5G मोबाईल नेटवर्कमुळे खरंच रेडिएशनचा धोका आहे?

-आशिष शिंदे

अभिनेत्री जुही चावलाने 5G नेटवर्कच्या तरंगांमुळे पर्यावरण आणि मानवी आयुष्यावर त्याचे विपरीत परिणाम होतात, असे नमूद करून 5G सेवेला विरोध करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात दाखल केली होती . मात्र न्यायालयानं ही याचिका रद्द करतांना जुही चावलाला  २० लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. सोबतच जुहीने ही याचिका केवळ प्रसिद्धीसाठी दाखल केली असल्याचंही उच्च न्यायालयानं म्हटलं आहे. जुहीप्रमाणेच अनेकांच्या मनात 5G नेटवर्कच्या तरंगांबाबत भरपूर समज – गैरसमज आहेत. पण या विषयात नेमकं सत्य काय आहे?हे आपण समजून घेऊया.

……………………………………………………..

थोडं बेसिक सायन्स माहीत असेल तर अशा वावड्यांना आपण बळी पडणार नाही. सगळ्या प्रकारचं रेडिएशन हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक (विद्युतचुंबकीय) असतं. या रेडिएशनलाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह सुद्धा म्हणतात (विद्युतचुंबकीय तरंग).  प्रकाश सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचाच प्रकार आहे. आपल्या रेडिओला सिग्नल सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. तसेच रेडिओतून बाहेर येणारा आवाज सुद्धा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन आहेत. म्हणजे दिसणे आणि ऐकू येणे या प्रक्रिया या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनला दिलेला प्रतिसाद आहेत.

इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचेबाबत  चार महत्वाच्या गोष्टी आपण समजून घेऊ.

१. वेग: सर्व इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा वेग 3 लाख किलोमीटर प्रती सेकंद म्हणजेच प्रकाशाच्या वेगाइतका असतो.

२. तरंगलांबी (वेव्हलेंथ): रेडिएशनचं एक आवर्तन.

३. वारंवारता (फ्रिक्वेन्सी): एका सेकंदामध्ये किती आवर्तनं होतात त्याची गणती.

४. अँप्लीट्युड म्हणजे तरंगाची तीव्रता. (करंट मोजताना अँप्लीट्युड अँपियरमध्ये मोजतात, पाण्यात तयार होणाऱ्या तरंगाचे अँप्लीट्युड मीटरमध्ये मोजतात.)

आता ठराविक अवयव/उपकरणं ठराविक फ्रिक्वेन्सी आणि वेव्हलेंथला रिस्पॉन्स देतात, म्हणजे त्यातून माहिती मिळवतात.

उदा. जेव्हा आपल्या डोळ्याच्या पडद्यावर प्रकाश (म्हणजे 400 ते 700 टेराहर्ट्झ (10^12 हर्ट्झ) फ्रिक्वेन्सी किंवा 380 ते 740 नॅनोमीटर (10^-9 मीटर) च्या दरम्यान असलेले इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन) पडतो तेव्हा आपल्याला दिसतं. म्हणजे डोळ्यातले सेन्सर त्या ठराविक फ्रिक्वेन्सी/वेव्हलेंथला excite होतात.

