१२ जुलै रोजी विधान परिषदेच्या १२ सदस्यांची निवडणूक होती. विधान सभेतून विधानपरिषदेत पाठवायच्या १२ जागांसाठी १३ उमेदवार उभे होते. त्याच्या आदल्या दिवशी म्हणजे ११ जुलै रोजी एक अत्यंत अनपेक्षित असा सत्कार आयोजित केला होता. त्यामुळे आमंत्रण पत्रिकेत नाव असलेले डझनभर नेते विधानभवनात अडकले. पण, नेते आले नाहीत म्हणून कुठेच अडले नाही. तुडूंब भरलेल्या सभागृहात ५ तास हा सत्कार कार्यक्रम चालला. कुणाचा होता सत्कार? तर… महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची सलग १८ वर्षे (१९७१ ते १९८९) सेवा करणारा त्यांचा सेवक यशवंत हाप्पे यांचा हा सत्कार. सत्काराचे निमित्त… यशवंताचा ७० वा वाढदिवस. आयोजन केले ते सामान्य कार्यकर्त्यांनी. आणि यशवंत हाप्पे यांच्या मित्रपरिवाराने.
महाराष्ट्रात अनेक मंत्री आणि मुख्यमंत्री झाले. त्यांचे ‘पी. ए.’, ‘पी. एस’. ‘मुख्य सचिव’ अशा अनेक पदांवर काम करणाऱ्या कुणाचाही असा सार्वजनिकरित्या वाढदिवस साजरा झाल्याचे मला ८५ वर्षांत माहिती नाही. पण, वसंतदादांच्या सेवेत असलेला यशवंत हाप्पे यांच्या सत्काराला यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात एक खूर्ची शिल्लक राहत नाही…. कार्यक्रम पाच तास चालतो… तरी लोक जागा सोडत नाहीत.. विधान भवनातून कोणी मंत्री, आमदार येणार नाहीत, याची खात्री असताना कार्यक्रम जबरदस्त यशस्वी होतो. राजकारणातील लोकांचे सत्कार होतात. पण, त्यांच्या सहाय्यकाचा असा सत्कार हा पहिल्याप्रथमच पहात होतो.
याचे कारण यशवंत हाप्पे हे दादांचे ‘स्वीय सहाय्यक’ नावाला असले तरी प्रत्यक्षात पहिल्या दिवसापासून दादांच्या शेवटच्या श्वासापर्यंत, यशवंतने दादांवर पित्यासमान प्रेम केले आणि दादांनीही त्याला ‘मानसपुत्रच’ मानले. अशी नाती एका दिवसात तयार होत नाहीत. या ‘ऋणानुबंधाच्या गाठी’ असतात. त्या कोण-कुठे-कशा जुळवतो… याचा मानसशास्त्रज्ञाांना देखील अभ्यास करता आला नाही. यशवंत आणि दादांचे नाते कसे जमले, हा एक कथा-कादंबरीचा विषय आहे. दादा प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष होते. त्यांना एका सहाय्यकाची गरज होती. कोणीतरी यशवंताला त्यांच्याकडे पाठवले आणि त्या क्षणापासून यशवंता दादांचा आणि दादा यशवंताचे झाले. दादा त्याला ‘यशवंता’ अशीच हाक मारायचे. दादांच्या पुतण्याच्या लग्नमंडपातच दादांनी यशवंतचे लग्न लावून दिले. दादा मंत्री असताना यशवंतची राहण्याची व्यवस्था ते राहत असलेल्या मंत्र्यांच्या बंगल्यात केली. मुख्यमंत्री असताना ‘वर्षा’ बंगल्यावर केली. राजस्थानचे राज्यपाल असताना जयपूरच्या राजभवनवर दादा त्याला घेवून गेले. आणि दादा जेव्हा सत्तेवर नव्हते तेव्हा त्याला हळूवारपणे म्हणाले, ‘यशवंता, आता माझ्याजवळ सत्ता नाही… तुला मंत्री असलेल्या कोणाकडे काम करायचे असेल तर मी शब्द टाकतो… आणि तुझी व्यवस्था करतो….’ यशवंताने सांगितले की, ‘दादासाहेब, तुम्ही सत्तेवर आहात किंवा नाहीत… यासाठी मी तुमच्या सेवेत नाही… तुमच्या सोबत मी कायमचा आहे…’
दादा भारावून गेले होते. दादांना यशवंताने जपले. आणि यशवंताला दादांनी जपले. सतत १९ वर्षे दादांच्या सहवासात यशवंता होता. दादाही साधे…. यशवंताही त्याहून साधा… दादांकडे येणारी माणसं म्हणजे दिवसभर गर्दीच गर्दी. त्या गर्दीचे नियोजन करून प्रत्येकाची भेट करून देणे… त्याचे जे काम करायचे आहे, ते दादांनी यशवंताला सांगणे… आणि प्रत्येकाचे काम टिपण करून यशवंताने प्रामाणिकपणे ते काम मार्गी लावणे… यशवंत हाप्पे यांनी कितीजणांना, कशी, आणि किती मदत केली असेल, याचा हिशेब नाही… आज खासदार असलेले सुनील तटकरे हे १९८५ च्या निवडणुकीत जेव्हा उभे राहिले तेव्हा त्यांना तिकीट मिळावे म्हणून ते यशवंतला भेटले. दादांची आणि तटकरे यांची भेट यशवंताने करून दिली. दादा तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. दादांनी यशवंताच्या शब्दावर तटकरे यांना तिकीट दिले. ती निवडणूक तटकरे हरले. पण आजचे तटकरे जे कोणी आहेत, ती त्यांची राजकीय सुरुवात यशवंताने करून दिली. अशा कितीतरी जणांना राजकारणात मदत करणारा यशवंत.
