‘वाळवी’: रोचक, मनोरंजक आणि उत्तम कथानक असेलला चित्रपट

-सानिया भालेराव

परेश मोकाशी या अत्यंत हुशार आणि एक्सपेरिमेंटल सिनेमामध्ये रस असणाऱ्या दिग्दर्शकाचा “वाळवी” हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. ‘हरीशचंद्रांची फॅक्टरी’, ‘एलिझाबेथ एकादशी’ यासारखे उत्तम विषय असणारे चित्रपट याआधी परेश मोकाशी यांनी दर्शकांसमोर आणले होतेच. चित्रपटाचं कथानक आणि चित्रपटाचं नाव यांचा परस्पर युनिक असा संबंध असणं हा मोकाशींचा एक यूएसपी. ‘वाळवी’ मध्ये देखील तो फार प्रभावीपणे दिसून येतो. १३ व्या शिकागो साऊथ एशियन फिल्म फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाला ‘बेस्ट फिल्मचं’ अवॉर्ड देखील मिळालं आहे.

तर चित्रपटाची कथा मुळातच फार इंट्रेस्टिंग आहे. स्वप्नील जोशी आणि अनिता दाते नवरा बायको. स्वप्नीलचं अफेअर जिच्याशी सुरु आहे ती म्हणजे शिवानी सुर्वे. ती त्याची डेंटिस्ट असते आणि चौथं पात्रं आहे अनिताचा मानसोपचारतज्ञ सुबोध भावे याचं. या कथेत फार जबरदस्त त्रिकोण दिग्दर्शकाने आखले आहेत. मूळ सस्पेन्स अबाधित ठेवायला हवा याकारणाने चित्रपटातले बारीक आणि आवडलेले मुद्दे लिहिता येणार नाहीत आणि या बारीक जागांसाठी हा चित्रपट बघायला हवाच.

तर ट्रेलर मध्ये सुद्धा दाखवल्यानुसार स्वप्नील आणि अनिता हे जोडपं एकत्र आत्महत्या करायचं ठरवतं आणि यात स्वप्नीलचा आणि शिवानीचा प्लॅन असतो की त्याच्या बायकोचा (अनिताचा) काटा काढून टाकायचा. मग आपण सुद्धा एक मर्डर मिस्ट्री आणि झ्याक सस्पेन्स बघता येईल असा माइंडेस्ट ठेवून चित्रपट बघायला सुरवात करतो. सुरवातीला कथानकात बारीक सारीक धक्के, थ्रिलर जॉनरला अनुसरून आपल्याला बसतात. स्वप्नील जोशी यांचं कॉमिक टायमिंग आणि पात्र घडवत असतांना कथानककाराने,त्यांचं केलेलं डिटेलिंग आणि स्वभाव वैशिष्ट्य यामुळे अनिता दाते आणि शिवानी सुर्वे या दोघीही बायको आणि गर्लफ्रेंड म्हणून आपल्याला भूमिकेत शिरून जे विनोदी प्रसंग साकारतात ते क्षण लाजवाब आहेत. खरा चित्रपट सुरु होतो तो मात्र मध्यांतरानंतर. विसंगतीमधला विनोद आणि काहीसा डार्क ह्युमर हा जॉनर कथेमध्ये बसवणं आणि तो पडद्यावर दाखवणं ही तशी अवघड गोष्ट आहे, जी या दिग्दर्शकाला मात्र अचूक जमली आहे. सुबोध भावे यांनी जे पात्र साकारलं आहे ते एकदम बढिया आणि अत्यंत सहज वाटेल अशा पद्धतीने त्यांनी भूमिका साकारली आहे, ती या चित्रपटाला एका हाय पॉइंटला घेऊन पोहोचते. “पुढे आता काय अजून होणार बाबा ” असा प्रेक्षकाला विचार करायला लावणारा अर्तक्य असला तरीही रिलेटेबल वाटावा असा मॅड उत्तरार्ध आणि मग जबरदस्त एंडिंग यासाठी तर हा चित्रपट अगदी थिएटरमध्ये जाऊन पाहायलाच हवा.

