साहेबांचे भारतीय ‘सरताज’!

– रघुनाथ पांडे

—–

ही गोष्ट काळाने भारतीयांच्या मस्तकावर लिहिली आहे. त्या उंच काळ्याभोर कपाळावरील अक्षरे आहेत..सुवर्णाची. त्यातील एक वाक्य आहे…” ब्रिटिश राजसत्तेची सूत्रे हे दोन भारतीय सांभाळणार आहेत..ती औट घटकेची का असेना, पण ‘काव्यात्म न्याय’ देण्याचे काळानेच नक्की केले आहे.

——

काळ हा सर्व प्रसंगांवर उपाय असतो. सूूूड घेत असावा का, ते ज्याचे त्याचे निरीक्षण आहे. साहेबांच्या क्षितिजावर सूूर्य कधीच मावळत नाही, असे म्हटले जाई. भूगोल बदलत असतो, इतिहास घडत असतो. ब्रिटिशांचा सूर्य १५ ऑगस्ट १९४७ ला अस्ताला गेला. आणि, भारतावर पडलेली सूर्य किरणे नवी उमेद, जाज्वल्य स्वप्ने घेऊनच जन्माला आली. आज ती खरी उतरू लागली…”काव्यात्म न्याय”या शब्दाचा अस्सल अर्थ, ब्रिटिश हुकूमतीवर अधिराज्य गाजवणाऱ्या ‘भारतीय नाळे’च्या दोन तरुणांच्या विलक्षण कर्तबगारीतून समजून घ्यावा लागेल. ते दोघे साहेबांचा पैसाही जोखतात, आणि घरही सांभाळतात. चिनी विषाणूच्या धुमाकुळाने ब्रिटिश मनातून कमालीचे हादरले; अशा कसोटीच्या काळात ब्रिटिश महासत्तेच्या किल्याची जबाबदारी या दोघा तरुणांवर सोपविली. ते दोघेही पन्नाशीच्या आतील. पण जिद्द आकाश कवेत घेण्याची.

४० वर्षांचे ऋषी सुनक आणि ४८ वर्षांच्या प्रीती पटेल. या दोघांनी जगाच्या राजकारणावर छाप सोडली आहे. भारतीय मनाला नवी ऊर्जा बहाल केली. जे ब्रिटिश भारतीयांना तुच्छ लेखायचे. तोडा, फोडा आणि राज्य करा, अशी धोरणं राबवायचे त्यांच्यावर हे दोघे आता राज्य करत आहेत. यापेक्षा अधिक काय हवे? हाच तो काव्यात्म न्याय…जो काळाच्या उदरात दडला असतो, आणि काळच बहाल करतो.

ऋषी उत्तम अर्थविषयक लेखक आहेत. ब्रिटिशांच्या मनात घर केलेले अर्थशास्त्री आहेत. आणि, आत्ता ते ब्रिटीश सरकारचे अर्थमंत्री आहेत. पंतप्रधान बोरिस जॉन्सन्स यांच्या मंत्रिमंडळात क्रमांक दोनचे मंत्री. त्यांची ओळख खूप दीर्घ आहे. रंजक आहे. ते इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण व सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. पंजाबी हिंदू असलेल्या ऋषींच्या आयुष्याचा मार्ग पुणे व बेळगावातून जातो. मूर्ती यांची कन्या अक्षदा व ऋषी कॅलिफोर्नियातील स्टँडफोर्डच्या ग्रॅज्युएट स्कुल ऑफ बिजनेसमधून शिक्षण घेत असताना प्रेमात पडले आणि २००९ मध्ये विवाहबद्ध झाले. त्यांना कृष्णा आणि अनुष्का ही मुलं आहेत. ऋषींचे आजोबा पंजाबात व्यवसाय करायचे. वडील यशवीर डॉक्टर आणि आई ऊषा फार्मासिस्ट. या दोघांनी नोकरीसाठी पूर्व आफ्रिका गाठली. पुढे, साठच्या दशकात ब्रिटन गाठले.

