सुपरहिरोचा सुपर-गोंधळ

 

साभार:साप्ताहिक चित्रलेखा

-सागर राजहंस

जगात आजवरच्या अभिव्यक्तीत म्हणजे दृक् आणि श्राव्य संदेशवहनात ‘कोरोना’ हा शब्द अत्यंत कमी कालावधीत सर्वाधिक पटीत आणि पट्टीत व्यक्त झाला असेल. या शब्दाने भल्या भल्यांची मती गुंग आणि कृती विकलांग झाली आहे. सारी मानवजात गेले २० दिवस आहार, निद्रा आणि भय यातच व्यग्र आहे. सुभाषितकारांनी सामान्य माणसाचे आयुष्य आहार-निद्रा-भय-मैथुन एवढ्या चार बिंदूंपर्यंतच नोंद करून ठेवलंय. अशातील काही सामान्यांना ‘असामान्य’ असे म्हणत पुढे आणले. या सुपरहिरोंनी भारतीय विचारशक्तीला कुंठित करून ठेवले आहे. यात नरेंद्र मोदी हे चालू सुपरहिरो आहेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रॉडक्ट आहेत.

मोहन भागवत, भैयाजी जोशी, दत्तात्रय होसबळे या किमान विवेक असणाऱ्या संघाच्या विद्यमान कारभाऱ्यांकडून त्यांच्या कल्पनेतील या सुपरमॅन, शक्तिमान, क्रिश अशा साऱ्यांचा एकत्रित अंश असणाऱ्या सुपरहिरोबद्दलची आताची प्रतिक्रिया काय असू शकते, ते जाणून घेतले पाहिजे.
वाजपेयी यांच्या अस्तानंतर आणि अडवाणी यांच्या भ्रमनिरासानंतर; देशात दहा वर्षांनी (२०१४) कांग्रेस आघाडीच्या सत्तेविरोधात जोरात वारे वाहत आहेत म्हणून संघ परिवाराने जो काही पर्याय भारतवर्षासमोर आणला, त्याचे दिवे लावणे ‘कोरोना’ संकटानिमित्ताने आता जगजाहीर झाले आहे.
हा सुपरहिरो संघानेच जन्माला घातला, मोठा केला आणि या देशाच्या बोडक्यावर आणून बसविला आहे. गुजरातमध्ये त्याने दुधाच्या नद्या प्रसविल्या आहेत. केशराचे मळे फुलविले आहेत. तुपाचे रांजण भरले आहेत. या व अशा त्यानं केलेल्या आणि न केलेल्या खर्‍या – खोट्या गोष्टींची प्रचंड जाहिरात करून अख्ख्या देशासमोर या ‘सुपरहिरो’ला ‘अच्छे दिन’च्या जुमल्यासाठी सज्ज केलं. या सर्व रणनीतीच्या अंमलबजावणीसाठी देशी- विदेशी भांडवलदारांकडून अब्जावधी डाॅलर्स जमा केले आणि देशाची सत्ता हस्तगत केली. हा सत्ता हस्तगत करण्याचा त्यांचा प्रयत्न दोनदा यशस्वी झाला. पण आता संघाच्या नेत्यांनाही वाटत असेल की, आपण सुपरहिरो आणलेला नाही ,तर माकडाच्या हातात काकड़ा दिलाय. रजनीकांतचा ‘रोबोट’ भ्रष्ट झाल्यावर त्याचेही ऐकत नव्हता. तसे हा ‘सुपरहिरो’ संघाच्या सुप्रीमोंचे काही ऐकत नसावा.

