सत्ता जेव्हा शाप वाटते…

भारताचे माजी पंतप्रधान नरसिंह राव यांच्या जन्मशताब्दी वर्षाला नुकतीच सुरुवात झाली आहे. १९९१ ते १९९६ या अत्यंत अडचणीच्या काळात देशाची धुरा समर्थपणे सांभाळणाऱ्या या नेत्याचे माध्यम सल्लागार असलेले  पी.व्ही. आर.के प्रसाद यांनी Wheels Behind The Veils या पुस्तकात शब्दबद्ध केलेल्या नरसिंह राव यांच्या आठवणी त्यांच्या रूढ प्रतिमेला पूर्ण छेद देणाऱ्या आहेत. देशाच्या एका माजी पंतप्रधानाला आपल्या वकिलांची फी देण्यासाठी घर विकायला काढावे लागते, हे वाचून चकित व्हायला होतं. एक थोर नेत्याच्या या आठवणी वाचायलाच हव्यात अशा आहे.

(साभार : साप्ताहिक साधना)

-पी.व्ही.आर.के.प्रसाद

‘प्रसाद, माझे एक छोटेसे काम तुम्ही करू शकाल का?’ देशाचा कारभार पाच वर्षे यशस्वीपणे चालवणारे आणि देशाची मान जगात उंचावणारे माजी पंतप्रधान पी.व्ही. नरसिंह राव आपले छोटेसे काम करण्यासाठी माझ्याकडे- त्यांच्या माजी माध्यम सल्लागाराकडे- आले होते. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने त्यांची (२००४ मध्ये) सर्व न्यायालयीन खटल्यांमधून निर्दोष मुक्तता केली होती. नरसिंह राव पंतप्रधान असताना झारखंड मुक्ती मोर्चाच्या खासदारांना अविेश्वास ठरावाच्या वेळी सरकारच्या बाजूने मतदान करण्यासाठी पैसे दिल्याच्या संदर्भात या सर्व केसेस होत्या. त्या खटल्यांचा निकाल लागल्यावर काहीच दिवसांनी ते हैदराबादला आले होते.

मी त्यांना विचारले- ‘‘सर, तुम्हाला काय मदत हवी आहे, हे नि:संकोचपणे सांगा. पण तुम्हाला हे माहीतच आहे की, मी मोठी कामे करू शकत नाही.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘माझे हैदराबादच्या ज्युबिली हिल्स भागातील घर विकायला तुम्ही मदत करू शकाल का?’’ मी म्हणालो, ‘‘सर, माजी पंतप्रधान या नात्याने तुम्हाला सरकारी खर्चाने घर, वैद्यकीय मदत, काही नोकर आणि मासिक पेन्शन मिळते. मग तुमचे हे एकमेव घर तुम्हाला का विकायचे आहे?’’ त्यांच्या सर्व मुलींची लग्ने झाली होती. माझ्या माहितीनुसार, त्यांनी कोणाहीकडून मोठ्या रकमेचे कर्ज घेतले नव्हते. आंध्र प्रदेशाचे मुख्यमंत्रिपद सोडल्यावरच त्यांना काही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता.

मला फार पूर्वीची एक घटना आठवली. नरसिंह राव आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री असताना (१९७२ मध्ये केव्हा तरी) त्यांच्याकडे दहा लाख रुपयांचे पाकीट देण्यात आले होते. ते पाकीट ते काही नेत्यांना देणार होते. तेव्हा माझा प्रश्नार्थक चेहरा पाहून त्यांनी सांगितले होते की, ‘‘काँग्रेस पक्षाच्या दिल्लीतील खजिनदारांनी हे पाकीट मला दिले आहे. पक्षाकडून मिळत असलेल्या पै न्‌ पैचा हिशेब मला द्यावा लागतो. माझ्याविरुद्ध असलेल्या अनेक तक्रारींपैकी एक तक्रार हीही आहे की, मी एक मुख्यमंत्री असूनसुद्धा पक्षाला काहीही (आर्थिक) मदत करू शकलो नाही. याउलट, पक्षाच्या खर्चासाठी पक्षाच्या हायकमांडनेच मला पैसे दिले आहेत.’’

