एसटी जगवा, ही तो विठुरायाची इच्छा!!

– रघुनाथ पांडे

‘लालडब्बा’ अशी लाडिक ओळख असलेल्या ‘एसटी’ची दोन छायाचित्रे मनात पक्की घर करून बसली. वाटले आता तर एसटी जगली पाहिजे. कितीही समस्या, अडचणी, तोट्याची गणिते तिच्या अस्तित्वाला बिलगून राहिली तरी एसटी फिरफिर फिरली पाहिजे. तिची टिंगटींग घुमली पाहिजे. तिची खडखड असो की, ढरढर..सगळे वाजले पाहिजे. तरीही एसटी धावली पाहिजे. एसटी म्हणजे जिवाभावाची मोटार. तिची सोबतच न्यारी. गाव जंगलात शाळा असो, की बाळंतपणाची कळ असो…सगळे सगळे या एसटीसोबत घडले. विश्वासाची, हक्काची सुखदुःखाची सखी म्हणजे, एसटी!! गावखेड्याच्या कित्तिक आठवणी या लालडब्यासोबत जोडल्या आहेत. लग्नाची वरात ते शाळेची सहल. प्रेमाचा मामला ते काडीमोडासाठी कोर्टाची चक्कर…सबकुछ एसटीच!

एसटी म्हणजे आयुष्याच्या ऊनसावलीचा कॅलिडिओस्कोप आहे. तिची सिंगल – डबल बेल म्हणजे धावण्या- थांबण्याचे संकेत नाहीत, तर आयुष्याच्या धावपळीचा हिशोब आहे!! लोक विमान प्रवासाच्या गमज्या मारतात,पण एसटीत बसण्याचे स्वप्नही कित्येकाचे राहून गेले आहे. एसटी न पाहिलेली असंख्य गावे अजूनही महाराष्ट्रात आहेत. गावात एसटी सुरू करा,म्हणून अनेक गावकरी निवेदने देत असतात,मागणी करत असतात. एसटीच्या आगमनाचे सोहळे बँडबाजा लावून, फटाके फोडून साजरे होतात. गावखेड्यातील मुली निर्धास्त होऊन शहरात शाळा-कॉलेजात एसटीनेच जातात. जगातील नामवंत मोटारींचे ब्रँड आणि कारखानदारी महाराष्ट्रात आली आहे, पण रात्रीच्या मुक्कामी गावात थांबलेली एसटी बघून आनंद पावणाऱ्या पिढ्या अजूनही एसटीच्या गोष्टी सांगतात.

अन्न, वस्त्र, निवारा आणि गावात येणारी एसटी असा मूलभूत गरजांचा जामानिमा याच महाराष्ट्राने अनुभवला. एसटीमधील काही आसने आमदार, खासदारांसाठी आरक्षित असतात. किती आमदार-खासदारांनी अलीकडच्या काही वर्षांत या “लालडब्यातून” प्रवास केला ते नाही सांगत यायचे. पण पक्के ठाऊक आहे, खिडक्यांवर आरक्षित आसनांची यादी लिहिली असते. मातीशी नाळ असलेल्या काही वयोवृद्ध आमदारांनी प्रवास केल्याचे फोटो-बीटो, त्यांच्या कौतुकाच्या बातम्या पाहण्या- वाचण्यात आल्याही; पण ते सगळे बोटावर मोजण्याइतकेच !

अशा ओल्या-सुक्या वातावरणात कोरोना आला. त्याने आमच्या एसटीला ग्रासले. पण माघार घेईल ती एसटी कसली? तिनेही भर कोरोनात आपली सेवा बजावली. ग्रीन झोनमध्ये असलेल्या जिल्ह्यात ती तत्परतेने फिरली…फिरता फिरता एक दिवस तिने कमालच केली. १० हजार बसेसच्या भरून  राज्यभरामध्ये लोकांना त्यांच्या गावी वा तालुक्याला तिने सुखरूप सोडले. ती राज्यस्थानातील कोट्याला गेली. शिकणाऱ्या मुलांना घेऊन आली. परराज्यातल्या मजुरांना घेऊन ती त्यांच्या राज्याच्या सिमेपर्यंत गेली. ती अगदी योध्यासारखी झुंजली !!तिचे हे मोठेपण समाजाला नक्कीच दिसले. जाणवले. तिच्या ‘असण्याचे मोल’ संवेदनशील मनाला रुंजी घालून गेले…अगदी तसेच ते देवगडच्या आजोबांना आणि आळंदीतून पंढरपूरला प्रथमच एसटीने गेलेल्या माऊलीला सुद्धा नक्कीच जाणवले असणार!!

