धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता माणूस जपला पाहिजे!

बीइंग इन्क्विझिटिव्ह -६

-उत्पल व्ही. बी.

दोन-एक महिन्यांपूर्वी मला ‘द पोस्टमन’ या मराठी यूट्यूब चॅनलवर बोलण्यासाठी बोलावलं होतं. ‘व्हिडीओ’ या माध्यमाशी; किंबहुना व्यासपीठावरून बोलणं याच्याशीच फारसं सख्य नसल्याने मी थोडा काळजीतच होतो. ‘बायनरीमध्ये अडकलेले आपण’ असा विषय घेऊन बोलायचं ठरलं. मी तशी तयारी केलेली असली तरी थोडा नर्व्हस होतोच. व्हिडीओ रेकॉर्ड झाल्यावर असं वाटलं की हा काही तितकासा प्रभावी वाटत नाही. म्हणून मग अधिक थेट, लोकांना लवकर कनेक्ट होता येईल असा अप्रोच घेऊन आणखी एक व्हिडीओ रेकॉर्ड केला. ‘सरकारविरोधात बोलणं म्हणजे देशद्रोह का?’ अशा शीर्षकाने तो प्रसिद्धही झाला. व्यक्तिशः मला पहिल्या व्हिडिओतली मांडणी यावी असं वाटत होतं, पण सध्या हा राहू द्यावा – नंतर नव्याने करू असं सगळ्यांचं मत पडल्याने तो व्हिडीओ बाजूला ठेवला.

व्हिडिओत मी शांतपणे बोललो होतो. त्यामुळे व्हिडिओवर सकारात्मक प्रतिक्रिया येतील असं मला वाटत होतं. पण झालं उलटंच. माझा म्हणजे ‘म्हाळसाकांत पोंबुर्पेकर’च झाला! (पाहा : बटाट्याची चाळ) सगळ्या प्रतिक्रिया नकारात्मक होत्या. लोकांनी फार प्रेमाने शिव्या दिल्या होत्या. मला ‘उत्पल खान’ असं बहुधा प्रथमच म्हटलं गेलं असावं! मात्र ‘निर्बुद्ध’, ‘नुसताच शरीराने वाढलेला’ या कमेंट्समध्ये नाही म्हटलं तरी थोडं तथ्य होतं. व्हिडीओ बघताना ‘द्रोह’ आणि ‘विद्रोह’ या शब्दांच्या अर्थांकनाबाबत आपल्याकडून काहीतरी गडबड झाली असं मलाही वाटून गेलं. पण एकूणात माझ्या लक्षात आलं की ‘ट्रोलिंग तर होणारच!’ (यातली आणखी एक मौज सांगतो. ‘द पोस्टमन’वर शेषराव मोरेंचेही काही व्हिडीओज आहेत. बहुतेक ठिकाणी त्यांची प्रशंसा झालेली असली तरी एक-दोन ठिकाणी त्यांच्यावरही लोकांनी हल्ला चढवला होता. एकाने तर ‘हा मुसलमान आहे का?’ असा प्रश्न विचारला होता. ते वाचल्यावर मला बरंच शांत वाटलं!)

धार्मिक संदर्भाने पाहता ऑगस्ट २०१८ मध्ये वैभव राऊतच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्च्याच्या अनुषंगाने मी ‘मी आणि गांधीजी’ या मालिकेत एक संवाद लिहिला होता. त्यावर काही हिंदुत्वनिष्ठ मंडळींनी अपेक्षेप्रमाणे टीका केली होती. त्याला धरून मी याच लेखमालिकेत लेखही लिहिला होता. एका बाजूला हिंदुत्ववादाचं टोकदार, विखारी स्वरूप तर दुसरीकडे बहुसंख्य हिंदू मानस ‘हिंदू’ असण्याबाबत हळवं असणं या अनुषंगाने तो लेख लिहिला होता. त्यानंतर अधेमधे काही पोस्ट्सवरील कमेंट्स सोडता काही घडलं नाही. मग मला वाटतं वरचा व्हिडिओचा प्रसंगच येतो. अलीकडे ‘श्याम आणि श्यामची आई’ मीम्स मालिकेत मी शंबूकवधाच्या संदर्भाने जो मीम केला त्यावर एका मित्राने कमेंट केली की ही कथा रामायणाच्या उत्तर कांडातील आहे आणि उत्तर कांड हा वाल्मिकी रामायणाचा भाग नाही. ते नंतर घातलं गेलं आहे. मला हे माहीत नव्हतं. (मला उत्तर कांड नावाचं कांड आहे हेदेखील माहीत नव्हतं.) शंबूकाची कथा रामायणाचा भाग आहे (इतर अनेक कथांसारखाच) अशी माझी समजूत होती. मित्राच्या कमेंटवर जी चर्चा झाली त्यात मी म्हटलंही की हा मीम मी डिलीट करतो. पण एका मैत्रिणीचं ऐकून मी थांबलो.

