सुमारांची सद्दी संपविणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स

– मोहिनी महेश मोडक

इन्फोसिसचे माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्यासह अनेक दिग्गजांनी ए-आय विषयीची भीती अनाठायी असल्याचे सांगत दिलासा दिला आहे. ते म्हणतात, ‘कॅल्क्युलेटर आला तेव्हाही आता अकाऊंटंटच्या नोकऱ्या जातील, अशी लोकांना भीती वाटत होती. बदलाचा स्वीकार आणि त्यानुसार आवश्यक त्या कौशल्यांचा अंगीकार, हेच कोणत्याही आव्हानावर मात करण्याचं सूत्र आहे.

………………………………………

घटना क्र. 1
हॉलिवूडच्या इतिहासात आजवर फक्त दोन संप झाले आहेत. दुसरा संप काही महिन्यांपूर्वी तिथल्या लेखकमंडळींनी पुकारला होता. त्यांच्या पोटावर पाय देणाऱ्या ए-आयच्या, म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सिनेक्षेत्रातील वाढत्या वापराविरोधात हा संप होता. या संपात हॉलिवूड पटकथा लेखकांच्या बाजूने स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड देखील उभी राहिली. 1,60,000 हून अधिक अभिनेते, आवाज देणारे कलाकार, सादरकर्ते यांनीही त्यांना साथ दिली. कृत्रिम बुद्धिमत्ता सर्जनशील व्यवसायांसाठी केवळ आव्हानच नव्हे तर धोका आहे; वेळीच रोखले नाही, तर ए-आय यांना अडगळीत टाकून यांच्या डोक्यावर मिरे वाटेल, अशी भीती स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्डचे अध्यक्ष फ्रॅन ड्रेशर यांनी व्यक्त केली. त्यामुळे ए-आयच्या वापराविषयी नियमावली व आवश्यक तेथे करार करण्यात यावेत, अशी संपकऱ्यांची मागणी होती. अभिनेते असोत की लेखक, दोन्ही बाजूंमधील वाटाघाटींमध्ये ‘जनरेटिव्ह एआय’चा वापर हा एक प्रमुख मुद्दा आहे. लेखक संघाने ए-आय आक्रमणापासून अभय देण्याची मागणी करत निर्मात्यांना प्रश्न केला होता; ए-आय खरोखर आम्हाला पर्याय ठरू शकेल का? कारण माणसासारखा त्याला स्रोत म्हणून वापरता येत नाही आणि युनियन करारामध्ये समाविष्ट असलेल्या कामांसाठी त्याचा वापर केला जाऊ शकत नाही.

घटना क्र. 2
व्हर्च्युअल गर्लफ्रेंडच्या चिथावणीवरून जसवंत सिंह या तरुणाने ब्रिटनची महाराणी एलिझाबेथ यांच्या हत्येचा कट रचला होता. लंडनच्या न्यायालयात जुलै महिन्यात या विषयी सुनावणी झाली. डिसेंबर 2021 मध्ये महाराणीची हत्या करण्यासाठी गेलेल्या जसवंतला पोलिसांनी आधीच अटक केली होती. जसवंत रेप्लिका या वेबसाईटवर एका ए-आय आधारित आभासी गर्लफ्रेंडशी जवळपास नऊ महिन्यांपासून बोलत असायचा. त्याने तिला पाच हजारांहून जास्त अश्लील संदेश पाठवले होते. मनोविश्लेषकांनी दोघांमधील चॅटचा अभ्यास केला, तेव्हा त्यांच्या निदर्शनास आले की, हा तरुण सामाजिकदृष्ट्या एकाकी होता, लोकांमध्ये मिसळू शकत नव्हता. ए-आय गर्लफ्रेंडने त्याच्या चुकीच्या इच्छेला खतपाणी घातले. त्यामुळे तो गुन्हा करून बसला. तो मानसिकदृष्ट्या विकृत असल्याचा तर्क फेटाळण्यात आला. जसवंत स्वत:ला स्टार वॉर्सच्या खलनायकासारखा समजत होता. आभासी गर्लफ्रेंडने त्याला परावृत्त करण्याऐवजी भडकवले, ज्याची परिणती आज जसवंतची तुरुंगात रवानगी होण्यात झाली आहे.

घटना क्र. 3
अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को शहरात ड्रायव्हरलेस टॅक्सींमुळे वाहतुकीच्या नव्या समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत. शहर अग्निशमन विभागाच्या अहवालात म्हटले आहे की, क्रूझ कंपनीच्या दोन चालकविरहित टॅक्सींनी गंभीर जखमी व्यक्तीला घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेचा मार्ग अडवला होता. त्या जखमी रुग्णाचा नंतर रुग्णालयात मृत्यू झाला. जनरल मोटर्सची उपकंपनी क्रूझने असे घडल्याचे नाकारले आहे. सॅनफ्रान्सिस्को बोर्ड ऑफ सुपरवायझरचे अध्यक्ष आरोन पेस्किन म्हणतात की, ‘मृत्यूचे कारण काहीही असले, तरी चालकविरहित कारच्या अपघातांची संख्या वाढते आहे हे नक्की.’ या टॅक्सींमुळे अग्निशमन दलाची वाहने आणि गुन्ह्यांच्या तपासासाठी जाणारी पोलिसांची वाहने थांबल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. मुळात, स्वायत्त वाहने गर्दीच्या वेळेत धावण्यासाठी अद्याप तयार नाहीत.

