मी हे आज लिहायला बसणं हेच सॅडीस्टपणाचं लक्षण आहे खरं तर पण लिहिल्याशिवाय राहवलं जात नाहीये. मनात खूप विचारांनी गर्दी केलीये त्यामुळे मी जे काही लिहेन त्यात किती सुसूत्रता असेल मला माहित नाही. पण हे वाचून तुमच्यातल्या एका व्यक्तीला जरी फायदा झाला तर ती माझी मिळकत समजेन
आठ-एक वर्षांपूर्वी मी अमेरिकेत असताना बाबांबरोबर रोजच्यासारखा फोनकॉल चालू होता. आईला बरं नाहीये म्हटल्यावर पहिला विचार सर्दी तापाचा आला. साधं लोणचं खाल्लं, फ्रिजचं थंड पाणी प्यायली तरी तिला लगेच सर्दी व्हायची पण या वेळी बाबांना नक्की सांगताच येत नव्हतं कि झालंय काय? त्यांच्या अडखळत्या उच्चरांवरून मला एकच शब्द कळला – स्चीझोफ्रेनिया
त्यावर काय बोलायचं हेच एक क्षण कळलं नाही. माझी जलद झालेली नाडी आणि पोटात पडलेला खड्डा एवढंच आता आठवतं. त्यानंतर मी बाबांचीच उलटतपासणी चालू केली. काय, कसं, कुठलं हॉस्पिटल, कुठले डॉक्टर, कधी – प्रश्नांवर प्रश्न. मिळालेली उत्तरं ठीकच होती. त्यांनी जराही वेळ दवडला नव्हता. एक दिवस नेहमीपेक्षा जास्त गप्प असणाऱ्या आईला दुसऱ्या दिवशी त्यांनी किचन मध्ये पाहिलं – तीने गुरुवारच्या पूजेला आणलेली फुलं घेऊन रोजच्या वापरातल्या भांड्यांची आरास मांडली होती आणि ती मनोभावे त्यांची पूजा करत होती.
बाबांनी दुसऱ्यादिवशीच तडक हॉस्पिटल गाठलं. एका आठवड्यात तिची स्चीझोफ्रेनियाची ट्रीटमेंट चालू झाली.
मला फोन आला तेव्हा हे होऊनही सहा महिने उलटून गेले होते. मी काळजी करेन म्हणून माझ्यापासून सगळं लपवण्यात आलं होतं. माझ्या आईचं आणि माझं नातं तसही इतर आई-मुलीसारखं न्हवतं. मी बाबांची लाडकी. त्यामुळे आईशी फार जुजबी बोलणं होत असे. काय खाल्लंस, बरी आहेस का – एवढंच. गेल्या काही महिन्यांपासून मी आई ला फोन द्या म्हटल्यावर बाबा टाळाटाळ करायचे, ती बाहेर गेलीये, वॉशरूम मध्ये आहे, शेजाऱ्यांशी बोलतेय अशा कारणांचा मलाही संशय येऊ लागला होता. कधी बोलणं झालंच तर आईचा आवाज खूप मंद, झोपेंतून उठल्यासारखा वाटायचा. तेच दोन जुजबी प्रश्न, पोटात एक विचित्र फिलिंग यायची पण तरीही हे मला अपेक्षित न्हवतं.
