(साभार: साप्ताहिक साधना)
आज ११ सप्टेंबर २०२२ : विनोबांच्या १२७ व्या जयंतीनिमित्त..
आज मी हे सगळं पश्चात्तापदग्ध होऊन बोलतोय. कारण त्या वेळी विनोबांवर टीका करण्यात अख्ख्या महाराष्ट्रासोबत मीदेखील सामील होतो. १९७६ मध्ये आणीबाणी सुरू असताना विनोबांच्या पवनार आश्रमामध्ये सर्व सेवा संघाचं संमेलन झालं. जयप्रकाशांसह प्रमुख नेते तुरुंगात होते. माझे आई-वडीलही तुरुंगात होते. आणीबाणीवर काय उपाय काढता येईल, यावर या संमेलनात चर्चा सुरू होती. तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ अशोक आम्ही दोघांनी भर संमेलनात विनोबांच्या कुटीसमोर विनोबांचा निषेध केला. हातामध्ये फलक धरले, ‘सगळे तुरुंगात असताना विनोबा आणि सर्व सेवा संघ मौन का आहेत? तुम्ही निषेध करा.’ विनोबांनी आमच्याकडे हसून दुर्लक्ष केलं. त्यांचं हृदय मोठं होतं.
………………………………………………….
विनोबांना जाऊनही आता एकोणचाळीस वर्षे होत आलीत. आज त्यांना पुन्हा पाहण्याचा, पुनर्मूल्यांकन करण्याचा प्रयत्न मी करणार आहे.
विनोबांसोबत असलेलं माझं नातं सुरुवातीस सांगितलं पाहिजे. एका वाक्यात- माझ्या जन्मापासून ते विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझं विनोबांशी नातं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर ते आणखीच दृढ झालं आहे, फक्त मधली काही वर्षे अपवाद होती. पण ते पुढे येईलच.
गांधीजींच्या आदेशावरून अर्थशास्त्राचे प्राध्यापक असलेले माझे वडील वर्धा जिल्ह्यातील एका खेड्यात शेतकऱ्यांसारखं जगून ग्रामीण अर्थशास्त्राचे प्रयोग करीत होते. या प्रयोगासाठी विनोबांनी पवनारजवळील महाकाळ गावात बारा एकर जमीन स्वतः मिळवून दिली. त्यानंतर विनोबांनी त्यांच्या अनेक भाषणांत हा उल्लेख केला आहे की, ‘भूदान यज्ञात मिळालेली जमीन सर्वांना माहीत आहे, पण मी ठाकूरदास बंग यांना मिळवून दिलेली जमीन हा माझा त्यापूर्वीचा भूदान यज्ञ.’
मी काही महिन्यांचा असताना विनोबा त्या महाकाळ गावी आले होते. तेव्हा त्यांनी मला बघितलं का? विनोबा एका तान्ह्या बाळाला हात लावतील असं मला वाटत नाही. पण माझ्या सहा महिन्यांच्या डोळ्यांनी विनोबांना तेव्हा पहिल्यांदा पाहिलं असणार. त्यानंतर विनोबा आणि गांधीजींनी स्थापन केलेल्या शाळा व आश्रमांत माझी पंधरा वर्षे गेली. विनोबांसोबत बरेच दिवस पदयात्रेमध्ये मी त्यांचं बोट धरून चाललो आहे. मला त्यातच कृतार्थता वाटायची. विनोबा काय बोलत आहेत याकडे माझं फार लक्ष नसायचं, पण संस्कार घडायचा.
त्यानंतर विनोबांचा सहवास ते जिवंत असेपर्यंत मला वेळोवेळी अनेक वर्षे मिळत राहिला. प्रायोपवेशन करून त्यांनी १९८२ मध्ये देहत्याग केला. तेव्हा शेवटच्या दिवसांत मी त्यांच्या जवळच होतो. विनोबांच्या मृत्यूनंतर ज्या सहा डॉक्टरांनी त्यांच्या मृत्यूच्या सर्टिफिकेशनवर सही केली, त्यात मीही एक होतो. म्हणून मी म्हणालो की, माझ्या जन्मापासून ते विनोबांच्या मृत्यूपर्यंत माझा आणि त्यांचा संबंध होता. विनोबांनी मला आयुष्यात भरभरून दिलं आहे. आजही देतच आहेत. माझी पहाट रोज सहसा विनोबांच्या वाचनाने होते आणि संध्याकाळ विनोबांनीच रचलेलं मराठीतलं ईशावास्य किंवा गीता प्रवचनाच्या वाचनाने होते.
कसे होते विनोबा? अदृश्य विनोबा
विनोबा अदृश्य राहण्याच्या कलेत फार माहीर होते. विनोबांबाबत वाचलेला एक प्रसंग सांगतो. वर्ध्याला जमनालाल बजाज यांनी आपल्या मुलांना विनोबांच्या आश्रमात ठेवले होते. कमलनयन बजाज- जे पुढे मोठे उद्योगपती झाले, ते- त्या विद्यार्थ्यांपैकीच एक. खोडकर होते. एक दिवस त्यांनी पाहिले की, आलेलं एक पत्र विनोबांनी फाडून कचरा कुंडीत टाकलं. पत्र महात्मा गांधींचं होतं. गांधींचं पत्र विनोबांनी फाडलं याचा अर्थ गांधींनी विनोबांना पत्रात खूप झापलं असणार! कमलनयननी ते तुकडे गोळा केले, एका कागदावर नीट चिकटवले आणि पत्र वाचलं. त्या पत्रात महात्मा गांधींनी लिहिलं होतं, ‘तुमसे बढकर ऊँची आत्मा मैने आज तक नहीं देखी.’ गांधीजी शब्द खूप तोलून-मापून वापरणारे होते. त्यामुळे त्यांचं हे पत्र जन्मभर कुणालाही मिरवता आलं असतं. पण विनोबांनी ते निर्लिप्तपणे फाडून फेकून दिलं.
गांधीजी योग्यच म्हणाले होते. नेहरूंनीदेखील एका जागी म्हटलं आहे की, ‘मी जगभर फिरतो, मोठमोठ्या लोकांना भेटतो आणि त्यावरून मी तुम्हाला सांगू शकतो की आज (नेहरू स्वातंत्र्योत्तर काळाविषयी म्हणत आहेत) अख्ख्या जगात विनोबांच्या उंचीचा एकही दुसरा माणूस नाही.’ पण तो माणूस जगाला फारसा माहीत नाही. कारण विनोबा या माणसाचा बहुतांश काळ हा अप्रकाशात आणि अज्ञातातच गेला. हा मार्ग त्यांनी स्वतः निवडला होता. एकदा त्यांनी म्हटले आहे की, ‘धुमसत असताना, धूर निघत असताना दिसून पडण्याची हौस करण्याची गरज नाही; आणि अग्नी पेटेल तेव्हा प्रकाश दिसेलच.’
१८८५ ला जन्म झाला तिथपासून १९४० पर्यंतचा त्यांचा काळ हा बहुतेकांसाठी अज्ञातच आहे. गांधींच्या मार्गदर्शनाखाली किंवा स्वतंत्रपणे सेवा आणि साधना सुरू आहे. १९४० मध्ये गांधींनी त्यांना देशातले पहिले ‘वैयक्तिक सत्याग्रही’ म्हणून घोषित केलं. एवढंच नाही, तर स्वतः लेख लिहून भारताला विनोबांची ओळख करून दिली. १९४० ते १९७० अशी ढोबळमानाने तीस वर्षे विनोबा सार्वजनिक प्रकाशात होते. त्या काळातलं त्यांचं सगळ्यात मोठं काम म्हणजे भूदान आणि ग्रामदान. विनोबा १९७० नंतर पुन्हा सूक्ष्मात गेले आणि १९८२ मध्ये महानिर्वाण- असा विनोबांचा थोडक्यात जीवनक्रम राहिला.
आपलं जीवन शक्यतो अप्रकाशातच ठेवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पण विनोबांचं दर्शन त्यांच्या कार्यात आणि साहित्यात होतं. त्यांच्या प्रकाशित साहित्याचा धावता आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
विनोबांचं आध्यात्मिक साहित्य
विनोबांचं साहित्य काही मुख्य प्रकारांमध्ये वर्गीकृत करता येतं. पहिला प्रकार आहे आध्यात्मिक साहित्य. यात शिरोमणी म्हणजे ‘गीता पंचक’. गीतेचा समश्लोकी मराठी अनुवाद- जो आपल्या आईलाही समजू शकेल यासाठी- त्यांनी ‘गीताई’ नावाने केला. गीताईवर त्यांनी जी प्रवचने दिली, ती ‘गीता प्रवचने’ महाराष्ट्रात बऱ्यापैकी माहीत आहेत. पण विनोबांचं माहीत नसलेलं आणखी एक पुस्तक म्हणजे ‘गीताई चिंतनिका’. ज्यांना कुणाला गीताई आणि गीता समजून घ्यायची असेल, त्यांना हे पुस्तक अतिशय सुंदर मार्गदर्शन करतं. यात विनोबा गीताईच्या एका-एका श्लोकावर, एका-एका शब्दावर भाष्य करीत आहेत.
याशिवाय ‘गीताई शब्दकोश’ आणि ‘स्थितप्रज्ञ दर्शन’ अशी विनोबांची गीतेवरची पाच पुस्तकं. या पुस्तकांच्या रूपाने एक अद्वितीय खजिनाच विनोबा आपल्यासाठी सोडून गेले आहेत. ‘ईशावास्य उपनिषद’ या पुस्तकाविषयी गांधीजी एका ठिकाणी म्हणतात, जगातील सगळी पुस्तके नष्ट होणार असतील आणि एकच पुस्तक वाचायला मिळणार असेल तर मी ईशावास्य उपनिषद निवडेन. त्याला पुस्तक तरी काय म्हणावं? इनमीन अठरा श्लोक. पण अख्ख्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार या पुस्तकात येतं.
आपण सहज गाऊ शकू असा ईशावास्योपनिषदचा मराठी अनुवाद विनोबांनी केला आहे. माझं सौभाग्य आणि दुर्भाग्य दोन्ही सांगायचं झाल्यास विनोबांनी वर्ध्याच्या ‘सत्याग्रह आश्रम’च्या ज्या एकांत खोलीत बसून गीताई रचली, माझ्या लहानपणी त्याच खोलीत बसून पहाटे चार वाजता अंधाऱ्या प्रकाशात मी पहिल्यांदा हे ईशावास्य उपनिषद ऐकलं, म्हटलं. पण मला तेव्हा त्या जागेचं स्थानमाहात्म्य माहीत नव्हतं की, गीतेच्या जन्मस्थानी बसून आपण ईशावास्य उपनिषद ऐकतो आहोत!
