच्या ?’ मी उत्सुकतेनं पृच्छा केली त्यावर सुधाकरराव म्हणाले, ‘नाही , तिचे वडील आज सकाळी वारले . त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी त्या बाई चालल्या आहेत . त्यांचे वारलेले वडील माझे शिक्षक होते . हे माहिती नाही नक्कीच .  त्या मला ओळखतही नसाव्यात . ( मला त्यांनी त्यांच्या त्या शिक्षकांचं  नावही सांगितलं    पण ,  इथे मुद्दाम त्यांच्या नावाचा उल्लेख करीत नाही . ) आता रात्रीचे पावणेदहा-दहा होतायेत . एवढ्या रात्री गाडी कुठून मिळवायची , कशी मिळवायची असे प्रश्‍न असणार तिच्यासमोर  . तेव्हा , माझ्या शिक्षकांनी जे मला काही शिकवलं आहे त्याचं ॠण म्हणून मी त्यांच्या मुलीची फक्त जाण्या-येण्याची सोय केली . त्यात विशेष असं काही नाही.’ असं म्हणून ‘तुझी घरी जाण्याची सोय आहे ना ?’ असं विचारुन सुधाकरराव नाईक गाडीकडे वळले .

ऐकलेले प्रवाद आणि प्रत्यक्षातले ; शिकारी असलेले आणि सावज टप्प्यात आल्याशिवाय राजकीय बार न टाकणारे , अ-राजकीय सुधाकरराव नाईक प्रत्यक्षात असे होते . तेव्हापासून कोणत्याही राजकारण्याविषयी कोणीही काहीही सांगितलं तरी , खातरजमा करुन घेण्याची दक्षता मी बाळगतो .

====

थोडंसं अजून मागे जात एक प्रसंग आठवतो . १९९६ची ही हकिकत आहे .

आपण शरद पवार , प्रमोद महाजन आणि त्यांच्या राजकारणाच्या शैलीबद्दल , ‘नॉन प्रेडिक्टेबल’-जे बोलतील ते करतीलच असं नाही , कुणाचा काटा कधी काढतील याची  शाश्‍वती कशी नाही , असं बिनदिक्कत बोलतो-वाचतो . अनेकदा ते आम्ही मीडियानी लिहिलेलं असतं ! पवारांच्या बाबतीत तर त्यांच्यात  असणार्‍या आणि नसणार्‍याही गुणां-अवगुणांबद्दल लिहिलं गेलेलं आणि बोललं जातं . त्यांच्या कूटनीतीचा अनेकांना खरंच फटकाही बसलेला असेल-आहे पण ,  तो या लेखाचा विषय नाही .

त्या काळात आमचा एक तरुण पत्रकार मित्र असाध्य रोगाने आजारी होता ; त्याचा मृत्यू अटळ होता . एका परधर्मीय मुलीशी लग्न केलेलं असल्यामुळे त्याला घरातून बाहेर पडावं लागलेलं होतं आणि त्याची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती . नियमित डायलिसिस करण्यासाठी खूप मोठा खर्च येत होता शिवाय औषधं , घरखर्च वेगळा . पैशाची जुळवणी करता करता तो खूप मेटाकुटीला आलेला होता . ही बाब आम्हा काही पत्रकारांना माहिती होती . त्यात प्रताप आसबे , धनंजय गोडबोले , धनंजय कर्णिक अशी मंडळी होती . त्यातही आणखी उल्लेखनीय बाब म्हणजे , तो तरुण पत्रकार आमच्या सगळ्यांचाच लाडका होता . मग आपण त्याच्यासाठी काही मदत मिळवू या , असं एकदा ठरलं .  आमच्यापैकी काहीजणं शरद पवार आणि काही प्रमोद महाजनांकडे गेले . त्यांना ती अडचण मोकळेपणानी सांगितली . अतिशय आवर्जून सांगायला हवं , पुढे शेवटपर्यंत त्याच्या उपचाराची सर्व काळजी त्या काळात शरद पवार आणि प्रमोद महाजन यांनी वैयक्तिक लक्ष घालून घेतलेली होती . लक्षात घ्या, तो काळ पैसे ट्रान्सफर करणं , संपर्क राखण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय कठीण होता . परंतु हे काम त्या दोघांनी केलं आणि खाजगीत तरी त्याचा कधी उल्लेख केल्याचं ऐकिवात नाही . इतक्या वर्षांनंतर आज प्रथमच याचा उच्चार केलाय ….

