कोरोना Vaccine काढायला एवढा वेळ का लागतोय ?

-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

-विज्ञान येवढं विकसित झालंय तरी एक Vaccine काढायला एवढा वेळ का लागतोय ? कुठेय तुमचं विज्ञान ?

-बंदुकीच्या गोळीशी लढण्यासाठी आपण बुलेट-प्रूफ जॅकेट बनवलं, पण तेही कधी, तर १०० वर्षांनंतर. बुलेटचा शोध-वापर हा अठराशेच्या काळातला, आणि बुलेट-जॅकेटचा शोध हा १९ च्या काळातला.
न्यूक्लिअर बॉम्ब आहे, पण तरीही आज आपल्याकडे न्यूक्लिअर पासून वाचण्यासाठी कुठलीही साधनं-प्रोटेक्शन नाही. कदाचित अजून २०० वर्षांनी निघतीलही. पण म्हणून का ‘विज्ञानाला’ कमकुवत ठरवता येत नाही.

एखाद्या समस्येवर उत्तर सापडत नाही, म्ह्णून लगेच, ‘देव’ वगैरे घुसवणं विवेकवादात बसत नाही. ते Impatient असण्याचाचं लक्षण ठरेल.

पण तरी , ‘विज्ञान कमकुवत आणि आमचा देव भारी’, असं स्वतःला खोटा दिलासा देऊन जर मानसिकरित्या बरं वाटत असेल तर मग तसं तर तसं …..

————————–

-तर हे Vaccine का येवढा वेळ घेतंय ?

मागे सांगितल्याप्रमाणे, व्हायरसला मारता येत नाही, कारण व्हायरस हा कुणी ‘जिवंत’ नाही, की ज्याच्यावर हल्ला केला आणि मेला. समजा तुमच्या शरीरात एक दगडाचा कण घुसलाय, तर त्याला आपण मारू शकू का ? त्याला फक्त आपण बाहेर कसं काढता येईल, यावर उपाय करता येतील. पण व्हायरस हा कण, असा की ज्याला स्वतःचं जेनेटिक स्ट्रक्चर आहे. जो आत दगडाच्या कणासारखं, एका जागेवर शांत पडून राहत नाही. तर इतर असंख्य पेशी नासवयला घेतो.

पण मग जगात एवढे ‘Antibiotic’ आहेत, त्यातलं एखादं वापरून, नाही का काही करता येणार ?

Antibiotic, हे बॅक्टेरीयावर काम करतं, कारण बॅक्टेरीया, हा सजीवदेखील आहे, आणि तो वेगळ्या प्रकारे घात करतो. पण Antibiotic हे Virus वर काम करत नाही. बॅक्टेरीयामध्ये देखील बरेच बॅक्टेरीया माणसाच्या जीवावर उठणारे आहेतच. त्यातला TB आणि काही STD, जे सेक्स दरम्यान होतात ( उदा, गुप्तरोग – Gonorrhea, chlamydia, syphilis )

आता हेच उदाहरण बघ,
STD हा जर Virus मुळे झाला की तो “AIDS” आणि बॅक्टेरीयाने झाला की “Gonorrhea, Chlamydia, Syphilis” सारखे गुप्तरोग.
आणि त्यातही Aids वर आपल्याकडे औषध नाही, जो Virus पासून होतो…. तर Gonorrhea, Chlamydia, Syphilis सारख्या रोगांवर, जो बॅक्टेरीयामुळे होतो, तो कमीतकमी घातक कसा ठरेल, यासाठी आपल्याकडे आज औषधं आहेत..

Virus आणि Bacteria, हे दोघंही वेगळे आहेत, त्यांची काम करण्याची पद्धत वेगळी आहे.

थोडक्यात सांगायचं तर Virus वर आपल्याकडे कोणतंही औषध नाही. आपण त्याचा बंदोबस्त करू असं आपण बाहेरून काहीही पुरवू शकत नाही शरीराला, औषधी स्वरूपात. त्याचा बंदोबस्त फक्त आपलं शरीरच करू शकतं. म्हणजे आपल्या ‘रोग-प्रतिकारक शक्तीनेच’ त्याची विल्हेवाट लावता येते.

—————————

-असं असेल तर मग, वॅक्सीन बनवून पण मग फायदा नाहीच का ? जर ते काही करणार नसेलच तर मग का बनवतात वॅक्सीन ?

