पत्रकारिता या व्यवसायाशीच इमान राखणारे, त्यासाठी प्रसंगी अनेकांचा अनादर केल्याचा ठपकाही वागविणारे असा विनोद मेहता यांचा लौकिक राहील. संपादकाने चित्रवाणी वाहिन्यांवरील चर्चातून वेळीच स्वत:ला बाजूला काढले आणि लेखन-वाचनाकडे लक्ष केंद्रित केले, हेही वैशिष्टय़पूर्णच..
स्वत:च्या प्रेमात पडलेली नाही अशी माध्यमातील व्यक्ती अति विरळाच. अशा अपवादात्मक व्यक्तीत बिनदिक्कत आदराने नाव घेता येईल अशी प्रभृती म्हणजे विनोद मेहता. या ज्येष्ठ संपादकाचे रविवारी आकस्मिकपणे निधन झाले. माध्यमातिरेकाच्या काळात, कानठळ्या बसतील अशा माध्यमी गोंगाटात विनोद मेहता यांचे महत्त्व लक्षात घेणे आवश्यक आहे. माध्यमांसाठी आणि समाजासाठीदेखील.
व्यवस्थेच्या विरोधात उभे राहणे हे माध्यमांचे अंगभूत कर्तव्य असते. अनेक संपादक आणि त्यांची प्रकाशने या कर्तव्याचे पालन करतातदेखील. परंतु अशा अनेकांत विनोद मेहता मोठे ठरतात ते यासाठी की त्यांनी प्रसंगी स्वत:च स्वत:च्या विरोधात उभे राहण्यास मागेपुढे पाहिले नाही. हा गुण भारतीय पत्रकारितेत फार अभावाने आढळतो. सर्वसाधारणपणे पत्रकाराचा संपादक होत असताना वाटेवर त्याचे काही ग्रह, अनुग्रह होत जातात आणि त्यांना कवटाळत बसण्यात त्याची पुढील कारकीर्द खर्च होते. असे संपादक मग आपले सर्व बुद्धिचातुर्य आपले ग्रह किती बरोबर आहेत हे समाजास सांगण्यात खर्ची घालतात. मेहता यांचे हे असे कधी झाले नाही. भालचंद्र नेमाडे ज्या अर्थाने लेखकाचा लेखकराव कसा होतो, असा प्रश्न विचारतात त्या अर्थाने विनोद मेहता यांचा कधीही विचारवंत वगरे संपादकराव झाला नाही. याचे महत्त्व अशासाठी की आसपासचे जग हे बदलत असते, नव्याने अनेक माहिती समोर येत असते आणि अशा बदलणाऱ्या वास्तवात आपले ज्ञान, समज, गरसमज नव्याने तपासून घेणे हे संपादक म्हणवून घेणाऱ्यासही आवश्यक आहे हे मानण्याचा प्रामाणिकपणा त्यांच्याकडे होता. या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या ठायी आणखी एक दुर्मीळ गुण होता. तो म्हणजे त्यांच्यासाठी कोणीही व्यवसायापेक्षा मोठे नव्हते. एरवी संपादकांचा एकूण अनुभव असा की त्यांच्यासाठी एखादी व्यक्ती वा व्यवस्था ही टीकेपलीकडे असते. या व्यक्ती वा व्यवस्थेचे महत्त्व त्या संपादकाच्या आयुष्यात इतके असते की त्यावर टीका करण्यास वा त्याचे यथायोग्य, प्रामाणिक मूल्यमापन करण्यास तो संपादक धजावत नाही. एका अर्थी ही व्यक्ती वा संस्था त्याच्या आयुष्यात प्रात:स्मरणीय आणि पूजनीय असते. मेहता यांच्यापर्यंतचे अनेक ज्येष्ठ संपादक आणि त्यांची अशी आंधळी श्रद्धास्थाने यांची यादी सांगता येईल. पण मेहता यांच्याबाबत अशी एकही अंधश्रद्धा नव्हती, असे ठामपणाने म्हणता येईल. म्हणूनच यशवंतराव चव्हाण ते संजय गांधी ते नरेंद्र मोदी व्हाया विश्वनाथ प्रताप सिंग, अण्णा हजारे आणि अनेक समव्यावसायिक पत्रकार यांच्यातील न्यून दाखवण्यात मेहता यांची लेखणी कधीही कमी पडली नाही. मेहता यांच्या टीकेचे धनी व्हावे लागले नाही, असा एकही राजकीय पक्ष वा व्यक्ती नसेल. हे व्यावसायिकतेचे उत्तम उदाहरण होय. आणखी दोन गोष्टींसाठी मेहता मोठे ठरतात.
