सामान्य माणसांची खूप चेष्टा झाली. शासकीय रुग्णालयात औषधांअभावी माणसं मरत असताना ‘क्लीनचीट’ मिळते…. महाराष्ट्राचा आरोग्यमंत्री कोण? त्याचे नाव मंत्रिमंडळातील सर्वांना माहितीतरी आहे का? आणि कुठे आहेत ते आरोग्यमंत्री? राज्यपालांनी त्यांना तडकाफडकी पदावरून दूर करायला हवे. जे मृत्यू पावले त्यांच्या नातेवाईकांचे शाप या सरकारला लागणार आहेत. कोरोनाचा ताे भीषण काळ आठवा… आपली माता मृत्यूशी झूंज घेत असताना आमचे त्यावेळचे आरोग्यमंत्री राजेश टोपे वणवण करत प्रत्येक रुग्णालयात फिरत होते, व्यवस्था पहात होते. ऑक्सिजन , व्हेंटिलेटर, डॅाक्टरांची उपलब्धता, स्टाफच्या अडचणी, सॅनिटाईझ करून आंबुलन्सची चोख व्यवस्था, त्या आरोग्यमंत्र्यांनी त्या काळात रात्र- रात्र जागून काढली, याची मला माहिती आहे. आईचा मृत्यू झाल्यावर, मृत्युचे दु:ख पचवून तिसऱ्या दिवशी ते कामाला बाहेर पडले. याला कर्तव्यनिष्ठा म्हणतात. महाराष्ट्रातील अनेक संस्थांनी कोरोना संपल्यावर राजेश टोपे यांचा सत्कार करून त्यांना ‘कोरोना योद्धा’ अशी सन्मानपत्रे दिली. त्या काळात Tocilizumab हे अत्यंत महत्त्वाचे इंजेक्शन रुग्णाला वाचवू शकत होते. त्याचा काळाबाजार झाल्याचे निदर्शनास आल्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी त्या इंजेक्शनचा कोठा गोठवला. आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली त्या इंजेक्शनचे नियंत्रण आणले. बाळासाहेबांनी तातडीने बैठका घेवून सगळा कोटा मुंबईच्या रॅायल केमिस्ट औषध दुकानात नियंत्रित केला. किती रुग्णांना या इंजेक्शनची गरज आहे, याचा तपशील मिळवला. मुख्य स्टॅाकिस्टकडून त्या त्या रुग्णालयात त्या-त्या रुग्णांना हे इंजेक्शन महसूल अधिकारी यांच्यामार्फत दिले जाईल, याकरिता यंत्रणा उभी केली. रुग्णालयांत तशी यंत्रणा बसवली. अनेक रुग्णालयांनी त्याबद्दल या नियोजनाचे कैातुक केले. मी ठाण्याला राहतो त्या इमारतीच्या सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रशांत कुलकर्णी व्हेंटीलेटरवर होते. ठाणे रुग्णालयाचे डॅाक्टर महेंद्र यांनी आरोग्य खात्याला तसे कळवल्यावर बाळासाहेब थोरात यांच्याकडून Tocilizumab हे इंजेक्शन त्या रुग्णाला महसूल खात्याकडून दिले गेले. त्या रुग्णाचे प्राण वाचले. बाळासाहेब थोरात यांच्या या कर्तव्यदक्ष भूमिकेचे अनेकांनी अभिनंदन केले.