त्याआधी “वॅक्सीन म्हणजे काय”, हे समजावून घेऊ.

वॅक्सीन हे दुसरं-तिसरं काही नसून, ते Virus असतात. म्हणजे आपल्या शरीरात त्या आजाराचे Virus सोडले जातात.
हे दोन प्रकारांनी केले जातात.

१. Inactivated virus – म्हंजे त्या आजाराचे असे Virus जे Active नाहीत, किंवा मेलेले (शब्दशः नाही) आहेत. आणि
२. Attenuated virus – असे व्हायरस, जे activated आहेत, पण त्यांची जेनेटिक रचना बदलली जाते….

ह्या दोन्ही प्रकारात, ही काळजी घेतली जाते, की त्याचा आपल्या शरीराला धोका होणार नाही.

———————–

अरे पण मग ते व्हायरस आत सोडून काय फायदा ?

त्याआधी,

जसं मागे सांगितलं, की व्हायरसशी फक्त आपलं शरीर लढा देऊ शकतं. अजून कोणीही नाही. कुठलंही औषध नाही.

तुम्ही म्हणाल, “पण मला ताप-खोकला आला की डॉक्टर औषधं देतो. मग ती कशी काय ?”

तर, तो ताप आणि खोकला हा बॅक्टेरियामुळे झालेला असेल तरच तो डॉक्टर औषधं देतो…. जर ते Viral असेल तर तो औषधं देत नाही. आणि देऊही नये. यावर उपाय एकच असतो, तो म्हणजे ‘आराम करणं’, खूप पाणी पिणं’.. तुमचं शरीर आतून जर लढत असेल, तर त्याला एनर्जीची गरज आहे. ती तुम्ही दगदग करून अजून शरीराला स्ट्रेस देऊ शकता.
जर डॉक्टर तुम्हाला Viral ताप-खोकल्यावर औषधं देत असतील, तर एक असं कारण असतं, की तुमची रोगप्रतिकारक शक्ती थोडी नाजूक पडू शकते, Virus शी लढण्यासाठी, तर त्या काळात इतर संसर्ग होऊ नये, किंवा तुमच्या भागात तशी साथ असेल, आणि इतर भर नको म्हणूनही.

आता शरीर कसं फाईट करतं, हे मागे आपण पाहिलं…. पण अमुक कोणाशीही लढण्यासाठी शरीराकडून ‘लगेच लढ’ असं होत नाही. त्याला वेळ लागतो. कुठल्या प्रकारचा Virus आहे, आधी तो आला होता का शरीरात, त्याला कशा प्रकारे घालवायचं…. या सगळ्या प्रोसेसमध्ये वेळ जातो. कधीकधी तो आठवडाभरही जाऊ शकतो… आणि जर Virus अगदीच नवीन असेल, जसा सध्याचा कोरोना आहे, तर तेवढा वेळ शरीराने घेणं हे शरीराला परवडू शकत नाही. खासकरून ज्यांना आधीच इतर त्रास असतील, ज्यांची रोग-प्रतिकारकशक्ती तेवढी चांगली नसेल, त्यांना ते घातक ठरतं… कारण हा Virus फास्ट वाढत राहतो आणि आपल्या LUNGS वर अटॅक करतो.

तुमची रोगप्रतिकारक शक्ती जेवढी चांगली, तेवढं तुम्ही लवकर बरा होणार.

—————————

अजून एक उदाहरण – न्यूमोनिआ

मला जेव्हा डॉक्टरने सांगितलं की तुला Mild न्यूमोनिआ आहे, आणि औषध लिहून दिलं. त्यात “Penicillin” हे औषध डॉक्टरने लिहिलं होतं. आता ‘न्यूमोनिआ’ म्हंजे एक असा आजार, ज्यात अनेक आजार जडतात. ताप-खोकला-छातीत दुखणं-श्वास घ्यायला त्रास वगैरे… हा दोन्ही प्रकारांनी होतो , बॅक्टेरिया आणि व्हायरस, कोणाकडूनही होऊ शकतो. तर त्यांनी माझे एक्स-रे, ब्लड टेस्ट केल्या तेव्हा, तो बॅक्टेरियल असण्याची शक्यता त्यांना वाटली असावी… आणि म्हणून त्यांनी औषधं दिली. पण जर हा व्हायरल असता तर औषधं दिली नसती.

-मग व्हायरलवर काय करतात ? असंच मरू देतात का ?

