‘मी माझा’- स्मरण एका गारूडाचे !

शेखर पाटील mee_maza
‘आयकॉनिक’ या एका शब्दात वर्णन करता येईल अशा कवि चंद्रशेखर गोखले अर्थात तुमच्या-आमच्या आवडीचे ‘चंगो’ यांच्या ‘मी माझा’ या प्रचंड गाजलेल्या चारोळी संग्रहास नुकतीच २५ वर्षे झालीत. या कालखंडातील तरूणाईच्या कोमल भावनांना अभिव्यक्त करण्याची मोठी कामगिरी त्यांनी बजावली आहे. या अनुषंगाने आज पाव शतकाच्या कालखंडानंतर ‘चंगो’, त्यांचे सृजन, यानंतर मराठीत चारोळ्यांचे आलेले उदंड पीक आणि याचा साहित्यावरील परिणाम आदींचा घेतलेला हा धांडोळा.

प्रत्येक पिढीचे आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी माध्यम असते. पॉप कल्चरमध्ये चित्रपट व त्यातील संगीत हेच काम करते. याचसोबत साहित्यातूनही या भावना व्यक्त होतात. यापैकी चारोळ्यांचा विचार करता नव्वदच्या दशकाच्या प्रारंभीपासून ते थेट आजवर तरूणाईच्या भावनांची गुंंफण करणार्‍या चारोळ्या या फक्त आणि फक्त चंद्रशेखर गोखले यांनीच लिहल्या हे नाकारता येणार नाही. ‘चंगो’ यांचे हे यश अन्य चारोळीकारांना प्रेरणादायक ठरले. मात्र मराठी चारोळी आशयाने पुढे सरकली नाही. चारोळी हा प्रकार खरे तर रूबाई या प्रारूपाचे मराठीकरण होय. माधव ज्युलियन यांनी हा प्रकार आपल्या भाषेत आणला. विख्यात सूफी कवि ओमर खय्याम यांचे काव्यही मराठीत आले. याचे अनुकरण करणार्‍या चारोळ्यादेखील दाखल झाल्या. अर्थात मराठीत सर्वाधीक खपाचा कवितासंग्रह बनण्यासारखे ‘मी माझा’मध्ये असे काय होते? याचे नेमके उत्तर देता येणार नाही. मात्र यातील तरलता, भावसंपन्नता, चपखल शब्द व याचे आकर्षक स्वरूप तरूणाईच्या हृदयाला स्पर्श करणारे ठरले. अगदी मुखपृष्ठावरीलच

पुसणार कुणी असेल तर
डोळे भरून यायला अर्थ आहे
कुणाचे डोळे भरून येणार नसतील तर
मरण सुध्दा व्यर्थ आहे.

ही चारोळी प्रत्येकाला झपाटून टाकणारी ठरली. यानंतर…

नेहमीच डोक्याने विचार करू नये
कधी भावनांनाही वाव द्यावा
आसुसलेल्या डोळ्यांना
स्वप्नांचा गाव द्यावा ।

आणि या स्वप्नाच्या गावात प्रेमाची अनेक विलोभनीय प्रकार ‘चंगों’नी दाखविले.

मिठी या शब्दात
केवढी मिठास आहे
नुसतं उच्चारलं तरी
कृतीचा भास आहे।

असा गोडवा ‘मी माझा’च्या पानापानावर ओसंडलेला आढळून येतो.

आठवतय तुला आपलं
एका छत्रीतून जाणं
ओंघळणारे थेंब आपण
निथळताना पहाणं

अशा प्रकारचा आधीच्याच पिढीतला राज-नर्गिस यांनी अजरामर केलेला रोमान्सही त्याच्या शब्दातून येतो. याचप्रकारे तरल प्रेमभावना या काव्य संग्रहात व्यक्त झाल्या आहेत. मात्र यात फक्त प्रेम कविताच नव्हेत. या चारोळ्यांमधून खुद्द ‘चंगो’ ही आपल्याला भेटतो. मग तो म्हणतो…

मी आहेच असा
एकटा एकटा राहणारा
वाळक पान सुध्दा गळताना
तन्मयतेने पाहणारा

असो की,

मी मनसोक्त रडून घेतो
घरात कुणी नसल्यावर
मग सहज हसायला जमतं
चारचौघात बसल्यावर

यातून चंगो हा विलक्षण संवेदनशील माणूस आपल्याला उलगडत जातो. ‘मी माझा’ मध्ये बहुतांश प्रेमावर आधारित काव्य आहे. अल्प प्रमाणात यात सामाजिक प्रश्‍नांवर भाष्य केले आहे.

