धर्माचे वेड पांघरलेले विचारवंत

अतुल विडूळकर
————————————

वारकरी मार्ग हा वरवर धार्मिक-आध्यात्मिक परंपरेचा मार्ग वाटत असला तरी त्याच्या स्थापनेमागचा हेतू केवळ ईश्वरभक्तीचा एक नवा संप्रदाय निर्माण करणे नाही. खरतर संत नामदेवांनी उभारलेलं ते समतेचं आद्य आंदोलन आहे. चळवळ आहे.

संविधान अभ्यासक सुभाष वारे म्हणतात त्याप्रमाणे, “समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्व म्हटले की प्रत्येक वेळी फ्रेंच राज्यक्रांती आठवण्याची गरज नाही. उदरामतवाद म्हटले की युरोपातील रेनेसांस म्हणजे युरोपियन प्रबोधन परंपरा आठवण्याची गरज नाही. तर ही प्रबोधन परंपरा आपल्याच संतविचारात पाहायला मिळते. संतांनी सांगितलेली मूल्यव्यवस्था आणि संविधानाने सांगितलेली मूल्यव्यवस्था ही परस्परपूरक आहे”.

श्री सुभाष वारे यांचं मत मध्ययुगीन काळातील जातीय व्यवस्थेच्या संदर्भात ‘क्रॉसचेक’ करून बघितलं की वारकरी मार्गाच्या स्थापनेमागील कारणं स्पष्टपणे दिसतात. जगाच्या इतिहासात समता, स्वातंत्र्य आणि बंधुता ही आधुनिक मूल्ये मानली जातात. राजेशाही आणि सरंजामशाहीनंतर जी लोकशाही राज्यप्रणाली अस्तित्वात आली त्यामागची मूळ प्रेरणा म्हणजे ही मूल्ये.

वारकरी मार्ग या ‘Democartic values’ ना बाराव्या शतकातच जन्माला घालतो; त्याच्याच मागेपुढे तिकडे इंग्लंडमध्ये राजेशाहीचे अधिकार कमी करून जनतेला अधिकार देण्यासाठी Magna Carta ही चळवळ सुरू होते… या दोन्ही घटनेच्या मागे एक समान सूत्र आहे, ते म्हणजे या आधुनिक मूल्यांची गरज. सामाजिक आणि राजकीय व्यवहारावर तिकडे चर्चचे आणि आपल्याकडे धर्माचे किती वर्चस्व होते, यावरही नजर टाकली तरीही या मूल्यांची गरज लक्षात येते.

आधुनिक मूल्ये ही लादली जात नाहीत. त्याआधी लोकशिक्षण महत्वाचं असते. लोकशिक्षणाच्या माध्यमातून या मूल्यांची भूक पेरली जाणं गरजेचं असते, ते काम संत नामदेवांनी कीर्तनाच्या माध्यमातून केलं. ‘नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी’ हा अभंग या समतेच्या चळवळीचा उद्घोष आहे. कारण, ज्ञानाचं लोकशाहीवरण होण्याची सुरुवातच या अभंगापासून होते.

पत्रकार आणि कीर्तनकार हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर म्हणतात, “ज्ञान देण्याचा आणि ज्ञान घेण्याचा जो अधिकार सीमित, मर्यादित ठेवण्यात आला होता, ती कोंडी फोडण्याचे काम नामदेव महाराजांनी वारकरी कीर्तन पद्धतीच्या माध्यमातून केले. “

अजूनही सर्वात जास्त आस्थेचा विषय असलेली गीता ही आजही अनेकदा ‘misquoted’ होत असते. माउलींनी ज्ञानेश्वरी लिहून भाषिक मक्तेदारीमधून तिला सोडवलं नसतं, तर तिचं मतलबी interpretation किती झालं असतं. याचा अंदाज घ्या. या घटना या ज्ञानाचे लोकशाहीकरण करणाऱ्या होत्या, हे मान्य करावच लागतं.