एकदा एका नियतकालिकाचे संपादकपद यशस्वीपणे भूषविल्यानंतर त्या यशाची पुनरावृत्ती अन्य प्रकाशनांत करून दाखवण्यात भारतात एकही संपादक आतापर्यंत यशस्वी ठरलेला नाही. अनेक संपादकांचा नावलौकिक हा त्यांच्या पहिल्या संपादकपदाचा आहे. दुसऱ्या प्रकाशनात गेल्यावर त्या यशाच्या सुकलेल्या पारंब्यांना लोंबकळण्यातच अनेक संपादकांनी धन्यता मानलेली आहे. अपवाद फक्त एक. विनोद मेहता. पुरुषांना तरुण आणि प्रौढावस्थेत जे पाहायची सुप्त लालसा असते त्या डेबोनेरपासून ते शेवटच्या आऊटलुक या साप्ताहिकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर मेहता संपादक म्हणून यशस्वी ठरले. संडे ऑब्झव्र्हर, पायोनियर, द इंडियन पोस्ट, द इंडिपेंडंट आदी दैनिकांतील त्यांची कारकीर्द याची साक्ष देईल. त्यांचे महत्त्वाचे वैशिष्टय़ हे की ते लिहिते संपादक होते. अलीकडे संपादक हे बऱ्याच ठिकाणी तोंडी लावण्यापुरतेच असतात आणि सणसोहळे व्यवस्थापन हे त्यांचे मुख्य काम असते. मेहता यांच्याबाबत असे कधीही झाले नाही. या सर्व ठिकाणी त्यांची कारकीर्द गाजली ती त्यांच्या लिखाणासाठी. आणि या सर्व ठिकाणी ते संपादक म्हणून यशस्वी झाले ते एकाच गुणामुळे. तो गुण म्हणजे आम्हास आम्ही पुन्हा पाहावे, काढुनी चष्मा डोळ्यावरचा, ही वृत्ती. मेहता अन्य अनेक कथित संपादकांप्रमाणे त्यामुळे बनचुके झाले नाहीत. त्या अर्थाने उच्च दर्जाची व्यावसायिकता त्यांच्या अंगी होती. त्यांचा दुसरा गुण म्हणजे प्रामाणिकपणा. आपण जसे आहोत तशीच आपली अभिव्यक्ती असेल याबाबत ते जागरूक होते. आयुष्यातल्या मोहांवर मात केल्याचा आणि आपण म्हणजे कोणी नतिकतेचा पुतळा असल्याचा आव त्यांनी कधीही आणला नाही. तरुणपणी पूर्वायुष्यातील प्रेमप्रकरणातून त्यांना एक मुलगी झाली. पण ही बाब ना त्यांनी आपल्या पत्रकार पत्नीपासून लपवली ना आत्मचरित्रात ते ही कबुली द्यायला कचरले. आपल्या कृत्याची, मताची प्रांजळ कबुली हे त्यांचे अत्यंत मोठे वैशिष्टय़. वयपरत्वे सायंकाळी मद्याचा आनंद लुटणे त्यांना आवडे. परंतु आपल्याला लोक काय म्हणतील या भीतीपोटी त्यांनी तेही कधी लपवले नाही. मी आहे हा असा आहे, हे त्यांचे जीवनमूल्य होते आणि तसेच ते जगले. त्याचमुळे समव्यावसायिकांवर टीका करताना त्यांचा हात कचरला नाही. राडिया टेप हे त्याचे उत्तम उदाहरण. टीव्हीवरील चर्चातून बोलघेवडेपणा करणारे पत्रकारच सत्ताकेंद्राच्या भोवती जमून नको ते उद्योग कसे