यानंतर डेक्कन कॉलेजमधील एका प्राध्यापक मित्राशी मी चर्चा केली. त्याने अशी माहिती दिली की रामायण आणि महाभारताच्या ‘क्रिटिकल एडिशन’ असतात. त्या तयार होण्याची प्रक्रिया फार किचकट असते. उपलब्ध आवृत्त्या, पोथ्या यांचा धांडोळा घेत घेत ही एडिशन तयार होते. आता मालिकेचा निर्माता क्रिटिकल एडिशननुसार मालिका काढेल असं नाही. म्हणजे कोणत्याही रामायण मालिकेत जे दाखवलं जातंय त्यातलं किती ग्राह्य आणि किती नाही हा प्रश्न आहे. आमची चर्चा पुढे चांगलीच रंगली. (‘रामायण’ हे काव्य आहे, त्यामुळे त्यातील काय काय प्रत्यक्ष घडलं आहे आणि काय काय नाही हे आपण छातीठोकपणे सांगू शकत नाही, शिवाय काव्याच्या आधारे समाजाची मूल्यव्यवस्था आकारास येत असेल तर त्याकडे कसं पाहायचं इ.) आपलं मानस ‘परंपरे’च्या आधारे घडलं आहे, ‘ज्ञाना’च्या आधारे नाही या मुद्द्यापाशी आम्ही चर्चा थांबवली!

वर उल्लेख केलेल्या मीमवरील चर्चेतही मी हे म्हटलं होतं की रामाच्या बाबतीत ‘निर्णय’ देणं हा मुद्दाच नाही. शंबूकाचा वध करणं हा रामाचा गुन्हा म्हणता येणार नाही; कारण त्या काळाच्या चौकटीत तो व्यवस्थेचा भाग होता. मुद्दा रामाचा नाहीये, मुद्दा ‘काय दाखवायचं आणि काय नाही’ हा निर्णय सांस्कृतिक वर्चस्व असणाऱ्यांच्या हातात असतो हा आहे. थोडक्यात जे मुळात काव्य आहे, ज्यात मिथकं आहेत त्याच्याकडे खराखुरा इतिहास म्हणून बघता येतं का हा प्रश्न आहे. हा सविस्तर चर्चेचा मुद्दा आहे. तो फक्त नोंदवून पुढे जाऊ.

वरील विविध उदाहरणांतील मुख्य धागा हिंदू धर्माविषयी, हिंदू परंपरेविषयी आस्था/निष्ठा/भक्ती असणाऱ्यांच्या भावना दुखावणं हा आहे. यावर विचार करताना मला असं दिसतं की ज्यांना आपण ढोबळ अर्थाने हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी म्हणतो (हे दोघे म्युच्युअली एक्सक्ल्युझिव्ह आहेत की नाहीत हा आणखी वेगळा मुद्दा) त्यांच्यातील संघर्ष हा धारणांचा संघर्ष असल्याने एकूण समाजस्वास्थ्याच्या दृष्टीने तो कमीत कमी त्रासदायक व्हावा यासाठी सातत्याने काम करत राहायला लागणार आहे.

या लेखमालिकेतील पहिल्याच लेखात मी ‘समंजस हिंदुत्ववादी’ असा शब्द वापरला होता. त्याबाबत अलीकडे ज्येष्ठ अभ्यासक किशोर बेडकिहाळ यांच्याशी चर्चा झाली. हिंदुत्ववादी आणि उदारमतवादी यांच्यात संवाद सुरू व्हायचा असेल तर त्यासाठी काही कॉमन रेफरन्स फ्रेम असू शकते का हे शोधायला लागेल असं त्यांचं म्हणणं होतं. याबाबत त्यांनी त्यांचे काही पूर्वानुभवही सांगितले. ते फारसे उत्साहवर्धक नसले तरी मला एक जाणवतं ते असं की स्वातंत्र्योत्तर काळापासून हा संघर्ष सुरू आहे आणि त्याचं वैचारिक पातळीवरील एक स्वरूप तरी एके काळी अधिक संवादी आणि सुसह्य होतं. कारण दोन्ही बाजूने सामंजस्य अधिक होतं. कुरुंदकर, दलवाई, अ.भि.शहा, वसंत पळशीकर, मे.पुं.रेगे, स.ह.देशपांडे, भा. ल.भोळे, शरद पाटील हे मला अभिप्रेत असणाऱ्या काळाचे प्रतिनिधी आहेत. (मला असं दिसतं की नव्वदच्या दशकापासून हे चित्र बदललं. जाणकारांनी आपलं मत जरूर नोदवावं.) ‘भाषा’ हे त्यामागचं एक प्रमुख कारण आहे असं मला दिसतं. त्या काळी भाषेची मर्यादा सांभाळून दीर्घ चर्चा (‘दीर्घ’ हा शब्द महत्त्वाचा आहे) होत असत. आज तसं होताना दिसत नाही. चर्चा लघुरूपात असतात आणि त्या व्यक्तिगत होऊ लागतात.