मी प्रोजेक्ट मधून रिलीज घेऊन, बांधाबांध करून निघायला अजून तीन चार महिने गेले. तेव्हा आईच्या आजारपणाची कल्पना फक्त माझ्या खूप जवळच्या मैत्रिणींना दिली होती. अमेरिकेतून निघायचं कारण प्रोजेक्टचा कंटाळा आलाय, अकाउंट बदलायचं एवढंच दिलेलं कारण लोक काय म्हणतील याची धास्ती. ती तेव्हा मलाही चुकली नव्हती
तिथून माझा आणि माझ्या कुटुंबाचा प्रवास सुरु झाला तो एका वेगळ्या वाटेवर. इंडियाला आल्यावरहि माझी गट फिलिंग जात नव्हती. आपण सेकंड ओपिनियन घेऊ म्हणून तिला घेऊन आम्ही जसलोकला गेलो. दोन व्हिजिट्स मधेच तिथल्या हेड ऑफ सायकियाट्रीनीं सांगितलं कि झालेलं निदान चुकीचं आहे. आईला डिप्रेशन होतं, स्चीझोफ्रेनिया नाही. हे म्हणजे सर्दीताप आलेल्याला एड्सचं निदान केल्यासारखं होतं. बऱ्याच मेंटल प्रॉब्लेम्सची सुरुवातीची लक्षणं हि सारखी असतात त्यामुळे ट्रीटमेंट चालू झाल्यावरही काउन्सेलिंग होणं गरजेचं पण तिच्या आधीच्या हॉस्पिटलमध्ये दहा मिनिटात बडबड करून गोळ्यांचे डोस वाढवून दिले जायचे तेवढंच. एवढ्या मोठ्या कालखंडात पोटात गेलेल्या चुकीच्या औषधांचे परिणाम झालेले होते. आई मुळातच मितभाषी पण आता तिने बोलणं बंद केलेलं जवळपास. तोंडातल्या तोंडात पुटपुटत बसायची. ते कोणालाही उद्देशून नसायचं. आपण नर्व्हस झाल्यावर हातापायांची हालचाल करतो तसंच काही. तिच्या सगळ्या कृती संथ झाल्या. तिचा विसराळूपणा प्रमाणाबाहेर वाढला – एवढा कि पुढे तिने स्वयंपाक करणं बंद केलं. मी सुट्टीत अमेरिकेहून आल्यावर एरवी मला चांगलंचुंगलं करून खायला घालणारी आई मी परत आली आहे हेच विसरून जाऊन फक्त त्या तिघांपुरतं जेवण करायची. मला तशीही भूक नाही, मी बाहेरून खाऊन आलेय असं मी सांगून वेळ मारून न्यायचे कारण ते लक्षात आणून दिल्यावर तिचा चेहऱ्यावर अपराधीपणाचे भाव यायचे. ते पाहून खूप रडायला यायचं
डॉक्टर्सनी औषधं बदलली पण कुठलंही न्यूरॉमेडिसिन हे एका झटक्यात चालू आणि बंद करता येत नाही. तिची स्चीझोफ्रेनियाची औषधं कमी करत करत डिप्रेशनची वाढवेपर्यंत अजून सहा महिने निघून गेले होते. तिच्या चेहऱ्यावर आता कसलाच भाव दिसायचा नाही. पण डोक्यात विचारांची भिंगरी गरगर फिरत असायची हे तिच्या पुटपुटण्यावरून कळायचं. आम्ही गप्पा मारण्याचा प्रयत्न करायचो पण ती आमच्यापासून शेकडो कोस दूर गेली होती.
या काळात माझं मानसिक रोगांविषयी वाचन वाढलं. स्वतःची या सगळ्याबद्दलची जाणीव, या गोष्टींकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत गेला. त्या दोन एक वर्षांत आम्ही तिच्या मूळ ट्रीटमेंट मध्ये कसलाही खंड न पाडता इतर उपाय केले. होमिओपॅथी, न्याचरोपॅथी, मेडिटेशन सगळं करून झालं. Transcranial Magnetic Stimulation (TMS) चा शोध तेव्हा नवीन होता. मुंबईत हे ऑफर करणारी फक्त चार क्लिनिकस. हि ट्रीटमेंट खूप महागडी. एक सेशन २०,०००-२५,००० च्या पुढे. यात मॅग्नेटिक वेव्हस पेशंटच्या मेंदूतून पास केल्या जातात. ते पहिल्यांदा ऐकलं तेव्हा डोळ्यासमोर आपल्या सिनेमात दाखवतात तशी तोंडात बोळा कोंबून दिली जाणारी शॉक ट्रीटमेंट आठवली. पण तसं इथे काहीही न्हवतं. फारफार तर तिला सेशन नंतर थोडा डोकेदुखीचा त्रास होईल असा डॉक्टरांनी भरोसा दिल्यावर ते चालू केलं. त्याचा मोठा काही परिणाम झाला नाही पण तिच्या विसरभोळेपणा थोडा कमी झाला.