ऋषींनी व्यवसाय निवडला तो बँकर म्हणून. त्यातील गती ब्रिटिशांना चकित करून गेली. ते राजघराण्याशी जोडले गेले. कंजरव्हेटिव्ह पार्टीची दुसऱ्यांदा सत्ता आली, तेव्हा ते खासदार झाले. एक दिवस महाराणीने ऋषींची अर्थमंत्री म्हणून नेमणुकीचे फर्मान जारी केले. ऋषींची अर्थविषयक धोरणे विचारी असल्याने ते सरकार आणि प्रासाद या दोघांनाही आवडू लागले. कोरोनाने जगभर उद्रेक माजवला असताना, त्याची झळ ब्रिटिश राजसत्तेलाही बसली. अगदी, अलीकडे म्हणजे कोरोना शिगेवर असताना, १२ मार्च रोजी ऋषींनी त्यांच्या कारकीर्दीतील पहिला , ब्रिटनचा अर्थसंकल्प मांडला. कोरोनाशी लढण्यासाठी २,८५० अब्ज रकमेचे पॅकेज जाहीर केले…आणि, त्या क्षणापासून ब्रिटन वाचवण्याची त्यांची झुंज सुरू झाली. कंट्री फर्स्टचा नारा त्यांनी दिला, ती ब्रिटनमध्ये गाजू लागला.

राजकीय पट समोर सरकत असताना, ऋषिबाबतचा एक प्रसंग थेट भारतीयत्वाची जाणीव करून देणारा आहे. २०१७ मध्ये ते प्रथम ‘हाऊस ऑफ कॉमन्स’मध्ये खासदार म्हणून गेले. तेव्हा खासदारकीची शपथ घेताना त्यांनी सोबत एक ग्रंथ नेला होता. शपथेसाठी त्यांचे नाव पुकारले गेले. त्यांनी तो ग्रंथ समोरच्या तख्तावर ठेवला, आणि त्यावर हात ठेवून म्हटले, ” मी

भगवद् गीतेनुसार शपथ घेतो की..” शिरस्त्याप्रमाणे मग त्यांनी अर्थमंत्रीपदाचा कारभार हाती घेतला..

प्रीती पटेल. अस्सल गुजराती. ब्रिटिश राजसत्तेच्या क्रमांक तीनच्या मंत्री. ब्रिटनच्या गृहमंत्री !! भारताचे आणि ब्रिटनचे गृहमंत्री गुजराती आहेत, हा केवळ योगायोग.

प्रीती ब्रिटनच्या राजकारणात पंधरा वर्षांपासून सक्रिय आहेत. राजकीय वादळे अंगावर घेणे, झेलणे आणि आक्रमक शैलीने त्यांना परतवूनही लावणे ही त्यांच्या स्वभावाची खासियत. यश व अपयश असा उन्हं सावलीचा त्यांचा राजकीय प्रवास मोठा काटेरी आहे. बंडखोर वृत्ती. थेट आणि नजरेत येणारे बोलणे हा गुण त्यांच्या अनेकदा अंगलट आला. अलीकडे गृहमंत्री म्हणून त्यांनी अनेक कठोर निर्णय घेतले.पण राजघराणे व शिस्त हवी म्हणणाऱ्या साहेबांची कुटुंबे त्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभी आहेत. शिस्त लागते आहे, कायदा बरकरार आहे, अशी जनता म्हणते. त्या गृहमंत्री झाल्याझाल्या काही जुन्या धोरणात्मक बाबींमुळे आशियातील काही देशांत काहूर माजले. त्याला ठोस प्रत्युत्तर त्यांनी दिले. तर ,अशी ही तडकफडक भारतीय नाळेची कन्या.! तंबाखू आणि दारू उद्योगाला मुख्य प्रवाहात आणा, अशी तिची मागणी आणि याच धोरणाची ती प्रशंसकही आहे. अनेक उद्योग, त्यांची पारंपरिक घराणी आणि असले नसले तरी तेथीलही संस्कृती रक्षक त्यांच्या विरोधात आहेत. राजकीय विरोधकांना हे तिचे धोरण अजिबातच मान्य नाही, त्यामुळे ती जिथे असेल तिथे टीका सुरू असते. इजरायलमध्ये एका खासगी भेटीवर गेली असताना, तिने काही गुप्त राजकीय बैठकांना गुपचूप हजरी लावल्याने तिच्यावर अनेक आक्षेप घेतले गेले. पण, देशासाठी मी कसलाही आक्षेप सहन करायला तयार आहे,अशी भूमिका घेतली. विरोध संपला. मागील सहा महिन्यात पंजाबी मुंडा आणि गुजरातीच्या छोकरीने साहेबांची ही दुनिया आपल्या कर्तृत्वाने शरण आणली.