राजकीय विचार आड ना आणता शरद पवार , प्रमोद महाजन , गोपीनाथ मुंडे , दत्ता मेघे , आणि नितिन गडकरी यांच्या सहृदयता , सौहार्द आणि मैत्री जपण्याच्या अनेक कहाण्या मला चांगल्या ठाऊक आहेत .

====

दुसर्‍यांचं दुःख , वेदना वाचून त्याचं सहोदर कसं व्हावं , हा ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्यात असलेला दुर्मिळ गुण कसा अनपेक्षितपणे अनुभवायला मिळाला त्याची ही हकीकत आहे- ग्रंथालीने प्रकाशित केलेल्या माझ्या ‘डायरी’ या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम मुंबईत होता . सुशीलकुमार शिंदे प्रमुख पाहुणे , कुमार केतकर , अरुण साधू , राधाकृष्ण नार्वेकर अशी अनेक मान्यवर मंडळी तिथे होती . मी कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतो न पोहोचतो , नेमक्या त्याच वेळेस सुशीलकुमार शिंदे यांचंही तिथे आगमन झालं . मी सामोरं गेलो , त्यांचं स्वागत केलं . जिना चढता चढता सुशीलकुमार शिंदे मला म्हणाले , ‘तुम्हालाही इतकं काही भोगावं लागलेलंय याची मला खरंच कल्पना नव्हती .’ त्यांच्या म्हणण्यातला ‘तुम्हालाही’ हा जातीवरून आलेला आहे असा माझा समज झाला आणि मी त्यांना पटकन म्हणालो, ‘अहो शिंदेसाहेब , भोगण्याला , भुकेला आणि वेदनेला जात-धर्म काहीच नसतो .’  तेवढ्यात काही लोक समोर आले आणि तो विषय अर्धवटच राहिला . भाषणामध्ये मात्र सुशीलकुमार शिंदे यांनी माझ्या आईने उपसलेल्या अफाट कष्टांचा , रोजगार हमी योजनेवर मी काम केल्याचा आवर्जून गौरवपूर्ण उल्लेख केला आणि मी माझ्या आईच्याबद्दल लिहावं असा आग्रह केला .

माई-माझ्या आईबद्दल सुशीलकुमार यांनी केलेले ते उल्लेख अजूनही विसरु शकलो नाही कारण माईच्या संदर्भामध्ये आजही मी जरा जास्तच सेंटिमेंटल आहे . पण , माझ्यापेक्षा ते सुशीलकुमार शिंदे यांच्या मनात जास्त राहिलं आणि नंतर कांही महिन्यांनी बुलडाण्याच्या एका कार्यक्रमात बोलताना माझ्या त्या पुस्तकाचा तो सगळा संदर्भ देऊन जवळजवळ १०-१२ मिनिटं सुशीलकुमार शिंदे बोलले . कार्यक्रम संपल्यावर त्याबद्दल तिथला माझा सहकारी सोमनाथ सावळे आणि अन्य पत्रकारांचे फोन आले ; सुशीलकुमार शिंदे यांच्या भाषणात माझ्या संदर्भात जो काही उल्लेख होता तो त्यांनी कथन केला  . मला मोठं आश्‍चर्य वाटत होतं , की माझ्या अभावग्रस्ततेशी सुशीलकुमार शिंदे कशा पद्धतीनं आणि का रिलेट होऊ पाहतायत . एक दिवस सकाळच्या फिरतांना अचानक माझी अभावग्रस्तता , माईचं सहन करणं याच्याशी सुशीलकुमार शिंदे यांचा सहोदर होण्याचं कारण जाणवलं . सुशीलकुमार यांना माझं तेव्हाचं जगणं आणि माईचं सहन करणं , आमची ती परिस्थिती सुशीलकुमार शिंदे यांच्या निकटच्या परिचयाची होती ; त्यांनी व त्यांच्या आईनं खाललेल्या खस्ताचे व्रण मिटलेले नव्हते… सुशीलकुमार यांच्या त्या ‘रिलेट’ होण्यानं मी आश्‍चर्यस्तंभित झालो .

