शेतकरी चळवळीतला एकांडा शिलेदार – विजय जावंधिया

-प्रवीण बर्दापूरकर

ज्येष्ठ सहकारी असलेल्या प्रा. डॉ. आशा देशपांडे यांचा फोन आला की , शेतकरी नेते विजय जावंधिया महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी येत आहेत . विजयची गळाभेट झाली . खूप वर्षांनी भेटलो . दोघांचाही गहिंवर दाटून आला. बऱ्यापैकी गप्पा झाल्या . गिले-शिकवे झाले.  मन भूतकाळात गेलं. माझी आणि विजय जावंधिया यांची ओळख १९८०तली . महाराष्ट्रात शरद जोशी यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी चळवळ बहरात होती . त्या चळवळीतला विदर्भातील एक धुरंधर विजय होता . विजय वयानं ज्येष्ठ पण लगेच आम्ही एकेरीवर आलो कारण आमच्यात तसं अंतर फार नव्हतं . त्या काळात नागपुरातच नाही तर अन्य अनेक ठिकाणी आमच्या भेटी होत . नागपुरात त्याचं घर सीताबर्डीवरील मोदी गल्लीत होतं . घर कसलं मोठा वाडाच होता तो ! विजयच्या आईच्या हाताला मस्त चव होती आणि त्या माऊलीच्या हातची ती अवीट चव चाखण्याची संधी मला मिळालेली आहे .

त्या काळात विजयचं एक पाऊल नागपुरात आणि दुसरं नागपूरबाहेर म्हणजे देशात कुठेही . जिथे कुठे शेतकऱ्यांचं आंदोलन सुरु आहे तिथे विजय हमखास सापडणार ; हे म्हणजे अगदी चुकला  फकीर मशिदीत सापडणार तस्सं झालेलं होतं . उंच आणि कांहीशी धिप्पाड शरीरयष्टी , रापलेला निमगोरा वर्ण ,  विस्तीर्ण भाल प्रदेश कारण डोईवर केसांचा बऱ्यापैकी दुष्काळ , डोळ्यांवर चष्मा , चष्म्याआडचे डोळे कायम उत्सुकतेनं चाळवलेले , अंगावर खादीचे कपडे , शर्टावर शेतकरी संघटनेचा बिल्ला आणि खिशात एक पेन तसंच कांही कागद नक्की असणारच , पायात साध्याशा चपला घातलेला माणूस म्हणजे विजय जावंधिया  . पायी चालत असेल तर तो झपाझप चालणार अशा गतीने की , सोबत  चालणा-याची दमछाक व्हावी . त्या काळात अनेकदा  विजय लुना या वाहनांवर नागपुरात फिरत असे आणि ते दृश्य डोळ्यांचे पारणे फिटवणारे असे ! आता वार्धक्याच्या खुणा चेहेऱ्यावर दिसू लागलेल्या आहेत बाकी विजय तेव्हा होता अगदी तस्साच आजही आहे .