माझ्या असंही लक्षात आलं आहे की धारणांचं द्वंद्व पूर्णपणे संपणं अवघड आहे कारण मुळात ‘वर्ल्ड व्ह्यू’ भिन्न आहेत. त्यातून समाजमाध्यमांनी या संघर्षाला जमीन पुरवली आहे. म्हणजे मी केलेला मीम पाहून एखादा खरोखर दुखावला जाईल (आणि अशाची मी मनःपूर्वक क्षमा मागेन) कारण त्याने माझं इतर लेखन वाचलेलं असेल असं नाही. मी असे मीम्स वारंवार केले तर त्याला मी हिंदूद्वेष्टा वाटेन (लेखन वाचलं तर वाटणार नाही!). मागे बऱ्याचदा उल्लेख केल्याप्रमाणे विनोदाची बलस्थानं आहेत तशीच त्याची कमकुवत स्थानंही आहेत.

‘तुम्ही हिंदूंना बोलता, पण इतर धर्मीयांना बोलत नाही’ हा पुरोगामी मंडळींवरचा एक प्रमुख आक्षेप असतो. यावर मी काही वर्षांपूर्वी एक दीर्घ लेख लिहिला होता. त्यामुळे पुन्हा काही मांडत नाही, पण एक मुद्दा मात्र मांडतो. तुमची जी व्यक्तिगत ‘प्रभाव/आस्था/निष्ठा’ स्थानं आहेत त्याबाबत तुम्ही व्यक्त व्हायला काहीच हरकत नाही. उदा. नरेंद्र दाभोळकर किंवा गोविंद पानसरेंचा खून झाल्यावर मी काही लिहिलं तसं एखादा हिंदुत्वनिष्ठ मनुष्य लिहिणार नाही. दुसरीकडे उद्या एखाद्या हिंदुत्ववादी नेत्याचा खून झाला तर मी काहीही लिहिणार नाही, पण तो लिहील. (अटलबिहारी वाजपेयी गेल्यावर मला दोन ओळी लिहाव्याशा वाटल्या होत्या हे मुद्दाम नोंदवतो. कारण या नोंदीमध्ये काही प्रश्नांची उत्तरं आहेत!). जिथे माझे बंध गुंतलेले आहेत (ते अधिकाधिक ठिकाणी गुंतावेत ही अपेक्षा आहेच) तिथे मी अधिक प्रखरपणे व्यक्त होणं साहजिक आहे. मात्र सामूहिक/संघटनात्मक पातळीवर आपण काही निश्चित भूमिका घेतो की नाही हे नक्कीच तपासायला हवं.

आज असं दिसतं की पुरोगामी मंडळींकडून मुस्लिम कट्टरतेबद्दलदेखील बोललं जातंय. याला जोडलेला एक मुद्दा मला दिसतो तो मांडतो. हिंदुत्ववाद हा आजचा एक मोठा राजकीय फोर्स आहे. हिंदुत्ववादाची नकारात्मक बाजू लक्षात न घेता अनेकजण (अशिक्षितांपासून सुशिक्षितांपर्यंत) त्याच्या प्रभावाखाली आले आहेत. हिंदुत्ववादाची पार्श्वभूमी, भाजप आयटी सेलकडून पद्धतशीरपणे पसरवला जाणारा द्वेष, संघ-भाजप-नरेंद्र मोदी-अमित शहा आणि त्यांच्या हातातील मीडिया यांचं समाजात दुफळी माजवण्यातलं योगदान याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून (जाणतेपणाने किंवा अजाणतेपणाने) एक मोठा वर्ग भाजप आणि मोदींचं समर्थन करतो आहे. फुले-आंबेडकरांपासून हिंदू धर्माची बरीच चिकित्सा झाली आहे / होते आहे हा एका अर्थी हिंदूंचा विजय आहे. पण ही चिकित्सेची स्पेस कमी होण्यात हिंदू धर्माच्या राजकीयीकरणाचा मोठा वाटा आहे. ‘डाव्या-पुरोगामी लोकांमुळेच खरं तर हिंदुत्ववादी जिंकतात’ या विधानात तथ्यांश आहेच, नक्की आहे. पण हे विधान सरसकटीकरण करूनही वापरलं जातं कारण ते राजकीय विधान आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम कट्टरतेची चिकित्सा करताना त्या चिकित्सेची पद्धत आपण ठरवून घेतली तर ते इष्ट होईल असं मला वाटतं. (उदा. हा विषय विनोदाच्या कक्षेत आणावा की नाही? आपला नक्की अप्रोच कसा असावा? मांडणीत कोणते तर्कदोष असू शकतात? ते कसे टाळावेत?)

