काला, करिकालन… कालदेव…

डिसक्लेमर….

काला सिनेमा रावणाचा आहे. रामाच्या प्रतिमेला तोडत फोडत रामचे, कृष्णाचे, हिंदूइझमचे रिडल्स उद्ध्वस्त करणारा आहे. बाबासाहेबांच्या रिडल्स इन हिंदूइजमची सिनेमॅटीक वर्जन आहे.

——–—————————–

लेखक- -वैभव छाया…

काला, करिकालन… कालदेव…
बुराई के खिलाफ लढनेवाले को गुंडा कहा जाता था.. वक्त के साथ साथ सब बदल गया.
तुकाचं कोट.. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. आपला पुत्र गुंडाच व्हावा. ज्याने समाजातील अनिष्ट रुढींविरोधात यल्गार पुकारून स्वतःचं गुंडपण सिद्ध करावं. ही बाबासाहेबांची शिकवण. परंतू प्रमाण भाषेच्या साहित्यात गुंड हा शब्द व्हिलन या अर्थाने आला. जे जे आमच्या अस्मितेचं, विजयाचं, साहसाचं प्रतिक होतं ते ते सर्वच या साहित्य विश्वाने, इथल्या ब्राह्मणी साहित्य संस्कृतीने हीन ठरवलं, निषिद्ध ठरवलं, तुच्छ ठरवलं, वाईट ठरवलं. त्या प्रत्येक राजकारणाविरोधात काला उभा ठाकतो. तो नुसताच उभा ठाकत नाही तर जोरकसपणे आपल्या विजयाची पताका सुद्धा रोवतो. रामराज्याची पिसं काढून त्याला भर चौकात नागडा करून त्या राज्याच्या दहशतवादी शोषकांच्या कुल्यांवर हंटरचे फटके ओढतो. इतका थेट, सटीक, टोकदार काला आपल्या मनावर, भारतातल्या ब्राह्मण्यवादी व्यवस्थेवर प्रहार करतो. नी काला आपसूकच कोळश्याच्या खाणीत दाबल्या गेलेल्या एकेक कोळश्याच्या दगडाची अभिव्यक्ती बनतो. याचं संपूर्ण क्रेडीट जातं ते पा. रंजितच्या निधड्या, बेडर नी विद्रोही पद्धतीने आंबेडकवादी सांस्कृतिक राजकारणाला.

१९३१ साली सिनेमा बोलू लागला. तेव्हापासून आजपोतर ८७ वर्षांचा काळ जावा लागला एखादा सिनेमा बुद्ध विहारातून सुरू व्हायला. नायकाच्या वावराची सुरूवात भीमवाड्यातून होण्यासाठी तब्बल ८७ वर्षांचा काळ जाऊ द्यावा लागणे हीच खरी पुरोगामी राज्य म्हणवून घेणाऱ्यांच्या, ती शेखी मिरवणाऱ्या तमाम उच्चवर्णीय, वर्गीय, जातीय पुरोगाम्यांच्या तोंडावर शेणात बुडवून मारलेलं खेटर आहे. कालाचं विश्लेषण केवळ सिनेमा या एकाच अंगाने करणे हा मूर्खपणा ठरेल. यात स्त्रीवाद, आंबेडकरवाद, मागासवर्गीय स्त्रीवाद, एसआरए, फॅसीजम, ब्राह्मणी भाषिक राजकारण, प्रांतवाद, तुच्छतावाद, लुंपेन प्रोलिटेरिएट वर्गाचे अॅप्रोप्रिएशन, धारावी आणि धारावीच्या समकक्ष असणाऱ्या देशभरातील तमाम वस्त्या, मराठी माणसाचे मराठी म्हणून असलेले वा फसलेले तुच्छ राजकारण यांच्या अंगाने बोलले गेले तरच तो काला सिनेमावर बोलताना त्याला न्याय दिलेला ठरेल.