एकदा गांधीजी विनोबांना म्हणाले की, ‘मला सहज समजेल असं एक टिपण तू मला संस्कृत ईशावास्य उपनिषदावर बनवून दे.’ ते उपनिषद गांधींना आणखी समजून सांगण्यासाठी विनोबांनी त्यावर जे भाष्य लिहिलं, त्याला म्हणतात ‘ईशावास्य वृत्ती’. हे एक अद्वितीय भाष्य आहे. याशिवाय पतंजलीची जशी योगसूत्रे आहेत तशी ‘१०८ साम्यसूत्रे’ विनोबांनी संस्कृतमध्ये रचली आहेत. त्यात विनोबांनी गीतेला सूत्रबद्ध केले आहे. ‘अष्टादशी’ नावाने विनोबांचं आणखी एक पुस्तक आहे. १८ निवडक उपनिषदे आणि त्यांचा मराठी अनुवाद म्हणजे ‘अष्टादशी’ हे पुस्तक. कठोपनिषद, केनोपनिषद आदींचा यात समावेश आहे.
उपनिषदातली एक सुंदर कथा या पुस्तकात विनोबांनी सांगितली आहे, ती मनाला फार भावली. गोष्ट अशी की- पुरातन काळी एका खेड्यात एक म्हातारा मेला. त्याला तीन मुलं होती. म्हाताऱ्याने मरताना आपलं मृत्युपत्र करून ठेवलं होतं. त्यात लिहिलं होतं की, ‘माझ्याकडे जेवढे बैल आहेत ते तिन्ही मुलांमध्ये वाटावेत. पण त्यांची कुवत आणि गरजेनुसार हा वाटा वेगवेगळा करावा. निम्मे बैल मोठ्या मुलाला द्यावेत. एक-तृतीयांश बैल दुसऱ्या मुलाला आणि एक-नवमांश बैल हे तिसऱ्या मुलाला द्यावेत.’ अडचण अशी की, बैल होते एकूण १७ त्यामुळे त्याचे एक-द्वितीयांश, एक-तृतीयांश आणि एक-नवमांश असे तीन वाटे कसे करायचे? बैल कापावे? वाद मिटविण्यासाठी त्यांनी गावच्या प्रमुखाला बोलावलं. तो आपल्या बैलावर बसून आला. त्याने समस्या ऐकून घेतली आणि म्हणाला, ‘तुमचे वडील माझे मित्र होते. मी तुमच्या पित्यासारखाच आहे. तुमच्या वडिलांच्या १७ बैलांमध्ये माझाही एक बैल जोडून देऊ.’ आता बैल झाले १८. त्यातले एक-द्वितीयांश म्हणजे नऊ बैल दिले एका मुलाला, एक-तृतीयांश म्हणजे सहा बैल दिले दुसऱ्या मुलाला आणि एक-नवमांश म्हणजे दोन बैल दिले तिसऱ्या मुलाला. एकूण झाले सतरा. आणलेला अठरावा बैल परत घेऊन तो म्हातारा निघून गेला. त्यांचा प्रश्न सुटला, पण त्याबरोबर माझाही एक मोठा प्रश्न सुटला.
माझ्यासाठी तो युरेका क्षण होता. हा १८ वा बैल बीजगणिताच्या ‘क्ष’सारखा आहे. तो तुम्ही धरला तर प्रश्न सुटतात आणि पुन्हा तो शेवटी जसाच्या तसा अलगद कायम राहतोच की! पण आपण जर हट्टच धरून बसलो की- क्ष नाहीच मानायचा, तर मात्र बैल कापावा लागेल. ईेशर हा असाच अठरावा बैल आहे. तो तुम्ही मानला तर जीवनाची कित्येक कोडी सुटतात. आणि यात तुमचं काहीच जात नाही, कारण तो शेवटी नामानिराळा अलिप्तच राहतो. अष्टादशीमधल्या या अठराव्या बैलाने एक कूटप्रश्न सोडविला.
विनोबांनी ‘ऋग्वेद सार’ रचले आहे. तसाच ‘गुरुबोधसार’ही रचले आहे. विनोबा जेव्हा पहिल्यांदा ‘गुरुबोधसार’ सांगत होते, त्या वेळी योगायोगाने मी तिथे हजर होतो. त्यांच्या वाणीतून ते मला ऐकायला मिळालं. ते अद्भुत शिक्षक होते, जादूगारासारखे. शब्दांमधून गूढ अर्थ काढून दाखवायचे. त्याच प्रकारे ‘बुद्धाचं धम्मपद’ आहे, ‘कुराणसार’ आहे, ‘ख्रिस्तधर्मसार’ आहे. असे धर्मांची सार विनोबांनी सोप्या भाषेत मांडली आहेत. विनोबांची अतिशय मार्मिक भाषा ‘संतांचा प्रसाद’ या पुस्तकात बघायला मिळते. तुकारामाचं हार्द्र विनोबा उलगडून दाखवत आहेत. तुकारामाच्या तंबोऱ्याची दुसरी तार विनोबांच्या हृदयात झंकारत आहे. तुकारामाच्या आध्यात्मिक उंचीवर डोकावून विनोबा आपल्याला तुकाराम समजावून सांगत आहेत. याहून सुंदर आणि विलक्षण अनुभव नाही. दुसरं कोण आपल्याला तिथे नेईल?
‘रामनाम : एक चिंतन’ नावाचं विनोबांचं एक छोटंसं पुस्तक आहे. रामनाम हे प्रकरण अनेकांना मोठं कोडं ठरलं आहे. गांधींचं हे काय ‘रामनाम’ आहे, ते विज्ञानाच्या विद्यार्थ्याला कळत नाही. तर्कपूर्ण विचार करणाऱ्यांनाही ते नीटसं कळत नाही. आणि ‘मी सुशिक्षित आहे, विचारवंत आहे’, असा अहंकार असणाऱ्यांना तर ते मुळीच कळत नाही. रामनामाची खुबी काय हे विनोबा या पुस्तकात समजवून सांगतात.
‘महागुहेमध्ये प्रवेश’ या नावाचं विनोबांचं एक संकलित पुस्तक आहे. योग, अध्यात्म, ध्यान, समाधी, साक्षात्कार अशा अनेक गूढ विषयांवर विनोबांनी मांडलेले विचार या पुस्तकात आहेत. या पुस्तकाने माझी अनेक जळमटं दूर झाली. माझ्या हृदयरोगानंतर मी योगशास्त्राचा अभ्यास गंभीरपणे केला. भारतभर फिरलो. सर्व मुख्य योगपीठांमध्ये जाऊन आलो. सगळ्या गुरूंना भेटलो. त्यामुळे या विषयात मी ज्ञानी जरी नसलो, तरी जिज्ञासू आहे. विनोबा या योगमार्गाबद्दल विलक्षण अंतर्दृष्टी (insight) देतात.
यातील एक उदाहरणादाखल सांगतो. पतंजलीच्या योगाशास्त्रामध्ये ज्या आठ पायऱ्या आहेत, त्यामध्ये समाधी ही अंतिम व सर्वोच्च स्थिती मानली गेली आहे. त्यामुळे योगी ध्यान लावतात, ओम म्हणतात; पण त्यांच्या मनामध्ये एकच तळमळ असते की, समाधी केव्हा लागणार? पण विनोबा म्हणतात, ‘समाधी हे सर्वोच्च ध्येय नाही.’ एकदम बॉम्बगोळा टाकावा तसं हे विधान. सगळे योगी ज्या समाधीसाठी धडपडतात, ज्या अप्राप्याच्या मागे धावतात- त्याबाबत विनोबा म्हणतात, समाधी हे साधनेचं सर्वोच्च ध्येय नाही;
‘स्थितप्रज्ञ-वृत्ती’ हे सर्वोच्च ध्येय! हा ‘द्राक्षं आंबट’ प्रकार नाही. असा निर्णय देण्याचा विनोबांना अधिकार होता. प्रसिद्ध विदुषी श्रीमती विमलताई ठकारांनी काही वर्षांपूर्वी मला एक स्मरण सांगितलं. 1950 ते 1958 या काळात त्या बराच काळ विनोबांसोबत होत्या. आध्यात्मिक साधिका होत्या. एकदा विनोबांनी त्यांना विचारलं की, निर्विकल्प समाधी अवस्था किती काळ राहते याविषयी रामकृष्ण परमहंस काय म्हणाले आहेत? परमहंस म्हणाले होते- जास्तीत जास्त 21 दिवस. त्यानंतर शरीर गळून पडेल. विनोबा म्हणाले, ‘विमल, मी गेले सहा महिने सतत निर्विकल्प समाधी अवस्थेत आहे. वाट बघतो आहे शरीर केव्हा गळून पडेल याची. पण शरीर अजून तगून आहे.’ आणि तरी विनोबा म्हणतात, समाधी हे अंतिम ध्येय नाही.
थोडक्यात, एखाद्या गाईने जंगलात चारा खावा आणि दूध आपल्यासाठी घरी आणावं तसं विनोबांनी गेल्या चार हजार वर्षांतील आध्यात्मिक साहित्य, धार्मिक साहित्य, संतसाहित्य पचवून आपल्यासाठी दुधासारखी ही पुस्तकं निर्माण केली आहेत. आपल्याला समजेल, उमजेल अशा भाषेत. आणि ते करताना जुन्या ग्रंथांवर, शब्दांवर नव्या अर्थाचं कलम केलं आहे.
