इतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या?

-प्रा.हरी नरके

१. एसेम अण्णा एकदा आम्हाला सांगत होते, ” १९४२ चे दिवस होते. महात्मा गांधीजी ९ ऑगष्टला “चले जाव” चा नारा देणार होते. त्या दिवशी इंग्रजांनो चालते व्हा असे सांगणारा मोर्चा पुण्यात काढण्याचे आम्ही ठरवलं.
मोर्च्याच्या पुर्वतयारीसाठी बैठक झाली. नऊ तारखेचा मोर्चा यशस्वी व्हावा म्हणून आम्ही कंबर कसली. ९ तारिख असल्याने मोर्च्याला किमान ९ तरी पुणेकर यायला हवेत असा आमचा प्रयत्न होता. नोंदणी केली तेव्हा लक्षात आले, आकडा आठच्या पुढे जात नव्हता. शेवटी एका मोलकरणीला विनंती करून तिला सहभागी करून घेतले तेव्हा आकडा नऊवर गेला. तेव्हा बाकी सगळे पुणेकर इंग्रजांना घाबरून मोर्च्यापासून दूर राहिले होते, अंधाराची पुजा करीत.”
पुढे इतिहास लिहिताना मात्र सारा भारत चले जावच्या आंदोलनात सहभागी झाला होता असेच लिहिले गेले.

२. विश्राम बेडेकरांची अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावर निवड झाली तेव्हा मी त्यांची पुणे विद्यापीठाच्या [ सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ] मराठी विभागात मुलाखत ठेवली होती.
मी त्यांना विचारले “सर, तुमचे “एक झाड दोन पक्षी” हे आत्मचरित्र मला खूप आवडलेय. मात्र एक प्रश्न पडतो, तो हा की त्याकाळात देशभर स्वातंत्र्य चळवळींने उसळी घेतलेली असताना तुमच्या आत्मचरित्रात त्याचा पुसटसाही उल्लेख येत नाही असे कसे?” ते शांतपणे म्हणाले, ” बाळ, आम्ही महागांडू मध्यमवर्गीय बुद्धीजिवी लोक. आम्ही त्यावेळी दारंखिडक्या लावून इंग्रजांना घाबरून शेपटं घालून बसलेलो होतो. होय आम्ही सत्ताधिशांसोबत होतो. कसलं डोंबलाचं वर्णन करणार स्वातंत्र्यचळवळीचं?

“३. १९४२ च्या ९ ऑगष्टला कोल्हापूरजवळच्या कामेरीच्या विष्णू भाऊ बारप्टे या तरूणाने मोर्चा काढला. एस.पी. ब्रिटीश होता. क्रूर जनरल डायरच्या कुळातला. त्याने विष्णूला थेट कपाळात गोळी घातली. तो जागेवरच ठार झाला. त्याचं बालवयात लग्नं झालेलं होतं. बायको गरोदर होती. पोलीसांनी तिचा अतोनात छळ मांडला. ती गाव सोडून परागंदा झाली. पुढे मुख्यमंत्री अ. र. अंतुले यांनी गावोगावी हुतात्मा स्मारकं बांधायची ठरवलं. कामेरीत शहीद स्मारकाचं काम सुरू झालं.

एक आजारी म्हातारी मजूर म्हणून तिकडे काम करीत होती. अंगात खूप जास्त ताप असल्याने तिचा तोल जात होता. ती कामावर जखमी झाली तर आपल्याला ताप नको म्हणून कंत्राटदारानं तिला कामावरून घरी जायला सांगितलं.

ती म्हणाली, “मी आज काम केलं नाही तर माझी चूल पेटणार नाही. लेकरा मला काम करू दे.

“तो चिडला आणि त्यानं तिला हाकललं. तिनं त्याचे पाय धरले आणि त्याला म्हणाली, “बाळा, हे स्मारक ज्याच्या नावानं बांधताय ना त्याची मी विधवा बायको आहे रे!”

या घटनेची कोल्हापूर सकाळने मोठी बातमी दिली.

इतिहास सत्ताधिशांच्या बाजूने असणारांचा असतो की विवेकाच्या? गुलामीच्या चाहत्यांचा असतो की स्वातंत्र्याच्या? इतिहास अंधाराच्या उपासकांचा असतो की उजेडाच्या? इतिहास ब्लॅक आऊटवाल्यांचा असतो की प्रकाशाच्या बाजूने असलेल्यांचा? बहुमत बहुधा दिवे विझवणारांचच राहत आलंय. प्रकाशपुजकांचं नाही. मित्रांनो, निराश नका होऊ!

(लेखक नामवंत अभ्यासक विचारवंत  आहेत)

Previous articleजैन साधूंच्या ‘मुखपट्टी’चा वैज्ञानिक शोध
Next articleगोष्ट ‘अज्ञानकोशाची’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here