अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राजकारणातील समविचारी मित्र. या दोघांची मैत्री जगजाहीर आहे. फेब्रुवारीमध्ये चीनसह अनेक युरोपीय देशांत कोरोना व्हायरसचा धुमाकूळ सुरू असताना हे दोन्ही मित्र भारतात साबरमतीच्या किनारी ‘रोड शो’ करीत होते. मात्र त्यानंतर महिनाभरातच ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ नावाच्या एका २०० मिलीग्रामच्या गोळीमुळे या दोन्ही राष्ट्रप्रमुखांची मैत्री तुटते की काय, अशी परिस्थिती काल-परवा निर्माण झाली होती. भारताने नमते घेऊन मृत्यूचे तांडव सुरू असलेल्या महासत्तेस मदतीचा हात देतानाच कोरोना विषाणू विळख्याच्या कठीण काळातील ही लढाई मिळून जिंकू, अशा विश्वासही दिल्याने तो प्रसंग टळला.
चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेतील कोरानाग्रस्तांच्या उपचारासाठी भारताकडून ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ (HCQ) या गोळ्या मागितल्या आणि कोरोनाशी लढणाऱ्या संपूर्ण जगाचे लक्ष या औषधीकडे वेधले गेले. वैद्यक क्षेत्रात प्रगत असलेल्या अमेरिकेसारख्या राष्ट्राने भारताकडे या गोळ्यांची मागणी करावी, हाच अनेक देशांसाठी आश्चर्याचा धक्का होता. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर भारत सरकारने २५ मार्च रोजी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनसह पॅरॅसिटेमॉल व अन्यकाही औषधांवर निर्यातबंदी लागू केली. त्यामुळे चिडलेल्या ट्रम्प यांनी विनंतीकडे दुर्लक्ष करणाऱ्या भारतास हायड्रॉक्सीक्लोरोक्विन गोळ्या दिल्या नाहीत तर ‘बघून घेण्याचा’ इशारा दिला . मात्र परिस्थिती अधिक चिघळण्याची वाट न पाहता भारत सरकारने या औषधांवरील बंदी उठवली आणि गुजरातमधून तातडीने एक कोटी Tablet दोन दिवसांपूर्वी अमेरिकेस रवाना केल्या. अमेरिकेस या औषधांचा साठा पोहचल्यामुळे, आधी इशारा देणाऱ्या ट्रम्प यांनी लगेच मानवतेच्या लढाईत केलेल्या मदतीबद्दल भारताचे आभार मानले आहेत.
मात्र या संपूर्ण प्रकरणामुळे ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ हे औषध नेमकं काय आहे ? अमेरिकेला ते महत्वपूर्ण वाटावं असं त्यात काय आहे ,हे प्रश्न निर्माण झाले आहेत .हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हा शब्द उच्चारताना जीभ जरा जडावत असली तरी अमेरिकेपाठोपाठ ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनॅरो यांनी हनुमानाच्या संजीवनी बुटी सोबत तुलना केल्याने ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ गोळीबद्दल जाणून घेण्याची सर्वांचीच उत्सुकता वाढली. भारतात मलेरियासह अन्य काही आजारांवर उपचारासाठी वापरली जाणारी ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ ही गोळी खरेच कोविड-१९ (कोरोना) उपचारांत लाभदायक आहे काय, ती नेमकी कसे कार्य करते, तिचा अन्य आजारात काय उपयोग होतो, ती सहज मिळते का, तिचे साईड इफेक्ट काय आहे, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यास सगळे उत्सुक आहेत.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन म्हणजे काय?
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन मलेरियाचा उपचार किंवा प्रतिबंध करण्यासाठी वापरले जाणारे ‘क्विनोलिन’ औषध आहे. आफ्रिका, दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशियासारख्या भागात मलेरियाचा आजार सामान्य आहे. मात्र हे औषध मलेरियाच्या सर्व प्रकारांवर प्रभावी नाही. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे रोगप्रतिकारक्षमता (ऑटो इम्यून डिसीज) आणि संधीवाताच्या उपचारात वापरले जाते. भारतातून मलेरियाचे उच्चाटन झाल्याचा दावा वारंवार होत असला तरी अजूनही दरवर्षी लाखो लोकांना मलेरिया होतो, हे वास्तव आहे. त्यामुळे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधाचे जगात सर्वाधिक उत्पादन भारतातच होते. इंडियन फार्मास्यूटिकल अलायंसच्या म्हणण्यानुसार, या औषध निर्मितीत भारताचा वाटा एकूण जगाच्या ७० टक्के इतकाआहे. दर महिन्याकाठी देशात हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची ४० टन इतकी प्रचंड उत्पादन क्षमता आहे. म्हणजे २०० मिलीग्रामच्या अंदाजे २० कोटी गोळ्यांचे उत्पादन आपल्याकडे होऊ शकते.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) या औषधांस आवश्यक औषधांच्या सूचित टाकले आहे. अमेरिकेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही तेथील डॉक्टरांद्वारे सर्वाधिक लिहून दिली जाणारी औषधी आहे. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध मलेरियासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘क्लोरोक्विन’ या औषधापेक्षा मात्र भिन्न आहे. सध्याचा कोरोना विषाणू हा ‘सार्स सीओवी’ या जातकुळीतील आहे. आणि हायड्रॉक्सीक्लोरोक्विन या औषधांचा परिणाम ‘सार्स सीओवी २’ या विषाणूवर परिणामकारक होत असल्याचे दिसून आले आहे . त्यामुळेच सध्या जगात थैमान घालत असलेल्या कोरोना अर्थात कोवीड-१९ च्या संसर्गात उपचारासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर अचानक वाढल्याचे वैद्यकीय जाणकार सांगतात. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन आणि अझिथ्रोमाइसिन (झेड-पीके, झीथ्रोमॅक्स) यांच्या संयोजनामुळे काही रूग्णांमध्ये क्लिनिकल सुधार झाला, असे सांगण्यात येते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध कोरोना संसर्गात विषाणूंची वाढ रोखण्यात थोडेफार यशस्वी ठरल्याने या रूग्णांवर उपचारासाठी ते जगभर वापरले जाऊ लागले.