त्यांनंतर तिने दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला. यावर मी आजही लिहू शकत नाही एवढी ती आठवण ताजी आहे. माझ्या बाबांनी जर तिच्यावर घारीसारखी नजर ठेवली नसती तर आम्ही आईला खूप आधीच शरीरानेही मुकलो असतो. या सगळ्यातून जाताना घरचं वातावरण किती नॉर्मल ठेवता येईल ते आम्ही पाहिलं पण अजूनही ते मळभ आहे. आमच्या सगळ्यांच्या मनावर आहे. आणि आई हयात असे पर्यंत ते राहिलंच याच्याशी आता आम्ही तिघांनी तडजोड करून घेतलीये पण या बाबतीतलं सगळं श्रेय हे बाबांना आणि माझ्या लहान बहीणीला आहे
या सगळ्यातुन जात असताना एक समाज म्हणून मानसिक आरोग्याबद्दल आपण किती उदासीन आहोत याचा प्रत्यय क्षणोक्षणी येत गेला. ‘वेडा आहे तो’ किती सहजपणे बोलून जातो आपण. किंवा ऑफिस मध्ये एक वाईट दिवस गेला कि डिप्रेसड झाले बाई असं पटकन म्हणतो. पण डिप्रेशन म्हणजेच नैराश्य येतं कसं, त्याचे शारीरिक आणि मानसिक असे दोन्ही दोष आहेत हेच बऱ्याच जणांना ठाऊक नसतं.
हे आपल्यावर आहे, आपण झटकून मोकळं व्हायचं, हि नुसती थेरं आहेत. यांना भुकेचे चटके बसत नाहीत, घरात पैसा आहे म्हणून नाटकं सुचताहेत. गरिबांना नाही होत का असं काही. चांगलं कामाला लावलं पाहिजे. आत्महत्येचा प्रयत्न करणारे, तो यशस्वी झालेले – त्यांनाही आपण सोडत नाही. पळपुटेपणा म्हणतो आपण त्याला. तिथेही जजमेंटल होतो आपण. कारण हेच कि आपण एक नंबर मूर्ख आणि मागासलेले आहोत. जर तुम्ही स्वतः यातून गेला नसाल तर मेंटल ईशूज असणाऱ्या माणसाच्या डोक्यात नक्की काय चालू असतं याचा अंदाजही आपण बांधू शकत नाही.