या ‘सुपरहिरो’ने संघाची अर्थव्यवहारातली सर्व नीतिमत्ता गाडून टाकून मोजक्याच शिलेदारांसह टोळीराज सुरू केलंय. यातूनच कोणत्याही तयारीशिवाय नोव्हेंबर २०१६ला नोटाबंदी आणून छोट्या-मध्यम उद्योग-धंद्याचे बारा वाजवले. करोडो लोकांच्या नोकऱ्या घालवल्या. शेतीमाल मातीमोल करून शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटले. या साऱ्यात ‘जीडीपी’चा शेंडा खुडला गेल्याने अर्थव्यवस्था घायाळ झाली. त्यातून देश सावरतोय तोवर ‘जीएसटी’ आणला. या फंड्याने चालू आर्थिक वर्षांत २,१८,००० कोटी रुपयांचा घाटा केलाय. यातल्या बर्‍याचशा घटना संघाला मान्य नाहीत. पण *’मी आणि माझा सर्किट’ या मोदी-शहा यांच्या ‘मुन्नाभाई- मोटाभाई’च्या जोडीपुढे संघ सुप्रीमो हतबल झालेले दिसत आहेत. त्यांना संघाच्या ‘सांस्कृतिक राष्ट्रवादा’चा विनाश दिसत असणार. पण काय करणार?* भस्मासुर अजून स्वत:च्या डोक्यावर हात ठेवायचे नाव घेईना !
नोटाबंदी जाहीर करण्यापूर्वीही या ‘सुपरहिरो’ला आपल्या मंत्रिमंडळाशी; किमान अर्थमंत्र्यांशी चर्चा करावीशी वाटली नाही. अनेक आंतरराष्ट्रीय पातळीवरचे निर्णय घेताना आपल्याच परराष्ट्रमंत्र्यांशी चर्चा करावीशी वाटली नाही. आपल्या कृषिप्रधान देशात कृषिविषयक निर्णय घेताना कधीही कृषिमंत्र्यांना स्वायत्तता देणे तर लांबची गोष्ट; साधी चर्चाही करावीशी वाटली नाही. उद्योगक्षेत्राशी संबंधित महत्त्वाचे निर्णय घेताना कधीही उद्योगमंत्र्यांना विचारावेसे वाटले नाही. आंतरराष्ट्रीय वाणिज्यिक संस्थांना आणि कंपन्यांना भारतात हातपाय पसरू देण्यापूर्वी कधी वाणिज्यमंत्र्यांशी चर्चा करावीशी वाटली नाही. अशीच बेफिकिरी ‘कोरोना’च्या संकटाबाबत दाखवली आहे.

नोटाबंदी, जीएसटी, पुलवामा असा प्रवास करत सुपरहिरो इथपर्यंत आला. आता मला कुणाचीच जोड नाही. जोड़ीला ट्रम्प आहे म्हटल्यावर, काय कुणाची बिशाद ! चायनीज व्हायरस काय माझे वाकडे करील? कोरोना भारतात येणारच नाही, असा याचा हेका. तोवर ‘कोरोना’ भारताच्या वेशीवर आला होता. लाॅकआऊट जाहीर होण्याआधीच्या दोन महिन्यांत १५ लाख लोक विदेशातून भारतात लँड झाले. त्यात अरब देशातून आलेले मुल्ला- मौलवीही होते. तरीही ‘सुपरहिरो’चे ‘कोरोना- बिरोना काही नसते’ असेच चालले होते. पण ‘महाविकास आघाडी सरकार’ने महाराष्ट्र लॉकडाऊन प्रक्रियेला सुरुवात करताच, ‘सुपरहिरो’ला जबाबदारीचे भान आले. मग आधी एक दिवसाचा (२२मार्च) ‘जनता कर्फ्यू’ आणि मग २१ दिवसांचा देशव्यापी लाॅकडाऊन जाहीर केला. या दिरंगाईत ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या गुणाकाराने वाढली. ‘लॉकडाऊन’चा निर्णय आवश्यक होता. पण तो जाहीर करण्यापूर्वी बहुआयामी , बहुसांस्कृतिक विशाल देशातल्या सर्व मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन ‘अॅक्शन प्लॅन’ तयार करणे अत्यावश्यक होते. ते झाले नाही. याचे परिणाम संपूर्ण देश गेले दहा दिवस भोगतोय.
यावर उपाय काय? तर काहीतरी नवे, अचाट, वेगळे काही करीत असल्याच्या थाटात ‘हिटलर स्टायली’त राष्ट्राला उद्देशून भाषण करणे. त्यासाठी साऱ्या यंत्रणांना फाट्यावर मारून, देशाच्या जनतेशी अत्यंत नैसर्गिक नाते आहे ,असे समजून, करमणुकीचा ‘प्राईम टाईम’ म्हणजेच हक्काचा टी.आर.पी. मिळवण्याच्या नादात रात्री आठची वेळ निर्णय जाहीर करण्यासाठी निवडणे. हेच मुळात चुकीचे होते. त्याचे परिणाम काय होणार होते आणि होतील , हेच सुपरहिरोच्या बुद्धीच्या पलीकडचे होते. रात्री १२ वाजल्यापासून सुरू होणारा ‘लाॅकडाऊन’ फक्त ४ तास आधी जाहीर करणे, यातून गोंधळ किती झाला? परिणामी, विमानवाल्यांनी आणलेल्या रोगाची जबाबदारी रेशनकार्ड वाल्यांच्या खांद्यावर चढवली गेली. देशाच्या फाळणीच्या वेळी एवढा हिंसाचार झाला नाही; पण तेवढाच त्रास सोसून गरीब जनतेला शहरातून निघून आपले गावाकडचे घर गाठावे लागले. त्या दोन दिवसात जेवढे लोक रस्त्यावर मेले; तेवढे दवाखान्यात ‘कोरोना’ने मेले नाहीत. त्याबद्दल मानभावीपणे आणि तोंडदेखली ‘माफी मागणे’ हे त्यावरचे उत्तर होऊ शकत नाही.