धारावी ही वस्ती सिद्धार्थनगर, लेबर कँप, कोरबा मिठागर, रमाबाई कॉलनी या वस्त्यांपेक्षा वेगळी. धारावी वगळता उल्लेख केलेल्या सर्व वस्त्या ह्या केवळ सर्विस क्लास मध्ये मोडणाऱ्या आहेत. इथे राहणारा वर्ग आजही इक्विटी च्या शोधात आहे. इक्विटी म्हणजे इक्वालिटी ऑफ द ऑपॉर्च्युनिटी. तर धारावी हा सर्विस क्लास सोबत ट्रेडर आणि इंडस्ट्रीअल क्लासवाली वस्ती आहे. मांस कमावणं, मांसासोबत आलेले चामडं कमावणं, ते दोन्ही विकणं… कालांतराने चामड्याच्या अंगाने आलेले अनेक व्यवसाय उभे करून स्वतःचं विश्व उभं करण्यात धारावीने जी मजल मारलेली आहे ते उदाहरण जगात अन्यत्र कोणत्याही वस्तीत नाही. अशा वस्तीवर सिनेमा जर आला नाही तर नवल वाटलं असतं. पण, ज्याला धारावी ठाऊक नाही. त्याने यावर सिनेमा बनवला तर कसा बनेल याची अनेक उदाहरणे बॉलीवूडने पाहीली आहेत. सतत कोणत्यातरी गोष्टीत हरवलेला, जगण्याशी हरलेला, गोऱ्या कातडीच्या बाईच्या स्वप्नात रमलेला, लैंगिकता फक्त नाजूक शरिरापुरती मर्यादीत ठेवलेला पुरूष, दबून राहीलेली, शिव्या हासडणारी, कुरूपात कुरूप दिसेल, आयुष्यात कसलंही ध्येय्य, आकांक्षा नसलेली, स्वतःचं लैंगिक स्वातंत्र्य हरवलेली बाई म्हणजे धारावीची बाई अशीच प्रतिमा धारावीवर आलेल्या सिनेमांतून मेनस्ट्रीमने उभी केलेली आहे. पण, धारावीतल्या माणसाने बनवलेल्या सिनेमाने हे सर्व धुवून लख्ख करून काढलं.

पहायला गेलं तर कालात प्रत्येक स्त्रीपात्राला योग्य ते प्रतिनिधित्व बहाल केलेलं आहे. कालाची पत्नी सेल्वी, तुफानी अंजली पाटील, जरीना हुमा कुरेशी यांच्या कॅरेक्टरचं बिल्डींग ज्या ताकदीने साकारलंय त्यासाठी पा. रंजीतला मानाचा मुजरा. जरीना ही तामीळ मुस्लीम आहे. ती रंगाने गोरी आहे. प्रचंड सुंदर आहे. वाढत्या वयाचा तीच्यावर तीळमात्र फरक पडलेला नाही. पण ती सिनेमात दाखवतात तशी पन्नाशीतील मुस्लिम बाई सारखी नाही. तीचे दात लालफटक नाहीत. ती पान चावत बसणारी, मध्येच थुंकणारी, केसांना मेंहदी लावून अधून मधून हैदराबादी हेलाची हिंदी बोलणारी बाई नाही. तीच्या पायात जोडवे नाहीत. हातभर बांगड्या नाहीत. सातत्याने अल्ला रखा बोलणारी नाही. ती मस्त इंग्रजी बोलते. डोक्यावर पदर घेत नाही. कुर्त्याचे वरचे दोन बटन उघडे असून हिस्त्र पुरूषाची लोचट नजर अंगावर पडल्यावरही स्वतःचं अंग चोरून घेण्याचा कोणताही कमजोर प्रयत्न न करणारी ती मुस्लिम स्त्री आहे. हे असं कॅरेक्टर बिल्डींग पहिल्यांदाच सिनेमात झालंय.

