सावरकरांचा विषय सध्या देशभर गाजत आहे. आरोप-प्रत्यारोप जोरात सुरु आहे . या पार्श्वभूमीवर आचार्य अत्रे यांनी ‘नवयुग’ या त्यांच्या साप्ताहिकाच्या दिनांक १४ सप्टेंबर १९४१ च्या अंकात सावरकरांबद्दल काय लिहिले होते, हे जाणून घेणे उद्बोधक ठरेल – संपादक
…………………………………………………………………………
-आचार्य अत्रे
केळकर प्रणित गांधी- सावरकर तुलना!
गांधीजी आणि सावरकर ह्यांची तुलना करण्याचा हास्यास्पद पोरकटपणा श्री तात्यासाहेब केळकर यांनी ‘केसरी’ मध्ये कसा केला ह्याची माहिती गेल्या अंकात मी माझ्या वाचकांना दिलेलीच आहे.
तात्यासाहेब म्हणतात की काँग्रेसवाल्यांनी शिव्या देण्यासारखे असे सावरकर काहीच बोलत नाहीत. सावरकर आणि काँग्रेस ह्यांचा दृष्टिकोन मूलतःच कसा भिन्न आहे हे आपण पाहू. हिंदू समाजाचे संरक्षण करणे हे हिंदूने आपले कर्तव्य समजावे. ह्या सावरकरांच्या म्हणण्याशी कोणत्याही काँग्रेसजनाचा मतभेद असण्याचे कारण नाही. पण हिंदू आणि मुसलमान ही ह्या देशातील दोन राष्ट्रे आहेत आणि ही दोन राष्ट्रे मिळून या देशात एकराज्य (स्टेट) झाले पाहिजे, ही ‘सावरकरी’ कल्पना हिंदुस्थानच्या राष्ट्रीय ऐक्यास नि स्वातंत्र्यप्राप्तीस अत्यंत विघातक आहे. हिंदू लोक हिंदुस्थानात जरी बहुसंख्यांक असले तरी ह्या देशात त्यांचे स्वतंत्र राष्ट्र आहे असे मानणे चुकीचे आहे. ह्या अवाढव्य देशात सर्व जातीच्या व सर्व धर्मांच्या लोकांची इतकी सरभेसळ झालेली आहे, की धर्मवाचक गटांच्या नावाखाली त्यांना वेगळे निवडून काढणे हे अशक्य आहे आणि ही गोष्ट अराष्ट्रीय पण आहे. हिंदू आणि मुसलमान लोक या देशात निरनिराळ्या गटांनी राहात नाहीत. दोघांचे आर्थिक, सामाजिक, व्यावसायिक हितसंबंध एकमेकांशी शेकडो वर्षे निगडीत झालेले आहेत. दोघांचीही संस्कृती जिनासाहेब म्हणतात तितकी भिन्न नाही. दोघांच्याही भाषा, दोघांचेही इतिहास, दोघांचेही भवितव्य परस्परावलंबी आहे. अशी परिस्थिती असतांना ह्या दोन जमातींमध्ये अधिकाधिक ऐक्य साधणे ह्यातच राष्ट्राचे अंतिम कल्याण आहे. हिंदू आणि मुसलमान ह्यांचे वैयक्तिक धर्म काहीही असले तरी त्यांचा ‘राष्ट्रधर्म’ एकच आहे. दोघांच्या भूतकालीन वैमनस्यामुळे हिंदुस्थानचे स्वातंत्र्य गमावले, आणि आजही दोघांमधील गैरसमजामुळे देशाचे स्वातंत्र्य दुरावत आहे. ज्या मार्गाने हिंदुस्थानचे स्वातंत्र्य गेले, त्या मार्गानेच ते परत येणार आहे आणि तो मार्ग म्हणजे हिंदू- मुसलमानांचे ऐक्य (अर्थातच यात इतर सर्व धर्मांच्या ऐक्यांचा आम्ही समावेश करतो) हा एकच होय. मुसलमानांचे स्वतंत्र पाकिस्तान कल्पिणारे जीना किंवा हिंदू- मुसलमान ही दोन स्वतंत्र राष्ट्रे आहेत असे मानणारे सावरकर हे दोघेही हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याचे शत्रू आहेत! दोघेही अप्रत्यक्षपणे ब्रिटीशांची या