मुग्धा कर्णिक
इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा चांगला अनुभव आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं असा सद्भाव मनात असल्यामुळे वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं. पण ते सांगतानाही आपला अनुभव तर्कसंगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना देणे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्देचाच प्रसार.
धार्मिक-अध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो जेव्हा रोजचे आवश्यक व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासांतून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे.
माणसाने काय खावे, कसे खावे, कां खावे याचा विचार मानवी नागर-अनागर संस्कृतींच्या प्रत्येक टप्प्यावर होत गेला. जे उपलब्ध आहे, जसे हवामान आहे, जशी प्रकृती आहे त्यानुसार विविध प्रदेशांतल्या विविध लोकांनी आहाराच्या पध्दती ठरवल्या. अन्नग्रहणाचे सामाजिक, कौटुंबिक संकेत, रीती ठरवल्या. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपध्दतीही थोड्याबहुत स्वीकारल्या गेल्या. अन्नघटकांत अनेक प्रकारची धान्ये, कडधान्ये, फळेमुळे, पानेफुले असा शाकाहार, मत्स्याहार, मांसाहार, दही-दूध-लोणी-तूप-छेना-चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश होत गेला.
जगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा असे सांगण्यात आलेले नव्हते. प्रत्येक धर्मात काही अन्नपदार्थ वर्ज्य आहेत. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वर्ज्य आहेत. जैन धर्मात मात्र अशाक आहार पूर्णतः वर्ज्य मानण्यात आला आहे. आणि त्यातील कट्टरभाव वाढत आहे.
पण आजकाल जगभरातच सर्वत्र, मूळ धर्मांचा भेदाभेद न रहाता शुध्द शाकाहारी बनण्या-बनवण्याचा थोडी कट्टरतेची झांक असलेला आधुनिक विचार बळावण्याचे प्रयत्न होत आहेत. मांसाहाराविरुध्द धर्मयुध्द पुकारल्यासारखी प्रचारकी भाषा वापरली जाते आहे. मानवी करुणाबुध्दीला भावुक आवाहन केले जाते आहे. भावुकतेच्या आहारी जाऊन अनेक मांसाहारी लोक नाहक अपराधी भावनेने ग्रस्त होत आहेत.
व्यक्तिगत आवडनिवड म्हणून कुणी शाकाहारी रहायचे ठरवले तर तो मुद्दा मान्यच करता येईल. अशा व्यक्ती कुणी मांसाहार करण्याचा आग्रहच केला तर नम्रपणे मला आवडत नाही, चालत नाही अशी उत्तरे देऊन मांसाहार टाळतात. क्वचित थोडी चव घेऊन आवडलं नाही म्हणून बाजूस सारतात. अशा उदाहरणांचा सन्मान वैयक्तिक आवड म्हणून राखलाच पाहिजे.
हिंदू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठेवलेले जन्मजातीने ब्राह्मण असलेले अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत.
ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्कसंगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली तिसरी पिढी तरी भारतात आहेच.
परंतु त्याचवेळ शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा येऊ लागली आहे. जैन धर्मीय तर त्यात आहेतच, पण भारतीय परिघाबाहेर, जागतिक स्तरावरही शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अनेक अवास्तव मुद्दे उपस्थित केले आहेत. त्या मुद्द्यांचा कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे. कारण या वादामुळे मानवजातीचे विभाजन आणखी एका अंगाने होऊ लागले आहे., एवढेच नव्हे तर मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळेपणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले एका श्रेष्ठ प्रथिनयुक्त आहाराला मुकतात, आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.
फार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल बाबा, बुवा फेथहीलर्स कशा प्रकारे विज्ञानाच्या परिभाषेचा दुरुपयोग करून करतात हे तर सहजच पाहायला मिळते. हा सारा खेळ प्रसिध्दी आणि पैशाचा असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहे. ज्यांनाज्यांना आपले काही विशिष्ट दुकान चालवायचे आहे, प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवून आपले ठाणे प्रस्थापित करायचे आहे अशा जगभरातील विविध गटांत कोणकोण आहेत? यात आहेत पृथ्वीच्या रक्षणाचे काही ठेकेदार, प्राणिप्रेमाचे ठेकेदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स एंजिनिअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महंत- अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते. या सर्वांचीच दुकाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या सत्तेच्या दुकानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वांचेच ध्येय पैसा असते असेही नाही. कुणाला प्रसिध्दीचे वलय हवे असते, कुणाला काटेरी मुकुट… जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा हवा असेल त्यांना फंड्स आणि काटेरी मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके. कधीकधीतरी दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम्-प्लेज्झर-ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा मिळवण्याचे शूचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे.