‘हिंदू’ हा शब्द खूप प्रचलित आहे. आपल्याला हेही माहीत आहे की, हिंदू हा संस्कृतमधला मूळ शब्द नाही. अरब लोक भारतात आले तेव्हा त्यांनी सिंधू नदीच्या काठावर राहणाऱ्या समाजाला हिंदू म्हटलं. अरबी भाषेत स आणि ह ही एकच अक्षरे आहेत. त्यामुळे सिंधूचा उच्चार अरबी लोकांनी हिंदू असा केला. भौगोलिक दृष्ट्या सिंधू परिसरात राहणारे लोक ते हिंदू. जसे विदर्भातले वैदर्भीय, अगदी तसेच. पण पुढे त्याला धार्मिक, सांस्कृतिक असा अर्थ प्राप्त झाला. विनोबा ‘हिंदू’ या शब्दाची निरुक्ती काय सांगतात? ‘हिंसया दूयते चित्तम्’. हिंसेने ज्याच्या हृदयाला, चित्ताला दुःख होते तो हिंदू. हे प्रचंड मोठं विधान आहे. आध्यात्मिकही आणि राजकीयदेखील. हिंदुत्वाच्या आजच्या अवतारामध्ये ‘हिंसया दूयते चित्तम’ ही व्याख्या हिंदूला काय करायला मार्गदर्शन देते? अशा प्रकारे विनोबांनी एका-एका शब्दावरती जी भाष्ये केली आहेत, ती म्हणजे नव्या सांस्कृतिक अर्थाचा शोध आहे.
क्रांती साहित्य
समाज कसा असावा याबाबत विनोबांनी बरंच चिंतन केलं. भूदान, ग्रामदान, सर्वोदय या रूपात कामही केलं. त्यावरती त्यांनी जी पुस्तकं लिहिली, त्याला आपण क्रांती साहित्य म्हणू. ‘स्वराज्यशास्त्र’ हे पुस्तक म्हणजे स्वराज्यावर राजकीय भाष्य. विनोबा वस्तुतः राज्यवादी नव्हते, अराजकवादीही नव्हते. म्हणायचंच झाल्यास ते अराज्यवादी होते. आणि त्याहून योग्य म्हणजे, ते ‘स्वराज्यवादी’ होते.
स्वराज्याची ‘रूल ऑफ द सेल्फ’ ही व्याख्या सर्वांनाच परिचयाची आहे. आवडतीही आहे. आपलं राज्य कुणाला आवडणार नाही? पण गांधी म्हणतात- Swarajya is not rule of the self, but rule on the self! स्वतःवर, स्वतःच्या इच्छांवर, स्वतःच्या वासनांवर, स्वतःच्या वर्तनावर मला नियंत्रण करता आलं पाहिजे. राज्य आणि स्वराज्य यावर विनोबांनी या पुस्तकात आपले विचार मांडले आहेत. ‘लोकनीती’ हे विनोबांचं आणखी एक अप्रतिम आणि उपयुक्त पुस्तक. राजनीतीला पर्याय विनोबा लोकनीती सांगत आहेत. ‘शिक्षण विचार’ हे पुस्तक काळाच्या फार पुढे होतं. मी शिक्षणशास्त्रज्ञ नाही. पण सुदैवाने वयाच्या चौदा वर्षांपर्यंत मी गांधी आणि विनोबांनी स्थापन केलेल्या शाळांमध्ये, नई तालीम या शिक्षणपद्धतीत शिकलो. पुढे आयुष्यभरदेखील मी त्याच पद्धतीने शिकत राहिलो. भारतात सर्वत्र लॉर्ड मेकॉलेने सुरू केलेली इंग्रजी शिक्षणपद्धती सुरू होती. शाळेच्या चार भिंतींत बसून पुस्तक आणि फळा या आधारे दिलेले माहितीचे ओव्हरडोस म्हणजे शिक्षण. गांधीजींनी याऐवजी ‘नई तालीम’ ही पद्धती मांडली. शास्त्र म्हणून विनोबांनी ती विकसित केली. ‘शिक्षण विचार’ पुस्तक क्रांतिकारी आहे. या पुस्तकात एका जागी विनोबा फार मार्मिक लिहितात. निव्वळ पुस्तकी शिक्षणाऐवजी नई तालीम म्हणजे जीवनासाठी शिक्षण, जीवनाचं शिक्षण, जीवनाद्वारे शिक्षण असे अनेक अर्थ सांगण्यात येतात. पण विनोबा म्हणतात, ‘हे सगळे मला नामंजूर आहेत. कारण या सगळ्यांमध्ये अजूनही जीवन व शिक्षण यामध्ये द्वैत कल्पित आहे. वस्तुतः जीवन हेच शिक्षण!’ हे वाक्य वाचलं तेव्हा माझ्या अंगावर रोमांच उभे राहिले. यापेक्षा अधिक साक्षात्कारी वाक्य मला शिक्षणाच्या क्षेत्रात माहीत नाही.
विनोबांचं ‘मधुकर’ हे पुस्तक अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. यात एक दुर्दैवी बाब आहे. महाराष्ट्रातले साहित्यिक, मराठीचे प्राध्यापक मधुकरच्या शैलीच्या प्रेमात पडले. विनोबांची मराठीतील निबंधशैली अद्वितीयच मानली जाते. सगळ्या पाठ्यपुस्तकात ‘मधुकर’ हे पुस्तक विनोबांची लेखनशैली म्हणून शिकविलं जातं. पण आपण विनोबांच्या विचारांचं मर्म दुर्लक्षित करून निबंधशैलीलाच कवटाळून बसलो. पोशाख धरला आणि आतला माणूस सोडून दिला.
विनोबांचा सत्याग्रह विचार
विनोबांचं आणखी एक छोटेखानी पुस्तक ‘सत्याग्रह विचार’. हे खरं तर संकलन आहे. विनोबांचे सत्याग्रहाबाबत काय विचार होते? त्याविषयी समज, गैरसमज, अपेक्षा, अपेक्षाभंग, आरोप काय नाहीत? विनोबांनी उत्तर आयुष्यात सत्याग्रहाबाबत जी भूमिका घेतली त्यावर अनेकांचा आक्षेप आहे. विनोबांची भूमिका गांधींना विन्मुख आहे, पलायनवादी आहे, संघर्ष टाळणारी आहे इत्यादी. त्यामुळे पुस्तकातील एका भागाचा उल्लेख करावासा वाटतो. विनोबा म्हणतात, ‘हिंसेचं, युद्धाचं शास्त्र मानवजात हजारो वर्षांपासून निर्माण करीत आहे. त्यामुळे विध्वंसाचा पुरेसा अनुभव आपल्याकडे आहे.
अहिंसेचं शास्त्र तर आता नुकतंच होऊ घातलं आहे. त्याचा अंतिम शब्द अद्याप कुणी सांगितलेला नाही. ‘It is a science in evolution.’ म्हणून गांधींनी जो सत्याग्रह केला तोच अंतिम आहे, असं विनोबा मानीत नाहीत. विनोबा म्हणतात की, गांधींनी सुरुवात केली असून पुढचं शोधण्यास सांगितलं आहे. ‘मी रोज बदलतो’, असं म्हणणारे गांधी ‘मी सांगितला तोच अंतिम सत्याग्रह’ असं कसं म्हणू शकतील? त्यामुळे आपल्याला सत्याग्रहाचे नव नवे अर्थ, नव्या पद्धती आणि त्याचे सूक्ष्म अर्थ शोधावे लागतील. नवे प्रयोग करावे लागतील.
एका जागी तर विनोबा म्हणतात की, ‘सत्याग्रह’ शब्दामध्येच थोडी समस्या आहे. आता आली अडचण! गांधींनी प्रसिद्ध केलेला हा शब्द. गांधींनीच ज्या माणसाला प्रथम सत्याग्रही म्हणून निवडलं, जणू त्यांचा सत्याग्रहाचा वारस. पण तेच विनोबा म्हणताहेत की, सत्याग्रह शब्दामध्येच एक समस्या आहे. ती म्हणजे त्यातला आग्रह. सत्याचा आग्रह धरला तर सत्य कुठे उरतं? माझं सत्यांचं आकलन वेगळं असू शकतं आणि दुसऱ्याचं वेगळं. दोघांनीही आपापल्या सत्याचा आग्रह धरला, तर दोघांचा दुराग्रह तेवढा शिल्लक राहील. सत्य शिल्लक राहणार नाही. त्यामुळे सत्याचा आग्रह होऊ शकत नाही.
वैज्ञानिक हे सत्याचा आग्रह धरत नाहीत. ते म्हणतात, माझ्या निरीक्षणावरून-आकड्यांवरून मला हे चित्र दिसत आहे. उद्या ते कदाचित बदलेल. उद्या तुला काही वेगळंच दिसू शकतं. त्यामुळे सत्य काय हे आपण दोघेही शोधू या. वैज्ञानिकांनी तरी सत्याबाबत आग्रही राहू नये. सत्याचा आग्रह धरला तर सत्याचा बळी जाईल.
विनोबा म्हणतात की, ‘सत्याग्रही’ऐवजी आपण ‘सत्य-ग्राही’ असावं. हा शब्दच्छल नाही. विनोबांनी सत्याग्रहाबाबत पुढे घेतलेली भूमिका यातून प्रगट होते. विनोबा म्हणतात, सत्याचादेखील आग्रह धरता येत नाही. कारण मला जे दिसतं तेच सत्य, हाच मुळी दुराग्रह आहे. हा असत्याग्रह होऊ शकतो. म्हणू सत्यग्राही असावं. सत्यग्राही सुरुवातीलाच मान्य करेल की, सत्य माझ्या प्रतिपक्षाकडेही असू शकतं. तेही मला समजून घेतलं पाहिजे. ते सत्य असेल तर मला ते स्वीकारलं पाहिजे. प्रतिपक्षाचं आणि माझं सत्य मिळून संपूर्ण सत्य बनतं. वस्तुतः अहिंसेमध्ये प्रतिपक्षच नसतो. सत्य हाच एकमेव पक्ष असतो. माझाही पक्ष असायला नको, कारण माझा अहंकार, आसक्ती त्यात जुळली आहे. मुळात प्रतिपक्षच नको. कारण कोणीच प्रति नाही, सगळे माझेच आहेत. उरावे ते केवळ सत्य. ही मोठी कठीण आणि सूक्ष्म भूमिका आहे. पण ही भूमिका नक्कीच गांधींच्या पुढे जाते. किंवा असं म्हणावं की, ही भूमिका गांधींना पुढे घेऊन जाते.