देशावरील सत्ता व राज्य कायम ठेवण्यास सहाय्य करीत आहेत. हिंदू नि मुसलमान यांचे ऐक्य झाले तर परकी सत्ता ह्या देशात एक क्षणभरही रहाणार नाही हा काँग्रेसचा दृष्टिकोन आहे. परकी सत्ता जर ह्या देशातून गेली तर हिंदू लोक आपल्यावर राज्य करतील असे जीनांना भय वाटते; आणि मुसलमान लोक आपल्यावर अत्याचार करतील असे सावरकरांना भय वाटते. त्यापेक्षा आपण आधीपासूनच स्वतंत्र झालेले बरे असा आत्मसंरक्षणाचा अत्यंत आकुंचित आणि स्वार्थी दृष्टिकोन या दोघांचाही आहे. दोघांनाही आपापल्या धर्मियांसाठी ‘स्वातंत्र्य’ पाहिजे आहे. पण मुसलमानांचे वेगळे पाकिस्तान झाले किंवा हिंदूंचे निराळे ‘राष्ट्र’ जर स्थापन झाले तर ह्या ‘पाकिस्ताना’ला वा ह्या ‘हिंदु-स्थाना’ला मिळणार असणारे स्वातंत्र्य हे हिंदू-मुसलमानांच्या ऐक्यामुळे अखिल भारताला प्राप्त होणाऱ्या खऱ्याखुऱ्या निर्भेळ स्वातंत्र्यापेक्षा किती तरी हिणकस ठरेल ह्याची ह्या दोघांही पुढाऱ्यांना कल्पना नसावी ही दुःखाची गोष्ट आहे! ब्रिटिशांची साम्राज्यशाही ह्या देशातून जाऊन आपला देश संपूर्णत: स्वतंत्र झाला पाहिजे हे काँग्रेसचे ध्येय आहे. हिंदूचे राष्ट्र (वा राज्य) या देशात स्थापन करण्याचे जे सावरकरांचे ध्येय आहे ते ह्या देशातील ब्रिटिशांची सत्ता पर्यायाने दृढमूल करण्यास कारणीभूत होणारे असल्याने ब्रिटिशांना काँग्रेसचे जेवढे आज भय वाटते तेवढे सावरकरांचे भय ह्या क्षणाला त्यांना वाटत नाही. १९०८ च्या सावरकरांची खरोखरच भीती ब्रिटिशांना वाटत होती. कारण त्यावेळी ते ब्रिटिश साम्राज्यशाहीचे शत्रू होते. निव्वळ हिंदूंसाठी स्वातंत्र्य पाहिजे असल्याची भाषा त्यावेळी ते बोलत नव्हते. ‘माझा सबंध देश स्वतंत्र झाला पाहिजे, माझी मातृभूमी स्वतंत्र झाली पाहिजे’ माझा अखिल भारत वर्ष स्वतंत्र झाला पाहिजे अशा तेजस्वी घोषणा त्यावेळी सावरकरांच्या तोंडून निनादत होत्या. त्यावेळी सावरकर हे खरोखरच ‘स्वातंत्र्यवीर’ सावरकर होते. १९०८ चे सावरकर जर देशाला पुन्हा दिसतील तर ‘स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या’ जयजयकाराने हा देश आसेतुहिमाचल दुमदुमून जाईल! पण आजचे सावरकर हे आता ‘स्वातंत्र्यवीर’ राहिलेले नाहीत. त्यांना काँग्रेसचा जितका मनापासून द्वेष वाटतो, काँग्रेस हे नाव निघाल्याबरोबर त्यांच्या तळपायाची आग जितकी झपाट्याने त्यांच्या मस्तकात जाऊन पोहोचते, तितका द्वेष, तितका संताप, त्यांना परकीय साम्राज्यशाही सत्तेबद्दल आज वाटत नाही. सरकारशी सहकार्य करण्याची भाषा आज ते उघड उघड बोलतात, आणि सरकार देशात अनंतकाळ राहील असले राजकारण लढविण्यात आज ते गुंतले आहेत. म्हणून आम्हाला ते आज ‘स्वातंत्र्यवीर’ वाटत नाहीत, किंबहुना आमच्या राष्ट्राच्या स्वातंत्र्याचे शत्रू आहेत तसेच मोठ्या दुःखाने आम्हांला म्हणावे लागते.