तीच गत चारूमती ऊर्फ तुफानी या कॅरेक्टरची. न्युटन सिनेमात मुंग्या खाणारी हाडक्या अंगाची तुफानी. पहिल्यांदाच एक बौद्ध मुलगी, त्यातही आंबेडकरी विचारांची असून सुद्धा स्वतःच्या मराठी असण्याचा कोणताही लवलेश मराठी न्यूनगंडाच्या राजकारणाशी सांगड नसलेली प्रतिमा साकारलेली भूमिका ही पहिल्यांदाच पडद्यावर पहायला मिळाली. ही मुलगी काळी आहे, सावळी आहे. तीचे आयब्रो चारचौघ्या मुलींसारख्या न कातरलेल्या आहेत. चेहऱ्यावर, शरिरावर आखीव रेखीव पणा उठून दिसावा तशा प्रकारचा पेहराव नाही. पायात पैंजण नाही, ओठांना बिनकामाचे रंगवलेले नाही. ती तुफानासारखी येते. तुफानासारखी भिडते. दोन कानाखाली लगावताना तीचे हात, तीचे ओठ थरथरत नाहीत. ती चवताळून उठते तेव्हा मनूस्मृती व पुरूषसुक्ताचे एकेक शब्द रक्तबंबाळ होऊन वेशीवर टांगल्यासारखे दिसू लागतात इतक्या भन्नाट ताकदीने तीने भूमिका साकारलीये. आपण ज्या पुरूषावर प्रेम करतो त्या पुरूषासोबत किंबहूना त्याच्यापेक्षा अधिक ताकदीने चळवळीत काम करताना त्याच्या पुरूषपणाच्या मर्यादा समजूनच नव्हे तर सांभाळून घेत उभी राहणारी ही व्यक्तीरेखा आहे. ती ज्या एसआरए च्या इमारतीत राहते तीथलं असणं, वावरणं हे सहज सोप्पं नसतं. ते ही त्या इमारतीत, वस्तीत न वाढलेल्या मुलीसाठी ते ही इतकं निरागसपणे आलंय त्याची कमाल करावीशी वाटते. आपलं शरीर ही आपली कमजोरी नाही हे पोलिसांनी जबरदस्तीने पँट काढल्यानंतरही हातात दंडूका घेऊन तुफान बरसणाऱ्या तुफानी ची प्रतिमा नामदेवच्या माझ्या काळ्या सावळ्या लाडक्या मादीस या कवितेतील तु आता व्हीएतनामी योद्धी झाली आहेस या प्रतिमेला साजेसी उभी राहीली आहे. पुन्हा इथेही.. एक काळी सावळी सगळे स्टिरिओटाईप मोडलेली बौद्ध मुलगी मुख्य हिरोईन म्हणून सिनेमात यायला तीच ८७ गोरी वर्षे जावी लागली.

रजीनीची पत्नी सेल्वी ही तशीच. तीला पाहून आजवर मेनस्ट्रीमच्या पडद्यावर न उतरलेली आमची आई, मागासवर्गीय कार्यकर्त्यांच्या बायकांची इमेज अधिक घट्ट रुजवत जाते. आपल्या लेकरांना, नवऱ्याला आवडीने बीफ, सुप करून खाऊ घालणारी, जेवणात हाय डाएट प्रोटीन मेंटेन करणारी, कुणी एक हाणायच्या आधी दोन हाण म्हणणारी आहे. स्वतःच्या मुळांपासून दूर जाणाऱ्या मुलांना त्यांचा अपमान न करता, कसलीही दया माया न दाखवता दूर करणारी आहे. आपल्या नवऱ्याच्या छायेखाली न वावरता त्याच्या स्वातंत्र्याचा पूर्ण सन्मान करणारी, ते करताना स्वतःच्याही स्वातंत्र्याचा पुरेपूर मान राखत ते जपणारी स्त्री आहे. ती काळी आहे, अगदी माझ्या आईसारखी, ती अंगावर सोनं मिरवते, ते ही अगदी माझ्या समाजातल्या एकुण एका बाईसारखी, दुःखात, सुखात, विवंचनेत वागण्यातलं कारूण्य तसूभरही कमी न होऊ देणारी ती बाई आहे. कार्यकर्त्याची पत्नी असलेल्या मागासवर्गीय बाईचं सौंदर्य, त्याच्या व्याख्या पडद्यावर यायला पुन्हा तीच ८७ वर्षे जावी लागली.

