आम्ही मोगलाईतले!

-कामिल पारखे

आम्ही मोगलाईतले म्हणजे मराठवाड्यातले. माझा जन्म आणि बालपण पश्चिम महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपुर येथे गेले तरी नाळ मात्र कायम गंगेपलीकडे असलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या आजोळशी राहिली. या मोगलाईतली भामाठाण, पैठण, नागमठाण, वरखेड, बोरसर, लासूर, महालगाव वैजापूर, गंगापूर अशी अनेक नावे बाई-दादांच्या अन आजोळच्या लोंकांच्या बोलण्यातून कायम कानावर पडायची. गंमत म्हणजे वरीलपैकी बहुतेक ठिकाणी मी कधीही गेलेलो नाही वा त्यांचे भौगोलिक स्थान मला आजही माहित नाही.अधूनमधून सणावाराला माळीघोगरगाव येथून पायपीट करत आमचे आजोबा म्हणजे गोविंदराव शिनगारे टिळकनगर श्रीरामपूरला स्थायिक झालेल्या मार्थाबाई आणि अनुसयाबाई या आपल्या दोन्ही लेकुरवाळ्या लेकींसाठी पुरणपोळ्यांचे आणि इतर खाद्यपदार्थांचे टोपले घेऊन दुपारी बारापर्यंत आमच्या घरी पोहोचायचे. बहुधा भल्या सकाळी गरमागरम पुरणपोळ्याचे टोपले फेट्यावर ठेवून घेऊन ते या पायी प्रवासाला निघत असत. या सगळ्या ऐकीव गोष्टी.

याचे कारण म्हणजे मी जन्मायच्या खूप वर्षे आधीच आजोबा अचानक गेले. एका सकाळी शेतमळ्यात घराबाहेर झोपलेल्या आजोबांचे शरीर काळेनिळे पडलेले दिसले होते, बहुधा विषारी सर्पदंशाने त्यांचा मृत्यू झाला असावा. आजीचे – आईची आई – जिच्याबाबत कधी एक शब्द ऐकलेला आठवत नाही, तिचे तर आजतागायत नावसुद्धा माहित नाही. दहापंधरा वर्षांपूर्वी बाई असताना काहीही निमित्त नसताना मुद्दामच तिच्याबरोबर तिच्या माहेरी गेलो होतो. तेव्हा शांत्वनमामांच्या थोरल्या मुलाला माझ्या मामेभाऊ शाहूला सहज `आपले शेत कुठपर्यंत आहे ? ‘ असे विचारले तेव्हा त्याने दोन दिशेला हात उभारुन लांबवरपर्यंतची शेतीची जागा दाखवली होती. “बहुधा साठ-पासष्ट एकरांपर्यंत असावी,” असे तो म्हणाला होता.विशेष म्हणजे ही हाडुळकीची शेती नव्हती. तेव्हा त्यावेळी नाशिकजवळच्या नांदूर-मधमेश्वर धरणाचे पाणी नुकतेच घोगरगावाला पोहोचले होते. तशी शेतात विहीर होती, गरजेनुसार मोटेने पिकांना पाणी दिले जात होते.

विहिरीतून चार बैलांच्या मदतीने मोटेने विहिरीतून पाणी काढून या शेतातल्या भाजीपाल्यांना, वांगे, काकडी वगैरेंना पाणी दिले जाताना मी पाहिले आहे. आता धरणाच्या पाण्याने शेती पूर्णतः बागायती झाल्याने सालातून तीनदा पीक घेणे आज शक्य झाले आहे. आम्ही श्रीरामपूरला परतताना शाहूभाऊने आमच्या नजरेसमोर जमीनीतून उपटलेला डहाळ, गव्हाच्या कोवळ्या लोंब्या असे काय काय दिले होते. बाईची ही तिच्या माहेरची शेवटची गाठभेट ठरली. त्यानंतर घोगरगावातल्या त्या शेतमळ्यात आजपर्यंत मी पाय ठेवलेला नाही.