‘ जनता कर्फ्यू’च्या संध्याकाळी सुपरहिरोने लोकांना थाळ्या आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या. ‘कोरोना’च्या भीतीने, रोगप्रतिकारक शक्ती भक्कम असतानाही विवेकशक्ती गमावलेल्या समाजाने हातात काही मिळेल ते बडविले. त्यावेळीच ‘समाजअंतर’ राखण्याच्या मूळ अटीचा भंग झाला. गरज ‘कोरोना’विरुद्ध जागृती करताना आरोग्य सुविधा वाढवल्या का, सरकारी जबाबदारीत काय वाढ करण्यात आलीय, हे स्पष्ट करणे अपेक्षित असताना; टाळ्या-थाळ्या वाजविणे ; दिवे लावणे, असे उपक्रम लोकांनी राबवण्याचे आवाहन करण्यात आले. या पुढचा उपक्रम देशी गायीच्या शेणाने घर सारवण्याचा वा गोमुत्राची फवारणी करण्याचा असू शकतो.
असो. फक्त ‘लोकल न्यूज’ पाहून आपल्याभोवतीच्या मर्यादित वर्तुळातच रमणाऱ्या मोदी- भक्तांच्या माहितीसाठी देशपातळीवरच्या काही घटना इथे देत आहे. त्यावरून या ‘सुपरहिरो’नं निर्मिलेल्या ‘सुपरगोंधळा’ची कल्पना येईल. मोठ्या शहरात रोजीरोटीसाठी आलेले लाखो लोक शहरातली रोजीरोटी बंद झाल्यावर आपापल्या मुलखात परतण्यासाठी मजबूर होतील आणि त्यासाठी ते कोणताही मार्ग अवलंबतील , हे या ‘सुपरहिरो’च्या अजिबातच लक्षात आलं नाही. असला कसला हा यतिधर्मी? परिणामी, मोठ्या शहरांबाहेरच्या महामार्गांवर ‘सुपरगोंधळ’ सुरू झाला. महाराष्ट्र वगळता देशात ही स्थिती होती. महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी लागू होणार असल्याचे जाहीर केल्याने लोक आधीच स्थलांतरित झाले होते. पण नरेंद्र मोदींनी देशव्यापी लॉकडाऊन जाहीर करताच अन्य राज्यांच्या शहरांत काय झाले, ते NDTV सोडल्यास अन्य कोणत्याही चॅनलने दाखवले नाही. जे दिसले ते भयानक होते. त्यापेक्षा लोकांना आहे, त्याच ठिकाणी थांबविणे आणि रोगावर नियंत्रण प्राप्त करणे आवश्यक होते. आता हा रोग सुपरहिरोने मोठ्या शहरातून, छोट्या शहरातून गावात आणि गावातून डोंगरकपारीत नेला आहे, असे म्हणण्याला जागा आहे. कारण आता प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात कोरोनाबाधित लोकांची नावे पुढे येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच केजरीवाल यांनी दिल्लीतल्या परप्रांतीयांसाठी मोफत जेवण व इतर सुविधा जाहीर केल्या होत्या. पण घरभाडे देणे किंवा इतर अडचणींमुळे हजारोंचे लोंढे उत्तर प्रदेश आणि बिहारच्या दिशेनं निघाले. याला सर्वस्वी जबाबदार केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेशमधील सरकारच आहे. महाराष्ट्राप्रमाणे एका बसमधून फक्त २० /२५ प्रवाशांना प्रवास करण्याची अट घालून ‘योगी सरकार’ने काही ‘शे’ किंवा काही हजार विनाथांबा ‘पाॅईन्ट टू पाॅईन्ट’ बसेस तातडीने उपलब्ध करून देणे आवश्यक होते. तसे झाले असते, तर दिल्लीबाहेर जाणार्‍या रस्त्यांवर हजारोंचे लोंढे दिसलेच नसते. ‘सोशल डिस्टन्सिंग’ धाब्यावर बसवून लोकांनी बसेसच्या टपावर बसून प्रवास केला. याला जबाबदार कोण ?

