केवळ एक व्यक्ती एक मत यापेक्षा एक व्यक्ती एक मुल्य यावर बाबासाहेबांचा भर होता. सामाजिक लोकशाहीची मुल्ये त्यांनी राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केली.
प्राथमिक शिक्षण सक्तीचे, मोफत आणि सार्वत्रिक असावे ही ४५ व्या कलमातील तरतूद त्यांना मुलभूत अधिकारात आणायची होती. ती त्यांना आणता आली नाही. मात्र त्यासाठी त्यांनी १० वर्षांची त्याला मुदत घातली होती. पुढे १ एप्रिल २०१० ला शिक्षण हक्क कायदा आणून सर्व शिक्षण मोहिमेद्वारे आपण जे केले ते त्यांना तेव्हाच हवे होते, यावरून त्यांचा द्रष्टेपणा दिसून येतो. पर्याप्त प्रतिनिधित्व देण्यासाठी त्यांनी अनुसुचित जाती, जमाती आणि इतर मागासवर्गियांना आरक्षण देण्याची तरतूद केली. आरक्षणामागे ” समान संधीसाठी विशेष संधी” असे समतेचे तत्वज्ञान असून राजकीय आरक्षण १० वर्षांऎवजी जास्त काळ द्यावे लागेल असे भाकीत त्यांनी केले होते.
Indian first, Indian last and nothing else but Indians-
४ एप्रिल १९३८ रोजी मुंबई प्रांताच्या विधीमंडळात तळमळीने आणि राष्ट्रभावनेने बोलताना डॉ. बाबासाहेब म्हणाले होते, “I do not like what some people say, that we are Indian first and Hindus afterwards or Muslims afterwards. I am not satisfied with that, I frankly say that I am not satisfied with that. I do not want that our loyalty as Indians should be in the slightest way affected by any competitive loyalty whether that loyalty arises out of our religion, out of our culture or out of our language. I want all people to be Indian first, Indian last and nothing else but Indians.” सर्व देशवासियांनी आपली ओळख फक्त भारतीय म्हणून सांगण्याचा हा दिवस अजुनही उगवलेला नसल्याने डॉ. बाबासाहेबांचे हे स्वप्न अजूनही अधुरे आहे.
हिंदुराष्ट्र ही देशावरची महाभयानक आपत्ती-
” If Hindu Raj does become a fact,it will, no doubt, be the greatest calamity for this country.No matter what the Hindus say, Hinduism is a menace to Liberty, Equality, and Fraternity. On that account it is incompatible with democracy. Hindu Raj must be prevented at any cost.” [ Pakistan or The Partition of India,1946, pp.358, Dr Babasaheb Ambedkar: Writings and Speeches, Vol.8, 1990, pp.358]
बाबासाहेब हिंदुत्वाचे समर्थक होते असा भ्रम आजकाल पसरवला जात आहे. ” हिंदु राज्याची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती महाभयानक आपत्ती असेल. समर्थक हिंदू त्याबद्दल काहीही म्हणोत, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता व बंधुता यांचे शत्रू आहे. हिंदुत्व हे लोकशाहीविरोधी आहे. म्हणून कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदुराज्य घडू देता कामा नये.” [ पाहा- डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पाकिस्तान किंवा भारताची फाळणी, १९४६, पृ. ३५८ ] या कडक शब्दात हिंदुराष्ट्रवादाला नकार देणारे बाबासाहेब आजच्या नासक्या आंब्यातील रेशीमकिड्यांना अजिबात परवडणारे नाहीत. पण तरीही हे विकृत लोक संदर्भापासून तोडलेल्या अर्धवट विधानांच्या आधारे बुद्धीभेद करण्याचे आणि अफवांच्या अभियानाद्वारे बाबासाहेबांची बदनामी करीत असतात. त्यांचा यशस्वीपणे प्रतिकार करायचा असेल तर एकटादुकटा समाज तो करू शकणार नाही. त्यासाठी तमाम बहुजन आणि पुरोगामी छावणीतले सर्वजण एकत्र यायला हवेत.
जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे-
शोषित, वंचित समाजाची गुलामगिरी नष्ट करण्यासाठी राजकीय सत्ता आवश्यक असते हे ओळखून दलित उपेक्षितांच्या आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक मुक्तीसाठी ते राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या हेतूने निवडणुकांच्या राजकारणाकडे बघतात. निवडणुकीतील पराभव हे खेळातील पराभवासारखे असतात, त्याने नाउमेद न होता पुन्हा नव्या जोमाने खेळायचे असते असे ते म्हणतात. दलितांनी व मागासवर्गियांनी आपली करारपात्रता (Bargaining Power) वाढविल्याशिवाय त्यांना समान वाटा मिळणार नाही असे ते स्पष्ट सांगतात. आंबेडकरांची सत्तासंकल्पना संघर्षातून नव्हे तर समन्वयातून साकार होणारी आहे. त्यांच्या राजकारणाचा संपूर्ण रोख समाजबदलावर होता. बळकट विरोधी पक्ष, वृत्तपत्र स्वातंत्र्याचे जतन आणि निवडणुकांद्वारेशांततामय मार्गाने सत्तांतर यावर त्यांचा सारा भर होता.