* * * *
तात्यासाहेब म्हणतात की, ‘नेमस्त वा काँग्रेसवाले यांच्या तोंडून मुसलमानांना जे शब्द कधी ऐकू आले नाहीत ते सावरकर उच्चारतात!’ हा तात्यांचा मुद्दा अजब आहे! मुसलमानांना शिव्या देण्यात अभिमानाची गोष्ट काय आहे? आज शेकडो वर्षे आम्ही हिंदु-मुसलमान एकमेकांना अर्वाच्य शिव्या देत आलो नाही काय? एकमेकांना शिव्या देत आलोत म्हणूनच आम्हाला ही परकीयांची गुलामगिरी पत्करावी लागली! मुसलमानांना जितक्या ‘इरेसरी’ने सावरकर आज शिव्या देत आहेत, तितक्या त्वेषाने शिव्या ते आज दास्याला वा गुलामगिरीला देत नाहीत हेच देशाचे दुर्भाग्य आहे! १९०८ सालचे सावरकर ‘शेणामाजी बांधुनि वाडे नांदति शेणकिडे!’ असे जळजळीत शाप सरकारी नोकरीत रमलेल्या स्वातंत्र्यशत्रूंना देत असत, ही आमची आठवण अद्यापि बुजलेली नाही! मुसलमानांबद्दल वाटेल ते बोलण्याचे आम्हाला कारण काय? आमचे स्वातंत्र्य मुसलमानांनी हिरावून नेले नाही! दोघेही आज एका देशामध्ये, एका घरामध्ये ‘दुसऱ्याचे गुलाम’ आहोत! ज्यांनी आमचे स्वातंत्र्य आमच्यापासून हिसकावून घेतले त्यांच्याशी आम्हाला लढायचे आहे, त्यांना पाहिजे तर आम्ही शिव्या देऊ! दोन गुलामांनी वा दोन भिकाऱ्यांनी एकमेकांना शिव्या देण्यात हाशील काय? सावरकर म्हणतात, “वेळ पडली तर आम्ही हिंदू, इंग्रजांशी आणि मुसलमानांशी लढून स्वातंत्र्य मिळवू!” सावरकरांच्या ह्या निव्वळ राणा भीमदेवी छापाच्या नाटकी वल्गना आहेत. ज्याला गेल्या हजार वर्षांचा हिंदूंचा इतिहास माहिती आहे, बाहेरून आलेल्या प्रत्येक परकीय सत्तेने एतद्देशीय हिंदूवर राज्य केले आहे, ही गोष्ट ज्यांना अवगत आहे त्यांना सावरकरांच्या वल्गना हास्यास्पद वाटल्याखेरीज राहणार नाहीत. आम्ही निशस्त्र झाल्यामुळे तेजो ही दुर्बल झालो याबद्दल सावरकरांनी इतकाच आम्हालाही खेद वाटतो. पण त्या दुबळेपणाचा वचपा नुसता नुसत्या कोरड्या वल्गना करून कसा निघणार? आपल्या सामर्थ्याच्या आणि साधनाच्या मर्यादा ओळखणे यातच खरा मोठेपणा आहे. सशस्त्र युद्धाच्या मार्गाने कोणत्याही क्षक्षक्ष ह्यापुढे स्वातंत्र्य मिळविता यावयाचे नाही. थोडावेळ मिळाले असे वाटले तर ते फार वेळ टिकू शकणार नाही हा धडा चालू महायुद्धाने आपल्याला शिकविलेला आहे. “उद्या स्वराज्य प्राप्तीसाठी सशस्त्र युद्ध सुरू झाले तर यातला पहिला पाईक मी होईन”, ही सावरकरी घोषणाही अगदी नाटकी आणि म्हणून हास्यास्पद आहे.