वरील तीनही घटना या वर्षात घडलेल्या आहेत. या विषयीच्या बातम्या प्रख्यात वृत्तपत्रात प्रसिद्ध झाल्या आहेत. ए-आयच्या वापराचा माणसाच्या जगण्यावर झालेला परिणाम, हे या तीनही घटनांचे साम्यस्थळ आहे. लेखकसंघाच्या संपाच्या घटनेचा संबंध ए-आयने मानवी सर्जनशीलतेशी सुरू केलेल्या बौद्धिक स्पर्धेशी आहे. दुसऱ्या घटनेतील आभासी गर्लफ्रेंडच्या चिथावणीतून केलेल्या गुन्ह्याचा संबंध माणसाच्या मनःस्वास्थ्यावर होणाऱ्या परिणामांशी आहे, तर तिसऱ्या घटनेतील ए-आय चलित कार अपघाताचा संबंध माणसाच्या सामाजिक आणि शारिरिक परिस्थितीशी आहे. एकूण ए-आयने माणसापुढे मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि बौद्धिक पातळीवर वेगवेगळी आणि नवनवीन आव्हाने उभी केली आहेत. प्रश्न फक्त ए-आय च्या अतिवापराचा किंवा आक्रमणाचा नाही. ए-आयने थेट माणसाला पर्याय म्हणून उभे राहण्याचा आहे. त्याच्या मुळाशी जाण्यासाठी या तीनही घटनांकडे विस्ताराने पाहू या.

खरे तर ए-आयचा वापर हॉलिवूडलाच काय, भारतीय मनोरंजन क्षेत्रालाही नवा नाही. अभिनेत्यावर कथानकानुसार वयाचा परिणाम दाखवण्यासाठी, अगदी निवृत्त अभिनेत्यांच्या आवाजाची प्रतिकृती तयार करण्यासाठी ए-आयचा वापर हॉलिवूडमध्ये झालेला आहे, मग अभिनेत्यांना आता अचानक इतकी चिंता वाटायचे कारण काय! कारण आता तिथल्या स्टुडिओना अभिनेत्यांच्या भविष्यातील डिजिटल प्रारूपांची मालकी हवी आहे. सोप्या शब्दात सांगायचे, तर अभिनेत्यांवर पूर्णपणे अवलंबून राहण्याची यानंतर स्टुडिओला गरज भासणार नाही. काही वर्षांपूर्वी वॉशिंग्टनच्या प्राध्यापकांनी संशोधन करून ए-आयच्या मदतीने प्रायोगिक तत्त्वावर बराक ओबामांचा एक व्हिडिओ तयार केला होता. त्यात ओबामा जे बोलत होते ते, ते बोलत नव्हतेच; इतकेच नव्हे तर मुदलात ते ओबामा नव्हतेच. त्यांच्या अनेक प्रतिमा, व्हिडिओ आणि आवाजाचे नमुने वापरून हुबेहुब ओबामा वाटतील, असे त्यांचे डिजिटल रूप होते. मिशेल ओबामांनासुद्धा बुचकळ्यात पाडेल, इतके ते अस्सल वाटते. त्याच्या लकबी, आवाज, संवादफेक, हावभाव सारे काही खऱ्या ओबामांप्रमाणेच होते. याला डीप-फेक तंत्र म्हटले जाते. (हा व्हिडिओ यू ट्यूबबर उपलब्ध आहे.)

अशा स्वरूपाची एक यशस्वी चाचणी भारतात मदुराईतल्या गावांमध्ये करण्यात आली आहे. एका गायकाच्या ‘डिजिटल क्लोन’ला या गायकाच्या आवाजाचे अनेक नमुने पुरवून त्याच्या हरकती शिकवण्यात आल्यात. याचा अर्थ, त्याच्या मृत्यूनंतरही तो डिजिटली गात राहू शकेल. सोनू निगम किंवा अरिजित सिंगने म्हटलेले गाणे आज हयात नसलेल्या किशोरकुमार किंवा रफीच्या स्वरात आपण विविध रील्सवर ऐकू शकतो आहोत किंवा पेटीएमच्या ग्राहकांना खात्यातील व्यवहाराचा प्रत्येक ध्वनिसंदेश चक्क अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ऐकायला मिळतो आहे ते याच तंत्रज्ञानामुळे. चित्र विकता येते पण चित्रकाराचे हात नाहीत, असे आजवर आपण मानत होतो, पण असे आता वेगळ्या अर्थाने घडू शकते आहे. कलाकाराचा आवाज, त्याची शैली, नर्तनाची पद्धत, अभिनेत्याचे तर अवघ्या व्यक्तिमत्त्वाचे हक्क विकता येऊ शकतील. थोडक्यात एखाद्या अभिनेत्याच्या तारखा मिळत नसतील, तर त्याचे डिजिटल रूप तेवढे काम सहज भागवेल. पुनरुत्पादनात ते अस्सल भासावे याची काळजी अर्थातच ए-आय घेईल. अर्थात, अनधिकृत क्लोनिंगमधून निर्माण होणाऱ्या समस्या भविष्यात वाढून ठेवलेल्या आहेतच. डीप फेकमुळे सत्य असत्यामधली सीमारेषा धूसरच नव्हे, तर नष्ट होऊ शकते. त्यामुळे दिवंगत भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि उद्योजक एलोन मस्क यांसारख्या कित्येकांनी ‘डिजिटल अमरत्वा’च्या संभाव्य धोक्यांबद्दल समाजाला सचेत केले आहे.

