किती पैसा पुरेसा आहे ?

संजय सोनवणी
पैसा आणि तणाव याचे निकटचे नाते असल्याचे आपण दैनंदिन व्यवहारात नेहमीच पाहतो.paisa म्हणजे पैसा अपुरा असला तरी तणाव आणि अतिरिक्त झाला तरी त्याचे व्यवस्थापन कसे करायचे याचा तणाव. शिवाय मुळात पैसा किती असला म्हणजे तो पुरेसा असतो याबाबत सर्वच संभ्रमित असतात. त्याची काही ठोस अशी मानसिक व्याख्या नाही. कितीही पैसा आला तरी तो कमीच वातणे हा एक मानवी स्वभाव झाला. हा स्वभाव काही आजचा नाही. वेदांतही म्हटले आहे कि एकपट धन असलेला दुप्पट धनाची तर दुप्पट धन असलेला चौपट धनाची अपेक्षा बाळगतो. सर्वच धर्मग्रंथांत अतिलोभ असू नये, अधिकची हाव धरु नये, वाममार्गाने धन मिळवू नये अशी आज्ञात्मक विधाने असतातच…पण गंमत म्हणजे स्वत: धर्मसंस्थाही अंतत: धन जमा करण्याच्याच मागे लागलेल्या दिसतात. हिंदू मंदिरांतील अचाट संपत्ती असो कि व्ह्यटिकनकडे जगभरातुन वाहता संपत्तीचा प्रचंड ओघ असो. हा ओघ थांबावा असे धर्मसंस्थांनाही वाटत नाही. मग सामान्य माणसाचे काय?

तणावरहित पैसा असू शकतो काय? होय. माझ्या मते तणावरहित पैसा सहज असू शकतो. सहजपणे मिळवता येवू शकतो. समजा हाव असली तरी पैसा तणावरहित असू शकतो.

हे अशक्य वाटेल वरकरणी, पण ते तसे नाहीय.

प्रथम आपण पैशांचा अभाव म्हनजे नेमके काय हे पाहुयात. किती पैसा पुरेसा आहे याचे गणित नाही याचे कारण अनुकरनातुन, नक्कलेतुन, आपण आपल्या जीवनशैलीच्या कल्पना घडवत असतो. म्हणजे हजार रुपयाचे साधे मोबाईल इंस्ट्रुमेंट काल करण्यासाठी व घेण्यासाठी पुरेसे असले तरी कृत्रीम जाहिरातींच्या दबावाखाली हाय-फाय इंस्ट्रुमेंट घेण्याची अकारण इच्छा होते…पण प्रत्यक्षात आपली जीवनशैली सुधारायला त्यचा काहीएक उपयोग नाही हे लक्षात घेतले जात नाही. भारतातील मानसिकतेची एक गम्मत आहे. सर्वप्रथम भारतात मोबाईल आले तेंव्हा त्या कंपन्यांची अपेक्षा होती कि डाक्टर-वकील हे आपले सर्वप्रथम ग्राहक बनतील….झाले उलटेच…ज्यांचे खरे तर मोबाईलशिवाय काही अडु शकत नव्हते असेच मोबाईलमागे धावले. आजची हायस्ट व्हर्जन्स घेणारे उद्योजक नाहीत…तर हे मध्यमवर्गीय आहेत. या हायर व्हर्जन्सनी त्यांची कार्यक्षमता मुळीच वाढलेली नाही…उलट घटलेली आहे. कारण त्या अभिनव सुविधांचा वापर टाईमपाससाठीच अधिक होतो आहे. खरे तर हे एकुणातील राष्ट्रीय संपत्तीचे नुकसान आहे असे माझे स्पष्ट मत आहे.

हे एक उदाहरण झाले. पैशांचा अभाव तेंव्हाच जाणवतो जेंव्हा गरज नसलेल्या गरजांचा हव्यास असतो. उपयुक्ततेपेक्षा स्टेटस सिंबोल म्हणुन एखादी वस्तू घेतली जाते तेंव्हा पैशांचा अभाव जाणवने सहज स्वाभाविक आहे. एका थिकाणावरुन दुस-या ठिकानी व्यवस्थित नेणे हे जर दुचाकी असो कि चारचाकी, वाहनाकडुनची अपेक्षा असेल तर अकारण अमुकच कंपनी—तमुकच मोडेल यांचा हव्यासही तसाच निरर्थक असतो. अमेरिकेची अर्थव्यवस्था गडगडली ती आमदनी चवन्नी खर्चा रुपैया…भारतीय अर्थव्यवस्था आज नाही तर उद्या याच मार्गावर जाणार याचे दुश्चिन्हे आताच दिसत आहेत.