*. *. *. *
‘उद्या स्वराज्यप्राप्तीसाठी सशस्त्र युद्ध सुरू झाले तर-‘ अशी ‘जर-तारी’ भाषा एखाद्या ज्योतिषाप्रमाणे सावरकर का बोलतात हे आम्हाला कळत नाही! ‘सशस्त्र युद्धा’चा मार्ग सावरकरांना जर मनापासून खरोखरच पसंत असेल तर त्या मार्गाचा त्यांनी जाहीरपणे असंदिग्ध शब्दांमध्ये पुरस्कार करावा किंवा त्या कल्पनांचा देशात उघडपणे प्रचार करीत हिंडावे! “सैन्यात जेथे जागा सापडेल तेथे शिरा!” हा सध्या ते करीत असलेला उपदेश तर उपर्युक्त स्वराज्याप्रित्यर्थ सशस्त्र युद्धाचा त्यांचा प्रचार नसेल ना? सैन्यात शिरुन स्वराज्य मिळवण्याचा सावरकरांचा शेख मोहम्मदी कट पाहिला म्हणजे त्यांच्या राजकारणविषयक अज्ञानाची कीव करावीशी वाटते! मग आजपर्यंत ‘पेनशनर’ लोक तरी काय, हेच म्हणत होते! सरकारी नोकरीत शिरा, सर्व सरकारी जागा पटकावा, म्हणजे आपले राज्य झाले, स्वराज्य-स्वराज्य ते ह्यापेक्षा काय निराळे! या पेनशनरी भावनेपेक्षा सैन्यात शिरून स्वराज्य जिंकण्याची सावरकरी कल्पना! ही कितीशी निराळी आहे! ‘सशस्त्र युद्ध सुरू झाले तर मी पहिला पाईक होईन!’ हे सावरकरांचे म्हणणे आज बोलायला ठीक आहे! १९०८ चे सावरकर असे छातीठोकपणे खास म्हणू शकले असते, पण चोवीस तास एक शीख शरीरसंरक्षक घेऊन मगच बाहेर पडणाऱ्या १९४०-४१ च्या भेकड सावरकरांच्या तोंडी मात्र ही भाषा कशीशीच दिसते!
*. *. *. *
‘गांधी आणि सावरकर ह्या दोघांनी बॅरिस्टरीचा काळा झगा अंगावर घेतला, पण गांधींनी तो झगा घालून पैसे मिळवले आणि सावरकरांचा काळा झगा त्यांच्या प्रेताला गुंडाळावयाला उपयोगी पडतो की काय अशी परिस्थिती उत्पन्न झाली’ अशी जी तात्यासाहेबांनी दोघांमध्ये तुलना केली आहे ती अत्यंत कुत्सित आणि अधमवृत्तीची द्योतक आहे. गांधींनी बॅरिस्टरी करून पैसे मिळविले असले तरी ते सर्व राष्ट्र कार्याला अर्पण केलेले आहेत! साऊथ आफ्रिकेमध्ये ते बॅरीस्टरी करीत असता हिंदी लोकांच्या हक्काचा प्रश्न हातात घेऊन त्यांनी आपणा स्वतःवर किती प्राणघातक संकटे ओढवून घेतली हा इतिहास तात्यासाहेबांना सांगावयाला पाहिजे असे नाही. आणि गेल्या वीस वर्षात महात्माजींनी राष्ट्रासाठी आपले प्राण अनेक वेळा पणाला लावले आहेत ही गोष्ट जगजाहीर आहे! फाशी जाण्याचे संकट सावरकरांनी फार झाले तर एक वेळा ओढून घेतले असेल, पण महात्माजींनी आपल्या प्राणावर अनेक वेळा पाणी सोडलेले आहे! (अर्थात तात्यांनी आपल्या प्राणाला अपाय होईल अशी एकही गोष्ट अद्यापपर्यंत केलेली नाही ही गोष्ट निराळी!) तेव्हा कोण आपल्या प्राणावर किती उदार आहे हे एखाद्या तिऱ्हाईत उपऱ्याने बोलण्याचे कारण नाही!
