मेरी क्युरी: दोनदा नोबेल मिळवणारी अफाट शास्त्रज्ञ

-मंगेश सपकाळ , मेलबोर्न (ऑस्ट्रेलिया)

विज्ञान जगात जर ‘फिमेल-सायंटिस्टमध्ये’ माझं सर्वात जास्त कुणी फेव्हरेट असेल, तर ती म्हणजे ‘मेरी क्युरी’.

अठराशे-एकोणीशेचा काळ म्हणजे विज्ञान जगासाठी एक सुवर्ण काळ होता. कित्येक महत्त्वाचे संशोधन या काळात होणार होते. कित्येक ग्रेट सायंटिस्ट या जगाला पुरून उरणार होते. पण तरी पुरुषप्रधान व्यवस्थेची मुळं इतक्या खोलवर रुळलेली होती की, केवळ स्त्री म्ह्णून जगणं हा तेव्हाही एक वेगळाच स्ट्रगल असायचा. आणि या सगळ्याला पुरून उरली ‘मेरी क्युरी.’

ज्या गोष्टी Rare असतात, त्या गोष्टींबद्दल नेहमीच उत्सुकता असते.
कळायला लागल्यापासून मला ‘हुशार, खमक्या, स्ट्रॉंग व्यक्तिमत्त्व’ असणाऱ्या बायकांचं आकर्षण राहिलंय. अशा व्यक्तिमत्त्व लाभलेल्या-घडलेल्या स्त्रिया मला नेहमीच भुरळ घालतात.

जेवढं आईन्स्टाईन जवळचा वाटतो, तेवढंच मला ‘मेरी क्युरी’ जवळची वाटते. आणि याचं कारण तिची प्रगल्भता, तिची माणुसकी, तिची हुशारी हे सगळं आहेच, पण अजूनही एक मिळतं-जुळतं कारण ते म्हणजे तिचं नाव.

मेरी क्युरीचा जन्म पोलंडचा. तिचं मूळ नाव ‘Maria Sklodowska’ . पोलंड Accent मध्ये काही लोक Maria या शब्दाचा उच्चार Mania/Marniya/Manya असा करतात. जो ऐकायला ‘मान्या’ असं ऐकू येतो.
(‘मान्या’, माझी मुलगी, १० वर्ष. हे नाव, मी ठेवलेलं नाही. ना मला मेरी क्युरीबद्दल माहित होतं तेव्हा)

फ्रांसला शिक्षणासाठी आल्यावर तिने तिचं नाव ‘Marie’ केलं, आणि क्युरी हे तिच्या नवऱ्याचं म्हणजेच Pierre चं आडनाव.
—————-

रेडिओऍक्टिव्ह जगाचा उलगडा करणाऱ्या मेरीचा स्ट्रगल देखील आपल्या सामान्य लोकांपेक्षा वेगळा नव्हता. शिक्षणासाठी पैसे नाहीत, एका छोट्याश्या खोलीत राहणं, एका छोट्या प्रयोगशाळेत बाटल्या धुण्याचं काम करणं, जेमतेम ब्रेड-बटरवर जगणं आणि ते सगळं करूनही आपले प्रयोग पूर्ण करत राहणं… या सगळ्यात तिची जिद्द, तिची चिकाटी ठळक दिसून येते.
फक्त स्त्री असल्यामुळे तिला ‘मोठ्या प्रयोगशाळेत’ प्रवेश नाकारला जाई. कारण पुरुषांचं लक्ष विचलित झालं तर.