ए-आयचा वापर डिजिटल चित्रकारितेत होतो आहे. डॅल-ई-2 सारखे मंच त्यासाठी उपलब्ध झाले आहेत. ए-आय आधारित संगीत देणारे अ‍ॅप्स उपलब्ध झाले आहेत; पण त्याला लेखन कसे शक्य आहे, असे आपल्याला वाटेल. यू ट्यूब ओरिजिनल्सने ‘द एज ऑफ ए-आय’ नावाची नऊ भागांची मालिका तीन वर्षांपूर्वीच यू ट्यूबवर आणली आहे. यात या क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींनी केलेले प्रयोग, वास्तव चित्रण आणि भाकिते आहेत. यातील एका भागात रास या टेक आर्टिस्टने एका उत्तम लेखकाच्या साहाय्याने एक ‘बेंजामिन’ नावाचा चाचणीपुरता रोबो लेखक तयार केल्याचे आपण पाहू शकतो. रोबो लेखकाबद्दल तज्ज्ञांचे मत आहे की कलानिर्मितीसाठी प्रोग्राम तयार करणे, हे तांत्रिक प्रॉब्लेम सॉल्विंगपेक्षा जास्त सोपे आहे. आज प्रचंड लोकप्रिय असलेला ChatGPT (Generative Pre-trained Transformer) मेमो, पत्र, निबंध, लेख, प्रबंध, कविता, नाट्यप्रवेश असे अनेक लेखनप्रकार सहज हाताळू शकतो. म्हणाल तितक्या शब्दांमध्ये किंवा ओळींमध्ये, आवडले नाही तर नव्याने लिहून देऊ शकतो. नागरी समस्येविषयी महापालिका आयुक्तांना पत्र लिहायचे असो किंवा रजेचा अर्ज असो, तो प्रेमपत्रही लिहू शकतो. जोडप्यात बेबनाव झाल्यास तितक्याच निर्विकारपणे क्षमापत्र व तेही निरुपयोगी ठरल्यास ब्रेक-अपचा मेसेज सुद्धा लिहून देऊ शकतो. तो गृहपाठ करून देऊ शकतो. हा विद्यार्थ्यांसाठी नवलाईचा आणि पालक-शिक्षकांसाठी डोकेदुखीचा विषय ठरला आहे. आपल्याला कॉमन सेन्स नाही, असे तो मान्य करतो. या अनुषंगाने अमुक लेख माणसाने लिहिला आहे की चॅट-जीपीटीने, हे सांगू शकणारे GPTZero अ‍ॅप प्रिन्स्टन विद्यापीठातील एडवर्ड टिआन या तरुणाने विकसित केले आहे. अर्थात, निर्मात्यांना त्याने काही फरक पडत नाही, मात्र विद्यापीठांना फरक पडतो.

कोणताही देशी-विदेशी विषय त्याला वर्ज्य नाही. तर्कहीन प्रश्न विचारले तर तो नम्रपणे नकार देतो. सुमारे 570 जीबी डाटा त्याला इंटरनेटवरील विविध माध्यमातून पुरवण्यात आला आहे. हा प्रचंड डाटा जसे त्याचे बलस्थान आहे, तशीच त्याची मर्यादा देखील. पुरवलेली माहिती अपुरी वा चुकीची असेल, तर त्याचे उत्तर ही अपुरे वा चुकीचे असू शकेल. सध्या त्याच्याकडे 2021 पर्यंतचाच विदा उपलब्ध आहे. त्यापुढील माहितीसाठी जीपीटी4 वापरायला पैसे भरावे लागतात. स्पॅनिश, फ्रेंच, जर्मन इ. अनेक भाषात तो काम करतो, मराठीत देखील. मात्र, अद्याप इंग्रजी व्यतिरिक्त अन्य भाषांवर त्याचे प्रभुत्व नाही.

लेखनाच्या प्लॉटबाबत या स्वरूपाच्या ए-आयची मदत घेता येते, हे आपण समजू शकतो; पण नावीन्यपूर्ण संवादांचे लेखन, काव्यलेखन किंवा कल्पक भन्नाट लेखन ए-आयच्या जनरेटिव्ह प्रोग्रामच्या मदतीने कसे करता येते! 90 च्या दशकापर्यंत हिंदी सिनेमांचा एक साचा होता. गरीब नायक, श्रीमंत नायिका, नायकाची विधवा आई, खलनायकाची जिच्यावर नजर आहे अशी नायकाची बहीण इ. पात्रे असत. शेवटी एक मारामारी होऊन नायक नायिकेचे मीलन होई. एकछाप सिनेमे पाहिल्याने प्रेक्षकांना ‘संवादांचा’ आणि पुढील प्रसंगांचा सुद्धा अंदाज येत असे. ते पात्रांबरोबर ‘ये शादी नही हो सकती’, ‘दुनिया की कोई भी ताकत हमे एकदूसरे से जुदा नही कर सकती’ वगैरे पठडीबाज संवाद बोलू शकत. आपण चॅटिंग अ‍ॅपमध्ये ‘ऑटो कम्प्लीट’ म्हणून जी सोय वापरतो तसेच! याला डीप लर्निंगची सुरुवात म्हणता येईल. पठडीच्या बाहेरचे लेखनकौशल्य ए-आयच्या जनरेटिव्ह प्रोग्रामला येण्यासाठी ते त्याला सखोलपणे शिकवत राहावे लागेल. ऐतिहासिक- सांस्कृतिक संदर्भ, शब्दांच्या अर्थच्छटा हे सर्जक घटक ए-आयला त्याशिवाय कळू शकणार नाहीत.
‘आवाज बसला आहे’ चा गुगल अनुवाद सध्या ‘व्हॉईस इज सिटिंग’ असा विनोदी असला, तरी डीप लर्निंग त्याला अभिप्रेत अर्थ लवकरच शिकवेल. याच्या वेगामुळे वकील, पत्रकार, कंटेंट तयार करणारे सर्वांचे धाबे दणाणले आहे; पण या जिनला भाषेचा गर्भितार्थ समजत नाही, तोवर त्या त्या विषयातील तज्ज्ञांची मदत घेणे अपरिहार्य आहे.