करतात हे त्यांनी अनेकांची नावे घेऊन उघड केले. या पत्रकारांचा रोष त्यांनी पत्करला. त्याचप्रमाणे बलाढय़ उद्योगसमूहांनाही त्यांनी उघडे केले. या त्यांच्या वृत्तांकनामुळे समव्यावसायिक आणि अन्य अनेकांच्या रोषाचे धनी त्यांना व्हावे लागले. अनेक ज्येष्ठ म्हणवणाऱ्या पत्रकारांनी काही काळ तर त्यांचे नावच टाकले. पण आपण जे केले ते योग्यच होते, पत्रकारांचे पितळही उघडे पाडण्यात काहीही चूक नाही असेच ठाम मत मेहता यांचे कायम राहिले आणि त्यामुळे त्यांना त्याचा कधीही पश्चात्ताप झाला नाही.
या सर्वावर पुरून उरेल असा अत्यंत महत्त्वाचा गुण त्यांच्या अंगी होता. आपण आता कालबाह्य़ झालो आहोत, हे त्यांना कळले होते. त्यामुळे वाढलेल्या वयातील िशगे मोडून टीव्हीवरील चर्चात वायफळ वादविवादात सहभागी होणे आता थांबवायला हवे हे त्यांना लक्षात आले आणि त्याप्रमाणे ते थांबलेदेखील. त्यामुळे उगाच दररोज संध्याकाळी कोणत्या ना कोणत्या वाहिनीवर आपल्या मतांचा घाऊक रतीब घालत गावगन्ना िहडण्याचा सुमार उद्योग त्यांनी केला नाही. चच्रेत सहभागी होणारे अनेक तरुण पत्रकार माझे विद्यार्थी आहेत, आपण सहभागी होऊन त्यांच्यावर दडपण का आणायचे, असे ते म्हणत. या चॅनेलीय वितंडवादात सहभागी होऊन, शाळेतल्या वर्गातल्या मुलांप्रमाणे हात वर करून लक्ष वेधून घेत एक मिनिटभराचे शहाणपण सांगण्यासाठी तासभर वाया घालवण्यापेक्षा घरी बसून मद्याचा आनंद घेत लेखन-वाचन करणे अधिक कलात्मक आहे, असे ते मानत. पत्रकाराने प्रसिद्धीच्या झगमगाटापासून स्वत:हून दूर जाणे तसे आपल्याकडे दुर्मीळच. मेहता हे असे दुर्मीळ होते.
परखड, प्रामाणिक व्यक्तीच्या अंगी एक प्रकारचा चक्रमपणा असतो. तो मेहता यांच्याकडे होता. त्यांनी त्यांच्या पाळलेल्या श्वानाचे नाव एडिटर असे ठेवले होते. या संपादकाशी त्यांचा अनेकदा संवाद चाले आणि तो वाचणे अत्यंत आनंददायी असे. अशा तऱ्हेने मेहता हे संपादकास पाळणारे संपादक होते. आपल्या टीकेने शत्रुत्व, कटुता आली तरी हरकत नाही. पण समाजाच्या व्यापक हितासाठी, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी टीका आवश्यक असेल तर ती करायलाच हवी. प्रसंगी त्याची किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर पण लेखणीचे इमान राखावे असे मानणारे संपादक आज मुळातच कमी. त्यातले एक मेहता काल गेले. त्यांच्या पत्रकारितेस लोकसत्ता परिवारातर्फे आदरांजली
(सौजन्य लोकसत्ता)