विनोबांनी सत्याग्रहाचा विकास थांबविलेला नाही. अतिशय सूक्ष्म विचार त्यांनी केलेला आहे. अनेक प्रयोग केले आहेत. आणि त्यावरून विनोबांची सत्याग्रहाबाबतची भूमिका बनलेली आहे. त्यामुळे विनोबांच्या सत्याग्रहाबाबतच्या भूमिकेवर टिप्पणी करताना प्रत्येकाने आपली कुवत बघून घ्यावी. पण अप्रिय सत्य सांगितले म्हणून सॉक्रेटिसला विषाची शिक्षा देण्याची इथे परंपरा आहे! विनोबांनी कधी आत्मकथा लिहिली नाही, पण त्यांची ‘प्रेमपंथ अहिंसेचा’ आणि ‘स्नेह सन्निधि’ ही दोन पुस्तकं त्यांच्या शिष्या कालिंदी यांनी संपादित केली आहेत. विनोबांच्या लिखाणात वा भाषणात जागोजागी स्वतःच्या जीवनाविषयी उल्लेख येतात. ते संकलित करून ही पुस्तकं निर्मिली आहेत. ‘स्नेह सन्निधि’ हे पुस्तक पहिल्या दर्जाची ऐतिहासिक सामग्री आहे. यात विनोबांनी लिहिलेली पत्रं आहेत. पत्रावाटे ते जणू त्यांचं अंतर, त्यांच्या अंतरातले संघर्ष, त्यांचा विकास, ते करीत असलेले प्रयोग (मुख्यतः 1920 ते 1950 या काळातले) वाचकांसमोर मांडत आहेत.
‘विचारपोथी’ नावाचं विनोबांचं एक छोटेखानी पुस्तक आहे. विनोबांनी त्याला स्वतःशी अर्धवट पुटपुटलेले ‘माझे स्वगत विचार’ असं म्हटलं आहे. अद्वितीय हिरे- माणकं त्यात आहेत. त्यात एका जागी विनोबा म्हणतात, (सेवा)/(अहंकार) = 0. माणसात अनंत अहंकार भरलेला आहे. तुम्ही कितीही सेवा केली तरी त्याचं फलित शून्यातच जातं; कारण कोणत्याही संख्येला अनंतने भागिले असता फलित शून्य हे असते. गणिताच्या भाषेत विनोबा सामाजिक अध्यात्म मांडत आहेत. आणि त्याच्यापुढे त्यांचा उपाय- आपला अहंकार शून्य करा. स्वतःला शून्य करा. काय घडेल? (सेवा)/(0) = अनंत. कोणतीही संख्या भागिले शून्य केल्यास गणितात उत्तर येतं अनंत. आपल्या अहंकाराला शून्य केलं आणि सेवा केली, तर छोट्याश्या सेवेचाही अनंत परिणाम घडू शकतो. असं हे सेवेचं आध्यात्मिक गणित अकाट्य आहे.
विनोबांचे विचार प्रथम अशा वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये मांडले गेले. काही त्यांनी स्वतः लिहिलेली, तर काही संकलित. पुढे आश्रमाच्या लोकांनी त्यांचं संकलन करून एकूण 10 हजार पृष्ठांचे 20 भाग ‘विनोबा विचार’ या नावाने काढले. पराग चोळकर आणि एमकेसीएलचे विवेक सावंत यांनी विनोबांचे व विनोबांबाबतचे एक लाख पानांचे सर्व उपलब्ध साहित्य www.vinoba.in या वेबसाईटवर मांडलं आहे, जे आपल्यासमोर आज उपलब्ध आहे.
विनोबांचे आज औचित्य?
विनोबा केवळ प्राचीन भारताचे प्रतिनिधी किंवा भाष्यकार होते का? आजच्या आणि उद्याच्या जगासाठी विनोबांचं काही औचित्य आहे का? सेम्युअल हंटिंग्टन हा हार्वर्डमधला प्रोफेसर. त्याने 1996 मध्ये एक पुस्तक प्रकाशित केलं, ‘दी क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन्स’. लक्षात घ्या, तोपर्यंत शीत युद्ध संपलेलं आहे. मग पुढची युद्धं कुठल्या मुद्यांवर होणार? तो इतिहास तपासतो आणि भाकीत करतो की, यापुढे जगातले संघर्ष हे सांस्कृतिक मुद्यांवर होतील. यात भाषा आली, धर्म आला, वंश आला, राष्ट्रीय अस्मिता आली. स्थानिक संघर्षदेखील वंश, धर्म, भाषा आणि अस्मिता यामुळे होतील.
जागतिक संघर्ष हे देशांमध्ये नाही तर वेगवेगळ्या संस्कृतींमध्ये होतील. मुख्य संघर्ष पाश्चिमात्य संस्कृती विरुद्ध चिनी संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती विरुद्ध इस्लामिक संस्कृती. हंटिंग्टनचे अनेक विचार जरी पटण्यासारखे नसले, तरी याबाबत मात्र त्याने अचूक भाकीत वर्तविले आहे. यापुढे संघर्ष होणार ते सांस्कृतिक मुद्यांवर. आज आपण हे सर्वत्र घडताना पाहत आहोत. अस्मिता संघर्ष वाढला आहे. स्पेनमधून कॅटालोनिया वेगळं होऊ पाहतो. ब्रेग्झिट करून इंग्लंड युनायटेड युरोपमधून बाहेर पडलं. मध्य-पूर्वेमध्ये आयसिस आहे, तालिबान आहे. इस्लामिक जगत तर पूर्ण धार्मिक संघर्षाने पेटलं आहे.
भारताकडे पाहता काश्मीर प्रश्न आहे, हिंदुत्वही आहे, दलितांचे आणि आदिवासींचे संघर्षही आहेत. सोबतच जाट, मराठे आणि राजपुतांचेही संघर्ष आहेत. भारत धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक संघर्षांनी पेटला आहे. भारतच नाही, तर सबंध जगच संघर्षाच्या उंबरठ्यावर उभं आहे. विज्ञानामुळे संपूर्ण जग आणि माणसं फार जवळ आली आहेत. प्रत्येकजण आपापली संस्कृती घेऊन एकत्र येत आहे. मग यांच्यात संघर्षच होणार का? हा संघर्ष झालाच तर विज्ञानामुळे तो महाभयंकर होणार, हे नक्की. उत्तर कोरिया तर बॉम्बच्या बटणावर हात ठेवूनच बसला आहे. अशा स्थितीत संघर्षापासून जगाला कसं वाचविता येईल? संघर्षाची बीजं तर वाढतच आहेत.
प्रचंड आर्थिक विषमता निर्माण झाली आहे. यावर मार्क्सने वर्ग-संघर्ष सांगितला. त्यातून आर्थिक समता येईल, असं भाकीत केलं. आर्थिक समता फार सुंदर गोष्ट राहिली असती, पण दुर्दैवाने तसं झालं नाही. फुले, आंबेडकरांनी आपल्याला वर्ण-संघर्ष आणि सामाजिक समता सांगितली. पण अजूनही आपल्या मनातील जात गेलेली नाही. जातीय संघर्ष पेटलेलाच आहे. दलितांना जाळले जातच आहे.
थॉमस पिकेटी आपल्या ‘कॅपिटल इन ट्वेंटी फर्स्ट सेन्चुरी’ या पुस्तकात सांगतोय, या शतकात जगातील विषमता वाढली आहे. जगातील 50 टक्के उत्पन्न हे 1 टक्का लोकांचे आहे 90 टक्के मालमत्ता ही 2 टक्के लोकांकडे आहे. केवढी आर्थिक विषमता वाढली आहे! सामाजिक विषमता तर आपण पाहतच आहोत. आणि हिंदुत्व तर समतेची सोडा, आता श्रेष्ठत्वाची भाषा बोलतं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर प्रश्न उपस्थित होतो की, समतेचा आधार काय असू शकतो? सामाजिक-आर्थिक समता हवी असेल तर या समतेचा आधार काय? का म्हणून माणसं सारखी मानायची?
समतेचा आधार साम्य
याबाबत युरोपने ह्युमनिझम किंवा लिबरॅलिझम हा विचार मांडला. माणूस सर्वोच्च हा विचार त्यात अंतर्निहित आहे. विनोबा मात्र भारतीय भाषेत समतेचा वेगळाच विचार आपल्याला सांगतात. ते म्हणतात, ‘समतेचा आधार आहे साम्य! समता आणि साम्य या दोन्ही शब्दांत फरक आहे. समता म्हणजे इक्वालिटी आणि साम्य म्हणजे युनिटी, एकरूपता.’ विनोबा त्यांच्या साम्यसूत्रात पहिलंच सूत्र सांगतात, ‘अभिधेयम् परम् साम्यम्.’ सर्वोच्च ध्येय काय आहे तर परम साम्य. पूर्णपणे एकरूपता. मी आणि तू समान नाही, तर एकच आहोत. समता तर हवीच, पण ते अपुरं ध्येय. म्हणून विनोबा म्हणतात, ‘राजकीय, सामाजिक, आर्थिक समता हवीच आहे. पण या तिन्ही समता जगात तेव्हाच प्रस्थापित होऊ शकतात, स्थिर होऊ शकतात; जेव्हा हृदयामध्ये मानसिक समता असेल. आणि त्याचा आधार आध्यात्मिक साम्य हाच असू शकतो.
ईशावास्यं इदम् सर्वम्. इथे जे जे काही आहे, त्यात ईश तत्त्वाचं वास्तव्य आहे. ईेशर तुझ्यातही आहे, तोच माझ्यातही आहे. हेच आपल्यात साम्य आहे. तोच ईेशर दोघांमध्ये वसतो आहे.
हा आध्यात्मिक विचार समतेच्या कल्पनेला आधार देतो. ‘क्लॅश ऑफ सिव्हिलायझेशन’च्या जगात तो सबंध मानवजातीलाच नव्हे तर विश्वातल्या सर्व प्राणिमात्रांना, वृक्षांना, पर्यावरणाला, सृष्टीला, परग्रहांना एकरूपतेचा आधार देतो. विज्ञान एकीकडे आपल्याला म्हणणार की सगळेच कणमय आहे म्हणून आपण सगळे सारखे आहोत आणि दुसरीकडे विनोबा आध्यात्मिक दृष्टिकोनातून सांगणार की- ‘अभिधेयम् परम् साम्यम्.’ विज्ञान आणि आध्यात्माला एकत्र आणून विनोबा आपल्याला विलक्षण असा एकरूपतेचा दृष्टिकोन देतात.