इथे एक गोष्ट लक्षात येते की, एका विशिष्ट जात समूहातील केवळ पुरुषांना वेदाध्ययनाचा अधिकार देणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेला नामदेवांनी दिलेले ‘क्रिएटिव्ह’ उत्तर आणि जनतेला दिलेला ‘डेमोक्रॅटिक’ पर्याय म्हणजे कीर्तन आहे. या कीर्तनाने महाराष्ट्राला, वारकऱ्यांना संत पंचायतन दिले. ते म्हणजे संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम आणि संत निळोबा महाराज पिंपळनेरकर.

या संतांनी आपापल्या काळात केलेल्या प्रबोधनामुळे केवळ वारकरी संप्रदायालाच नाही तर एकंदरीत महाराष्ट्राच्या समाजजीवनाच्या राजकीय, सांस्कृतिक बाजूंना एक भक्कम पाया दिला. त्यामुळे वारकरी संत परंपरेत सर्व जाती धर्माचे प्रतिनिधी दिसतात. वर्ण आणि वर्गव्यवस्थेच्या रचनेला आव्हान देताना स्त्री-पुरुष विषम व्यवस्थेलाही वारकऱ्यांना सुरुंग लावला. संत जनाबाई, कान्होपात्रा पासून तर बहिणाबाई पाठक यांच्यापर्यंत पाचशे वर्ष स्त्री-पुरुष समतेच्या विचारांचे कृतिशील सिंचन महाराष्ट्राच्या मनोभूमीचे झाले. यामुळे देशातील इतर प्रांतांच्या तुलनेत महाराष्ट्र पुरोगामी ठरतो.

वारकरी संतांनी केवळ लोकशाही मूल्यांची भूक जागवण्याचं काम केलं नाही, तर समाजाची एकंदरीत ‘मॅच्युरिटी’ किती ‘हाय पॉईंट’ वर नेली याचं एक उदाहरण बघा. नामदेवांच्या उत्तर भारत भ्रमणादरम्यान आणि ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीनंतर वारकरी संप्रदायाचं नेतृत्व जनाबाईंच्या हाती होतं. त्या जनाबाई आपल्या अभंगात ‘धरिला पंढरीचा चोर’ असं थेट पांडुरंगलाच चोर म्हणतात. पण त्यामागील त्यांची भावना समजून घेण्याइतकी Maturity समाजाची होती. देवाला चोर म्हंटलं म्हणून कुणाच्या भावना दुखावल्या नाहीत. नामदेव-ज्ञानेश्वरांनी ही मॅच्युरिटी डेव्हलप नसती केली तर गौरी लंकेश हत्याकांड तेव्हाच घडलं असतं.

वारकरी संतांनी आणि नंतर राजकीय विचारवंतांनी महाराष्ट्राची अशी मॅच्युरिटी विकसित केली नसती तर जगन्नाथ यात्रेचा मुद्दा जसा दोनदा सुप्रीम कोर्टात गेला, तसा आपल्या वारीचाही मुद्दा कोर्टात गेला असता. पण हा संतांचा महाराष्ट्र आहे. इथे संतांचा पांडुरंग आहे. त्या पांडुरंगाला कधी ताप येत नाही. टेथेस्कोप घेऊन कधी त्याचा ताप मोजावा लागत नाही. थंडीत त्याला स्वेटर लागत नाही. इतका समजदार देव आणि त्याचे समजदार भक्त असतील तर वारी कोर्टात कशी जाईल ! संतांच्या पालखी लोकवाहिनीत बसून पंढरीला गेल्या. इकडे वारकऱ्यांनी घरूनच पांडुरंगाचं दर्शन घेतलं.

यूपी, बिहार आणि गायपट्ट्यातली राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थिती आणि आपली परिस्थिती यांच्या दरम्यान कमरेवर हात ठेवून पांडुरंग उभा आहे. तो तसाच राहो ही आजची गरज आहे. संतसाहित्याच्या अभ्यासकांना संत कबीर आणि महाराष्ट्रातील संतांच्या विचारात समान सूत्र दिसते. संत कबिरांची पालखी पंढरीला येत असल्याचेही नोंद आहे. कबिरांनाही त्यांच्या प्रांतात एखादा पांडुरंग भेटला असता तर कदाचित त्यांच्या विचारांचा प्रवाह त्या प्रांतांच्या समाजात प्रतिबिंबित झाला असता.

