उपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा!

हिंदुस्थानची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील निर्वासित झालेल्या सिंधी समाजातील लोकांना आपले घरदार, मालमत्ता, शेतीवाडी सगळे सोडून भारतात यावे लागले. उद्यमशील वृत्तीमुळे या समाजाने शून्यातून आपले विश्व निर्माण केले. अशा सिंधी समाजातील अगदी तळागाळातील ‘लासी’ या जमातीत जन्मलेल्या डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांनी ‘निर्वासित’ हे आपले आत्मकथन लिहिले आहे. केवळ समाजाकडूनच नव्हे तर रक्ताच्या नात्याच्या घरच्यांकडूनही पावलो पावले उपेक्षेचा अंध:कार पसरवला गेल्यावरही उषाताईंनी तो भेदून त्यांच्या नावाप्रमाणे आपल्या आयुष्यात उष:काल आणला, याचीच कैफियत त्यांनी या आत्मकथनात मांडली आहे.

-माया देशपांडे

डॉ. उषा रामवाणी-गायकवाड

डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांचे ‘निर्वासित’ हे आत्मकथन म्हणजे सिंधी समाजातील एका स्त्रीच्या संघर्षमय जीवनाची कहाणी आहे. वाचकांशी स्वतःच्या आयुष्याबाबत केलेलं हितगुज आहे. वाचकांशी मारलेल्या गप्पा आहेत. पुस्तक वाचताना खरंच हा प्रत्यय येतो. लेखिका आपल्याशी बोलतेय हे जाणवते. तिच्या गप्पांमध्ये वाचक आपसुकच गुंतून जातो. मनातील असंख्य प्रश्न, शंका, अडचणी व त्यातून काढलेला मार्ग हे सगळं लेखिका अतिशय प्रांजळपणे वाचकांशी शेअर करते.

 

जगण्याचा हक्कच डावललेली ही लेखिका स्वत:च्या अस्तित्वाच्या लढाईचा मोठा पटच मांडते. मनोगतात लेखिका लिहिते, ‘अत्यंत दुर्दैवी आयुष्य वाट्याला येऊनही अत्यंत दुर्मीळ असं, कोणीही माझ्याकडे अभिमानाने, आदर्शाने पाहावं असं ‘अर्थपूर्ण’, मूल्यात्म आयुष्य दुर्दम्य चिवटपणाच्या बळावर ताठ मानेने मी जगले, विकले नाही गेले… दुर्दम्य इच्छाशक्ती, आत्मविश्वास आणि नेमके काय करायचे याचे भान असल्यामुळेच उषाताई आपल्या ध्येयापर्यंत पोहचू शकल्या.

त्या लिहितात, ‘स्वत:च्या कुठल्याही चांगल्यासाठी हवी ती किंमत मोजणं, कमालीचा संयम या सर्व घटकांनाच जगण्याचा आधार बनवलं. कितीही विपरीत परिस्थिती उद्भवली तरी एकटीने धैर्याने नि वैचारिक व भावनिक परिपक्वतेच्या आधारे तिला सामोरी गेले. माझं लिखाण, संशोधन वगैरेची सभोवतालच्या प्रस्थापित समाजाला नोंद घ्यायला भाग पाडलं. या सगळ्याचा मला सार्थ अभिमान आहे. प्रयत्नपूर्वक बाणवलेली संवेदनशीलता मी मरू दिली नाही. हे आत्मकथन वाचताना याचा प्रत्यय पानोपानी येतो. जे भोगलं ते शब्दांत मांडताना लेखणीच त्यांची जीवाभावाची सखी झाली. तिनेच त्यांचं दु:ख हलकं केलं.

हिंदुस्थानची फाळणी झाल्यावर पाकिस्तानातील निर्वासित झालेल्या सिंधी समाजातील लोकांना आपले घरदार, मालमत्ता, शेतीवाडी सगळे सोडून भारतात यावे लागले. उद्यमशील वृत्तीमुळे या समाजाने शून्यातून आपले विश्व निर्माण केले. अशा सिंधी समाजातील अगदी तळागाळातील ‘लासी’ या जमातीत जन्मलेल्या उषाताईंना स्वअस्तित्वासाठीच मोठा संघर्ष करावा लागला. लासी जमात पाकिस्तानातील लसबेला शहरातील ‘सुखवस्तू आदिवासी’ म्हणता येईल अशी अत्यंत अल्पसंख्याक जमात.