विनोबांचं बोट धरून मी बंगालमध्ये 1963 मध्ये चालत होतो. त्या काळात ते ‘जय जगत’ अशी घोषणा आमच्याकडून करून घ्यायचे. कल्पना करा… चीनचं आक्रमण झालंय. दोन राष्ट्रांमधला संघर्ष पेटला आहे. जगामध्ये त्या वेळी शीत युद्ध सुरू आहे. रशिया आणि अमेरिकेने आण्विक शस्त्रांचे ढीग तयार करून ठेवले आहेत. अशा जगामध्ये अशी वैश्विक कल्पना मांडणारा, ‘जय महाराष्ट्र’ नाही, ‘जय हिंद’ही नाही तर ‘जय जगत’ म्हणणारा हा पहिला महापुरुष होऊन गेला. हा माणूस ज्ञानयोगीही होता, 22 भाषा जाणणारा.
वेल्लोर तुरुंगात गेले तेव्हा गेल्या-गेल्या त्यांनी तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशी चारही भाषांची पुस्तकं मागितली आणि एकाच वेळी या चारही भाषा शिकायला सुरुवात केली. कुणी तरी त्यांना म्हणालं की, तुम्ही चार चार भाषा एकाच वेळी कसे शिकता? यावर विनोबा म्हणाले, ‘कारण पाचवी भाषाच नाही म्हणून चार शिकतो. पाचवी कुठली दक्षिण भारतीय भाषा असती तर तीदेखील शिकलो असतो.’ पदयात्रेमध्ये आम्ही रात्री गाढ झोपून असायचो. विनोबा तीन वाजता उठायचे आणि अध्ययन करायचे. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी चिनी भाषा शिकायला सुरुवात केली. असा हा ज्ञानयोगी. तो कर्मयोगीही होता.
‘स्नेह सन्निधि’मध्ये ते आपल्याला पाहायला मिळतं. आठ-आठ, बारा-बारा तास हा माणूस केवळ सूत कताई करायचा. आठ-आठ तास फक्त कुदळीने विनोबांनी खड्डे खणले आहेत. एवढा मोठा ज्ञानी, एवढा मोठा योगी; तो काय करतो आहे, तर कुदळीने माती खणतो आहे. झेन पंथामध्ये साक्षात्कार झाल्यानंतर काय घडते याचं सुंदर वर्णन आहे.
Before Enlightenment chop wood, carry water. After Enlightenment chop wood, carry water
साक्षात्कारी व्यक्ती तीच साधी कर्मे करत राहते. आत परिवर्तन घडलं तरी बाह्य कर्मे सोडत नाही. विनोबा खादीशास्त्राचे भीष्माचार्य होते.
खादीशास्त्राचा बराचसा भाग विनोबांनी आपल्या शिष्यांसोबत वर्ध्याच्या आश्रमात प्रयोग करून रचला. भाऊ पानसे नावाचे विनोबांचे एक शिष्य होते. एका तासामध्ये 460 तार कातण्याचा त्यांचा भारतातला विक्रम होता. विदर्भातला कापूस घेऊन तो रेचायचा कसा, त्यातून सरकी कशी काढायची, रुई कशी वेगळी करायची, पिंजायचे कसे, त्याचे पेळू कसे करायचे, त्याच्या तारा कशा करायच्या, त्या मोजायच्या कशा आणि विणायच्या कशा- या अख्ख्या खादीशास्त्राचे विनोबांनी अनेक वर्षे प्रयोग केले. एकदा गांधीजींकडे खादी कातणारे मजूर गेले. तेव्हा कदाचित एका गुंडीला दोन पैसे असा कातण्याचा दर होता. मजूर म्हणाले, ‘‘बापू पोटच भरत नाही. अर्धपोटी राहावं लागतं.’’ त्याचवेळी खादीचे व्यवस्थापक म्हणत होते की, सूत कातण्याचे दर वाढवले तर खादी खूप महाग होईल. लोक खादी विकत घेणारच नाहीत.
गांधीजींनी विनोबांना बोलावलं आणि विचारलं, ‘‘या खादी कातणाऱ्या मजुरांच्या मजुरीचा दर काय असावा?’’ विनोबा म्हणाले, ‘‘मला सहा महिने द्या.’’ सहा महिन्यांनी ते गांधींजवळ परतले. वजन 30 पाउंड कमी झालं होतं. गांधीजी म्हणाले, ‘‘विनोबा, हे काय झालं?’’ विनोबा गांधीजींना म्हणाले, ‘‘गेले सहा महिने मी दररोज आठ तास फक्त सूत काततोय. या कातण्याची जी मजुरी मिळत आहे, तेवढ्याच पैशांत मी जेवतोय. तर माझी अशी अवस्था झाली.’’ थोर ज्ञानी, पण खादी कातणाऱ्यांची मजुरी काय असावी यासाठी स्वतःवर प्रयोग करून निर्णय सांगतोय. असा हा ज्ञानयोगी, कर्मयोगी, भक्त आणि संन्यासी सर्व एका पुरुषाच्या देहामध्ये आपल्याला साक्षात बघायला मिळाला. अजिबात अतिशयोक्ती न करता मी असं म्हणणार आहे की- दधिची, शंकराचार्य, ख्रिस्त, ज्ञानेश्वर आणि गांधी या पाचही महापुरुषांचा संगम विनोबा या एका माणसात होता.
अंतिम पर्व
बहुतेक महापुरुषांचं अंतिम पर्व हा अटळपणे शोकांत असतो. श्री रामचंद्राच्या जीवनामध्ये बघा- वनवासातून परत आले, सीतेचा त्याग करावा लागला. सीता धरणीमध्ये गेली. लक्ष्मणाला ‘जीव दे’ असा आदेश द्यावा लागला आणि शेवटी रामचंद्राने स्वतः शरयू नदीत बुडून समाधी घेतली. कृष्णाच्या जीवनात बघा- महाभारताचं युद्ध जिंकलं, पण महासंहार झालेला आहे. कृष्ण द्वारकेला येतो तेव्हा त्याला दिसतं की आप्त-स्वकीय दारू पिऊन आपसात लढून मेले आहेत. वंशसंहार झालेला आहे. आणि हे सगळं बघायला कृष्ण जिवंत आहे. शेवटी वनामध्ये एकटा उदास बसलेला आहे. त्या वेळी बाण लागून कृष्ण देहत्याग करतो.
ख्रिस्ताला सुळावर चढवलं. गांधींना तर त्यांच्या अंतिम पर्वामध्ये देशाची फाळणी बघावी लागली. हिंदू-मुस्लिम दंगे बघावे लागले. काँग्रेसने गांधींचा अस्वीकार केला. तेही त्यांना बघावं लागलं. शेवटी तीन गोळ्या छातीत झेलाव्या लागल्या. विनोबादेखील याला अपवाद नव्हते.
वर्ष 1970. वयाची पंचाहत्तर वर्षे पूर्ण झाली आहेत. गेली वीस वर्षे भारताची पदयात्रा, वाहनयात्रा करत होते. राज्या-राज्यात, गावा-गावात जाऊन भूदान मागत होते. लोकांना आर्थिक व सामाजिक समतेचा, ग्रामस्वराज्याचा विचार समजावत होते. आता शरीर थकलं आहे, जर्जर झालं आहे. सामाजिक कर्तव्य आता पूर्ण झालं, असं म्हणून 1970 मध्ये त्यांनी भूदान, ग्रामदान व पदयात्रेतून निवृत्ती घेतली आणि आपल्या जीवनातील एक अंतिम प्रयोग सुरू केला.
कठीण प्रयोग
विनोबांच्या जीवनातला हा अंतिम प्रयोग अतिशय धोकादायक सिद्ध झाला. आपल्याला समजण्यासाठी त्यांनी याला ‘सूक्ष्मात प्रवेश’ असा शब्दप्रयोग केला. म्हणजे ‘सगळ्या कर्मांपासून मी आता निवृत्त होतो आहे.’ संन्यासाची आपल्या देशात परंपराच आहे. पण विनोबांनी त्यापुढचा अतिशय कठीण प्रयोग मांडला. गीतेच्या पाचव्या अध्यायामध्ये असं द्वंद्व आहे की, कर्मयोग श्रेष्ठ की संन्यास श्रेष्ठ? विनोबांनी स्वतः म्हटलंय की, ‘गीतेतला हा मला सर्वांत कठीण प्रश्न वाटला. जोपर्यंत माझ्या मनात या प्रश्नाविषयी स्पष्ट उत्तर तयार झालं नाही तोपर्यंत मी गीतेचा अनुवाद, गीताई लिहिणं सुरू केलं नाही. तोपर्यंत मी थांबून राहिलो.’ कर्मयोगी काय करतो? तर तो कर्म करूनही निर्लेप राहतो. निष्काम कर्मयोग- जे विनोबांनी जवळपास 50 वर्षे- 1920 ते 1970 या काळात केलं. आता विनोबांनी बाह्य कर्म सोडलं आणि म्हणाले, ‘आता माझं केवळ आंतरिक कर्म, सूक्ष्म कर्म सुरू राहणार. मी काहीही बाह्य कर्म करणार नाही; पण (गीतेच्या पाचव्या अध्यायात म्हटलेलं जर खरं असेल तर) माझ्या आंतरिक कर्मातून, अकर्मातून व्यापक कर्म घडेल.’
आपल्याला समजायला जरा कठीणच आहे. हे कसं घडेल याबाबत गीता प्रवचनामध्ये एका जागी विनोबा समजावतात. आई आपल्या लहान मुलाला चूक झाली म्हणून मारते. मातृहृदयच आहे, पण त्याला शिक्षा करते. हे झालं कर्म. त्यामुळे मूल कदाचित बाह्यतः सुधारतं, पण परिमाण कमी. पण आईने त्या मुलाशी बोलणंच सोडलं. हे झालं अकर्म. मारत नाही आणि बोलतही नाही. तरी मुलावर त्याचा प्रचंड परिणाम घडतो. अकर्मातून कर्म घडू शकतं, परिणाम होऊ शकतो. त्यामुळे विनोबांनी आता बाह्य कर्मयोगाचा भाग सोडला आणि संन्यस्त होऊन अकर्मातून कर्म सुरू केलं. कर्मसंन्यास घेतला, क्षेत्रसंन्यास घेतला आणि सूक्ष्मात प्रवेश केला. म्हणाले की, आता यापुढे माझे कर्म असे सूक्ष्मच राहणार. दिसणार नाही. पण माझी श्रद्धा आहे की, त्याचा परिणाम व्यापक होईल.