संत हे साहित्यिक असतील आणि वारी हे जर साहित्य संमेलन तर पांडुरंग हा संमेलनाध्यक्ष आहे. लोकशाहीवादी आधुनिक मूल्यांचा आग्रह धरणारे आणि प्रबोधनाचे हे संमेलन आठशे वर्षे सुरू आहे, त्याचं श्रेय या संमेलनाध्यक्षाचेही आहेच की !

संतांनी डेव्हलप केलेली मॅच्युरिटी अबाधित राहावी. त्यासाठी परमत, परधर्म सहिष्णुता महत्वाची आहे. तसेच ही सहिष्णुता दुसऱ्यांच्या आस्थेबाबत बाळगणे गरजेचे आहे. सहिष्णुतेशिवाय प्रबोधनाच्या चळवळी व्यर्थ आहेत. आदर आणि सहिष्णुता नसेल तर प्रबोधन आणि विखार यात फार अंतर राहत नाही. जिथे तर्कशुद्ध विचारांची जागा तर्ककर्कश भाषा घेते, तिथे नवविचारांची स्वीकारार्हता कमी होते. परिणामी प्रबोधनाचा उद्देश साध्य होत नाही. ही परिस्थिती मग सनातन, मागास आणि द्वेषमूलक व्यवस्थेच्या जीर्णमतवाद्यांना फायद्याची ठरते.

ही परिस्थिती टाळण्यासाठी स्वामी विवेकानंद नोव्हेंबर 1893 मध्ये अमेरिकेतून आपल्या शिष्यांना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘आजपर्यंतच्या सर्व धर्मसुधारकांचे आणि परिवर्तनवादी तरुणांचे प्रयत्न फसले. कारण त्यांनी धर्मावर आघात केला. आपल्याला धर्माचा आधार घेऊन धर्मातील अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल.”

आपले भाऊ महेंद्रनाथ यांना सांगताना एके ठिकाणी स्वामी विवेकानंद म्हणतात, “धर्मवेडासारखा मानवी मनाला होणारा दुसरा भयावह रोग नाही. मी धर्माचे वेड पांघरलेला विचारवंत आहे”.

नामदेवांपासून तर ज्ञानेश्वर, एकनाथ-तुकोबापर्यंत ही संतमंडळी तरी इतर दुसरे कोण आहेत ? धर्माचे वेड पांघरलेले विचारवंतच ना !!!

(लेखक ‘मीडिया वॉच’ नियतकालिक व वेब पोर्टलचे उपसंपादक आहेत)

84088 58561

 

Previous articleवारी: सामुदायिक सदाचाराचा अमीट संस्कार
Next articleएसटी जगवा, ही तो विठुरायाची इच्छा!!
अविनाश दुधे - मराठी पत्रकारितेतील एक आघाडीचे नाव . लोकमत , तरुण भारत , दैनिक पुण्यनगरी आदी दैनिकात जिल्हा वार्ताहर ते संपादक पदापर्यंतचा प्रवास . साप्ताहिक 'चित्रलेखा' चे सहा वर्ष विदर्भ ब्युरो चीफ . रोखठोक व विषयाला थेट भिडणारी लेखनशैली, आसारामबापूपासून भैय्यू महाराजांपर्यंत अनेकांच्या कार्यपद्धतीवर थेट प्रहार करणारा पत्रकार . अनेक ढोंगी बुवा , महाराज व राजकारण्यांचा भांडाफोड . 'आमदार सौभाग्यवती' आणि 'मीडिया वॉच' ही पुस्तके प्रकाशित. अनेक प्रतिष्ठित पुरस्काराचे मानकरी. सध्या 'मीडिया वॉच' अनियतकालिक , दिवाळी अंक व वेब पोर्टलचे संपादक.