तुमच्या मेंदूत स्रवणारे, तुमच्या मानसिक स्वास्थ्यासाठी जबाबदार असणारे डोपामाईन, सेरेटोनीन, एपिनेफ्रिन आणि यासारखे अजून काही न्यूरोरिसेप्टर्स हे त्यांचं काम थांबवू शकतात, मंद करू शकतात. हे होण्यामागे वय, अनुवंशिकता, आजूबाजूचं वातावरण, स्ट्रेस, अचानक आयुष्यात झालेली मोठी उलथापालथ यातलं कुठलंही आणि कितीही कारणं असू शकतात. माझ्या आईसाठी थोड्याफार प्रमाणात अनुवंशिकता आणि त्यावेळी घडलेली एक मोठी घटना कारणीभूत आहे. त्या घटनेबद्दल मी इथे काही लिहू शकत नाही. फरक एवढाच होता कि बाबा, मी आणि माझी बहीण त्यातून वेळीच सावरलो पण आईसाठी ती घटना एक ट्रिगर बनली. तिने हे आयुष्य निवडलेलं नाही. तिने हा रोग निवडलेला नाही. लहानपणीच वडिलांचं छत्र हिरावून घेतल्यावर चुलत्यांकडे राहून, जेमतेम सातवी पर्यंत शिकलेल्या आणि नंतर गिरणीकामगाराशी लग्न झालेल्या माझ्या आईने आयुष्यभर गरिबीचे चटके सोसले होते. तिच्या हातात असतं तर ती या सगळ्यांपासून खूप लांब पळून निघून गेली असती
पण आपण इतके बुरसटलेल्या विचारांचे आहोत कि माणसाच्या शरीरापलीकडचा माणूस आपल्याला दिसतच नाही. पैसा, प्रतिष्ठा, मानपान, त्याची शोबाजी यापलीकडे आपली मती खुंटलेली आहे. प्रत्येक माणसाने, स्पेशली पुरुषाने स्ट्रॉंग असलंच पाहिजे, प्रत्येक संकटावर मात केलीच पाहिजे, प्रत्येक जबाबदारी एक अश्रू न ढाळता निभावलीच पाहिजे. एखाद्याचं कमकुवत असण्याचंही स्वातंत्र्य नाकारणारे, अशा माणसांची धिंड काढणारे आपण गाढव, भिकारचोट लोक आहोत.
मी इतकी वर्षं भारताबाहेर राहतेय कारण मला आईकडे पाहवत नाही. एखाद्या माणसाने मरण्यापूर्वीच आपल्यातून निघून जाणं यासारखी वाईट गोष्ट असू शकत नाही. तिचे रिकामे डोळे पाहिले कि स्वतःचा राग राग येतो. मी सुरुवातीलाच तर इंडियात असते तर कदाचित, कदाचित तिची ट्रीटमेंट व्यवस्थित झाली असती हा प्रश्न आणि त्यामागची खंत मला आयुष्यभर राहील. आता कुठे हातात पैसे येत होते, आता कुठे तीला चार सुखाचे दिवस दाखवता आले असते. नोकरचाकर ठेवता आले असते, उंचीतल्या साड्या, दागिने सगळं देता आलं असतं मला पण आता ह्या सगळ्याच्या पलीकडे ती आहे. गोळ्या घेऊन डोक्यातले भणभणणारे विचार थांबवायचे आणि झोपून येईल तितके दिवस काढायचे तिला एवढंच सुचतं
मी अरेंज म्यॅरेजच्या सेट अप मध्ये हि गोष्ट फार लवकर सांगते. मी आईची परिस्थिति समोरून सांगू नये असं बऱ्याच जणांचं मत आहे पण मला ते पटत नाही. या सगळ्याची लाज मला वाटत नाही. लाज जर कोणाला वाटायची गरज असेल तर ती याकडे एक लाजिरवाणा प्रकार म्हणून पाहावं असं वाटणाऱ्यांना आहे.
मी हे सांगितल्यावर ९९% मुलं आणि त्यांचे सुजाण, शिकलेले पालक पळून जातात. वेड्या आईच्या मुलीला पुढे वेड लागलं तर? हे मी माझ्या कानांनी ऐकलेलं आहे. अशा लोकांचा सांभाळ आयुष्यभर करावा लागतो, हे खर्चिक प्रकरण आहे हा व्यवहार सगळ्यांना दिसतो. तो मलाही दिसतो म्हणून मी आधीच सांगून मोकळी होते. बाबा आता थकले आहेत. आईची एवढी मोठी जबाबदारी पेलवून त्यांच्या स्वतःच्या मनस्थितीवर परिणाम होऊ नये म्हणून जिथे शक्य असेल तिथे आम्ही त्यांनाही ब्रेक देतो पण या पुढे हि माझी आणि माझ्या बहिणीची जबाबदारी राहिलंच. ज्याला हे मंजूर नसेल तो माझा जोडीदार कसा असेल?