हिंदुत्ववाद आणि उदारमतवाद या विशिष्ट संदर्भात या मालिकेतील दुसऱ्या लेखात मी तीन सूचना/उपाय नोंदवले होते. ते मला किमान सामाजिक संदर्भात तरी अद्याप योग्य वाटतात म्हणून इथे पुन्हा नोंदवतो. (राजकीय संदर्भात काही वेगळा विचारही संभवू शकेल.) यावर चर्चा करायला, यात भर घालायला हरकत नाहीच.

– एक म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिक हळवेपणाची ‘ग्रॅव्हिटी’ लक्षात घेऊन समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवणं – जे अगदी कट्टर आहेत त्यांनाही तिखट उत्तर न देता त्यांना धार्मिक मूलतत्त्ववादाचं गांभीर्य समजावून सांगत राहणं (हे अवघड असू शकेल, पण मला वाटतं हाच एक मार्ग आहे. कारण कट्टरता ही मुळातच एकारलेली, नाजूक आणि म्हणूनच काहीशी हिंस्रही असते. त्यामुळे तिथे प्रहार केला की ती आणखी हिंस्र व्हायची शक्यता असते.)
– दुसरं म्हणजे उदारमतवादी लोकांनी धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांची ते दुखावले गेले तर दिलगिरी व्यक्त करणं. (उलट होणं अवघड आहे, पण तो विषय वेगळा.) यात भूमिका बदलायचा प्रश्न येत नाही. पण समजुतीचा प्रश्न येतो. कळत-नकळत जर धर्मश्रद्धेला धक्का बसला असेल किंवा काही कारणाने आपली मांडणी त्यांना एकारलेली वाटत असेल तर त्याची नोंद घेऊन, धार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता, तिचे दुष्परिणाम दाखवून देणं न सोडता ‘माणूस दुखावला गेला’ म्हणून दिलगिरी व्यक्त करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. ‘दिलगिरी कोणत्या परिस्थितीत आणि कुणासमोर व्यक्त करायची हे ठरवणं हा यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे.
– तिसरं म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळव्या लोकांनी आपलं केंद्र सोडून परिघाकडे येणं. धार्मिक कक्षेच्या आत जी मौज आहे त्यापेक्षा अधिक मौज या कक्षेच्या बाहेर आहे कारण इथे मौजेबरोबर आपली परीक्षा घेणारी आव्हानंही आहेत!

प्रस्तुत लेखमालिका हिंदुत्ववाद-उदारमतवाद या विशिष्ट विषयाभोवती असली तरी मागचे दोन लेख जातीसंस्थेबाबत होते. या दोन्ही विषयांबाबतची चर्चा या मालिकेत पुढे सुरू ठेवूया. आणखी एक म्हणजे या मालिकेतील लेखांबाबत काहीही ‘अंतिम’ नाही हे लक्षात घेऊया. ‘बीइंग इन्क्विझिटिव्ह’ हे नाव त्यासाठीच निवडलं आहे.

हेही वाचा- हिंदुत्ववादी व पुरोगामी : एकमेकांना ‘सुधारण्याची स्पेस’ नाकारत आहेत का? https://bit.ly/33KlOWR-

हेही वाचा- उदारमतवाद्यांनी समंजस हिंदुत्ववाद्यांशी संवाद सुरू ठेवायला हवा! https://bit.ly/2WQLTlw

(लेखक ‘मिळून साऱ्याजणी’ मासिकाचे संपादक आहेत)

9850677875

 

Previous articleप्रत्येक भाषण १५ ऑगस्ट नाहीतर २६ जानेवारीला केल्यासारखं का भासतं ?
Next articleसुपरहिरोचा सुपर-गोंधळ
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here