लग्नाआधी ….

लेखक – मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

भाग-२

लग्न नावाची संस्था मला कितीही मागास वाटत असली, तरी जोपर्यंत बहुतांश मानव जात विचारांनी प्रगल्भ होत नाही, तोपर्यंत लग्न ही संस्था एकंदर समाजाच्या दृष्टीने हितकारक राहील. लग्नाबद्दल प्रत्येकाची मतं वेगळी आहेत. इथे कोण चुकीचा कोण बरोबर हा मुद्दा येत नाही, ज्याला जे सोयीस्कर आणि योग्य वाटेल ते करावं.

लग्न करण्याआधी काय काळजी घ्यावी, काय काय करायला हवं, ह्याबद्दल आपण अनभिज्ञ असतो. ना घरचे, ना दारचे याबाबत मार्गदर्शन करत, ना लग्न संस्थेचा उदोउदो करणार्यां वा ती संस्था राबवणारे त्यासाठी झटत. त्यांच्यामते “लग्न ही संस्था योग्य आहे. एकदा तुम्ही लग्न करा आणि जे काय झक मारायचेय ते मारा. तुमचं तुम्ही बघा”… असं असतं.

खरंतर लग्नाआधी कौन्सिलिंग हे ‘Must’ असायला हवं.

लग्न करण्याआधी दोन्ही पार्टनरने तीन गोष्टी करणं मला खूप महत्त्वाचं वाटतं.

१. स्वतःबद्दलचं आपलं प्रामाणिक मत आपल्या पार्टनरला सांगणं.
– दोघांनी एक एक कागद घ्यायचा. त्यावर स्वतःचे स्वतःला वाटणारे “गुण” आणि स्वतःत असणारे “दुर्गुण” लिहावेत. पार्टनरकडून असणाऱ्या अपेक्षा लिहाव्यात. कुठल्या गोष्टी अजिबात चालणार नाहीत हेही मांडावं. दोन्ही कागद एकमेकांना द्यावेत. त्यावर विचार करावा. आपल्या पार्टनरने मांडलेले दुर्गुण हे आपल्याला कितपत झेपतील, कुठल्या गोष्टी आपल्या पार्टनरसाठी महत्त्वाच्या आहेत, कुठल्या गोष्टी पार्टनरसाठी असह्य आहेत … ह्याचा विचार करून त्यावर सविस्तर चर्चा करून मग निर्णय घ्यावा.

२. लग्नाआधी ६ महिने एकत्र राहणं.
– बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड असताना आपण आपल्या पार्टनरला आपल्यातलं फक्त बेस्ट देतो. मग तो तिच्या घरी, ती तिच्या घरी. जो काही टाईम तिच्यासोबत/त्याच्यासोबत घालवतो तो बेस्ट असावा अशी आपली धारणा असते. नव्याचे नऊ दिवस असतात ते. मग दोघं एकत्र आल्यावर कळतं, ‘अरेच्या हा असा झोपतो, हा असा ब्रश करतो, ही असं घर आवरते, हा असा पसारा करतो, हा टीव्हीतच लक्ष घालवतो … ” वगैरे वगैरे. एक एक सवयी कळत जातात, त्यातल्या बहुतांश सवयी एड्जस्ट करण्याच्या लायकीच्या असतातही… पण बऱ्याच वेळा त्या छोट्या मोठ्या गोष्टींवरूनच वणवा पेटतो. मग पुन्हा आपल्या निर्णयावर पश्चाताप होण्यापेक्षा, त्यातून परत डिवोर्स वगैरेची लफ़डी करत बसण्यापेक्षा, त्यांनी आधी ६ महिने एकत्र राहून पाहणं मला गरजेचं वाटतं.
अर्थात हे भारतासारख्या देशात अवघड आहे, पण अशक्य नाही.

३. मेडिकल टेस्ट्स

लग्नाआधी प्रत्येक पार्टनरने मेडिकल टेस्ट्स करून घेणं मला प्रचंड गरजेचं वाटतं. भारतात अजूनही त्याबद्दल फारशी जागरूकता नाही. खेड्यापाड्यात तर नाहीच नाही. मग अशा कुठल्या टेस्ट्स करून घ्यायला हव्यात ?

– STD’s आणि HIV/एड्स
ह्या टेस्ट्स का करायच्या ह्याबद्दल वेगळं सांगायला नकोच.

