काळीज पिळवटून टाकणाऱ्या ‘लॉकडाऊन कथा’

साभार: दैनिक ‘दिव्य मराठी’

कुठलीही नैसर्गिक वा मानवनिर्मित आपत्ती मानवी भावभावनांची राखरांगोळी करते . कोरोना विषाणूच्या उद्रेकामुळे संपूर्ण जग हतबल झालं असताना जगाच्या काना-कोपऱ्यातून अशाच काळीज कुरतडून टाकणाऱ्या कथा समोर येत आहेत.

अविनाश दुधे

…१…..

तो मूळचा उत्तरप्रदेशचा. व्यवसायाने ट्रक ड्रायव्हर. व्यवसायाच्या निमित्ताने वर्षातील दहा महिन्यापेक्षा अधिक काळ ट्रान्सपोर्ट कंपनीचा माल देशातील वेगवेगळ्या प्रांतात पोहोचविणे हेच त्याचं आयुष्य. कोरोनाची साथ आली त्यावेळी ताप आणि खोकला असल्याने तो सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलला दाखवायला येतो . डॉक्टर त्याची तपासणी करून त्याला संशयित कोरोना रुग्ण म्हणून नॉन कोविड वार्डात दाखल करून घेतात. त्याच्यावर उपचार सुरु होतात. त्याचा थ्रोट स्वाब सॅम्पल तपासणीसाठी नागपूरला पाठविण्यात येतो. दरम्यान दोन दिवसातच त्याची तब्येत चिघळते आणि त्याचा मृत्यू होतो. त्याचा कुटुंबाचा ठावठिकाणा शोधण्यासाठी पोलिसांची धावपळ सुरु होते . त्याच्या सामानातील आधार कार्डावरून  तो उत्तरप्रदेशच्या बांती पोलीस स्टेशन क्षेत्रातील रहिवाशी असल्याचे समजते .शासकीय यंत्रणेमार्फत त्याच्या घरातील मंडळींपर्यंत निरोप पोहचविला जातो . त्याची पत्नी व दोन मुलं कडक संचारबंदीत ठिकठिकाणच्या चौकशीला उत्तरं देत सव्वा दोन हजार किलोमीटरचे अंतर कापून कसेबसे अमरावतीत पोहचतात. त्याची पत्नी नवऱ्याचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहचते. तिथे त्याचा मृतदेह तीन स्तरीय प्लास्टिकच्या आवरणात बंदिस्त केला असतो . अश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी ती डॉक्टरांना, पोलिसांना विनंती करते की मला आणि मुलांना केवळ पाच मिनिटासाठी माझ्या नवऱ्याचा , मुलांना वडिलांचा चेहरा पाहू द्या. कोरोना संसर्गाच्या भीतीने डॉक्टर साफ नकार देतात. अंत्यसंस्कार लवकर आटोपून घ्या , हा सल्ला देतात. तिचा बांध फुटतो ती जीवाच्या आकांताने रडत सांगते, ‘तीन महिने झाले हो, मी माझ्या नवऱ्याला पाहिले नाही . केवळ दोन मिनिटं तेवढं पाहू द्या.’ यंत्रणा नकार देते. तिच्या आणि मुलांच्या आक्रोशाने रुग्णालयाच्या भिंती हादरतात. पण यंत्रणेचा नाईलाज असतो . त्यांना अंत्यसंस्कार आटोपण्याची घाई असते. काही वेळात तो पार पडतो. ती भकासपणे थिजलेल्या अवस्थेत रुग्णालयाच्या भिंतीला टेकून बसली असते.

    ….त्याच वेळेस बातमी येते . संसर्गाच्या भीतीने ज्याचा चेहराही पाहू देण्यास डॉक्टरांनी नकार दिला असतो त्या  तिच्या नवऱ्याचा रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला असतो .

………………………………………………………

…. २….

तो यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी तालुक्यातील एका छोटया गावाचा रहिवासी. अतिशय गरिबीत संघर्ष करून , शिक्षण घेवून तो मुंबईत टाऊनप्लानर या पदापर्यंत पोहोचला . संपूर्ण गावाला त्याचा सार्थ अभिमान. तो जेव्हा अधिकारी झाला होता तेव्हा संपूर्ण गावाला त्याचा आनंद झाला होता . त्याचाही गावावर खूप जीव . गावाच्या आठवणीत तो खूप रमायचा . गावातून कोणीही मुंबईत गेलं की त्याचं आपुलकीने सारं काही करायचा.  अलीकडे काही वर्षात हृदयविकाराचा त्रास सुरु झाल्यानंतर त्याने घरच्यांना सांगून ठेवले होते .’ मला काही झाले तर माझे सगळे अंतिम विधी गावातच पूर्ण करायचेत’. दुर्दैवाने लॉकडाऊन काळात त्याचं निधन होतं. घरची मंडळी त्याची अंतिम इच्छा पूर्ण करण्यासाठी त्याचे शव घेवून कसेतरी गावात पोहचतात. मात्र गावकऱ्यांनी कोरोनाची एवढी भीती घेतली असते की ते त्यांचे अंतिम क्रियाकर्म गावात करू देण्यास सपशेल नकार देतात. गावाच्या कर्तबगार पोरावरील प्रेमापेक्षा भीतीचा विषाणू अधिक प्रबळ ठरतो. गावाच्या वेशीवरूनच त्यांना परत पाठविण्यात येते. पाणावलेल्या डोळ्यांनी घरची मंडळी जवळच्याच काकाच्या गावात अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतात . पण दुर्दैव पाठ सोडायला तयार नसते. तिथेही तोच अनुभव येतो . शेवटी पोलिसांच्या मदतीने यवतमाळात त्याला अखेरचा निरोप देण्यात येतो.

