-नीलेश कमलकिशोर हेडा
विदर्भाचं सगळ्यात मोठं नुकसान गेल्या तीस वर्षात कुठलं झालं असेल तर ते म्हणजे येथील आमराया संपल्या आहेत. आमराया फक्त आंब्याची झाडं नव्हती. त्यात एक राजसी थाट होता. संस्कृती होती. आमराया नष्ट झाल्यात म्हणजे केवळ एक स्पेसिज संपली नाही, तर… एक अतिशय लोभस संस्कृती संपली आहे. आज मुली आंब्यांसाठी हट्ट करतात तेव्हा मी त्यांना सांगतो, ‘तेरे पप्पा के दादा पाच हजार स्वेअर फिट में पवन्या नाम का घांस बिछाके आम को पकाते थे! एक बकेट आम हम ऐसे ही खेलते खेलते खा जाते थे.’ सगळं नॉस्टाल्जिया आहे.
………………………………………………………
लहान असताना उन्हाळ्याच्या सुटीत गावात आम्हा मुलांचा दुपारचा बहुतांश वेळ हा गावालगतच्या आमराईतच जायचा. कच्च्या कैऱ्या पाडणे, कोकिळेचा आवाज ऐकत बसणे, पाडावर आलेल्या आंब्यांचा शोध घेणे, डाबडुबीचा खेळ खेळणे आणि मधे-मधे आमराईच्या जवळूनच वाहणाऱ्या अरुणावतीच्या खोल डोहामध्ये मनसोक्त डुंबने हे आमचे आवडते उद्योग. आसपास जेव्हा उन्हाचा वणवा पेटलेला असायचा त्याही वेळी आमराईतल्या थंडगार वातावरणात आमचा उन्हाळा सुसह्य व्हायचा.
कैऱ्या उतरवणी योग्य झाल्या की आजोबा आंबे उतरवण्याचा ठेका “उताऱ्याला” द्यायचे. आंबे उतरवणीचा दिवस मोठा लगबगीचा असायचा. मोठ्या बांबूच्या काठीवर जाळीच्या “खुडी” घेऊन उतारे आजोबांसोबत आमराईत यायचे. झाडावर चढण्यात निष्णात असणारे उतारे सरसर झाडावर चढायचे. खुडीने तोडलेले आंबे दोरीच्या “झेल्यामधून” खाली सोडले जायचे. कच्च्या आंब्यांचा मोठा ढीग लागायचा. शेवटी आंब्यांची वाटणी व्हायची. पैशाचा स्वरुपात उताऱ्यांना मोबदला देण्याची प्रथा नव्हती. मोबदला आंब्यांच्या स्वरुपातच दिल्या जायचा. आंबे मोजण्याच्या पारंपरिक एककात आंब्याची मोजदाद व्हायची. सहा आंब्यांचा एक फाडा.वीस फाड्यांमागे उताऱ्यांना एक फाडा मिळायचा. राखणदार जर असेल तर त्याला एकूण आंब्यांच्या चवथा हिस्सा मिळायचा.
एकाच आमराईत शेंदरी, लाडू, शहद्या, शेप्या, नारळी, तेल्या, कागद्या, केळ्या, दोडी, गोटी, आमट्या, खाऱ्या, दाडक्या अशा अनेक स्थानिक आंब्याच्या प्रजाती गुण्यागोविंद्याने नांदायच्या. प्रत्येकाचे गुणधर्म, चव, आकार, उपयोग वेगवेगळे. आमट्या फक्त लोणच्यासाठी. शहद्या रसाळीसाठी, नारळी कच्चा खाण्यासाठी तर शेप्या नावडता! उतरलेले आंबे बैलगाडीतून घरी आले की एका वेगळ्या खोलीत भरपूर गवत घालून आजोबा “माच” घालायचे. आठ दिवसानंतर पिकलेले आंबे खायचा कार्यक्रम सुरु व्हायचा. मोठ्या बादली मध्ये भरपूर आंबे टाकून त्यांचा आस्वाद घेतल्या जायचा. सर्वांना उत्तर माहीत असूनही लहाणपणी एक कोडं आम्ही घालायचो, “इवलासा बाबू, गवतात दाबू”. सर्व जण ओरडायचे “आंबा”! दररोज रसाळी व्हायची. उरलेल्या कोया गोळा करणे, वाळवणे आणि फोडून विकण्यातून आम्हा मुलांचा खाऊचा खर्च भागायचा. एका वर्षी तर विकलेल्या कोयांमधून शाळेची सर्व पुस्तकं घेतल्याचेही आठवते. कोयांचे पैसे हातात पडले की म्हणायचो, “आम तो आम, गुठली के दाम”. विकलेल्या कोयांचं काय होते? असा मोठा प्रश्न तेव्हा आम्हाला पडायचा. कोणी म्हणायचं साबण बनवण्यासाठी उपयोग होतो, कोणी म्हणायचं त्यापासून तेल काढतात!
पाऊस पडण्याच्या आधी लोणच्यासाठीचा आंबा उतरवल्या जायचा. फ्रिजची सोय नसल्याने पाऊस पडून गारवा निर्माण झाला की लोणचे घालण्याचा कार्यक्रम पार पडायचा. घराघरातून मसाल्यांचा घमघमाट यायचा. प्रत्येक घरातील लोणच्यांची चव वेगळी असायची. शाळेत प्रत्येकाच्या डब्यांतील लोणच्यांची विविधता चाखण्यासारखी असायची.
