डॉ. पंजाबराव देशमुख: एक द्रष्टा महापुरुष

-सोमेश्वर पुसतकर

विदर्भाच्या महान परंपरेचा वारसा पुढे नेण्यात आधुनिक काळात ज्यांनी अहर्निश कार्य केले अशा काही महनीय व्यक्तींमध्ये डॉ. पंजाबराव उर्फ भाऊसाहेब देशमुख यांचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी असलेल्या डॉ. पंजाबराव देशमुखांनी समाजसेवा, कृषिविकास, राजकारण, जातिप्रथा, अस्पृश्यता निर्मूलन आणि शिक्षणप्रसार यासाठी आपले आयुष्य खर्ची घातले. समाजकारण व राजकारण या दोन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले विधायक कार्य प्रचंड आहे. सत्तेच्या राजकारणात असूनही त्यांनी सतत समाजहितवादी दृष्टिकोन ठेवला व बहुजन समाजाच्या चळवळीला सर्वसमावेशक तात्त्विक आधार दिला.

अमरावती जिल्ह्यातील पापळ या लहानशा खेडेगावात डॉ. पंजाबराव देशमुख यांचा जन्म २७ डिसेंबर १८९८ या दिवशी एका गरीब शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील शामराव देशमुख व आई राधाबाई यांनी मुलातील शिक्षणाची जिद्द ओळखून आर्थिक परिस्थितीवर मात करीत त्याचे शिक्षण चालू ठेवले. आईवडिलांच्या उत्तम संस्कारामुळे भाऊसाहेबांचे व्यक्तिमत्त्व उजळून निघाले. भाऊसाहेबांचे शालेय शिक्षण पापळ, चांदूर रेल्वे, कारंजा आणि अमरावती या ठिकाणी झाले. पुढे पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंटरपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे त्यांनी ठरविले. भाऊसाहेबांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती साधारण होती. त्यामुळे जमीन गहाण ठेऊन भाऊसाहेब २१ ऑगस्ट १९२० रोजी उच्चशिक्षणासाठी इंग्लंडला गेले. एडिंबरो विद्यापीठातून त्यांनी १९२३ मध्ये संस्कृत विषयात एम.ए. व १९२५ मध्ये बॅरिस्टर व डॉक्टरेट या पदव्या अनेक संकटांवर मात करून अथक परिश्रमाने प्राप्त केल्या. त्यांना ‘व्हान्स डनलॉप संस्कृत रिसर्च फेलोशिप’ मिळाली. त्यांच्या पीएच.डी.चा विषय ‘वैदिक वाङ्मयातील धर्माचा उद्गगम आणि विकास’ हा होता. उच्च शिक्षणामुळे भाऊसाहेबांचा समाजजीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक व्यापक आणि मूलग्राही झाला.

भारतात परतल्यानंतर भाऊसाहेबांनी अमरावतीच्या बार रूममध्ये वकिली तसेच शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये शिकवायला प्रारंभ करून आपल्या राजकीय व सामाजिक जीवनाला प्रारंभ केला. भाऊसाहेबांचे विचार उदारमतवादी होते. सर्व शोषित समाज म्हणजे बहुजन समाज अशी भाऊसाहेबांची व्यापक भूमिका होती.अमरावतीत वकिली करत असतानाच गरीब व अल्पशिक्षित बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आपण झटलो पाहिजे, हा विचार त्यांच्या मनात पक्का झाला. त्यामुळे भाऊसाहेबांचा सर्व भर अस्पृश्यता निवारण, शेती विकास आणि शिक्षणप्रसार यावर होता. दलित समाजाचा विकास व्हावा याकरिता स्नेहभोजने आयोजित करणे, पाणवठे मुक्त करणे आदि कार्यक्रमांवर त्यांनी विशेष जोर दिला. १९२७ मध्ये त्यांनी अमरावतीला ‘श्रध्दानंद छात्रालय’ सुरू केले. या जातिनिर्बंधाला संपूर्णपणे फाटा देण्यात आला होता. जे विद्यार्थी जात- पात पाळेल त्याला वसतिगृहातून बाहेर केले जात असे ही त्या काळातील क्रांतिकारी घटना ठरली.अमरावती जिल्हा व वऱ्हाडातील अनेक मागास समाजातील विद्यार्थी श्रध्दानंद छात्रालयात शिकून मोठे झालेत.