…………………………………………………

… ३….

ती केवळ १२ वर्षाची . छत्तीसगडच्या बिजापूर जिल्ह्यातील. आपल्या शेतमजूर आई-वडिलांसह नजीकच्या तेलंगणात शेतमजुरीसाठी आलेली. लॉकडाऊन होताच आठ दिवसातच शेतमालक मजुरी देण्यास नकार देतो. झोपडीत असलेले तांदूळ व ज्वारी पाच –सहा दिवसांच्या वर पुरणार नाही हे लक्षात येताच हे कुटुंब छत्तीसगडमध्ये परत जाण्याचा निर्णय घेते. तोपर्यंत वाहतुकीची सगळी साधनं बंद झाली असतात. तिचे आई- वडिल पायीच निघण्याचा निर्णय घेतात. झोपडीत असलेलं धान्य एका बोचक्यात बांधून ते गावाकडे निघतात. २०० किलोमीटरचे अंतर पाच –सात दिवसात पार करू, हा विश्वास त्यांना असतो . त्या चिमुकलीला लॉकडाऊन किंवा इतर परिस्थितीचं काही नसतं. तिला आपल्या गावातील मैत्रिणींना भेटण्याची ओढ लागली असते . ते निघतात. रस्त्यात जिथे कुठे विहीर वा नदी लागेल तिथे स्वयंपाक करतात. जिथे पाठ टेकवायला जागा मिळेल तिथे मुक्काम करतात. सहा दिवस असे निघून जातात. दरम्यान उन चांगलच तापायला लागलं असतं. पारा ४२ वर पोहोचला असतो. पण आता गाव जवळ आलं असतं . ते सगळेच गावाच्या ओढीने भराभर पावलं टाकत असतात. एकाएकी ती अचानक कोसळते. काही क्षणातच ती दम तोडते.

….ती जिथे जीव सोडते तिथे तिचं गाव १४ किलोमीटर असल्याचा फलक असतो.

…………………………………………………

… ४….

तो चंद्रपूरचा . मुंबईजवळच्या पनवेल येथे मजुरी करायचा . लॉकडाऊन घोषित झालं आणि हातातील काम गेलं. तेव्हा त्याच्याजवळ ५००० रुपये जमा होते. पुढील सात – आठ असेच गेले.  पैसेही संपत गेले. लॉकडाऊन लांबलं तर आपल्याजवळ असलेले तुटपुंजे पैसे पुरणार नाही हे लक्षात येताच तो गावाकडे जाण्याचा निर्णय घेतो . रेल्वे –बसेस बंद झाल्या असतात. पायी जाण्याशिवाय पर्याय नसतो . ८५० किलोमीटरचे अंतर पायी कापण्याचा निर्धार करत तो प्रवासाला सुरुवात करतो. जवळपास १५-२० दिवस पैसे पुरावेत म्हणून तो बिस्कीटचे पुडे तेवढे सोबत घेतो. २ एप्रिलला पहाटे ५ वाजता पनवेलवरून तो रेल्वे रुळावरून पुण्याकडे निघतो. रात्री १२ च्या सुमारास पुण्यात पोहोचतो . तिथे रेल्वे रुळाच्या बाजूला उघड्यावर झोपतो . दुसऱ्या दिवशी अहमदनगरकडे निघतो. एक दुचाकीस्वार जवळपास चाळीसेक किलोमीटर अंतर पार करून देतो. त्यानंतर ४ एप्रिलला भीमा –कोरेगाव करत ५ तारखेला औरंगाबादला पोहोचतो. त्यानंतर पुढचा आठवडा जालना-सिंदखेडराजा- वाशीम- कारंजा – दारव्हा –यवतमाळ असा प्रवास करतो. रस्त्यात ठिकठिकाणी असलेला पोलीस पहारा चुकविण्यासाठी आडमार्गाने तो प्रवास करतो. यवतमाळहून उमरी मार्गे तो आपल्या जिल्ह्याच्या सीमेवर पोहचतो. प्रवासाने प्रचंड थकवा आला असला तरी काही तासातच आपण आपल्या घरी पोहोचण्याचा आनंद मनात ओसंडून वाहत असतो. त्या आनंदात तो मित्राला मोबाईल करून आपण येत असल्याची माहिती देतो. मित्र ही माहिती पोलिसांना देतो. पोलीस त्याला यवतमाळ- चंद्रपूरची सीमा असलेल्या घुग्गुस येथे ताब्यात घेतात आणि थेट रुग्णालयात नेतात . तिथे त्याला आता विलगीकरण कक्षात ठेवण्यात येते . घराच्या ओढीने निघालेला तो आता आपला क्वारंटाइन कालावधी संपण्याची वाट पाहतो आहे.

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे संपादक आहेत)

8888744796

Previous articleग़म बढ़े आते हैं…
Next articleमकबूल, तू हमेशा याद रहेगा!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here