माध्यमोत्सवाच्या मर्यादा

सौजन्य – लोकसत्ता
चीनला तवांग आदी अरुणाचली प्रदेशही आपला वाटतो आणि अक्साई चीन तर आपलाच आहे, असे त्यांचे जाहीर म्हणणे आहे. मात्र चीनच्या या धोरणास मोदी यांनी आपल्या दौऱ्यात आक्षेप घेतल्याचे ऐकिवात नाही. अदानी आणि भारती एअरटेलसाठी काही फायदेशीर करार झाले म्हणजे दौरा यशस्वी ठरला असे मानायचे काय?

modiबरोबर ६१ वर्षांपूर्वी १९५४ साली भारताचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू आपल्या पहिल्याच चीन दौऱ्यातील स्वागताने भारावून गेले होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याइतकाच, किंबहुना कांकणभर अधिकच, प्रेमवर्षांव चीन सरकार आणि जनतेने नेहरू यांच्यावर केला. त्यानंतर आठच वर्षांनी चीनने भारतावर हल्ला केला. पं. नेहरू यांच्या चीनभेटीनंतर २५ वर्षांनी १९७९ साली मोदी यांचे पूर्वसुरी अटलबिहारी वाजपेयी जनता सरकारचे परराष्ट्रमंत्री म्हणून जेव्हा चीनला गेले तेव्हाही चीनचे प्रेम आणि उत्साह आताइतकाच उतू जात होता. परंतु या उत्साहाच्या देखाव्याआड चीनने भारताचे मित्रराष्ट्र असलेल्या व्हिएतनामचा घास घेतला. पंतप्रधान मोदी चीनच्या दौऱ्यात असताना यावेळी असे काही घडले नाही, असे ज्यांना वाटत असेल त्यांना याहूनही अधिक गंभीर काही घडले त्याची जाणीव करून द्यावयास हवी. ते म्हणजे मोदी चीनमध्ये असताना त्या देशाच्या सरकारने अधिकृतपणे प्रसृत केलेला भारताचा नकाशा. या नकाशात जम्मू-काश्मीरचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश भारतापासून विलग करून दाखवण्यात आले असून मोदी यांनी या दौऱ्यात या संदर्भात एक शब्दही काढल्याचे ऐकिवात नाही. अगदी असाच प्रकार पं. नेहरू यांच्या काळात चीनने केला होता आणि पं. नेहरू यांनी आक्षेप नोंदवल्यानंतर ती कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून झालेली तांत्रिक चूकअसल्याची मखलाशी चौ एन लाय यांनी केली होती. त्यानंतर ही तांत्रिक चूक चीनने प्रत्यक्षात आणली आणि भारतावर हल्ला करून ती चूक बरोबर करून दाखवली. तात्पर्य इतकेच की चीन हा एकाच वेळी दुहेरी नाही तर तिहेरी मापदंड पाळणारा देश असून मोदी यांनी आपल्या उत्साहाला लगाम घालण्याची गरज होती. याच मोदी यांनी आपल्या निवडणूकपूर्व भाषणांत काँग्रेसला चीनसंदर्भात कडक धोरण अवलंबिण्याचा सल्ला दिला होता. तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी चीनकडे डोळे वटारून पाहण्याची िहमत दाखवावी, पण ती त्यांच्याकडे नाही असे मोदी यांचे म्हणणे होते, याची आठवण या प्रसंगी करून देणे आवश्यक ठरते. याचे कारण असे की आपल्या या यशस्वी दौऱ्यात मोदी यांनी कोणत्या प्रश्नावर चीनवर डोळे वटारले? अरुणाचली नागरिकांना व्हिसा देण्याचा वादग्रस्त मुद्दा मोदी यांनी या दौऱ्यात उपस्थितदेखील केला नाही. हा मुद्दा डोळे वटारण्याच्या धोरणाचाच भाग होता काय? याशिवाय प्रश्न असा की चिनी अध्यक्ष जिनिपग हेदेखील मोदी यांचे मित्र कसे आणि केव्हापासून झाले? ओबामांचा बराक हा मोदी यांचा जिगरी दोस्त हे देशाला एव्हाना कळले आहेच. पण जिनिपग कुलदीपक क्साय हादेखील मोदी यांचा यार हे या भारतवर्षांस माहीत नव्हते. या दोस्तीची जाणीव हेच या दौऱ्याचे फलित.
अन्यथा हा संपूर्ण दौरा मोदी यांच्या गतसालच्या निवडणूक विजयाचे साजरीकरण ठरतो. या दौऱ्यात २२०० कोटी डॉलरचे व्यापारी करार झाले. अदानी आणि भारती एअरटेल हे या करारांचे सर्वात मोठे वाटेकरी. याचा अर्थ या दोन कंपन्यांना या करारांचा सर्वाधिक फायदा होईल. मोदी ऑस्ट्रेलियाला गेले तरी अदानी समूहाचे भले आणि चीनमध्ये गेले तरी याच समूहाचे कल्याण ही बाब दुर्लक्ष करण्याजोगी ठरते काय? या दौऱ्यात चीनने मोदी यांच्या स्मार्ट सिटी योजनेत गुंतवणूक करण्याची तयारी दर्शवली. ही नियोजित स्मार्ट सिटी उभी कोठे राहणार? तर गुजरातमध्ये. तेव्हा माझे राज्य आणि माझे उद्योगपती यांचेच भले करण्याचा विडा मोदी यांनी उचलला आहे काय, असा प्रश्न विरोधकांनी विचारल्यास ते कितपत अयोग्य ठरेल? या सगळ्या आर्थिक करारमदार यशावर पुरून उरेल अशी एक बाब आहे. ती म्हणजे चीन आणि भारत यांच्यातील व्यापार तफावत. चीन हा भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार असून या दोन देशांत जवळपास ७२०० कोटी डॉलरचे व्यवहार होतात. परंतु यातील मेख अशी की हे व्यवहार एकतर्फीच आहेत. म्हणजे चीन आपली उत्पादने भारतीय बाजारात ज्या प्रमाणावर आणतो त्या प्रमाणात भारतीय उत्पादकांना चिनी बाजारात स्थान नाही. दोन देशांतील ही तफावत तब्बल सुमारे ४००० कोटींची आहे. तेव्हा चीनशी हे असे दोनपाच करार झाले म्हणजे मोठा दिग्विजय साध्य झाला असे मानायचे कारण नाही. चीनबरोबरचे संबंध हा अत्यंत नाजूक, गुंतागुंतीचा राजनतिक बुद्धिबळाचा खेळ असून एखाद्या चालीबद्दल असा उत्साह अत्यंत फसवा ठरतो हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे.

