प्रेम या भावनेचं transformation होत नाही !!

-मिथिला सुभाष

प्रेम..!! या अडीच अक्षरात खूप मोठी जादू आहे. ज्यांना प्रेम कळलंय त्यांना ते ‘कळलं’ म्हणून आणि ज्यांना नाही कळलं, त्यांचा शोध संपत नाही म्हणून. खरं तर प्रेम ही सगळ्यात सोपी भावना आहे. पण ती दुर्मिळ आहे. आपल्यातली खूप कमी माणसं खऱ्या अर्थाने प्रेम करतात. ‘मी प्रेम करतो/करते’ या भावनेवरच बहुधा आपण प्रेम करत असतो.

प्रियकर सोडून गेल्यावर काही बायका सूडाने पेटतात, काही त्याला त्रास देण्याच्या क्लृप्त्या शोधतात, त्याची बदनामी करतात, त्याच्या खाजगी गोष्टींचे भांडवल करतात आणि येनकेनप्रकारेण त्याला ‘पळता भुई थोडी’ करतात. हेच उलटही होतं. पुरुष पण असे वागतात. अशा लोकांनी प्रेम केलेलंच नसतं. ‘मी प्रेमात आहे’ या भावनेवर त्यांचं प्रेम असतं. आणि मग त्यात इतर अपरिहार्य गोष्टी म्हणजे सेक्स, मालकी हक्क, अहंकार वगैरे असतात. अस्सल प्रेमात येणारी असूया तात्कालिक असते, टेम्पररी असते. ती काही काळाने संपते आणि प्रेम पुन्हा झळाळून उठते.

परिवर्तन हा जगाचा नियम आहे. या नियमाला अपवाद फक्त एकच. पृथ्वी..! ती सूर्याभोवती फिरण्याचे सोडत नाही. बहुतेक मानवी भावनांच्या बाबतीतही परिवर्तन अटळ असते. प्रत्येक भावना कालांतराने बदलते. काळजीचा कंटाळा होतो, मालकी हक्क हा सूड किंवा तिरस्काराचे रूप घेतो, दु:खाचे रुपांतर वेडेपण किंवा स्थितप्रज्ञतेत होते, सुख आळसावते किंवा माजते..!! कुठलीही मानवी भावना घ्या, तिचा अतिरेक नेहमी तिचं रूप बदलतो. प्रेम ही एकच भावना अशी आहे जी कधी बदलत नाही, transform होत नाही. कारण ‘प्रेम’ ही भावना माणसाने सरळ-सरळ पृथ्वीकडून घेतलेली आहे. पृथ्वी कधीही एका कुणातरी विशिष्ट व्यक्ती वा समाजाला अवकाशात भिरकावून देत नाही. तुम्ही तिच्यावर कितीही अत्याचार करा, ती प्रेमच करते. तिचं प्रेम बदलत नाही. आणि म्हणून तिच्याकडून घेतलेली ही भावना पण कधीच बदलत नाही. बदलते ते प्रेम नसते.

प्रेम हे concentrated सरबतासारखं असतं. ते जसं असतं तसं घशाखाली उतरत नाही. डायल्युट करावं लागतं. या डायल्युट करण्याच्या प्रकारामुळे आपण प्रेमाचं खरं स्वरूप विसरलोय. त्यात इतर भावना, इच्छा, महत्वाकांक्षेचं पाणी घालत राहतो. जे निरपेक्ष असणं अपेक्षित आहे त्यात अपेक्षांची भेसळ करत राहतो आणि त्यालाच ‘प्रेम’ समजतो. माणसाचा प्रेमभंग होऊ शकतो, पण ते तिरस्कार किंवा इतर कुठल्याही नकारात्मक भावनेत बदलू शकत नाही. प्रेम ही उर्जा आहे. उर्जा विधायक असते, ती जेव्हा संहारक रूप धारण करते तेव्हा तिच्यात मुळातच काहीतरी घोळ असतो.