जगभर जास्तीत जास्त तीनशे कुटुंबे. त्यातील उषाताईंच्या शहापूर गावात २५, ३० कुटुंबे. उल्हासनगरला सगळ्यात जास्त म्हणजे २५० कुटुंबे. आपल्या जमातीचे परखड शब्दांत त्या वर्णन करतात. चंगळवादी, सामाजिक व वैचारिक मागासलेपण, अत्यंत रूढीप्रिय, भौतिकतेचा अतिरिक्त सोस, स्त्रीपुरुष विषमता. कापड-कपडे विकणे हा पारंपरिक व्यवसाय. व्यापारी दृष्टिकोनामुळे शिक्षणाकडे दुर्लक्ष. गृहिणी असणे हेच स्त्रीचे ध्येय आणि कुटुंबात मुलगा हवाच हा आग्रह! अशा कुटुंबात जन्मलेल्या उषाताईंनी वेगळी वाट निवडली आणि दीर्घकाळ संघर्षात गेला.

उषाताईंना शिक्षणाची मनापासून आवड. त्यासाठी कुटुंबातूनच संघर्षाला सुरुवात झाली. मुलींच्या शिक्षणासाठी होणारा खर्च व्यर्थ आहे असा वडिलांचा दृष्टिकोन. त्यामुळे उच्च, महाविद्यालयीन शिक्षणासाठी वडिलांचे मन वळविण्यासाठी उषाताईंनी जीवाचा आटापिटा केला, उपोषण केले. यातच दोन वर्षे निघून गेली. सांसारिक जबाबदारी त्यांच्या आईने कधीच घेतली नाही. घरात सततच संत मंडळी असायची. आई भजन ऐकणे, ध्यानधारणा करणे यातच रमायची. मुलींनाच घरची कामे करावी लागायची. उषाताईंनी पेपर वाचलेलाही आवडायचे नाही. छंद, हौसमौज, आवडीनिवडी यांना काहीच स्थान नव्हते. उषाताईंच्या जवळच्या नातेवाइकांच्या स्वभावाचे, अनुभवांचे तपशील वाचताना मन खिन्न होते. कुटुंबातीलच माणसे एकमेकांशी अशी का वागतात, हा प्रश्न अस्वस्थता निर्माण करतो.

अशा वातावरणातही उषाताईंनी शिक्षणाची जिद्द कायम ठेवली. नोकरी करून, वर्किंग वुमेन्स हॉस्टेलला राहून महाविद्यालयात प्रवेश घेतलाच. महाविद्यालयातील अनेक राज्यस्तरीय निबंध स्पर्धांमध्ये बक्षिसे मिळवली. ग्रंथालयात भरपूर पुस्तके वाचली. या काळातील शिक्षकांचे अनेक बरेवाईट अनुभव त्यांनी सांगितले आहेत. रूढ परीक्षा पद्धती, एक विशिष्ट चाकोरीबद्ध शिक्षण न पटल्यामुळे आणि संशोधनाची विशेष आवड यामुळे एमए सोडून पीएचडी करण्याचा मोठा निर्णय त्यांनी घेतला आणि २००६ साली ‘एकोणिसाव्या शतकातील निबंध वाङ्मयातून व्यक्त होणारे स्रीजीवनविषयक चिंतन’ या विषयावर पीएचडी मिळवली. विशेष हे की गाईडशिवाय आणि पोस्ट ग्रॅज्युएशन नसताना त्यांनी प्रबंध पूर्ण केला. असंख्य अडचणींना तोंड द्यावे लागले. डॉ. छाया दातार व शर्मिला रेगे यांनी त्यांच्या प्रबंधाला मान्यता दिली. उत्कृष्ट प्रबंधासाठी असलेला प्रा. अ. का. प्रियोळकर पुरस्कारही मिळाला. तसेच सोलापूरचा संशोधनासाठीचा विठाबाई पसारकर स्मृत्यर्थ दिला जाणारा पुरस्कारही मिळाला.

उषाताईंनी विविध नियतकालिकांत लेख, कविता, पत्रे, पुस्तक परीक्षणे असे लेखन केले आहे. अनेक शाळा, महाविद्यालयांत शुद्धलेखनविषयक कार्यशाळा घेतल्या आहेत. त्यांचे मराठी व्याकरण व शुद्धलेखनावरील मार्गदर्शन अनेकांना उपयोगी पडले आहे. ‘मृण्मयी’ हा पारितोषिकप्राप्त दिवाळी अंक त्यांनी सहा वर्षे काढला. अनेक प्रतिष्ठित प्रकाशन संस्थांमध्ये मुद्रितशोधन व संपादन साहाय्य केलं, परंतु तिथेही त्यांना चांगली वागणूक मिळाली नाही.