एका मर्यादेपर्यंत ए-आयने भारतीय मनोरंजन क्षेत्रातही शिरकाव केलेला आहे. वेब सिरीजच्या प्रत्येक एपिसोडमध्ये शेकडो दृश्यफ्रेम्स वापरल्या जातात. दृश्य रचना, त्यातील पात्रांच्या हालचाली, त्यांच्या जागा, संवादाचा आराखडा इ. साठी ए-आय आधारित अ‍ॅप्सचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो आहे. भारतीय वेब सिरीजचे चाहते दिवसेंदिवस वाढत आहेत. निवांतपणे कथाबीजावर काम करून कथानक फुलवणे, मग ते चित्रित करणे हे वेळखाऊ काम आहे. ए-आय आधारित लिखाणाच्या अ‍ॅप्समुळे लेखनकार्यात अधिक नेमकेपणा, अधिक उत्पादकता साधता येते आहे. ए-आयची मदत घेऊन प्रकल्प वेगाने पूर्ण करणे, ही निर्मात्याची व्यावसायिक गरज आहे. लेखक, गीतकार यांचे मूड असतात. वैयक्तिक अडचणी असतात. चांगले लेखन बुंदीसारखे पाडता येत नाही. ए-आयला मात्र ते पाडता येते आणि म्हणूनच लेखकसंघावर संपाची वेळ आली आहे.

गुणवत्तापूर्ण सर्जनशीलतेसाठी तल्लख मेंदूचे संवेदनशील मनाशी घट्ट नाते असणे आवश्यक असते, कलाकृतीत प्राण फुंकण्यासाठी भावना आणि प्रतिभा आवश्यक असते, हे समजून घेऊन त्या बळावर माणसाला त्याच्या दोन पावले पुढे राहावे लागेल. तसे घडले, तर लेखकाऐवजी ए-आय न वापरता लेखकासह ए-आय वापरून अधिक सकस कलाकृती निर्माण होऊ शकतात. ‘मोडून पडली पाठ तरी मोडला नाही कणा’ किंवा ‘देणाऱ्याचे हात घ्यावे’ या शब्दांमधला आशय ए-आयला समजत नाही. भविष्यात समजणे अशक्य नसले, तरी सोपे नाही. एकूण आता सामान्य लेखकांची धडगत नाही, पण असामान्य प्रतिभावंतांना काळजीचे कारण नाही. मात्र, आर्थिक मुद्यावर तोडगा काढण्यासाठी त्यांच्यापुढे आज तरी संप हाच मार्ग आहे.
——-

दुसऱ्या घटनेचे विश्लेषण करू या. बातमीनुसार जसवंत नामक तरुण व्हर्च्युअल गर्लफ्रेंडच्या चिथावणीवरून ब्रिटनच्या महाराणीच्या हत्येसाठी राजवाड्यात घुसला. मुळात अशी गर्लफ्रेंड हवी कशाला! सर्वसामान्य माणसाला व्हर्च्युअल किंवा डिजिटल गर्लफ्रेंड /सहचर हा प्रकारच मूर्खपणाचा वाटू शकतो. एका डिजिटल आयडीशी शेअरिंगची इतकी गरज माणसाला का वाटू लागली असेल? हे इथेच न थांबता लैंगिक विकृतीपर्यंत पोचत असेल, तर याला आवर कसा घालायचा, हा पाश्चिमात्य देशात चिंतेचा विषय ठरतो आहे. ते जात्यात असले, तर आपण सुपात आहोत.

आजच्या स्पर्धेच्या जगात ‘भीड के बीच अकेला’ अशी मनोवस्था अनेकांच्या वाट्याला येते. मन मोकळं करायला जितीजागती माणसं भोवताली असली; तरी कधी ती आपल्याला जज करतात, तर कधी आपण विश्वासाने सांगितलेलं गुपित जगजाहीर करतात. या पार्श्वभूमीवर ग्लोबल जगाचे वेगवेगळे ताण सहन करताना होणारी मानसिक, शारीरिक कुचंबणा समजून घेईल, आपल्याशी सुखदु:खाच्या गोष्टी करून मन हलके करेल अशा डिजिटल जोडीदाराची कित्येकांना गरज आहे; आणि यात एका व्यवसायाचे बीज दडले आहे, हे युजेनिया क्यूडासारख्या काही इनोव्हेटर्सनी हेरले. त्यातून निर्माण झाले डिजिटल बडी नावाचे मोहजाल. अ‍ॅनिमेशनचा वापर करून संभाषण अधिक मादक, आकर्षक करण्याची सुविधा या अ‍ॅपमध्ये असते. डिजिटल जोडीदार (गर्लफ्रेंड, बॉयफ्रेंड किंवा अन्य) हे शेवटी एक उत्पादन किंवा सेवा आहेत, त्यामुळे त्यात चक्क फ्रीज, टीव्हीला असावेत तसे वेगवेगळे फीचर्स असतात. त्यानुसार दर ठरवलेले असतात.

