उठ के कपडे़ बदल…जो हुआ सो हुआ..!

साभार : दैनिक ‘दिव्य मराठी’

-वसुंधरा काशिकर

उठ के कपड़े बदल, घर से बाहर निकल, जो हुआ सो हुआ..!

संपूर्णपणे निराशेच्या गर्तेत गेलेल्या मनाला उभारी देण्यासाठी लिहिलेली ही गझल आहे. १९९२-९३ साली मुंबईत झालेल्या दंगलीनंतर ज्येष्ठ शायर निदा फ़ाज़लींना आपल्या मित्राच्या घराचा आधार घ्यावा लागला. हा मित्र हिंदू होता. त्या दंगलीने मुंबईला बदलवलं…भारताला बदलवलं…भारताच्या चेतनेला बदलवलं…त्या दंगलीने भारताच्या संस्कृतीचा पोत बदलला..

शायर हा मुळात अत्यंत संवेदनशील असतो. किंवा प्रत्येक सर्जनशील माणूस मग तो चित्रकार असो, संगीतकार असो, लेखक असो वा शिल्पकार असो संवदेनशील असतोच असतो. एखाद्या घटनेचा कलाकाराच्या मनावर होणारा परिणाम आणि सर्वसामान्य माणसाच्या मनावर होणारा परिणाम यात निश्चितच फरक असू शकतो किंवा तो असतोच.

१९९२ च्या दंगलीनं निदांना परत एकदा अंतर्बाह्य घुसळून काढलं. दंगलीनंतर विस्कटलेलं जीवन, मोडलेले संसार, भयग्रस्त चेहरे हे सगळं हा शायर बघत होता. मनात नोंदवत होता. शायर जवळ व्यावसायिकासारखे कोटयवधी रुपये नसतात की ते देऊन तो मदत करु शकेल. शायरजवळ असतात ज्याचं काही मोल होऊ शकत नाही असे शब्द…आणि त्या शब्दांमध्ये माणसाला उभं करण्याची ताकद असते. ही गझल म्हणजे पोळलेल्या, होरपळलेल्या, जखमी झालेल्या माणसाला हळुवार हातानं लावलेला मलम आहे. ही गझल म्हणजे उदासीनं ग्रासलेल्या माणसाचं केलेलं समुपदेशनच आहे.

मी मागेही म्हटल्याप्रमाणे गझल ही एखाद्या प्रसंगातून प्रेरणा घेऊन लिहिली असली तरी असते वैश्विकच. म्हणूनच मग निदांची ही गझल दंगलीत पोळलेल्या माणसाच्या दु:खापुरती मर्यादीत राहत नाही. ती सर्वच दु:खांवर फुंकर घालते.

असं म्हणतात बुद्धानं तीन दृष्यं आयुष्यात बघितली अन् त्याची जीवनदृष्टी बदलंली…जरा, व्याधी आणि मरणाची…बुद्ध आयुष्यात प्रथमच माणसाच्या या वास्तव अशा अवस्था बघत होत्या. त्याला जाणीवपूर्वकच या सत्यापासून त्याच्या वडिलांनी दूर ठेवलं होतं. वडिल नसताना एकदा बुद्ध घराबाहेर पडले. रथात जाताना ही दृश्य त्यांना दिसली. तिसऱ्या दृश्यानंतर बुद्ध म्हणाले ‘सारथी रथ वापस ले चलो’..आणि सिद्धार्थचा गौतम बुद्ध झाला.

बुद्धाने दु:खाचा शोध घेतला. त्याची कारणं शोधली. दु:ख ही मानवी जीवनातली अटळ आणि सत्य गोष्ट आहे हे त्याला जाणवलं. अत्यंत जवळच्या व्यक्तीचा मृत्यू, नातं तुटणं, घटस्फोट, मतिमंद मुलं जन्माला येणं, अपत्यांचा मृत्यू, शरीर पोखरून काढणाऱ्या कॅन्सरसाररख्या व्याधी, असे दु:खाचे किती प्रकार अन् किती तर्हा सांगाव्यात…

अशी अशी पुरतं वाकवणारी दु:ख की त्या दु:खांनी जगणं सोडून दयावं…हसणं कायमचं विसरून जावं..अशा वेळी ऐकण्यासाठी ही गझल आहे… असं पुरतं मोडून टाकणारं दु:ख आलं तर त्यासमोर झुकू नकोस.. मग काय कर..