मला या मुलांबद्दल किंवा त्यांच्या पालकांविषयी रोष नाही. माझ्या स्वतःच्या घरात हे घडलं नसतं, हे सर्व एक कुटुंब म्हणून आम्ही भोगलं नसतं तर कदाचित माझा स्वतःचा दृष्टिकोन हा कायम स्वरूपी मागासलेला आणि संकुचित राहिला असता. याबद्दल कोणालाही दोष देऊन चालत नाही. माझ्या आईचं आणि खरंच जर हे अनुवांशिक असेल तर पर्यायाने माझं वास्तव झेलायची जर कोणाचीही हिम्मत नसेल तर माझं लग्न कधीही झालं नाही तरी मला फिकर नाही. आयुष्याच्या या टप्यावर तसंही आता नवर्ऱ्याकडून फक्त सोबत, प्रेम, माया आणि सहवास अपेक्षित आहे. पैसा अडका, घर, गाडी, सोनं नाणं माझं मला आहे. खरं सांगू तर माझी आशा या बाबतीत खूप धूसर होत चाललीये कारण आपण सुधरू यावरचा माझा विश्वासच उडत चाललाय.
याचा संबंध हा फक्त संवेदनशीलतेशी आहे, शिक्षण, आर्थिक परिस्थिती याच्याशी नाही. मला नकार देणारे, आम्हाला वाळीत टाकणारे, आमच्याकडे पाठ फिरवणारे हे मुख्यतः व्हाईट कॉलर वाले आहेत त्यामानाने आमच्या चाळीतल्या शेजाऱ्यांनी या बाबतीत आम्हाला खूप खूप मदत केलीये. मग तो बाबांना दिलेला आधार असो किंवा माझ्या आईबरोबर तशाही परिस्थतीत बसून रोज मारलेल्या गप्पा असोत. ती बाहेर पडल्यावर हट्टाने तिच्या सोबत जाऊन बडबड करून तिला एखाद्या इनव्यालीड सारखं ट्रीट न करता जमेल तसे तिला सामावून घेणारी हि कमी शिकलेली, साधी सुधी, शुद्ध मराठी, इंग्रजीत न बोलणारी माणसं आहेत. त्यांनी ज्याप्रकारे माझ्या आईला आणि माझ्या कुटुंबाला स्वीकारलं ते पाहून मला खूप बरं वाटतं
आत्महत्या करणाऱ्यांना मागे राहणाऱ्यांची काळजी, विचार नसतो का? नसतो. त्यांचा स्वतःचा मेंदू त्यांच्या विरुद्ध उठलेला असतो. त्यांच्या डोळ्यांवर, मनावर विचारांचा एक न भेदता येणारा पडदा असतो. तिथे माया, ममता, प्रेम, वासना कशालाही आणि कोणालाही जागा नसते. हा रोजचा, अव्याहत चालणारा संघर्ष एकदाच मरून संपवायचा विचार मनात येत नसेल तरच आश्चर्य. माझी आत्महत्या करू पाहणाऱ्यासोबत फक्त आणि फक्त सहानुभूती आहे. मी काही क्षणांसाठी त्या वाटेवर स्वतः चालले आहे आणि मागे वळले आहे. सतत आपण छान दिसावं, छान वागावं, दुनियेच्या मतांचा आदर करत, त्यांनी खांद्यावर टाकलेल्या जबाबदाऱ्या एकटीने पेलता पेलता हे सर्व संपेल तर बरं होईल असं बरेचदा मनात येऊन गेलंय पण माझं नशीब बलवत्तर म्हणून माझी माणसं आहेत. सोनाली, देविना, ज्योती या माझ्या मैत्रिणीनि माझी हि बाजूही पाहिलीय आणि मी त्या कड्यावर असताना माझा हात पकडून मला मागे वाळवलंय
गेली आठ वर्षं मी कामानिमित्त एकटी राहते. त्यातून येणार एकटेपण खायला उठतं. आपण असे का आहोत, आपलं पुढे काय होणार, आपल्या नशिबी एकट्याने, कुठल्याशा वृद्धाश्रमात मरण लिहिलंय का हे प्रश्न डोक्यात असतात. याचा खूप त्रास व्हायला लागला होता. रात्री अपरात्री खाडकन झोपेतून जाग यायची आणि श्वास कोंडायचा. देवाचं नाव घेत झोपायचा प्रयत्न करायचा. आपण स्वतःच काय करून घेऊ असा अविश्वास वाटायचा. यापायी मी माझ्या लंडनच्या त्यावेळच्या घराची खिडकी आणि पुण्यात असताना टेरेस यांना लॉक करून चावी कुठेतरी लपवून ठेवली होती. त्या त्या क्षणी वाटणारी भीती, आयुष्यात आपण काहीच करू शकलो नाही यातून वाटणारी हार, बरोबरच्या लोकांचे भरलेले संसार पाहून आपल्या आजूबाजूला नजर टाकली तर न दिसणारी माणसं यातून स्वतःलाच इजा करून घेतली तर?
