मकबूल, तू हमेशा याद रहेगा!

-सानिया भालेराव

‘इरफान खान’ म्हटलं की काय आठवतं? चेहेऱ्याच्या मानाने भले मोठ्ठे असणारे त्याचे डोळे, त्याचा डाऊन टू अर्थ ऍटिट्यूड, आपण वेगळे आहोत हे स्ट्रगलच्या काळात सतत स्वतःला सांगून स्वतःवरचा विश्वास तगवून ठेवणं, लहानपणी सिनेमा काय आहे हे माहित नसूनही आणि स्वतःच्या दिसण्याबाबत प्रचंड गंड असूनही अँग ली ते अनीस बज़्मी या रेंजमध्ये काम करणारा ऍक्टर… न्यूरोएन्डोक्राईन ट्युमर डिटेक्ट झाल्यावर २०१८ पासून इरफान खान ट्रीटमेंट घेत होता.. आज त्याचं निधन झालं हे ऐकलं आणि सुन्न व्हायला झालं. या माणसात इतकं प्रचंड टॅलेंट होतं.. त्याचा प्रत्येक पिक्चर पाहून असंच वाटायचं की अरे अजून काहीतरी भन्नाट यायचं आहे. इरफानचे पिक्चर आठवायचे झाले तर सुरवात कुठून करावी हेच कळत नाही. ‘नेमसेक’, ‘मकबूल’, ‘पान सिंग तोमर’, ‘लाईफ ऑफ पाय’, ‘लंचबॉक्स’, ‘पिकू’, ‘ब्लॅकमेल’, ‘सलाम बॉम्बे’… की त्याच्या सुरवातीच्या काळातल्या टेलिव्हिजन सिरीयल आठवू.. ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांता’.. या माणसाचा ग्राफ पहिला की आश्चर्यचकित व्हायला होतं.

इरफान एका ठिकाणी म्हणाला होता की इंडस्ट्रीमध्ये मोठ्या स्टार्सना जे अनन्य साधारण महत्व मिळतं, म्हणजे अगदी इंट्रेस्टिंग दिग्दर्शक सुद्धा असं म्हणतात की यार पुढच्या पिक्चरच्या वेळी एखाद्या मोठ्या स्टारला घेऊया.. अशा वेळी खूप हेल्पलेस वाटायचं. . आपल्या जुन्या दिवसांबाबत इरफान एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता की ‘मी टेलिव्हिजनमध्ये काम करत असतांना माझ्या बरोबरीचे कलाकार, ज्युनियर्स यांना सिनेमात कामं मिळायची हे पाहून मला खूप इर्षा व्हायची कारण मी फक्त एका मिनिटासाठी सिनेमात काम काम मिळावं म्हणून तेव्हा झटत असे. पण कालांतराने हे समजत गेलं की फाईट बॅक करण्यापेक्षा आणि दुसऱ्याच्या जागेत शिरण्यापेक्षा आपण स्वतःची अशी एक जागा निर्माण करू शकतो. मला हे उमजत गेलं की मला एका पिक्चरमध्ये एखाद्या दिग्दर्शकाने मला घेतलं आणि त्याच्या पुढच्या फिल्ममध्ये नाही घेतलं तरीही मी नाराज होता कामा नये. ही माझी अशी स्वतःची जर्नी आहे.’

इरफान खान हा एकच असू शकतो कारण कित्येक वर्ष स्ट्रगल करूनही त्याने त्याच्यातला ऍक्टर जिवंत ठेवला होता. चित्रपट हे विकण्याचं प्रोडक्ट नाहीये असं छातीठोकपणे सांगू शकणारा इरफान सारखा विरळाच. त्याच्या बोलण्यात पण एक प्रचंड नॅचरल कॉमिक टाईमिंग होतं. नॅचरल ऍक्टिंग हा जो काही रेअर प्रकार आहे त्यात इरफानचा हात धरणारं कोणीही नाही. इरफान खऱ्या अर्थाने पान सिंग तोमर होता असं मला कायम वाटतं. खराखुरा हिरो. माणसाच्या आयुष्यातला स्ट्रगलचा काळ जितका मोठा असतो तो तितका जास्त कडवट होत जातो मोस्टली. पण इरफान म्हणायचा, ‘माझ्याकडे हरण्यासारखं काहीही नव्हतं. त्यामुळे मी चालत राहिलो. मला स्वतःच काम फार आवडलं नाही. मला सतत असं वाटतं की मी यापेक्षा अजून जास्तं चांगलं काम करू शकतो.. कदाचित हे असं वाटणं हेच इरफानच्या वेगळेपणाचं कारण असू शकतं.’