पहिला फोटो सगळ्यांनी पाहिला, तो कोकणातील देवगडच्या एसटी स्टँडवरचा. लॉककडाउन दीड महिन्यांनी शिथिल झाल्यावर जिल्ह्यात एसटी बस धावायला सरकारने परवानगी दिली. गावापासून दूर असलेले एक आजोबा पुन्हा घरी जायला मिळतंय या आनंदात एसटी स्टँडवर पोहोचले. बस फलाटावर लागली. गावाच्या नावाची घोषणा झाली. आजोबा बसच्यादिशेने निघाले. तिला पाहताच ते आनंदून गेले…जणू हिच्याच शोधात ते इतके दिवस लॉकडाऊन होते!! त्यांनी बसमध्ये शिरण्यापूर्वी बसच्या दरवाज्याला आपला माथा टेकवला. काही क्षण ते तिथेच स्वतः ला हरवून गेले.. ते विलक्षण ममत्वाचे दृश्य देवगडचे छायाचित्रकार वैभव केळकर यांनी टिपले. समाजमाध्यमावर ते प्रचंड गाजले. प्रसिद्ध टीव्ही कलावंत श्रीजीत मराठे यांनी ते छायाचित्र कॉपीराईट कर,असा सल्ला केळकर यांना दिला..इतके भावविभोर दृश्य सर्वांनी मनात जपले. तो केवळ एक फोटो नाही, तर “एसटी बस” नावाच्या यंत्रणेवर असलेला विश्वास आहे.

दुसरे छायाचित्र मंगळवारी दुपारचे. पुण्याजवळच्या दिवेघाटातील. या घाटातील  वारीचे विहंगम दृश्य आनंद, उत्साहाचे जगणे असते. दरवर्षी आपण ते बघत असतो, अनुभवत असतो, डोळ्यांत साठवीत असतो.  लाखो वारकरी, भगवे ध्वज, पताका असे सगळे बघून हरिनामाची नुस्ती धुंदी प्रत्येकाला चढते. भक्तीचा ठेवा नजरेत पडत असतो….त्याच ऐतिहासिक दिवेघाटात यापूर्वी कधीच नव्हे असे दृश्य छायाचित्रकारांनी टिपले. चित्र बोलत होते. संवाद साधत होते. गलबलून आले. डोळ्यांच्या कडा पाणावल्या. पांढऱ्या सरकारी मोटारीचा ताफा, पोलीसांच्या व्हॅन आणि अग्रभागी हारांच्या माळांनी लपेटलेली ” एसटी” होती… त्या बसमध्ये माऊलींच्या पादुका होत्या. श्री क्षेत्र आळंदी येथून आषाढी एकादशीसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका पंढरपूरकडे एस टी बस मधून मार्गस्थ झाल्या होत्या. ती निव्वळ एसटी नव्हती. हारफुलांचे आच्छादन असलेला ‘माऊलींचा रथ’ होता. साक्षात माऊलींनी आपले प्रस्थान यंदा एसटीतून ठेवले होते. माऊलींपाठोपाठ त्रंबकेश्वरातून निवृत्तीनाथ, देहूतून तुकोबाराय, सासवडातून सोपानदेव, खान्देशातून मुक्ताबाई, कौडण्यपुरातून रुख्मिणी असे सगळे ‘एसटीतून’ पंढरीला मार्गस्थ झाले. निवृत्तीनाथ ‘विठाई’ नावाच्या बसमधून निघाले. अर्थात, एसटीने नेहमी आपले रूप बदलले.एशियाड, शिवनेरी, हिरकणी, शिवशाही असे तिचे बारसे होत गेले. लालडब्याची ती कधी ‘लालपरी’ झाली ; आता तर ती निवृत्तीनाथांची ‘विठाई’सुद्धा झाली..!!