पुढे माझ्याकडून माझ्या माईवर एक लेखन झालं . नंतर , दरवर्षी नागपुरातून निघणार्‍या स्मिता स्मृती विशेषांकासाठी मी ‘आई’ हाच विषय घेतला आणि ‘स्त्री म्हणजे क्षणाची पत्नी आणि अनंतकाळची माता’ या समजाला छेद देऊन आईकडे मानवी नजरेतून बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन सादर करणार्‍या लेखांचं एक मोठं संपादन केलं . त्यात अनेक नामवंतांनी लिहिलं त्यात सुशीलकुमार शिंदे यांचाही त्यांच्या आईवरचा लेख आहे  . त्या मजकुराचं पुढे साधना प्रकाशननी ‘आई’ हे पुस्तक काढलं .  ते पुस्तक आवर्जून सुशीलकुमार शिंदे यांना मी पाठविलं . सुशीलकुमार शिंदे तेव्हा केंद्रीय ऊर्जा मंत्री होते ; त्यांचे व्याप खूप मोठे होते पण , त्यांनी ते पुस्तक वाचून पाठविलेलं चार पानांचं पत्र साहित्य आस्वादाचा अप्रतिम नमुना आहे . किती बारकाईनं सुशीलकुमार शिंदे ते पुस्तक वाचतात आणि त्या पुस्तकात व्यक्त झालेल्या त्या मजकुराशी कसे रिलेट होतात , याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ते पत्र आहे . पुढे दिल्लीत पत्रकारिता करायला मी गेलो तेव्हा सुशीलकुमार शिंदे यांना एक दिवस भेटायला गेलो. तेव्हा त्यांच्या विस्तीर्ण बंगल्यातल्या हॉलमध्ये खूप सारी पुस्तकं मांडून ठेवलेली होती आणि त्यात माझ्या ‘डायरी’ आणि ‘आई’ यांसह मराठी पुस्तकंही मोठ्या प्रमाणात होती .

====

पुस्तकांचा असाच मोठा खजिना माजी मंत्री नानासाहेब कुंटे यांच्याकडे त्यांच्या , प्रभादेवीला जातांना डाव्या गल्लीत असलेल्या घरात मी बघितला होता . त्यांच्याकडे तीन खोल्या भरून ग्रंथसंपदा होती . ते सक्रीय राजकारणातून निवृत्त झाल्यावर मी त्यांना भेटायला गेलेलो होतो ; ती ग्रंथ संपदा बघून मी थक्कच झालो . एखाद्या राजकारण्याकडे इतकी पुस्तकं बघण्याची  माझी एक पत्रकार म्हणून ती पहिलीच वेळ होती .  मी गप्पांच्या ओघात विचारलं , ‘तुमचा दिनक्रम काय असतो ?’  तर ते म्हणाले, ‘खास काही नाही ,  वाचन आणि बस्स . मी आता राजकारणापासून लांब आहे .  वकिली आणि राजकारण करतांना जमा केलेली पुस्तकं वाचायचं राहून गेलं होतं . ती वाचण्यामध्ये मी आता रंगून गेलेलो आहे . सत्तेत नाही याचं काही वैषम्य वाटत नाही.’

