बहुतेकदा संध्याकाळी कामे संपवल्यानंतर किंवा रात्रीच्या जेवणापूर्वी मी तासभर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत ऐकतो. पूर्वी मी वर्षानुवर्षे संग्रहित केलेल्या सीडीज किंवा कॅसेट्स ऐकत असे. आता युट्यूब नावाच्या विशाल भांडारावर डल्ला मारत असतो. काहीवेळा मी एखादा कलाकार निवडतो किंवा काहीवेळा एखादा विशिष्ट राग. त्यानंतर मला मिळालेल्या अल्गोरिदमनुसार (माझ्या अंदाजानुसार, तो माझ्या आधीच्या नोंदींवर आधारलेला असतो) मी जात राहतो. काही आठवड्यांपूर्वी युट्यूबने सुचवलेल्या यादीच्या अग्रस्थानी उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी गायलेला राग हंसध्वनी होता. मी आज्ञाधारकपणे मला प्राप्त झालेला निर्देश अनुसरून ती प्रस्तुती ऐकली, मग लगेचच पुन्हा ऐकली, आणि पुन्हा एकदा..
बडे गुलाम अलींचा जन्म १९०२ मध्ये पश्चिम पंजाबमधील कसूर येथे झाला. त्यांचे वडील अली बक्ष पतियाळा घराण्याचे गायक होते. त्यांना संस्थानच्या शीख महाराजांनी आश्रय दिला होता. फाळणीपश्चात बडे गुलाम अलींनी पाकिस्तानात जाण्याचा मार्ग निवडला, मात्र तिथे शास्त्रीय संगीतासाठीचा मर्यादित (या शब्दाच्या सर्व अर्थांनुसार) श्रोतृवर्ग पाहून त्यांनी सीमेच्या भारतीय बाजूस परतणेच पसंत केले. १९५० मध्ये या देशांदरम्यान प्रवास करणे सध्याच्या स्थितीहून अधिक सोपे होते. त्यामुळे बडे गुलाम अली मुंबईला आले. तिथे कुणीतरी त्यांच्यावर ओढवलेल्या दुर्दैवी स्थितीकडे मोरारजी देसाईंचे लक्ष वेधले. मोरारजी तेव्हाच्या अविभाजित मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. मोरारजींनी या श्रेष्ठ कलावंतासाठी सरकारी निवासाची व्यवस्था केली. त्याचबरोबर जवाहरलाल नेहरूंच्या नेतृत्वाखालील त्यावेळच्या केंद्र सरकारने या मुस्लिम व्यक्तीसाठी भारतीय नागरिकत्वाचा मार्ग सुकर करून दिला.
हंसध्वनी हा कर्नाटकी संगीतातील एक मधुर, आल्हाददायक राग आहे. असे म्हटले जाते की, १८ व्या शतकामध्ये रामस्वामी दीक्षितर यांनी हा राग तयार केला. या रागात अनेक गाणी रचली गेली आहेत, जसे की, ‘वातापि गणपतीम्’ – जी (इतरांसह) एम. एस. सुब्बलक्ष्मी आणि एम. एल. वसंतकुमारी यांनी गायलेल्या कलाकृतींपैकी एक अतिशय लोकप्रिय कलाकृती आहे. काही प्रमाणात हा राग हिंदुस्थानी गायकांनीही गायला आहे.
मी स्वतः कर्नाटकी संगीतापेक्षा हिंदुस्थानी संगीत जास्त ऐकतो. अमीर खाँ आणि किशोरी आमोणकर या गायकांनी गायलेला, आणि त्याचप्रमाणे बासरीवादक पन्नालाल घोष यांनी वाजवलेला हंसध्वनी मी पुष्कळ वेळा ऐकलेला आहे. पण माझ्यासाठी पहाडी आणि बिहाग या रागांमधील पेशकशही ज्यांची ओळख होती, (आणि त्यासाठी जे मला आवडत होते) त्या बडे गुलाम अली खाँकडून हा राग मी पहिल्यांदाच ऐकला. याविषयी मी अधिक जाणकार मित्राकडे विचारणा केली आणि मला असे समजले की माझा होरा योग्य होता, बडे गुलाम अलींनी हंसध्वनी फार क्वचित गायला आहे. आणि त्यामुळे हे ध्वनिमुद्रण अतिशय खास होते.
