साभार : कर्तव्य साधना
-हिनाकौसर खान-पिंजार
‘हेल्लारो’ या गुजराती भाषेतील चित्रपटाला यावर्षी सर्वोत्कृष्ट राष्ट्रीय चित्रपटाचे सुवर्णकमळ मिळाले आहे. अभिषेक शाह या तरुण दिग्दर्शकाचा हा पहिलाच चित्रपट. गुजराती लोककथेतून प्रेरीत झालेला हा चित्रपट पाहताना केतन मेहतांच्या ‘मिर्च-मसाला’ची आठवण झाल्यावाचून राहत नाही. हेल्लारो चित्रपटातल्या श्रद्धा डांगर, शाची जोशी, देनिशा घुमरा, नीलम पांचाल, तर्जनी भादला, ब्रिंदा नायक, तेजल पंचसारा, कौशंबी भट, एकता बचवानी, कामिनी पांचाल, जागृती ठाकोरे, रिद्धी यादव आणि बालकलाकार प्राप्ती मेहता अशा तेरा अभिनेत्रींना विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला आहे. शुक्रवार, 8 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट देशभर प्रदर्शित झाला आहे.
चित्रपट सुरू होतो तेव्हा, पहिल्याच दृश्यात एक पुरुष आरशात पाहून त्याच्या झुपकेदार मिशांना वळण देत असतो. तिथंच चुलीपाशी आईजवळ बसलेली सात-आठ वर्षांची मुलगी गरबा खेळण्यासाठी आईला विनवत असते. आरशात पाहणारा पुरुष म्हणजे त्या चिमुरडीचे वडील. ते मुलीच्या हट्टावर चिडून म्हणतात, ‘मुली गरबा खेळत नाहीत.’ त्यावर ती बालसुलभ कुतूहलाने विचारते, ‘असं का?’ घराबाहेर पाऊल टाकायला निघालेले वडील त्या प्रश्नावर वळतात आणि म्हणतात, ‘मुलींनी प्रश्नही विचारायचा नसतो.’ त्याच्या पुढच्याच दृश्यात देवीपुढं नतमस्तक झालेली गावातली समस्त पुरुष मंडळी दिसतात. गावचा प्रमुख मानला गेलेला पुरुष त्या देवीकडे आळवणी करत असतो, ‘ये माये, मान्सूनमधला पहिला गरबा तुला अर्पण करत आहोत. तीन वर्षांनंतर यंदा तरी आमच्या जमिनी ओल्या होऊ दे, यंदा पाऊस होईल असा आशिर्वाद दे.’ आणि मग हातात नंग्या तलवारी घेऊन स्वत:च्या मर्दानगीचं खुलं प्रदर्शन करत पुरुष गरबा नृत्य करु लागतात. जित्या जागत्या स्त्रियांना घरात डांबून, कोंडून मूर्तीतल्या देवीपुढं शरण गेलेले पुरुष ही विसंगती एस्टॅब्लिश करुन चित्रपटाची सुरूवात होते आणि पुढे पदोपदी वृत्तीतल्या अशा विविध विसंगतीतनं हाडामांसाच्या स्त्रियांचं होणारं शोषण चित्रपट सहज अधोरेखित करत जातो.
हा चित्रपट घडतो, तो १९७५ च्या काळात. कच्छच्या वाळवंटातील समरपूर नावाच्या गावात. हे गाव शहरापासून तर सोडा, आसपासच्या गावांपासूनही तुटलं आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी आणीबाणी घोषित केली आहे, याचा पत्ताही गावाला नाही. शहरातून ये-जा करणारा भगलो (मौलिक नायक) ही खबर घेऊन येतो. तेव्हा एक गावकरी म्हणतो, ‘गावात सरकार कधी आलं नाही मग आणीबाणी कधी आली.’ दुसरा त्यावर म्हणतो, ‘गावात आणीबाणीसुद्धा आली पण तीन वर्षांपासून पाऊस काही आला नाही.’ तर तिसरा म्हणतो, ‘बाईकडं देश चालवायला दिला तर असंच होणार.’ त्या गावात पाऊस व्हावा म्हणून पुरुषमंडळी देवीला गरबा अर्पण करत असतात. ती त्या गावची प्रथाच असते. बायकांना मात्र ती पाहण्याचीसुद्धा मुभा नाही. ढोलकीचा आवाज तिथल्या बायकांना फार आकर्षित करत असतो. त्यावर ताल धरावा, पाय मोकळे करावेत,असं त्यांना खूप वाटतं पण परंपरेनं त्यांना नाचण्यापासून रोखलं आहे. तरण्या पोरींनी गरबा करावा, हे बुजुर्ग महिलांनाही पटण्यासारखं नसतं.