आता नक्की संदर्भ आठवत नाही मात्र आमच्या आईवडलांच्या संभाषणात अनेकदा येणारा एक शब्द म्हणजे `मोगलाई’ हा होता. मोगलाई हा शब्द ऐकून तेव्हा शालेय वयातला मी अचंबित व्हायचो. (तिथल्या `राजवाडा’ या शब्दाचा नेमका अर्थ मला तसा फार लवकर समजला होता).`आम्ही मोगलाईतले’, `मोगलाईतला अमुकअमुक परिसर’ असे शब्दप्रयोग व्हायचे. ”ही काय मोगलाई हाई काय?”, ”मोगलाई लागून गेली काय?” असे वाक्प्रचार कानावर पडायचे.दिल्लीतले मुघल साम्राज्य आणि औरंगाबाद जिल्ह्यातली मोगलाई ही नक्की काय भानगड आहे, असा मला प्रश्न पडायचा. नंतर नंतर कळायला लागले की ही मोगलाई म्हणजे हैदराबाद निजामाच्या अमलाखालील मराठवाडा वगैरे प्रदेश म्हणजे मोगलाईतील भाग. अहमदनगर जिल्ह्यातल्या सीमेवरची गोदावरी म्हणजे गंगा ओलांडली कि हा मोगलाईचा भाग सुरु व्हायचा.

घोगरगावच्या फादर गुरियन जाकियरबाबांचे मी चरित्र लिहायला घेतले तेव्हा अगदी पहिल्यांदा ‘मोगलाई’ हा शब्द त्याच्या समर्पक अर्थासह तोही इंग्रजी पुस्तकांत मी पहिल्यांदा वाचला आणि या शब्दाविषयीच्या माझ्या कुतूहलाला अखेरीस पूर्णविराम मिळाला. मी वाचलेल्या कुठल्याही मराठी पुस्तकांत `मोगलाई’ या शब्द या अर्थाने वापरलेला माझ्या वाचनात आलेला नाही. मी वाचलेले बहुतेक लेखक पुण्यामुंबईतले, पश्चिम महाराष्ट्रातले आणि कोकणातले असावेत यामुळेही हे असेल कदाचित.

दुसरा नेहेमी कानावर पडणारा शब्द म्हणजे अमरावती आणि अमरावतीचे बिशप. त्याकाळात औरंगाबाद जिल्हा आणि गोदावरी नदीपलीकडचा परिसर अमरावती डायोसिसमध्ये म्हणजे धर्मप्रांतात होता. औरंगाबाद धर्मप्रांताची निर्मिती खूप अलिकडची, १९७७ सालची, पण तोपर्यंत मी माझे घर आणि श्रीरामपूर सोडून गोव्यात फादर होण्यासाठी गेलो होतो

ऐंशीच्या दशकाआधी खूप, खूप वर्षांपुर्वी अखंड नागपूर धर्मप्रांत होता. नागपूरचे फ्रान्सलियन बिशप यांच्या अखत्यारीतला. फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु विशाखापट्टणम येथून मिशनकार्य करण्यासाठी नागपूर आणि वऱ्हाडात पोहोचले होते आणि तेथून ते मोगलाईचे अखेरचे टोक असलेले औरंगाबाद जिल्ह्यात माळीघॊगरगाव येथे १८९२ साली काम करण्यासाठी पोहोचले होते. ही त्यांची मिशनकामाची सीमाहद्द कारण तेथून पुढे अहमदनगर आणि पश्चिम महाराष्ट्रात आणि मुंबईत जर्मन असलेल्या जेसुईट धर्मगुरुंची हद्द.

युरोपातल्या एकमेकांचे प्रतिस्पर्धी असलेल्या दर्यावर्दी देशांत आपापसांत झगडे नको म्हणून मध्ययुगात पोपमहाशयांनी संपूर्ण जगाची चक्क दोन भागांत वाटणी केली होती ! एक-दुसऱ्यांच्या हद्दीत आक्रमण टाळण्यासाठी.