काहीही म्हणा, पण – ‘एक हुशार-स्वतंत्र स्त्री, पुरुषांना झेपत नाही’

याच काळात तिची, तिच्या Future husband, Pierre शी ओळख झाली. मग ओळख प्रेमात रूपांतरित आणि मग लग्न. खरंतर येवढ्या प्रभावी-हुशार स्त्रीबरोबर राहण्याची संधी मिळणारा Pierre मला फार नशीबवान वाटतो. आणि अर्थात Pierre म्हणून नवरा मिळणं हेही मेरीचं भाग्यच होतं. कारण Pierre हा देखील सायंटिस्ट होता. त्याची स्वतःची स्वप्न असतील, स्वतःचे प्रयोग-संशोधन असेल. पण जेव्हा मेरीने ‘रेडिओ-एक्टिव्ह’ वर काम सुरु केलं, तेव्हा Pierre ने आपले हातातले प्रोजेक्ट सगळे बाजूला ठेऊन मेरीला मदत करायचं ठरवलं. त्यात ना त्याचा पुरुष म्हणून अहंकार आला, की क्रेडिट घेण्यासाठी हाव आली.

—————

नुकताच एक्स रेचा शोध लागलेला. हे नक्की कुठले ‘किरण’ आहेत हे कळत नव्हतं. म्हणून जसं गणितात आपण माहित नसलेल्या नंबर्सला ‘X’ मानतो, तसं त्याला X-Ray म्हटलं जाऊ लागलं. X-Ray हा अपारदर्शक वस्तूमधून देखील जात असल्यामुळे, त्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. सगळेच यावर प्रयोग करू लागलेले. खरंतर हा शोध चुकून लागला होता, कॅथोड रे वर काम करत असताना. आणि त्याआधीही ते X-Ray सारखा इफेक्ट बऱ्याच लोकांना दिसलेला. पण X-Ray चा शोध लावणाऱ्या जर्मन सायंटिस्ट Rontgen ने फक्त एकंच प्रश्न विचारला, तो “का ?”. ‘हे असं का झालं ?’

बरेच लागलेले शोध हे ‘का ?’ या प्रश्नामुळे लागले. त्यामुळे तुम्हाला जर प्रश्न पडत असतील, तर तुम्ही ‘शोधापासून’ किंवा ‘उत्तरापासून’ लांब नाही आहात. प्रत्येकवेळी हे शोध विज्ञानजगात किंवा बाह्य जगातच असायला हवं असं नाही. अशा प्रश्नांनी आपण आपल्यालाही शोधू शकतोच. आपल्यातला ‘मी’ देखील नव्याने सापडत जातो मग.

तर या एक्स-रे वर काम करण्यासाठी बरीच गॅंग खपली. कारण याचा मेडिकलसाठी बराच फायदा होणार होता. रेडिएशनवर लोकांकडे माहिती होती. (रेडिशन म्हणजे ‘किरणोत्सर्ग’, म्हणजेच एखाद्या पदार्थातून किरणं बाहेर पडणं)

एक्स-रे ने, ब्रेकहेल या शास्त्रज्ञाला देखील भुरळ घातली. एकीकडे, युरेनियमचे क्षार जर आपण सूर्यप्रकाशात धरले, तर क्षार तो प्रकाश आपल्याआत शोषून घेतात आणि नंतर ते तो प्रकाश बाहेर फेकतात, याचा शोध लागलेला. तर दुसरीकडे, एक्स रे आरपार जातात हा शोध माहित होता. त्यामुळे या चमकणाऱ्या क्षारातून एक्स रे आरपार जाऊ शकतात का ? यावर ब्रेकहेलने प्रयोग करायला सुरुवात केली. त्याने फोटोग्रागिक फिल्म घेतली, त्यावर काळा कागद लावला आणि त्याच्यापुढे युरेनियमचे क्षार, जे त्याने सूर्यप्रकाशात धरून चार्ज केले होते, ते ठेऊन पाहिलं. तर एक्स-रे त्या क्षारातून आरपार जाऊन अगदी काळ्या कागदाच्या आरपार जाऊन ते फोटोग्राफिक प्लेट वर पडत होते. त्याला शोध लागला. नंतर ती प्लेट, त्या प्लेटवर काळ्या कागदाद गुंडाळून ठेवलेला युरेनियमचा क्षार एका कपाटात ठेऊन तो गेला. बऱ्याच दिवसांनी त्याने ते उघडून पाहिलं तर त्याला त्या प्लेटवर अजून गडद प्रतिमा दिसू लागल्या.