या इतिहासात वर्तमानात बदल होईल असे मानण्याचे काहीही कारण नाही. चीनने भारतासंदर्भात अंगीकारलेली धोरणे याची साक्ष देतील. एकाच वेळी भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला सतत चुचकारत भारताच्या मनात कायम संदेह राहील अशी व्यवस्था करणे, त्याच वेळी अरुणाचल आणि जम्मू-काश्मीरच्या भूभागावर दावा सांगत हा संदेह वाढवणे आणि त्याच वेळी हसऱ्या चेहऱ्याने भारतीय नेतृत्वास गुंगवत ठेवणे ही चीनची ऐतिहासिक त्रिसूत्री आहे. मोदी यांचे जिगरी दोस्त जिनिपग हे चीनच्या अध्यक्षपदी आहेत म्हणून ती बदलणार नाही. यात फरक झालाच तर तो असेल ६२ प्रमाणे प्रत्यक्ष हल्ला न करण्याचा. त्याची आता चीनला गरज नाही. कारण आधुनिक काळात आíथक हत्यार हे प्रत्यक्ष लष्करी उपायांपेक्षा अधिक प्रभावी ठरते हे चीन जाणतो. तो देश अरुणाचलातील तवांग परिसरावर सातत्याने दावा करीत असून मोदी यांच्या डोळ्यादेखत चीनने ते धाडस पुन्हा एकदा करून दाखवले. तवांगचा भूप्रदेश चीनसाठी तिबेट राखण्यासाठी महत्त्वाचा असून त्या मुद्दय़ावर चीन भारताची जमेल तितकी अडवणूक करीतच राहणार. चीनच्या या धोरणाने अलीकडच्या काळात घेतलेल्या गंभीर वळणाची जाणीव त्यामुळे आपणास असणे गरजेचे आहे. इतके दिवस चीन हा अक्साई चीनवरील आपला दावा सोडण्याच्या बदल्यात तिबेटवरील हक्क सोडून देण्याची भाषा करीत होता. त्यात आता बदल झाला आहे. तो म्हणजे चीनला तवांग आदी अरुणाचली प्रदेशही आपला वाटतो आणि अक्साई चीन तर आपलाच आहे, असे त्यांचे जाहीर म्हणणे आहे. माझे ते माझे आणि तुझे तेही माझेच या चीनच्या धोरणास मोदी यांनी आपल्या दौऱ्यात आक्षेप घेतल्याचे वा किमान तसा प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही. उलट चिनी प्रवाशांना इलेक्ट्रॉनिक व्हिसाची सवलत मोदी यांनी या दौऱ्यात जाहीर केली. तेव्हा हे जे काही झाले त्यालाच भव्य यश म्हणावे अशी मोदी यांची इच्छा दिसते. ती पूर्ण करावी असे ज्यांना वाटते त्यांच्या समजशक्तीस दंडवत.