आपण असं म्हणू या की, विनोबा कर्मयोगाच्या नॅनो-टेक्नोलॉजीचा प्रयोग करत आहेत. सूक्ष्मातिसूक्ष्म कर्म. मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवरती कर्म. पण त्याचा परिणाम मानवजातीवर जास्त व्हावा. विनोबा नॅनो-टेक्नालॉजीचे प्रयोग करीत होते, पण आम्हाला फक्त लोहाराची हातोडी समजते. त्यांचं अकर्मातून कर्म आम्हाला समजलंच नाही. स्वीकार्यही झालं नाही. म्हणून नंतरच्या म्हणजे 1972 ते 1982 या दहा वर्षांच्या काळात विनोबांच्या या सूक्ष्माची, क्षेत्रसंन्यासाची मराठी लेखक-पत्रकारांनी यथेच्छ खिल्ली उडविली. त्यांचं पात्र जेवढं होतं तसे ते वागले.
दोन आरोप
अंतिम दहा वर्षांत विनोबांवर जे अनेक आक्षेप आणि आरोप झाले, त्यात मुख्य दोन आरोप आहेत. एक म्हणजे- जयप्रकाश नारायणांच्या आंदोलनाला समर्थन का दिलं नाही, इंदिरा गांधींविरुद्ध सत्याग्रह का केला नाही, हा पहिला आक्षेप. आणि दुसरा, आणीबाणीला ‘अनुशासन पर्व’ असं प्रशस्तिपत्र का दिलं? विनोबांविषयी अख्ख्या महाराष्ट्राच्या मनातलं भावविश्व या दोन प्रश्नांनी कलुषित झालं आहे. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांविषयी आज विस्ताराने चर्चा करावी, असं मला वाटतं. या दोन प्रश्नांची उत्तरं शोधायची असतील तर सुरुवात वेगळीकडून करावी लागते. कारण या प्रश्नांची उत्तरं दृष्टिकोनाच्या भेदामध्ये लपलेली आहेत.
गीता प्रवचनात विनोबा एक कथा सांगतात. रामचरित्र सांगण्यात येत आहे. तुलसीदास की रामदास सांगतात आहेत आणि हनुमान वेषांतर करून कथा ऐकण्यासाठी येऊन बसला आहे. एका जागी तुलसीदास म्हणाले की, हनुमान लंकेमध्ये सीतेच्या शोधासाठी गेला, तिथे सगळीकडे शुभ्र फुले फुलली होती. हे ऐकताच हनुमान उभा राहिला आणि म्हणाला, तुम्ही खोटं सांगत आहात. ती फुलं पांढरी नव्हे, लाल होती. तुलसीदास म्हणाले, ‘नाही ती फुलं शुभ्रच होती,’ ‘हनुमान म्हणाला मी स्वतः तिथे पाहिलं; फुलं लाल होती.’ दोन भक्तांमध्ये वाद झाला; न्याय कोण करणार? ते दोघे प्रभू रामचंद्रांकडे गेले. रामचंद्र म्हणाले, ‘फुलं तर पांढरीच होती; पण हनुमान एवढा क्रोधित झाला होता की, त्याचे डोळे लाल झाले होते आणि त्यामुळे त्याला सगळं लाल दिसत होतं.’ तात्पर्य हे की, दृष्टिकोनामुळे त्याच वास्तवाचं वेगळंच दर्शन आपल्याला होतं.
द्वैत की अद्वैत?
दोन दृष्टिकोन आहेत. एक आहे द्वैतवादी दृष्टिकोन- जो मानतो की जगामध्ये द्वैत आहे, द्वंद्व आहे. दोन वेगवेगळ्या बाजू आहेत आणि त्यांच्यामध्ये द्वंद्व आहे, त्यांच्यामध्ये संघर्ष आहे. द्वंद्व हेच वास्तव आणि संघर्ष हाच उपाय, असे हा दृष्टिकोन सांगतो. या विचारातून स्वाभाविकपणे युद्धं होतात. दुसरा अद्वैत दृष्टिकोन आहे. तो म्हणतो, सर्व काही एकरूप, एकात्मच आहे. त्यामुळे यातून समन्वयाचा मार्ग निघतो. सगळं जर एकच असेल, तर द्वंद्व होऊच शकत नाही. संघर्षाला जागाच नाही. जीवनात छोटी-छोटी द्वैतं आणि द्वंद्वं असतात पण ती व्यापक अशा विशाल अद्वैताच्या, एकात्मतेच्या पोटात असतात. आता वास्तवाला बघायचं कसं, हे दृष्टिकोनावर अवलंबून असतं. आपल्या दृष्टीला जग हे छोटी-छोटी द्वंद्वं आणि द्वैताने बनलेलं आहे असं भासतं. विनोबांनी नेहमीच व्यापक अद्वैत पाहिलं आणि अनुभवलं. विनोबांचा हा मूलभूत आणि तात्त्विक दृष्टिकोन समजून घेतल्याशिवाय विनोबांना समजूनच घेता येत नाही. विनोबांच्या जीवनात अद्वैत इतकं ओतप्रोत भरलं होतं की, त्यांनी द्वैतासोबत वाद करणंदेखील नाकारलं.
विनोबा 18 वर्षांचे होते तेव्हाची गोष्ट. ब्रह्माच्या शोधात, मोक्षाच्या शोधात ते हिमालयाकडे निघाले होते. वाटेत काशीला काही काळ थांबले. तिथे ते संस्कृत आणि वेदाचा अभ्यास करत होते. त्या काळात काशीमध्ये पंडितांच्या मोठमोठ्या वादसभा भरायच्या. एक वादसभा भरली, द्वैतवादी विरुद्ध अद्वैतवादी. भारतीय तत्त्वज्ञानात हे वाद कायमच राहिले आहेत. काशीमधल्या त्या वादामध्ये द्वैतवादी हरले, अद्वैतवादी जिंकले. आता ते उठणार आणि विजयाचा उत्सव साजरा करणार तेवढ्यात श्रोत्यांमधून विनोबा उभे राहिले. अठरा-एकोणीस वर्षांचा मुलगा. म्हणाले, ‘‘तुमचं चुकतंय. द्वैतवादी तर वादात पराजित झाले, ते स्पष्टच आहे. पण अद्वैतवाद्यांनी द्वैतवाद्यांशी वाद स्वीकारला, म्हणजे मुळातच त्यांनी द्वैत स्वीकारलं. खरा अद्वैतवादी द्वैत आणि अद्वैत यामध्येदेखील अद्वैतच बघेल. त्यामुळे तो वादच करू शकत नाही. द्वैती लोकांशी तुम्ही वादाला उतरल्याने तुम्ही अद्वैतवादी तर मुळातच पराजित झालात.’’
अद्वैताची खरी कसोटी ही द्वैताशीदेखील न लढण्यात आहे, असं विनोबा मानतात. कठीण बाब आहे आपल्यासाठी. मला आणि तुम्हाला वाद झाल्यावर हाती तलवार घेऊन किंवा बुद्धीची शस्त्रं परजून भांडायची सवय आहे. आणि विनोबा म्हणत आहेत की, सगळंच काही एकरूप आहे, अद्वैत आहे; मग मी द्वैत कल्पून वादात कशाला पडू? ज्याच्या दृष्टी आणि वृत्तीमध्ये अद्वैत ओतप्रोत भरलं आहे, त्या माणसासाठी कोणीच परका नाही. सर्वच माझे आहेत. त्याही पुढे जाऊन विनोबा म्हणतात, सर्वच मी आहे. तुकारामांनी वर्णन केलं आहे- ‘जो जो भेटे तो तो वाटे मी असे।’ ही संतांची वृत्ती असते. त्यांचं हृदय या पातळीवर असतं. कुणाशी वाद कसला आणि कुणाशी शत्रुत्व कसलं? आणि ‘या सर्वच मी’चा आधार आहे ‘ईशावास्यं इदम् सर्वम्.’ सर्वत्र जर ईश्वर वसलेला आहे; मग द्वैत कसं असू शकतं? संघर्ष कसा असू शकतो?
गीतेमध्ये अर्जुन आपल्यासारखा आहे. तो जागोजागी द्वंद्व उभे करतो. ज्ञान श्रेष्ठ की कर्म श्रेष्ठ? निर्गुण भक्ती श्रेष्ठ की सगुण भक्ती श्रेष्ठ? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा गीता प्रवचनात विनोबा देतात, तेव्हा ते कोणतीही एक बाजू घेणं नाकारतात. ही सगळी द्वैतं, सगळी द्वंद्वं काल्पनिक आहेत; त्यांच्यामध्ये मूलभूत अद्वैत आहे, असं ते म्हणतात आणि अद्भुत अद्वैताचं दर्शन आपल्याला करवतात.
पाचव्या अध्यायामध्ये कर्म आणि संन्यासाचं अद्वैत विनोबा दाखवतात. सगुण भक्ती आणि निर्गुण भक्तीमध्ये कोणती श्रेष्ठ यावर शतकानुशतकं वाद चालले आहेत. पण बाराव्या अध्यायात विनोबा दाखवितात की, दोन्ही एकच आहेत. त्यांच्यामध्ये द्वैतच नाही. गीता प्रवचनात सतराव्या अध्यायात तर विनोबा आणखीनच कमाल करतात. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार कोणाला आहे, असा प्रश्न विचारला आहे. तो पुण्यवानाला आहे, असं कुणीही म्हणेल. पण विनोबा सतराव्या अध्यायाच्या शेवटच्या वाक्यात याचं अद्भुत उत्तर देतात. ‘परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार पुण्यवानाला आहे, कारण तो पुण्यवान आहे. परमेश्वराचं नाम घेण्याचा अधिकार पाप्याला आहे, कारण तो पापी आहे. त्याला गरज आहे.’ पापी आणि पुण्यवान यातही विनोबा अद्वैत बघतात.
कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर सांगितलेल्या गीतेमध्येदेखील विनोबा अद्वैत बघत आहेत. त्यामुळे गीतेला त्यांनी नाव दिलं आहे ‘साम्ययोग’. गीतेमध्ये वेगवेगळ्या भाष्यकारांना वेगवेगळं अंग दिसलं, भावलं. टिळकांचा कर्मयोग, ज्ञानेश्वरांचा भक्तियोग, शंकराचार्यांचा ज्ञानयोग, महात्मा गांधींचा अनासक्तियोग; तसा विनोबांचा साम्ययोग. साम्ययोगातून केवळ अहिंसा जन्माला येऊ शकते. सगळंच जर मी आहे आणि परका कोणी नाहीच आहे, मला कोणी शत्रूच नाहीच; तर हिंसा कशी करता येईल? पण आपल्या मानसिक अडचणी बघा. आपल्यात हिंसा मुरली आहे.