मुख्यमंत्री असताना जरी पक्षाचे लाखो रुपये नरसिंह रावांनी हाताळले होते, तरी त्यांना त्याच सुमारास वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या आपल्या मुलीच्या फीचे पैसे भरणे  कठीण गेले होते. अतिशय अवघड परिस्थितीचा सामना करीत त्यांनी आपल्या मुलींची लग्ने केली होती. त्यांच्या एका मुलाच्या शिक्षणाची काही जबाबदारी त्यांच्या जावयाला घ्यावी लागली होती. म्हणजे आंध्र प्रदेशात मंत्री असताना आणि मुख्यमंत्रिपद भूषवताना नरसिंह रावांनी ‘व्यावहारिक’ शहाणपण दाखवले नव्हते.

पुढे दिल्लीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पार पाडल्या होत्या. केंद्रीय मंत्रिमंडळात गृह, संरक्षण, परराष्ट्र आणि मनुष्यबळ विकास इत्यादी खात्यांची कॅबिनेट दर्जाची मंत्रिपदे त्यांनी सांभाळली होती. आणि ते काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस व अध्यक्षसुद्धा झाले होते. सन १९९१ते १९९६ अशी पाच वर्षे तर ते देशाचे पंतप्रधान होते. त्यामुळे इतक्या वेगवेगळ्या आणि महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या व्यक्तीवर आपले हैदराबादमधील एकमेव घर विकायची वेळ का आली असावी, असा प्रश्न मला पडला.

मला त्यांच्याविषयी खूप काही माहीत नाही, या अर्थाच्या आश्चर्याने त्यांनी माझ्याकडे पाहिले आणि ते म्हणाले, ‘‘प्रसाद, मी सर्व न्यायालयीन खटल्यांमधून निर्दोष सुटलो याचे सर्व श्रेय माझ्या वकिलांना जाते. त्यांच्यापैकी एकानेही माझ्याकडे कधीही आपल्या कामाचा मोबदला मागितला नाही. उलट, मी जेव्हा आणि जेवढे काही देऊ शकलो तेवढे पैसे त्यांनी (तक्रार न करता) स्वीकारले. तुम्हाला हे माहीत आहे का, की मी त्यांना माझ्या ‘द इनसायडर’ या पुस्तकाच्या वेळोवेळी मिळणाऱ्या रॉयल्टीमधून टप्याटप्याने पैसे दिले. मी पंतप्रधानपद सोडल्यानंतर ते पुस्तक लिहिले. जरी माझ्यावर तीनच खटले होते तरी मला जिल्हा न्यायालये, उच्च न्यायालये आणि सर्वोच्च न्यायालयात ते लढावे लागले. त्या सर्व केसेस भ्रष्टाचाराविषयीच्या होत्या; परंतु कोणत्याही केसमध्ये मी स्वतःसाठी भ्रष्टाचार केला, असा आरोप नव्हता. माझे नाव मी इतरांना वापरायला दिले, असा तो आरोप होता. परंतु राजकीय सूडबुद्धी आणि खटल्यांच्या होणाऱ्या जाहिरातीमुळे जेव्हा जेव्हा कोर्टाने माझ्या बाजूने निकाल दिला, त्या प्रत्येक वेळी त्याविरुद्ध अपील केले गेले. इतक्या वर्षांत अनेक वरिष्ठ आणि कनिष्ठ वकिलांना अनेक कोर्टांत माझी बाजू मांडावी लागली. त्यामुळे माझ्या वकिलांचे मी लाखो रुपयांचे देणे लागतो. पण मला अशी भीती वाटते की, मी माझ्या वकिलांचे पैसे न देताच या जगातून निघून जाईन.’’

त्यांचे बोलणे ऐकून माझे मन पंधरा वर्षे मागे गेले. त्यांच्यासारख्या महनीय व प्रतिष्ठित व्यक्तीला आपल्या वकिलांचे पैसे देण्यासाठी घर विकायची वेळ येऊ शकते, यावर माझा विेशास बसेना. देशाच्या इतिहासातील अतिशय कठीण प्रसंगी त्यांनी पंतप्रधानपद स्वीकारले होते.  तसे करताना त्यांनी संतपद स्वीकारून कोर्टल्लम पीठाचे अधिपती होण्याचा आपला निर्णय बाजूला ठेवला होता. ते पंतप्रधान झाले तेव्हा भारताला परकी चलनाची तीव्र कमतरता भरून काढण्यासाठी देशाच्या तिजोरीतील काही टन सोने लंडनमध्ये गहाण ठेवून पैसे उभारावे लागले होते. त्यानंतर पंतप्रधान नरसिंह रावांनी देशात उदारीकरण व जागतिकीकरण यांचे युग कसे आणले, देशाला आर्थिक आपत्तीमधून बाहेर कसे काढले आणि आर्थिक वाढीच्या महामार्गावर कसे आणून सोडले याचे जगाला कुतूहल होते. त्यांनी नव्वद कोटी भारतीयांना अभिमान वाटावा, अशी कामगिरी केली होती.