नाही, तर तिथे ‘ओव्हर द काउंटर’ अशी औषधं देतात. म्हणजे जो तुमचा त्रास असतो तो थोडा सुसह्य होईल.

उदा – अशी औषधं, ज्याने कफ पातळ होणं, जेणेकरून तो बाहेर पडेल… आणि श्वास घ्यायला त्रास होणार नाही. वगैरे… पण व्हायरसच्या केसालाही ती औषधं धक्का पोहोचवत नाहीत.

व्हायरसवरची औषधं, तुम्हाला फक्त वेळ वाढवून देतात, म्हणजे त्याचा प्रसार होणार नाही…. बाकी काही नाही. जसं आपण आज घरात बसलोय. ह्याने काही व्हायरस मरणार नाही, पण प्रसार होणार नाही. आणि पर्यायाने हेल्थ-डिपार्टमेंटला मुबलक वेळ मिळेल.

————————–

तर मग वॅक्सीन देऊन, अतिरिक्त व्हायरस शरीरात सोडून काय होतं ?

हे वॅक्सीन-व्हायरस सोडण्याचा उद्देश एवढाच असतो, की आपल्या शरीरातली रोगप्रतिकारकशक्तीला जागृत करणं. म्हणजे तिला ह्या व्हायरसचा अभ्यास करता येईल. आणि जो ‘उपाय’ काढलाय तो ते लक्षात ठेवतात. मेमरी-सेल्सद्वारे. म्हणजे जर व्हायरस शरीरात शिरला, तर शरीर त्यावर नव्याने काम करत नाही, त्याला माहित असतं, कुठलं उपाय आहे. ते पटकन पावलं उचलतात आणि पुढचा प्रसार बंद होतो.

व्हायरसच्या बाबतीत, ‘त्याचा प्रसार ना होणं’, हाच एकमेव उपाय असतो.

पण, शरीर तरी काय तोडगा काढणार ?

बऱ्याच व्हायरसच्या बाबतीत, व्हायरस जिथून ‘कनेक्ट’ होतो, त्या ‘प्रोटीन-स्पाईक्स’ वर एक प्रकारचं झाकण लावलं जातं, शरीराकडून. त्यामुळे ते झाकण मध्ये येऊन, आपल्या पेशीला ते कनेक्टच होत नाही आणि पर्यायाने ते पेशीत शिरकाव करत नाही. जसं आपण स्विचबोर्डात लहान पोरांनी बोट घालू नये, म्हणून त्यात ‘चाईल्ड सेफ्टी’ लावून ठेवतो… तसं काहीसं.

———————-

-पण मग आता नाही का सोडता येत आहे हे कोरोनाचे व्हायरस शरीरात ?

पहिले त्याला पूर्ण समजून घ्यायचं. मग त्याची जेनेटिक रचना कशी आहे, याचा अभ्यास करायचा. ते झालं की त्या जेनेटिक रचनेशी खेळ करून तो घातक ठरणार नाही हे पाहायचं, मग पहिले तो प्राण्यांवर ट्राय करायचा, मग तो वेगवेगळ्या वयोगटातल्या माणसांवर ट्राय करायचा ……. यासाठी लागणारा वेळ प्रचंड असतो कारण, कितीतरी टेस्टिंग त्यासाठी कराव्या लागतात.

एखादं वॅक्सीन मार्केट मध्ये येण्यासाठी, त्याच्या चार फेजेस असतात –

१. १०-१२ अशा छोट्या गृपवर, लोकांना ते वॅक्सीन देऊन, त्यांचा अभ्यास करणं. कुठले साईड-इफेक्टस होतायेत का ते पाहणं. यासाठी २/३ महिने जातील.
२. मग मोठ्या ग्रुपवर, १००-२०० लोकांना ते वॅक्सीन देऊन, त्यांचा अभ्यास करणं. कुठले साईड-इफेक्टस होतायेत का ते पाहणं. यासाठी ६-८ महिने जातील.
३. अजून मोठ्या ग्रुपवर, १० हजार ते पुढे, लोकांवर ते वॅक्सीन ट्राय करून, त्यांचा अभ्यास करणं. कुठले साईड-इफेक्टस होतायेत का ते पाहणं. यासाठी वर्ष लागू शकतं.
या तिसऱ्या फेजनंतर लॅबवाल्यांना मिळतं वॅक्सीन विकण्याचं लायसन्स. आणि मग शेवटची फेज –

४. शेवटच्या फेजमध्ये, ते मोठ्या प्रमाणात बनवणं, विकणं, डिलिव्हरी… वगैरे यात वेळ जातो. बरं याबरोबर त्यांना हेही सारखं जागृत राहावं लागतं, की ते काम करतंय ना, किंवा त्याचं अपग्रेडेड व्हर्जन मग तसं लाँच करणं..