या गावात लग्न होऊन मंजिरी (श्रद्धा डांगर) नावाची तरुणी येते. गावात कुठल्या प्रकारची घुसमट तिची वाट पाहतेय याची तिला जाणीव नसते. बीएसएफमध्ये असणारा तिचा नवरा, अर्जन (अर्जन त्रिवेदी) लग्नाच्या पहिल्याच रात्री तिला विचारतो, ‘शिक्षण किती झालंय?’ ती उत्तरते, ‘सातवी.’ अर्जन तिच्याकडे रोखून पाहतो आणि म्हणतो, ‘इतकं शिकल्यानंतर मुलींना पंख आणि शिंगं फुटतात. तुला यातलं काय फुटलंय? काहीही फुटलेलं असू दे, तू ते स्वत:च छाटून टाक. मी ते कापले तर तुला त्याचा जास्त त्रास होईल.’ गावात मंजिरी ही एकमेव शिकलेली, शहरातून आलेली स्त्री आहे. बाकी बायकांची अवस्था न विचारलेलीच बरी. तर इतकं बंदिस्त आयुष्य जगणार्या या बायकांच्या आयुष्यात एकच विरंगुळा आहे, तो म्हणजे पाण्यासाठी पाच-सहा किलोमीटर अंतर पायपीट करत जाणं. खरंतर हा विरंगुळादेखील जीवघेणाच आहे. पण घरातच अडकून पडलेल्यांसाठी हीच काय ती मोकळीक. पाणी उपसण्याच्या निमित्ताने का होईना, त्या घराबाहेर पडू शकत असतात. एकमेकींशी बोलू, हसू शकतात, बाकी पूर्ण वेळ जणू मुक्याच.
त्यांच्यावर रूढी-परंपरांचा प्रचंड पगडा आहे. केवळ पुरुषांनी ठरवलंय म्हणून पाणी भरायला सोबत येणार्या विधवेशी देखील त्या बोलण्यास धजावत नसतात. मंजिरी मात्र विधवेशी बोलायला जाते. तिला विरोध करणाऱ्यांना ती बाणेदारपणे म्हणते,‘नियम आणि खेळ दोन्ही त्यांचेच. भावनांशी खेळण्याचा त्यांचा हा खेळ आपण नको खेळायला. आपणदेखील आधीच त्यांच्या नियम-खेळांचे बळी आहोत.’ स्त्रियांनी तरी आपसांत भेद न करता आपली दु:ख नीट ओळखावीत असंच मंजिरीला तिथं सुचवायचं असतं.
मंजिरीच नव्हे तर इतरही बायकांकडे जगण्यातून आलेलं शहाणपण आहे. पाण्यासाठी जात असताना त्यांच्यातली राधा (देनिशा घुमरा) म्हणते, “किती विचित्र आहे ना, पाऊस पडावा म्हणून पुरुषांनी गरबा करायचा आणि बायकांनी उपवास.” त्यांना एकाअर्थी त्यांचं दु:ख कळतंय पण ते मोकळं करुन द्यायला वाट गवसत नसते. ती मिळते – एका ढोलकी वाजवणार्या मुलजीच्या (जयेश मोरे)रूपाने. पाण्याच्या वाटेवर त्यांना हा मुलजी बेशुद्धावस्थेत सापडतो आणि तिथून पुढं त्यांना गरबातून व्यक्त होण्याचं माध्यमही गवसतं. मुलजीच्या ढोलकीवर मंजिरीच प्रथम ताल धरते. हळूहळू इतर जणीही पुढाकार घेतात. बंडखोरीची इच्छा जणू सगळ्यांत दडलेली असते, त्या इच्छेला फक्त एखादी संधी, कुणाचा तरी पुढाकार मिळाला की, पुढचा प्रवास करायला कुणीही तयार होतो, हेच दिग्दर्शकाला सांगायचंय असं वाटत राहतं.