तीला काला आणि जरीनाचं जुनं नातं ठाऊक आहे. तरी त्या दोघी म्हणजे जरीना आणि सेल्वी हिंदू वा मुस्लिम पद्धतीसारखं जे आजवर दाखवलं गेलं आहे त्यासारखं धाकली सवत, थोरली सवत सारख्या नांदायच्या फंदात पडत नाहीत. आपला आपल्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे याची ती पावलोपावली प्रचिती देते. जरीनाही भूतकाळाला वर्तमान आणि भविष्यात ढवळाढवळ करू देत नाही. सेल्वी नवऱ्याला आरे कारे करते. जरीना पाया पडण्याऐवजी हात मिळवणं समानतेचं आणि समतेचं लक्षण असल्याचं ठासून सांगते. पा. रंजीत मागासवर्गीय स्त्रीवादाचं, त्या स्त्रीयांचं सौंदर्यशास्त्र इतक्या ताकदीने मांडतोय की त्याला तोडच नाही.

ब्राह्मण स्त्रीवाद्यांनी कायमच मागासवर्गीय कार्यकर्त्यांना गोऱ्या रंगाचं असलेलं लोचट आकर्षण, ब्राह्मण स्त्रीयांबद्दल असलेलं लैंगिक आकर्षण, दलित पितृसत्तेच्या नावाखाली प्रत्येक बाईला चिरडणारे पुरूष अशी जी काही व्याख्या तयार केलेली होती ती रजनीकांतच्या एकुण एका कृतीतून मोडून काढली आहे. आपलं जुनं प्रेम परतून आपल्यासमोर उभं ठाकलेलं असतानाही वर्तमानात चालू असलेलं नातं, ते निभावणं किती महत्त्वाचे आहे हे स्त्री व पुरूष या दोन्ही पात्रांकडून व्यवस्थित निभावलेलं आहे. आपल्या आधीच्या प्रेयसीबद्दल सुनांशी, बायकोशी, नातवांशी, मुलांशी दिलखुलासपणे बोलू शकणे, बायकोने त्या प्रेयसीला भेटण्यासाठी कोणतीही आडकाठी न करणे या गोष्टी मागास जातींतल्या घरात सहजपणे घडतात. खाना बनाना सिर्फ औरतो का काम नही म्हणण्यापर्यंत आलेले हे विचारस्वातंत्र्य सहज आलेले नाही. त्यामुळे रजनीकांतच्या घरात असलेला बाबासाहेबांचा फोटो, पेरियारसदृश्य वेंगईचा फोटो सार्थ ठरतो.

धारावीतच नव्हे तर पब्लिक संडास असलेल्या प्रत्येक वस्तीत संडासाच्या लाईनीत उभं राहताना मुली पाहणं, लग्न ठरणं, तीच जागा लाईन मारण्याची जागा असणं अगदी सहजपणे दाखवल्या गेल्यात. ही खरंच कमाल आहे. छोट्याश्या खुराड्यात तीन चार बिऱ्हांडांनी राहताना त्यांचा होणारा लैंगिक कोंडमारा अगदी खुशीत चित्रित केला आहे. यात कुठेही ते किळसवाणं होईल असे संवाद नाहीत. म्हणून ब्राह्मण स्त्रीवाद्यांनी दिलेल्या एकेका कलंकाला पा. रंजीत सफाईदारपणे पुसून टाकतो. म्हणून पा. रंजीत जबरदस्त जिंकतो आहे.

हा सिनेमा सुरू होतो तोच मेनस्ट्रीम ने ठरवून दिलेल्या सर्व चौकटींना, सौंदर्यशास्त्रांना उद्ध्वस्त करत. हिरोची एंट्री दमदार होण्याऐवजी लहानग्यांकडून खेळात हरलेला हिरो, तो ही रजनीकांत दाखवणं, हे कमालीचे विलक्षण धैर्याचे काम होते. ते ही रंजीथने लीलया पेलले. यात कुठेही अतिशयोक्ती नाही. अतिशयोक्ती अॅक्शन स्वीकेंस मध्ये आहे. तेवढं चालतं कारण त्यात रजनीकांत आहे. पण या ठिकाणी फिजिक्सच्या नियमांना कुठेही चॅलेंज केलेलं नाही. रजनीकांतचा एकेक संवाद बाबासाहेबांचे कोट्स म्हणून कानावर येत असतात. सबटेक्सट म्हणून संदर्भ, असूर नावाचे पुस्तक टेबलावर दिसणे, रावणाचं खरं अॅप्रोप्रिएशन, जो राखतो .. रक्षा करतो तो राक्षस, तोच रावण हे अॅप्रोप्रिएशन प्रचंड ताकदीने उभे राहते. तरी या सिनेमाचं जे कथानक आहे ते खरे तर तामिळ विरूद्ध मराठी नसून … फॅसिजम विरूद्ध लोकशाही असेच आहे. त्याचा आधार एसआरएचे राजकारण आहे.