Caryn Marjori

या सर्वात सध्या गाजते आहे ती केरीन मार्जोरी. स्नॅपचॅटवर प्रसिद्ध असलेल्या केरीनचा (caryn) डिजिटल अवतार तिच्या वेबसाईटवर मिनिटाला एक डॉलर दराने उपलब्ध आहे. तिच्या अनेक व्हिडिओंचा वापर करून ‘चॅट-जीपीटी 4’ च्या साहाय्याने ही डिजिटल गर्लफ्रेंड तयार करण्यात आली आहे. तिचा डिजिटल क्लोन तिचा प्रियकर म्हणवणाऱ्या प्रत्येक वापरकर्त्यांशी तिच्या मूळ आवाजात बोलत असतो. केरीनला मिळालेला हजारो चाहत्यांचा प्रतिसाद बघता, तिला स्नॅपचॅटपेक्षा बक्कळ पैसा या मार्गे मिळतो आहे. केरीनपासून प्रेरित होऊन एव्हाना मनोरंजन क्षेत्रातल्या, काही लोकांना आपल्या डिजिटल क्लोनमध्ये गुंतवणूक करून स्वत:ला डिजिटल गर्लफ्रेंड किवा बॉयफ्रेंड म्हणून सादर करून कमाई करायची इच्छा होत असल्यास नवल नाही. हेच हक्क वर चर्चिलेल्या संपाच्या घटनेत स्टुडिओला स्वत:कडे हवे आहेत. इथेही स्वत:चे वेगळेपण अबाधित राहावे, म्हणून डिजिटल बडींच्या काही अल्गोरिदमच्या मालकीची नोंद त्यांचे निर्माते अगोदरच करून ठेवतात.

डायरी लिहून मन मोकळे करणे शक्य नसल्यास डिजिटल बडीशी संवाद, हा मानसोपचार आताशा सुचवला जाऊ लागला आहे. डिजिटल जोडीदार टेक्स्ट किंवा ऑडिओच्या माध्यमातून संवाद साधतात. ‘तुम दिनको अगर रात कहो रात कहेंगे’ भूमिका घेऊन ते सुरुवातीला संभाषणाच्या मोहात पाडतात. बोलल्यावर प्रसन्न वाटेल, या पद्धतीने ते प्रोग्राम केले जातात. ते माणसासारखा संवाद कसा काय साधतात, याचे उत्तर त्यांच्या ए-आय संरचनेमध्ये आहे.

यासाठी नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग (NLP) या ए-आयच्या एका शाखेचा उपयोग केला जातो. मानवी भाषा समजून घेणे आणि त्याचा अर्थ लावणे, हे तिचे कार्य आहे. ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे; कारण काही शब्दांचे छुपे अर्थ त्या भाषेशी निकट असलेल्या व्यक्तीलाच समजतात. उदा: ‘दीडशहाणा’. पण ए-आयद्वारे भाषेच्या गाभ्यात शिरणे शक्य होते आहे. यासाठी हजारो संभाषणांचा मोठा डेटासेट संदर्भ म्हणून वापरला जातो. समजा आपण डिजिटल मित्राशी एखाद्या विषयावर बोलत असू आणि त्याची माहिती त्याला पुरवलेल्या डाटामध्ये नसेल, तर तो तिसरेच काहीतरी बोलून वेळ मारून नेतो. असे वारंवार घडले, तर वापरकर्ता वैतागून या बुद्धू बडीला कायमचा टाटा करू शकतो. असे घडणे व्यावसायिकदृष्ट्या घातक असल्याने हे अ‍ॅप न्यूरल नेटवर्क्सचा वापर करतात. म्हणजेच, ते चॅट-जीपीटीसारखे प्रोग्राम वापरतात. हे प्रोग्राम डीप लर्निंगच्या साहाय्याने शक्य तितके फाइन-ट्यूनिंग करत भाषानिर्मिती क्षमता सुधारण्याचा व संभाषण सुसंगत राखण्याचा प्रयत्न करतात. हाडामांसाच्या माणसाने गप्पा मारल्याचा भास व्हावा, इतक्या सहजभावापर्यंत पोहोचणे हे या प्रोग्रामचे अंतिम लक्ष्य असते.