अखिल भारतीय पातळीवर त्याचे संबंध निर्माण झाले. मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजयसिंह हे एकमेव नेते असे आहेत की, दर आषाढी एकादशीला गेले ३० वर्षे ते सातत्याने पंढरपूरला येतात. महाराष्ट्रातील जो मंत्री आषाढीला पांडुरंगाची पूजा करतो तो सत्तेवर नसला तर पुढच्या वर्षी तिकडे फिरकतही नाही. पण, दिग्विजयसिंह हे दरवर्षी ‘वारी’सारखे पंढरपूरला येतात. आणि गेली ४० वर्षे त्यांना पंढरपूरला घेवून जाणे आणि मुंबईला परत आणणे हे काम करतो तो यशवंत. अनेकांना माहिती नसेल… असे अनेकजणांशी जिव्हाळ्याचे ऋणानुबंध यशवंताने कसे जोडले… टिकवले… त्यामुळे त्याच्या सत्काराला नेते नसले तरी मनापासून प्रेम करणाऱ्यांची तुडुंब गर्दी झाली. महाराष्ट्रातील नेत्यांना वेळ मिळाला नाही… कारण, ११ जुलैचा दिवस आणि रात्रसुद्धा ‘कत्तल’ची होती. १२ जुलै रोजी विधान परिषदेचे मतदान होते. बाळासाहेब थोरात, बंटी पाटील, सुनील तटकरे हे पुष्पगुच्छ देवून गेले. पण, सत्कारासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्या २० जणांची नावं होती ते कोणीही फिरकले नाहीत. सत्कारासाठी आले कोण? तर भोपाळहून खासदार दिग्विजय सिंह… तेही आपल्या धर्मपत्नीसह….
सत्काराअगोदर निर्माते जयू भाटकर यांनी यशवंत यांच्या जीवनावर तयार केलेली १५ मिनिटांची चित्रफित अप्रतिम होती.
मध्यंतरी यशवंत अचानक आजारी पडला.. पिंपरी- चिंचवडच्या डॉ. पी. डी. पाटील यांनी त्यांच्या अद्ययावत रुग्णालयात यशवंताला दाखल करून घेतले. तब्बल दीड महिना उपचार केले… तो दिवस असा होता की, यशवंत हाप्पे पुण्याला चालले होते…. पिंपरीजवळ त्यांना छातीत दुखू लागले… घाम आला…. त्यांनी लगेच पी. डी. पाटील यांचे हॉस्पिटल गाठले. सुदैवाने पी. डी. सर कार्यालयात हाेते. त्यांनी लगेच यशवंत यांना आय.सी.यू. मध्ये दाखल करून घेतले. विषय खूप गंभीर होता… योग्यवेळी, योग्य उपचार झाले म्हणून यशवंत वाचला… आणि डॉ. पी. डी. पाटील सर यांच्यामुळे हे शक्य झाले. आणि खरं म्हणजे हे जाहीरपणे सांगू नये…. दीड महिन्याच्या उपचाराच्या खूप मोठा आकडा असलेल्या बिलाचा एक पैसाही पी.डी. सरांनी घेतला नाही. कारण काय? ‘अहो, वसंतदादांच्या सेवेत १८ वर्षे काम केले त्यांनी….’ हे जेव्हा तुम्ही सांगितले तेव्हा बील घेणे हा विषयच गौण ठरला…’ पी. डी. सर मला म्हणाले, ‘अशी माणसं आता कुठं मिळतात…’ पी. डी. सरांसारखी मोठ्या मनाची माणसं किती वेगळ्या भावनेने विचार करू शकतात… आणि कोणाचे पुण्य कोणाला फळाला येते, याची ही अशी उदाहरणे आहेत. (खरं म्हणजे यशवंताच्या सत्कार कार्यक्रमात पी. डी. सरांना आमंत्रित करून त्यांचाही सत्कार करावा, असे मी सूचवले होते. पण, संयोजकांकडून ते राहून गेले. यशवंताच्या सत्कारा इतकाच तो सत्कार तेवढ्याच कृतज्ञतेचा ठरला असता. )
दादांच्यासोबत यशवंताला काम करायला मिळणे… हा नशिबाचाच भाग… दादा हा एवढा मोठा माणूस महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाण साहेबांनंतर वसंतदादाच… १९५२ साली दादा विधानसभेत निवडून आले. आणि १९७२ साली मंत्री झाले. तेसुद्धा इंदिरा गांधी यांच्या आग्रहामुळे. सलग २० वर्षे ते पक्षाचे काम करत होते. आमदार होते… पण, ‘मला मंत्री करा…’ असे सांगायला ना ते पंडित नेहरू यांना भेटले… ना इंदिराजींना कधी भेटले. आज आमदार झाल्यावर कोणी २० दिवस थांबायला तयार होत नाही. प्रत्येकाला मंत्रीपद हवे असते… दादा किती वेगळे होते… स्वातंत्र्यासाठी छातीवर गोळी झेललेला हा माणूस. सांगलीचा तुरूंग फोडून इतिहास घडवणारा माणूस… क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या १९४२ च्या लढ्यातील सातारा जिल्ह्यातील हा स्वातंत्र्यसेनानी. फक्त सातवीपर्यंत शिकलेला… पण, महाराष्ट्रातील सगळ्यात शहाणा माणूस. महाराष्ट्रातील ग्रामीण विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी पुणे-मुंबईतील काॅलेजमध्ये प्रवेश मिळत नाही… हे या फार न शिकलेल्या शहाण्या माणसाच्या प्रथम लक्षात आले… आणि त्यांनी खाजगी महाविद्यालयांना परवानगी दिली. असे हे दादा. त्यांच्यासोबत काम करणाऱ्या यशवंताने दादांच्या सत्तेचा, नावाचा कधीही, कसलाही गैरफायदा घेतला नाही. एखाद्या माणसाने दादांच्या मुख्यमंत्रीपदाचा फायदा घेऊन किती पैसे कमावले असते… पण दादांचा खरा सच्चा चेला कोण असेल तर तो यशवंता आहे… दादांनीही काही कमावले नाही… ते तर लोकांना देतच राहिले… यशवंताही तसाच राहिला… पण त्याचे सगळ्यात मोठे समाधान तेच आहे. त्याला काँग्रेसने आमदारसुद्धा केले नाही… ना कोणते पद दिले… पण तो दादांसोबत होता. हेच त्याचे सगळ्यात मोठे पद. सामान्य माणसांच्या आडलेल्या कामांना यशवंताने धडाकून मार्गी लावले. ती यादी एवढी मोठी आहे की, यशवंताच्या मदतीमुळे मोठी झालेल्या माणसांची नावंही शेकड्यांत आहेत.