नरसिंह रावांचे बोलणे ऐकून मी स्वतःला रोखू न शकल्याने त्यांना प्रश्न विचारला- ‘सर, त्या घराचे चांगले भाडे तुम्हाला मिळत असेल ना?’ त्यावर ते म्हणाले, ‘‘नाही. १९९१ च्या निवडणुकांच्या थोड्याच आधी मी भाडेकरूला घर खाली करायला सांगितले आणि दिल्लीत मला काही काम नसल्याने माझे सर्व सामान- मुख्यतः पुस्तके- दिल्लीहून हैदराबादला हलवली. त्यानंतर पक्षाने मला पक्षाध्यक्ष आणि पंतप्रधान केले. तेव्हापासून घर रिकामेच आहे.’’ ते ऐकून मी आपल्या अज्ञानाबद्दल माझी जीभ चावली. ए.व्ही.आर कृष्णमूर्ती हे त्यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी होते. तेच त्यांचे उत्पन्न आणि खर्च व बाकी कुटुंबविषयक व्यवहार पाहत असत. त्यामुळे मला त्यांच्या आर्थिक स्थितीची कल्पना कधी आली नाही.

मी पी.व्हीं.ना विचारले, ‘‘तुम्ही तुमचे बाकीचे आयुष्य घराशिवाय काढायचा विचार केला आहे का?’’ ते उत्तरले, ‘‘त्याबाबत विचार करावा असे काय आहे? माझी सर्व मुले स्वतंत्रपणे राहतात आणि मला एकट्याने जगण्याची सवय आहे. मला वरण-भात खाऊन जगता येईल, जे मला माजी पंतप्रधान या नात्याने मिळत आहेच. जरी मी आजारी पडलो तरी माजी पंतप्रधान हे स्टेटस माझ्या मदतीला येते. आणि मला एकट्याला राहण्यासाठी व माझे अनुभव लिहिण्यासाठी अशी किती जागा लागणार आहे?’’ त्यांचा तो बेफिकीर दृष्टिकोन पाहून मी चकित झालो. एके काळी पंतप्रधान असताना तीन बंगल्यांत राहिलेली ही व्यक्ती स्वतःच्या भविष्याविषयी अजिबात चिंता करीत नव्हती.

माझी विचारांची साखळी त्यांच्या बोलण्यामुळे तुटली. मूळ विषयाकडे परत येत त्यांनी मला विचारले, ‘‘तुम्हाला असे वाटते का, की मला त्या घराचे चांगले पैसे मिळतील? जरी समजा नसतील मिळत, तरी हरकत नाही. माझ्या वकिलांचे पैसे दिल्याशिवाय माझी सदसद्‌विवेकबुद्धी मला शांत बसू देणार नाही. कृष्णमूर्तींचा मुलगा प्रसाद माझ्या घराची देखभाल करतो. तुम्ही दोघे मिळून घराचा व्यवहार पार पाडा. मी अजून दोन पुस्तके लिहून संपवली आहेत. ती पुस्तके कधी प्रकाशित होतील आणि त्यांची रॉयल्टी मला कधी मिळेल, हे माहीत नाही. त्यामुळे माझ्या रॉयल्टीचे पैसे मिळेपर्यंत मी वकिलांना थांबवू इच्छित नाही. जर मधेच मला काही झाले तर?’’