उठ के कपडे बदल..घर से बाहर निकल..जो हुआ सो हुआ…रात्रीनंतर दिवस येतोच..आज नंतर उदया असतोच…प्रकाशाचे, आनंदाचे काही कवडसे नक्की येतील…त्यासाठी उठ के कपडे बदल जो हुआ सो हुआ
रोजच्या आयुष्यातही आपल्याला हा अनुभव येत असतोच. संध्याकाळच्या वेळेला अनेकदा उदास वाटतं…काहीच करावसं वाटत नाही अशावेळी जर छानशी गरम पाण्यानं आंघोळ केली, नवीन कपडे घातले की आपल्याला प्रसन्न वाटतं…या वरकरणी फारश्या महत्वाच्या न वाटणाऱ्या कृती पण मनस्थिती बदलवू शकतात. म्हणूनही उठ के कपडे बदल..

जोवर जीव आहे, जगणं आहे..जगण्याचे नैसर्गिक धर्म आहेत..भूक लागणार, तहान लागणार..आयुष्य तर थांबवता येत नाही. मग नांगर घेऊन शेत नांगरण्याशिवाय पर्याय नाही गडया…’खेत की और चल, रख के कांधे पे हल..जो हुआ सो हुआ..’

दंगलीत जो मारल्या गेला तो का मारल्या गेला..त्याचा नेमका काय दोष होता किंवा कोणता गुन्हा होता..या प्रश्नांची उत्तरं कित्येक वर्ष झालीत मिळतच नाहीयेत..पण तरीही जो हुआ सो हुआ..

मंदिरामध्ये गेलो तर भजनाचा आवाज येत होता, मशिदीत गेलो तर अजान ऐकू येत होती..माणूस कुठे सापडलाच नाही…माणसासाठी माझी एक ताजी गझल…जो हुआ सो हुआ…

हरिवंशराय बच्चन यांची पण एक फार सुंदर कविता आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीच्या मृत्यूनंतर त्यांनी ती लिहिली होती. कवितेचं शीर्षक आहे, ‘जो बीत गई सो बात गई…’ त्यातलं एक कडवं आहे…

अंबर के आनन को देखो
कितने इतके तारे टूटें
कितने इसके प्यारें छूटें
पर बोलों टूटे तारोंपर, कब अंबर शोक मनाता है
जो बीत गई सो बात गई...

हे स्वत:च स्वत:चं केलेलं समुपदेशनच आहे.

माणुसकी जपणाऱ्या साध्यासुध्या माणसासाठी निदा ही गझल लिहितात. यातली आदमी के लिए एक ताजा गझल यातला ताजा गझल हा प्रयोग मला खूप आवडला. ताज्या दुधाचा ताजा चहा करुन प्यावा अगदी तसा फील येतो, ताजा गझल हे ऐकून… निदांचं दर्जेदार सोपेपणा हे वैशिष्ट्य या गझलेतही प्रकर्षानं उठून समोर येतं. निदांची सगळी शायरी त्यांच्या जगण्यातून आली आहे त्यामुळे ती लगेच अपील होते. अनुभवाशिवायचा बुडबुडा असे त्यांचे शब्द नाहीत. अर्थात हे सांगण्याचीही गरज नाही.