बऱ्याच वर्षानंतर गावाकडे जाणं झालं. आजोबा कधीचेच आमराई सोडून गेले आहे. जिथे आधी आमराई होती तिथेच त्यांच्या अस्थी ठेवून एक चबुतरा तयार केली आहे. आता आमराई नाही. अरुणावतीचा डोहही गाळाने भरून गेला आहे. आंबा नसल्याने कोकिळेचा आर्त स्वरही नाही. आजोबा जाणे, आमराई संपणे , नदीचा डोह भरून जाणे, कोकिळेचा स्वर ऐकायला न मिळणे. यात काही परस्परसंगती आहे काय, हे शोधण्याचा प्रयत्न माझ्यातला अभ्यासक करत आहे. यावर विचार करत असतांना एक दोन ओळींची झेन कथा आठवली. एका जंगलातून शेवटचा वाघ संपला आणि जंगलातून वाहणारी एक नदी कोरडी झाली. एवढीच ती कथा. आजच्या आपल्या परिस्थितीकीशास्त्राच्या परिपेक्षात ही कथा खरी आहे. आमराईलाही ती लागू पडते.
विषन्न मनाने आजोबाच्या समाधी जवळ बसलो. गेल्या २०-२५ वर्षांमध्ये तथाकथित विकासाचा नावाखाली बरीच काही उलथापालथ झाली आहे. आमराई संपली आहे. विदर्भातला शेतकरी कर्जामध्ये जेव्हा आकंठ बुडाला तेव्हा किटकनाशकांच्या, रासायनिक खतांच्या अवाजवी खर्च भागवण्यासाठी त्याने सर्वप्रथम शेतातील, धुऱ्यावरची आंब्याची झाडे तोडून विकण्याचा निर्णय घेतला.मातीत आधीसारखा ओलावा टिकत नाही म्हणून सुद्धा अनेक आंब्यांची झाडे आपसूकच वाळली. नंतर ती तोडून टाकण्यात आली. गेल्या काही वर्षात माकडांचा त्रास अतोनात वाढल्याने अनेक शेतकऱ्यांनी आंब्याच्या झाडांपासून दूर व्हायला सुरुवात केली. बाजार प्रत्येक ठिकाणी आपला रंग दाखवतो. बाहेरून येणाऱ्या, रसायनांचा उपयोग करून पिकविलेल्या कलमी, बदाम आंब्यांनी गावरानी आंब्याचा गोडवा नष्ट केला. बाजारात नेलेला गावरान आंबा बेभाव घेण्याच्या मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे शेतकरी निरुत्साहित झाला. आंब्याला जेव्हा बार नसतो तेव्हा भाव भरपूर. जेव्हा बार भरपूर, तेव्हा भाव नाही अशा दृष्टचक्राने शेतकरी जिथे होता तिथेच राहिला.
एकूण काय… तर जुनी मातीशी इमान असणारी माणसे मातीआड गेल्याने, पर्यावरणाचा अतोनात ऱ्हास झाल्याने आणि बाजाराच्या बदलेल्या स्वभावाने आमराया कायमच्या संपल्या
काही दिवसाआधी वाशिम जिल्ह्यातल्या रिसोड तालुक्यातल्या हराळ या गावात होतो. गावातील नरवाडे नावाच्या शेतकऱ्याने दोन्ही हातातही मावणार नाही ,असा एक आंबा आणून दिला. अशी आंब्याची जात पूर्वी कधीही बघितली नव्हती. त्या आंब्याचा जो गोडवा होता तो यापूर्वी कधीच चाखला नव्हता. अशा प्रकारचं ते गावात एकमेव झाड होतं. अशा आंब्याच्या जातीची दखल घेण्याची बुद्धी कृषी विभागाला, कृषी विद्यापीठांना होऊ नये, याचे आश्चर्य आहे. विदर्भातील विविध आंब्यांच्या जातींची साधी चेक लिस्ट, त्यांचा आढळ बनवले गेल्याचे मला माहीत नाही. परवा एका गावाला तंटामुक्तीचा दोन लाख रुपयांचा पुरस्कार मिळाला. आलेल्या पैशात मोठे प्रवेशद्वार निर्माण करायचं नियोजन सुरु झालं. माझा एक पर्यावरण प्रेमी मित्र म्हणाला, ‘गावाच्या ‘इ’ क्लास जमिनीवर गावरानआंब्यांची आमराई उभारुया. दरवर्षी गावाला उत्पन्नही मिळेल आणि आमराई पुनर्निर्माणाच्या दिशेने एक पाऊल सुद्धा टाकले जाईल. ज्या प्रमाणे नक्षत्र वन, स्मृती वनाच्या दिशेने आपली वाटचाल आहे तशीच वाटचाल आमराईच्या बाबतीतही व्हायला हवी. हराळ गावच्या दुर्मीळ आंब्याच्या जातींची कलम करुन त्याला संरक्षित करता येईल.’ हे व्हायला हवं . जुन्या निसर्गाशी निगडित सगळ्या गोष्टी जपायला हव्या . त्या नष्ट झाल्या असतील तर त्याचे पुनर्जीवन व्हायला हवे.
(लेखक संशोधक व कृषिप्रेमी आहेत)
9765270666