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार हे सुरुवातीला मौनात होते. आता ते महाराष्ट्र, गुजरात, गोवा सरकारांवर बिहारींना परत राज्यात पाठवले म्हणून टीका करतायत. उपमुख्यमंत्री (भाजपचे) सुशीलकुमार मोदी हेही बिहारींची पाठवणी करणाऱ्या राज्यांवर तोंडसुख घेतायत. राज्या – राज्यांच्यात भांडणे लावण्याचा हा उद्योग दिल्लीत बसून कोणी केला, ते उघडच आहे.
मुळातच संघाने निर्माण केलेल्या या सुपरहिरोने ‘कोरोना’च्या संकटाला दोन महिन्यांपूर्वीच गांभीर्याने घ्यायला हवे होते. हा रोग काही वाऱ्याबरोबर अरुणाचल, सिक्किम, नेपाळमार्गे भारतात येणार नव्हता. पाण्यातूनही येणार नव्हता. तो हवेतून येणार होता, हे कुणातरी ज्ञानी माणसावर भरवसा ठेवून गृहीत धरायला हवे होते. थेट चीनमधून नाही, पण ‘व्हाया’ म्हणजे दुसऱ्या देशातून तो येऊ शकतो, याचा अंदाज करायला हवा होता. १५ नोव्हेंबरपासून हे ‘कोरोना’चे संकट जगजाहीर झाले आणि त्यापासून बचाव कार्याच्या प्रारंभासाठी १५ मार्च उजाडला. त्यापूर्वी म्हणजे फेब्रुवारीतच ‘आतंरराष्ट्रीय एअरलॉक’ केला असता आणि विदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची तपासणी करून त्यांच्या क्वारंटाईनची कडेकोट व्यवस्था केली असती; तर ‘कोरोना’ संकट दीड-दोन लाख लोकांपुरतेच मर्यादित राहिले असते. आता त्याचे रूपांतर देशातील १३० कोटी लोकांना घरात बसवणाऱ्या महामारीत झाले आहे. २१ दिवसांच्या ‘लॉकडाऊन’मुळे मोठे आर्थिक आणि नोकऱ्या जाण्याचे संकट उभे ठाकले आहे.

त्यावरचे उपाय , आरोग्य सुविधा, आर्थिक तरतुदी आणि मुख्य म्हणजे धोरणे एव्हाना प्रधानमंत्रींनी जाहीर केली पाहिजे होती. पण ते सोडून सुपरहिरो दुसरे काहीही बोलतो. टाळ्या-थाळ्या वाजवायच्या कार्यक्रमानंतर; आता दिवे पेटवायला सांगितले आहे. त्यासरशी शेणात शेंगदाणे शोधणारे ‘दिव्या दिव्या दीपत्कार’ म्हणू लागलेत. हा सुपरहिरो लोकांना १९९० सालात घेऊन गेलाय. संमिश्र आणि नव्या आर्थिक धोरणांनी भारताला सक्षम विकसनशील देश बनवले होते. देशाची वाटचाल महासत्ता होण्याच्या दिशेने सुरु होती. पण आता?…
‘लॉकडाऊन’ कधीतरी संपेलच. पण तोपर्यंत आपला वैयक्तिक आणि सार्वजनिक बाजार पुरा बसलेला असेल.विषाणू हा विषाणूच असतो. तो आरोग्याला लागो वा देशाला !

साभार:साप्ताहिक चित्रलेखा

Previous articleधार्मिक कट्टरतेची चिकित्सा करणं न सोडता माणूस जपला पाहिजे!
Next articleधर्मप्रसारक की रोगप्रसारक
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.