नाशकात याचे शो कमी असले तरीही चित्रपटगृहांमध्ये हा सिनेमा आला आहे ही फार मोठी गोष्ट आहे. काल मी माझ्या दोन मैत्रिणींसोबत हा सिनेमा पाहिला तेव्हा साधारण तीस एक प्रेक्षक होते. आम्ही फुल्ल कल्ला करत सिनेमा पाहिला. अशा खूप जागा होत्या जिथे मनसोक्त खदाखदा हसून घेतलं आम्ही. मराठी प्रेक्षकांनी तिकीट विकत घेऊन असे दर्जेदार चित्रपट खरंतर डोक्यावर घेतले पाहिजेत. या चित्रपटांना काहीतरी मार्केटिंग गिमिक करून प्रेक्षकांच्या गळी उतरवायची गरज भासयाला नको असा मला फार आतून वाटतं. मी नेहेमी लिहिते तसं, चित्रपट फार मुश्किलीने थिएटरपर्यंत पोहोचत असतो. सगळ्यांना मग पुन्हा मार्केटिंगसाठी पैसे ओतता येत नाही आणि म्हणून अशा बेहतरीन चित्रपटाला रसिकांची दाद नक्कीच मिळायला हवी. मराठी भाषा, अस्मिता वगैरे जेव्हा आपण बोलतो तेव्हा अशा चित्रपटाला गर्दी होणं, एखादा दिगदर्शक जर मराठी सिनेमामध्ये वेगळा प्रयोग करत असेल तर एक सामान्य रसिक म्हणून तो चित्रपट पाहणं, त्याबद्दल चर्चा करणं म्हणजे अधिक लोकांपर्यंत तो पोहोचेल या साध्या गोष्टी तर आपण करूच शकतो.

मी म्हटलं तसं चित्रपटाची गोष्ट रिव्हील न करता यावर लिहिणं अवघडच आहे. पण तरीही या चित्रपटाचं शीर्षक वाचल्याक्षणी फार आतवर पोहोचलं होतं. ‘वाळवी’ हा जो कीटक आहे तो मला कायमच फार इंट्रेस्टिंग वाटायचा. म्हणजे लाकडामधलं सेल्युलोज खाणारी ही एक जमात. आतून लाकडू पोखरून काढणारी! म्हणजे बाहेरून ते दिसतं एकदम अभेद्य वगैरे पण जर वाळवी लागली त्याला, तर ती सगळं आतून पोखरून काढते आणि एक क्षण असा येतो जेव्हा वरकरणी अगदी व्यवस्थित दिसणारं लाकूड अगदी क्षणभरात कोलमडून पडतं. बघणारे अवाक होऊन जातात आणि मग आतून ठिसूळ झालेल्या त्या लाकडाच्या तुकड्यांमधून वाळवीचा जमात पुन्हा नवं दमदार लाकूड शोधायला निघते. मग प्रश्न असा होता की इतकं अमेझिंग नाव या दिगदर्शकाने दिलंच का या चित्रपटाला? आता जे हा चित्रपट पाहतील त्यांना वाटेल की या चित्रपटाचा शेवट जो आहे त्यामुळे नाव असावं ‘वाळवी’ हे.. पण आता माझ्या सारख्या फिल्मी किड्याला तर हा चित्रपट पाहत असतानाच सतत वाळवीचा आवाज कानात घुमत होताच.. चित्रपटातली पात्र ज्या पद्धतीने आपला स्वार्थ साधण्यासाठी वाट्टेल ते करताना दिसतात आणि एका पॉईंटला आपल्याला सुद्धा ‘हं ठीक आहे हे वागणं’ असं वाटायला लागतं.. त्या क्षणी आपण पॅराडॉक्सीकली त्या प्रसंगावर हसत जरी असलो तरीही स्वप्नील मधली, सुबोध मधली, शिवानी मधली ती वाळवी आपल्याला सुद्धा लागली तर नाही नं.. असं वाटून जातं… आणि मग आत थरथर जाणवते.. आपला शेवट असा होणार का? अशी शंका मनात चुकचुक करते.. मग आपण बायकोच्या प्रेताच्या बाजूला बसून चिप्स खाणारा तिचा नवरा बघतो, नसती ब्याद नको म्हणून प्रेयसीला मारणारा प्रियकर बघतो, दुसरीचा नवरा मिळावा म्हणून वाट्टेल ते करणारी बाई बघतो, जळणाऱ्या माणसाला वाचवायचं सोडून आपल्यावर नको यायला अजून काही म्हणून त्यांना जाळून टाकणारे लोक बघतो.. आणि अशा चारशे अडुसष्ट गोष्टी.. आणि हे बघत असतांना आपण देखील पॉपकॉर्न खात असतो, कॉफीचे सिप घेत असतो, प्रसंगी हसत असतो.. मग आपण त्यांच्याहून वेगळे की असेच काहीसे किडलेले?