संतांचा हा ‘एसटी’प्रवास योगायोग नक्कीच नाही. सर्वसामान्य नागरिकांचे हक्काचे वाहन असलेल्या ‘एसटी’ नावाच्या ‘रथा’ने कमावलेला हा विश्वास आहे. ज्यावर देवानं शिक्कामोर्तब केले…म्हणून एसटी जगली पाहिजे. ती फिरफिर फिरली पाहिजे. तिची घंटी वाजली पाहिजे. आता जे माऊलींना वाटते, तेच राज्यकर्त्यांना वाटले पाहिजे. नफा-तोटा होत राहील. अवैध वाहतुकीने एसटी महामंडळाला हजार- बाराशे कोटींचे नुकसान दरसाल होते. तोटा शिगेला पोचतो. गेल्यावर्षीचा (२०१८-१९)  वार्षिक तोटा ८६२ कोटी होता. एसटीचा तोटा हा कधीच काबूत येणे नाही. तो आणायचा असेल तर, महामंडळामध्ये असलेली राजकीय लुडबुड थांबवावी लागेल. जाणकारांच्या हाती नियोजनाची सूत्रे सोपवावी लागतील. आजवरच्या कोणत्याच राजकर्त्यांनी एसटीला सुगीचे दिवस आणले नाहीत. टायर, रंग ,स्पेअरपार्ट आणि कर्मचारी भरतीमधून घरे भरली; पण दमलेल्या वाहक- चालकांसाठी डेपोत असलेली रेस्ट रूम कधीच उत्तम केली नाही, की प्रसन्न वाटतील अशा सोयी-सुविधा दिल्या नाहीत. ती कायम खुरडा राहिली. राजकारणाच्या बजबजपुरीत एसटीतील संघटना बरबटल्या; त्यांचे नेतेही प्रसंगबघून वाकू बोलू लागले…असे खूप काही एसटीने सहन केले आणि कर्जाच्या- तोट्याच्या ओझ्याखाली तिची चाके रूतू लागली. चंद्रभागेच्या वाळवंटात ती चाके संतांच्या पादुका घेऊन आली; त्यामुळे ती आज धन्य झाली.. एस. टी. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना कर्नाटक सरकार प्रमाणे जेवढी जास्त रक्कम जमा करतील; तेवढी टक्केवारी व पगार देऊन पहा आपले मावळेही गाडी थांबवून प्रवाशी गोळा करतील; महामंडळ नफ्यात नक्कीच आणतील. सव्वालाख कर्मचारी एसटीच्या सेवेत असले तरी त्यांचे कुटुंब राज्यभर पसरले आहे. तो पसारा कोट्यवधी जनांचा आहे. संतांच्या पादुका घेऊन मोजकेच  चालक  पंढरीला गेले असले तरी, तो एकटा नव्हता, लाखांचा एक वारकरी म्हणून त्याची सेवा विठुचरणी लीन झाली, अशी भावना एसटीच्या समस्त कर्मचाऱ्यांची नक्कीच झाली असेल. एसटीच्या उत्पन्नाचा स्रोत फारसा मोठा नाही, त्यामुळे खर्च कमी करून उत्पन्न कसे वाढवता येईल,त्याकडे परिवहन मंत्री अनिल परब लक्ष देतीलही.  आजवर कैक योजना आल्या-गेल्या पण एसटी सुधरू शकली नाही. तुटक्या- फुटक्या एसटीत ग्रामीण महाराष्ट्र आनंदाने बसला. आता हा “गाडा” लोककल्याणासाठी ओढावा लागेलच. कारण एसटीतून माऊलींच्या पादुकांनी प्रस्थान ठेवले. त्यामुळे सर्वसामान्य वारकऱ्यांचे वाहन म्हणून तिला जगवण्याची इच्छा ही साक्षात विठ्ठरायाची समजा.

(लेखक दैनिक ‘पुण्यनगरी’ च्या विदर्भ आवृत्तीचे संपादक आहेत)

संपर्क : ९८१८२१३५१५

——-

Previous articleधर्माचे वेड पांघरलेले विचारवंत
Next articleसत्ता जेव्हा शाप वाटते…
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.