या चित्रपटाचा खरा नायक गरबाच आहे, भावभावनांना दडपून टाकण्याच्या माहोलात केवळ गरबाच त्यांना मुक्ततेचा सोबती भासतो. घाबरत, चाचरत सुरू केलेल्या गरबाच्या नृत्यातून या स्त्रियांना मोकळं वाटू लागतं. त्यांच्या आयुष्यात एकाएकी रंग येतो, त्यांना स्वत:ला आरशात पाहावंसं वाटू लागतं, आनंदी रहावं वाटू लागतं. खरंतर पहिल्यांदा गरबा करतात तेव्हा त्यांना त्यासाठी अपराधी वाटू लागतं. आपल्या हातून पाप घडलंय असंही वाटतं. आपल्या पापाची शिक्षा आपल्या कुटुंबियांना, विशेषकरून पुरुषाला मिळेल अशीच त्यांना भिती वाटते.
पण मंजिरीला वाटत असतं की, देवी कोपणार नाही. त्यावेळी तिच्या तोंडचं वाक्य विचार करायला लावणारं आहे, ‘देवी कुणाच्या अंगात ‘येत’ नाही. ती असतेच आपल्यासोबत. उलट आपण गरबा करतोय, हे पाहून देवीलाही आनंद वाटत असेल.’ देवीसुद्धा दगडात बंदिस्त आहे, असं अलवार सुचवून एक स्त्री दुसर्या स्त्रीची मुक्तता नक्कीच समजून घेईल, हे सहज मांडलं गेलं. आपला गरबा ‘पाप’ नाही असं वाटायला लागल्यावर सगळ्या जणींना पाणी आणायला जाणं मौजेचं वाटू लागतं. ‘आमच्या आयुष्यात वाळवंटातल्या वार्याचा सोसाटा नाहीतर सन्नाटा, इतकंच आहे.’ असं मंजिरी म्हणते, तेव्हा ती आजच्या काळातही अगणित प्रकारच्या दडपणाखाली असणार्या स्त्रियांचंच प्रतिनिधित्व करते. मात्र त्यांच्या या छुप्या आनंदाची गावकर्यांना माहिती होते आणि चित्रपट वळण घेतो.
सासुरवास, लग्नसंस्थेतला बलात्कार, गर्भावस्थेतही मारहाण, मुलगा-मुलीतला भेद, विधवेचा दुस्वास अशा विविध शोषणप्रकाराला चित्रपट हळूच स्पर्शून जातो. खरंतर स्त्रियांवर होणार्या अन्याय-अत्याचाराची किंवा तिच्या दडपशाहीची गोष्ट यापूर्वी अनेकदा सिनेमांतून मांडली आहे. आजच्या काळातही अनेकींच्या खर्याखुर्या आयुष्यातही अशीच दडपशाही आहे. मात्र या चित्रपटात ती ज्या पद्धतीने मांडली आहे, त्यात तिचं वेगळेपण दडलं आहे. कुठल्याही पद्धतीने आक्रस्ताळेपणा न करता वा कुठल्याही दृश्यातून ‘प्रीची’ न होता सर्वसामान्यांना सहज समजेल अशारितीनेही एखादा गंभीर विषय हाताळता येऊ शकतो, हे या चित्रपटानं पुन्हा स्पष्ट केलं आहे.