उदाहरण द्यायचं झाल्यास ‘पराक्रम’ हा शब्द बघा. आपण पराक्रम करतो. त्याचं कौतुक करतो. पराक्रम म्हणजे काय तर पर+आक्रम. दुसऱ्यावर आक्रमण म्हणजे पराक्रम. इतर माणसांना ‘पर’ समजणं, ही पहिली हिंसा. म्हणजे पहिलेच द्वैत. त्यावर आक्रमण करणं म्हणजे दुसरी हिंसा. हिंसेचा गुणाकार म्हणजे पराक्रम. आणि त्या पराक्रमाचं आपण किती कौतुक करीत असतो!
विनोबांच्या जीवनात मात्र सातत्य आहे. काशीला द्वैतासोबत त्यांनी वाद नाकारला. ब्रिटिशांसोबत पूर्णपणे अहिंसक राहून हा माणूस सत्याग्रह करू शकेल हे गांधींना माहीत होतं, म्हणून त्यांनी विनोबांना पहिला वैयक्तिक सत्याग्रही म्हणून निवडलं. तेलंगणात जमिनीसाठी वर्ग- संघर्षातून साम्यवादी हिंसा करीत होते. विनोबांनी हिंसा नाकारली आणि भूदान सुरू केलं. भूमिवान आणि भूमिहीन दोघेही ईशराचीच मुलं. गावांतील पक्ष, दुही आणि तंटे मिटवायला त्यांनी ग्रामदान, सर्वसंमती हे प्रयोग सुरू केले. विनोबा सर्वत्र अद्वैत कल्पता आहेत. चंबळच्या डाकूंनादेखील त्यांनी आपलं म्हटलं. आश्चर्य म्हणजे, त्या डाकूंनादेखील असं वाटलं की, हा संत आपल्याला खरंच आपलं मानतो आहे. त्यामुळे विनोबांवर विेशास ठेवून त्यांनी शस्त्रं समर्पित केली. विनोबांचा हा अहिंसक प्रेमभाव डाकूंना समजला, त्यांनी विेशास ठेवला; आपल्याला तो समजला नाही.
इंदिरा विरुद्ध जयप्रकाश
याची कसोटी केव्हा झाली? भ्रष्टाचार आणि हुकूमशाही विरुद्ध जयप्रकाश नारायण यांनी संघर्ष सुरू केल्यावर ‘इंदिरा विरुद्ध जयप्रकाश’ असं द्वंद्व उभं राहिलं. आमच्या पिढीला हे द्वंद्व खूप आकर्षक वाटलं. जेपींच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आमच्यासारख्या अनेकांनी विनोबांना प्रश्न केला की, तुम्ही आमच्या बाजूचे की तिकडचे? तेव्हा आमची मनोवृत्ती ही जॉर्ज बुश सारखी होती. ‘दोज हु आर नॉट विथ अस, दे मस्ट बी विथ अवर एनिमीज’. म्हणून आम्ही विनोबांना विचारत होतो की, तुम्ही जयप्रकाशवादी की इंदिरावादी? पण यापेक्षाही एक उंच भूमिका असू शकते. ती म्हणते, दोघंही माझेच.
दोघांचे मतभेद आहेत, जयप्रकाश आणि इंदिरा यांच्या भूमिका वेगळ्या आहेत, म्हणून काय मी एकाला परका मानू, टाकून देऊ? हे असं झालं- एखाद्या आईच्या दोन मुलांत मतभेद झाले आणि आईला विचारत आहेत की, तू कोणाच्या बाजूला? आई काय उत्तर देणार? आम्हाला तो प्रश्न पडला नाही, कारण आम्हाला मातृहृदय नव्हतं. आम्हाला साम्यदृष्टी नव्हती. जो आम्हाला पटला, त्या पक्षात आम्ही पटकन् उभे राहिलो. पण ज्याला साम्यदृष्टी आहे, जो अधिक उंच पातळीवर उभा आहे. मातृहृदयाने तो दोघांनाही म्हणतोय की तुम्ही माझेच. तो म्हणेल, मी केवळ एका पक्षाच्या बाजूने उभा नाही. त्यांच्यात आपसी संघर्ष हा माझा मार्ग नाही. हा प्रश्न मी अहिंसा आणि प्रेमाने सोडविणार. प्रतिपक्ष न कल्पिता मी सत्य शोधणार. अन्यायाशी लढल्याने निरगाठ पक्की होते. विनोबांचं हे वेगळंच लॉजिक आहे.
त्यांच्या ‘मधुकर’ पुस्तकात ‘जशास तसे’ नावाचा एक निबंध आहे. तो आम्हाला शाळेत अभ्यासाला होता. विनोबा त्यात सांगतात, तलवारीने तलवारीशी युद्ध करता येत नाही. आपण तलवार कधी खेळलो नाही, त्यामुळे आपण ‘तलवारीला तलवारीने उत्तर’ असा शब्दप्रयोग वापरतो. जे खरंच तलवार खेळले त्यांना माहीत आहे की, तलवारीला उत्तर ढालीने देतात. आगीचं उत्तर आगीने आपण कधी देतो का? आगीचं उत्तर आपण पाण्याने देतो. त्याच प्रकारे क्रोधाचं आणि द्वेषाचं उत्तर आपल्याला प्रेमानेच देता येतं. क्रोधाने क्रोध वाढतो. उत्तर कुठे मिळतं? म्हणून ‘जशास जसे’ नाही, ‘जशास तसे’! त्याच न्यायाने अन्यायीला शत्रू कल्पून त्याच्याशी लढल्यास निरगाठ पक्की होणार. प्रश्न सुटणार नाही. लढून जिंकण्याचा विखारी आनंद त्यातून कदाचित मिळेल. ‘इंदिरा चुकली असेल, भ्रमित झाली असेल; पण तिला मी शत्रू मानणार नाही. तिला मी परकी कल्पणार नाही.’ विनोबांची ही भूमिका संधिसाधूपणा नव्हती. हा साधूपणा होता. हे विनोबांचं साधुत्व होतं. अतिशय उच्च पातळीवरील आध्यात्मिक आणि विशाल मनाची ती भूमिका होती. आम्हाला समजली नाही. त्यांच्या हेतूवरच आरोप झाले. विनोबा शासनमुक्त होते. पण आम्ही असे समजलो की, ते सरकारधार्जिणे आहेत. आम्ही असं समजलो की ते इंदिरा गांधींच्या बाजूने आहेत. त्यांची ती अहिंसा होती, समदृष्टी होती, परम साम्य होतं. आमचे डोळे क्रोधाने लाल झाले होते.
आता चाळीस वर्षांनंतर मी या घटनेकडे मागे वळून बघतो तेव्हा हे लक्षात येतं की- तेव्हा जयप्रकाश हे लोकशक्ती जागृत करून भ्रष्टाचार व लोकशाही प्रस्थापित करण्याचा प्रश्न सोडवू पाहत होते, तर विनोबा आत्मशक्तीच्या प्रभावाने हा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करीत होते. या दोन भूमिका विरोधी आहेत, असं आम्ही कल्पिलं. वस्तुतः त्या विरोधी नव्हत्या, पूरक होत्या. लोकशक्ती विरुद्ध आत्मशक्ती अशी स्थिती नव्हती, तर लोकशक्ती आणि आत्मशक्ती अशी स्थिती होती. पण त्यांची भूमिका आमच्या छोट्या बुद्धीला समजली नाही. द्वंद्व आमच्या मनात होतं, आम्हाला तसंच दिसलं. आम्ही म्हटलं, एक तर त्या बाजूला उभे राहा किंवा त्या बाजूला. विनोबा अहिंसक आणि लोकशाहीवादी होते. संघर्षाचा मार्ग हा आदर्श सत्याग्रह नाही अशी त्यांची तात्त्विक भूमिका होती. पण तरी विवेकाने निर्णय घेण्याचं ‘स्वातंत्र्य’ म्हणून विनोबांनी आपल्या अनुयायांना ‘कुठलीही हिंसा करणार नाही’ या अटीवर जयप्रकाशांच्या सत्याग्रहात सामील होण्याची अनुमती दिली. पण त्याच वेळी त्यांनी इंदिरा गांधींशी संवाद सुरू ठेवला.
आणीबाणी पर्व
विनोबा संत होते आणि आम्ही त्यांच्याकडून राजकीय भूमिका मागत होतो- तुम्ही इंदिरेचा धिक्कार करा. पण या संघर्षातून जेव्हा आणीबाणीची हुकूमशाही आली, तेव्हा मात्र आम्ही आमच्या घरात किंवा विद्यापीठात लपलो. आपण घेतलेल्या संघर्षाच्या मार्गाचे जे काही अवांछित आणि अटळ दुष्परिणाम होते, ते स्वीकारण्याचं शौर्य आम्ही दाखविलं नाही. आणि लहान मुलासारखी आम्ही विनोबांकडून मागणी करायला लागलो की- विनोबा, आता आणीबाणीवर तुम्ही काही तरी उपाय करा. यातून मार्ग काढा. आता तुम्हीच प्रश्न सोडवा. एवढंच नाही, तर हा प्रश्न आम्हाला जी पद्धत हवी आहे त्या पद्धतीने सोडवा. आंदोलन करा, सत्याग्रह करा, इंदिराचा विरोध करा आणि तुरुंगात जा; तरच ‘तुम्ही खरे सत्याग्रही’.
