डॉ. एलिसा ग्रॅनॅटो: कोरोना विषाणूची लस टोचून घेणारी महिला

–  नितीन पखाले

कोरोना लस प्रायोगिक तत्वावर टोचून घेणारी जगातील पहिली मानवप्राणी म्हणून डॉ. एलिसा ग्रॅनॅटो यांच्या नावाची इतिहासात नोंद झाली आहे. तिच्या ३२ व्या वाढदिवशी तिने ही लस टोचून घेतली. व्यवसायाने सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ असलेली एलिसा म्हणते, ‘मी स्वतः वैज्ञानिक असल्याने कोरोना विषयातील वैद्यकीय संशोधनात सहभागी होण्याचा मला आनंद आहे. यात जर यश मिळाले तर ती संपूर्ण मानवजातीसाठी आनंदाची गोष्ट असेल.’

……………………………………………………………………

कोरोना लसीची अशी ही कहाणी !

जगावर कोरोना विषाणू संसर्गाचे संकट भविष्यात किती काळ घोंघावत राहील, हे अद्याप अनिश्चित आहे. या भयग्रस्त वातावरणात कोरोनाची लस कधी येणार आणि आपली या विषाणूच्या व त्यामुळे सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’च्या तावडीतून सुटका कधी होणार, हा प्रश्न सर्वांनाच भेडसावतोय. कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूवर विकसित होत असलेल्या लसीची मानवावर होणाऱ्या परिणामांची जगाला उत्सुकता लागली आहे. तर ही लस सर्वप्रथम स्वत:च्या शरीरात टोचून घेण्यासाठी पुढे आलेली ऑक्सफर्ड विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. एलिसा ग्रॅनॅटो हिच्या मृत्यूच्या वावड्या उठविण्यापर्यंत चाललेल्या हरकतींमागे राजकारण आहे की, फार्म्यासिट्युकल्स आणि वैद्यकीय संशोधन क्षेत्रातील अर्थकारण? ही लस तयार करण्यात भारत, अमेरिका आघाडी घेणार की चीनच यावर उपाय शोधणार? ही लस तयार कशी होते, ती बाजारात कधी येईल, तिची किंमत किती असेल, त्यामुळे कोरोनाचे जगातून उच्चाटन होईल का, असे अनेक प्रश्न सर्वसामान्यांना पडले आहेत.

सध्या कोरोना प्रतिबंधासाठी प्रत्येक देशात वेगवेगळी उपचार पद्धती वापरली जात आहे. भारतात एचआयव्ही, मलेरिया, बीसीजी आदी लसी वापरल्या जात आहे. मात्र प्रत्येक देशाने वापरलेल्या उपलब्ध औषधींचा रिझल्ट कुठेही परिणामकारक आढळला नाही. त्यामुळे कोरोनाची लस आल्याशिवाय या जीवघेण्या आजारातून मानवाला मुक्ती नाही. अर्थात ही लस आल्यानंतरही कोरोनाचे संपूर्ण उच्चाटन होईल, याची शाश्वती नाही. कारण येणारा काळ हा विविध विषाणूजन्य साथरोगांचाच असणार आहे. कदाचित कोरोनावर लस आल्यानंतर अन्य कोणता विषाणू जगावर हल्ला करेल, हे सध्यातरी सांगता यायचे नाही.

जगभरात संशोधनात यशापयश

सध्या जगभरातल्या वैद्यकीय संशोधन संस्था कोरोना लसीवर संशोधन करीत आहेत. या कामी अनेक देशातील शेकडो संस्था लागल्या आहेत. भारतासह, अमेरिका, चीन, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आदी देशांमध्ये कोरोना विषाणूवरील लसींचे संशोधन टप्प्यात आले आहे. अर्थात या संशोधनाचे मानवी शरीरावर काय परिणाम होतील, हे प्रयोगाअंतीच स्पष्ट होणार आहे. अमेरिकेत कोरोनाने पन्नास हजारांवर बळी घेतल्याने हा प्रगत देश हादरला आहे. त्यामुळे कोरोनाच्या उच्चाटनासाठी लस निर्मितीचा पहिला प्रयोगही अमेरिकेतच झाला आहे. अमेरिकेतील सीएटलमधील शास्त्रज्ञांनी संशोधित केलेल्या लसीचे कुठल्याही प्राण्यांवर प्रयोग न करता थेट माणसांवर ते सुरू केले. ऑस्ट्रेलियात सध्या प्राण्यांवर प्रयोग सुरू असून या महिनाअखेर त्यांनी शोधलेल्या लसीचे मानवावर प्रयोग होण्याची शक्यता आहे. चीनमध्ये ‘रेमेडिव्हिर’ नामक अँटिव्हायरल औषधाची वैद्यकीय चाचणी नुकतीच करण्यात आली, पण ती अयशस्वी ठरली. आपल्या भारतातही विविध सहा कंपन्या कोरोना लसीवर संशोधन करीत आहे. कोरोनाने शक्तीहीन झालेल्या अमेरिकेस भारताने हायड्रोक्सीक्लोरोक्वीनच्या गोळ्या पाठविल्यापासून कोरोनाच्या संशोधनाला भारतातूनच बळ मिळेल, हा विश्वास जगभरातून व्यक्त होत आहे. मात्र या गोळ्यांचा कोरोना रूग्णांवर विशेष फायदा न झाल्याने अमेरिका सध्या भारताच्या नावाने शंख करीत आहे. असे असले तरी अमेरिकेचे परराष्ट्र सचिव माईक पाँपेओ यांनी अमेरिका आणि भारत संयुक्तपणे कोरोना विषाणूवर लस बनिवण्याचे काम करीत असल्याचे जाहीर केले. त्यामुळे या दोन देशांमधील भविष्यातील संबंध कसे राहू शकतात, याचे चित्रही बऱ्यापैकी स्पष्ट झाले.

महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट

या सर्व प्रयोगात महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब म्हणजे, जगातील सर्वाधिक लसी आणि औषधांच्या शोधांचा अनुभव असलेल्या पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही कंपनी अमेरिकेतील कोडॅजेनिक्स, इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर कोरोना लसीवर काम करीत आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाबरोबर कंपनीने उत्पादन करारही केला आहे. मे महिन्यापासून पुण्यातील प्रकल्पात या लसीचे प्रत्यक्ष उत्पादन आणि क्लिनिकल ट्रायल एकाच वेळी सुरू होईल, असे सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदार पुनावाला यांनीही स्पष्ट केले. जगाच्या तुलनेत भारतात या लसीची किंमत सामान्यांना परवडणारी म्हणजे एक हजार रूपयांच्या घरात राहणार असल्याचे संकेतही ‘सीरम’ने दिले आहेत. वैद्यकीय चाचणीनंतर सीरम इन्स्टिट्यूटने तब्बल चार कोटी डोजेसच्या निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. तर हैद्राबाद येथील भारत बायोटेक या कंपनीनेही अमेरिकेतील काही कंपनींबरोबर कोरोना लसीच्या संशोधनासाठी टायअप केले आहे.

डॉ. एलिसा ग्रॅनॅटो- दि ग्रेट

कोरोनाचा उद्रेक झाल्यापासून त्यावर लस संशोधनाचे काम जगभर जोरात सुरू असताना गेल्या आठवड्यात या संशोधनाकडे नागरिकांचे विशेष लक्ष वेधेले गेले ते, इंग्लंडमधील ऑक्स्फर्ड विद्यापीठातील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ डॉ. एलिसा ग्रॅनॅटो यांनी स्वत:च्या शरीरात ही लस टोचून घेतल्यानंतर. कोरोना लस प्रायोगिक तत्वावर टोचून घेणारी जगातील पहिली मानवप्राणीम्हणून डॉ. एलिसा ग्रॅनॅटो यांचे नाव इतिहासात नोंद झाले. ऑक्सफर्ड विद्यापीठात त्यांच्यासह आणखी एका व्यक्तीवर या लसीचा प्रयोग करण्यात आला. या दोघांवरील लसीच्या परिणामानंतर इंगल्ंडमध्ये आणखी ८०० लोकांवर हा प्रयोग केला जाणार आहे. यापैकी काही लोकांना कोरोनाची तर काही लोकांना मेनिंजायटिस (मेंदूज्वर)ची लस दिली जाणार आहे. त्यातून येणाऱ्या परिणामांवर कोरोना लसीच्या यशापयशाचा निष्कर्ष काढला जाईल. गेल्या आठवड्यात गुरूवारी डॉ. एलिसा यांना ही लस टोचल्यानंतर या प्रयोगामुळे त्यांचा मृत्यू झाल्याची बातमी सोशल मीडियावर पसरली. अखेर यावर ब्रिटन सरकारला खुलासा देऊन डॉ. ग्रॅनॅटो यांच्या मृत्यूची बातमी ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट करावे लागले. डॉ. एलिसा ग्रॅनॅटो यांची प्रकृती लस टोचल्यानंतरही उत्तम असल्याचे ब्रिटन सरकारने म्हटले आहे. सोशल मीडियावर डॉ. एलिसा यांच्या मृत्यूची अफवा मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यामुळे या प्रयोगाच्या विश्वसनीयतेबद्दल जगभरात विविध तर्क विर्तक लावले जाऊ लागले. या अफवेमुळे हा प्रयोग करून जगातील करोडो माणसांचं जगणं सुसह्य करू पाहणाऱ्या शास्त्रज्ञांचं मनोबल खच्ची होऊ नये म्हणून अखेर डॉ. एलिसा यांनीच प्रकट होत स्वत: एक ट्विट करून आपल्या मृत्यूच्या अफवेबद्दल खुलासा केला आहे. या संदेशात त्या म्हणतात, ‘स्वत:च्याच मृत्यूची खोटी बातमी ऐकण्यासारखे दुसरे गमतीदार काही नाही. कोरोना लस टोचल्यानंतर प्रत्यक्षात मी ठणठणीत आहे. मला काहीही झालेले नाही.’ ऑक्सफर्डच्या कोरोना लस निर्मिती गटाने सप्टेंबरपर्यंत ही लस प्रत्यक्ष उपलब्ध करून देण्याचे ठरविले आहे.