असल्या गटांमधलाच एक अत्याधिक बोंबाबोंब गट आहे शाकाहारवाद्यांचा. हे बोलके शाकाहारवादी कोणत्या प्रकारची विज्ञान परिभाषा वापरतात आणि दिशाभूल कशी केली जाते हे पाहाण्यासारखे आहे.
माणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना हे मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाही हा त्यांचा सर्वात लाडका युक्तीवाद. शरीररचनेचा वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे.
शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. तर्कनिष्ठा गहाण पाडणाऱ्या एखाद्या प्रणालीच्या पगड्याखाली असलेली माणसेच असली विधाने करतात. अनिमल लिबरेशन फ्रंट नावाच्या एका दुकानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. बऱ्याच शाकाहारवादी माणसांचे म्हणणे असते की मांस हे आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्नच नाही.
निसर्गसंमत म्हणजे काय? मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुध्दी निसर्गतःच मिळाली. एकाच खाद्य वस्तूवर विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बुध्दी माणसाकडेच आहे. आणि त्या निसर्गदत्त बुध्दीचाच वापर करून मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गतः मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत आले आहे. माणूस आपल्या भंवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूमध्ये परिवर्तन-संस्कार करून ती खाऊ, पचवू शकतो. उष्ण कटिबंधातील मामसे अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नी, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा- तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तुरट चवींचा वापर करून खातात. मांस, मांसे, अंडी वगैरेंप्रमाणेच धान्ये कडधान्ये, भाज्या, फळे मुळे. फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे लागते. निवडणे, सोलणे, धुणे, बिजवणे, चिरणे, कुटणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधांतील माणसं कमी-जास्त प्रमाणात तेच संस्कार करतात. अतीशीत प्रदेशांतील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर देत जगताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खाऊन त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.
दुसरे असे की माणसाची आतडी साधारण शुध्द शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा कमी लांब असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा थोडी अधिक लांब असतात. पूर्ण शाकाहारी प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसांत नसते. रवंथ करण्यासाठी योग्य अशी रचनाही माणसाच्या अन्नपचनसंस्थेत नसते. माणूस हा शाका तसेच मांस असे दोन्ही प्रकारांतले अन्न घेऊ शकतो., ( तरीही “चार जठरं” ही रचना सर्वच शाकाहारी प्राण्याना असतेच असं नाही. पण इतर अवयव तत्सदृश कार्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ अपेंडिक्स – काही शाकाहारी प्राण्यांमध्ये वनस्पतीज सेल्युलोजच्या पचनासाठी लांब अपेंडिक्स असतात, ज्यात जीवाणूंद्वारे सेल्युलोजचे पचन होते. मानवांमध्ये फक्त मोठ्या आतड्यात हे कार्य काही प्रमाणात होते.)
दातांच्या उत्क्रांतीवर एक नजर टाकल्यास लक्षात येईल की मानवाची दंतरचना सुद्धा शाक-अशाक दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी उपयुक्त आहे. शिवाय भाषा/धर्म इत्यादीच्या कल्पना पूर्णत्वास जाण्याआधी सुद्धा मनुष्यप्राणी शिकारी आणि अन्न गोळा करणारा होता – ह्यामध्ये मांसासाठी शिकार करणे एआणि वनस्पतिज अन्न ‘गोळा’ करणे हेच अध्याहृत आहे.
अशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शुध्द अशाक आहार घेत नाही. शाकायुक्त आहारातच प्राणिज पदार्थांची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचर यांचे मांस यांची जोड दिलेली असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिंबिरी यांच्या जोडीला मांसाहार घेतला जातो. छान मजेत पचवतो माणूस सगळं. दातांनी, सुळ्यांनी तोडतो, किंबहुना सुळे हे मांस तोडून काढण्यासाठीच उत्क्रांत झाले आहेत! आपल्या मानवेतर पूर्वजांमध्ये सुळे बऱ्याचदा मोठाले होते असे दिसून आले आहे. तर माणूस अन्न चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी आणि इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.
संस्कृतींच्या युगप्रवासात पाककला प्रगत झाली याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बुध्दी, निसर्गदत्त शरीररचना-म्हणजे पचनसंस्था आणि काय आवडतंय, काय नावडतंय हे कळवणारी रसना. शरीराला काय अहिताचं आहे हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध घेऊन आहारात बदल करण्यास सुचवणारी अक्कल हे सारं निसर्गदत्तच होतं. मग ते निसर्गसंमत नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.