‘प्रेमात असणं’ ही एक विलक्षण घटना आहे. ‘मला तिच्याबरोबर/त्याच्याबरोबर लग्न करायचंय’ किंवा, ‘मला तिच्यासोबत/त्याच्यासोबत झोपायचंय’ या किंवा तत्सम भावना मनात ठेऊन होतं ते प्रेम नाही..!! ते वाईट आहे असंही नाही मला म्हणायचं. यातली पहिली गरज सामाजिक आहे आणि दुसरी नैसर्गिक. पण ते प्रेम नक्की नाही. “त्याला मी नको आहे तर मी त्याच्या नजरेसही न पडण्याचा कटाक्ष पाळणे,” हे प्रेम आहे. “त्याचे इतर कुणावर तरी प्रेम आहे, तर त्यासाठी त्याला मदत करणे,” हे प्रेम आहे. आणि अशा ‘प्रेमात’ फार कमी लोक असतात. हे प्रेम बदलत नाही. यावर कुठल्याही प्रतिकूलतेचा परिणाम होत नाही. सास्कृतिक, आर्थिक किंवा सामाजिक परिस्थितीत असलेली विषमता, वयातले अंतर या कशाचा परिणाम प्रेमावर होत नाही. यात आपण आपल्या जोडीदाराला त्याच्या सर्व गुण-दोषांसह स्वीकारलेलं असतं. तरच ते ‘प्रेम’ असतं. प्रियकराला त्याच्या गुण-दोषांसह स्वीकारण्यात एक नैतिकतेचा मुद्दा कदाचित येऊ शकतो. समजा, तो/ती कुठेतरी चुकलेच, चांगलेच चुकले. तर काय करायचं? त्याची चूक धडधडीतपणे दिसत असतांना तिचा स्वीकार करायचा का? ती कायद्याच्या चौकटीत ‘गुन्हा’ मानली जाणारी चूक असेल तर काय करायचं? हा खरं तर एका वेगळ्या लेखाचा विषय आहे आणि थोडा विचार करून मी त्यावर लिहायचं ठरवतेय. त्यामुळे आत्ता असो..!

आपल्याकडे प्रेम आणि लग्न या दोन गोष्टींची घट्ट मोट वळलेली आहे. ‘प्रेमाशिवाय सेक्स असू नये’ ही एक सात्विक भावना आणि ‘लग्नाशिवाय सेक्स करू नये’ हा एक समज, या दोन गोष्टींमुळे प्रेम आणि लग्न एकमेकांशी जोडले गेले. खरं तर प्रेम ही एक अलौकिक भावना आहे आणि लग्न हा एक व्यवहार आहे. या दोघांची सांगड घालणं म्हणजे रथाला मालगाडीचे डबे जोडण्यासारखा प्रकार आहे. ‘प्रेम’ आणि ‘लग्न’ एकत्रितपणे फार कमी नांदतात. अपवाद म्हणून ज्यांच्या बाबतीत हे होते ते खरोखरच कौतुकास पात्र आहेत. पण एरवी, लग्नात असते ती धोरणीपणे केलेली तडजोड असते. ‘धोरणीपणा’ आणि ‘तडजोड’ या दोन मानवनिर्मित गोष्टींना प्रेमाच्या अलौकिक राज्यात प्रवेश नसतो.

संपूर्ण लेखात मी ‘खरं प्रेम’ अशी शब्दयोजना टाळलेली आहे. कारण प्रेम हे प्रेम असतं. बावन्नकशी सोनं जसं ‘स्वयंसिद्ध सोनं’ असतं. ‘खूप-खूप सोनं’ नसतं. तसंच प्रेम हे स्वत:च सिद्ध असतं, स्वयंभू असतं. त्याला कुठलेही विशेषण लावून त्याचा उपमर्द करण्याची गरज नसते, त्या विशेषणामुळे प्रेमाच्या Quantity, Quality, and Volume – प्रमाण, गुणवत्ता आणि आकारमान, यात कुठलाच फरक पडत नाही.कुठल्याही शब्दाने, आघाताने, परिस्थितीने ते बदलत नाही. प्रेम या भावनेचं transformation होत नाही !!

mithila.jadhav@gmail.com

Previous articleदिल्लीत विकास जिंकला , धर्मांधता हरली !
Next articleहोशवालों को ख़बर क्या…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here