आणि जर आपण यातल्या कुठल्याही स्टेप्स गाळल्या आणि व्यवस्थित चेक नाही केलं…. तर कदाचित कोरोना मारण्याआधी, हे वॅक्सीनच आपल्याला मारू शकतं.

ह्याचं ताजं उदाहरण म्हणजे, फिलिपाइन्स या देशात २०१६ साली झालेला उद्रेक.
२०१६ साली डेंग्यूवर लस शोधण्यात आली, पण त्यांनी फास्ट उपाय म्हणून, ‘लहान मुलांवर’ त्याच्या टेस्ट्स केल्याच नाहीत. आणि जी रिस्क होती, तेच झालं. कित्येक लहान मुलं या वॅक्सिनच्या साईड-इफेक्टसमुळे मृत्युमुखी पडली.

डॉक्टरांनी, कोरोनावर वॅक्सीन शोधायला लागणारा वेळ, हा कमीतकमी दीड-दोन वर्ष असतील असं सांगितलाय, कमीतकमी. ते पण जर-तरच्या सुरात.
आता असं होऊ शकेल की, येत्या काळात वॅक्सीन मिळेपर्यंत, इतर काही उपाय जे ‘ओव्हर द काउंटर’ असतील ते अवलंबतील, ज्याने आजार थोडा सुसह्य होऊ शकेल.

——————–

तर वॅक्सीन येईपर्यंत काय ?

वॅक्सीन येईपर्यंत टांगती तलवार अशीच राहणार. त्यामुळे जे आपल्या हातात त्या गोष्टी करायच्या.

– बाहेरून कोणीही आलं की, कशालाही हात लावण्याआधी स्वच्छ हात धुणं.
– अगदीच गरज नसेल तर बाहेर न पडणं. पडलंच तर मास्कशिवाय बाहेर न पडणं.
– कितीही जिगरी दोस्त असला, नातेवाईक असला (घराबाहेरचा) तरी अंतर पाळणं.
– रोज हार्टरेट वाढवेल असा व्यायाम करणं
– योग्य आहार घेणं.

मान्य आहे की, हे सगळं सवयीने येतं, लगेच असं अंगिकारता येत नाही. पण त्याशिवाय पर्यायही नाही आपल्याकडे आज.

देख, टेन्शन घ्यायचं नाहीये, आणि निष्काळजी पण वागायचं नाहीये.
आणि झाला तर असं काही मोठं आभाळ कोसळणार नाही. थोडावेळ आजारी पडाल.. पण प्रश्न फक्त तुमचा नाहीये… तुम्ही ते इतरांना पोहोचवाल त्याचं काय ?
घरात म्हातारे आई-वडील असतील, लहानगे असतील… सगळ्यांची रोगप्रतिकारकशक्ती तुमच्यासारखी स्ट्रॉंग असेल असं नाही ना. त्यामुळे त्यांच्यासाठी, तुमची काळजीपूर्वक पावलं उचलणं गरजेचं आहे.

आणि तुम्हीच एकटे त्रासात आहात, तुमचंच आर्थिक नुकसान झालंय… वगैरे रडत बसण्यात काही हशील नाही. सगळीकडे तेच रडगाणं आहे. सगळेच त्या त्रासातून जातायेत. आणि यापुढेही हे वाढत राहील. रडत बसण्याने जर बरं वाटणार असेल, काही उपाय निघणार असेल तर ठीक…. आणि नसेल, तर मग काय कु रे ? जो होगा देखा जायेगा रे !

(लेखक उपहास , वक्रोक्ती व विनोदी पद्धतीने अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)

हेही नक्की वाचा-

ये व्हायरस व्हायरस क्या है… ये व्हायरस व्हायरस! https://bit.ly/3dm78Bz

Immunity (रोगप्रतिकारक शक्ती) हा नक्की काय प्रकार आहे?https://bit.ly/3diIFNA

Previous articleसाहेबांचे भारतीय ‘सरताज’!
Next articleरस्त्यावरच्या माणसांच्या आयुष्यालाच लागलीय टाळेबंदी
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.