आता हे बघा आयोनायझिंग रेडिएशन नावाचा जो प्रकार आहे त्या रेडिएशनमुळे आपल्याला कॅन्सर वगैरे होण्याची भीती असते. हे रेडिएशन जास्त फ्रिक्वेन्सीचे असतात. म्हणजे प्रकाशाच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा जास्त. जास्त फ्रिक्वेन्सी असणारे रेडिएशन सहसा आयोनायझेशन घडवून आणतात. या रेडिएशनमुळे आपल्या पेशींच्या आत असलेल्या DNA, RNA म्हणजे गुणसूत्रांवर किंवा गुणसूत्र तयार करणाऱ्या प्रोटिन्समध्ये बदल घडून येऊ शकतो. दृश्य तरंगांपेक्षा कमी फ्रिक्वेन्सी असलेले रेडिएशन नॉन-आयोनायझिंग असते. हे आपल्याला शारीरिक इजा थेट पोहचवत नाहीत. नॉन-आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन जर उष्णता शोषून घेणाऱ्या पदार्थावर पडले तर ते पदार्थ मात्र गरम होतात. मायक्रोवेव्ह ओव्हन याच प्रिन्सिपलवर चालतो. मात्र यासाठी हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन खूप जास्त इंटेनसिटीचे म्हणजे अँप्लीट्युडचे हवेत आणि त्याचा मारा जास्त काळासाठी व्हावा लागतो. मोबाईलचे सिग्नल हे मायक्रोवेव्हपेक्षा कमी फ्रिक्वेन्सीचे असतात. म्हणजे त्यामुळे गरम होण्याचा धोका पण कमी असतो. सध्या 5G चे ट्रान्समिशन 2 पायऱ्यांवर होतात/भविष्यात होतील. मुख्य मोठा टॉवर, ज्याचं रेडिएशन 18 KWatt इंटेनसिटीने होतं आणि अनेक छोटे टॉवर ज्याचं रेडिएशन 1 KWatt पेक्षा कमी असतं. मोबाईलमध्ये/मोबाईलजवळ हे रेडिएशन साधारण 0.1 Watt असतं. 1990 मधल्या मोबाईल्समध्ये हे रेडिएशन साधारण 1 watt पर्यंत होतं.

उदा. मोबाईल रेडिएशनइतक्या फ्रिक्वेन्सीचे पण त्यापेक्षा 25 पट इंटेनसिटीचे म्हणजे अँप्लीट्युडचे रेडिएशन जर आपल्या शरीरावर सतत एक तास टाकले तर आपला शरीराचा भाग गरम होईल. पण किती गरम होईल? तर उन्हात साधारण 5 मिनिटं उभारल्यावर जेवढं गरम होईल तेवढं. त्यापेक्षा जास्त नाही.

मोबाईल टॉवर्समधून येणारे रेडिएशन  धोकादायक आहेत का?

मोबाईल टॉवरच्या वर मोबाईल अँटेना लावलेले असतात. ते आकाराने टॉवरच्या मानाने बरेच लहान असतात. त्यातून येणारं रेडिएशन दर मीटरला साधारण 3-5 टक्क्याने कमी होतं. साधारण 100 मीटरनंतर हे रेडिएशन मोबाईलमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनसारखं असतं. (म्हणजे तेवढं कमी धोकादायक).

मोबाईल टॉवरच्या बरोबर खाली राहणाऱ्या लोकांना किती धोका असतो?

मोबाईल टॉवरच्या बरोबर खाली त्या टॉवरचं थेट रेडिएशन पोहचतचं नाही. आजूबाजूच्या इमारतीना धडकून परत आलेलं रेडिएशन त्या मोबाईल टॉवरच्या खाली असलेल्या लोकांना मिळतं. त्यांच्यापर्यंत पोहचेपर्यंत  हे रेडिएशन 100 पटींनी कमी झालं अकतं. म्हणजे त्यांना पण धोका नसतो.

खरतरं मोबाईल रेडिएशनपेक्षा मनुष्याला थेट सूर्यप्रकाश जास्त धोकादायक आहे.

त्यामुळे मोबाईल रेडिएशनच्या, 5Gच्या नावाखाली लोकांच्यात भीतीचं वातावरण निर्माण करणं हे अंधविश्वास पसरवणे या कॅटेगरीत मोडलं पाहिजे . सध्या अमेरिकेच्या फूड अँड ड्रग ऑडमिनीस्ट्रेशन या सरकारी संस्थेने 5G बद्दल इत्थंभूत माहिती आपल्या वेबसाईटवर दिलेली आहे. त्याशिवाय नेचर आणि IEEE वगैरे रिसर्च जर्नलमध्ये या विषयावर अनेक रिसर्च आर्टिकल आहेत.

सामान्य नागरिकांना हा विषय आत्ता आत्ता महत्वाचा वाटतोय पण टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये या विषयावर मागील  20 वर्षे संशोधन होत आहे. त्या संशोधनातून 5G नेटवर्क, त्याचे तरंग धोकादायक वा मनुष्य व पक्षी-प्राण्यांना हानीकारक आहे,असा कुठलाही निष्कर्ष निघालेला नाही. उलट त्याची  सुरक्षितता वारंवार सिद्ध झालेली आहे.

(लेखक इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विषयातील जाणकार आहेत)