एक होता ‘आईनस्टाइन’ !

-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

असं होतं ना बऱ्याचवेळा, की प्रत्येकवेळी आपल्याला कोणाला प्रत्यक्षात भेटण्याची गरज नसते. कोणी पुस्तकातून, लिखाणातून, चित्रांतून… किंवा इतर कुठल्या माध्यमांतून आपल्याला भेटत असतो आणि आपल्याला तो जवळचा वाटत राहतो.

कुठलाही वैज्ञानिक हा ग्रेट असतोच, पण ‘आईन्स्टाईन’ मला सगळ्यांच्यात थोडा जास्तच ग्रेट आणि फार जवळचा, अगदी घरातला वाटतो. ते तसं वाटण्यामागे असंख्य कारणं असतील. त्याची साधी राहणी, उच्च विचार कारणीभूत आहेत, की मग त्याची हुशारी, माहित नाही. पण आपल्या सामान्य माणसांसारखंच त्यानेही असंख्य समस्या झेलल्या, रोजचं जगण्यातलं डिप्रेशन त्यालाही कित्येकवेळा खचवत गेलं की त्याच्याही मनात आत्महत्येचे विचार बळावू लागावेत… आणि तरी देखील तो त्यासगळ्याशी झटून विज्ञानासाठी पुरून उरला.

लहान मुलांना शिक्षण देताना ते गोष्टीच्या स्वरूपात असावं, ते छान रंगवून सांगावं, काल्पनिक जग त्यांच्यासमोर उभं करावं. त्याने त्यांच्या भावविश्वात होणारी खळबळ, त्यांना पडणारे प्रश्न-कुतूहल ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्यासाठी, त्यांच्या प्रगतीसाठी फार महत्त्वाच्या असतात.

आईन्स्टाईनच्या लहानपणी त्याच्या हातात आलेल्या कंपासाने त्याच्या डोक्यात प्रश्नांची रांग सुरु केली. ‘एक अदृश्य शक्ती कसं काय हे कंपासातली सुई हलवू शकते, कुठली शक्ती आहे ती, ती पाहायला मिळेल का’…. त्या ५ वर्षाच्या मुलाला हे प्रश्न पडू लागले. १२ व्या वर्षी हातात आलेल्या विज्ञानाच्या मजेदार पुस्तकांनी (Popular Books on Physical Science), त्याची कल्पनाशक्ती चाळवत गेली. ‘आपण एका इलेकट्रीकल वायरमध्ये बसून अगदी विजेच्या बाजूने जातोय, ती पाहतोय’, ह्या त्या पुस्तकातल्या कल्पनेने, त्यालाही ‘प्रकाशकिरण-प्रकाशझोत कसा असेल’, ‘आपण ते पाहता येईल का’…. या सारख्या गोष्टी डोक्यात येऊ लागल्या.

प्रश्न-चिकित्सा हे सगळं प्रगतीसाठी गरजेचे असतात. जर ‘प्रश्न विचारण्याचीच’ भीती निर्माण केली गेली, किंवा उत्तरं देण्याचं टाळत राहिलो, तर तो “विकासासाठी अडथळा” होऊ शकतो.

आईन्स्टाईनकडून शिकण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत. शाळेत गेलं, उच्च मार्कांनी पास झालं म्हणजे खूप प्रगती करालच असं काही नसतं. तुमचा विकास हा सर्वस्वी तुमच्या पॅशनवर असतो. आणि त्या पॅशनचा आणि आपल्या उच्च मार्कांचा संबंध नसतो. ना तो तुमच्या वयाशी असतो, ना परिस्थितीशी.

नोकरीसाठी स्ट्रगल करणारा आईन्स्टाईन, घरच्या परिस्थितीमुळे डिप्रेशनमध्ये जाणारा आईन्स्टाईन, संसाराच्या किचकट गोष्टींमध्ये अडकणारा आईन्स्टाईन…. आणि हे सगळं चालू असताना आपल्या डोक्यातले प्रश्न, त्यावरचे अंदाज, ते सिद्ध करून जगाला एक नवीन दिशा देणारा आईन्स्टाईन.
—————-