गिरीश लाड याच्या आमंत्रणावरुन अशात एका कार्यक्रमासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या संगमनेरला गेलो होतो . आता संगमनेर म्हटलं की बाळासाहेब थोरात यांची भेट होणं ओघानं आलाच . महाराष्ट्राचे माजी महसूलमंत्री आणि ज्यांचं नाव नेहमीच मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असतं , तेच हे बाळासाहेब थोरात . मी गेलो तेव्हा नगरपालिका निवडणुकीची गडबड सुरू असल्यामुळे बाळासाहेब थोरात बरेच व्यग्र होते . कार्यक्रमाच्या ठिकाणी त्यांची भेट होईल असं मी गृहीत धरलेलं होतं ; परंतु दुपारी ४ च्या सुमारास अचानक रुमचा दरवाजा वाजला . दरवाजा उघडला तर समोर बाळासाहेब थोरात उभे होते . मला आश्‍चर्यच वाटलं . माझ्या पूर्ण राजकीय वृत्तसंकलनाच्या कालखंडात बाळासाहेब थोरात यांच्याशी  माझा फार काही संबंध आलेला नाही . औपचारिक नमस्कार-चमत्काराच्या व्यतिरिक्त आम्ही फार काही बोलल्याचंही आठवत नाही तरी ते प्रमुख पाहुण्याकडे चालत आलेले होते .

मग ते त्यांच्या कार्यालयात आम्हाला घेऊन गेले . आदरातिथ्य केलं , सत्कारही केला . गप्पा चालू असताना त्यांनी ग्रेसचा विषय काढला. ते मला म्हणाले की, ‘अहो बर्दापूरकर, तुमची सगळी पुस्तकं माझ्याकडे आहेत . परंतु ‘ग्रेस नावाचं गारुड’ नाहीये .’

मी उडायचाच बाकी होतो . बाळासाहेब थोरातांच्या संदर्भामध्ये मला फारशी काही माहिती नव्हती पण , एक मंत्री ; आणि तोही काँग्रेसचा  ग्रेसच्या पुस्तकाच्या संदर्भात आपल्याकडे चौकशी करतो , वगैरे वगैरे डायजेस्ट होणं जरा कठीणच गेलं . मी त्यांना पुस्तक पाठवायचं कबूल केलं .  गप्पात ग्रेस हाच विषय सुरू राहिला . तेव्हा अचानक ते म्हणाले , ‘तुला पाहिले मी नदीच्या किनारी ,’  ही कविवर्य ग्रेस यांची कविता मला खूपच आवडते .’ पुढे त्यांनी ग्रेसच्या काही कविता म्हणून दाखवल्या . निवडणुकीचं राजकारण खेळणारे , गावातल्या सगळ्या राजकीय तथाकथित कटकारस्थानात भाग घेणारे राजकारणी थोरात नेमकी संध्याकाळ कलत असतांना ग्रेसच्या कविता वाचून दाखवत आहेत , हे वेगळं फिलिंग्ज होतं .

छगन भुजबळ , नितीन गडकरी , राज ठाकरे , उद्धव ठाकरे , मनोहर जोशी , सुधीर जोशी यांचंही वाचन खूप दांडगं आणि त्यांना गाणंही कळतं . विलासराव आणि आर. आर. पाटील यांना वाचनाची चांगली जाण होती . या सर्वांच्या वाचनांच्या संवयी मला छान माहिती आहेत . पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी माझा खूप काही संपर्क आला नाही ; पण त्यांचं वाचन आणि त्यांचं पुस्तकाच्या दुकानामध्ये रेंगाळणं हे मला प्रभावित करून गेलेलं आहे .