विजयचा जन्म आणि शिक्षण नागपुरात झालं पण मुळचा तो महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या वास्तव्याचा परिमळ लाभलेल्या वर्धा जिल्ह्यातील  वायफडच्या मालदार कुटुंबातला . मालदार म्हणजे भरपूर शेती असलेल्या घरातला . शेतीत लक्ष घातलं आणि विजयला शेतीची परवड लक्षात यायला वेळ लागला नाही . मग त्यानं त्याच्या स्वभावाला शोभणाऱ्या  शैलीत केवळ शेतीच नाही तर एकूणच कृषी व्यवस्थेचा मूलभूत अभ्यास सुरु केला . समतेचा कट्टर पुरस्कर्ता असलेल्या विजयला शेतकरी , शेतमजूर यांच्या विदारक स्थितीचं आकलन झालं . कृषी  व्यवस्थेच्या सर्व पैलुंच्या बाबतीत तो पारंगत झाला .शरद जोशी यांची शेतकरी चळवळ विदर्भात पोहोचण्याआधीच तो या विषयावर बोलता आणि लिहिताही झाला . शरद जोशी आणि त्यांच्या शेतकरी चळवळीच्या संपर्कात आल्यावर त्यांच्या बोलण्याला धार आली. कृषीशी संबंधित प्रश्नांवर तो टोकदार झाला . विजयच्या वक्तृत्वाला विलक्षण समंजस अशी ऐट आहे . अतिशय संयत पण वास्तवाचा पाया असलेल्या बोचऱ्या शैलीत तो मांडणी करतो . वाचन भरपूर असल्यानं रुपकं , कविता असे अनेक दाखले देत तो असं कांही बोलतो की समोरचे मंत्रमुग्ध होतात ; विजय काळजाचा ठाव घेतो आणि त्याच्या प्रतिपादनाशी ऐकणारे सहमत होतात . हे केवळ मराठी बाबतच घडतं असं नाही तर हिन्दी आणि इंग्रजीतही तो तेवढाच प्रभावी ठरतो . विजयनं लिहिलेली प्रसिद्धी पत्रकंही मुद्देसूद ; कोणताही फापटपसारा नाही . अक्षर देखणं नसलं तरी सुवाच्य. त्याच्या अक्षरांना एक वेगळंच वळण . पत्रकांच्या भाऊ गर्दीतही ते वळण लगेच लक्षात येत असे ; व्याकरणाशी मात्र सलगी नसे !

विजय जावंधिया याचा निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचा आणि वेगळी मत स्पष्टपणे मांडण्याचा स्वभाव शरद जोशी यांना फारसा रुचत नसल्याचं जाणवत असे पण , प्रश्न विचारणं आणि स्पष्ट मतं मांडणं ही विजयची खासीयत होती . शेतकरी संघटना म्हणजे शरद जोशी सर्वेसर्वा असा तो काळ होता . (तेव्हा शरद जोशी यांना आम्ही कांही पत्रकार खाजगीत ‘बिग ब्रदर’ म्हणत असू ; याचा संदर्भ जॉर्ज ऑरवेलच्या ऑल टाइम ग्रेट ‘1984’ या कादंबरीशी होता . )  तरीही बाकी सर्व गुणांमुळे विजय जावंधिया शरद जोशी यांच्या गळ्यातला ताईत बनला नसता तरच नवल होतं . इतका लाडका ताईत की शरद जोशी यांचा उत्तराधिकारी विजयकडे म्हणून बघितलं जाण्याचे  दिवस आले . विजयकडे संघटनेच्या राज्याध्यक्षपदाची सूत्रे आली .  देशात ठिकठिकाणी तो शेतकरी संघटनेतर्फे संबोधित करु लागला . तेव्हा लाखांच्या गर्दीत झालेल्या विजयच्या सभा अजूनही आठवतात . विजयचा वावर राष्ट्रीय  होण्याचा तो काळ होता . ते सर्व संपर्क विजयनं अजूनही कायम राखले आहेत . मात्र वावर राष्ट्रीय होऊनही नागपुरात आला की ‘डाऊन टू अर्थ’ अकृत्रिम मैत्रीचा प्रत्यय विजय जावंधियाकडून येत असे . आम्हा मित्रांत असणारा त्याचा वावर ‘अहं’ पासून कोसो दूर असायचा .

आज प्रथमच लिहितो आहे , शरद जोशी यांच्या सर्वच भूमिका विजय जावंधिया याला पटणं शक्य नव्हतं आणि कधी तरी तो त्यांच्यापासून विभक्त होण्याची  वेळ येणार यांचा अंदाज आलेला होता . ‘राजकारणात कधीच येणार नाही’ , ‘निवडणूक लढवणार नाहीच’ ( यातील ‘च’ महत्त्वाचा ; एक पत्रकार म्हणून मीही तो अनेकदा ऐकलेला आहे ) असं एकीकडे शरद जोशी ठासून सांगत आणि दुसरीकडे उजव्या विचाराच्या राजकारण्यांशी सलगी  साधत असल्याची सुरु झालेली कुजबूज हळूहळू वाढतच गेली . ( पुढे तर शरद जोशी त्याच उजव्यांच्या सहकार्यानं कृषी विषयक राष्ट्रीय समितीवर गेले , राज्यसभेवर नियुक्त झाले . )