प्रत्येक गावाबाहेर
छोटा महारवाडा आहे
चवथिच्या पुस्तकात मात्र
समानतेचा धडा आहे।

अर्थात हा अपवाद वगळता त्यांच्या चारोळ्यांमध्ये समाजभान जवळपास दिसून येत नाही. व्यावहारिक जगात आपण अयशस्वी होतो असे अनेकदा चंद्रशेखर गोखले यांनी सांगितले आहे. या पार्श्‍वभुमीवर ते सहजपणे नमुद करतात…

येथे वेडे असण्याचे
खूप फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत

या प्रकारच्या जगावेगळ्या वेडातूनच चंगोंच्या चारोळ्या आकारास आल्या आहेत. यात समाज हा एखाद्या संवेदनशील माणसाच्या विरूध्द कसा आहे असा आशय असणार्‍या अनेक चारोळ्यांचाही समावेश आहे. या सर्व बाबींचा विचार केला असता स्वप्नाळू वयाला भावणारे सारे काही ‘मी माझा’ मध्ये होते. मात्र हा फॉर्म्युला अपेक्षेपेक्षा जास्त लोकप्रिय होण्यासाठी आपल्याला तत्कालीन समाजात होत असणार्‍या बदलांचा प्रवाह समजून घ्यावा लागेल.

नव्वदच्या दशकाच्या प्रारंभी भारतात आर्थिक उदारीकरण सुरू झाले. अजस्त्र बहुराष्ट्रीय कंपन्यांना दरवाजे खुले झाले. पाठोपाठ आयटी क्रांती येऊ लागली. तरूणाईच्या स्वप्नाला नवीन पंख फुटले. क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर, सिनेमामध्ये खान मंडळी आदी नायकांचा उदय झाला. आधीच्या ‘अँग्री यंग मॅन’ टाईप संघर्षशील पिढीच्या तुलनेत या पातीला प्रगतीच्या अधिक संधी होत्या. समाजात सुबत्ता अन् सुखासीनताही आली. याचे प्रतिबिंब कला, साहित्य, चित्रपट आदींमध्ये उमटणार हे निश्‍चित होते. याच कालखंडात चंगो उदयास आला हा योगायोग मुळीच मानता येणार नाही. खरं तर मराठी साहित्यात समुहांना आकर्षित करणारे साहित्य आधीपासून होतेच. मग ‘मी माझा’ला विक्रमी यश मिळाले कारण तो योग्य कालखंडात जगासमोर आला.

एक तर पारंपरिक कवितासंग्रहांपेक्षा ‘मी माझा’ हा संग्रह अगदी खिशात मावेल अशा साईजचा आणि अर्थातच सर्वसामान्यांना परवडेल अशा मुल्यात सादर करण्यात आला होता. याचा फायदा असा झाला की, कुणीही अक्षरश: खिशात याला वागवून हव्या त्या वेळेस वाचू शकत होता. याच्या मुखपृष्ठावर कृष्णधवल प्रकारात चंगोचा अत्यंत देखणा चेहरादेखील याच्या लोकप्रियतेत भर टाकणारा ठरला. अक्षरश: हजारो तरूणी त्या काळात चंगोंच्या प्रेमात पडल्या होत्या. यातून त्यांना काही प्रमाणात त्रासही झाला होता. आधीच म्हटल्याप्रमाणे हा काळ उदारीकरण सुरू झाल्यानंतरचा असला तरी अद्याप सोशल मीडियाचे आगमन झाले नव्हते. यामुळे तरूणाईच्या प्रेमभावांना अभिव्यक्तीसाठी सुलभ काव्यरसानेयुक्त प्रेमपत्रांचाच सहारा होता. आणि त्या काळातील लक्षावधी प्रेमपत्रांमध्ये अर्थातच ‘मी माझा’तील तमाम चारोळ्या ओसंडून वाहत होत्या. (अनेकांनी त्या आपल्या नावावर खपवल्या हा भाग वेगळाच!) बहुतांश मराठी पुस्तकांप्रमाणे ‘मी माझा’च्या विक्रीची अधिकृत आकडेवारी समोर आली नसली तरी अनेकांच्या मते हा मराठीतला सर्वाधीक खपाचा कविता संग्रह ठरला आहे. खुद्द चंद्रशेखर गोखले यांनी या संग्रहाने आपल्या भरभरून दिले असल्याचे जाहीरपणे नमुद केले आहे. अर्थात खपाच्या दृष्टीने विक्रमी ठरणार्‍या ‘मी माझा’ने मराठी साहित्याला काय दिले आणि याचा काव्यावर व विशेषत: चारोळ्यांवर नेमका काय परिणाम झाला? हे पाहणे अगत्याचे ठरते.