स्वार्थासाठी किंवा स्वत:चा इगो जपण्यासाठी समोरच्या व्यक्तीचे किती व कसे नुकसान होऊ शकते याची साधी जाणीवही माणसांना नसते हे त्यांचे आत्मकथन वाचताना लक्षात येते. अतिशय प्रांजळपणे लिहिताना उषाताईंनी मोठ्या माणसांचे मोठेपणाचे खोटे मुखवटे वाचकांसमोर उघडे केले आहेत. त्यासाठी मोठे धाडस, धैर्य लागते. आज मात्र त्यांच्या मनात कोणाबद्दलही आकस वा कटुता नाही. आयुष्यातील स्वत:च्या चुका, दोषही त्यांनी प्रामाणिकपणे सांगितले आहेत आणि लहानसहान आनंदही व्यक्त केले आहेत.

उषाताईंचा संघर्ष कुटुंब, स्वत:चा समाज, शैक्षणिक क्षेत्र, प्रकाशन क्षेत्र वा जिथे जिथे नोकरी केली तिथे तर झालाच; शिवाय योग्य जीवनसाथी मिळविण्यासाठीही झाला. त्यांच्या समाजात मुलीला मुलाकडून मागणी यावी लागते. स्वाभाविकच, सुंदर आणि श्रीमंत आईबापाच्या मुलींना मागणी जास्त! उषाताईंना कधीच मागणी आली नाही. लग्नात हुंडा प्रकार नाही, पण खर्च खूप करतात. आपल्याच जातीत लग्न झाले पाहिजे, इतर सिंध्यांना मुलगी द्यायची नाही हा अट्टाहास. मुलांचे शिक्षणही कमी असायचे.

उषाताईंना शिक्षणाची आवड. त्यांनी वयाच्या २१व्या वर्षापासून स्वत:च्या लग्नासाठी एकटीनेच प्रयत्न केले. त्याचेही चित्रविचित्र अनुभव वाचताना माणसांच्या विविध छटा दिसून येतात आणि लग्न हा एक बाजार, व्यवहार आहे हेही स्पष्ट होते. ‘जात’ आणि सुंदर नसणं हेच मुद्दे लग्न न होण्याबाबत पुढे येत राहिले. आंतरिक सौंदर्य, बुद्धिमत्ता यापेक्षा बाह्य सौंदर्यालाच लग्नाच्या बाजारात महत्त्व आहे. ‘शिक्षण, नोकरी आणि लग्न या तीन महत्त्वाच्या टप्प्यांवर नातेवाईक, मित्रमंडळी नि एकूणच समाजाचं खरं रूप उघडं पडतं,’ हे उषाताईंचे मत आणि ते खरेही आहे. वयाच्या ५२व्या वर्षी त्यांना योग्य जीवनसाथी मिळतो. आज चांगले सहजीवन, कुटुंब जीवन जगण्याचा आनंद त्यांना मिळतोय.

या आत्मकथनातून समाजाचा स्त्रीविषयक दृष्टिकोन भारतीय विचारसरणीत कसा आहे हे दिसून येते. त्याचबरोबर हेही लक्षात येते की हिंमत आणि जबरदस्त इच्छाशक्ती असेल तर कितीही खडतर, नकारात्मक आयुष्य वाट्याला आले तरी कुठलीही स्त्री स्वाभिमानी, आदर्श आणि अर्थपूर्ण आयुष्य जगू शकते. म्हणूनच प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करणार्‍या महिलांना ‘निर्वासित’ नक्कीच प्रेरणादायी राहील. ‘निर्वासित’ आत्मकथनाला विक्रोळी (पूर्व) मुंबई येथील २०२३चा स्नेहदा साहित्य पुरस्कार नुकताच मिळाला आहे.

(लेखिका गांधीवादी आणि स्त्री चळवळीशी संबंधित आहेत)

डॉ. उषा रामवाणी-गायकवाड यांचा मोबाईल क्रमांक -7498380403

Previous articleआम्ही मोगलाईतले!
Next articleसुमारांची सद्दी संपविणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.