धारावी… सायन स्टेशनच्या बाजूला वसलेली आशियातली सर्वात मोठी झोपडपट्टी. सायन म्हणजे SION .. शीव… ही मुंबईची शीव. मुंबईची बॉर्डर. जेथून मिठी नदी वाहते. ही नदी गोड्या पाण्याची नव्हती. खारट पाण्याची नदी. म्हणून नाव पडलं मिठी नदी. या पाण्यातच मुंबईचा कचरा जमा होऊ लागला. मुंबई स्वच्छ ठेवण्यासाठीचं हक्काचं कचऱ्याचं गोदाम धारावी बनली. धारावी आजही अख्ख्या मुंबईचं भंगार मॅनेज करते. धारावी तेच भंगार कातरते, चिरते, त्यातून नवनव्या वस्तू निर्माण करते. आज जगात असा कोणताही उद्योग नाही जिथे धारावीतलं लेदर प्रोडक्ट जात नाही. प्रत्येक ठिकाणी धारावीचा ठसा आहे. पण या लोकांना धारावीचं प्रोडक्ट जरी चालत असलं तरी धारावीची माणसं नको असतात. या नको असणाच्या तुच्छतेविरोधात जो यल्गार आहे. तोच काला आहे.

आयुष्यभर बाळ ठाकरेंच्या राजकारणाची भलावण वजा गुलामी केलेल्या नाना पाटेकरसारख्या कलाकारानेच मोदी प्लस बाळ ठाकरे अशी भूमिका साकारावी. पा. रंजीथ ने ती भूमिका नानाकडून करवून घेणे, हा नानाच्या राजकीय भूमिकेवर काळाने उगवलेला सूड आहे. चित्रपट पाहताना क्षणाक्षणाला ९२ पासून घडलेल्या दंगली, त्या दंगलीत सत्ताधाऱ्यांनी पोलिसांचा केलेला वापर मनात एकाच वेळेस धडकी, प्रचंड राग, दंगलग्रस्तांप्रती प्रचंड सहवेदना निर्माण करत जातो. तामीळ सिनेमा राजकीय प्रोपोगेंडासाठी बनवला जातो असं म्हणतात. नाही, तामीळ सिनेमा हा स्वतःच एक मोठं राजकारण आहे. कालाला कुणी रजनीकांतचा इलेक्शन मॅनिफेस्टो म्हणेल. म्हणतही आहेत. तर म्हणू देत. ते योग्यच बोलताहेत. पण त्याचवेळेस ते सर्व या देशातल्या किमान साठ टक्के लोकांच्या राजकीय कृतीशी अनभिज्ञ आहेत याचीच ती साक्ष आहे.

मुंबईच्या जमीनी ह्या धंद्यापेक्षा स्वतःच्या स्वार्थी अस्मितेचं प्रतीक आहेत. त्यामुळे एसआरएचं राजकारण भयानक आहे. याला ९२ नंतर तरूण झालेला तरूण वर्ग मोठ्या संख्येने बळी पडलेला आहे. कार्यकर्त्यांचं नेभळट बूर्झ्वा तरूणांत वर्गीकरण करण्यात एनजीओ राजकारणारला बऱ्यापैकी यश मिळालेलं आहे. त्याचं परफेक्ट एक्झांपल म्हणजे कालाचा मुलगा लेनीन. स्वतःचं असणं सुधारलं पाहीजे ही त्याचीही मनिषा. पण सुधारणं म्हणजे उच्चवर्गीयांचं अनुकरण करणं ही आताच्या घडीला असलेल्या तमाम डाव्या आणि अर्धवट आंबेडकरी तरूण, तरूणींची असलेली मानसिकता जी आहे ती लेनीनच्या भूमिकेतून परफेक्ट उमटलेली आहे. दोन पुस्तके वाचून, स्वतःची मूळं समजून न घेता क्रांती करायला निघालेल्या तरूणांना सणसणीत चपराक लगावण्याचं काम पा. रंजीथने लेनीनच्या माध्यमातून केलेलं आहे. दलित ब्राह्मण पणाची बीजं आपल्याच मुलात रुळलेली पाहून दुःखी झालेला करिकालन त्यांना वेळीच ठिकाणावर आणतो. हे धाडस आजकालचे बापलोक आपल्या मुलांबाबत करेनासे झालेत. ते लवकरच होईल अशीही अपेक्षा मनातून व्यक्त होते.