प्रॉब्लेम असा होता की, त्या अंधारात तिकडे लाईट मारलीच नाही कोणी त्या क्षारावर, कपाटात पूर्ण काळोख, मग जर प्रकाशकिरणच नाहीत तर तो क्षार चार्ज तरी कसा होणार ? कारण त्याच्याकडे स्वतःचा प्रकाश नाही. मग नक्की हे कुठले किरण आहेत जे बाहेर पडतायेत ? म्हणजे युरेनियमच्या त्या क्षारमध्ये अजून काहीतरी आहे जे जास्त रेडिओएक्टिव्ह आहे, जे बाहेर पडतंय… पण ते काय ?

आणि मग त्याने या Marie आणि Pieree ला यावर संशोधन करायची विनंती केली. युरेनियम असणारं पिचब्लेंड नावाचं खनिज उकळून, गाळून त्यात काय सापडतंय हे बघायचं ठरलं. हा प्रयोग दिसतो तेवढा सोपा नव्हता, खास करून त्या काळात… वेळखर्ची होताच, पण त्याचे साईड इफेक्टही होते.

दोघांच्या दिवसरात्र मेहनतीने त्यांना नवीन मूलद्रव्य सापडलं, ज्याचं नाव त्यांनी पोलंडवरून ‘पोलोनियम’ ठेवलं. पण तरी मेरीला अजून काहीतरी सापडेल असा विश्वास वाटला, म्हणून प्रयोग चालूच ठेवला. आणि ‘रेडियम’चा शोध लागला. त्यामधून होणारा किरणोत्सर्ग हा युरेनियमच्या ३० लाख पटीने जास्त होता. त्यातुन निघणारी किरणं येवढी स्ट्रॉंग होती की ते पेशी देखील मारू शकत होती. अर्थात त्याचा फायदा कॅन्सरसाठी होणार होता. पण तेवढाच तो घातक देखील होता.

पण अडचण अशी होती की, रेडियम नॉनस्टॉप कसं काय चमकतंय, कशी काय येवढी लाईट, म्हणजेच ऊर्जा तो बाहेर फेकतोय ? हे कोडं काही सुटता सुटेना. आणि इथे आला आपला आईन्स्टाईन मदतीला. E = mc२ ने ते कोडं सुटलं.

आता इथे नुसतं रेडियमचा शोध लागला असं होणार नव्हतं. पण अनु-रेणू, हे सगळं विश्व नव्याने कळणार होतं. आणि अणू हा काही सर्वात लहान, म्हणजे शेवट आहे, असं नाही, तर त्याच्या आत पण अजून काही छोटे पार्टिकल्स असायला हवेत, हा समज बळावला. ‘हे सगळं अणूच्या रचनेमुळे होतंय’, यावर शोध लागण्याआधीच मेरीने हा तर्क काढला होता. तर दुसरीकडे आईन्स्टाईनने ब्राऊनियन मोशन मध्ये अणू-रेणूचा संबंध प्रबंधात जोडून तो मोकळा झाला होता.

————————-

या तिच्या शोधामुळे जगाला पहिली नोबल पटकवणारी स्त्री सापडली. म्हंजे, मेरी क्युरी ही पहिली स्त्री होती जिला नोबल मिळाला.

खरंतर मेरी तिच्या शोधाचं पेटंट घेऊन करोडपती झाली असती. पण तिने ते तसं केलं नाही. रेडियम हे लोकांचं आहे, लोकांसाठी आहे’, ती म्हणायची.