पण, विषय इथे संपत नाही. आपल्या भावनिक किंवा लैंगिक गरजेची पूर्ती करण्यासाठी डिजिटल जोडीदारात गुंतल्याने आपल्या प्रियजनांशी असलेले नाते ताणले जाऊ शकते. शिवाय, सशुल्क असल्याने हे प्रचंड खर्चिक प्रकरण आहे. याचे व्यसन लागते. त्यामुळे अनेक पातळ्यांवर नुकसान होऊ शकते. हा संवाद यांत्रिक असल्याने अनेकदा साचेबद्ध किंवा चुकीचा प्रतिसाद येऊ शकतो. त्यातून अपेक्षाभंग, नैराश्याला तोंड द्यावे लागू शकते. वास्तव जीवनात वावरताना आत्मविश्वास कमी होऊ शकतो. खाजगी संभाषणात नकळत माणूस वैयक्तिक माहिती देतो, ज्याचा गैरवापर होऊ शकतो. जाहिरातदारांसाठी कच्चा माल म्हणून ही गोपनीय माहिती खुली केली जाऊ शकते. शिवाय, हे शब्दश: कृत्रिम संभाषण आहे, त्यामुळे संभाषणात आत्मा नाही. जीव नाही. माणसाने माणसाला केलेला उत्कट स्पर्श, जवळ घेऊन पुसलेले डोळे, हसून डोळ्यात येणारे पाणी, कडाकडा भांडल्यावर केलेला हळवा समेट याची जादू काही और आहे. त्यामुळेच आपल्या अस्तित्वाला अर्थ आहे. एक डिजिटल आयडी ही जागा कधीही घेऊ शकत नाही. त्याला उपचारापुरते वापरायचे की वास्तवाला सामोरे जायचे, हे आपल्याला ठरवायचे आहे.

अशा पडद्यावरच्या आभासी नात्यापेक्षा चालत्या बोलत्या डिजिटल गर्लफ्रेंडचा सहवास मिळाला तर! तंत्रज्ञ आणि आर्टिस्ट सॅन मार्कोस (कॅलिफोर्निया) रियल बॉटिक्स या कंपनी मार्फत डिजिटल बाहुल्या (रोबो) तयार करतात. लोकांच्या मनातल्या प्रतिमेशी त्या मिळत्या जुळत्या असाव्यात, असा त्यांचा प्रयत्न असतो. मग लोक मुलींनी बार्बीशी खेळावं, तशी त्यांच्याशी संबंधित कथानके पण रचतात. सॅनची मुलाखत आपण त्याच ‘द एज ऑफ ए-आय’ व्हिडिओ मालिकेत पाहू शकतो.

या बाहुल्यांची गरज आहे का, हे तपासायला त्यांनी काही पेशंटना वास्तवातील डॉक्टरांशी बोलायला सांगितले आणि काही पेशंटना डिजिटल अवतारांशी बोलायला सांगितले. पेशंट डिजिटल अवतारांशी जास्त सहजपणे बोलू शकले. आपला वाढदिवस कोणीतरी लक्षात ठेवावा किंवा आजचा तुझा दिवस कसा गेला असे कोणीतरी आपुलकीने विचारावे, अशी भावनिक गरज या डिजिटल बाहुल्या एआयच्या मदतीने भागवू शकतात. एक निरीक्षण म्हणजे यात ‘बाहुला’ नाही. ए-आयच्या जगातही पुरुषप्रधानता बरकरार आहे. असो! या रोबो बाहुल्या इंजीनियरिंग प्रोग्रामिंग आणि कला यांचा समन्वय आहेत. त्यांना ऐकण्याचे व त्यानुसार उत्तरे देण्याचे (उदा: अलेक्सा) तसेच स्पर्शाचे ज्ञान एका मर्यादेपर्यंत देण्यात आले आहे.

आता राहिली नजर. ते जमले की, रोबो बाहुली ‘मालकाला’ ओळखू शकेल आणि त्याच्या भावना पण वाचू शकेल. माणूस आपल्या दहा टक्के भावना शब्दातून व्यक्त करतो आणि बाकी त्याच्या हावभाव आणि शरीरभाषेतून. मग कदाचित माणसे या निरपेक्ष बाहुल्यांच्या प्रेमातही पडतील, यातून नवे मानसिक प्रश्न उपस्थित होतील. म्हणूनच सॅन म्हणतात, ‘सजीव आणि रोबो सखी यामधली सीमारेषा ठरवता आली पाहिजे, नाहीतर आपण बाहुलीच्या हातचे बाहुले होऊ.’ ती रेषा सापेक्ष आहे. मेख इथेच आहे.
तिसऱ्या घटनेबद्दल बोलू या. ‘चालकविरहित टॅक्सींमुळे सॅनफ्रान्सिस्कोत अपघातांमध्ये वाढ’

हॉली नाल या सिस्टिम्स इंजिनियरचे ए-आय प्रणित वाहनांवर संशोधन सुरू आहे. त्यांनी अशा वाहनांची स्पर्धा घेतली. त्यातून त्यांच्या लक्षात आले की, शर्यत जिंकायला फक्त वेग पुरेसा नसतो, तर त्यासाठी इच्छाशक्तीही हवी. ती मानवाकडे असते. यंत्राकडे नाही. शिवाय, ही वाहने मानवी चालकापेक्षा अधिक वेगाने पळवता आली पाहिजेत, पण जास्त सुरक्षितरित्या. माणसाकडून होणाऱ्या अपघातांच्या तुलनेत ए-आय वाहनांचे अपघात नगण्य असले पाहिजेत. नाहीतर ती निरुपयोगी आहेत. बुद्धिमत्ता शक्यतो चूक न करण्यात दिसून येते, त्याहूनही ती चूक तात्काळ सुधारण्याने सिद्ध होते.