सिनेमात, मराठी माणसाने स्वतःच्या न्यूनगंडापाई पोसलेल्या राजकीय नेतृत्वाने इथल्या मागासवर्गावर पर्यायाने स्वतःवरच किती मोठं संकट ओढवून घेतलंय यावर भाष्य करतो. राज्यातल्या भाषिक राजकारणाऱ्या फॅसिस्ट संघटना ह्या कश्या सेवाभावी, उत्स्फूर्त समाजसेवी आहेत अशी पिपाणी वाजवून गैरकाँग्रेसी राजकारणाराची फिडेल वाजवत आलेल्या तमाम उच्चवर्गीय पुरोगाम्यांना सुद्धा चपराक आहे. फॅसिजम हा फॅसिजमच असतो हे सांगायला पा. रंजित जराही घाबरत नाही.

आपल्या सिनेमाचा नायक आजोबाच्या वयाचा आहे. पण तो आधुनिक आहे. तो थेअरींमध्ये रमत नाही. तो शिक्षणाचं महत्त्व जाणतो. तो आधुनिक युगातील तंत्रज्ञानाला मोठं मानतो. स्वतःच्या मेव्हण्याला सोशल मिडीया वापरून आपल्या आंदोलनाची धार मोठी करायला लावतो. तेव्हा मला राजा ढालेंसोबत झालेला वाद आठवला. या वादात तेथे उपस्थित असलेल्यांना घेतलेली सोईस्कर भूमिकाही आठवली. कालाची व्यक्तीरेखा आधुनिक तंत्रज्ञानाला हत्यार बनवून आंदोलन धारधार करते. त्याला उगाच हे भांडवलवाद्यांचं तंत्रज्ञान आहे असं म्हणून स्वतःला ते जमत नसल्याचा वा आपण त्यात खुप पिछाडीवर पडलो असल्याचं अपयश झाकण्यात एनर्जी वाया घालवत नाही. कठिण प्रश्नांना सोपं करून लोकांना सांगतो.

काला हा फक्त रंग नाही. तो मेहनतीचा रंग आहे. ह्या रंगाच्या लोकांनी स्वतःच्या हक्कांची, अधिकारांची, स्वतःच्या मालकीच्या रिसोर्सेवर कसं बोलावं, अहिंसेला कोणत्या पातळीपर्यंत जपावं याची परफेक्ट शिकवण आहे. आपलं दुःख व्यक्त करताना ते रॅप मधून व्यक्त करणं हे किती सुंदर असू शकतं याचं उदाहरण आहे. धारावीचाच नव्हे तर देशातल्या तमाम वस्त्यांत असलेलं रॅपचं टॅलेंट हे भन्नाट आहे. ती गाणी पूर्णतः भिन्न आहेत. त्यात आक्रोश आहे, प्रश्न आहेत, सोल्यूशन आहे, विचारधारा आहे. या वस्त्यांत रॅप गाणारी मुलं ही मेनस्ट्रीमवर नाहीत. कारण त्यांच्या रॅप मध्ये शिव्या नाहीत. ड्रग्ज नाहीत. फिमेल बॉडीचं ऑब्जेक्टीफिकेशन नाही. पण शरिराची घाणेंद्रीये जरूर आहेत. घाण होणाऱ्या अवयवयांना नाक न मुरडता ती स्वच्छता ठेवणारी अवयव म्हणून मान्यता आहे. म्हणून ही रॅप गाणारी मुलं कुणाच्याच पोर्टलवर नाहीत.