छगन भुजबळ , नितीन गडकरी यांचा एक अनुभव तर आवर्जून सांगण्यासारखा आहे . माझ्या ‘डायरी’ आणि ‘क्लोजअप’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशनासाठी गोपीनाथ मुंडे , छगन भुजबळ आणि नितीन गडकरी यांना ‘ऑन डिमांड’ बोलावलं आणि ते आले . याचं कारण की ते तिघंही जण जसे माझ्या व्यक्तिगत मित्रवर्तुळातील आहेत आणि तसेच ते एक चांगले वाचकही आहेत . मात्र , गोपीनाथ मुंडे यांच्याशी कार्यक्रमाच्या आदल्या दिवशीपर्यंत काही संपर्क झाला नाही  . तेव्हा मी नागपूरला संपादक होतो . कार्यक्रमासाठी औरंगाबादला पोहोचलो आणि आणि समजलं कार्यक्रमाच्या दिवशी गोपीनाथ मुंडे औरंगाबादला येणार आहेत . त्यांना फोन केला आणि त्यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाला यावं अशी विनंती केली . आमचं मैत्र १९७२पासूनचं म्हणजे बरंच जून झालेलं . त्या प्राचीन मैत्रीला जागून मुंडे म्हणाले की, ‘मित्राचा कार्यक्रम  आणि मी येणार नाही असं कसं होईल ? नक्की येतो आणि सभागृहात पहिल्या रांगेत बसून कार्यक्रम ऐकतो.’ अर्थात मुंडेंना काही मी पहिल्या रांगेत बसवणार नव्हतो . तातडीने आम्ही बातम्यांमध्ये मुंडेही आणखी एक  प्रमुख पाहुणे असतील असा उल्लेख केला . नितीन गडकरी यांना फोन करून विनंती केली की त्यांचा पक्षाचा कार्यक्रम आटोपून येतांना गोपीनाथ मुंडें यांना त्यांच्याच कारमध्ये घेऊन कार्यक्रमाच्या स्थळी यावं .’ तेव्हा नितीन गडकरी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष होते .  त्यांच्या आणि गोपीनाथ मुंडे यांच्यात बरीच मोठी दरी निर्माण झाल्याच्या चर्चा होत्या ; आम्ही पत्रकार त्या बातम्या रंगवून देत होतो . नितीन गडकरींनी गोपीनाथ मुंडे यांना घेऊन येण्याचं कबूल केलं .

मैत्रीचा संदर्भ आला सत्तेच्या मोठ्या पदावरची माणसं नाहक हट्टी नसतात ; त्या संदर्भात मानमरातबाच्या शिष्टाचाराचा बाऊ कसा करीत नाही , याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे तो कार्यक्रम होता . मुंडे-गडकरी येण्याच्या आतच महाराष्ट्राचे तेव्हा उपमुख्यमंत्री असलेले छगन भुजबळ पोहोचले आणि शिष्टाचार विभागाच्या अधिकार्‍यांची गडबड सुरू झाली . त्यांनी अन्य पाहुणे आल्याशिवाय तुम्ही येऊ नका , असं भुजबळ यांना सुचविलं होतं . परंतु भुजबळ यांनी ऐकलं नाही आणि ते आले . आम्ही दोघं चहा घेत असतानाच मुंडे आणि गडकरी आले . कोण पहिले भाषण करेल याबाबत चर्चा सुरू झाली , तेव्हा मुंडे म्हणाले की गडकरी आता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत तेव्हा पहिलं भाषण मी करतो , मग गडकरी आणि  आणि उपमुख्यमंत्री असल्यामुळे भुजबळ साहेब सगळ्यात शेवटी बोलतील . नितीन गडकरी एकदम संकोचले आणि ते म्हणाले, ‘मुंडेसाहेब आपण आमचे नेते . मी तुमच्या आधी बोलतो.’ त्या दोघांचं ते प्रेमाचं भांडण बघून  भुजबळ म्हणाले की , ‘तुम्ही दोघेही गप्प बसा. मी सांगतो त्याचप्रमाणेच होईल . पहिले नितीन गडकरी , मग मुंडेसाहेब बोलतील आणि मग मी बोलेन.’