अनेक लेखक/कविंना आपल्या पहिल्या कृतीच्या प्रभावातून निघता येत नाही. चंद्रशेखर गोखले यांचेही तसेच झाले. ‘मी माझा’ची उंची त्यांना नंतर गाठता आली नाही. त्यांना ‘मी माझा’ची जादू पुन्हा दाखवता आली नाही. नाही म्हणायला यानंतर त्यांचे ‘मी’,‘पुन्हा मी माझा’, ‘मी नवा’, ‘माझ्यापरीने मी’ आणि अलीकडेच आलेल्या ‘मी माझा २५’ आदी काव्यसंग्रह आलेत. मात्र पहिल्याची सर कुणालाही आली नाही. खुद्द गोखले यांना या काव्यसंग्रहाने अलोट लोकप्रियता लाभली. यातून मराठीत गल्लोगल्ली चारोळीकारांचा उदय झाला. अनेक प्रति ‘चंगो’ प्रकटले. बर्‍याच जणांनी त्यांच्या शैलीसह ‘मी माझा’च्या स्वरूपाची कॉपी केली. ‘ट’ ला ‘ट’ आणि ‘फ’ ला ‘फ’ लावणार्‍या यमक्या कविंप्रमाणे ‘उदंड जाहल्या चारोळ्या आणि चारोळीकार’ अशी म्हणण्याची वेळ आली. अर्थात यातील एकानेही चंगो इतकी उंची गाठली नाही. या सर्व बाबींचा विचार करता ‘मी माझा’ने एक ‘कल्ट’ निर्माण केला हे मात्र नक्की. हजारो कविंनी हा प्रकार तर लक्षावधी रसिकांनी या संग्रहाला डोक्यावर घेतले. मात्र मराठी साहित्यात यामुळे फारशी भर पडली नाही. चारोळीप्रमाणे मराठीत काही विदेशी लघु काव्य प्रकार रूजले नाहीत. हायकू हा अवघ्या तीन ओळीत मार्मिक भाष्य करणारा समर्थ जपानी काव्यप्रकार. शिरीष पै यांनी त्याला मराठीत आणले. मात्र यानंतर हा प्रकार फारसा रूढ झाला नाही. याशिवाय ‘मी माझा’च्या यशानंतर ‘दोनोळी’, ‘एकोळी’ आदी प्रकारही उदयास आले तरी ते बाळसे न धरतांनाही अस्तंगत झाले.

मात्र ‘मी माझा’मुळे अनेक जण काव्याकडे वळले हेदेखील नाकारता येत नाही. माझ्या माहितीतील अनेकांनी आपल्या आयुष्यात फक्त ‘मी माझा’ हा एकमेव काव्यसंग्रह वाचलाय! याचप्रमाणे जगभरात जिथेही मराठी जन आहेत तिथे ‘मी माझा’ पोहचला. खुद्द चंगो यांची चारोळी आशयगर्भ असून त्यांच्यामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली हे खरे आहे. मात्र मराठी काव्यात याची फारशी दखल घेतली जाणार नाही. एका व्यापक अर्थाने भलेही बाबूराव अर्नाळकर, सुहास शिरवळकर, बाबा कदम आदी वाचकप्रिय लेखकांप्रमाणेच अभिजात काव्यात चंगो आणि त्यांच्या सृजनाचा समावेश होणार नाही. मात्र लक्षावधींंवर गारूड करणार्‍या चंद्रशेखर गोखले यांना रसिकांनी आपल्या हृदयात कधीच अढळपद दिलेले आहे. आज सोशल मीडियाचा प्रभाव व्यापक होत असतांना चारोळीसह शेर, दोनोळी, एकोळी आदी काव्य प्रकार पुन्हा उदयास आल्याचे दिसत आहेत. यामुळे एकविसाव्या शतकातील चंगो हा सोशल मीडियातूनच येणार काय? याचे उत्तर मात्र काळच देणार आहे.

शेखर पाटील
लेखक दैनिक साईमत चे कार्यकारी संपादक आहेत .
९२२६२१७७७०

Previous articleगांधी मला भेटला
Next articleकिती पैसा पुरेसा आहे ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.