जातिभेद नष्ट करणे हे पंजाबरावांचे स्वप्न होते आणि म्हणून त्या दिशेने त्यांनी प्रयत्न सुरू केले होते. अमरावतीचे अंबादेवी मंदिर अस्पृश्यांसाठी खुले करण्यासाठी त्यांनी मोठी चळवळ उभी करून सत्याग्रह केला. महाराष्ट्रात अस्पृश्यांच्या मंदिर प्रवेशासाठी झालेला हा पहिला सत्याग्रह होता. पश्‍चिम महाराष्ट्रात मंदिर प्रवेशाची चळवळ त्यानंतर सुरू झाली हे येथे लक्षात घेण्यासारखे आहे. पंजाबरावांनी स्वत: आंतरजातीय विवाह करून जातीअंताची चळवळ स्वत:पासून सुरू केली. त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर कोणत्याही प्रकारचे कर्मकांड न करता त्यांचा अंत्यविधी करून तेरवीचे जेवण बोर्डिंगमध्ये राहणार्‍या दलित मुलांना दिले. भाऊसाहेबांचे विचार त्यांच्या कृतीतून स्पष्ट होत असे.

डॉ. पंजाबराव देशमुखांना विदर्भातील किसान चळवळीचे प्रणेते मानले जाते. सर्वांना अन्न पुरविणार्‍या या शेतकर्‍याचे कल्याण व्हावे असे त्यांना मनापासून वाटत होते. शेतकर्‍यांच्या पिकांना योग्य भाव मिळत नाही, शेतकरी सतत कर्जात बुडालेला असतो आणि त्याचे जीवन सतत उपेक्षेचे होऊन बसते, ही खंत पंजाबरावांना होती. शेतकर्‍यांची ही परिस्थिती सुधारण्यासाठी त्यांना संघटित करून चळवळ केली पाहिजे असा पंजाबरावांनी विचार केला. त्यासाठी १९३० च्या सुमारास त्यांनी शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली.

शेतकरी कर्जाच्या निवारणासाठी त्यांनी मध्यप्रांत आणि वर्‍हाडप्रांताचे मंत्री (१९३०-३३) असताना ‘कर्ज लवाद विधेयक’ कायदेमंडळात मंजूर करून घेतले. तसेच सावकाराच्या तावडीतून ७८००० एकर जमीन सवलतीच्या अटीने कर्जफेड करण्याच्या तत्त्वावर मुक्त केली. १९५२ मध्ये भारताचे कृषिमंत्री म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्यांनी जपानी भातशेतीचा प्रयोग व अधिक उत्पादन देणार्‍या गव्हाच्या जातीचा प्रसार केला. याशिवाय भाऊसाहेबांनी दिल्लीला ११ डिसेंबर १९५९ ते १४ फेब्रुवारी १९६० या दरम्यान प्रथमच जागतिक कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले. या प्रदर्शनासाठी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष आयसेन हॉवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रदर्शनीला अनेक देशातील राष्ट्रप्रमुखांनी भेटी दिल्या. त्यानंतर ७ फेब्रुवारी १९५५ ला ‘भारत कृषक समाजा’ची स्थापना भाऊसाहेबांनी केली. ‘कृषी सहकारी खरेदी विक्री अधिकोष’ ही योजनाही पंजाबरावांनी प्रथम राबविली.

राज्यातील दुसऱ्या क्रमांकाची शिक्षण संस्था असा लौकिकप्राप्त श्री शिवाजी शिक्षण संस्थाही भाऊसाहेबांनीच स्थापन केली . ज्या काळात विदर्भात शिक्षणाच्या कुठल्याही सोयीसुविधा नव्हत्या त्या काळात भाऊसाहेबांनी ही संस्था स्थापन केल्याने बहुजन , मागास समाजातील लाखो लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल झाला. विदर्भात शिक्षणाची गंगा भाऊसाहेबांनीच आणली.

भाऊसाहेब हे खऱ्या अर्थाने द्रष्टे होते. काळाची पुढची पावलं ओळखून त्यांनी शेती आणि शिक्षण या विषयात जे काम केलं ते कायम स्मरणात असणार आहे.

(लेखक नामवंत सामाजिक कार्यकर्ते होते)

Previous articleमानवी इतिहासाला निसर्गाची चपराक
Next articleयशोदाबाई आगरकर : वेदनेच्या अंधारात जळणारी विद्रोहाची वात
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here