आता ह्याचं एक उपकथानक असं आहे की, तोपर्यंत मुंडे यांनी माझी पुस्तक वाचलेली नव्हतं ; शक्यच नव्हतंही . त्या दिवशी सकाळी पक्षाच्या त्या कार्यक्रमाला जाताना माजी आमदार श्रीकांत जोशींच्या हस्ते मी ती पुस्तकं त्यांना पाठवली होती . तीच पुस्तकं घेऊनच ते कार्यक्रमच्या स्थळी आलेले होते आणि त्यांना ते पुस्तक वाचायला वेळ मिळालेला नाही , हे. त्यांनी मला स्पष्टपणानी सांगितलंही . परंतु केवळ चाळलेल्या पुस्तकावर गोपीनाथ मुंडेंनी जे भाषण केलं , त्या मजकुराच्या अनुषंगाने ते इतकं सुंदर होतं की विचारता सोय नाही .          मुंडे-गडकरी-मी आमच्यातलं प्राचीन .  त्याचा कधी नजाकतदार , कधी टोलेबाजी तर कधी गौरव करत त्याचा व्यासपीठावर उच्चार झाला आणि कार्यक्रम  रंगला . नितीन गडकरींनी दोन्ही पुस्तकं पूर्ण पुस्तकं वाचलेली होती . त्यांच्या भाषणाला वेगळा बाज होता , त्यात आमच्या मैत्रीचा संदर्भ होता , त्या मैत्रीचे काही अनुभव होते  . त्यामुळे नितीन गडकरींचं भाषण अतिशय छान होणं स्वाभाविकच होतं . त्याही पुढे जाऊन भुजबळांचं भाषण हे एखाद्या अस्सल समीक्षकाला लाजवणारं होतं . त्यांनी रीतसर नोटस् अशा काढून आणलेल्या होत्या आणि पुस्तकातल्या एकेका उल्लेखावर , काही वाक्यांवर त्या वाक्यांचा उल्लेख करून केलेलं प्रतिपादन थक्क करणारं होतं . अर्थात हे मला नाही तर ऐकणारांना थक्क करणारं होतं . भुजबळ आणि नितीन गडकरी यांच्या वाचनांच्या सवयीबद्दल मला बरंच ज्ञात आहे . नितीन गडकरी आणि माझ्यामध्ये पुस्तकांची देवाण-घेवाणही होत असे . राज ठाकरे , उद्धव ठाकरे हे बोलताना कितीत्यांचं वाचन कसं चौफेर आहे  आणि ते एका विशिष्ट विचारसरणीचा पुरस्कार करणारे असले तरी प्रत्यक्षात मात्र ते मित्र म्हणून वागताना किती सौहार्दपूर्ण असतात हे मला ठाऊक आहे . एक उल्लेख अप्रस्तुत ठरणार नाही- उद्धव ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली त्याच दिवशी माझ्या पत्नीची खूप मोठी बायपास सर्जरी झाली .  अँजिओप्लास्टीतून बाहेर आल्यावर कुणीतरी उद्धव ठाकरे यांना त्या संदर्भात सांगितलं .  त्यांनी लगेच मला फोन केला आणि म्हणाले, ‘मी आज तुमच्याशी बोलणार नाही , वहिनींशी बोलणार आहे . कारण वुई आर ट्रॅव्हलिंग इन अ सेम बोट.’ आणि त्यांनी अत्यंत आवर्जून मंगलच्या प्रकृतीची चौकशी तर राज ठाकरे चक्क घरीच भेटायला आले .

विलासराव देशमुख-गोपीनाथ मुंडे-प्रमोद महाजन , विलासराव-सुशीलकुमार , नितिन गडकरी , छगन भुजबळ , दिवाकर रावते ,  शरद पवार यांनी जोपासलेलं असं निर्व्याज मैत्र , त्यांच्यातली सुसंस्कृतता , संवेदनशीलतेच्या , माणुसकीचं दर्शन घडवणार्‍या आणि राजकीय विचार-जात-धर्म विहित अनेक हकिकती मला ठाऊक आहेत ; पण विस्तारभयास्तव थांबतो .