हस्तीमलजी फिरोदिया १९९७ साली माझ्या एका कारखान्याचे भूमीपुजन करायला जेजुरी एम-आय.डी.सी.त आले होते. वाटेत मी त्यांना प्रश्न विचारला होता…” भारतीय उद्योग एवढे वर्षे झाली तरी येथीलच बाजारपेठेत अजून का रेंगाळत आहेत? विदेशात जावे तेथे आपली उत्पादने एस्ट्यब्लिश करावीत असे का होत नाही?” हस्तीमलजी यावर म्हनाले होते, ज्यांना हाव आहे त्यांनी ते करावे. तसेही जागतिकीकरण आलेलेच आहे. पण गांधीजींच्या तत्वज्ञानाचा आमच्या परिवारावर पगडा आहे. कोठे थांबायचे हे आम्हाला चांगलेच माहित आहे. उद्योगाचा विस्तार किती मोठा असावा याचे भान नसले तर एक दिवस असे उद्योग स्वत:च्याच ओझ्याखाली चिरडुन जातात.”

तेंव्हा मी फारच महत्वाकांक्षी होतो. पार अमेरिकेत सायटेक आयेन्सी ही कंपनीही स्थापन केली होती…अगदी भारतीय रेस्टारंटसची चेन सुरु करण्याच्याही बेतात होतो…त्यामुळे मला हस्तीमलजी जुनाट मताचे पुराणपंथी वाटले होते हेही खरे आहे. पण आज मागे वळुन पहाता लक्षात येते कि हस्तीमलजींनी एक वैश्विक सत्य सांगितले होते, जे आज सर्वांनाच लागु आहे.

म्हणजे खरे तर पैसा हा तनावाचे कारण असतो हे जेवढे खरे आहे त्यापेक्षा खरे हे आहे कि पैशांची नेमकी गरज आपल्याला कधीही मोजता येत नाही यामुळेच पैसा हा तनावाचे कारण बनतो हे अधिक खरे आहे. पैसा हे कर्तुत्वाचे दृष्य मूल्य आहे असे आयन -यंड त्यांच्या कादंब-यांतुन मांडत आल्या आहेत. खरे तर माझ्या पिढीचे असंख्य उद्योजक ते वित्तसल्लागार तिच्या तत्वज्ञानाच्या प्रभावाखाली होते. टोकाचा भांडवलवाद हे तिच्या तत्वज्ञानाचे मुलभूत वैशिष्ट्य. रशियासारख्या तत्कालीन साम्यवादी विचारव्युहातुन बाहेर पडतांना कदाचित ही अतिरेकी विचारसरणी जन्माला आलेली असावी. आपल्या मानसिकतेने गांधीवादी (किंवा समाजवादी म्हणा) विचारांतुन बाहेर पडण्यासाठी ही विचारसरणी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वीकारली हेही एक वास्तव आहे. पण त्यातील “कर्तुत्व” हा भाग सोयिस्कररित्या विसरला गेला. पैसा हवा हे खरे, पण त्याची मर्यादा कर्तुत्वसापेक्ष राहिली नाही. सर्जनशील कर्तुत्व नसलेले सोमेगोमेही अब्जाधीश होवू लागले. इतके कि कर्तुत्ववानांनाही न्यूनगंड चढावा. लोकांचे बळी गेले तरी चालतील, पण पैसा हवा या हव्यासाने आपण अनेक गंभीर सामाजिक सुरक्षितताच संकटात आणुन ठेवल्या आहेत.

कसा असतो तणावरहित पैसा? काय मापदंड आहेत तणावरहित पैशाचे?