प्रीती यांचे आजोबा गुजरातच्या तारापूर येथील. नंतर हे कुटुंब १९६० मध्ये युगांडात स्थायिक झाले. अनेक कौटुंबिक उद्योगांपैकी त्यांचाही एक उद्योग होता, वर्तमानपत्रे आणि नियतकालिकांच्या विक्रीचा !! युगांडामध्ये त्यांची सामाजिक व राजकीय स्तरावर मोठी उठबस होती. जनता त्यांना साथ देत होती. कारण, हे कुटुंब केवळ वर्तमानपत्रे विकत नसे ; तर लोकांना भिडणारे व सरकारची वाभाडे काढणारे लेखनही करत असे. १९७२ मध्ये युगांडात सामाजिक क्रांती झाली आणि त्यातून पुढे कठोर राजकीय निर्णय सरकारने घेतला. देशात बाहेरून आलेल्याना देश सोडण्याचे फर्मान युगांडाचे राष्ट्रपती अदी अमीन यांनी सोडले. आदेशात दोनच मुद्दे होते. आशियातील अल्पसंख्याककांनी देश सोडून अन्यत्र जावे, हा पहिला व दुसरा आदेश होता, ९० दिवसांची मुदत दिली आहे. सुमारे ८० हजार लोक या फटक्याचे शिकार होते. त्यातील २३हजारांवर संख्या गुजराती कुटुंबांची होती. देश सोडण्याची भळभळती जखम घेऊन पटेल कुटुंबाने लंडन गाठले. त्याचवर्षी, लागलीच लंडनमध्ये प्रीती यांचा जन्म झाला. अंजना व सुशील पटेल यांच्या पारंपरिक व्यवसाय येथेही सुरू केला. विस्थापित होण्याची हा व्रण त्यांना अजूनही स्वस्थ बसू देत नाही. ब्रिटनने आश्रय दिला…ते ब्रिटनचे झाले.!! भारतीय तरुणांसाठी त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमधून मदत केली, तर भारताच्या एका मोठ्या सामाजिक लढ्यात त्यांनी ब्रिटनमध्ये भारताची साथ केली. ब्रिटनच्या गृहमंत्री प्रीती पटेल पुढच्यावर्षी पन्नाशीच्या होतील. यानिमित्ताने त्या युगांडियन- इंडियन्स असा कार्यक्रम तिथे करणार आहेत.

अर्थात, हे असेल पुढचे. पण आज जे घडतंय ते तरतरी आणणारे आहे. कोरोनाने ब्रिटिश हादरून गेले आहेत. पंतप्रधान आजारी आहेत. ते घरूनच कारभार पाहत आहेत. तसेही ते गटांगळ्या खाण्यात पटाईत असलेले पंतप्रधान आहेत. मागच्या निवडणुकीत त्यांची प्रसारमाध्यमापुढील प्रतिमा फारच केविलवाणी होती. खोटरडेपणाचे विक्रमी नमुने त्यांच्या नावावर आहेत. आता, जनता त्रस्त व प्रचंड घबराटीचे वातावरण निर्माण झाले असताना बोरिस घरातून परिस्थिती नियंत्रित करत आहेत. याउलट, मोठ्या

हिरीरीने आणि आत्मीयतेने अर्थमंत्री आणि गृहमंत्र्यांची प्रतिमा “साहेबांमध्ये” आश्वासक म्हणून उभी होताना दिसत आहे. साहजिकच आभाळ फुटलेल्या या स्थितीत बोरिस यांची मदार या दोघांवरच अधिक आहे. जो निर्णय तुम्ही घ्याल तो माझा समजा असे धोरण बोरिस यांनी स्वीकारले आहे. परिस्थिती आणि घटना या मस्तकी राजकारणात सत्ता नियंत्रणासाठी पुरेशा असतात. भारतीयांच्या हाती पूर्ण सूत्रे नसली, तरी मदार मात्र आहे.

म्हणूनच, ही गोष्ट जर-तरची असली तरी, काळाने भारतीयांच्या मस्तकावर लिहिली आहे. त्या उंच काळ्याभोर कपाळावरील अक्षरे आहेत..सुवर्णाची. त्यातील एक वाक्य आहे…” ब्रिटिश राजसत्तेची सूत्रे हे दोन भारतीय सांभाळणार आहेत..ती औट घटकेची का असेना, पण ‘काव्यात्म न्याय’ देण्याचे काळानेच नक्की केले आहे.

(लेखक पुण्यनगरीच्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत.)

9818213515

Previous articleउठ के कपडे़ बदल…जो हुआ सो हुआ..!
Next articleकोरोना Vaccine काढायला एवढा वेळ का लागतोय ?
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.