या यशापयशाच्या पलीकडे मोदी यांनी केलेल्या अत्यंत आक्षेपार्ह कृत्याचा समाचार घेणे आवश्यक ठरते. ती म्हणजे शांघाय येथे त्यांनी काँग्रेसवर केलेली टीका. मोदी यांची चीनभेट हा निवडणूक प्रचार दौरा नव्हता. तेव्हा विरोधी पक्षावरील टीकेचे प्रयोजनच काय? खेरीज काँग्रेस किती नालायक होती वा आहे, हे देशाने अनुभवलेले आहे. चि. राहुलबाबांच्या गायब होण्यावरही मोदी यांनी टोला लगावला. तसे करून आपण चि. राहुलसाठी एक पायरी खालती उतरतोच पण त्याला आपल्या पायरीवर येण्याची संधी देतो, हेदेखील त्यांच्या लक्षात येऊ नये? विरोधी पक्षावर परदेशी भूमीवर पुन्हा पुन्हा टीका करण्याने आपण खुजे ठरतो याचीदेखील जाणीव मोदी यांना नसावी? घरची उणीदुणी ही बाहेरच्यांसमोर काढायची नसतात ही साधी बाब पंतप्रधानपदावरील व्यक्तीस ठाऊक नाही काय? दुसरे असे की मी तीस वर्षांचे खरकटे काढत आहे, हे ते आता आणखी किती वेळा सांगणार? त्यासाठीच तर जनतेने त्यांना संधी दिली. आणि मी पंतप्रधानपदावर येईपर्यंत भारत म्हणजे वैराण वाळवंट होते आणि आपणच आता या वाळवंटात प्रगतीचे मळे फुलवणार आहोत, असे त्यांनी म्हणणे म्हणजे देशाचाच अपमान नव्हे काय? सुजाण लोकशाही देशातील एकही नेता परदेशी भूमीवर आपल्या देशातील विरोधकांची उणीदुणी काढत नाही, याचे भान तरी त्यांनी बाळगण्याची गरज आहे. तूर्त ते नसल्याने अशा परदेश दौऱ्यांतून त्यांना जे काही यश मिळते त्यास गालबोट लागते.
अशा परदेश दौऱ्यांचे माध्यमोत्सव करून तात्पुरते समाधान मिळते. हाती फार काही लागत नाही. या माध्यमोत्सवाच्या मर्यादा त्यांना जेवढय़ा लवकर कळतील तेवढे बरे.
सौजन्य – लोकसत्ता

Previous articleस्त्री-जन्माचे भोग संपणार कधी ?
Next articleकोमात कोण?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.