नरसिंह रावांच्या सचोटीविषयी मला कधीही शंका नव्हती, परंतु त्यांचे हे शब्द अद्‌भुत वाटत होते. मला आठवतंय- ते सत्तेत होते, तेव्हा पक्षाने त्यांच्या सर्व कार्यक्रमांसाठी खर्च केला होता, ज्याची रक्कम लाखो रुपयांत होती. पीव्हींच्या सिक्रेट मिशनचा भाग म्हणून अयोध्येत राम मंदिर बनवावे, यासाठी तयार केल्या गेलेल्या ट्रस्टच्या कामासंदर्भात मला अनेक ठिकाणांना भेटी द्याव्या लागत असत. अशा वेळी काँग्रेस पक्षानेच माझ्या विमानप्रवासाचा खर्च केला होता, काही वेळा तर स्पेशल विमानाचीसुद्धा व्यवस्था केली गेली होती.

एकदा मला या ट्रस्टच्या कामासाठीच पेजावर मठाचे विेशतीर्थ स्वामीजी आणि पंतप्रधान नरसिंह राव यांची एक गुप्त भेट आयोजित करावी लागली होती. दुसऱ्या दिवशी स्वामीजी बद्रीनाथ येथे त्यांची ‘चातुर्मास दीक्षा’ सुरू करणार होते. त्यामुळे पंतप्रधानांना संध्याकाळी भेटून त्याच दिवशी रात्री स्वामीजींना बद्रीनाथला परतणे भाग होते. केवळ काही तासांत ते बद्रीनाथला कसे पोहोचू शकत होते? मला त्यांच्या व्यवस्थेबाबत काहीही माहिती नव्हती, म्हणून मी पंतप्रधानांना भेटून त्यांना याची कल्पना दिली. त्यांनी त्यांचे स्वीय सहायक राम खांडेकरांना सीताराम केसरींशी बोलायला सांगितले. त्यापुढील दोन तासांत स्वामीजींना बद्रीनाथला घेऊन येण्यासाठी एक हेलिकॉप्टर तयार होते. काशीच्या श्री मठाचे स्वामीजी आणि द्वारकेचे शंकराचार्य यांच्यासाठीसुद्धा मला अशीच व्यवस्था करावी लागली होती. मी पंतप्रधानांना या व्यक्तींच्या वेळेबद्दलच्या निकडीची कल्पना देत असे आणि ते त्यांची व्यवस्था लावत असत.

त्याचप्रमाणे आम्ही त्या काळात पंतप्रधानांच्या नावाने अनेक ठिकाणी प्रार्थना आयोजित करीत असू. त्याचाही खूपच खर्च होत असणार. पंतप्रधानांचा माध्यम सल्लागार या नात्याने मला माध्यमांतील अनेक व्यक्तींची ‘नीट’ काळजी घ्यावी लागत असे. काँग्रेस पक्षाने जाहिराती, शॉर्ट  फिल्म्स आणि प्रचाराचे इतर साहित्य यांची निर्मिती व वाटप यावर कोट्यवधी रुपये खर्च केले असावेत. पक्षाचे खजिनदार सीताराम केसरी यांच्याकडे निधी उभारणे, त्याचा वापर करणे आणि त्याचा हिशेब ठेवणे याची जबाबदारी होती. त्यांनी नरसिंह रावांना माहिती न देता काहीही केले असणे शक्य नाही.

पंतप्रधानांनी पक्षासाठी देणगीच्या स्वरूपात कोट्यवधी रुपये उभारले असतील. तो संदर्भ लक्षात ठेवून मी पंतप्रधानांना विचारले, ‘‘सर, तुम्ही कोट्यवधी रुपये हाताळले असतील. आता तुम्ही कसे काय आपल्या वकिलांचे पैसे देऊ शकत नाही?’’ पीव्हींनी माझ्याकडे अविेश्वासाने बघितले. म्हणाले, ‘‘काय बोलत आहात प्रसाद? माझ्या हाताखालून गेलेले पैसे हे पक्षाचे होते. त्याचा मी स्वतःच्या फायद्यासाठी कसा वापर करू शकतो? जेव्हा जेव्हा देणगीदार मला भेटायचे, तेव्हा तेव्हा त्यांना मी सीताराम केसरींकडे पाठवायचो. अशा पैशाचा काही भाग आपल्याजवळ ठेवावा; जेणेकरून त्याचा भविष्यात उपयोग होईल, असा विचार मला शिवलासुद्धा नाही.’’