शरद जोशी यांच्यापासून बंडखोरी करण्याचा निर्णय विजय जावंधिया याने अखेर घेतलाच . तेव्हा तो निर्णय फारच धाडसीहोता कारण जो शरद जोशी यांच्यापासून दुरावला तो संपला असं समजलं जाण्याइतका शरद जोशी यांचा करिष्मा गडद होता . मात्र , दुरावल्यावरही शरद जोशी यांच्या धोरणाच्या संदर्भात विजय मत प्रदर्शन करत असे ; शरद जोशी यांचा अवमान होईल असा शब्द विजयच्या तोंडून ( अगदी खाजगीतही ) बाहेर पडला असल्याचं किमान मला तरी आठवत नाही आणि तो सर्वांचाच अनुभव असणार याची खात्री आहे . विजयच्या अंगी असणारा हा सुसंस्कृतपणा विलक्षण भावणारा आहे यात शंकाच नाही.

छायाचित्रात डावीकडून प्रवीण बर्दापूरकर , महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि विजय जावंधिया

शरद जोशी यांच्यापासून विजय दुरावला तरी शेतकऱ्यांच्याप्रती असणाऱ्या  संवेदनापासून त्यानं मुळीच फारकत घेतली नाही . त्याच्या जगण्याचा श्वास आणि नि:श्वास शेतकरी आणि शेतमजूर आहे , त्यांचे प्रश्न विजयचा रक्तगट आहे आणि त्यांना सन्मानानं जगण्याचा समतेचा हक्क मिळावा हेच विजयचं स्वप्न आहे . तो आणि नंतरचा कांही काळ विलक्षण घुसमटीचा होता , प्रवादांचा होता आणि प्रश्नांच्या भोवऱ्यातही गुंतवणारा कसा होता हे ठाऊक असणा-यात मी एक आहे . ते सर्व ताकदीनं  सहन करुन , प्रतिकूल परिस्थितीतही  शेतकऱ्यांच्या प्रश्नांची मशाल हाती घेऊन चालण्याची विजयची एकांडी शिलेदारी विविध व्यासपीठांवरुन सुरुच आहे . शेतीची दुरावस्था , कोसळलेलं अर्थकारण , शेतीचं समाजकारण , कडेलोट झालेलं भावजीवन याविषयी मग सातत्यानं बोलत राहिला . त्याच्या मांडणीची  दखल पंतप्रधानांसह सर्वच राज्यकर्ते गंभीरपणे घेऊ लागले . एकदा तर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग विजयच्या वर्धा जिल्ह्यातल्या छोट्याशा गावी गेले . विजयचं शेतीबद्दलचं म्हणणं त्यांनी तब्बल तासभर ऐकून घेतलं . अशी मान्यता मिळूनही विजय जावंधिया उतला नाही , मातला नाही . त्याचे पाय जमिनीवरच घट्ट राहिले .

विजय जावंधिया आणि माझे या सर्वापलीकडे जाऊन मैत्रीचे बंध आहेत ; ते रेशमी आहेत , त्यांना भावनेची किनार आहे ; माझी बेगम मंगलाच्या मृत्यू नंतर त्याचा फोन आला पण , आम्ही दोघंही कांहीच बोललो नाहीत इतके ते बंध गहिरे आहेत , पण ते असो .

विजय जावंधिया नावाच्या एकांड्या शिलेदार मित्राचा मला सार्थ अभिमान आहे , हे समाधान अपरंपार आहे .

(लेखक नामवंत संपादक व राजकीय विश्लेषक आहेत)

९८२२० ५५७९९

प्रवीण बर्दापूरकर  यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –प्रवीण बर्दापूरकर– type करा आणि Search वर क्लिक करा.

छायाचित्रात डावीकडून प्रवीण बर्दापूरकर , महात्मा गांधी विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम आणि विजय जावंधिया

Previous articleसत्यशोधकांचा महाराष्ट्र ‘असत्या’च्या विळख्यात
Next articleमहाराष्ट्राची तब्येत सध्या बिघडलीय…!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here