दुसरा मुद्दा पुढे केला जातो तो क्रौर्याचा. तर्कनिष्ठेला, अनुभवसिध्द ज्ञानाला खुंटीला टांगून केवळ आपलीच भावना श्रेष्ठ मानणारांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वतःच्या माथ्यावर संवेदनशीलतेचा किरिट ठोकून बसवला तरीही असले खुळचट मत मनावर घेण्याची गरज नाही.
अनेक लोक आपण संवेदनशील, भावनाप्रधान असल्याचा उपयोग शस्त्रासारखा करतात. आपल्यासारखे नसलेले इतर लोक खालच्या प्रतीचे आहेत हे दाखवण्यासाठी, नैतिकदृष्ट्या आपण श्रेष्ठ आहोत म्हणून आपल्या मताला प्राधान्याने सर्वसंमती मिळालीच पाहिजे हे ठसवण्यासाठी या भावनाप्रधानतेचा वापर होत असतो. पण बुध्दीनिष्ठ परिशीलनातून स्पष्ट झालेले सत्य कळले तर असल्या भावनाप्रधान श्रध्दांना आदर देण्याची गरज उरत नाही. किंबहुना असल्या उद्योगांना सज्जनता म्हणून थोडाही आदर दाखवल्यास त्यांच्या शस्त्रांना धार चढते. काही काळानंतर त्यातूनच भावना दुखावण्याचे राजकारण सुरू होते.
अशाक आहार म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रौर्य असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या भावनांचा डोलारा आधारित आहे. शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील अडाणी माणसाचे मत असू शकते.
खरे तर धान्य खाणे म्हणजे भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या बिया दोन दगडांत भरडल्या दळल्या जातात, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या वेदनां ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत असे गृहीत धरणे सोयिस्कर पडते एवढेच. ऊब मिळते आहे, पाण्याचा ओलावा जाणवतो आहे अशा जाणीवेने गहू, कडधान्ये अंकुरायला लागतात, वाढण्याचे स्वप्न त्या बीजांना पडू लागते. त्यांची जीजिविषा अशी जागवून त्यांना फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून झालेले नसताना अगदी कोवळेच पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे जीवहत्याच आहेत. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे. कारण अजूनही माणूस दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा (आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?)
निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे, तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे. अर्थात साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहेत. खरे तर तो एक अटळ असा सृष्टीक्रम आहे. प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणूसही याच नैतिकतेचे तत्व पाळत आला आहे.
स्वग्रहसंवर्धनाच्या नव्या जाणीवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून खाद्य जीव, अखाद्य जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशुपक्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या व्यक्ती दुर्मिळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता निर्बुध्द, लोभी, लालची एवढेच करता येईल. शाकाहारी तसेच मांसाहारी असलेल्या अनेक व्यक्ती दुर्मिळ जीवसृष्टीच्या अवयवांच्या काळ्या बाजारात तसेच अनेक काळ्या व्यवहारांतही असतात. तेव्हा काहीच फरक होत नाही. त्याच बरोबर आस्थेने आपला परिसर, आपली सृष्टी, आपला समाज निरोगी रहावा म्हणून तळमळीने काम करणारांत शाकाहारी नि मांसाहारी दोन्ही आवडीनिवडींची माणसे असतात. सुष्टत्वाचे आणि दुष्टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार आणि मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक लोकप्रिय गैरसमज आहे. ही आयुर्वेदिक संकल्पना आहे आणि ती आधुनिक विज्ञानाच्या कसोटीस उतरत नाही.
वनस्पतींची जीवहत्या सात्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका भेद नाहकच करून ठेवला आहे.
पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रंगाचे असल्यामुळे कींव वाटणे किंवा घृणा वाटणे या दोन भावना उचल खाण्याचे प्रमाण जास्त असते. भाजी कापल्यावर, फळे चिरल्यावर वाहणारा वनस्पतींचा जीवनरस अशी भावना चेतवत नाही याचे कारण जीव म्हणून त्यांचे आपल्याशी गुणसाधर्म्य नसते. एका पूर्ण वेगळ्या प्रकारातील सजीवांची संज्ञा जाणून घेण्याची आपली कुवत नसते. शिवाय पावित्र्यासंबंधी आंधळे गैरसमज असल्याने स्त्रीचे पाळीचे रक्तही अपवित्र मानणाऱ्या समाजात- मांसाहारी व्यक्तींमध्ये अनेकदा हकनाक न्यूनगंड किंवा अपराधी भावना निर्माण झालेली पाहायला मिळते. संभ्रम निर्माण होतो. असल्या संभ्रमित दुबळेपणाचा फायदा भोंदूबुवा-स्वामी-बापू घेतात तसेच प्रचारकी शाकाहारवादीही घेतात.