आमच्या छोट्या व्याख्या, आमचे छोटे आग्रह! प्रश्न आम्ही निर्माण केले. विनोबा आम्हाला वारंवार सांगत होते की, सत्याग्रहाने प्रश्न सोडविण्याची ही जागा नाही. सत्याग्रह मलाही समजतो. देशात शत्रुत्व निर्माण न करता अहिंसक मार्गाने हा प्रश्न सोडविला पाहिजे, असं त्यांना वाटत होतं. खरं म्हणजे You can not solve a problem by the same level of intellect, which created the problem in the first place असं एक सर्वमान्य सूत्र आहे. द्वैत आणि शत्रुत्व कल्पिण्याच्या दोन्ही बाजूंच्या ज्या वृत्तीने शेवटी आणीबाणीची हुकूमशाही आली, ती त्याच पद्धतीने सोडवा- ही आमची बालिश मागणी होती. विनोबांनी त्याला आपल्या सौम्य सत्याग्रहाच्या पद्धतीने हाताळलं. पण आम्ही त्यांना ‘सरकारी संत’ म्हणून जाहीर करून टाकलं. खरं म्हणजे परिस्थितीनुसार पक्ष बदलणारे आम्ही. आम्ही म्हणजे महाराष्ट्रातले बुद्धिवंत. पण जे तत्त्वनिष्ठ आणि समदृष्टीने अचल राहिले, त्या विनोबांना मात्र आम्ही संधिसाधू आणि पळपुटे म्हटलं.
साहित्य संमेलनासाठी 25 लाखांची भीक मागत आम्ही शासनाच्या मागे फिरतो व स्वतःला साहित्यिक म्हणवतो आणि ज्या विनोबांनी आयुष्यात शासनाचा एक पैसा घेतला नाही, बारा-बारा तास मजुरासारखे श्रम करून आपली रोटी कमविली, ते विनोबा सरकारधार्जिणे! आणीबाणी विरुद्ध यदुनाथ थत्तेंची साधना आणि दुर्गा भागवत ही दोन उज्ज्वल उदाहरणे सोडली, तर कोणीही आवाज उठविला नाही. सर्व बुद्धिवादी सोईस्कररीत्या भीतीने चूप होते.
विनोबांनी आणीबाणीचा निषेध म्हणून मौनाचा सत्याग्रह सुरू केला. पण आम्हाला अपेक्षा होती की, विनोबांनी ‘मुर्दाबाद’ अशी घोषणा द्यावी. विनोबांनी खरं तर मौन धारण करून सूक्ष्म सत्याग्रहाचा संदेश दिला. ते एका आईचं मौन होतं. आईने अबोला धरला तर किती परिणाम होतो, हे आपल्याला माहीत आहे. पण विनोबांचा हा सूक्ष्म सत्याग्रह आम्हाला समजलाच नाही. त्यामुळे आम्ही विनोबांना ‘मौनीबाबा’ म्हणून हिणवलं. खरं म्हणजे विनोबांनी जेव्हा मौन सोडलं आणि त्यांच्या मैत्री या मुखपत्रात आणीबाणीवर टीकात्मक प्रकाशित झालं, तेव्हा ते मुखपत्रच शासनाने जप्त केलं. विनोबा आणीबाणीविरोधात आपल्या मौन भाषेत बोलले. पण सरकारी संत हा आम्ही त्यांच्यावर ठपका ठेवला.
एस.एम.जोशींसारखे संत राजकारणी रात्री 12 वाजता महाराष्ट्रातल्या एका थोर बुद्धिवंत प्राध्यापकाच्या घरी निवासासाठी पोचले. पण एस.एम. आले, आणीबाणीमध्ये आले, हे झेंगट घरात कशाला म्हणून रात्री बारा वाजता घराचं दार बंद करून एस.एम.ना अंधारात लोटणारे ते प्राध्यापक मात्र महाराष्ट्रातले बुद्धिवंत! यात एक गोष्ट मी अधोरेखित करतो की, या सगळ्या वादात मीदेखील विनोबा विरोधी होतो.
दोन संतांचा प्रयत्न
इंदिरा गांधींमध्ये हुकूमशाही वृत्ती होतीच. पण त्या चवताळलेल्या वाघिणीला लाल झेंडी दाखवून आणखी आक्रमक करणं निरर्थक होतं. म्हणून भारतातील दोन संत महापुरुषांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. एक विनोबा आणि दुसरे जे.कृष्णमूर्ती. श्रीमती पुपुल जयकर या जे.कृष्णमूर्ती यांच्या खूप जवळच्या होत्या आणि त्या इंदिरा गांधींच्या बालमैत्रीण होत्या. पुपुल जयकर यांनी इंदिरा गांधींचं अतिशय सुंदर चरित्र लिहिलं आहे. त्यामध्ये त्या वर्णन करतात : आणीबाणीच्या काळात इंदिरा गांधी मानसिक दृष्ट्या एकट्या व असुरक्षित झाल्या आहेत. जे.कृष्णमूर्ती इंदिरा गांधींशी वारंवार संपर्क, संवाद करत आहेत. निरोप पाठवत आहेत. तसंच इंदिरा गांधीदेखील विनोबांना भेटायला यायच्या किंवा विनोबादेखील त्यांना निरोप पाठवायचे.
त्या दोघांनी जाहीर टीका करून तिला आणखी असुरक्षित करण्याचा धोका घेतला नाही. तिला समजावलं, अश्वस्त केलं. अत्याचारीलादेखील आपलं म्हणायला जास्त मोठं शौर्य लागतं. जो अत्याचारी आहे, त्याचा निषेध करणं तुलनात्मक दृष्ट्या सोपं आहे. तुम्ही आणि मी तेच करतो. (किंवा तेवढंदेखील धैर्य दाखवत नाही.) पण ‘ही अत्याचारी व्यक्ती चुकली आहे, पण ती माझीच आहे,’ असं म्हणून तिला आपलं म्हणून उचलायला मोठं धैर्य लागतं. निंदा-नालस्ती स्वीकार करायची तयारी लागते. हे धैर्य या दोन संतांमध्ये होतं. या दोघांनी तिच्या अंतरात्म्याला आवाहन केलं. ‘निवडणुका लवकरात लवकर घे, सर्व राजबंद्यांना सोड, लोकशाही हक्क पुन्हा प्रस्थापित कर’; हे तिला वारंवार समजावलं. इतर अनेक कारणांसोबतच या दोघांचाही परिणाम इंदिरा गांधींवर झाला. त्यांनी निवडणुका घेतल्या आणि त्या पराभूत झाल्या. हे सर्वांना माहीत आहे.
पराभूत झालेल्या इंदिरा गांधींची प्रतिक्रिया पुपुल जयकर यांनी नोंदविली आहे. मार्च 1977. पुपुल त्यांना भेटायला गेल्या. इंदिरा गांधी हरलेल्या होत्या. घरी एकट्या बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, ‘पुपुल, आय एम रिलीव्ह.’ मी मोकळी झाले. रागावलेल्या नव्हत्या. चिडलेल्याही नव्हत्या. जणू त्या म्हणाल्या, माझं चुकलंच होतं. माझ्या चुकांच्या पिंजऱ्यात मीच कैद झाले होते. वाघावर स्वार झाले होते मी, पण उतरायचं कसं माहीत नव्हतं. आज मी त्या चुकीच्या भूमिकेतून खाली उतरले. त्या जाहीरपणे कदाचित हे कबूल करणार नाहीत, पण आय ॲम रिलीव्हड म्हणाल्या. आम्ही मात्र स्वतः कमावलेला नव्हता त्या विजयाचा जल्लोष केला. आणि विनोबांना कॉम्प्रोमाईझ सेंट, अधःपतित संत असं जाहीर केलं. पण निळकंठाने जसं गळ्यात विष धारण केलं, तशी आमची टीकाही या बैराग्याने शांतपणे धारण केली.
आज मी हे सगळं पश्चात्तापदग्ध होऊन बोलतोय. कारण त्या वेळी विनोबांवर टीका करण्यात अख्ख्या महाराष्ट्रासोबत मीदेखील सामील होतो. 1976 मध्ये आणीबाणी सुरू असताना विनोबांच्या पवनार आश्रमामध्ये सर्व सेवा संघाचं संमेलन झालं. जयप्रकाशांसह प्रमुख नेते तुरुंगात होते. माझे आई- वडीलही तुरुंगात होते. आणीबाणीवर काय उपाय काढता येईल, यावर या संमेलनात चर्चा सुरू होती. तेव्हा मी आणि माझा मोठा भाऊ अशोक आम्ही दोघांनी भर संमेलनात विनोबांच्या कुटीसमोर विनोबांचा निषेध केला. हातामध्ये फलक धरले, ‘सगळे तुरुंगात असताना विनोबा आणि सर्व सेवा संघ मौन का आहेत? तुम्ही निषेध करा.’ विनोबांनी आमच्याकडे हसून दुर्लक्ष केलं. त्यांचं हृदय मोठं होतं. आणीबाणी सुरूच होती.
दरम्यान, मी राणीसोबत लग्न करायचं ठरवलं. तुरुंगात नेऊन राणीची आई-वडिलांशी भेट घालून दिली आणि नंतर सर्वप्रथम मी राणीला विनोबांकडे घेऊन गेलो. कितीही राग असला तरी आई- वडिलांच्या खालोखाल मला दुसरी संमती विनोबांची हवी होती. म्हणालो, ‘विनोबा, ही राणी आहे आणि आम्ही दोघं लग्न करतोय. तुमचा आशीर्वाद हवा.’ त्या वेळी विनोबा म्हणाले, ‘अरे, रामदास जेव्हा बोहल्यावर चढत होते तेव्हा काय म्हटलं, तुला माहीत आहे का? सावधान!’ मला सावधान म्हणून त्यांनी हसून टाळी वाजविली. राणीला ते आवडलं नाही. लग्नासाठी आशीर्वाद देण्याऐवजी म्हणतात- सावधान! आता असं वाटतं की, वस्तुतः ते मला नव्हे तर राणीला सावधान करीत असावेत; कारण ते मला बऱ्यापैकी ओळखत होते.
विनोबाजी समजून घ्यायचे असतील तर हा लेख वाचला पाहिजे. आज या लेखाने मनातल्या अनेक शंका दूर झाल्या. अनेक प्रश्नांची उत्तरे मिळाली. धन्यवाद.
खरोखर,आजचा हा रामप्रहर अभय बंग यांच्या या लेखाने मनाला एक सात्विक समाधान लाभले.विनोबा मी ही लेखक म्हणून वाचत आलो आहे.या लेखात अभय बंग यांनी विनोबांच्या विचार व्यक्तित्वाचा जो शोध घेतला आहे,तो खूप अंतर्मुख करणारा आणि माझ्या पिढीच्या भूमिकांची नव्याने चिकित्सा करण्याची गरज अधोरेखित करणारा आहे… अविनाश दुधे,खूप आभार तुमचे.
अभय आभार मित्रा. पुणे- दि.१२/९/२०२०.