युट्यूब वर अधिक खोलवर शोधाशोध केल्यानंतर एक प्रफुल्लित करणारा शोध मला लागला की, हंसध्वनीची ती विशिष्ट पेशकश बडे गुलाम अली यांनी १९५६ साली माझ्या स्वतःच्या शहरात, बेंगलोरमध्ये सादर केलेल्या एका मैफिलीतील होती. ती मैफिल रामनवमी उत्सवाचा भाग होती, जो शहराच्या सांगीतिक दिनदर्शिकेतील महत्त्वाचा घटक मानला जात असे (अजूनही मानला जातो) आणि नेहमी चामराजपेटमधील फोर्ट हायस्कुलच्या प्रशस्त मैदानावर भरवला जात असे.
ज्या किल्ल्यामुळे या हायस्कुलला ‘फोर्ट’ असे संबोधण्यात येते, ती मुळात १६ व्या शतकात केम्पेगौडा याने बांधलेली एक चिखलाची वास्तू होती. कालांतराने हैदर अली याने तिची दगडात पुनर्बांधणी केली. पुढे हैदरचा पुत्र टिपू याने १८ व्या शतकात तिचे सौंदर्य वाढवले. हे हायस्कुल मात्र २० व्या शतकातले असून त्याची अतिशय देखणी वास्तू ब्रिटिश वसाहतीच्या काळात बांधली गेलेली आहे.
या पुढील तपशिलांनी मी अधिकच भारावून गेलो. कारण गेल्या काही वर्षांत रामनवमी उत्सवातील काही मैफिलींना मी स्वतःदेखील हजेरी लावली होती. १९५६ मध्ये तर माझा जन्मही झाला नव्हता. मात्र नक्कीच अशी शक्यता आहे की, बडे गुलाम अलींना तिथे त्या वर्षी गाताना ज्यांनी ज्यांनी ऐकले त्यांच्यामध्ये बेंगलोरमधील ख्यातनाम रसिक शिवराम आणि ललिता उभयकर हे होते, ज्यांच्याशी माझी कालांतराने ओळख झाली होती. मला असा विचार करून (किंवा आशा वाटून) आनंद होतो की, दंतकथा बनून राहिलेले भौतिकशास्त्रज्ञ सी. व्ही. रमण सुद्धा त्या दिवशी श्रोत्यांमध्ये असतील, त्यांना शास्त्रीय संगीतात खोल रुची होती. कदाचित चामराजपेटमध्ये राहणारे माझे काही नातेवाईकही त्या दिवशी हजर राहणाऱ्यांमध्ये असू शकतील.
तर, बेंगलोरमधील फोर्ट हायस्कुलच्या मैदानात दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या रामनवमी उत्सवात हंसध्वनी गाणारे असे हे बडे गुलाम अली खाँ. आताच्या पाकिस्तानात असणाऱ्या ठिकाणी जन्मलेले भारतातील एक मुस्लिम गायक. शीख महाराजांनी राजाश्रय दिलेल्या, हिंदुस्थानी संगीतातील एका घराण्याचे नामांकित उस्ताद, जे कर्नाटकी शैलीतील एक राग गातात; तेही एका महानतम हिंदू दैवताच्या नावाने चालणाऱ्या उत्सवात, जो ब्रिटिश काळात बांधलेल्या एका शाळेच्या मैदानात संपन्न होतो; आणि त्या शाळेचे नाव १६ व्या शतकातील एका किल्ल्यावरून ठेवले गेले आहे, ज्याचे सध्याचे स्वरूप हे हिंदू व मुस्लिम अशा दोन्ही शासकांचे देणे आहे.
आणखी एक उल्लेखनीय बाब म्हणजे, या मैफिलीचे वर्षदेखील महत्त्वपूर्ण आहे. ती १९५६ साली झाली, जेव्हा दक्षिण भारतातील कन्नडभाषिकांचे प्रांत हे एकच राजकीय घटक म्हणून एकत्र आणले गेले. ब्रिटिश राजवटीतील भारतात म्हैसूर व हैद्राबाद संस्थानांमध्ये त्याचप्रमाणे मद्रास व बॉम्बे इलाख्यात कन्नड भाषिक मोठ्या संख्येने राहत होते. स्वातंत्र्यानंतर या प्रदेशांच्या एकीकरणासाठीच्या प्रसिद्ध चळवळीने १९५६ मध्ये एका एकसंध कन्नड भाषिक राज्याची निर्मिती घडवून आणली.