शाकाहारवाद्यांचा क्रौर्यासंबंधीचा हा प्राथमिक खुळचटपणा निकाली काढायला फारसा त्रास पडत नाही. प्रश्न येतो, जेव्हा ते अशाक आहारातील पोषक द्रव्यांचा अभाव, अपद्रव्ये वगैरे संदर्भात बोलू लागतात, आणि शाकाहारातील पोषक द्रव्यांची(च) श्रेष्ठता पटवून देऊ लागतात तेव्हा.
शाकाहाराच्या प्रचाराचे व्रत घेतलेल्या संस्था आजकाल सॅच्युरेटेड फॅट्स, पॉलिअनसॅच्युरेटेड, कोलेस्टेरॉल, ओमेगा ६, ओमेगा३, अँटिऑक्सिड्ट्स या अन्नघटकांसंबंधीने मांसाहारासंदर्भात बेधडक विधाने करत असतात. आरोग्य हा त्यांचा आणखी एक लाडका मुद्दा. मधुमेह, हृदयविकार, रक्तदाब, आतड्यांचे विकार, कर्करोग अशा अनेक रोगांना सामोऱ्या जाणाऱ्या लोकांना आधीच धसका बसलेला असतो. त्यात अशी दणकावून केलेली, आकडेफेक विधाने ऐकल्यावर अपेक्षित परिणाम त्यांच्यावर होतोच. शुध्द शाकाहारी लोकांचे आयुर्मान मांसाहार घेणाऱ्या लोकांपेक्षा किमान नऊ वर्षांनीतरी अधिक असते असा एकजात खोटा प्रचार केला जातो.
मेरीलॅण्ड विद्यापीठातील पेडिएट्रिक्स, मेडिसीन आणि फिझिऑलजीचे प्राध्यापक डॉ. अॅलिसिओ फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९च्या अंकामध्ये प्रसिध्द झाले आहे. शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे, मुळे, पशुपक्ष्यांचे मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका ठिकाणी राहून निश्चिंतपणे अन्न मिळवण्याचे शेतीतंत्र अवगत होताच धान्यबियांचे आहारातील प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांतील ग्लुटेन या प्रथिनामुळे त्यापूर्वी होत नसलेले आतड्याचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे. आतड्यांच्या विकारांनी जगातील खूप मोठी लोकसंख्या त्रस्त आहे. ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना ग्लुटेनच्या दुष्परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पुढील संशोधन सुरू आहे. ही सारी शाकाहारात मोडणारीच धान्ये असूनही त्यांचे दुष्परिणाम आहेत, म्हणून काही कुणी गहू खायचं सोडून देणार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पध्दती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यासाठी अनेकांची बुध्दी कामाला लागेल.
माणसाने विकसित केलेल्या किंवा वापरात आणलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये, अन्नसंस्कारंमध्ये दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर अनेक प्रकारच्या मांसांचे, भाज्यांचे, धान्ये, फळे-मुळे यांचे व्यक्तिशः गुणावगुणवर्णन केले आहे. पथ्यकर काय, कुपथ्यकर काय याचा तपशीलवार अभ्यास करून निरीक्षणे नोंदवून ठेवली आहेत. त्याबद्दल लोकांना माहिती देण्याऐवजी एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावना गोंजारली जाण्यापलिकडे यातून काहीही साध्य होत नाही.
शाकाहारी लोक अधिक निरोगी रहातात या दाव्याची शहानिश कुणी केली आहे कां? निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवशैली, आहार-विहार, देशस्थान, हवामान, जलस्रोत, व्यसने किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपुल्य असे कितीतरी मुद्दे- वेरिएबल्स असतील.