मित्रांच्या मदतीला धावून जाणं हे नितीन गडकरी , छगन भुजबळ  , दत्ता मेघे आणि  दिवाकर रावते अशा अनेकांची एक अपरिहार्य अगतिकता आहे ! कुणी सर्वसामान्यही गरजू माणूस कुणी लक्षात आणून दिला आणि  तो अनोळखी असला तरी तर त्याला सर्व प्रकारची मदत करण्याची या सर्वांना खुमखुमी आहे .  ( सार्वजनिक बांधकाम मंत्री असतांना नितीन गडकरी यांना माझं नाव सांगून एकानं मुंबईत क्वार्टर्स मिळवलं होतं .  ते लक्षात आल्यावर आम्ही मदतीची शिफारस करतांना फारच कांटेकोर झालो . ) कोणत्याही मदतीबद्दल कुठलाही उल्लेख न करण्याचं व्यसन या सर्व नेत्यांना आहे , हे जास्त महत्वाचं  . हे सर्व संवेदनशीलतेत, सुसंस्कृतपणात बसतं का नाही , हे ज्याचं त्यानी ठरवायचं आहे . इतक्या वर्षांच्या पत्रकारितेतल्या राजकारण्यांचे गैरव्यवहार, अपवृत्ती , गैरवृत्ती यावर अतिशय टोकाची टीका केलेली , करतो आणि करणारही आहे . तरी गेल्या ४०वर्षांच्या पत्रकारितेत हे प्रकर्षाने जाणवलं की , या प्रत्येक राजकारण्यांच्या मनात एक माणूस दडलेला असतोच-तो बाप असतो , काका , मामा असतो, त्याच्यात आई , बहीण , भाऊ असतो  आणि तो त्याचं माणूसपण जपत असतो . फक्त ते आपल्या  लक्षात येत नाही किंवा आपल्यापर्यन्त पोहोचत नाही  . आपल्या समोर  येतो तो त्यांचा तामझाम आणि त्यांचं ते सत्तेच्या गुर्मीत , कैफात वावरणं .  ते ज्या सुसंस्कृतपणे संवेदनशीलतेने वागत असतात ते आपण आपल्या वर्तन आणि व्यवहाराशी कधी पडताळून पाहतच नाही .

====

अजून एक मुद्दा असा आहे- राजकारण्यांनी सुसंस्कृत वागावं अशी अपेक्षा आपण एक समाज म्हणून आणि  आम्ही पत्रकार म्हणून कायमच बाळगतो पण , आपला समाज खरंच शंभर टक्के सुसंस्कृत आहे का ? हा प्रश्‍न आपण कधी आपल्याला विचारत नाही . त्या पलीकडे जाऊन किमान मी एकटा तरी सुसंस्कृतपणे , संवेदनशीलतेने का वागत नाही , हे प्रश्‍न जास्त महत्वाचे आणि मूलभूत आहेत . या  संदर्भातली एक गोष्ट इथे आवर्जून सांगायला हवी . लोकसंस्कृतीचे प्रख्यात संशोधक रा. चिं. ढेरे यांना ‘पुण्यभूषण’ पुरस्कार मिळाला तेव्हा केलेल्या भाषणात प्रख्यात नाटककार , माझे आवडते साहित्यिक महेश एलकुंचलवार यांनी ती  सांगितल्याचं अजूनही स्मरणात आहे . त्यांनी फिनलँड या देशातली जी एक हकीकत सांगितली ती अशी- त्या देशात सिबिलियस नावाचा एक संगीत रचनाकार राहत असे . ( आपल्याकडे जसे संगीत दिग्दर्शक असतात तसे युरोपीय देशामध्ये संगीत रचनाकार असतात ) सिबिलियस खूप प्रख्यात होता ; मोझार्टसारखाच . एक दिवस एका अमेरिकन पर्यटकाने दुपारी तीन- साडेतीनच्या सुमारास अचानक एक टॅक्सी थांबवली आणि त्या टॅक्सीत बसून त्यानं चालकाला विचारलं , ‘तुला सिबिलियस कुठे राहतात हे माहिती आहे का ?’