लस कशी काम करणार?

मानवी शरीरात डब्ल्यूबीसी आणि आरबीसी अर्थात पांढऱ्या पेशी आणि लाल रक्तपेशी असतात. यात पांढऱ्या पेशी रोग प्रतिकारकशक्तीमध्ये महत्वाची भूमिका बजावतात. कोणतीही लस तयार करताना अत्यंत कमी प्रमाणात मानवी शरीरात विषाणू सोडण्यात येतो. शरीरातील संरक्षण प्रणाली या विषाणूसोबत कसे लढायचे याचे धडे शरीराला देते. आपण काट्याने काटा काढणे म्हणतो, तसला हा प्रकार. बहुतांश लसींमध्ये संबंधित विषाणूंचाच वापर केलेला असतो. कोरोना संदर्भात प्रचलित संशोधनासोबतच काही शास्त्रज्ञ मात्र जेनेटिक कोडद्वारे लस बनविण्याची पद्धत वापरत आहे. कोरोनाच्या जेनेटिक कोडचा वापर करून ही लस बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र अद्याप याचे परीक्षण व्हायचे आहे.  कोरोना विषाणू एखाद्या फुटबॉलला कंगोरे फुटल्याप्रमाणे दिसतो. शास्त्रज्ञांनी या विषाणूच्या पृष्ठभागावरील गुणसूत्र काढून ती एका निरूपद्रवी विषाणूमध्ये सोडून त्यावर संशोधन सुरू आहे. शरीरात हा विषाणू लसीद्वारे सोडला म्हणजे पुढल्या वेळी या विषाणूने पुन्हा हल्ला केला तरी त्याच्यासोबत टक्कर देण्यासाठी शरीरातील स्वसंरक्षण यंत्रणा तत्पर राहिल, असा विश्वास संशोधक व्यक्त करीत आहेत.

लस उपलब्धीबाबत अनिश्चितता

कोरोना लसीवर सर्वत्र संशोधन सुरू असले तरी ती प्रत्यक्षात बाजारात कधी उपलब्ध होईल, याबद्दल खुद्द संशोधकांमध्येही एकमत नाही. ही लस बाजारात प्रत्यक्ष येईपर्यंत सहा महिने, वर्ष किंवा दीड वर्षांचांही कालावधी लागू शकतो, असे शास्त्रज्ञ सांगतात. ब्रिटनमध्ये मानवी शरीरात या लसीचा पहिला प्रयोग झाला असला तरी सध्याच्या घडीला तो ‘प्रयोग’च आहे. त्याची कोरोनावर मात करण्याची उपलब्धता, सुरक्षितता सिद्ध झालेली नाही. वैद्यकीय चाचण्या, विविध क्लिनिकल चाचण्या, प्राण्यांवरील चाचण्या, मानवांवरील प्रायोगिक चाचण्या अशा अनेक पातळींवरून या लसीचा प्रवास होत आहे, होणार आहे.   जगभरात ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ (प्रवृत्ती नव्हे) असल्याने प्रत्येकालाच ही लस मानवेल असेही नाही. त्यामुळे ही लस टोचल्यानंतर व्यक्तीच्या आरोग्यावर अनय्‍ वाईट परिणाम होणार नाहीत, याचीही काळजी घ्यावी लागणार आहे. जगभरातील विविध देशांतील औषधी प्रमाणीकरण संस्थांनी या लशीस मान्यता देणेही महत्वाचे राहणार आहे. प्रत्येक देशातील आरोग्य विषयक सुरक्षेची मानके वेगवेगळी आहेत. त्यामुळे कुठेही तयार होणारी एकच लस जगात सर्वत्र वापरली जाईल, अशा सामाईक पद्धतीने ती तयार करणे, हे लस बनविण्यापेक्षाही मोठे आव्हान संशोधकांसमोर आहे. त्यामुळे लस उपलब्ध होण्याचा कालावधी सध्या अनिश्चित असल्याने जागतिक आरोग्य संघटनेसह शासनाने आपल्याला सुरक्षिततेचे जे नियम घालून दिले आहेत, त्याचे काटेकोर पालन करा. वारंवार साबणाने हात स्वच्छ धुवा, बाहेर पडताना तोंडाला मास्क बांधा आणि हो घरात आणि घराबाहेरही वावरताना ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ (सोशल डिस्टन्सिंग या शब्दाला WHO ने आता ‘फिजिकल डिस्टन्सिंग’ हा पर्यायी आणि उचित शब्द सुचविला आहे) पाळा. सध्यातरी कोरोनाच्या तडाख्यातून बचावासाठी हाच खात्रीशीर उपचार आहे.

(लेखक ‘लोकसत्ता’ चे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आहेत)

९४०३४०२४०१

Previous articleमकबूल, तू हमेशा याद रहेगा!
Next articleग्रीष्मकळा…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here