विरोधी पक्षाचा वचक नसेल तर तो सत्तेचा गैरवापर करील या भुमिकेतून ते द्विपक्षीय पद्धतीचा पुरस्कार करतात. तुल्यबळ दोन पक्ष असतील तेव्हा मागास वर्गियांनी तराजूतील ” पासंगा”चे राजकारण करावे असे ते सांगतात. संघटित शक्तीच्या बळावरच सत्ता आणि भौतिक लाभ त्यांना मिळवता येईल असा आशावाद ते व्यक्त करतात. आपल्याला जातीय बहुमत नको तर विचारांचे बहुमत हवे असे ते म्हणतात. वरिष्ठवर्णियांच्या दयाबुद्धीवर विसंबण्यापेक्षा राजकीय बहुमताच्या आधारे वाटचाल करा असा सल्ला ते देतात. धर्मनिरपेक्ष राज्याची संकल्पना त्यांनी स्विकारली होती. धर्मांतरामागे त्यांची प्रेरणा अध्यात्मिक असण्याऎवजी महान लोकशाहीवादी बुद्धाचा स्विकार ही होती.
माणसाकडे पुनर्विचाराचे व विचार बदलण्याचे धाडस हवे-
आपण जर एकाच विषयावर दोनदा किंवा अधिकवेळा बोललो अथवा लिहिले असेल आणि त्यात विसंगती असेल तर त्यातील कालानुक्रमे शेवटी आलेले मत प्रमाण मानावे असे सांगून ते म्हणतात, “जबाबदार माणसाकडे पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धाडस असलेच पाहिजे.” डॉ. बाबासाहेब ‘भाषावार प्रांतरचनेवरील विचार’ या विषयावरील लेखनात इमर्सनला उद्धृत करुन म्हणाले होते, “ द्वेषबुद्धीने माझ्यावर टिका करणार्या आणि माझ्या विसंगतीचेच भांडवल करू पाहणार्या माझ्या टीकाकाराला मी सरळ उत्तर देत आहे.
विचारातील सातत्य, सुसंगती, तोचतोचपणा हा गाढवाचा सद्गुण आहे असे इमर्सनने म्हटले आहे. सुसंगती राखून मला गाढव व्हायचे नाही. सुसंगतीच्या नावाखाली एकेकाळी व्यक्त केलेल्या मताला कोणताही विचार करणारा माणूस स्वत:ला जखडून घेणार नाही. सुसंगतीपेक्षाही जबाबदारी जास्त महत्वाची असते. जबाबदार माणसाकडे एकदा शिकलेले विसरून जाण्याचे, पुनर्विचार करण्याचे आणि आपले विचार बदलण्याचे धैर्य असले पाहिजे. अर्थात तसे करण्यासाठी त्याच्याजवळ पुरेशी आणि सबळ कारणे असली पाहिजेत. कारण विचारविश्वात अंतिम असे, शेवटचा शब्द म्हणून काही नसते.” यावरून आंबेडकरवाद हा परिवर्तनशील राजकीय विचार होता हे स्पष्ट होते.
आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार –
डॉ. बाबासाहेबांचा द्रष्टेपणा लक्षात घेऊनच दक्षिण आफ्रिकेचे नेते नेल्सन मंडेला यांनी आणि नेपाळने आपली राज्यघटना बनवताना डॉ. बाबासाहेबांच्या विचारांचा सखोल अभ्यास केला होता.
आज डॉ. बाबासाहेब हे सामाजिक न्याय, ज्ञाननिर्मिती आणि लोकशाही विचारधारेचे प्रतिक बनले असून डॉ. रामचंद्र गुहा यांच्यासारख्या थोर इतिहासकाराने तसेच नोबेल पुरस्कार विजेते अमर्त्य सेन यांनी आधुनिक भारताचे प्रमुख शिल्पकार म्हणून डॉ. बाबासाहेबांचा गौरव केला आहे.
अशा सर्वव्यापक राष्ट्रनेत्याचा दलितांचा उद्धारकर्ता असा मर्यादित उल्लेख करणे अन्यायकारक आहे. हे चित्र बदलणे शक्य आहे. भारतीय जनसंघ-भाजपाची प्रतिमा ” भटाब्राह्मणांचा” पक्ष अशी होती. तेव्हा ती बदलायचे ठरवून वसंतराव भागवत यांनी “माधव” सुत्रानुसार गोपीनाथ मुंढे, ना.स.फरांदे व अण्णा डांगे यांचे नेतृत्व तयार केले. त्यातून त्यांनी काही वर्षातच पक्षाची प्रतिमा बदलली.
यापुढे बौद्ध, आंबेडकरवादी नेत्यांनी जाणीवपुर्वक बॅकसीट घेऊन बाबासाहेब हे ओबीसी, बलुतेदार- अलुतेदारांचे, महिलांचे, शेतकर्यांचे नेते होते ही प्रतिमा रूजवण्यासाठी त्या त्या समुहातील अभ्यासक, नेते, प्रचारक, प्रसारक यांना बळ द्यायला हवे, त्यांना समाजात पुढे करायला हवे.
काही वर्षात ” भारतभाग्यविधाता बाबासाहेब” ही प्रतिमा निर्माण करणं शक्य आहे. तर आणि तरच हा जातीयवाद्यांचा बुलडोझर रोखता येईल. नाहीतर अवघड आहे. आज त्यांनी मुस्लीमांना एकटे पाडले आहे. दुसरा नंबर बौद्धांचा, आंबेडकरवाद्यांचा असेल, हे लक्षात घेता जलदी करायला हवी. नाहीतर एका महासूर्याला एका समाजगटापुरते कायमचे सिमित केले जाईल व प्रतिक्रांतीचे राजकारण देशावर लादले जाईल. बहुजनांना भवितव्य लोकशाहीतच आहे, हिंदुराष्ट्रात म्हणजे उत्तर पेशवाईत नाही ह्याचा विसर पडू देता कामा नये.
(लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे या मालिकेतील खंड १७ ते २२ चे संपादक आहेत.)