मोगलाईतल्या गंगेपलीकडे अहमदनगर, पुण्या-मुंबईत जर्मन जेसुईट प्रॉव्हिन्सचे जर्मन, स्विस, ऑस्ट्रेलियन धर्मगुरू कार्यरत होते त्याप्रमाणे विदर्भात, अमरावती आणि मराठवाड्यात फ्रान्समधल्या फ्रान्सलियन संस्थेचे धर्मगुरू कार्यरत होते. या संस्थेच्या कागदपत्रांतून आणि रोजनिशीतून विसाव्या शतकातील येथील ख्रिस्ती मिशन कामाबाबत, शैक्षणिक संस्थाबाबत माहिती मिळते.

फ्रेंच फ्रान्सलियन धर्मगुरु फ्रान्सिस मॉगे ( Francis Moget) यांनी Vagabonds for God : A story of the Catholic Church in India (1846-1907) प्रकाशनवर्ष १९९० आणि Shepherds for Christ : A story of the Catholic Church in Central India 1907-1960) प्रकाशनवर्ष १९९४ हे दोन ग्रंथ विविध संदर्भ आणि रोजनिशींच्या आधारे लिहिलेले आहेत.

सामाजिक आणि आर्थिक जीवन अभ्यासण्यासाठी अशा प्रकारचा ऐतिहासिक दस्तऐवज किती महत्त्वाचा आहे हे सांगायलाच नको. याच दोन पुस्तकांच्या आधारावर मी स्वतः “घोगरगावचे जाकियरबाबा : मराठवाडा कॅथोलिक धर्मप्रांताचा इतिहास’ हे पुस्तक मराठी आणि इंग्रजीत लिहिले आहे.

पहिल्या महायुद्धात आणि दुसऱ्या महायुध्दातसुद्धा तत्कालीन ब्रिटिश सरकारने भारतातल्या सर्व शत्रुराष्ट्रातील नागरिकांना म्हणजे जर्मन जेसुईट धर्मगुरूंना तुरुंगात वा छावणीत टाकले होते. अशा कठीण आणि युद्धस्थसमयी मोगलाई, अमरावती आणि नागपूर येथील फ्रेंच असलेले फ्रान्सलियन धर्मगुरु फादर गुरियन जाकियर आणि मेरी बेर्जे पुण्यातल्या आणि इतर जर्मन जेसुइट धर्मगुरूंच्या मदतीला धावले आणि येथील चर्चचे काम पाहिले.

यापैकी फादर बेर्जे यांनी १९१७ साली जन्मलेल्या माझ्या वडलांचा माळीघोगरगाव येथे बाप्तिस्मा केला होता. बाप्तिस्मा सर्टिफिकेटवर फादर बर्जे यांचे आणि गॉडफादरचेही नाव आहे. आपल्याकडे लग्नात नवरीला उचलून मांडवात आणण्यासाठी नवरीच्या मामाची – खऱ्या किंवा मानलेल्या – मामाची गरज असते तसेच बाप्तिस्मा करताना गॉडफादर ( आणि कधीकधी गॉडमदरसुद्धा) पाहिजेच.

पहिल्या महायुद्धात जर्मन शत्रूराष्ट्राचे नागरिक असलेले पुण्याचे बिशप हेन्री डोरींग रोममध्येच अडकल्याने त्यांच्या अनुपस्थितीत नागपूरचे बिशप फ्रान्सिस कॉपेल बैलगाडीने प्रवास करत मजल दरमजल करत पुण्याला, खडकी, संगमनेर आणि राहाता येथे तीन वेळेस म्हणजे १९१६, १९१७ आणि १९१९ला आले होते !अन याची परतफेड म्हणून महायुद्ध संपल्यानंतर १९२६ला जपानमधील हिरोशिमातून भारतात परतलेल्या पुण्याचे आर्चबिशप हेन्री डोरींग हे ८ जानेवारी १९३३ रोजी मोगलाईतल्या माळीघोगरगावला मुलांमुलींना कन्फर्मेशन सांक्रामेंत देण्यासाठी पोहोचले होते. कारण नागपूरचे बिशप कॉपेल त्यावेळी आजारी होते.