माणूस म्हणून जगत असतांना माणुसकीच्या, तारतम्याच्या गोष्टी आपण विसरत चाललो आहोत का? ‘माझं सगळं उत्तम चालू आहे’ हे सतत सगळ्यांना भासवतांना आपल्या मनाला पोखरणाऱ्या वाळवीला आपण दृष्टी आड करतो आहोत का? आणि आहे कशाची ही वाळवी? एकटेपणाची, आर्थिक कमकुवतपणाची, एखाद्या न्यूनगंडाची , अहंकाराची, सतत खुश आहोत हे दाखवण्याची, सतत मी कसा आघाडीवर हे भासवण्याची, मी किती सुंदर, मी किती प्रसिद्ध हे प्रूव्ह करत राहण्याची, नैराश्याची, एकसुरी प्रेमाची, नाकारलेपणाची, विश्वासघाताची ? अशा हजारो गोष्टी असतील ज्या खात असतील आतून अगदी परफेक्ट दिसणाऱ्या एखाद्या व्यक्तीला.. पण ती काही बोलणार नाही.. आतल्या आत घुसमटत राहील.. सोपे, तात्पुरते मार्ग शोधेल आनंदी राहण्याचे पण वाळवीला मुळापासून काढून टाकावं लागतं नाहीतर कीड वाढत जाते.. ती पोखरत राहते त्या माणसाला आणि एक दिवस आतून पोकळपणा इतका वाढतो की ती व्यक्ती पार कोलमडून पडते आणि इतर लोक काहीही करू शकत नाही…

आता तर जेनेटिकली रिकॉम्बिनंट वाळव्या सुद्धा येत आहेत.. ज्या कचरा खातील’ प्लास्टिक खातील.. माणसाने केलेली घाण माणूस याच वाळवीकडून साफ करून घेतो आहे.. पण हीच वाळवी तर नाही नं मनुष्याला लागलेली? आपण घाण करत जायची आणि दुसऱ्याला ती साफ करायला लावायची? मग लागली आहे का अशी एखादी वाळवी आपल्याला सुद्धा? दचकायला झालं नं? आपल्याला कीड लागली आहे हे तपासून बघायची तरी हिंमत आहेत का आपल्यात हा मोठा प्रश्नच आहे.. कधी कधी मला वाटतं की हे असे सतत प्रश्न पडत राहणं हि सुद्धा आपल्याला लागेलली एक कीडच आहे.. म्हणजे कित्येक लोक जगतात वरवर.. आत काय चाललंय याचं काही देणं घेणं नाही.. आता साधं सिनेमाचं घ्या.. गेलो,पाहिला सिनेमा, आलो परत  चार घटिका मनोरंजन झालं.. संपला विषय .. पण नाही.. सिनेमाच्या नावापासून ते त्याच्या गोष्टीत घुसायचं,, सगळं कसं आत जाणवेस्तोवर अनुभवायचं.. म्हणजे नसेल सुद्धा असा अर्थ पण आपण तो काढायचा नई मग तो अर्थ कसा कथानकाशी जोडलेला हे सांगायचं..सतत अर्थ उलगडत राहायचे.. ही सुद्धा वाळवीच आहे का एक प्रकारची आपल्याला लागलेली?

असे अनेक मॅड उपद्रवी वाटणारे पण उपयुक्त असलेले प्रश्न हा चित्रपट विचारून गेला.. एक अत्यंत रोचक, मनोरंजक आणि उत्तम कथानक असेलला हा चित्रपट मराठी चित्रपटांमधला एक बढिया प्रयोग आहे. जॉनर फार वेगळा आहे सो ज्यांना प्रयोगशील, वेगळे आणि इंटलिजन्ट सिनेमा आवडतो अशांनी आवर्जून हा सिनेमा चित्रपटगृहात पाहवाच.. नंतर जर सापडली वाळवी लागलेली जागा आपल्या आत, वेळ जायच्या आत मिळालेलं ते बोनस आहे असं समजा..

[email protected]

(लेखिका नाशिक येथे MET’s Institute of Pharmacy येथे कार्यरत आहेत)

सानिया भालेराव यांचे जुने लेख वाचण्यासाठी www.mediawatch.info या वेब पोर्टलवर वरच्या बाजूला उजवीकडे ‘साईट सर्च करा’ असे जिथे लिहिलेले आहे त्याखालील चौकोनात –सानिया भालेराव– type करा आणि Search वर क्लिक करा.

Previous articleखोल काळजातल्या अंधारयक्षिणी…
Next articleवर्ध्याची वाङ्‍‍मय परंपरा 
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.