पतीच्या निधनानंतर काही वर्षांनी ती पुन्हा प्रेमात पडली. पण ज्याच्या प्रेमात पडली तो शादीशुदा. त्याच्या बायकोने कल्लोळ केला. बातम्यांसाठी हपापलेल्या वर्तमानपत्रांनी तिच्यावर बरेच आरोप केले. तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. येवढंच काय तर, नवऱ्याचा खून हिनेच केला असेल, वगैरे चर्चाही रंगली. गंमत म्हणजे ज्या पुरुषाबरोबर अफेअर होतं, ज्याला बायको देखील होती, त्याच्याबद्दल फार काही लिहिलं नाही बातम्यांनी. कारण चारित्र्य हा प्रकार फक्त बायकांना असतो, पुरुष म्हणजे समाजाने सोडलेला खुला सांड. त्याला हवं ते करण्याची मुभा, हा आमचा समाज .

यातून नैराश्य येणं भाग होतंच. आणि तेव्हा तिच्या मदतीला धावून आला आपला आईन्स्टाईन. तिला धीर दिला. हे सगळं तुझ्या विज्ञानावर येऊन देऊ नको म्हणू तिला प्रोत्साहन दिलं. (बॉस, पुन्हा आईन्स्टाईन होणे नाही.)

अर्थात मेरीने हे सगळं फाट्यावर मारून आपले शोध, आपले प्रयोग चालू ठेवले. आणि तिने दुसरा नोबल देखील पटकावला.

ज्या मेरीला केवळ स्त्री असण्याच्या कारणावरून कमी लेखलं गेलं, जिच्या हुशारीवर शंका घेतली गेली, ती मेरी जगातली पहिली व्यक्ती ठरली, जिला दोनदा नोबल मिळालं. कुठल्याही पुरुषाने हा पराक्रम केला नव्हता, तो ‘मेरीने’ केला.

१९११ च्या फिजिक्स-केमिस्ट्री च्या पहिल्या कॉन्फरन्समध्ये जिथे रदरफोर्ड, प्लॅन्क पासून ते आईन्स्टाईनपर्यंत कित्येक दिग्गज हजर होते, त्यात एकमेव स्त्री होती, ‘मेरी क्युरी’.

मेरी आणि पेरीचे जीन्स घेऊन जन्माला आलेली तिची मुलगी आयरिन, आईवडिलांच्या नक्षे-कदम वर, तिनेही पुढे नोबल पटकावला. गंमत म्हणजे, तिची मुलगी ही जगातली दुसरी स्त्री जिला नोबल मिळाला.

पुरूषप्रधान सत्ता मोडीत काढून, नोबल मिळवून मेरीने केवळ स्त्रियांना एक आदर्शच दिला नव्हता, तर आपल्या मुलीच्या रूपात तो आदर्श तिने चालूही ठेवला.

चुल-मुल सांभाळून हे सगळं करणारी मेरी निव्वळ ग्रेट होती.

————–

तेव्हा रेडिओऍक्टिव्हचा घातकपणा कोणाला माहित नव्हता. रेडिओऍक्टिव्ह पदार्थ ती खिशात घेऊन फिरायची आणि त्याचा तिच्या शरीरावर परिणाम होऊन ती हे जग सोडून गेली.

मेरी म्हणायची,
“आयुष्यात घाबरण्यासारखं काही नाही, जे आहे ते फक्त शिकण्यासारखं, जाणून घेण्यासारखं आहे. आणि आता ही वेळ शिकण्याची, जाणून घेण्याची आहे, ज्यामुळे आपली भीती कमी होईल”

इतरांच्या आयुष्यात नको तेवढं इंटरेस्ट घेणाऱ्या पोरा-पोरींनो,

मेरी म्हणायची, “लोकांमध्ये कमी आणि त्यांच्या विचारांमध्ये जास्त इंटरेस्ट घ्या”

(लेखक अनेक विषयांचा अभ्यासपूर्ण व परखड वेध घेतात)

Previous articleपत्रकारांना करोनाचा झटका
Next articleडॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे तर विषारी झाड!’
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

Comments are closed.