साभार: दिव्य मराठी
-वसुंधरा काशिकर
व्हॅलेंटाईन डे निमित्ताने प्रेमावरची गझल निवडावी असं मनात होतं. उर्दू शायरीमध्ये सर्वात जास्त गझला प्रेम आणि प्रेमभंगातून आलेलं दु:ख यावर आढळतील. मग वेगवेगळ्या पर्यायांमधून नेमकी कुठली गझल यानिमित्त घ्यावी असा थोडा संभ्रम निर्माण झाला. पण मनाने निर्विवाद कौल दिला की ‘होशवालोंको ख़बर क्या’ हिच घ्यायची.. प्रेम या दैवी आणि शाश्वत भावनेचं इतकं यथार्थ वर्णन करणारी दुसरी सुंदर गझल मला सापडली नाही. मुख्य म्हणजे कुठलाही नकारात्मक, दु:खाचा, अपेक्षाभंगाचा, क्षोभाचा, उदासिनतेचा, स्व-करुणेचा असा भाव ही गझल व्यक्त करत नाही. मुसलसल प्रकाराचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे ही गझल होय. या गझलेतले सर्व शेऱ हे एकच विषय आणि भाव घेऊन लिहिले आहे. आणि शायर आहेत अर्थातच पद्मश्री, जनाब निदा फ़ाज़ली साहेब!
साधं-सोपं तरीही अतिशय दर्जेदार लिखाण हे निदा फ़ाज़लींच्या लिखाणाचं वैशिष्ट्य! जीवनातलं गहनातलं गहन तत्वज्ञान ते खूप सोपं करुन सांगतात..अगदी ओशो करत तसं! व्यक्तिगत आयुष्यात खूप जटिलता बघितल्याशिवाय असं सोपं लिहिता येत नाही. निदांच्या लिखाणाचं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ते सतत प्रश्न विचारतात..कधी थेट, कधी सूचक. इथेही त्यांनी सुरूवात प्रश्नानेच केली आहे.. प्रेमाच्या बेहोशीत जगणाऱ्यांना काय आनंद प्राप्त होतो ते सतत सजग, सावध राहणाऱ्या व्यवहारी/हिशेबी माणसांना काय कळणार? जीवनातलं सत्य समजून घ्यायचं असेल तर आधी प्रेम करायला शिका..असा सल्लाही ते व्यवहारी माणसांना देतात.
संतांपासून ते शायरांपर्यंत आणि तत्वज्ञांपासून ते मानसशास्त्रज्ञांपर्यंत अनेकांचा प्रेम हा चिंतनाचा विषय राहिला आहे. कारण तो नैसर्गिक आहे. अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांसोबत प्रेम करणं आणि प्रेम करवून घेणं ही माणसाची मूलभूत अशी शारीरिक आणि मानसिक गरज आहे. तुम्ही प्रेमात पडता तेव्हा काय होत नाही…तुम्ही सुंदर दिसायला लागता…तुमच्या शरीरात जास्त डोपामाईन पाझरायला लागतं…सकाळी उठल्या उठल्या हे जग किती सुंदर आहे ही भावना निर्माण होते…तुमचं अवघं जगणं म्हणजे उत्सव होऊन जातं…
ज्या व्यक्तीवर आपण प्रेम करतो तीच्या नुसत्या दर्शनाने जग वेगळं दिसायला लागतं…रौशन फ़िज़ाये हो गयी…अरे तेच तर आकाश आहे..तेच रस्ते…तीच घरं पण सगळं कसं बदलून गेलंय…आज जाना प्यार की जादूगरी क्या चीज़ है…
खरं सांगू प्रेमात असताना कष्ट हे कष्ट वाटत नाही. पंगूं लंघयते गिरीम्…त्यात यत्कृपा तमहं वंदे असं म्हणण्याऐवजी…प्रेमाची कृपा झाली तर पांगळाही पर्वत चढून जाईल असं म्हणायला पाहिजे.
प्रेमात होणारी सर्वात सुंदर गोष्ट म्हणजे माणूस अहंकार विसरतो…(लग्नानंतर काही काळात परत अहंकाराचे फणे निघतात तो भाग अलाहिदा) ???? आणि जीवनातलं सगळं जडत्व अहंकारामुळेच तर आहे..
कबीर म्हणतात-
प्रेम गली अति साकरी, उसमें न दूजा समाय
जहा मैँ हूँ वहा हरी नही, जहा हरी है वहा मैं नही
प्रेमाची ही गल्ली अतिशय अरुंद अशी आहे. त्यात एकावेळी एकच व्यक्ती मावू शकतो. परमेश्वर असेल तर ‘मी’ नाही आणि ‘मी’ असेल तर परमेश्वर नाही.