आईन्स्टाईनने १९०५ मध्ये सहा प्रबंध लिहिले, त्या वर्षाला आईन्स्टाईनचं ‘चमत्कारिक वर्ष’ म्हटलं जातं (annus mirabilis). त्यातले ३ प्रबंध हे फिजिक्सच्या दुनियेला ‘उथल-पुथल’ करणारे होते. आणि त्याचा फायदा भौतिकशास्त्राशी जोडलेल्या प्रत्येक क्षेत्राला होणार होता. आणि हे सगळं तो फावल्या वेळात, आपला नोकरी-धंदा करून करायचा. ब्राऊनियन मोशनमधून त्याने कणामधील रेणूंच्या टक्करा दाखवून, ‘अनु-रेणू’ विश्व समजायला सोपं केलं. स्पेशल थिअरीबद्दल किती बोलावं आणि किती नाही… त्यानंतरची ‘जनरल थिअरी’ हा शोध म्हणजे, बाकी शोध एकवेळ ठीक, पण आईन्स्टाईनशिवाय ही थिअरी कुणीही मांडू शकला नसता, असं त्याकाळी म्हटलं जाऊ लागलं. रातोरात स्टार झाला तो.

त्याला मिळालेलं नोबेल हे, ‘फोटो-इलेकट्रीक इफेक्ट साठी होतं. कारण स्पेशल थिअरीबद्दल (थिअरी ऑफ रॅलेटिव्हिटी), एकमत होत नव्हतं.
‘फोटो-इलेकट्रीक इफेक्ट’ हे त्याचं सर्वात महत्त्वाचं काम होतंच, पण जनरल थिअरीची गोष्टच निराळी होती. साक्षात न्यूटनला शह द्यायचा होता, त्याच्या सिद्धांतांना तडा लागणार होता.

फोटोइलेक्ट्रिक इफेक्टनेदेखील बऱ्याच गोष्टी बदलणार होत्या. त्यातली सर्वात मोठी गोष्ट होती ती, आईन्स्टाईनचं प्रकाशाला कण मानणं. आतापर्यंत प्रकाश ही लहर (Wave) आहे असं सिद्ध करण्यात आलं होतं. आणि आईन्स्टाईनने ‘फोटॉन्स’ ह्या कणांनी प्रकाशकिरण बनलेला असतो, हे सांगितलं. क्लासिक विज्ञानात हे बसणारं नव्हतंच. मॅक्सवेलने इलेकट्रोमॅग्नेटीक लहरीसारखंच प्रकाश ही लहर आहे म्हटलं, पण त्या लहरींचं माध्यम काय ? जसं आवाजासाठी हवा हे माध्यम, तसं प्रकाशकिरण हे जर लहर असेल, तर मग ते माध्यम कुठलं कळेना झालं. आणि त्यावर तोडगा म्हणून वातावरणात ‘ईथर’ असं अदृश्य-काल्पनिक काही पसरलेलं आहे, असं ठरवण्यात आलं. अर्थात आईन्स्टाईनने सगळं निकालात काढलं. ईथर शोधण्याचा कित्येक वर्ष प्रयत्न झाला, पण ते काही सापडलं नाही.

असं नव्हतं की आधी कोणीच ‘टाइम मशीन’ वगैरेचा विचार केला नव्हता. आधीही चौथं डायमेन्शनची कल्पना केली होतीच. पण सर्वांनी चौथं डायमेन्शन स्पेसच्या कल्पने पलीकडे केलं नाही. आणि आईन्स्टाईनने चौथ्या डायमेन्शनची सांगड घातली वेळेशी.

स्पेशल थियरी, म्हणजे सापेक्षतावाद लिहिताना त्याने काय नक्की खाल्लं होतं कुणास ठाऊक. कारण ती संकल्पनाच पूर्ण वेगळी होती. आधीच्या क्लासिकल विज्ञानाप्रमाणे, फ्रेम ऑफ रेफरन्सचा विचार केला गेला, तर अंतर, वेळ हे सगळं सारखंच राहणार होतं. कोणीही, कुठूनही, कधीही मोजा – अंतर,वेळ सारखंच. पर आईन्स्टाईन तो आईन्स्टाईन है भाई. तो ‘वेळ आणि अंतर’ हे दोन्ही सापेक्ष ठरवून मोकळा झाला. आणि हे कोणालाही झेपण्यासारखं नव्हतं. कारण ते कसं शक्य होईल ? मुंबईत बसलेली व्यक्ती आणि पुण्यात बसलेली व्यक्ती, दोघांमधलं अंतर एकच असणार आहे, आणि वेळ देखील एकच, आणि जरी त्यातली एखादी व्यक्ती फिरत्या बसमध्ये असली, तरी वेळ थोडीच बदलणार आहे ? ती देखील सारखीच असणार, मग हा काय बोलतोय वेगळं असणार ?