मांसाहार केल्याने आरोग्यास बाध येतो असे सुचवले जाते. आधीच म्हटल्याप्रमाणे, मांसाहारी लोक काही शुध्द मांसाहारी नसतात. शाकाहाराला ते मांसाहाराची जोड देतात. मांसामधून जी आठ अमायनो आम्ले मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी आरोग्याला मारक आहेत असा एक गैर निष्कर्ष यातून काढला जातो. इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ होतो. पार्श्वभूमी अशी : आपल्या शरीरातली प्रथिने एकूण २३ अमायनो अम्लांची बनलेली असतात. त्यापैकी काही अशी आहेत की आपला शरीर इतर अमायनो आम्लांपासून तयार करू शकतं. पण दहा आम्ले अशी आहेत की ती शरीर तयार करू शकत नाही – ती आहारातूनच घ्यावी लागतात. त्यांना essential amino acids म्हणतात. ह्यातली बहुतेक मांसाहारातून सहज उपलब्ध असतात. ही ती आठ acids असावीत. जर हीच अभिप्रेत असतील, तर ती आरोग्याला हानिकारक आहेत हा समाज निर्बुद्धपणाचाच नाही, तर धोकादायक आहे! Essential amino acids ही शाकाहारातून सुद्धा मिळू शकतात, नाही असं मुळीच नाही.
आपल्या शरीराला रोज (सरासरी) विविध amino acids वेगवेगळ्या मात्रेमध्ये आवश्यक असतात. कुठलाही अन्नपदार्थ हे सगळी अचूक प्रमाणात देऊ शकत नाही. म्हणूनच आहारात वैविध्य असणे आवश्यक आहे. ह्यामध्ये शाकाहार-मांसाहार संतुलन आणि दैनंदिन वैविध्य दोन्ही अंतर्भूत आहेत.
शाकाहार प्रवर्तकांनी काहीही म्हटलं तरी दूध हे खऱ्या अर्थाने प्राणिज अन्न आहे!
शुध्द शाकाहारामुळे आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे. आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप घेतला आहे.
आजकाल धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनचीही साथ मिळाली आहे. फॅशनचे हेतू थोडे परस्परविरोधी वाटावेत असे दुहेरी असतात. एक म्हणजे चारचौघात वेगळेपणाने उठून दिसण्याची गरज वाटून फॅशन सुरू होते आणि मग एक नवा ट्रेन्ड आपणही स्वीकारला आहे, आपण काही मागासलेले नाही हे दाखवण्याची गरज वाटून फॅशन रुळते. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या चौकटीत बसणारी मते चटकन् स्वीकारतात. असल्या फॅशनकेंद्री मनमानी मतांचा पराभव करणे सोपे नसते. कारण केवळ बुध्दीनिष्ठा ग्राह्य धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.
आता आपण आरोग्यकारक घटकांचे काही तपशील पाहू.
शाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की बी१२ हे जीवनसत्व शाकाहारी आहारातून मिळू शकते. काही शैवाले, सोयाबीन्स आंबवून मिळणारे टेंपी, यीस्ट नावाचे कवक यातून बी१२ हे जीवनसत्व लाभते हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे. हे जीवनसत्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाहीत, हे मात्र सांगितले जात नाही- किंवा ते त्यांनाच माहीत नसावे. स्पिरुलिना, टेंपी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिध्द झाले आहे. यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरुपातील बी१२ नसतेच. ते केवळ बाहेरील घटकांबरोबर संयोग पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेल्या सोयाबीनची तिसरीच कथा आहे. सोयाबीनची उत्पादने करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती काहीही असोल, सोयाबीन हे काही फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या सेवनामुळे विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना थायरॉइड ग्रंथींचे विकार सुरू होतात हे सिध्द झालेले आहे.
काही प्रचारक तज्ज्ञ सांगतात आतड्यांतील बॅक्टेरियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहेच पण तेथे तयार झालेले बी१२ शरीराला नीटसे लाभत नाही त्याचे काय… बी१२ मिळवण्यासाठी ते जठरातील पचनप्रक्रियेत यावे लागते. देशाच्या काही प्रदेशातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२ जीवनसत्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित् असा निष्कर्ष काढला गेला. पण याच प्रदेशात कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सूक्ष्म अंडी असू शकतात, ज्यातून त्यांची प्रथिनांची गरज काही प्रमाणांत भागत असावी, कीटक आणि त्यांची अंडी ही भविष्यातील प्रथिनांचा पुरवठा असू शकतात अशा एका वैज्ञानिक निष्कर्षाची आठवण इथे स्वाभाविकपणे होते. शरीराला सहजपणे शोषून घेता येईळ असे बी१२ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतूनच मिळू शकते हे सत्य आहे. लिवर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दुग्धजन्य पदार्थांतून थोड्या कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दूध आणि अंडीही आहारातून वगळतात. अंडी खाल्ल्यामुळे कोलेस्टेरॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करून ठेवला आहे त्यामुळे अनेकजण अंडीही खात नाहीत. परिणामी बी१२ची कमतरता आणि त्यातून पुढे अॅनिमिया जडणे ठरलेलेच.
