स्त्री-जन्माचे भोग संपणार कधी ?

स्त्रियांचे भोग संपत नाहीत कारण ज्यांच्यावर अत्याचार होतो आहे त्या स्त्रिया संघटीत होवून लढायला सोडा बोलायला देखील तयार नाहीत, आणि दुसरे म्हणजे मानव निर्मित कायद्या पेक्षा मनुस्मृती सारख्या ग्रंथात सांगितलेल्या “ईश्वर निर्मित ” कायद्याचा जनमनावर जास्त प्रभाव आणि पकड आहे.
—————————————————————

गेल्या पंधरवाड्यात स्त्री प्रश्नावर दु:खदायी घडामोडी घडूनही त्याची व्हावी तशी चर्चा झाली नाही.उपाय योजनाimages तर दूरची गोष्ट. याचा बहुतांशी दोष स्त्रीयाकडेच जातो. कितीही संतापजनक घटना त्यांच्या बाबतीत घडली तरी त्या स्थितप्रद्न्य असतात.बालकासाठी आवश्यक घुट्टी एखादेवेळी पाजली जाणार नाही पण स्त्रियांनी कसे सोशिक राहिले पाहिजे याचे बाळकडू मात्र न चुकता न विसरता प्रत्येक कुटुंबात पाजले जाते. परिणामी कितीही अन्याय , अत्याचार तिच्यावर होवू द्या तिच्याकडून हुं की चू होणार नाही. पुरुषप्रधान समाजासाठी तिची ही सोशिकता फायद्याची असल्याने समाजाकडून तिच्या या सोशिकतेचा गौरव होतो आणि हा गौरव तिला अधिक सहन करण्याची ताकद देतो. याचा अर्थ तिच्यात अन्यायाच्या विरोधात लढण्याची ताकद नाही असा नाही. आपल्या कुटुंबावर – समाजावर अन्याय-अत्याचार होत असेल तर ती वाघिणी सारखी चवताळून लढू शकते. महात्मा गांधीच्या नेतृत्वाखालील स्वातंत्र्य लढ्यात आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील समतेच्या लढ्यात स्त्रीच्या अमर्याद लढाऊपणाचे दर्शन घडले आहे. लढ्यात अव्वल असलेली स्त्री कुटुंबात मात्र दुय्यमच राहात आलेली आहे. कारण या दुय्यमत्वा विरुद्ध लढायची तिची मानसिकताच नसते. त्यामुळे तिच्या प्रश्नावर संसदेत चर्चा झाली , अगदी गदारोळ माजून संसद बंद पडली तरी लक्षात यावी आणि घ्यावी अशी स्त्रियांची प्रतिक्रिया असत नाही.

बाबा रामदेव यांच्या “पुत्रजीवक बीज” या औषधावर संसदेत वादळी चर्चा झाली. त्याही आधीही हे औषध चर्चेचा विषय राहिले आहे. आपल्याकडे मुलगी नव्हे तर मुलगा जन्माला यावा म्हणून देव पाण्यात घालून बसतात . मुलीचा जन्म ओझे आणि नकोसा वाटतो. लोकसंख्येतील स्त्रियांचे घसरते प्रमाण याचा पुरावा आहे. मुली ऐवजी मुलगा व्हावा अशी शाश्वती एखादे औषध देत असेल तर त्या औषधाची तुफानी विक्री होणारच. बाबा रामदेवांच्या पुत्रजीवक औषधा बद्दल हेच घडले. संसदेत चर्चा झाल्या नंतर रामदेवबाबाने खुलासा केला कि हे औषध मुलगा होण्यासाठी नसून मुलगा किंवा मुलगी असे कोणतेही अपत्य जन्माला यावे यासाठी आहे. झालेल्या गदारोळा नंतर यापेक्षा वेगळा खुलासा येणे शक्यच नव्हते. बाबांनी खुलासा खरा मनाला तरी हे औषध मुलगा व्हावा यासाठीच घेतले जाते हे वास्तव बदलत नाही. मुलगाच व्हावा यासाठी ते औषध नसेलही, पण मुलगाच हवा ही आमची मानसिकता लक्षात घेवून बाबाने त्या औषधाचे नांव तसे ठेवले आणि त्या पद्धतीने प्रचार करून लोकांना फसवून आपला धंदा वाढविला या आरोपातून बाबांची सुटका होत नाही. संसदेत या औषधाची तपासणी करण्याचे केंद्रसरकारचे आश्वासन आणि बाबा रामदेवच्या खुलाशा नंतरही मध्यप्रदेश सरकारने या औषधाच्या विक्रीवर प्रतिबंध घातला आहे यावरून हे औषध कशासाठी घेतले जात होते हे स्पष्ट होते. बाबांनी आपल्या खुलाशात जो राजकीय कांगावा केला आहे त्यावरून पाणी कुठेतरी मुरतेय असा संशय येणे स्वाभाविक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना बदनाम करण्यासाठी या औषधाची चर्चा केली जात आहे असे बाबांनी म्हंटले आहे. संसदेत किंवा संसदे बाहेरील चर्चेत कोणीही दुरान्वयानेही या औषध निर्मितीशी पंतप्रधानांचा संबंध जोडला नव्हता. उलट बाबांच्या खुलाशाने तो जोडला गेला किंबहुना तसा जोडणे बाबांना आवश्यक वाटले. असे वाटण्याचे कारण उघड आहे. केंद्र सरकार या औषधाची तपासणी आणि औषध विक्रीची चौकशी करणार असल्याने ती चौकशी प्रभावित करण्यासाठीच बाबाने पंतप्रधान मोदींना या वादात ओढले असाच निष्कर्ष निघतो. केंद्रसरकारच्या तपासणीची वाट न पाहताच भारतीय जनता पक्षाचे शासन असलेल्या मध्यप्रदेशात या औषधावर बंदी आली आहे हे लक्षात घेतले तर मोदींना बदनाम करण्यासाठी या औषधाची चर्चा होतेय हा बचाव गळून पडतो. मूळ मुद्दा असा आहे कि मुलगी नको , मुलगा व्हावा म्हणून घ्यावयाचे हे औषध स्त्रियांनी घ्यायचे आहे आणि तसे ते मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. याचा अर्थ स्त्रियांना देखील मुली जन्माला यायला नको आहेत. कुटुंबाच्या दबावाखाली त्या वागत असतील हे शक्य आहे. आपल्या वाट्याला जे भोग आलेत ते आपण जन्माला घातलेल्या मुलीच्या वाट्याला येवू नयेत म्हणून मुलगी नकोच अशीही तिची भावना असू शकते. तरीही हे तर मान्यच करावे लागेल कि स्त्री जन्मासाठी प्रतिकूल परिस्थिती विरुद्ध तिचे मन बंड करून उठत नाही.