त्या टॅक्सी चालकानं सांगितलं की, ‘मलाच नाही, आमच्या देशातील प्रत्येकालाच सिबिलियस कुठे राहतात हे माहिती आहे.’

तो अमेरिकन पर्यटक टॅक्सी चालकाला म्हणाला , ‘तू मला सिबिलियसकडे घेऊन चल.’ दरम्यान टॅक्सी सुरू होऊन थोडी पुढे गेली होती . अमेरिकन  पर्यटकाचं म्हणणं ऐकताच त्या टॅक्सीचालकाने टॅक्सी थांबवली आणि त्याला विचारलं की , ‘तुम्ही त्यांची अपॉईंटमेंट घेतलेली आहे का ?’

तर तो अमेरिकन म्हणाला की , ‘नाही , माझी मुलाखतीची वेळ वगैरे ठरलेली नाहीये    पण , अनायासे आलेलो आहे आणि मला वेळ आहे तर त्यांना भेटून जावं असं मनात आलं . मी त्यांचा चाहता आहे.’

त्या टॅक्सीचालकानं त्या पर्यटकाला सांगितलं , ‘तुम्हाला वेळ घेऊनच त्यांच्याकडे जावं लागेल . ही त्यांच्या संगीत साधनेची वेळ असते आणि तुम्हाला असं अचानक जाऊन त्यांना डिस्टर्ब करता येणार नाही.’

तर तो पर्यटक अमेरिकन शैलीत म्हणाला की, ‘ठीक आहे . तू नाही तर मी दुसरा टॅक्सीवाला पकडतो.’

त्यावर त्या टॅक्सीचालकाने सांगितलं , ‘या शहरातला कुठलाही टॅक्सीचालक सिबिलियसकडे तुम्हाला केव्हाही घेऊन जाणार नाही . तुम्हाला माहिती नाही , आमचा देश या संगीत रचनाकारावर केवढं प्रेम करतो . त्यांच्या घराजवळून एक रेल्वेलाईन जात होती . त्या रेल्वेच्या खडखडाटाचा त्रास सिबिलियस यांना होत असेल , सिबिलियसच्या संगीत साधनेत कदाचित व्यत्यय येत असेल हे लक्षात घेऊन ती रेल्वे लाईन त्यांच्या घरापासून १० मैल लांब नेण्याचा निर्णय सरकारने अंमलात आणलेला आहे .’

आता तुम्ही मला सांगा , एका सर्वसामान्य नागरिकाची त्याच्या देशातल्या सिबिलियससारख्या कलावंताविषयी असलेली भावना आपल्या देशातील नागरीकांची आपल्या लेखक , कलावंत , साहित्यिकांविषयी आहे का ? इतका सुसंस्कृतपणा आपण जपलेला किंवा आपल्यात आहे का ? आपला समाज एकमुखाने जेव्हा अशा पद्धतीनं सुसंस्कृत होईल तेव्हा आपले लोकप्रतिनिधी सुसंस्कृत निपजतील . आपल्या समाजात सुसंस्कृतपणा जेवढा काही आहे, तेवढ्याच प्रमाणात आपले लोकप्रतिनिधी सुसंस्कृत आहेत  खरं तर  आपण समजतो त्यापेक्षा ते जास्त सुसंस्कृत , जास्त संवेदनशील आहेत . ते दिसण्याची दृष्टी आपल्याकडे नाही . बहुसंख्य राजकारण्यांच्या ‘बाकी’च्या वर्तन आणि व्यवहाराविषयीच्या चर्चा जास्त होतात . त्यांच्या अशा सुसंस्कृतपणा , संवेदनशीलतेच्या चर्चा होत नाहीत , एवढंच काय ते .

(लेखक ज्येष्ठ संपादक आहेत)

9822055799

#mediawatch #praveenbardapurkar #mediawatchdiwaliank2018

 

Previous articleगांधी आणि डॉ. आंबेडकर-प्रा. दत्ता भगत
Next articleसेक्स…आणि मी…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here