आजकाल आधुनिक वैद्यकामुळे बी१२च्या पूरक गोळ्या उपलब्ध आहेत म्हणून ठीक, न पेक्षा हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती. खरे म्हणजे बी१२च्या कमतरतेचा एकच मुद्दा शाकाहाराच्या आरोग्यप्रदतेच्या मुद्द्याचा खात्मा करू शकतो. पण मुद्दे तरीही संपत नाहीत.
ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अॅसिड्स म्हणजे लिनोलिनिक आणि लिनोलेइक ही पॉली अनसॅच्युरेटेड मेदाम्ले आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वतः ती तयार करू शकत नाही. ओमेगा३ अत्यल्प प्रमाणात पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा पुरवठा मासे आणि अंडी यातूनच होतो. ओमेगा६ हे बव्हंशी भाज्यांमधून मिळते आणि अल्प प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतून मिळते. शाकाहारी लोकांची समजूत पटवण्यासाठी शाकाहाराचे प्रचारक सांगतात की आपले शरीर ओमेगा ६पासून ओमेगा ३ गरज पडेल तसे रुपांतरित करू शकते. असे होऊ शकत नाही असे मेरिलँड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग सिध्द केले आहे. ओमेगा६ मेदाम्ले थोड्या वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा ३चेही आहे. पण ओमेगा ६ चे ओमेगा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. मेंदूची कार्यक्षमता आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी म्हणून ओमेगा३ प्रकारातील मेदाम्ले अत्यावश्यक असतात.
भाज्यांतून मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने नुकसानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा३ वापरणे शरीराला कठीण होऊन बसते. ओमेगा ३ कमी पडल्यास कर्करोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारकशक्तीही खालावते.
मेदाम्ले, बी१२ जीवनसत्व यांबाबत जशी अर्धसत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्वाबद्दलही सांगितली जातात. अ जीवनसत्व हे शाकाहारातून भरपूर मिळते असा लोकप्रिय समज आहे. प्रचारकांकडूनच तो अधोरेखित होत आला आहे. वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा-कॅरोटिनचे रुपांतर करून शरीर अ जीवनसत्व मिळवून शकते हे सत्य आहे. पण ते रुपांतर करण्यासाठी साथीला चरबी किंवा तैलद्रव्ये खावी लागतात. शिवाय हे रुपांतर काही तेवढेसे सोपे नाही. जे काही बिटा-कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले, वृध्द माणसे, थायरॉइड, गॉलब्लॅडरच्या विकारांनी ग्रस्त लोकांना तितक्याही चांगल्या प्रमाणात हे रुपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळेल असे अ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतून मिळते. ताजे लोणी, तूप किंवा इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बिटा-कॅरोटिनपासून अ जीवनसत्व मिळवता येते. अ जीवनसत्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात आलेली प्रथिने किंवा खनिजद्रव्ये यांचा फायदा शरीराला घेता येतो.
मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्करोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा सतरा रोगांचा प्रादुर्भाव अत्याधिक प्रमाणात असतो असे छातीठोकपणे सांगितले जाते.
गंमत अशी आहे की यातील बऱ्याचशा रोगांचा प्रादुर्भाव विसाव्या शतकात अधिक होऊ लागला. त्यापूर्वीचा इतिहास, मानववंशाचा इतिहास साऱ्याकडे डोळेझाक करून हा प्रचार केला जातो. जगभरातील अनेक जुने वंश भरपूर मांसाशन करणारे आहेत हे लक्षात घेतले जात नाही.
मांसाहार त्याज्य आहे हे सिध्द करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले. हा प्रकल्प शाकाहारवादाकडे झुकणाऱ्या शास्त्रज्ञांकडे असूनही त्यांच्या निरीक्षणांचे निष्कर्ष अपेक्षेच्या उलट निघाले. डॉ. एच्. ए. कान, डॉ. डी ए स्नोडेन यांच्या अभ्यासांतून शाकाहारी लोकांना दीर्घायुष्य असल्याचा मुद्दा निकाली निघाला. अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या या शास्त्रज्ञांनी तसे मोकळेपणाने मान्य केले. पण तरीही शेवटी शक्य तो मांसाहार करू नये असेच सांगून तर्कनिष्ठेशी प्रतारणा केली.
शाकाहार घेणे महत्त्वाचे आहेच. आपण सारेच प्रायः शाकाहार घेतो. कर्बोदके मिळवण्यासाठी धान्ये, पचनसंस्था स्वच्छ ठेवण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच. परंतु तेवढ्याने पुरत नाही हेही मान्य करावे लागते.