क्रूझ आणि वेमो यांनी गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटच्या सहकार्याने गेल्या वर्षी सॅनफ्रान्सिस्कोमध्ये चालकविरहित टॅक्सी सेवा सुरू केली. दोन्ही कंपन्यांना कॅलिफोर्निया राज्य नियामकांकडून त्यांच्या सेवांसाठी पूर्णवेळ शुल्क आकारण्याची परवानगी मिळाल्यानंतर चारच दिवसांनी हा अपघात झाला. साहजिक अशा टॅक्सीसेवेची व्याप्ती वाढवण्याबाबत शहर प्रशासन आता नव्याने विचार करते आहे.
चालकविरहीत वाहनांमधील ए-आय सॉफ्टवेअर विविध सेन्सर्सशी जोडलेले असते. हा ए-आय कारमधील गुगल स्ट्रीट व्ह्यू आणि व्हिडिओ कॅमेऱ्यांमधून इनपुट मिळवतो. डीप लर्निंगचा वापर करून माणूस ज्या संवेदनक्षमतेने वाहन चालवतो व वेग वाढवणे, ब्रेक लावणे याबाबत परिस्थितीनुसार निर्णय घेतो, त्या प्रक्रियेचे अनुकरण करतो.

परंतु माणसाकडे ए-आयकडे नसलेली एक गोष्ट असते, ती म्हणजे फ्री-विल. उदा: एखाद्या अडचणीतील व्यक्तीला लिफ्ट द्यावी, असे वाहनचालकाला वाटू शकते. त्या व्यक्तीचे निरीक्षण करून व परिस्थिती पाहून माणूस लिफ्ट द्यावी की नाही, हा निर्णय घेईल. ए-आय तसे करू शकत नाही. कोणत्या वाहनांना पुढे जाऊ द्यायचे, हे ए-आयद्वारे कारला शिकवता येईल, पण वाटेत जाता जाता हातासरशी चारदोन कामे करण्यासाठी मार्ग बदलवणे ए-आयसाठी तितके सोपे नसेल.

ही वाहने भारतीय रस्त्यांवर धावू लागली, तर सेन्सरचे गणित कोलमडून टाकण्याची किमया करू शकणार्‍या रस्त्यातल्या गायी, म्हशी, गाढव, कुत्रे इ.ना हाताळायला ए-आयला जमणार आहे का, असा गमतीदार प्रश्न एका एकपात्री विनोदकाराने आपल्या रीलमध्ये विचारल्याचे आठवते. यावर देखील डीप लर्निंग हेच उत्तर आहे.
———

वरील तीनही घटना अस्वस्थ करणाऱ्या आहेत. दुसऱ्या बाजूला याच ए-आयचा उपयोग करून जगभरातले तंत्रज्ञ व शास्त्रज्ञ माणसाचे जगणे अधिक सुखकर आणि रंजक करण्यासाठी धडपडत आहेत.

चॅट-जीपीटीने ए-आय हा शब्द सर्वतोमुखी केल्यापासून सोशल मिडियावर ए-आय बाबाचे चमत्कार दाखवणारे विविध व्हिडिओ फिरू लागले आहेत. कुठे त्यात ए-आयने तयार केलेली बातम्या देणारी बाई आहे, तर कुठे रिअ‍ॅलिटी शोमध्ये स्पर्धकाच्या जागी खुद्द परीक्षकांचे चेहरे एंबेड करण्याच्या गमती आहेत. ए-आय वापरून प्रेझेंटेशन, व्हिडिओ, स्प्रेडशीट्‌स अधिक आकर्षक व सोप्या पद्धतीने कशा तयार करता येतील, याच्या रील्सवर रील्स येत आहेत. विविध क्षेत्रात ए-आय कसे वापरता येईल, याचे ऑनलाईन कोर्सेस उपलब्ध झाले आहेत.

आरोग्य, वित्त, मनोरंजन उद्योग क्षेत्राला ए-आयने ‘खुल जा सिम सिम’ म्हणत अनेक संधी उपलब्ध करून दिल्या आहेत. उदा: भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात आरोग्यसेवा नेहमीच अपुरी पडत आली आहे. अतिशय दुर्गम खेड्यातील पेशंटसाठी डॉक्टर उपलब्ध नसला, तरी ए-आयच्या साहाय्याने एखादे कठीण ऑपरेशन पार पाडणे शक्य होऊ शकेल. ‘द एज ऑफ ए-आय’ मालिकेतील एका व्हिडिओनुसार, ज्या लोकांना बोलण्याची अडचण आहे, अशा लोकांसाठी ए-आयच्या साहाय्याने एक उपकरण तयार करण्यात आले आहे. त्यातून त्याचे म्हणणे स्पष्ट ऐकता किंवा वाचता येईल. डोळ्यांमधले दोष त्वरित शोधता येतील. अपघातात हाताचा पंज गमावला, तर बसवलेल्या कृत्रिम पंजाला ए-आय च्या माध्यमातून मेंदू सूचना देऊ शकेल.

ग्राहक सेवेच्या क्षेत्रात एआय-संचालित चॅटबॉट्‌स अनेक प्रकारची कामे हाताळत आहेत. क्लिष्ट आणि धोकादायक स्वरूपाच्या निर्मितीप्रक्रियेत ए-आय वापरणारे रोबोट्स माणसाचा भार हलका करून त्याला सुरक्षित ठेवत आहेत. उदा: एखाद्या खाणीत काही किमी खोलवर शिरून काम करणे माणसासाठी धोकादायक, पण ए-आय संचालित रोबोसाठी सहजसाध्य असते.

