भारताच्या फाळणीला आणखी दोन वर्षाने ७५ वर्ष पूर्ण होतील. या एवढ्या वर्षात भारत- पाकिस्तानमध्ये चार युद्धे झालीत. दोन्ही देशांनी अनेकदा राजकीय,व्यावसायिक संबंध संपवलेत. मात्र दोन्ही देशातील सामान्य जनतेला एकमेकांविषयी कमालीचं आकर्षण आहे .सना अमजद या पाकिस्तानी तरुणीच्या भारताबद्दल चर्चा घडवून आणणाऱ्या You Tube चॅनेलच्या लोकप्रियतेतून हेच आकर्षण अधोरेखित होते.
………………………………………………………………………
सना अमजद…ही २४ वर्षीय तरुणी पाकिस्तानातील लोकप्रिय You Tuber आहे. हिच्या यूटय़ूब चॅनेलचे वैशिट्य म्हणजे त्यावरील बहुतांश कार्यक्रमांचा केंद्रबिंदू हा ‘भारत’ असतो. पाकिस्तानच्या वेगवेगळ्या शहरातील रस्ते, फूटपाथ, मार्केट, बगिचे, मॉल आदी सार्वजनिक ठिकाणांवर जाऊन ती तेथील तरुणाईला बोलतं करते. सनाचा स्टुडिओबाहेरचा हा Street Chat Show वेबच्या दुनियेत चांगलाच लोकप्रिय आहे. तिचा प्रत्येक शो काही लाख लोक पाहतात. आतापर्यंत जवळपास ४.७१ कोटी लोकांनी तिच्या यूटय़ूब चॅनेलला भेट दिली आहे. तिच्या प्रत्येक व्हिडीओवर हजारो लोक प्रतिक्रियाही नोंदवितात. हे चॅनेल Subscribe करणाऱ्यांची संख्या साडेतीन लाखाच्या घरात आहे. विशेष म्हणजे तिच्या यूटय़ूब चॅनेलच्या चाहत्यांमध्ये भारतीयांचीही संख्या मोठी आहे.
सना अहमदच्या शोचे विषय इंटरेस्टिंग असतात. नरेंद्र मोदी आणि इम्रान खान यांच्यात मजबूत नेता कोण? पाकिस्तानातील शिक्षण पद्धती चांगली की भारताची? मजबूत देश कुठला…भारत की पाकिस्तान? भारतातील बॉलीवूड बेस्ट की पाकिस्तानातील लॉलीवूड? शिक्षण, अर्थव्यवस्थेत भारत पुढे की पाकिस्तान? भारताची रेल्वे आधुनिक की पाकिस्तानची? असे अनेक विषय ती चर्चेसाठी घेते. तिच्या या थेट प्रश्नांना जी उत्तरं मिळतात ती पाकिस्तानी जनतेबद्दलच्या आपल्या धारणांना धक्का देणारी असतात. पाकिस्तानची बहुतांश जनता धर्मांध आहे, एकांगी आहे, भारताचा ते द्वेष करतात अशी आपली समजूत असते. मात्र सनाच्या प्रश्नांना मिळणारी उत्तरं ऐकली, की आश्चर्याचा धक्का बसतो आणि चकितही व्हायला होतं.
पाकिस्तानच्या तरुणाईला भारताची भरपूर माहिती आहे, हे सना अहमदचा शो पाहिला की लक्षात येतं. तेथील तरुणांना नरेंद्र मोदी आवडत नसले, तरी इम्रान खानच्या तुलनेत ते मजबूत नेता आहेत. त्यांचे इरादे भक्कम आहेत. ते सुनियोजित पद्धतीने भारताची जगातील प्रतिमा मोठी करत आहेत. उच्चशिक्षित इम्रान खान मेहनत भरपूर करत असले, त्यांचे इरादे चांगले असले, तरी पाकिस्तानातील भ्रष्टाचार कमी करण्यात ते अपयशी ठरले, असे तेथील तरुण सांगतात. भारताचे मोदींच्या अगोदरचे पंतप्रधान व नेत्यांनी केलेली पायाभरणी मोदींच्या कामी येत आहे . याउलट इम्रान खानला भ्रष्टाचार आणि अव्यस्थेनेने पोखरलेली व्यवस्था मिळाली, असे अभ्यासू मत तेथील तरुण नोंदवतात.