यातून काहीही करून बाहेर पडायचं होतं. माझं आयुष्य परफेक्ट नाही, पण ते तसंच असावं यामागचा अट्टाहास सोडायचा होता. सगळ्या जगाला, त्यांच्या एक बाई म्हणून असणाऱ्या अपेक्षांना फाट्यावर मारून मला जगायचंच होतं म्हणून मग मी पुण्यात शोधाशोध सुरु केली आणि CBT (cognitive behavioral therapy) च काउन्सेलिंग चालू केलं. सुरुवातीला खूप छोट्या डोस मध्ये चालू केलेले अँटी डिप्रेसंटस बंद केले कारण त्याचे उलटे परिणाम दिसायला लागले तर त्याची मला गरज नाही असं निदान केलं गेलं. लंडनला आल्यावर तर चिंतेची बाबच नव्हती. इथे या बाबतीत कमालीची जागरूकता आहे. इथे येऊन मी NHS तर्फे चालवल्या जाणाऱ्या IAPT (Improving Access to Psychological Therapies) मध्ये नावनोंदणी केली. मी अजूनही त्याच्या वेटिंग लिस्ट वर आहे कारण मी प्रिकौशनरी मेजर्स घेतेय, माझ्यात नैराश्याची कोणतीही ऍक्टिव्ह लक्षणं नाहीत म्हणून पण तरीही तिथल्या काउन्सिलरचा दार दोन महिन्यांनी खबरबात काढायला फोन येतोच. त्या मुलीशी अशाच मग हवा पाण्याच्या गप्पा होतात पण तेही किती गरजेचं आहे हे तो फोन कॉल झाल्यानंतर जाणवतं.
माझे सगळे छंद, अगदी फेसबुकवर लिहायचासुद्धा यातूनच जन्माला आलेत. त्यांनी केलेली सोबत, स्वतःला आहोत तसे स्वीकारून, स्वतःबरोबरचा वेळ छानपैकी कसा घालवायचा, पिटी पार्टीहुन लांब कसं राहायचं, सोशल मीडिया वर दिसणारी सुखी आयुष्य हा एक मुलामा असतो, त्यामागचा धुसमुसता राग, असंतुष्टता ओळखण्याची आणि त्यासोबत कुठलीही स्पर्धा न करण्याचं बळ, स्वतः कधी निगेटिव्ह विचारांच्या आधीन होतोय हे स्वतः ओळखण्याची आणि त्यापासून परतून येण्याचं कसब, तेही जमत नसेल तेव्हा हाकेची साद कशी घालावी – अशा एक नि अनेक क्लुप्त्या माझ्या थेरपीने मला शिकवल्या.