काला तमाम शुद्धतेच्या संकल्पनांना गढूळ करत त्यांना जमीनीवर आणतो. काला संघर्षात लढताना कसलीच भीडभाड बाळगत नाही. तो सुसाट असतो. सुसाट जातो. शिक्षणाने, संघटनाने, संघर्षाने स्वतःचा विजय कसा अर्जित करावा याचा परिपाठ आपल्यापुढे मांडतो.

एका मागासवर्गीय नायकाला जिंकताना दाखवायला … एका ब्राह्मण, ब्राह्मण्यावादी व्यक्तिरेखेला हरताना दाखवायला … ब्राह्मणी सौंदर्यशास्त्राचे इमले तोडायला… आंबेडकरी सौंदर्यशास्त्राचे, आंबेडकरी स्त्रीवादाचे सशक्त वर्णन करायला या सिनेमाजगताला ८७ वर्षे वाट पहावी लागली.

मी काला सर्वांना रिकमेंड करेन. त्या सर्वांसाठी जे आजही वस्त्यांत राहतात. असे ते सर्व लोक जे आपल्या जमींनींना फक्त २२५ स्क्वेअर फुट साठी कोण्या गुजरात्या मारवाड्याच्या जैनांच्या घशात घालत आहेत. ही जमीन नसली तर आपण कुणीच नाही. रमाबाई नगरचं हत्याकांड पुतळ्यासाठी नव्हतं. हे समजायला आपल्याला २००६ उजाडावं लागलं. आपलं राजकारण तपासण्याची संधी आपल्याला कालाने दिली आहे. ती संधी वाया घालवू नका.

एक नागराज यायला मराठीला १९१३ ते २०१३ .. फँड्री पर्यंत वाट पहावी लागली. तेच पा. रंजिथचंही. कालाचे रिव्यू निगेटिव आले. हा काही रिव्यू नाही. ही फक्त अभिव्यक्ती आहे. काला सिनेमा लवकर उतरवला गेला. कारण तो चालत राहणे म्हणजे आधीच नुकसानीत गेलेल्या रिअल इस्टेट मार्केट ला चॅलेंज करण्यासारखे आहे. त्याचाच कित्ता सध्या चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत गिरवला जातोय. लाईट आणि पाणी बंद आहे. पण तिथे कुणी काला नाही. आपली जमीन आपलं राजकारण आहे हे आंबेडकरी लोक विसरले आहेत. ते त्यांना कालाच्या निमित्ताने एकदा जोरदार आठवावे… आपल्या मुलांना आंबेडकरी हस्तक्षेप समजावून सांगावा, आंबेडकरवाद शिकवावा हीच नम्र इच्छा…

पा. रंजीथला लव यू…

जय भीम…

मी अजून भरपूर लिहीणार आहे… धारावी आणि धारावीच्या समकक्ष असलेल्या सर्व मेहनतकश वर्गीयांच्या वस्त्या माझं प्रेम आहे. त्याच माझा मतदारसंघ आहेत. तिथली भाषा ही माझी भाषा आहे. माझी मुळं तिथल्याच मातीतली आहेत. त्यामुळे ज्यांना हे आक्रस्ताळं वाट्टेल त्यांना खुश्शाल वाटू द्यावं. हा त्यांच्या भाषेचा, जाणीवेचा, नेणीवेचा प्रॉब्लेम आहे. कारण त्या ब्राह्मणवादी आहेत.

असो.. आज मला मीच लिहीलेली धारावी कविता प्रचंड आठवते आहे. ती तितकंच मला समाधान मिळवून देत आहे… करिमभाईच्या कैच्या धारदार करणाऱ्या शॉप नं १२ तल्या धारधार कैचीसारखा बनलेला काला सिनेमा ग्रेटच आहे. कारण या कालामुळे येत्या पाच वर्षात कैक ग्रेट कलाकार जन्माला येणार आहेत. ही खूणगाठ मनाशी पक्की असूद्या. तेव्हा कालाच्या एंडला जे रंग उधळले गेले आहेत ना तशीच इंद्रधनुष्यासारखी धारावी निळ्या, काळ्या, लाल रंगाचं राजकारण करत पुन्हा उभी राहील.

-वैभव छाया…

Previous articleअकेलेपन का अंदमान भोगते आडवाणी
Next articleअमृता, साहिर आणि इमरोज
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.