दिग्दर्शक अभिषेक शाह यांना मनोरंजन करता करता समाजाची दुखरी नस दाखवण्यात यश आलं आहे. गंभीर विषय असूनही प्रेक्षकाला सिनेमागृहात खेचून आणू शकेल असा हा चित्रपट झाला आहे. स्त्रियांचं सप्रेशन दाखवायचं असलं तरी सगळे पुरूष ‘व्हिलन’ अशी सिनेमाची रचना नाही. भगलो किंवा मुलजीसारखी पात्रं पुरुषांतलं माणूसपण मांडतात. ‘आधी स्त्रिया मग गाव’ असं म्हणून ढोलकीवर थाप देणार्या मुलजीच्या चेहर्यावरचा आनंद आणि समोर गरबा करायला उत्सुक असणार्या स्त्रियांचा आनंद एका पातळीवर येतो, तेव्हा प्रेक्षक म्हणून आपणही सुखावतो. दिग्दर्शकानं प्रत्येक फ्रेम आणि सीनमागे फार विचार केल्याचं आणि केलेला विचार अभिनेत्यांपर्यंत पोहोचल्याचं जाणवत राहतं.
सौम्य जोशी यांच्या मोजक्याच पण ताकदीच्या संवादाने तर सिनेमाला चार चाँद लागले आहेत. सिनेमातले एकेक संवाद, एकेक सुविचार-वनलायनर्ससारखे मनात बराच वेळ घोळत राहतात. जोशी यांनी लिहिलेली गाणीसुद्धा अत्यंत अर्थपूर्ण आणि श्रवणीय आहेत. ‘लेजे सपनाविना नी खाली रात’ हे गीत तर बायकांच्या दडपशाहीचं दु:ख अत्यंत नेमकेपणानं मांडतं. या सिनेमाचा गरबा हा मुख्य भाग असला तरी तो अत्यंत अस्सल पद्धतीने सादर केला आहे. बॉलिवूड किंवा नवरात्रीत जागोजागी खेळल्या जाणार्या फिल्मी गरबाला समीर टन्ना आणि अंश टन्ना या नृत्यदिग्दर्शकांनी येथे पूर्णत: फाटा दिला आहे. त्यांनी यातून स्त्रियांचं हळूहळू मोकळं होत गेलेलं अवकाश परिणामकारक उभारलं आहे. ते इतकं सुंदर झालंय की एकामागून एक गरबा पाहिला तरी सिनेमासारखं स्टोरीटेलिंग त्यात दडलं आहे.
सिनेमातल्या लहानमोठ्या प्रत्येक पात्रानं त्याच्या कॅरेक्टरला न्याय दिला आहे. निकी जोशी यांनी स्त्री पात्रांसाठी केलेली वेशभूषाही लक्षात राहण्याजोगी आहे. सुरूवातीला फिक्या आणि मंद रंगातील घागरा चोली पुढे पुढे बंडखोरीचं प्रतिक असणार्या लाल रंगात अलवार परावर्तित होते.
आणखी एक, एखाद्या चित्रपटाच्या नावातच गंमत असणं याचा अर्थ काय, हे हेल्लारो या चित्रपटाच्या शिर्षकातून आणि त्याच्या पोस्टरमधून पोहोचतं. हेल्लारो हा पुरातन गुजराती भाषेतला शब्द. आता सहसा गुजराती बोलणारी माणसंही तो शब्द फारसा वापरत नाहीत. या शब्दाचा अर्थ आहे, पाण्याच्या प्रवाहातील मोठी लाट. नुसती लाट नाही तर सगळ उलटपुलट करून जाणारी लाट. कच्छसारख्या, पाण्याचं दुर्भिक्ष्य असणार्या वाळवंटात पाण्याचं महत्त्व अनन्यसाधारण असणारच. गावातला दुष्काळ आणि त्याच गावातल्या स्त्रियांच्या आयुष्यात आनंदाचा ओलावा नसल्यानं कोरडीठक्क झालेली त्यांची आयुष्यं. पाण्याची असो की अभिव्यक्तीची, तृष्णा सारखीच असते आणि ती पूर्ण करण्याची प्रेरणा आपल्या आतच असते. स्त्री अभिव्यक्तीची तृष्णा आणि ती भागवण्यासाठी सुरू झालेला प्रवास, हेल्लारो या चित्रपटातून पहायला मिळतो.
(हेल्लारो हा चित्रपट 8 तारखेपासून देशभरातील प्रमुख शहरांत प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, मुंबई या शहरांचा समावेश आहे.)
साभार : http://kartavyasadhana.in/