मोदी सरकार सत्तेत आल्यापासून हिंदू स्त्रियांनी अधिक मुलांना जन्माला घालावे अशी चर्चा सतत कानावर आदळत आहे. स्त्रियांनी चूल आणि मुल सांभाळावे अशी भारतीय संस्कृती आहे असे अनेकवेळा सांगणारे रा. स्व. संघप्रमुख भागवत यांनी देखील अशी चर्चा करणाऱ्यांना फटकारले. स्त्री म्हणजे मुले जन्माला घालण्याचा कारखाना नाहीत या शब्दात ते बोलले. पण त्यांना न जुमानता त्यांचे अनुयायी स्त्रियांनी जास्त मुले जन्माला घालावीत असे बोलतच आहे. असे बोलताना त्यानाही मुली जन्माला याव्यात हे अपेक्षितच नाही . कारण असे मुले जन्माला घालायची आहेत ती दुसऱ्या धर्मावर मात करण्यासाठी , दुसऱ्या धर्माविरुद्ध लढण्यासाठी . स्त्री हे काम करू शकणार नाही असेच त्यांचे संस्कार आहेत. स्त्रियांनी मुले जन्माला घालून चुलच सांभाळली पाहिजे हे ते संस्कार आहेत. या संस्काराची वाहक “आई”च राहात आली आहे. असे संस्कार कमी पडून मुलगी जन्माला आली आणि घराबाहेर पडलीच तर तिला कायमचा धडा शिकवायला समाजातील टगे आहेतच. दिल्लीतील निर्भया प्रकरणा नंतर मोठे आंदोलन झाले , कठोर कायदे झालेत. तरी स्त्रियांचे भोग कमी झाले नाहीत. निर्भया प्रकरणी आंदोलनात आघाडीवर असलेले अरविंद केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री झालेत. परवा त्यांच्याच घरासमोर आणखी एका निर्भयाला सामुहिक बलात्कार करून फेकण्यात आले. स्त्रियांची परिस्थिती बदलू पाहणाऱ्या व्यवस्थेलाच हे एकप्रकारचे आव्हान आहे. समाजातील टगेच स्त्रियांचे जीवन नरकमय करतात असे नाही. न्याय आणि समानता निर्माण करण्याची आणि रक्षण करण्याची जबाबदारी असलेले लोकही वेगळ्या पद्धतीने हेच करतात. नवऱ्याकडून बायकोवर होणारी लैंगिक जबरदस्ती कायद्याने गुन्हा ठरविली पाहिजे ही मागणी संसदेतच सरकारने फेटाळून लावली आहे. स्त्रियांची इच्छा असो वा नसो त्या मात्र पुरुषांच्या इच्छापूर्तीचे साधन आहे ही खोलवर रुजलेली मान्यता ही मागणी फेटाळण्या मागे. एकीकडे कुटुंबाला पवित्र संस्था म्हणायचे आणि या पवित्र संस्थेत अत्याचाराला राजमान्यता आणि धर्ममान्यता द्यायची हे ढोंग आहे. कुटुंबातील अत्याचारांना असे संरक्षण तर समाजातील अत्याचारांसाठी स्त्रियांचे कपडे , त्यांचे रात्री-अपरात्री बाहेर पडणे या सारख्या गोष्टी जबाबदार मानल्या जातात ! कायदा आणि शासन या आव्हानापुढे दोन कारणांनी निष्प्रभ ठरत आहे. एक तर ज्यांच्यावर अत्याचार होतो आहे त्या स्त्रिया संघटीत होवून लढायला सोडा बोलायला देखील तयार नाहीत, आणि दुसरे म्हणजे मानव निर्मित कायद्या पेक्षा मनुस्मृती सारख्या ग्रंथात सांगितलेल्या “ईश्वर निर्मित ” कायद्याचा जनमनावर जास्त पकड आणि प्रभाव आहे. असे “ईश्वर निर्मित” कायदे फक्त हिंदू धर्मातच नाहीत तर दुसऱ्याही धर्मातही आहेत. धर्माविरुद्ध एल्गार पुकारण्याची मानसिक आणि संघटीत संख्येची ताकद स्त्रिया उभा करीत नाहीत तो पर्यंत स्त्री जन्माचे भोग संपणार नाहीत.

——————————————————————————————

सुधाकर जाधव , पांढरकवडा , जि. यवतमाळ
मोबाईल – ९४२२१६८१५८
——————————————————————————————-

Previous articleकिती पैसा पुरेसा आहे ?
Next articleमाध्यमोत्सवाच्या मर्यादा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here