इश़्क म्हणजे आपोआप विरघळून जाणं.
तेरा जमाल (सौंदर्य) है, तेरा ख़्याल है, तू है
मुझे ये फुर्सते-काविश(प्रयत्न) कहाँ कि क्या हूं मैं..
प्रेमात काय हद्द गाठावी..किती बुडून जावं…किती एखाद्या व्यक्तीने किती अणू—रेणू व्यापून टाकावा…
परवीन शाकीर म्हणतात..
उंगलियों को तराश दूं फिर भी
आदतन उसका नाम लिखेंगी…
बोटं कापली तरी सवयीने त्याचंच नाव लिहिलं जाईल…
प्रेमाला भाषा लागत नाही…प्रेमाचीच मुळात वेगळी भाषा असते.. खुलती ज़ुल्फों ने सिखायी…शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांनी मोठा सुंदर किस्सा सांगितला होता. एकदा ते इंदिरा गांधींना भेटायला दिल्लीला त्यांच्या घरी गेले. तिथे बैठकीत दोन वेगवेगळ्या कोपऱ्यात राजीव गांधी आणि सोनिया गांधी बसले होते. शरद जोशी म्हणाले की, राजीव आणि सोनिया एकमेकांपासून दूर अंतरावर बसले तरी कळत होतं की, ते एकमेकांच्या किती गाढ प्रेमात आहे! (संदर्भ- शरद जोशी:शोध अस्वस्थ कल्लोळाचा)
प्रेमात वेगळी नशा करावी लागत नाही…झुकती आँखो ने बताया मैकशी क्या चीज़ है…प्रेम व्यक्त करताना भीती का वाटत असावी बरं…तीने किंवा त्याने नकार दिला तर? हा एक भाग आणि दुसरा भाग म्हणजे स्वच्छ, कोवळ्या आणि निरागस प्रेमात संकोच हा असतोच आणि तो भलताच रोमँटिक, सुंदर दिसतो…मग कसं बोलू, कधी बोलू अशी घालमेल होत राहते…
मला एक मोठा मजेदार प्रसंग आठवतो आहे. एकदा माझ्या बहिणीसोबत दवाखान्यात गेले होते. वेळ रात्रीची होती. दवाखान्यातून बाहेर पडल्यावर आम्ही घरी जाण्यासाठी ऑटो शोधत होतो. तेवढ्यात दोन विशीची मुलं रस्त्यावरून जात होती. एक मुलगा तावातावाने बेभान होऊन बोलत होता. आपण रस्त्याने जात आहोत. आजूबाजूला लोक आहे याचंही भान त्याला नव्हतं..(बेख़ुदी)
त्याचं एक वाक्य मला ऐकू आलं..तो जोरजोरात हातवारे करत म्हणाला…’सालं…आता जे व्हायचं ते होऊ दे…उदया तीला प्रपोज करुन फैसला करतोच’…
मला हसू आवरेना. पण नंतर लक्षात आलं…त्याला प्रेम व्यक्त करता येत नव्हतं..अन् तीच्यापर्यंत ते पोहोचत नव्हतं…और वो समझे नहीं ये ख़ामोशी क्या चीज़ है…
तर असं हे प्रेम! प्रेयसी ते परमेश्वरापर्यंत पोहोचवणारं…!
ग़ालिब म्हणतात..
तारों में चमक, फुलों में रंगत ना रहेगी
कुछ भी ना रहेगा, जो मोहब्बत ना रहेगी..