विख्यात कन्नड लेखक कोटा शिवराम कारंथ यांनी एकदा असे नोंदवले आहे की, भारतीय संस्कृती’विषयी बोलताना ती एक अखंड गोष्ट आहे, असे मानून बोलता येणार नाही. कारंथ यांच्या मते, ‘आजची भारतीय संस्कृती ही इतकी वैविध्यपूर्ण आहे की, ती संस्कृती म्हणजे वस्तुतः अनेक संस्कृती आहेत. या संस्कृतीची मुळे प्राचीन काळापर्यंत गेलेली आहेत. आणि अनेक वर्ण व व्यक्तींच्या संबंधाने ती विकसित झालेली आहे. त्यामुळे तिच्या अनेक घटकांपैकी, कोणता घटक मूळचा इथला आणि कोणता परका; काय प्रेमाने येथे आणले गेले आणि काय बळजबरीने लादले गेले, हे खात्रीपूर्वक सांगता येणे अशक्य आहे. त्यामुळे भारतीय संस्कृतीकडे पाहून आपल्याला याची जाणीव होईल की, कडव्या देशभक्तीला येथे जागा नाही.’
कारंथ यांच्या या उद्धृताच्या जोडीलाच रवीन्द्रनाथ टागोर यांचीही जोड मला द्यावीशी वाटते. आपल्या या वंशपरंपरागत आणि स्विकारलेल्या विविधतेविषयी बोलताना टागोर एके ठिकाणी नोंदवतात: ‘हे कुणालाही उमगत नाही की, कुणाच्या पुकारण्याने जनांचे प्रवाह अज्ञात ठिकाणांहून अस्वस्थ लाटांमध्ये प्रवाहित होतात, आणि एकाच समुद्रात हरवून जातात : आर्य आणि अनार्य, द्राविडी, चिनी, शक व हूण आणि पठाण व मुघल यांच्या टोळ्या, हे सर्व इथे एकाच संचयात मिसळले आहेत.’
कारंथ आणि टागोर यांनी जो बहुतावाद आणि जी सांस्कृतिक विभिन्नता अधोरेखित केली आहे, त्यातून भारतीय जीवनाची बहुतेक क्षेत्रे रेखली आहेत. आणि कदाचित (तेही हे व्यवस्थित जाणतात की,) या सगळ्यापलीकडे आपले शास्त्रीय संगीत आहे. मग ते वाद्य असो, राग असो, शैली असो किंवा कलावंत; आपण सांगू शकत नाही की, यातील काय हिंदू आहे आणि काय मुस्लिम; यातील कोणता भाग इथला मूळचा आहे आणि कुठला परका.
आता मला हे ठाऊक नाही की, आपले पंतप्रधान शास्त्रीय संगीताचे चाहते आहेत की नाहीत. जर ते नसतील तर मी त्यांना आणि हिंदुत्वाची पाठराखण करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला विनंती करु इच्छितो की, या स्तंभात ज्या पेशकशीचे मी वर्णन केले आहे, ती अर्धा तास खर्च करून त्यांनी जरूर ऐकावी. तरच कदाचित भारताविषयीच्या आणि भारतीय असणे म्हणजे काय याविषयीच्या त्यांच्या संकुचित मनाने केलेल्या, दुराग्रही समजुतीचा पुनर्विचार ते करतील.
बडे गुलाम अली खाँ यांनी बंगलोर येथील फोर्ट हायस्कुलमध्ये १९५६ साली रामनवमीनिमित्तच्या मैफिलीत हंसध्वनी गाण्याच्या कृतीने अनेक भाषा, धर्म, प्रांत, राजकीय सत्ता, सांगीतिक परंपरा, आणि वास्तुशैली यांना एकत्र आणून एकमेकांत मिसळले आहे. आपल्या देशाची सांस्कृतिक विविधता आणि सभ्यता यांना केलेला हा देखणा सलाम आहे, आणि प्रसंगोपात तो संगीताचा एक उत्कृष्ट नमुनाही आहेच.
(अनुवाद- सुहास पाटील)
(लेखक इतिहासकार रामचंद्र गुहा यांना अशा इतिहासात रस आहे जो वर्तमान समजून घेण्यास उपयुक्त ठरतो. त्यांची डझनभरांहून अधिक पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. त्यात ‘India after Gandhi’, ‘Gandhi before India’, ‘Gandhi: The Years That Changed the World‘ ही तीन पुस्तके विशेष प्रसिद्ध आहेत.)
नक्की ऐका -उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांनी गायलेला राग हंसध्वनी