प्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होते हा दावा तर फारच फसवा आहे. आदिमानवांच्या आहारात फळेमुळे होती असे आग्रहाने सांगितले जाते. त्यांच्या आहारात अगदी कमी चरबीचे मांस थोडेफार होते, पण तो मुख्यत्वे शाकाहारीच होता म्हणून तो इतका निरोगी होता असे सांगितले जाते. हे दावे मनगढन्त म्हणावेत इतक्या कमी माहितीच्या आधारावर आधारित आहेत. अजूनही शिल्लक असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही त्यातील तथ्यांशाचा अभाव समजतो. काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळेनासे झाले, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाले… एकूणच अन्न न परवडल्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्राण्यांची प्रचंड प्रमाणात शिकार झाल्यामुळे काही प्राणी नामशेष झालेले असताना प्राचीन मानव शाकाहारी होता असे म्हणणे हास्यास्पद आहे.
आणखी एक गैरलागू मुद्दा पुढे केला जातो, तो म्हणजे मांसाहारामुळे आपल्या शरीरात हार्मोन्स, घातक कीटकनाशके, घातक रसायने जातात. प्राणी मारले जाताना त्यांच्यात जी स्ट्रेस हार्मोन्स जातात ती शरीराला चांगली नसतात असेही सांगितले जाते. यात तथ्य असेलही. नेमके हेच शाकाहार, धान्याहाराच्या बाबतीतही होते. वाढत्या लोकसंख्येच्या गरजा भागविण्यासाठी, अधिक अन्न उत्पादनासाठी जे आधुनिक मार्ग स्वीकारणे आपल्याला भाग पडले आहे, त्याचीच ही परिणति आहे. परिस्थितीशरण माणसाला या गोष्टींचा सामना सध्याच्या कालखंडात करणं भाग आहे. नंतर त्यात बदल होईलही. उदाहरणार्थ जेनेटिकली मोडिफाईड अन्नामुळे कीटकनाशकांचा वापर तर नक्कीच कमी होईल. माणूस नवे प्रश्न निर्माण करतो आणि नवी उत्तरे शोधतो हे तर वैशिष्ट्य आहे.
आहाराच्या पोषक मूल्यांसंबंधी सर्व मुद्दे मांडून झाले की शाकाहारवादी आजकालचे अव्वल नंबरचे चलनी नाणे वाजवू लागतात. ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट चेंजसाठी मांसाहार जबाबदार आहेत असे सांगितले जाऊ लागले आहे. भावनिकतेच्या आहारी जाऊन पर्यावरणासाठी काम करणारे काही किशोरबुध्दी कार्यकर्ते अनेकदा असल्या प्रचारातील सत्याची पडताळणी करायला तयार नसतात.
पण यासंबंधातील नेमका मुद्दा काय आहे तो पहावाच लागेल. खरे म्हणजे या मुद्द्यात नेमकेपणा नाहीच. जगातील गरीबी, मिथेनचे उत्सर्जन अशा दोन मुद्द्यांचा घोळ घालून तयार केलेला हा मुद्दा आहे. खाण्यासाठी जनावरे जगवायचे तर त्यांच्यासाठी जे काही धान्य, गवत तयार करावे लागते ते उगवण्याच्या जागेत जगभरातील अर्धपोटी, उपाशीपोटी जनतेसाठी धान्य उगवता येईल असा एक मुद्दा असतो. त्याच्या जोडीला गुरांच्या वाढत्या संख्येमुळे तयार होणारा मिथेन हा वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे असेही सांगितले जाते.
या वरवर छानछान वाटणाऱ्या युक्तीवादाच्या अंतरंगात जरा डोकावून पहा. गवतांमधले वैविध्य किंवा गुरांसाठी वाढवली जाणारी विशिष्ट धान्ये न वाढवता केवळ काही विशिष्ट धान्येच वाढू दिली तर जीववैविध्याची हानी होते याचा यात विचार आहे का? गुरांमुळे मिथेन वाढतो म्हणून गुरेच नष्ट करायची आहेत का? गुरांच्या वाढीसाठी पाण्याची नासाडी होते म्हणून गुरांची वाढ नको? आपण त्यांच्या दुधाचा, मांसाचा वापर करतो म्हणून त्यांना जगवतो हे सत्य आहे. (आज पुरेसा उपयोग करून घेता येणार नाही म्हणून भारतातील अक शेतकऱ्यांनी नव्या गायींची, बैलांची वीण वाढवणे बंद केले आहे. भारतीय गोमाता नि गोपित्यांची संख्या कमी होत जाऊन प्राणिसंग्रहालयांमध्येच ते पहायला मिळतील अशी स्थिती ओढवेलही लवकरच.)
