रस्त्यावरच्या माणसांच्या आयुष्यालाच लागलीय टाळेबंदी

– विजय चोरमारे

निर्जंतुकीकरण केलं जातंय माणसांचं
त्यांचे कपडे मळले आहेत
त्यांच्या केसांवर चेहऱ्यावर धुळीचे
थर साचलेत ओळखता येणार नाहीत त्यांच्या घरच्यांनाही आपली माणसं एवढे जाड थर
पाय फाटलेत चिंध्या झाल्यात तरी थकलेले नाहीत
कपायचीय खूप लांबची वाट
जगण्याच्या या मॅरेथॉनमध्ये
जे घरापर्यंत पोहोचतील ते सगळे जिंकतील
बाकी माहीत नाही शर्यत अर्ध्यात किती जण सोडणार आहेत

निघालोय गावाकडं यायला म्हणून
कळवलं असेल निघताना
कसं येतोय कधी पोहोचतोय नसलं कळवलं तरी
वाट तुडवता तुडवता मोबाइलनं टाकली मान
डेटा मजबूत असला तरी बॅटरी संपलीय कधीचीच
असंच आहे या माणसांच्या आयुष्याचं
डेटा असतो तेव्हा बॅटरी नसते
बॅटरी फुल्ल असते तेव्हा डेटा संपलेला असतो
आणि दोन्ही असतात तेव्हा रेंज माती खाते
म्हातारी कधीपासून बसली असेल दरवाजात डोळे मिचमिच करत
अजून किती काळ बसावं लागेल तिला सांगता येत नाही
आणि इथं निर्जंतुकीकरण सुरू आहे नाक्यानाक्यावर फवारे मारून अंगावर


त्यांनी थाळ्या वाजवल्या नाहीत कधीच मुद्दामहून
अगदी पंतप्रधानांच्या आवाहनानंतरही
तशी त्यांना वेगळी थाळी नाही वाजवावी लागत
यांच्या पोरांच्या थाळ्या
आपोआप वाजत असतात भुकेच्या वेळेला

आणि सोशल डिस्टनसिंग न पाळणारी
ही रानटी जनता बस स्टँडवर गर्दी करणारी
रस्त्यावरून गर्दी करून चालणारी
त्यांना दाखवा जरा विमानातल्या सुसंस्कृत लोकांचे फोटो
विमानतळावरील रांगांचे
राजकीय नेत्यांच्या घरांतले
कसे लोक अंतर ठेवून राहताहेत घरातल्या घरातसुद्धा
…….
माननीय पंतप्रधान
कायद्याची कठोर अंमलबजावणी करा
तुम्ही एवढं पोटतिडकीनं आवाहन केलंत
तुमच्या अनुयायांनी पुन्हा एकदा टाळ्या वाजवल्या
या एकाच माणसाला देशाची काळजी
असल्याचे मेसेज घुमवले देशविदेशात
तरीसुद्धा तुमच्या आदेशाचं उल्लंघन
करतात हे रानटी लोक
पोलिसांना ऐकत नाहीत
यांचं निर्जंतुकीकरण करा
लष्कर बोलवा
ऐकले नाहीत तर
गोळ्या घाला
नाहीतर यातली निम्मीअर्धी जनता
मरणारच आहे भुकेनं
भूकबळीचा डाग घेण्यापेक्षा
कठोर कायदापालनाबद्दल थाळीनाद करूद्या भक्तांना
……..

राजधानीतल्या बस स्टँडवरची अमाप गर्दी टीव्हीवर पाहून
प्रभू रामाची पूजा करून आलेले
मुख्यमंत्री म्हणाले,
रामसेतू बांधायला निघालेली वानरसेना
दिसतेय मला यांच्यामध्ये

अस्मितेचं राजकारण करणारा
दुसरा एक नेता
गॉगल नीट करीत म्हणाला
माझं काम विषाणूनं केलं

दुर्दैव या माणसांचं
यांना रामायण पाहता येत नाही
भारत एक खोज यांच्या
नशिबात नाही
‘आम्ही भारताचे लोक…’
म्हणत
निघालेत भारताच्या शोधात
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी
वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी
चिंध्या झालेल्या पायांचा उपाशी बाप
खातोय पोलिसांच्या लाठ्या पोराला खांद्यावर घेऊन
पोरगा हादरून गेलाय बापाची अवस्था पाहून

पायाला फ्रॅक्चर झालेल्या पत्नीला
खांद्यावर घेऊन दोनशे मैल धावणाऱ्या पतीनं
याच रस्त्यावर लिहिली जगाच्या
इतिहासातली अमर प्रेमकहाणी
…..
महासत्तेच्या वाटेवरचा महागुरू देश
दुसऱ्यांदा अनुभवतोय देशाची फाळणी
पहिली हिंदू-मुस्लिमांची आणि
दुसरी शहरी-ग्रामीणांची
इंडिया-भारताची
पासपोर्टधारक-रेशनकार्डधारकांची
परमयाळू सरकार विमाने पाठवते
विषाणूंच्या वाहतुकीसाठी
आणि हातावर पोट असणारे गरीब
धावत सुटतात गावाकडं हेच विषाणू पाठीवर बांधून
शहरांनी पायाखालची जमीन खेचली
गावंही नाकारताहेत डोईवरचं आभाळ
आयुष्य बनलंय छावणी निर्वासितांची
विषाणू घेऊन आलेले लोक
घरात वेळ कसा काढायचा या विवंचनेत
रोज नवनवे प्रयोग खाण्याचे, गाण्याचे
चिंता करताहेत कसे ढकलायचे हे टाळेबंदीतले दिवस
आणि या रस्त्यावरच्या माणसांच्या आयुष्यालाच लागलीय टाळेबंदी

(लेखक ‘महाराष्ट्र टाइम्स’ चे वरिष्ठ सहायक संपादक आहेत)

 

Previous articleकोरोना Vaccine काढायला एवढा वेळ का लागतोय ?
Next articleकोरोनापासून बचाव करणारे ‘पीपीई कीट’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here