– ब्लड ग्रुप (Rh incompatibility)
ब्लड ग्रुपबद्दल आपण सगळेच फार अनभिज्ञ असतो. भिन्न ब्लड ग्रुपमुळे भविष्यात मुलं जन्माला घालणं धोक्याचं होऊ शकतं.
समजा मुलीचा ब्लड ग्रुप Rh निगेटीव्ह असेल, आणि मुलाचा ब्लड ग्रुप Rh पोजीटिव्ह असेल… तर त्या स्त्रीला प्रेगन्सीच्यावेळी, तिलाही आणि तिच्या बाळालाही धोका पोहोचू शकतो.
होतं काय, कि आईचं रक्त Rh निगेटिव्ह आणि बाळाचं Rh पॉजिटीव्ह (जे वडिलांकडून आलेलं आहे) असल्यामुळे, आईचं शरीर, बाळाचे RBC (red blood cells) मारण्यासाठी Antibodies तयार करतं. आईच्या शरीराला Rh निगेटिव्हची ओळख असल्यामुळे, Rh पॉजिटीव्ह तिच्या शरीरासाठी ‘घुसखोर’ वाटून जातो. तिचं शरीर Rh पॉजिटीव्हला फॉरेन पार्टिकल्स म्हणून Treat करतं. आणि मग miscarriages वगैरेचे प्रकार होतात, तर काहीवेळा मुलं anemia सारखे आजार घेऊन जन्माला येतात. ग्यानबा-तुकाराम करायच्या आधीच जर ही गोष्ट डॉक्टरला सांगितली तर त्यावर उपाय करता येतात.

– फर्टिलिटी टेस्ट
हे जरा पुरुषी अहंकाराला सूट होणारं नाहीये. पण आपण बाप होऊ शकू कि नाही, आपण आई होऊ शकू कि नाही … at least आपण Physically Compatible आहोत की नाही हे चेक करायला हवेत. आजकाल कितीतरी डिवोर्स हे त्यामुळे होताना दिसतात. प्रेम असणाऱ्या कपल्समध्ये जरी हे महत्त्वाचं वाटत नसेल, तरी आधीच माहित असतील काही गोष्टी तर पुढचे निर्णय घेणं सोपं जातं.

————-

आता इथे एक गोम अशी की,
ह्या सगळ्या टेस्ट्स करून आपण फक्त “बेस्ट” निवडणार का ?
म्हणजे ज्याला वरपैकी कुठले प्राॅब्लेम्स आहेत त्यांना लग्नासाठी झिडकारलं जाणार…. मग माणूसकी वगैरे सगळं म्हशीच्या ____ जातं आणि स्वार्थाची उठून दिसतो. अर्थात माणूस हा स्वार्थीच प्राणी आहे… पण मग लग्न वगैरेला पवित्रतेच्या धाग्यात बांधणं निव्वळ गाढवपणा ठरतो.

हे सगळं पाहिलं की लग्न हे एक खूप मोठं युद्ध असल्यासारखं वाटतं. पण काळजी घेतली तर कमीतकमी वर दिलेले प्रॉब्लेम्स तरी वैवाहिक आयुष्यात येणार नाहीत…

एकत्र राहणं हे कितीही म्हटलं तरी ती ऍडजस्टमेन्टच असते. प्रश्न फक्त आपल्या प्रायॉरिटीजचा येतो. प्रत्येकाची ऍडजस्ट करण्याची/होण्याची एक चौकट असते, त्या चौकटीपलीकडे कुठलंही नातं टिकत नाही.

शेवटी लग्न काय, लिव्ह इन काय किंवा ओपन रिलेशनशिप … जोपर्यंत आपले स्वतःचे विचार क्लिअर नाहीत, आपण स्वतःशी प्रामाणिक नाही तोपर्यंत सारं आलबेलच आहे.

– मंगेश सपकाळ , मेलबोर्न ऑस्ट्रेलिया

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा परखड वेध घेतात. लेखक स्वतःचा परिचय अतिशय हट्टी , अतिशय निर्बुद्ध , अतिशय अश्लील , अतिशय दुराचारी-अविचारी , अतिशय उद्धट …. वगैरे वगैरे..असा देतात   )

हे सुद्धा पहा , ऐका -https://youtu.be/LJKQOKRmhmQ

जीवनसाथी 2आजकल तलाक़ क्यों ज्यादा होते है?क्या शादी ज़रूरी है? क्यों?जीवनसाथी का चुनाव कैसे करे?क्या लव मेरेजेस ज्यादा सक्सेसफुल होते है?

Manav Shyam ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಶನಿವಾರ, ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 2018

Previous articleलग्न
Next articleआंतरजातीय विवाह आणि मुरली चरित्र
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here