कॅथोलिक लोकांच्या जीवनात धर्मप्रांत आणि बिशप यांचे एक अतूट नाते असते कारण आयुष्यात किमान एकदा तरी भाविक लोक काही क्षण बिशपांच्या अगदी जवळ येत असतात. याचे कारण म्हणजे सप्त स्नानसंस्कारांपैकी एक असलेल्या दृढीकरण किंवा confirmation हे सांक्रामेंत केवळ बिशपमहोदयच देऊ शकतात. बाप्तिस्मा, लग्नविधी, अंत्यसंस्कार वगैरे सांक्रामेंतासाठी कुठलाही दीक्षित धर्मगुरु पौराहित्य करू शकतो. इतर धर्माच्या तुलनेत ख्रिस्ती धर्मात सश्रद्ध लोकांच्या जीवनात धर्मगुरूंचे अधिक महत्त्वाचे स्थान असते. विशेष महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ती धर्मात कुणाही व्यक्तीला- हो कुणालाही – धर्मगुरु होता येते, हे पद किंवा अधिकार विशिष्ट समाजघटकाचे नसतात. आता माझेच उदाहरण आहे. कधीकाळी मीसुध्दा गोव्यात फादर होण्यासाठी गेलो नव्हतो का?

अमरावती धर्मप्रांताचे नवे बिशप

तर एकेकाळी अमरावती धर्मप्रांत खूप महत्त्वाचा होता कारण या हद्दीत ख्रिस्ती लोकसंख्या भरपूर होती, या भागात अनेक ख्रिस्ती मंदिरे होती. माझ्या आजोळी माळीघोगरगाव येथे १९२७ साली गॉथिक वास्तू शैलीत बांधलेले भव्य आणि सुंदर चर्च आहे. चर्चचे नाव आहे ख्रिस्त राजा मंदिर…. Church of Christ the King… आजही अशाप्रकारचे भव्य आणि सुंदर बांधकाम नवलाईची बाब ठरते. या बांधकामासाठी नेवाशाहून खास काळे पाषाण मागवण्यात आले होते.

नवनियुक्त बिशप मॅल्कम सिक्वेरा

या भागातील ख्रिस्ती लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात घट होण्याची अनेक सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक कारणे आहेत. तर सांगायचा मुद्दा असा कि आम्ही जसे मोगलाईतले तसेच एकेकाळच्या अमरावती धर्मप्रांतातले सुद्धा .मागच्या आठवड्यात अमरावती येथील बिशपांचे कॅथेड्रल किंवा आसनपीठ (कॅथेड्रॉ म्हणजे आसन, seat ) असलेल्या चर्चमध्ये दुपारी पाचच्या दरम्यान चर्चबेलचा घंटानाद झाला.त्याचवेळेस व्हॅटिकन सिटीमध्ये सेंट पिटर्स बॅसिलिकामध्येसुद्धा घंटानाद झाला होता.अमरावती डायोसिसच्या नव्या बिशपांची पोप फ्रान्सिस यांनी नेमणूक केली हे जाहीर करण्यासाठी हा घंटानाद होता.अमरावतीच्या नव्या बिशपांच्या नेमणुकीची बातमी इथेच फेसबुकवर लगेचच पाचदहा मिनिटांत मला कळाली आणि अमरावतीशी असलेल्या माझ्या खूप जुन्या नातेसंबंधांना उजाळा मिळाला.

अमरावती धर्मप्रांताचे हे नवे बिशप आहेत पुणे धर्मप्रांताचे आताचे व्हिकर जनरल (धर्मसत्तेत पदश्रेणीत बिशपानंतर दुसऱ्या क्रमांकाचे) फादर मॅल्कम सिक्वेरा.

पुढच्या महिन्यात, २४ जानेवारीला, अमरावतीचे नवे बिशप म्हणून त्यांचा दीक्षाविधी होईल.

(लेखक नामवंत पत्रकार व ब्लॉगर आहेत)
९९२२४१९२७४

[email protected]

Previous articleशेतकऱ्यांचे गाडगेबाबा
Next articleउपेक्षेच्या अंध:काराला भेदणारी उषा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.