याचा अर्थ सगळं आलबेल आहे असं नाही. यातलं सगळ्या वेळी सगळंच जमतंय असंही नाही. ऑफिस म्हणजे स्ट्रेसची खाण आहे. वैयक्तिक आयुष्यात मी स्वतःला शक्यहोईल तितकं वादावादीहुन लांब ठेवते पण कामाच्या ठिकाणी ते नेहमी शक्य नसतं. बऱ्याच न पटणाऱ्या गोष्टी मनाविरुद्ध कराव्या लागतात, खडे बोल सुनवावे लागतात आणि ऐकूनही घ्यावे लागतात. टीमहि एका कुटुंबाप्रमाणे सावरावी लागते. बॉस म्हणून तुम्ही कायम निश्चल आणि इन कंट्रोल राहावं हि अपेक्षा असते. मी बऱ्याचदा वॉशरूम मध्ये जाऊन ढसाढसा रडले आहे. हे एक बाई असल्याने दाखवू शकत नाही नाहीतर कॅज्युअल सेक्सिजम वाले या बायका अशाच म्हणायला टपून बसलेले असतात. डिलिव्हरी टार्गेट्स, सेल्स टार्गेट्स, प्रोमोशनची टार्गेट्स. करोडोंमधे जातील अशा डीलस ग्राउंड अप डिजाईन करायच्या असतात. मार्जिन फॉर एरर शून्य. यातून घरी थकून आल्यावर जवळ घेणारं किंवा ज्याला जवळ घेता येईल असं कोणी नाही. त्यामुळे मी अधून मधून रडून घेत असते आणि मग बरं वाटतं मला. मी ज्यादिवशी लोक काय म्हणतील याचा विचार न करता CBT जॉईन करायचा निर्णय घेतला तो माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आणि महत्वाचा दिवस.
मी खाली काही घटना नमूद करतेय. यातल्या कुठ्ल्यातूनही तुम्ही जात असाल तर मिळेल ती मदत घ्या. जिथे शक्य आहे तिथे हि मदत दुसऱ्यांनाही करा. कुठलीही ट्रीटमेंट चालू असेल तरी हाडामासाच्या दुसऱ्या माणसासमोर आपलं दुःख बोलून दाखवण्यासारखं इफेक्टिव्ह काहीच नाही. तुमच्यातल्या नात्याचं भान बाळगून जिथे शक्य असेल तिथे त्या माणसाचे हात हातात घेणं, त्यांना आश्वासक मिठीत घेणं हे नक्की करा. आपण शारीरिक स्पर्शाला विचित्र नजरेने पाहायचे दिवस उलटले आहेत
१) आयुष्य उलथापालथ करेल अशी कुठलीही दुःखद घटना
२) नवीन बाळंतीण. आजकाल पोस्ट पार्टम डिप्रेशन खूप वाढू लागलं आहे. नेहमीपेक्षा जास्त थकवा, बाळाचं रडणं नकोस वाटण्यापासून ते बाळाला इजा करावीशी वाटणे यासाठी त्वरित तुमच्या प्रसूतीतज्ज्ञांना कॉन्टॅक्ट करा
३) कॅन्सर, एड्स किंवा कुठलाही दुर्धर आजार याची प्रो-लॉन्ग ट्रीटमेंट चालू असेल तर
४) कुटुंबात जवळच्या नातेवाईकांत मानसिक रोगांची हिस्टरी असेल तर
५) परीक्षा, करियर यासंबंधी वाटणारं भय. नुसती चिंता नव्हे तर अगदी पॅनिक अटॅक येईल इथपर्यंतची भीती
६) पौगंडावस्था. वयात येतानाचे शरीरातले बदल, खूप जवळच्या व्यक्तीबद्दल मनात आलेल्या लैंगिक भावनेवरून वाटणारी गिल्ट
७) घरातल्या पाळलेल्या प्राण्यांना इजा करावीशी वाटणे, इजा केल्यावर मिळणार सुप्त आनंद. आपली मुलं असं काही करत आहेत का यावर लक्ष असणे
खूप महत्वाचे
८) वर्षानुवर्ष अंथरुणाला खिळलेल्या व्यक्तीची सुश्रुषा करत असाल
