– उत्पल व्ही. बी.
ते एकदा म्हणाले, बागेत प्रेम करू नका.
म्हणजे प्रेम चालेल. पण जास्त स्पर्श नाही.
कारण प्रेम त्यातल्या त्यात चांगलं असतं. डोळयात डोळे घालून बसलं की रोमँटिक असतं. पण जास्त स्पर्श वाईट.
मग हे म्हणाले, पण आम्हाला स्पर्श करावासा वाटतो. आणि आम्हाला एकांत नाही.
ते म्हणाले, मग घरी जा.
हे म्हणाले, घरी आई-वडील आहेत. आणि ते अजून लहान आहेत. त्यांना या गोष्टी कळत नाहीत.
ते म्हणाले, तो तुमचा प्रश्न आहे.
मग ते म्हणाले, लग्नाआधी शरीरसुख अनैतिक. वाईट.
हे म्हणाले, का?
ते म्हणाले, माणूस बिघडतो.
हे म्हणाले, मग तो बिघडणार नाही याकरता आपण एकत्र बसून मार्ग काढू.
ते म्हणाले, छे! असं खूप करून बघितलं, जमलं नाही म्हणून तर लग्नाची आयडिया काढली.
हे म्हणाले, पण आता काळ बदलला आहे.
ते म्हणाले, असं काही नसतं. माणसं शेवटी सारखीच.
हे म्हणाले, असं कसं? बऱ्याच ठिकाणी लग्नाआधी संबंध येतात. आणि तरी ते लग्न करतात, वेगळ्या माणसाशीही. आणि आनंदातही राहतात.
ते म्हणाले, असं क्वचित कुठेतरी होतं. आणि अमेरिकेत बघा, कुटुंबं कशी मोडतायत ती.
हे म्हणाले, पण अमेरिकेत हुंडाबळी होत नाही.
ते म्हणाले, चूप बसा. वाईट गोष्टी सगळीकडेच असतात. अशा नाहीतर तशा. पण आपलीच संस्कृती श्रेष्ठ आहे.
हे म्हणाले, हो ना. मग आपण आपल्या संस्कृतीच्या भक्कम आधारावर लैंगिक सुखाला मोकळीक देऊ शकतो.
ते म्हणाले, काहीतरीच. पण कसं काय?
हे म्हणाले, म्हणजे आपल्या संस्कृतीत कुटुंब महत्त्वाचं आहे. ते योग्यच. मग या भक्कम व्यवस्थेत वयात आलेल्या मुला मुलींनी संमतीने आपापसात संबंध ठेवावेत. आई-बाबांना याची कल्पना असल्यास उत्तम. आणि मुला-मुलींनीही हवं ते मिळतं आहे म्हणून भरकटू नये.
ते म्हणाले, असं होत नाही.
हे म्हणाले, का नाही होत? नियोजन होतं तसं नियमन का नाही होऊ शकत? म्हणजे लैंगिक गरजेचा प्रश्न व्यक्ती व्यक्तींनीच सोडवावा अशी रचना आपण का नाही करू शकत?
ते म्हणाले, माणसं मोकाट सुटतात अशानं.
हे म्हणाले, हे गृहीतक झालं. पण मूल्यशिक्षण आणि लैंगिक स्वातंत्र्य दोन्ही साध्य होऊ शकतं. एक मुलगा आणि एक मुलगी संभोगोत्तर संतसाहित्याबद्दल बोलत आहेत असं का नाही होऊ शकत?
ते म्हणाले, भयंकर काहीतरी बोलू नका.
हे म्हणाले, अहो आपल्याला याची सवय नाही म्हणून. पण नियमन होऊ शकतं. भावनिक-शारीरिक विरेचन आणि वैचारिक विकास यांचा मेळ का नाही बसू शकणार?
ते म्हणाले, असं होत नाही.
हे म्हणाले, का? प्रयत्न तर करू.
ते म्हणाले, तुम्ही गप्प बसा हो.
पुढे ते म्हणाले, स्त्री आणि पुरूष यांच्यातच फक्त संबंध यायला हवेत. समलिंगी संबंध हा गुन्हा आहे.
हे म्हणाले, अहो पण ती माणसं आहेत. त्यांच्या इच्छेचं काय? त्यांना वाटतंय तेही प्रेमच आहे. जसं स्त्री पुरूषांना एकमेकांबद्दल वाटतं तसं.
ते म्हणाले, ही थेरं बाहेरून आलेली आहेत.
हे म्हणाले, अहो हे नैसर्गिक आहे. आपल्या इतिहासातही हे दिसतं.
ते म्हणाले, वाटेल ते बोलू नका. आपला इतिहास थोर आहे.
हे (कंटाळून) म्हणाले, बरं बरं. पण हा अन्याय आहे ना त्या माणसांवर.
ते म्हणाले, त्याची काळजी तुम्ही करू नका.
हे म्हणाले, का? आपण तर म्हणतो सगळे भारतीय माझे बांधव आहेत म्हणून.
ते म्हणाले, तुम्ही फार बोललात.
हे म्हणाले, छे! आत्ता कुठे सुरूवात केलीय.
अजून बरेच प्रश्न बाकी आहेत.
–