मुळात हे औषध कोरोनाबाधितांसाठी नसून कोरोना वाहक व बाधितांच्या संपर्कात आलेले संशयित रूग्ण, क्वारंटाईन केलेल्या व्यक्ती आणि कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर्स, नर्स यांच्यासाठी आहे. रोगप्रतिकारक क्षमतांच्या आजारावर हायड्रॉक्सीक्लोरोक्विन अत्यंत गुणकारी असल्याने ते अशा रूग्णांवर उपचारांकरीता तसेच जगभर लष्करी वैद्यकीय सेवेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांकरीता वापरले जाते. रोगप्रतिकारक क्षमतेशी निगडीत (ऑटो इम्यून डीसीज) आजारांमध्ये संधिवात, अस्थमा, स्नोग्रेन सिंड्रोम आदी ३१ प्रकारचे आजार येतात. ऑटो इम्यून डीसीजमध्ये शरीरातील आवश्यक असलेल्या पेशींना आपलेच शरीर शत्रू समजून बाहेर फेकून देण्यास सुरूवात करते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती कमी होऊन विविध आजार होतात. या प्रकारात त्वचारोगांशी संबंधित असलेला ‘ल्यूप्स’ हा आजार सर्वाधिक झाल्याचे आढळते. या आजारांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचा वापर होतो. मात्र कोरोना प्रतिबंधक उपचारांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विन हे औषध खात्रीशीर उपायकारक ठरेल याची शाश्वती नाही. यासंदर्भात अजुनही अनेक चाचण्यांची गरज असल्याचे मत वैद्यक शास्त्रज्ञांनी व्यक्त केले आहे.
क्लोरोक्विनपेक्षा हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ही ॲडव्हान्स औषधी आहे. कोरोना रूग्णांमध्ये या औषधाचा वापर सकारात्मक आढळल्याने ती या रूग्णांना दिली जात असली तरी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे अनेक गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ही औषधी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे हे जीवघेणेही ठरू शकते. भारतीय मानसिकतेचा विचार केला तर आजही असंख्य नागरिक अनेक आजारांसाठी डॉक्टरी सल्ल्याशिवाय स्वत:च औषधी घेणे पसंद करतात. कोरोना संसर्ग उद्भवल्यानंतर हा धोका ओळखून भारतात या औषधांवर निर्यातबंदी आणि औषधी दुकानांमधून विक्रीबंदी घालण्यात आली. डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शनशिवाय ही औषधी मिळत नाही. अमेरिकेच्या धमकीनंतर ही निर्यातबंदी उठवून हायड्रॉक्सीक्लोरोक्विन व पॅरासिटेमॉल ही औषधे परवाना क्षेत्रात टाकण्यात आली.
हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोणी घेऊ नये?
आपल्याला कोणत्याही प्रकारची ॲलर्जी असल्यास हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरू नये. लहान मुलांवर दीर्घकालीन उपचारांकरीता हायड्रोक्सीक्लोरोक्विनचा वापर करू नये. गर्भवती महिलांनी डॉक्टरांच्या सल्लयाशिवाय ही औषधी वापरू नये. डोळ्यांचा आजार असणारे, हृदय रोग, रक्तदाब, हृदयाची गती वाढणे, मंदावणे, मधुमेह, पोटांचे आजार, यकृताचे किंवा मूत्रपिंडोच आजार, सोरायसिस, डायरिया अशा आजारांमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे सेवन हानीकारक ठरू शकते. मद्यपान किंवा धुम्रपान करणाऱ्या व्यक्तींसाठीही हायड्रॉक्सीक्लोरोक्विन धोकादायक ठरू शकते. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन ड्रग्ज १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या कोणालाही वापरण्यासाठी प्रतिबंधित आहे. हायड्रोक्सीक्लोरोक्विन हे औषध संपूर्णपणे डॉक्टरांच्या निगराणीत, त्यांच्या सूचनांनुसारच घ्यावे, असे सांगितले जाते. प्रिस्क्रिप्शन लेबलवरील सर्व दिशानिर्देशांचे पालन करून हे औषध मोठ्या किंवा लहान प्रमाणात किंवा शिफारसीपेक्षा जास्त काळ घेऊ नये. हायड्रोक्सीक्लोरोक्विन कधीकधी आठवड्यातून एकदाच दिले जाते. आपण दर आठवड्यात डोस घेत असल्यास हे औषध घेण्यासाठी प्रत्येक आठवड्यात त्याच दिवशी घ्या, असे सल्ले देण्यात येतात.
हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे साईड इफेक्ट
हायड्रोक्सीक्लोरोक्विनचे प्रमाणाबाहेर डोजेस झाल्यास रूग्णांना तंद्री लागणे, दृष्टी बदल, हृदयाची गती कमी होणे, छातीत दुखणे, तीव्र चक्कर येणे, तीव्र डोकेदुखी, चेहरा, ओठ, जीभ किंवा घशात सूज, रक्तातील सारखचे प्रमाण कमी होणे, मळमळणे, शुद्ध हरवणे, अशक्तपणा जाणवणे अथवा श्वास घेण्यास अडचण येणे अशा अनेक तक्रारी व्यक्तीनुरूप जाणवू शकतात. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन घेण्यापूर्वी किंवा नंतर चार तासांच्या आत ॲन्टासिड किंवा काओपेक्टेट (कॅओलिन-पेक्टिन) ही औषधे घेणे टाळले पाहिजे.
जगभर हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या औषधांची चर्चा तेजीत असताना या गोळ्यांची अचानक विक्रीही वाढली आहे. या गोळ्या कोरोना संशयित, बाधितांवर वैद्यकीय सेवा बजावणारे डॉक्टर आदींसाठी वापरावयाच्या असल्याने बहुतांश वैद्यक व्यवसायिकांनी या गोळ्यांचा साठा केल्याची चर्चा आहे. या चर्चेमुळे सामान्य नागरिकांनीही या गोळ्या घेण्यासाठी औषधी दुकानांमध्ये गर्दी केली. मात्र डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय त्या मिळत नाही, हे कळल्यावर अनेकांचा नाईलाज झाला. त्यामुळे ‘क्लोरोक्विन’ हे औषध हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधीस समांतर असल्याचा समज होऊन सामान्य नागरिक आता औषधी दुकानांमधून क्लोरोक्विनच्या गोळ्या मागत आहेत. मात्र या गोळ्यांचाही बाजारात तुटवडा आहे. दुसरीकडे अमेरिकेच्या अध्यक्षांनी भारतात निर्मित या गोळ्यांची जाहीर मागणी करण्याकडे कोण्या फार्मा कंपनींना लाभ पोहचविण्याचा तर हेतू नाही ना, यादृष्टीनेही जागतिक स्तरावर अभ्यासकांमध्ये खल सुरू आहे.
काहीही असले तरी कोणतेही औषध डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणे, हे घातक ठरू शकते. त्यामुळे आपल्याला कोरोना संसर्ग होऊच नये, असे वाटत असेल तर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर न पडण्याचे उपचार पथ्य म्हणून केले तरी आपण ही कठीण लढाई सर्वमिळून नक्कीच जिंकू!
– (लेखक ‘लोकसत्ता’चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)
चांगली आणि सविस्तर माहिती ची गरज होतीच. या लेखातून नितीनभाऊंनी पूर्ण केली. या औषधाच्या उच्चारापासूनच गदारोळ सुरु झालेला होता. एरव्ही भारताच्या कोणत्याही प्रॉडक्ट च्या बाबतीत क्वालिटी कंट्रोल च्या नावाखाली अमेरिका नेहमीच नाक मुरडते. 60 वर्षांपूर्वीच्या संशोधित औषधाची मागणी आग्रही करावी लागली यात समाधान आहे.
चांगली आणि सविस्तर माहिती ची गरज होतीच. या लेखातून नितीनभाऊंनी पूर्ण केली. या औषधाच्या उच्चारापासूनच गदारोळ सुरु झालेला होता. एरव्ही भारताच्या कोणत्याही प्रॉडक्ट च्या बाबतीत क्वालिटी कंट्रोल च्या नावाखाली अमेरिका नेहमीच नाक मुरडते. 60 वर्षांपूर्वीच्या संशोधित औषधाची मागणी आग्रही करावी लागली यात समाधान आहे.
खूप नवीन अणि उपयुक्त माहिती…!
अभ्यासपूर्ण लेख..!!
छान वृत्तांकन केलंय, शासकीय यंत्रणेपेक्षा सोशल डिस्टनसिंग चा संयमी सामाजिक उठाव, यावर प्रभावी उपाय आहे हे सर्वांनी समजून घेणे आवश्यक आहे.