* * * *
सावरकर नि गांधी ह्यांच्यामध्ये एकच महत्त्वाचा फरक आहे असे तात्या म्हणतात. तो फरक म्हणजे गांधींच्या मागे अनेक लखपती, गुर्जर, मारवाडी अनुयायांचा परिवार आहे आणि सावरकरांच्या मागे कोरड्या सहानुभूतीने पहाणारा फक्त दरिद्री महाराष्ट्रीय समाज आहे. तात्यांच्या मते ‘पैसा हाच चळवळीचा आधार आहे!’ हे मत आम्हांलाही सर्वस्वी मान्य आहे. गायकवाडवाड्यामधील ज्या काही चळवळी आज इतकी वर्षे चाललेल्या आहेत त्यांना पैशाचा आधार आहे ही गोष्ट उघड आहे. गांधीजींना पैसे देण्यास करोडपती सिद्ध आहेत ही गोष्ट खरी असली, तरी गांधीजींनी आजपर्यंत जे जे केले, जे जे साधले, जे जे घडविले आणि जे जे लढवले ते केवळ पैशाच्या सहाय्यामुळे असे म्हणणे म्हणजे वस्तुस्थितीचा विपर्यास करण्यासारखे आहे. गांधीजींचे विलक्षण लोकोत्तर तत्त्वज्ञान, त्यांचे आत्मिक बल, त्यांचे तेजस्वी चारित्र्य, त्यांच्या विचारसरणीतील आणि त्यांनी उपयोगात आणलेल्या साधनांमधील प्रभावी सामर्थ्य ह्यामुळे त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचा लढा ह्या टप्प्यापर्यंत आणून सोडला! सावरकरांचे राजकारण जर खरेखुरे राष्ट्रीय होईल, देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा एकादा प्रभावशाली कार्यक्रम जर जनतेपुढे ते मांडू शकतील तर त्यांच्या गळ्यात ह्याहीपेक्षा जास्त हार पडतील (इतके की ते त्यांना मोजताही येणार नाहीत!) आणि त्यांच्यापुढे कोट्यावधी रुपयांचा ढीग पडेल! मग ‘सावरकरांना पैसे द्या’ असा केविलवाणा हंबरडा ‘केसरी’च्या स्तंभातून फोडण्याची आपत्ती आमच्या थकलेल्या तात्या केळकरांच्यावर कधीही येणार नाही! निव्वळ पैशाने राजकारण चालविता येत नाही! गायकवाड वाड्यातील माणसांना लो. टिळक एवढे ‘फंड’ ठेवून गेलेले आहेत त्यामुळे देशाचे कोणते प्रभावी राजकारण त्यांनी चालवून दाखविले? सावरकरांना दोन लक्षच रुपये पाहिजे असतील तर ते त्यांना एकट्या गायकवाड वाड्यात मिळू शकतील अशी आमची खात्री आहे!
* * * * *
सर्वात शेवटी एक विनोदी गोष्ट सांगावयाची राहिली. श्री. तात्यासाहेब केळकर हे एक उत्कृष्ट विनोदी लेखक आहेत. पण त्यांनी आजपर्यंत केला नसेल असा एक विनोद या लेखामध्ये साधला आहे. ते म्हणतात, “हिंदुमहासभेप्रमाणे लोकशाही स्वराज्य पक्षहि सावरकर ह्यांच्यामुळे बळकटीला आलेला आहे”. लोकशाही स्वराज्य पक्षाचे क्षक्षक्षभांडे तात्या उगाच एकाद्या लोचट भिक्षुकाप्रमाणे सावरकरांच्या गळ्यात फडकवित आहेत! खुद्द सावरकर देखील हा तात्यांचा विनोद ऐकून पोट धरधरून हसतील. जवाहिरलाल नेहरूंनी ज्या स्वरात “लोकशाही स्वराज्य पक्ष ए क्या चीज है” असे म्हणून पुण्यात प्रचंड हंशा पिकवला होता त्याच स्वरात आम्ही म्हणतो की, “कुठला लोकशाही स्वराज्य पक्ष अन् कुठली सावरकरांमुळे त्याला आलेली बळकटी!”
– प्रल्हाद केशव अत्रे
नवयुग,
वर्ष २ रे, अंक ३७ वा
दिनांक १४ सप्टेंबर १९४१
———————————–
लिप्यंतर – प्रल्हाद मिस्त्री
Savarkar hey Deshbhakta hotey aani rahata,tyanchya baddal aka patriket kai lihile aahe tyamule tey swatantryache shatru hot nahit,vel aaji kaal baghun vichar badalaila tey kahi Congress madhe navtey aani ek goshta lakshat theva Kalya panyachi saja kona sathi bhogali tyani hey visaru naka fakta aani fakta Swatantrya sathi tey ladhale hotey
Yach atre Yani Falni zalyawar congress Gandhi ani Sawarkar yabaddal Kay lihile Te pan Sanga ki ani mandlik Chhatrapati Kay karat hote Te pan liha jara
तुम्ही म्हणता ते तुम्ही लिहा म्हणजे लोकांना आणि आम्हालाही समजेल…
Atre was Congress member hence following its agenda hence his opinion don’t have any value.