ही गझल गायली आहे आल्हाद काशीकर यांनी. निदा फ़ाज़ली यांच्या गझलांवर त्यांचा Nida-Between the lines हा गझल अल्बम टाईम्स म्युझिकने लॉंच केलाय. त्यात त्यांनी ही गझल गायली आहे. हा अल्बम Gaana, आयटूयन या अँपवर उपलब्ध आहे. संगीताच्या दृष्टीने पाहू गेल्यास कंपोझिशन अतिशय सुंदर आहे. संगीत स्वत: आल्हाद काशीकर यांचंच आहे. खर्जातला वेगळा आवाज हे आल्हाद काशीकर यांच्या आवाजाचं वैशिष्ट्य म्हणता येईल. ही गझल मुळात डिप्रेशनमधल्या माणसाला समजवाण्यासाठी लिहिलेली आहे. हा प्रेमळ, समजूतदारीचा, पाठीवरून हात फिरवून, गालावरून हात फिरवून समजावून सांगण्याचा टोन आल्हाद काशीकरांनी ज्या पद्धतीने गाण्यात आणलाय त्याला दाद! त्यांच्या आवाजात कमालीचा सुकून आहे. बॅकग्राऊंड स्कोअर काहीतरी विपरीत घडून गेलंय हे दाखवणाऱ्या बिट्स आणि व्हायोलीनने फार नेमकं उभं केलंय.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काय लिहावं, कोणती गझल निवडावी असा सतत विचार सुरु होता. अन् निदांची हीच गझल समोर आली. कोरोनाची महाभयंकर साथ आली नसती तर मी ही गझल घेतलीही नसती…किंवा शेवटी शेवटी घेतली असती…पण आजच्या या संकटाच्या घडीला मला यापेक्षा दुसरी योग्य गझल दिसली नाही…सर्व डॉक्टर्स, नर्सेस, सफाई कर्मचारी, बँक कर्मचारी, माध्यमातले पत्रकार, रिपोर्टर, अँकर्स आपलं कर्तव्य ‘उठ के कपडे बदल, घर से बाहर निकल’ असं म्हणून पार पाडताहेत…

काही संकटं ही माणसानं आत्मपरीक्षण करावं म्हणूनही निसर्ग वा नियती पाठवत असते. कोरोनाच्या निमित्तानं आपण निसर्गाचं केलेलं शोषण, किती नदया-नाले बांधकामासाठी बुजवले, ध्वनी-प्रदूषण, वायू प्रदूषण याचा आढावा घेण्याचीही गरज आहे. आपली सार्वजनिक आरोग्य व्यवस्था किती घाणेरडी अकार्यक्षम आहे हेही या निमित्तानं परत एकदा समोर आलंय, कामाच्या धबडग्यात घरच्यांना, मुलांना, आई-वडिलांना वेळ दिला नसेल तर त्याची भरपाई करण्याची ही संधी आहे असं याकडे बघता येईल.

या संकटात आपणा सर्वांना मनोधैर्य टिकवायचं आहे..एकजुटीनं संकटाला सामोरं जायचं आहे..फक्त हिंमत हारू नका..खबरदारी घ्या..डॉक्टरांच्या सूचनांचे पालन करा…सर्व राजकीय मतभेद आणि इतरही मतभेद विसरून एक या. मृत्यूला जात,धर्म, राजकीय पक्ष समजत नाही. तिथे संपूर्ण समानता असते. तेव्हा हीच वेळ आहे माणुसकी दाखवण्याची आणि परीक्षेची…तेव्हा उठ के कपडे बदल.. (घर से बाहर निकल फक्त प्रतिकात्मक घ्या…???? घरातून बाहेर पडू नका…)

शेवटी निदांच्याच शब्दांत सांगायचे तर,
कोशिश करो ये लम्हा, जैसे भी हो, टल जाये
शायद कोई जीने का इमकान (शक्यता) निकल आये…

…………………………………………………………

उठ के कपड़े बदल, घर से बाहर निकल, जो हुआ सो हुआ
रात के बा’द दिन, आज के बा’द कल, जो हुआ सो हुआ
जब तलक साँस है, भूक है प्यास है, ये ही इतिहास है
रख के काँधे पे हल, खेत की ओर चल, जो हुआ सो हुआ
ख़ून से तर-ब-तर, कर के हर रहगुज़र, थक चुके जानवर
लकड़ियों की तरह, फिर से चूल्हे में जल, जो हुआ सो हुआ
जो मरा क्यूँ मरा, जो लुटा क्यूँ लुटा, जो जला क्यूँ जला
मुद्दतों से हैं गुम, इन सवालों के हल, जो हुआ सो हुआ
मंदिरों में भजन, मस्जिदों में अज़ाँ, आदमी है कहाँ
आदमी के लिए, एक ताज़ा ग़ज़ल, जो हुआ सो हुआ

निदा फ़ाज़ली

(लेखिका वसुंधरा काशिकर या Transform skill enhancers private limited च्या संचालक, स्तंभलेखक, भाषाविषयक सल्लागार  व निवेदिका आहेत)

[email protected]

Previous articleआपल्याकडे माणूस नाही, आपल्या ‘जातीचा माणूस’ जन्माला घातला जातो!
Next articleसाहेबांचे भारतीय ‘सरताज’!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.