शिक्षण, तंत्रज्ञान, आयटी, वैद्यकीय क्षेत्र, चित्रपट या क्षेत्रात आपण भारताच्या खूप मागे आहोत, हे पाकिस्तानचे तरुण प्रांजळपणे कबूल करतात. भारतीय तरुण जगाच्या कानाकोपऱ्यात आपल्या बुद्धीची चमक दाखवत आहेत. ‘गुगल’, ‘फेसबुक’, ‘नासा’ , ‘मायक्रोसॉफ्ट’ अशा प्रतिष्ठित संस्थात भारतीयांनी झेंडे रोवले आहेत, याची माहिती पाकिस्तानी युवकांना आहे. भारतातील लोकशाही, नियमित निवडणुका होणारी राज्यव्यवस्था, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य, खुलेपणा या गोष्टींमुळे भारत पाकिस्तानच्या खूप पुढे गेला आहे, हे पाकिस्तानच्या तरुणाईचे आकलन त्यांची समज लक्षात आणून देते. भारतातील चांगल्या व वाईट गोष्टी कुठल्या, असा थेट प्रश्नही सना अहमद त्यांना विचारते. भारतातील लोकशाही, हवं ते बोलण्याचं स्वातंत्र्य, ताजमहाल, फिल्म इंडस्ट्री, आयटी इंडस्ट्री, बॉलीवूडच्या नट-नट्या, विविधांगी संस्कृती पाकिस्तानच्या तरुणांना खुणावतात. मात्र भारतात श्रीमंत आणि गरीबांमध्ये असलेली मोठी दरी, विषमता, जातिव्यवस्था, काश्मिरच्या जनतेवर भारत करत असलेले अत्याचार आणि भारताचा मीडिया या भारतातील वाईट गोष्टी असल्याचे तेथील तरुण सांगतात. भारतापासून काही मागायचं असल्यास काश्मीर, ताजमहाल, शाहरुख खान, आमिर खान, आलिया भट्ट, श्रद्धा कपूर … आणि काही द्यायचं असल्यास नवाज शरीफ आणि इतर भ्रष्टाचारी नेते, असे नमुनेदार उत्तरं तेथील तरुण देतात. (पाकिस्तानने भारतीय चित्रपटांवर बंदी आणली असली तरी पाकिस्तानी तरुणांची पहिली पसंती भारतीय चित्रपटांनाच आहे. वेगवेगळ्या मार्गाने ते हे चित्रपट मिळवितात. भारतीय सिनेमातील गाणे, डॉयलॉग त्यांना तोंडपाठ असतात) भारतात फिरायला जाण्याची संधी मिळाल्यास राजधानी दिल्ली, फिल्म इंडस्ट्री असलेली मुंबई, मुघल वास्तुकलेची केंद्र असलेली शहरे, व गोव्याचे समुद्रकिनारे पाहायला आवडेल, असे तेथील तरुणाई सांगते.
सना अहमद पाकिस्तानच्या तरुणींना, तुम्हाला विराट कोहली सोबत डेटवर जाण्यास आवडेल की पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमसोबत, असा प्रश्न करते तेव्हा अधिकांश तरुणी अजिबात चिंता न करता विराट कोहलीचं नाव घेतात. पाकिस्तान महिला क्रिकेट संघातील खेळाडूंनाही विराटच हवा असतो. तेथील युवा वर्गात विराट चांगलाच लोकप्रिय आहे. त्याची स्टाईल, आत्मविश्वास ‘बहोत कमाल का है’, ’उसको देखके दिल खुश होता है’ , असे उत्तरं त्यांच्याकडून येतात. तेथील तरुणाईत विराटची प्रचंड क्रेझ आहे. तुम्हाला भारत आणि चीन या दोन देशांपैकी कुठल्या देशातील तरुणासोबत लग्न करायला आवडेल, या प्रश्नाच्या उत्तरातही पाकिस्तानी तरुणी भारतालाच पसंती देतात. भारताची व आपली संस्कृती एक आहे. भारत व पाकिस्तानातील तरुणांचं रंगरूप जवळपास सारखं असतं. चीनच्या तरुणांसोबत लग्न करायला कोणालाही मनापासून आवडणार नाही. चीनच्या खाण्या पिण्याच्या सवयीही विचित्र आहे. त्यामुळे दोनच पर्याय असतील, तर भारतातील मुस्लीम तरुणांसोबत आपण लग्न करू, असे तेथील तरुणी सांगतात.
सना अहमदच्या प्रत्येक शोमध्ये या पद्धतीच्या विषयांवर चर्चा घडवून आणली जाते. या चर्चेतून पाकिस्तानातील युवकांचं भारताबद्दलचं आकर्षण ठळकपणे लक्षात येतं. पाकिस्तानातील हिंदूचे उत्सव , हिंदूंची मंदिरं, तेथे साजरी होणारी दिवाळी , होळी , शिखांचे गुरुद्वारे, त्यांच्या परंपरा, लाहोर शहरातील little india नावाने ओळखलं जाणारं मार्केट, तिथे साड्यांपासून सौंदर्य प्रसाधनापर्यंत भारतीय वस्तूंना असलेली प्रचंड मागणी, असं भारतासंदर्भातील खूप काही सनाच्या शोमध्ये पाहायला मिळते. ‘पाकिस्तानातील भारत’ त्यातून कळतो.
(साभार: दिव्य मराठी)
(लेखक मीडिया वॉच पब्लिकेशनचे संपादक आहेत) 8888744796