इरफानला त्याचा ड्यू तसाही फार उशिरा मिळाला होता.. मग त्याला इतक्या लवकर का एग्झिट घ्यावी लागली याचं उत्तर काही केल्या मिळत नाहीये. एखाद्यामध्ये प्रचंड टॅलेंट असावं, आपल्यात काहीही टॅलेंट नाहीये असे टोकाचे विचार मनात येतील असे सतत त्याच्या आयुष्यात प्रसंग यावे, त्याने निकराने तरीही वाट काढत चालत राहवं, खूप खूप चालून, पायाचे तुकडे पाडून, टक्के टोणपे खात त्याला तगायला सरते शेवटी काडीचा आसरा मिळावा आणि मग आपल्या अंगी असलेल्या ऍक्टिंगच्या जोरावर त्याने त्या काडीचं मोठं जहाज बनवावं.. आता त्या जहाजात थोडं रिलॅक्स होऊन सफर करावी, अजून मोठे मोठे आराखडे आखावे असे दिवस यायला घातल्यावर नियतीने क्रूरपणा का करावा? आता या “का” ला उत्तर नाहीच. एखादा माणूस जावा आणि लोकांना आतून हळहळ व्हावी कदाचित हीच इरफानची कमाई.

इरफान.. तू केलेले रोल्स डोळ्यासमोरून जात आहेत. अगदी ‘बनेगी अपनी बात’ मधला कुमार, ‘द नेमसेक’ मधला अशोक, ‘लाईफ इन मेट्रो’ मधला कोकनाला गच्चीवर घेऊन जाऊन ओरडून सगळं फ्रस्ट्रेशन बाहेर काढून टाक असं सांगणारा मॉन्टी, ‘लंचबॉक्स’ मधला शांत, समजूतदार फर्नांडिस, ‘थँक यू’ मधला आचरट विक्रम, ‘पान सिंग तोमर’ मधला द पान सिंग, नासिरुद्दीन शहा,पंकज कपूर यांच्यासमोर छातीठोकपणे उभं राहून त्यांच्यावर सुद्धा प्रभावी ठरणारा मकबूल, ‘लाईफ ऑफ पाय’ मधला अत्यंत सटल असा पाय, ‘हैदर’ मधला रुहदार, ‘पिकू’ मध्ये अमिताभ बरोबरीने सरस वाटणारा राणा, ‘ब्लॅकमेल’ मध्ये मॅड काम करणारा देव, ‘हिंदी मिडीयम’ मधला वॉना बी कुल राज, ‘करीब करीब’ मधला योगी.. काय काय आठवू… तुझ्या कित्येक पिक्चरचे डायलॉग तोंडपाठ आहेत. तू आता कुठे मस्त मुरत होतास.. कसा काय गेलास असा?

Everyone is replaceable..हे वाक्य मी कोळून प्यायले आहे पण तरीही असं वाटतं की तू कधीही रिप्लेस होऊ शकणार नाहीयेस.. तुझ्यासारखा दुसरा कोणीही असू शकणार नाहीये. आता ही पोकळी भरून निघू शकणार नाही हे वाक्य तूझ्या जाण्याने तुझ्यावर प्रेम करणाऱ्या माझ्यासारखे तमाम सिनेप्रेमी अनुभवतील.. तुझे डोळे काहीसे मोठे, विचित्र आकाराचे… त्यात नेहेमीच काहीतरी ओसंडून वाहतं आहे असं वाटायचं.. त्यात पैसे कमवण्याचा, नाव, प्रसिद्धी कमवण्याचा हव्यास नव्हता.. अजून काहीतरी चांगलं काम करण्याची इच्छा वाहत असायची.. स्वप्नं बघणं, त्यासाठी मेहनत करणं, आपण कुठूनही आलो असोनात का.. जिथे जायचं आहे त्यासाठी मन लावून काम केलं तर पोहोचू शकतो हा विश्वास तू देऊन गेला आहेस. माणूस कशाने मोठा आहे असं समजलं जातं हे मला ठाऊक नाही. पैसा, प्रसिद्धी ही त्याची मोजमापं नाहीत. पण तो नाहीये आता. त्याची आठवण काढणारे जीव.. त्यांच्या प्रेमातून नक्कीच हे उमजू शकतं. क्राफ्टवर प्रेम करणारी तुझ्यासारखी माणसं मरत नाहीत इरफान.. ती आपल्या कामातून जिवंत राहतात. तू लढलास.. नियतीमध्ये जे लिहिलं होतं त्याविरुद्ध… तू राहशील आमच्यामध्ये कायम.. तू जे जगलास त्यातून काही घेता आलं आम्हाला, माणूस म्हणून स्वतःत बदल करता आले तर जिवंत आहेस तू असं समजू आम्ही.

‘लाईफ ऑफ पाय’ मध्ये तुझा एक डायलॉग आहे इरफान.. ‘I suppose, in the end, the whole of life becomes an act of letting go, but what always hurts the most is not taking a moment to say goodbye.’ तू म्हणतोस त्यात की ‘सरतेशेवटी, हे उमजतं की आयुष्याचं सार म्हणजे सोडून देणं, जाऊ देणं… पण सगळ्यात जास्त त्रास तेव्हा होतो जेव्हा तुम्हाला शेवटचा निरोप घेण्यासाठी साधा एक क्षण सुद्धा मिळत नाही’.. हे आहे खरं पण काही लोक इतके स्पेशल असतात की त्यांना अलविदा म्हणता येत नाही… भेटत राहीनच तुला.. मकबूल.. तू मेरी जान है… और रहेगा हमेशा …

[email protected]

Previous articleकाळीज पिळवटून टाकणाऱ्या ‘लॉकडाऊन कथा’
Next articleडॉ. एलिसा ग्रॅनॅटो: कोरोना विषाणूची लस टोचून घेणारी महिला
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here