दादा गेले… पण यशवंताचे दादांवरील प्रेम कमी झाले नाही… आज विधान भवनाजवळ वसंतदादांचा जो पूर्णाकृती पुतळा आहे… तो उभा रहावा म्हणून त्याचा पाठपुरावा केला तो यशवंताने… त्यावेळचे विधानसभा अध्यक्ष दत्ता नलावडे… मुख्यमंत्री मनोहर जोशी….. या सगळ्यांच्या पाठी लागून यशवंताने विधान भवनाच्या आवारातच दादांचा पुतळा उभारण्याचे स्वप्न साकार केले. दादांचा पुतळा तयार करून देण्याची जबाबदारी त्यावेळचे मंत्री रामकृष्ण मोरे आणि पुण्यातील काँग्रेसचे कार्यकर्ते संजय बालगुडे यांनी घेतली. पुतळा उभा राहिला. दादांची ‘जयंती’ आणि ‘पुण्यतिथी’ या दादांच्या पुतळ्याजवळ दरवर्षी यशवंतामुळेच साजरी होते. माणसं किती जमतात… पाच-पंचवीस… तीसुद्धा यशवंताचे फोन चालू असतात म्हणून…. महाराष्ट्र अनेक मोठ्या नेत्यांना विसरला, तसा दादांनाही विसरला… दादांच्या जन्मशताब्दी वर्षात यशवंताने महाराष्ट्रभर जन्मशताब्दी साजरी करण्याकरिता आटापिटा केला. सांगली-वैभव बँकेचे डॉ. पी. आर. पाटील यांनी यशवंताला मोठा पाठिंबा दिला, मदत केली आणि किमान ५० कार्यक्रम तरी यशवंताने महाराष्ट्रभर केले. असा हा यशवंत…
दादांचा विश्वासू सहकारी.. मानसपुत्र…. त्याचा ७० वा वाढदिवस साजरा करायला दादांचे नातू नुतन खासदार, विशाल पाटील, माजी केंद्रीय मंत्री प्रतिक पाटील, हे आत्मियतेने उपस्थित राहिले आणि विशेष म्हणजे ‘हा सत्कार झाला पाहिजे’, यासाठी सगळा खटाटोप आमदार सत्यजित तांबे यांनी केला. त्याचेही कौतुक वाटले. पण त्यालाही एक संस्काराचा धागा आहे. वसंतदादांनी महाराष्ट्रात ४० जणांना शैक्षणिक संस्थांची परवानगी दिली. तशी ती संगमनेरचे भाऊसाहेब थोरात यांनाही दिली होती. भाऊसाहेब आणि आजचे विधान सभेतील काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी देशातील सातव्या क्रमांकाचे इंजिनिअरिंग कॉलेज उभे केले. कॉलेजमध्ये प्रवेश करताना अगोदर यशवंतराव चव्हाणसाहेबांचा पुतळा आहे… आणि इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्रवेश द्वारावर वसंतदादांचे २० फूट उंचीचे भव्य तैलचित्र तेथे उभारण्यात आलेले आहे. परवा कळंबोलीच्या एम. जी. एम. मध्ये कमलकिशोर कदम यांना भेटायला गेलो होतो… त्यांनी गेल्या गेल्या म्हटले की, ‘महाराष्ट्रात हे शैक्षणिक काम उभे राहिले, ते केवळ वसंतदादांमुळे’. राजकारणात पद येते आणि जाते… पण माणसं पदामुळे लक्षात न राहता… त्यांनी केलेल्या कामामुळे आणि सामान्य माणसांबद्दल त्याला असलेल्या आपलेपणामुळे ही नावं कायमची हृदयात कोरली जातात.
वसंतदादाही त्यातीलच एक नाव. त्यांची सेवा करणारा यशवंत हाप्पे याच्या सत्काराला सामान्य माणसांनी तुडुंब गर्दी करावी…. सत्कार आटोपल्यावर किमान २ तास यशवंताला गुच्छ देण्याकरिता आणि हात मिळवून शुभेच्छा द्यायला ही रिघ होती…. यशवंताने जे काही आयुष्यात मिळवले आहे त्यात हीच कमाई सगळ्यात मोठी आहे. मला तरी असे वाटते की, एका राजकीय नेत्याच्या स्वीय सहाय्यकाचा असा सत्कार पूर्वी झालाही नाही आणि असा स्वीय सहाय्यक पुन्हा होणे नाही…. दादांसारखा नेता जसा होणे नाही… तसा यशवंतासारखा प्रामाणिक सेवकही पुन्हा होणे नाही. आजच्या पैशाच्या जगात तरी फार अवघड आहे. सामान्य माणसं उगाच गर्दी करत नाहीत… आणि ही ‘जमवलेली’ गर्दी नव्हती… आपणहून उत्साहाने आलेले हे यशवंतप्रेमी… सत्कारासाठी कोणते नेते येणार आहेत, त्याकरिता ही गर्दी नव्हती. ते फक्त आणि फक्त यशवंतला शुभेच्छा द्यायला आले होते. यशवंताची तब्बेत आजूनही थोडी नाजूक आहे… त्याला काळजी घ्यावी लागणार आहे… पण ११ जुलैच्या सत्काराने या सामान्यातील असामान्य माणसाला खूप खूप मोठी ऊर्जा मिळाली आहे. आणि या ऊर्जेच्या जोरावर यशवंत पुन्हा ठणठणीत बरा होईल. सार्वजनिक जीवनात त्याचा पुन्हा वावर सुरू होईल. सत्काराच्या दिवशी तो आणि त्याचे सर्व कुटुंब मोहरून गेले होते. त्याला खूप खूप शुभेच्छा…. आणि त्याच्या १०० व्या वाढदिवसाला अशीच तुडुंब गर्दी जमेल,अशी अपेक्षा…