‘सरफरोश’ सिनेमातली नसरुद्दीन शाह, अमीर खान आणि सोनाली बेंद्रे यांच्यावर चित्रित झालेली ही गझल…तरुणांमध्ये प्रचंड लोकप्रिय ठरली.. निदा फ़ाज़ली कोण तर ‘होशवालों को ख़बर क्या’ लिहिणारे…अशी परत एक ओळख या गझलेने निदांना आणि जगजीतला मिळवून दिली. जतीन-ललित यांचं अप्रतीम मेलोडियस संगीत..जगजीतचा आवाज..सुरूवातीचं नुसतं हमिंग ऐकलं तरी मूड बदलण्याची ताकद या गझलमध्ये आहे…हमिंगमध्ये वाजणारा छोटासा बासरीचा piece फारच नाजूक..पहिल्या शेरच्या सुरूवातीला वाजणारा सॅक्सोफोन प्रचंड रोमँटिक..दुसऱ्या शेरच्या आधी वाजणारा सतारचा piece…फारच पवित्र…हे pieces यावेळी नक्की लक्ष देऊन ऐका. आणखी एक व्हिडिओ यू ट्यूबवर जरूर बघा. जगजीत यांनी सिंगापूर येथील कार्यक्रमात गायलेल्या गझलेचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. त्यात पहिल्या शेरच्या सुरूवातीला गिटारिस्ट चिंटू सिंग याने गिटारचा piece मस्त वाजवला आहे. दुसऱ्या शेरच्या सुरूवातील दिपक पंडीत यांनी फार ग्रेट व्हायोलिन वाजवला आहे…वेगळ्या स्टाईलने ही गझल जगजीत यांनी लाईव्हमध्ये गायली आहे…आणि खुलती ज़ुल्फोनें सिखायी म्हणताना ऑडियन्समध्ये बसलेली एक मुलगी केसांमधून हात फिरवतानाचा क्षण कॅमेरामनने अचूक पकडला आहे. ते पण बघा…
स्वत:ला तसूभरही वाहवत जाऊ न देता..कठोरपणे व्यवहार सांभाळणारे लौकिकार्थानं यशस्वी असतीलही..पण त्यांचं जीवन हे खोखलं असेल, पोकळ असेल.. व्यवहार म्हणजे तर्क आणि प्रेम म्हणजे अनुभूती. रजनीश म्हणतात…’जब भी तर्क और अनुभूती में दौड होगी..तर्क हार जायेगा और अनुभूती जीत जायेगी’
पदरी घोर निराशा, दु:ख, वंचनेची वेदना, अपमान, प्रतारणा, गृहीत धरणं, वापरल्या गेल्याची भावना, यातल्या एक किंवा असंख्य गोष्टी आल्या तरीही प्रेम करावं, समर्पण करावं, करत रहावं कारण मुक्तीचा तोच एक मार्ग आहे. त्यात ठोकरा खाणं, पडणं, जखमी होणं, विव्हळ होणं हे worth आहे. प्रेमात धोके खाऊन, ठोकरा खाऊनही ज्यांच्यात कडवटपणा आलेला नाही, उलट ते अधिक कनवाळू झाले आहेत अशा सर्वांना मला सलाम करावासा वाटतो.
‘प्यार में डुबा हुआ हर व्यक्ती बुद्ध होता है’ असं म्हणतात ते उगीच नाही.
प्रेम जीवन भारविरहीत करतं. रजनीशांनी सांगितलेली गोष्ट आठवतेय. त्यांना एका माणसाने प्रश्न विचारला होता, तो म्हणाला, माझ्याजवळ पैसा, प्रसिद्धी, सुंदर बायको,मुलं असं सर्व काही आहे. तरीही मला सतत काहीतरी कमी जाणवतेय. त्यावर रजनीशांनी उत्तर दिलं की, निश्चित ही तुम्हारे जीवन दर्शन में कोई चूक है.. त्यांनी पुढील गोष्ट सांगितली. एक साधू एक गाठोडं घेऊन एक टेकडी चढत असतो. वजनी गाठोडं घेऊन साधू घामाघूम झाला असतो. तेवढ्यात त्याला एक ७ वर्षांची मुलगी आपल्या २ वर्षांच्या लहान भावाला घेऊन टेकडी चढताना दिसते. साधू तीला विचारतो, ‘बेटा इतकं ओझं घेऊन तू टेकडी चढते आहेस. तू थकशील नं’…
मुलगी त्वरीत उत्तर देते, ‘महात्मन, बोझ तो आप उठा रहे हैं..मेरे पीठ पर मेरा भाई हैं’…
ओझं आणि भाऊ यातला फरक काय चट्कन सांगितला त्या मुलीनं.
‘जहाँ प्रेम होता है वहाँ जीवन निर्भार हो जाता है’….निर्भार होने के लिए होश गवाओं और बेख़ुदी में डूब जाओ…व्हॅलेंटाईन डे च्या शुभेच्छांसह!
होशवालों को ख़बर क्या बेख़ुदी क्या चीज़ है
इश्क़ किजीये फिर समझीये ज़िंदगी क्या चीज़ है
उनसे नज़रे क्या मिली रौशन फ़िज़ाए हो गयी
आज जाना प्यार की जादुगरी क्या चीज़ है
खुलती ज़ुल्फो ने सिखायी मौसमों को शायरी
झुकती आँखो ने बताया मैकशी क्या चीज़ है
हम लबों से केह ना पाये उन से हाल-ए-दिल कभी
और वो समझे नही ये ख़ामोशी क्या चीज़ है
निदा फ़ाज़ली
नक्की बघा, ऐका -होशवालों को ख़बर क्या ..https://www.youtube.com/watch?v=hZuwe72Rtcc