खाद्यपदार्थ निर्मिती प्रक्रिया ए-आयमुळे मानवी स्पर्श न होता निकोप पद्धतीने पूर्ण करणे शक्य होते आहे.ए-आयमुळे डिजिटल आर्थिक व्यवहार आणि गोपनीय माहितीची देवाणघेवाण अधिक सुरक्षित, सोपी व्हायला मदत होणार आहे. व्यवसायाच्या स्पर्धेत जरा मागे पडलेल्या मायक्रोसॉफ्ट या विख्यात कंपनीसाठी तर ए-आय वरदान ठरते आहे. 2030 पर्यंत पर्यावरणस्नेही तंत्रज्ञानात ए-आयचा वाढता वापर जागतिक अर्थव्यवस्थेत तब्बल 5.2 ट्रिलियन डॉलर्सची भर घालेल, असा मायक्रोसॉफ्टचा अंदाज आहे.

त्याचबरोबर ए-आयला मूल्यांची चाड नाही. अवैध डिजिटली नियंत्रित शस्त्रांचा वापर त्यामुळे वाढेल. ए-आय म्हणजे बेरोजगारीची टांगती कुऱ्हाड, असे अनेकांना वाटते आहे. माणसाचे माणूसपण संपवणारे तंत्रज्ञान आपल्याला नको आहे, असे मानणारा एक वर्ग आहे. एकाच वेळी प्रचंड कुतूहल आणि भीती, अशी वापरकर्त्यांची संमिश्र मनोवस्था आहे. आपल्याला फ्री विलचे, म्हणजेच स्वेच्छेने निर्णय घ्यायचे वरदान आहे आणि ए-आयला ते कधीच मिळू शकणार नाही, त्याला अल्गोरिदमनुसार वागणे क्रमप्राप्त आहे; इतके आपण लक्षात ठेवले, तर आपले आणि ए-आयचे सहजीवन सुखकर होईल. या महत्त्वाच्या भेदामुळे माणसात आणि ए-आयमध्ये अतिपरिचयात अवज्ञा होणार नाही.

इन्फोसिसचे माजी अध्यक्ष नारायण मूर्ती यांच्यासह अनेक दिग्गजांनी ए-आय विषयीची भीती अनाठायी असल्याचे सांगत दिलासा दिला आहे. ते म्हणतात, ‘कॅल्क्युलेटर आला तेव्हाही आता अकाऊंटंटच्या नोकऱ्या जातील, अशी लोकांना भीती वाटत होती. बदलाचा स्वीकार आणि त्यानुसार आवश्यक त्या कौशल्यांचा अंगीकार, हेच कोणत्याही आव्हानावर मात करण्याचं सूत्र आहे .ए-आयही त्याला अपवाद नाही. उलट ए-आय नवे रोजगार, नवे व्यवसाय निर्माण करतो आहे. आपण ग्रामोफोनच्या तबकड्यांवरील गाणी ऐकण्यापासून कॅसेट, सीडीचे टप्पे ओलांडत क्लाऊड सर्व्हरवर आधारित म्युझिक अ‍ॅपवर गाणी ऐकण्यापर्यंत प्रवास केला आहे. त्याच सहजतेने ए-आय वापरत पुढे जाणार आहोत. मात्र, त्यासाठी आपल्याला आपली तंत्रज्ञानविषयक समज (टेक्निकल कोशंट) वाढवायला हवी आहे.

सुमारांची सद्दी ए-आय संपवेल, पण विशेषज्ञांनाही ए-आयसह आपले काम अधिक अद्यावतपणे, अधिक वेगाने, अधिक कार्यक्षमतेने करण्याचे तंत्र शिकून घेण्यावाचून इलाज नाही. एकूण ए-आयसह जगायला शिकणे आता अनिवार्य आहे. त्याच वेळी सुज्ञ माणसांनी तरी ऐश्वर्य पाटेकर या कवीला पडलेला प्रश्न स्वत:ला सतत विचारत राहिले पाहिजे- माणसे उत्क्रांत झाली, माणसेही यंत्र झाली. माणसाच्या आतल्या त्या माणसाचे काय झाले?

१६ जुलै हा दिवस जागतिक स्तरावर ए-आयचे, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेचे कौतुक करण्याचा आणि त्याविषयीच्या घडामोडी जाणून घेण्याचा दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. IRCAI आणि UNESCO चा हा संयुक्त उपक्रम आहे. ए-आयने दिलेल्या अगणित सुविधांबद्द्ल कृतज्ञता व्यक्त करण्याचा आणि ए-आय मुळेच उभ्या राहिलेल्या आव्हानांकडे गांभीर्याने पाहण्याचा हा दिवस आहे. ए-आय वरील आंतरविद्याशाखीय संशोधनाला प्रोत्साहन मिळावे, त्याचा जबाबदारीने वापर करण्याचे भान निर्माण व्हावे, यासाठी मार्गदर्शक तत्त्वे निश्चित व्हावीत, चर्चा झडाव्यात, ही या दिवसाची अन्य उद्दिष्टे.

साभार: ‘मीडिया वॉच’ दिवाळी अंक -२०२३

(लेखिका आयटी प्रशिक्षक , डिजिटल मार्केटर व सोशल मीडिया अभ्यासक आहेत.)

9850387853

[email protected]

Previous articleउपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा!
Next articleसावित्रीमाई, तुझ्या लेकींना खरंखुरं आत्मभान मिळू दे!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.