आईन्स्टाईनच्या मताप्रमाणे आपण प्रत्येकजण आपलं स्वतःचं घड्याळ घेऊन फिरतो. आणि ते घड्याळ प्रकाशाच्या वेगावर अवलंबून असणार. रोजच्या दैनंदिन जीवनात, अगदी आपण ५०० किमीप्रतीतास जरी गेलो तरी आपण कधीही प्रकाशाच्या वेगाच्या किंचितही जवळ जात नाही. आणि ह्यासाठी त्याने “L = L0((1 – v2/c2))1/2”, हे समीकरण मांडलं. ज्यात C हा प्रकाशाचा वेग, जो ३ लाख मीटरप्रती सेकंद असतो, आणि त्याचाही वर्ग…. त्यामुळे आपल्या दैनंदिन गतीने आपल्याला वेळ सापेक्ष वाटणार नाही.

पण या समीकरणाने, जर आपण प्रकाशाच्या वेगाने जाऊ लागलो (जे आज शक्य नाही), तर स्थिर असणाऱ्या माणसाच्या घड्याळात आणि आपल्या घड्याळात अंतर जाणवेल. आपलं घड्याळ चक्क थांबलेलं असेल. आणि त्याहून वेगात गेलो, तर मग ‘टाईम मशीन’, म्हणजेच आपण भूतकाळात जाऊ शकू.
अर्थात हे सगळंच एकंदर झेपण्यासारखं नव्हतं. कारण एकतर येवढ्या गतीचा विचार करणं शक्य नव्हतं. आणि दुसरं ‘ट्विन पॅराडॉक्स’.
यावर Interstellar नावाचा खूप सुंदर चित्रपट येऊन गेला. ज्यात बाप ब्लॅकहोलमध्ये अडकतो, आणि जेव्हा तो परत येतो, तेव्हा त्याची लहान मुलगी ही त्याच्याहूनही दुपटीने मोठी झालेली असते, तर तो तरुणच असतो. अर्थात तो चित्रपट देखील झेपला नाहीच कित्येकांना. (Inception देखील न झेपणारा)

जसं आईन्स्टाईनने अंतर आणि वेळ, यातली गुंतागुंत बाजूला केली, तसं त्याने वस्तुमान ऊर्जा, या दोघांमधलं नातं शोधून दाखवलं. आणि ते करताना त्याने जगाला दिलं एक प्रसिद्ध समीकरण, “E = mc2”. या समीकरणाने हळूहळू सर्व प्रश्नांची उत्तरं मिळू लागली. खगोलशास्त्रासाठी ते फार मोलाचं ठरणार होतं.

प्रकाशकिरण हा कणांनी बनलेला आहे, लहर नाही… हे सिद्ध करणं प्रचंड अवघड होतं. कारण न्यूटनच्या नियमाप्रमाणे गुरुत्वाकर्षणाने प्रकाशकिरण जे वाकतील, ते आईन्स्टाईनच्या ‘वक्र स्पेस’ च्या गणिताप्रमाणे, जास्त वाकणार होते. मग दुसरीकडून आलेले प्रकाशकिरण सूर्याजवळून जाताना किती वाकतात, हे पाहायचं ठरलं, पण कसं ? प्रकाशकिरण लक्ख प्रकाशात कसं मोजता येतील, पाहता येतील ? आणि त्यावर आईन्स्टाईनने ‘सूर्यग्रहण’ असताना ते मोजण्याचं सुचवलं. हा प्रयोग म्हणजे जगातला सर्वात मोठा प्रयोग होता. सर्व विज्ञानप्रेमी याकडे डोळा लावून बसलेले. न्यूटन, आईन्स्टाईन आणि साक्षात सूर्य.
अर्थात आईन्स्टाईन खरा ठरला आणि न्यूटनचा सिद्धांत फोल ठरला.

शंभर वर्षांपूर्वी लिहून ठेवलेली जनरल थिअरी आणि त्यातली ‘वक्र स्पेसची’ संकल्पना, गुरुत्वाकर्षण हे दुसरं-तिसरं काही नसून, आपल्या सभोवतालची स्पेस वक्र असल्यामुळे घरंगळत खाली जाणे किंवा सभोवताली फिरणे होय…. हे फेब्रुवारी २०१६ ला सिद्ध झालं.