नेमके काय करायचे अशी या पृथ्वीच्या शाकाहारवादी रक्षणकर्त्यांची सूचना आहे? गुरांचे अन्न, गुरांची विष्ठा, गुरांचे मूत्र याच्याशी संबंधित असलेल्या जीवाणूंचे अन्नसाखळीमध्ये पर्यावरणामध्ये महत्त्वाचे स्थान आहे. हा बागुलबुवा पूर्णतः अशास्त्रीय पायावर उभा करण्यात आला आहे. खरे म्हणजे हा मुद्दा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे आणि अनेक अभ्यासकांनी त्याचा यथास्थित समाचार घेतलेला आहे. काही सत्ये प्रचारातून वगळली जातातच.
सत्य एवढेच आहे, की प्रत्येकाने आपापल्या आवडीनिवडीप्रमाणे आणि सत्याधारित आऱोग्यविचार लक्षात घेऊन आपापला आहार ठेवावा. अगदीच आवडत नसेल तर कुणीही कुणावरही काही खाण्याची सक्ती करू नये. तशीच आपल्याला आवडत नाही म्हणून दुसऱ्याने खाऊ नये अशी सक्तीही करू नये. आपल्या आडीनिवडीला तात्विक रंग चढवू नयेत. गेंड्याच्या पाठीसारख्या धारणा ठेवून इतरांवर अनैतिकतेचे हेत्वारोप करू नयेत. दूध हे गायीचे रक्तच आहे वगैरे फालतू दाव्यांचे फालतूपण अनेकजण ओळखतात. मांसाहाराला हीन, क्रूर लेखण्याचा प्रकार याच फालतूपणाचे भावंड आहे.
अन्नविषयक आवडनिवड ही पूर्णतः व्यक्तिसापेक्ष आहे हे शाकाहारवादी कट्टरांनी लक्षात घ्यायला हवे.
स्वतःची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्वे आहेत ती आपल्यापुरती जपावीत. ती इतर लोकांवर काय आपल्या अजाण मुलांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये. शाकाहारी जैन धर्मीय स्वतंत्र गृहसंस्था करून रहाण्याचा प्रयत्न करतात तोवर ठीक आहे. पण मिश्र गृहसंस्थांत जागा घेऊन ते इतरांना हाकलून काढू पाहातात तेव्हा तो दुराचार ठरतो. आपल्या पर्युषणपर्वात इतरांनीही शाकाहार करावा- म्हणजे केवळ वनस्पतीजीवांची हत्या करावी- म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने बंद ठेवण्याचा आग्रह धरणे हाही दुराचारच.
आरोग्यरक्षणासाठी मितभुक्, हितभुक् आणि अशाकभुक् रहावे असा आयुर्वेदानेच उपदेश दिला आहे हे भारतीय संस्कृती मूळ शाकाहारी आहे असा खोटा दावा करणाऱ्या भुक्कड लोकांनी लक्षात घ्यावे.
मितभुक् म्हणजे आहार कमी असावा. खादाडपणा करू नये. भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत. खाण्याच्या दोन वेळांतही किती कालांतर असावे तेही आयुर्वेदाने सांगितले आहे. दोन तासांच्या आत पुन्हा खाऊ नये आणि सहातासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये. आधुनिक वैद्यकाने, पोषणाहारशास्त्रानेही हाच सल्ला दिला आहे.
हितभुक् म्हणजे आवडणारे अन्नपदार्थ खावेत, कारण जे आवडतात ते घटक सहसा तुमच्या पचनसंस्थेला सहन होणारे असतात. ज्या घटकांमुळे किळस किंवा घृणा वाटेल, वास नकोसा वाटेल ते जबरदस्तीने खाऊ नयेत, खायला लावू नये.
आणि या लेखासाठी सुसंदर्भित म्हणजे- अशाकभुक्- आहारात अशाक म्हणजे प्राणिज, प्राणिजन्य पदार्थ असावेत. फार जास्त प्रमाणात शाका खाऊ नयेत.
शाकाहार म्हणजे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे, शाकाहार हा पोषणाच्या दृष्टीने सर्वश्रेष्ठ आहार आहे असे सांगणे हा सत्यापलाप आहे. आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दुराचार आहे.
सौजन्य- मुग्धा कर्णिक