त्यांचे हे बोलणे ऐकून, कोर्टाने निर्दोष सोडल्याच्या आनंदात असताना आणि आपल्या वकिलांचे पैसे परत करायला उत्सुक असताना त्यांना चुकीचा प्रश्न विचारल्याबद्दल मला पश्चात्ताप झाला. खरे तर त्यांच्यावर चारच केसेस होत्या. परंतु जेव्हा ते एखादी केस खालच्या कोर्टात जिंकत असत, तेव्हा त्यांचा विरोधक किंवा सीबीआय त्यावर अपील करीत थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत जात. परिणामी, पंतप्रधानपद सोडल्यावर त्यांना कोर्टाच्या वाऱ्या सातत्याने कराव्या लागल्या. वय आणि केसेसचा ताण यांचा त्यांच्या शरीरावर परिणाम करू लागला, तसतसा त्यांचा उत्साहही मावळू लागला. त्यांनी स्वतःसाठी पैसे कमावले नव्हते (याबद्दल त्यांच्या एका मुलाने आपला राग जाहीररीत्या व्यक्त केला होता.) आणि लोकांवर मेहेरनजर करून पक्षात स्वतःचा असा गटसुद्धा तयार करण्याचा प्रयत्न केला नव्हता.

पीव्ही यांच्यामुळे ज्यांचा फायदा झाला असे पक्षाचे नेते, राज्यांचे मुख्यमंत्री यांनी पीव्ही सत्तेबाहेर जाताच त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. काहींना असे वाटत होते की, पीव्ही हे माणूस म्हणून खूपच चांगले असल्याने आपल्या अशा वागण्याचा त्यांना त्रास होणार नाही. तर पीव्हींच्या नंतर आलेल्या पक्षनेतृत्वाची आपल्यावर खप्पा मर्जी होऊ नये, म्हणून काही जण जाणीवपूर्वक दूर राहिले. त्यामुळे शेवटी पीव्हींवर स्वतःची काळजी घेण्याची वेळ आली. या त्यांच्या शेवटच्या दिवसांत त्यांना केवळ त्यांच्या स्टाफवरील लोकांनी (म्हणजे ए.व्ही.आर.कृष्णमूर्ती, रामू दामोदरन, राम खांडेकर, रतन वत्तल आणि मी) सोडले नव्हते.

आपण खूपच बोललोय असे लक्षात आल्याने मी माझी चूक सुधारण्याचा प्रयत्न केला. मी त्यांना विचारले, ‘‘सर, तुमच्यामुळे असंख्य लोकांचा फायदा झाला असेल… त्यांच्यापैकी कोणालाही जर तुमची परिस्थिती कळली, तर ते तुमच्या मदतीला येऊ शकतील.’’ माझ्या या प्रश्नावर ते म्हणाले, ‘‘प्रसाद, मी कोणालाही या भावनेने मदत केली नाही की, ती व्यक्ती कायम माझ्या ऋणात राहावी. मग त्यांना आता मी मदत कशी मागू? मी कायम सत्तेला लोकांची सेवा करण्याचे पवित्र साधन मानले. माझ्या वैयक्तिक फायद्यासाठी मी तिचा उपयोग केला नाही. सत्तेचा दुरुपयोग करणाऱ्यांसाठी ती वरदान असू शकते. मात्र माझ्यासारख्या लोकांसाठी तो एक शाप आहे. सर्व कठीण प्रसंगांत माझी साथ सोडली नाही, अशा लोकांसाठीसुद्धा मी काही करू शकलो नाही; आता मी का अशी अपेक्षा करावी की… कोणी तरी माझी चौकशी करीत येईल? मला माझ्या कर्माची फळे भोगलीच पाहिजेत.’’

हे ऐकून माझ्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. ते घराच्या कागदपत्रांविषयी काही बोलले आणि निघून गेले. मी घराच्या विक्रीची व्यवस्था करण्यापूर्वीच २३ डिसेंबर २००४ला त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्यांनी आपल्या वकिलांचे पैसे परत दिले की नाही, हे मला माहीत नाही.

(अनुवाद : संकल्प गुर्जर)

हे सुद्धा नक्की वाचा – रावांचा काटेरी मुकुट ‘हवाला’ने दाखवलाhttps://bit.ly/2YTFDdu

Previous articleएसटी जगवा, ही तो विठुरायाची इच्छा!!
Next articleरावांचा काटेरी मुकुट ‘हवाला’ने दाखवला
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here