——————————————

आईन्स्टाईनने कधी स्वतःला नास्तिकही म्हणून घेतलं नाही, ना त्याने कुठला देव-धर्म यावर विश्वास ठेवला. तो म्हणायचा,
“आपण एक लहान मूल आहोत आणि आपल्यासमोर एक मोठी लायब्ररी आहे. त्यात असंख्य वेगवेगळ्या भाषेतली पुस्तकं आहेत. आणि मला माहित नाही हे काय आहे, पण मी एका लहान मुलासारखं उत्सुक आहे, ते “काय” शोधण्यासाठी”

काही लोकं संसारासाठी बनेलेलीच नसतात. बायका-मुलं-बाळं त्यांना बंधिस्त करू शकत नाहीत. त्यांच्या डोक्यात असणाऱ्या गोष्टी त्यांच्यासाठी महत्त्वाच्या असतात. आणि त्याच्यासाठीच त्यांच्याकडे वेळ असतो. नुसतं अन्न-निवारा याची सोय करायची आणि अंडी टाकून ती वाढवत राहायची, आणि एक दिवस ‘अलविदा’.. छे हे कसलं लाईफ. जनावरं काय वेगळं करतात. काहीतरी ठोस असायला हवं. मनातलं ध्येय पूर्ण करता यायला हवं. आयुष्याचं चीज व्हावं, असं काहीतरी. कदाचित आपल्या सामान्यांच्या बाबतीत, ते ‘काहीतरी’ काय, हे शोधण्यातच आयुष्य जातं.

आईन्स्टाईनला खरंतर आपलं मरण पुढे ढकलता आलं असतं. पण त्याने सर्जरीसाठी नकार दिला. तो म्हणाला,

“मला या जगातून तेव्हा जायचंय, जेव्हा मला वाटेल. कृत्रिमपणे आयुष्य जगवत ठेवण्यात ती मजा नाही. मी माझ्या वाटचं काम केलेलं आहे. आता माझी जायची वेळ झाली. मी ते शांतपणे करेन”

आणि १८ एप्रिल १९५५ ला अल्बर्ट आईन्स्टाईनने स्वइच्छेने दिमाखात एग्झिट घेतली.

—————————

“प्रिय आईन्स्टाईन,

तू मला कुठल्याही शक्तीशाली-धैर्यवान राजां-महाराजांहून, कुठल्याही महापुरुषांहून, इतिहासातल्या कुठल्याही ग्रेट पात्रांहून फार उच्च वाटतोस. तुझ्या जयंतीला-पुण्यतिथीला लोक रस्त्यावर येत नाहीत. तुला एकेरी बोललं म्हणून कधी तुझा अपमान झाला नाही. तुला शिव्या घातल्या, टिंगल उडवली म्हणून कुणी कुणावर धावून जात नाही. तू आमच्यासारख्या, ज्याचं तुझ्यावर जीवापाड प्रेम आहे, अशा कुणासाठीही तू कधी अस्मितेचा प्रश्नही झाला नाहीस. आमच्या भावना तुझ्याबद्दलच्या सच्च्या आहेत आणि त्या मनापासून आहेत. त्याचा दिखावा करण्याची आम्हाला कधी गरज भासली नाही.

‘आईन्स्टाईन आज तू हवा होतास’ , असं रडगाणं देखील आम्ही गाणार नाही. कारण हजार वर्ष जगला असतास तरी ते आम्हाला कमीच वाटलं असतं. पण तरी टाईम मशीन बनवून गेला असतास तर आलो असतो तुला भेटायला. तुझ्या कुरळ्या केसांतून हात फिरवताना, अंतराळात विखुरलेल्या असंख्य प्रकाशकिरणांच्या कणांमधून हात फिरवल्यासारखं वाटलं असतं. पण जे दिलंस तेही खूप, पुरून उरण्यासारखं. शंभर वर्षांनंतरही तुझ्या थिअरीज अजून कुणी खोडू शकला नाही. पण ते कुणीतरी खोडून काढावं आणि जे सिद्ध आहे ते पुढे स्वीकरावं, असं मनोमन वाटतं देखील. यालाच आपण प्रगती म्हणू ना ?

काश, आम्ही तुझा ध्यास घेतला असता, तुझ्यासारखं होण्याची स्वप्न पाहिली असती. काश आम्ही राजकारणात गुंतून न पडता खऱ्या अर्थाने विज्ञान, ज्ञान याला महत्त्व दिलं असतं. काश ‘वैज्ञानिक दृष्टिकोन’ बाळगा सांगणारं संविधान आम्ही मनापासून जपलं असतं. हे सगळं घडेल आणि असा विचार करणं हा देखील एक पॅराडॉक्स आहेच आमचा. पण कधीतरी तो खरा व्हावा, येवढंच”

(लेखक अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)

Previous articleपत्रकारितेवर घोंगावणारं खरं संकट
Next articleहिंदुराष्ट्र ही महाभयानक आपत्ती : डॉ. बाबासाहेबांचा इशारा
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.