९) एखादा अपघाततुन वाचलाय पण बरोबरच्या व्यक्तींचा मृत्यु झाला असेल तर
१०) कुठल्याही बाबतीतलं अनैसर्गिक ऑब्सेशन, लावलेली कडी ५० वेळा ओढून पाहायची, दर दोन सेकंदांनी हात धुवायचे, आपल्याला सारखं काही होईल याची अवास्तव भीती वाटत असेल तर
११) वरकरणी कुठलंही कारण नसताना एक दोन आठवड्याहून जास्त काळ टिकणारं नैराश्य, एरवी आनंद देणारी कुठल्याही गोष्टीत मन न रमणे
१२) मेनॅपॉज आणि तसाच पुरुषांत दिसणारा पण कमी माहित असणारा अँड्रोपॉज
१३) सततचा निद्रानाश
१४) प्रेमभंग (हसू नका. यापायी कित्येक आत्महत्या होतात), समलैंगिकता स्वीकारणं आणि त्याबद्दल सर्वांना सूचित करणं (coming out) –> मी याला मानसिक रोग म्हणत नाहीये हे समजा. पण आपल्या समाजात याचं दमन केलं जातं. याबद्दल एका प्रोफेशनल बरोबर बोलणं खूप महत्वाचं
अजून चिक्कार कारण आहेत पण हि मी जवळच्या लोकांमध्ये पाहिलेली कारण आहेत.
शेवटी सगळ्यात महत्वाचं – आपण दिवसाचे चोवीस तास, वर्षाचे ३६५ दिवस आनंदी असायचा हवंय या अपेक्षेपासून दूर राहा. रडा, भेका, चुप्प रहा, मरणाची बडबड करा पण ह्या भावना आहेत आणि आपण त्यांवर पुरून उरू शकतो हे लक्षात ठेवा. तुम्ही इतर कोणासाठीही महत्वाचे असण्याची गरज नाही. आई वडील, भावंडं, नवरा/बायको, मुलं, शेजारी पाजारी इन्क्लुडेड. तुम्ही स्वतः साठी महत्वाचे आहात. दुनियेत तुमचं योगदान आहे, नेहमीच राहणार आहे. ते लहान कि मोठं याची पर्वा करू नका. आयुष्य सुंदर आहे, ते त्या क्षणी नसेल तर त्यावर हळूहळू लहानमोठा मार्ग काढता येऊ शकतो, प्रत्येक लहान मोठी चूक सुधारता येऊ शकते याची जाणीव ठेवून स्वतःचं स्वतःला माफ करून टाका. तुम्हाला अगदी न आवडणारी माणसंही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात स्ट्रगल करत आहेत याचं भान असू द्या. ‘जगी सर्वसुखी असा कोण आहे’ हे लक्षात ठेवा
सगळ्यात महत्वाचं फक्त जगा!
-यावर खूप सहानुभूतीची कंमेंट तुम्हाला टाकावीशी वाटेल. त्याबद्दल मी आभारी आहे आणि सदैव राहीन पण मी ठीक आहे. हे सगळं असं भडाभडा ओकायला मला जवळपास एक दशक लागलंय पण मी लिहिलंय आणि पब्लिक सेटींग्स वर ठेवलंय हा माझा स्वतःचा त्या असहाय्य वाटणाऱ्या भावनेवर छोटासा विजय आहे म्हणून त्या कॉमेंट एवजी जर ही पोस्ट तुम्हाला शेअर करता येण्यायोग्य वाटत असेल तर प्लिज शेअर करा. अगदी कॉपी पेस्ट करून स्वतःच्या नावे टाकली तरी चालेल. तुम्हाला स्वतःचे अनुभव शेअर करता येत असतील तर अजूनच छान.
आपण बोलायला हवंय या सगळ्यावर! ते महत्वाचं
(लेखिका लंडन येथे माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील Capgemini या कंपनीत सिनिअर प्रोजेक्ट मॅनेजर आहेत)