भविष्यातील असुरक्षितता हे गरजेपेक्षा अधिक पैसा मिळवण्याचे व संचय करण्याचे एक कारण मानले जाते. त्यात तथ्यही आहे. पण किती? याचा कहीक मापदंड नसतो हेही तेवढेच खरे आहे. मुळात सुनिश्चित असे भवितव्य कशाचेच…अगदी पैशांचेही नसते. कालच्या रुपयाची किंमत पुढच्या दिवशी काय असेल याचे निश्चित भकित करता येत नाही. डा. दत्तप्रसाद दाभोळकरांनी “ना डावं ना उजवं” या पुस्तकतील रशियावरील “लाल ता-याकडुन धुक्याकडॆ” या वाचायलाच हवा अशा रशियावरील लेखात यावर अप्रतिम भाष्य केलेलं आहे. एके काळचा बलाढ्य रशिया रुबल घसरल्यावर कोणत्या दयनीय स्थितीत येतो? अलीकडेच ग्रीसचे काय झाले? चार-पाच वर्षांपुर्वी अमेरिकेची अवस्था काय होती? गुंतवणुकींचे मोल एकाएकी शुण्य कसे होवून जाते? जर पैशाचेच भवितव्य स्थिर नसेल तर मग भावी आयुष्यातील असुरक्षिततेला पैसा कितपत कामाला येवू शकतो? भावी पिढ्यांसाठी कमवायचे असा “दूरदृष्टीचा” विचार करतात त्यांची तर मला कीवच वाटते. एक तर त्यांचा आपल्या भावी पिढ्यांवर मुळात विश्वासच नसतो अथवा पुढील पिढ्या ऐदी बनाव्यात असाच त्यांचा सुविचार असतो.

म्हणजे गुंतवणुक-बचत महत्वाची नाही असे नाही. परंतु ती करण्यासाठी कमवायचे किती? कसे? यावर विचार करणे तेवढेच आवश्यक आहे. पैसे अधिकाधिक कमवण्यासाठी आपल्या व्यक्तिमत्वातील काय काय आणि किती गमवायचे याचाही विचार करावा लागतो. आपण जो पैसा कमावतो आहोत तो आपल्या योग्यतेच्या प्रमानात आहे कि अधिकचा याचाही निरपेक्षपणे विचार करावा लागतो. पैसा खर्च करतांनाही आपण ज्यामुळे अडत नाही अशा निरर्थक पण स्टेटस देणा-या गोष्टींवर तर खर्च करत नाही ना हेही पहावे लागते.

पैसा कमी असो कि अधिक, तो त्रासदायक, तणावदायक तेंव्हाच ठरतो जेंव्हा पैसा कमवण्यामागील उद्देश निकोप नसतो. मनुष्य हा मुळात निसर्गत: कोणत्याही परिस्थितीशी जुळवुन घेवू शकेल एवढा लवचिक बनवला गेला आहे. परिस्थिती हवी तशी बनवुन घेण्याचेही निसर्गदत्त सामर्थ्य त्याला लाभलेले आहे. दुस-यापेक्षा मोठा व्हायची स्पर्धात्मकता त्याला अनेकदा अडचणीत आणते. स्वत:च्या ताटात काय वाढलेले आहे यापेक्षा दुस-याच्याच ताटात डोकावुन बघत असूयाग्रस्त होण्याचा त्याचा स्वभाव आहे. जग स्पर्धात्मक आहे असा आपला भ्रम आहे. ते खरे नाही. जग स्पर्धात्मक असेल तर ते आपण कृत्रीमरित्या तसे बनवले आहे. प्रत्येक व्यक्ति ही स्वतंत्र नैसर्गिक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असते. स्पर्धा असलीच तर फक्त स्वत:शी असते. अन्यथा बाह्य स्पर्धा कृत्रीम व एवतेव त्याज्ज्य आहेत. स्पर्धा माणसाला अनैसर्गिक बनवते. आणि म्हणुणच ती तणावाचे मुळ कारण असते. कोण मागे आहे कोण पुढे या सा-या सापेक्ष बाबी आहेत हे आपण लक्षात घेत नाही…म्हणुणच आपण तणावरहित पैसा मिळवुही शकत नाही.

पैसा तणावरहित असू शकतो…नव्हे त्याचे तणावरहित असने हेच त्याचे असण्याचे खरे लक्षण आहे. अर्थाचा पुरुष नव्हे तर पुरुषाचा अर्थ दास असतो. पैशाला दास बनवत सुखी जीवन जगायचे कि पैशाचा दास बनुन तणावसहितचे जीवन जगायचे…निवड आपल्या हातात आहे!
संजय सोनवणी
(लेखक नामवंत संशोधक आणि विचारवंत आहेत)
9860991205

Previous article‘मी माझा’- स्मरण एका गारूडाचे !
Next articleस्त्री-जन्माचे भोग संपणार कधी ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.